'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Tuesday 13 September 2016

सांगे भूमीचे मार्दव

आळंदी देवस्थानचे विश्वस्त प्राचार्य शिवाजीराव मोहिते यांच्या आग्रहाखातर चाकणचे मामासाहेब शिंदे यांच्यावरील गौरव विशेषांकात लेख लिहिला होता, माझ्या आजोळाविषयी. खेड अर्थात राजगुरुनगरविषयी. जून २०१४मध्ये लिहिलेला हा लेख आत्ता ब्लॉगवर टाकतोय...


पुण्याहून नाशिकच्या दिशेनं जात असताना वाटेत खेडच्या भीमा नदीवरचा पूल लागतो. गाडीतून पुलाखालचं नदीचं विस्तीर्ण पात्र दिसत राहतं. मी मनोमन हात जोडतो. भावूक होतो. खेड माझं आजोळ. पांढराशुभ्र फेटा घातलेले मायाळू, सावळे आजोबा डोळ्यासमोर तरळतात. आजीचे जिथे अंत्यसंस्कार झाले ती नदीतली जागा मी गाडीतून वळून वळून पाहतो. भीमेच्या याच पुलावर मोटरगाडीला बिचकून आमच्या गाभण गायीनं उडी मारली होती. नदीपात्रात पडताच ती व्याली. गोजीरवाण्या वासराला जन्म देऊन जीव सोडला. त्या वासराचं नाव नंद्या. पुढं तो आयुष्यभर आमच्यासोबत शेतात राबला. माझी नाळच या खेडच्या मातीत पुरली आहे. माऊली-तुकोबारायांची पालखी आषाढी वारीच्या वाटेवर असताना माझा जन्म झाला. हे रम्य आजोळ निवांत क्षणी आठवत राहतं. महानगरी धावपळीतही डोळ्यासमोर येत राहतं. मुंबईत मंत्रालयासमोर गेलो की, मला खेडची हमखास आठवण येते.

मंत्रालयासमोरच्या चौकातून जाताना 'हुतात्मा राजगुरू चौक' नावाची पाटी दिसते. मला खेडचं एसटी स्टँड आठवतं. तिथला छत्रीखालचा हुतात्मा राजगुरुंचा अर्धपुतळा आठवतो. इतिहासाच्या पुस्तकातील भगतसिंग, सुखदेव या क्रांतीकारकांच्या रांगेतील राजगुरू आठवतात. मंत्रालयावर फडकणार्‍या तिरंग्याशी खेडच्या असलेल्या या नात्यानं छाती अभिमानानं फुलून येते. राजगुरूंच्या बलिदानानंतर त्यांच्या स्मरणार्थ खेडचं नाव राजगुरुनगर झालं. त्याही पूर्वी ते होतं प्राचीन समृद्ध नाणेघाट मार्गावरचं खेटकग्राम. याच मार्गानं भारतीय माल परदेशात गेला. उत्तरेतल्या सम्राटांच्या फौजा दक्षिणेत आल्या. त्या अर्थानं परस्पर देवाणघेवाणीतून एक भारतीय आणि जागतीक संस्कृतीच खेडमध्ये रुजली. खरं तर त्याही पूर्वी भीमेकाठचा हा मावळी प्रदेश सर्वांगांनी समृद्ध होता.

