'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Wednesday 18 December 2013

एकच फाईट वातावरण टाईट!

आपण सिनेमातल्या 'दबंग' आणि 'सिंघम'चं कौतुक करतो. खऱ्या आयुष्यात त्यांनी लावलेले दिवे दिसतातच. पण असा खराखुरा दबंग बिहार राज्याला भेटलाय. त्याचं नाव शिवदीप लांडे. अस्सल मराठमोळा गडी. मी त्याच्याविषयी लिहिलं. 'चित्रलेखा'नं त्याची कव्हरस्टोरी केली. त्याची ही गोष्ट...


एकच फाईट वातावरण टाईट.. एक घाव शंभर तुकडे, अर्धे इकडे अर्धे तिकडे.. सोडली एकच गोळी, खल्लास अख्खी टोळी.., एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात, भाऊचा नाद केल्यास हातपाय गळ्यात.. असेल औकात तर भेट चौकात.. सर्व मुलींचा दावा आहे, अमुक तमुक भाऊ छावा आहे.. तुमच्यासाठी कायपण, कधीपण, कुठेपण!!!”... सध्या सोशल नेटवर्कवर धुमाकूळ घालणाऱ्या आणि हजारोंनी शेयर, लाईक्स होणाऱ्या या कॅचलाईन्स. या सगळ्या घोषणा जणू एकाच जिगरबाज मर्दासाठी बनवल्या असाव्यात. तसा दे दणका दराराच निर्माण केलाय त्यानं. तोही थेट गुंडाराज बिहारमध्ये. नाठाळ बिहारींना त्यानं आपल्या दबंगगिरीनं वठणीवर आणलंय. बिहारला सुतासारखं सरळ करणाऱ्या या मराठी वाघाचं नाव आहे, पोलीस कमिशनर शिवदीप वामन लांडे. 

त्यांच्यामुळं जब तक है समोसे में आलू तब तक है बिहार में लालू ही घोषणा आता लोक विसरलेत. एवढंच नाही तर मुख्यमंत्री नीतिशकुमारांनाही मागं टाकेल एवढी लोकप्रियता या पोलीस अधिकाऱ्याला मिळालीय. हा हँडसम ऑफिसर बिहारी तरुणाईच्या मोबाईलचा स्क्रीनसेव्हरच बनलाय. केवळ तरुणांच्याच नाही तर कुठल्याही सामान्य बिहारी माणसाच्या मोबाईलमध्ये शिवदीप लांडेंचा नंबर असतो. रस्त्यात कुणी छेड काढण्याचा प्रयत्न केला तर मुली थेट एसपी लांडेंना फोन लावतात. लांडे त्यांचा ठावठिकाणा विचारतात आणि पाचच मिनिटांत त्यांची जिप्सी भरधाव वेगानं तिथं जाऊन धडकते. मग सुरु होते त्या छेड काढणाऱ्यांची धुलाई... चौकातल्या एखाद्या गरीब रिक्षावाल्याला मारहाण करून सत्ताधारी आमदाराचा दिवटा बेमुर्वतपणे निघून गेलेला असतो. बघ्यांपैकी कुणीतरी एसपी लांडेंना फोन करतं. लांडे चपळाईनं हालचाल करतात. पाठलाग करून त्या बडे बाप के बेटाला गाठतात. जिप्सित घालून पुन्हा त्या चौकात आणतात. गरीब रिक्षावाल्याची माफी मागायला लावून पब्लीकसमोरच धुलाई करतात...
मस्तवाल राजकारण्यांना त्यांची जागा दाखवणं असो की खाणमाफिया किंवा नक्षलवाद्यांचा बंदोबस्त असो बिहारमध्ये शिवदीप लांडेंनी जी सिंघमगिरी केलीय, तिला तोड नाही. लोकप्रियता तर एवढी मिळालीय की, तिथल्या घराघरांत शिवदीप लांडेंचे फोटो लावले गेलेत. त्यांच्या दखल घेत मुख्यमंत्री नीतिशकुमारांनी त्यांना राजधानी पाटण्याचं एसपी बनवलं. विशेष म्हणजे हे सगळं होत होतं, जेव्हा मुंबईत मराठी विरुद्ध बिहारी अशा संघर्षानं टोक गाठलं होतं!