या मातीतल्या चिवट मावळयांनीच शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी साथ दिली. आणखी उलगडून सांगायचं तर उत्तम मशागत झालेल्या या मातीतूनच शिवरायांसारख्या रयतेच्या महान राजानं जन्म घेतला. ही मशागत केली होती, संतांच्या विचारांनी. इंद्रायणीच्या काठी जन्मलेल्या संत ज्ञानदेव आणि संत तुकोबांनी अन्यायाविरुद्ध बंडाचा झेंडा उभारण्याचा संदेश दिला. तो सांगण्यासाठी आचार्य अत्र्यांच्या शब्दांचा मोह आवरत नाही. त्यांची सासुरवाडी खेडमधल्या चासकमानची. ते म्हणतात, "धर्ममार्तंडांनी आणि पंडितांनी धर्माची तत्त्वे आणि विद्या ब्राम्हणांच्या किल्ल्यांत आणि संस्कृताच्या कड्याकुलुपात बंदिस्त करून जनतेला वर्षानुवर्षे अज्ञानात आणि दास्यात ठेवले. त्याविरुद्ध ज्ञानेश्वरांनी इंद्रायणीकाठी बंडाचा झेंडा प्रथम उभारला आणि ते ज्ञानाचे आणि विद्येचे भांडार मराठी भाषेत वाहून घरोघर पोहोचते केले. परकीय मोगल सत्तेच्या महापुरात अवघे महाराष्ट्र भूमंडळ बुडून सर्व मराठी बुद्धी आणि कर्तबगारी नामशेष होण्याची पाळी आली तेव्हा त्या सत्तेविरुद्ध बंडाचा भगवा झेंडा तोरणागडावर उभारण्यासाठी हातात भवानी तलवार घेऊन आणि कृष्णा घोडीवर स्वार होऊन महाराष्ट्राचा पहिला बंडखोर छत्रपती अवतीर्ण झाला. वेदस्थापित धर्माचे देव्हारे माजवून, वर्णश्रेष्ठत्वाचे पोकळ नगारे वाजवून, टिळे टोपी घालणार्‍या आणि साधुत्वाचा आव आणणार्‍या दांभिकांनी जेव्हा महाराष्ट्रातील अडाणी बहुजनांना आत्मोद्धाराचे सारे मार्ग बंद करून टाकले, तेव्हा इंद्रायणीच्या काठी भंडा-याच्या डोंगरावर एका देहूच्या वाण्याने बंडाची पताका उभारली आणि नुसत्या नामसंकीर्तनाच्या सामर्थ्यावर वैकुंठपेठ खाली ओढून आणण्याचा अभंगमंत्र महाराष्ट्राला दिला. 

अहो, आम्हा महाराष्ट्रातल्या माणसांचे केवढे हे भाग्य की, इंद्रायणीच्या काठी शूद्र कुळात जन्माला आलेला एक सत्पुरुष गेली तीनशे वर्षे सतत आपल्या हातांनी आमच्या डोळ्यांमधले अश्रू पुसत आहे आणि आपल्या अभंगवाणीने आम्हाला आशा देऊन, धीर देऊन, जागृती देऊन, आमचा उद्धार करीत आहे! या महाराष्ट्रातले लक्षावधी भोळेभाबडे, अडाणी आणि गरीब प्रापंचिक लोक गेली तीनशे वर्षे तुकारामाची भाषा बोलत आहेत आणि तुकारामाचे तत्त्वज्ञान सांगत आहेत. एवढ्या साध्या, सुबोध आणि रसाळ भाषेत संसाराचे सार इतके सोपे करून या जगात कुठे कोणी तरी सांगितले असेल काय हो?’'ज्ञानोबा-तुकोबांच्या या भूमीतूनच स्वराज्याची निर्मिती का झाली, इथूनच पंढपूरची वारी कशी निर्माण झाली, याची उत्तरे अत्र्यांच्या या उस्फूर्त उद्गागारात सापडतात. या बंडाची प्रेरणा पुढे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अगदी हुतात्मा राजगुरु, नारायण मेघाजी लोखंडे, नामदेव ढसाळ यांना मिळाली.

नाशिक हायवेवरून जाताना खेड परिसरातील स्त्याकडेला बाराही महिने जी हिरवीगार शेते डोलताना दिसतात, ती बहरलीत इथल्या माळी आणि शेतकरी समाजाच्या घामातून. याच मंडळीनी महात्मा जोतिबा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीला बळ दिलं. मुंबईच्या भग्न कापड गिरण्यांमधून फिरत असताना तिथं अहोरात्र राबणारे महाराष्ट्रभरातले कामगार आठवत होते. या कामगारांची पहिली संघटना बांधून त्यांना न्याय मिळवून देणारे आद्य कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे खेडमधल्या पूर कनेरसर गावचे. पानाफुलांत रमलेल्या मराठी साहित्याला आपल्या रांगडया भाषेनं घाम फोडून समृद्ध करणारे कवी नामदेव ढसाळ या कनेरसर गावचेच. गावच्या आठवणीने ते हळवे होत. त्यांची आई न् माझी आजी मैत्रिणी होत्या. योगायोगानं ढसाळांच्या कविता मी खेडच्या कॉलेजात प्राध्यापक असताना शिकवल्या. ढसाळाच्या घरची मुलं वर्गात होती. त्यांना विचारलं ढसाळाच्या कविता वाचल्यात का? तर नाही म्हणाले! ढसाळाना हा किस्सा सांगितला तर हसले नुसते. असो. याच गावाने भारताला यशवंत चंद्रचुडांसारखे सरन्यायाधीश दिले.  


पानिपतावर लढायला मराठ्यांची फौज निघाली तेव्हा खेडमधील शेतकरी सरदार बळवंतराव महेंदळे यांच्या फौजेत कंबर कसून उभे राहिले होते. असे भक्ती आणि शक्तीने पावन झालेले माझे आजोळ. नितांतसुंदर मराठी साहित्य लिहिणार्‍या कवयत्री शांता शेळके यांचं आजोळही खेडच. त्यांनी त्यांच्या धूळपाटी या आत्मचरित्रात खेडचं रमणीय वर्णन केलंय. खेडच्या वेशीवरचा मारुती असो निमगाव-खरपुडीचा कुलदैवत खंडोबा असो की, तालुक्यातील आळंदीचं माऊलींचं मंदीर किंवा जिथं तुकारामबाबांना अभंग सुचले तो भामचंद्र डोंगर असो, त्यांच्या नुसत्या दर्शनानं मन उचंबळून येतं.

खेडच्या शिवारातल्या भुईमुगाच्या शेंगा, बाजरीच्या भाकरीची खरपूस चव जगात सापडायची नाही.


तुकोबारायांनीच सांगितलंय, इथली माणसं मेणाहून मऊ आणि प्रसंगी वज्राहून कठोर. एरवी उग्र चेहर्‍याने फिरणारे पोलिस आषाढी-कार्तिकीला भाविक होतात. पोलिस स्टेशनच्या आवारात दत्तजयंती साजरी करतात. दरवर्षी श्री दत्तासमोर होणारं माझ्या वारकरी वडिलांचे कीर्तन मनोभावे ऐकतात. माऊली एके ठिकाणी म्हणतात, 'की भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव'...खेडची भूमी आणि इथल्या माणसांचं वर्णन माऊलींच्या याच शब्दांत करता येईल. ही सारी परंपरा, वारसा खेड तालुक्यानं जोपासला आहे. कुमंडला नदीकाठच्या कडूस गावात होणार्‍या तुकाराममहाराजांचे टाळकरी गंगारामबुवा मवाळ यांच्या उत्सवाला पुणे-मुंबईकर आवर्जून सहकुटुंब येतात.


पण भीमेकाठचं खेड आता पूर्वीचं राहिलं नाही. या तालुक्याच्या गावाचं आता शहरात रुपांतर होतंय. गावातून जाणारा हायवे चार पदरी झालाय. गावाशेजारी एसईझेड उभं राहिलंय. आता लवकरच विमानतळही उभं राहील. त्यामुळं जमिनींना सोन्याचा भाव आलाय. आर्थिक सुबत्तेच्या खुणा परिसरावर दिसू लागल्यात. परिसरासोबत माणसंही बदलू लागलीत. पैशासोबत येणार्‍या दुखण्याची बाधा त्यांना होऊ लागलीय. त्यावर उतारा म्हणून ज्ञानोबा-तुकोबांच्या या भूमीत बाबा-बुवांच्या नकली पंथांची दुकानदारी सुरू झालीय. जगाला स्फूर्ती देणार्‍या माझ्या या आजोळभूमीला कुणाची दृष्ट लागो नये, हीच माऊली-तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना.
No comments:

Post a Comment