शिवदीप यांना आठवतो ट्रेनिंगनंतरचा तो पहिला दिवस.. त्या दिवशी देशातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या त्यांच्या आठजणांच्या बॅचला विचारण्यात आलं, तुम्हाला बिहारमधल्या कोणत्या जिल्ह्यात पोस्टिंग हवं आहे? कुणी मागितलं भागलपूर, कुणी पाटणा तर कुणी मुजफ्फरपूर. ही सगळी मोठी शहरं. शिवदीप म्हणाले, ‘मला कुठंही पाठवा!इतरांना त्यांचा चॉईस मिळाला. शिवदीप यांना मिळाला मुंगेर जिल्हा. हेडक्वार्टरहून गाड्या निघतानाच ड्रायव्हर म्हणाला, ‘साहब, आपने मुंगेर क्यूँ चुना? बहोत खराब जगह है साहब. शांतीसे ट्रेनिंग पूरा करके बचके निकलो...शिवदीप सांगतात, “मला आठवतं,पाटण्यापासून मुंगेर १९० किलोमीटरवर आहे. मुंगेर जसजसं जवळ येईल तसतशी सर्वांच्या चेहऱ्यावरची भीती गडद होत होती. पुढं गेल्यावर तर ड्रायव्हरनं गाडीवरचा लाल दिवाही काढून टाकला. पाटी झाकून टाकली. गावात पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. सर्वत्र विचित्र शांतता पसरलेली होती. एकदम शुकशुकाट. मला घ्यायला आलेल्यांच्या चेहऱ्यावर भेदरलेपण स्पष्ट दिसत होतं. मग मला एका स्मशानशांतता असलेल्या किल्ल्यासारख्या सर्कीट हाऊसवर नेण्यात आलं. तिथं फक्त कावळ्यांची काव काव ऐकू येत होती. मी जेवण करून झोपलो बिनधास्त. 

सकाळी पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो. प्रत्येक आयपीएस अधिकाऱ्याला प्रोबेशनच्या काळात संबंधीत पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबलपासून ते एसपीपर्यंतच्या भूमिका बजवाव्या लागतात. किमान साडेतीन महिने पोलीस स्टेशन स्वतंत्रपणे हाताळावं लागतं. एसपी म्हणाले, ‘या फिरून गावातून’.. गावात गेलो न् मला देशभर चर्चेचा विषय असलेल्या बिहारच्या गुन्हेगारीचं प्रातिनिधीक दर्शन घडलं. तिथं उघड्यावर बंदुकांची दुकानं मांडलेली होती. गावठी कट्ट्यापासून ते एके ५६ पर्यंत सर्व प्रकारची हत्यारं खेळण्यांसारखी दुकानात टांगली होती. फक्त ऑर्डर करायची! मी सहज विचारलं, ‘या दुकानांना परवाना आहे का?’ तर ते माझ्याकडं पाहून छद्मी हसले. नंतर समजलं, बेकायदेशीर हत्यारं बनवणारा मुंगेर हा बिहारमधला कुप्रसिद्ध जिल्हा आहे. अशी हत्यारं बनवणारी एक मोठी फॅक्टरीही तिथं होती. खरं तर बिहारमध्ये असं खुलेआम हत्यारं बाळगण्याचं कल्चरच आहे. एक वेळ घरी खायला भाकरी नसली तरी चालेल पण बंदूक पाहिजे. एखाद्या लग्नातही गेलं तरी वरातीत सगळे बंदूकवाले हवेत बार काढत नाचत असतात. आपल्या हिंदी सिनेमांमध्ये दाखवतात ना, त्याहीपेक्षाही भारी सीन.. तिथंच मुंगेरचे एसपी के. सी. सुरेंद्रबाबू यांची २००५मध्ये हत्या करण्यात आली होती. दोन डीएसपी तसेच कितीतरी ठाणेदार आणि पोलीस शिपायांना ठार करण्यात आलं होतं. मी ज्या दिवशी ड्युटी जॉईन केली त्याच्या एक महिना आधी ३१ डिसेंबरला आठ पोलिसांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. मग सगळा प्रकार लक्षात आला. माझ्या स्वागताला आलेल्यांचे चेहरे भेदरलेले का होते ते...’’


शिवदीप लांडे यांनी मग हे सारं गांभीर्यानं घेतलं. परिस्थितीचा बारकाईनं अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, तिथली इकॉनॉमी या सगळ्याला कारणीभूत आहे. मुंगेरमधलं सगळं अर्थकारण स्टोनमाफिया आणि वाळूमाफिया चालवत होते. मुंगेरच्या रिझर्व फॉरेस्टमधल्या डोंगरांमध्ये दगडाच्या खाणी खोदणं आणि गंगेच्या पात्रातली वाळू बेकायदेशीरपणे उकरणं हे तिथले बेकायदा धंदे. यात अनेकांचे हितसंबंध गुंतलेले होते. सर्वात विशेष म्हणजे देशात कुठंही घडत नाही असला प्रकार तिथं वारंवार व्हायचा. तो म्हणजे पोलिसांवर सर्रास फायरिंग व्हायचं. वाळू किंवा दगड वाहतूक करणाऱ्या ट्रकला पोलिसांनी हात दाखवला की माफिया पोलिसांना सरळ उडवायचेच. लांडेंनी मग पहिल्यांदा तिथं पोलिसिंग सुरू केलं. स्टोन माफियांच्या विरोधात मोहीमच उघडली. हायवेनं जाणारे ट्रक अडवायचे. ड्रायव्हरला खाली ओढून ठोकून काढायचं, असा एककलमी कार्यक्रम लावला. दहशतीला दहशतीनं उत्तर देणं हीच तिथली गरज होती. म्हणून एसपी लांडेंनी रांगडं रूप धारण केलं. 

सकाळी निघताना जिप्सीत पाच सहा डंडे घेऊन जायचं आणि ते तुटल्यावरच घरी यायचं, असा काही दिवस नित्यक्रम ठेवला. हळू हळू एसपी लांडे या नावाची परिसरात दहशत निर्माण झाली. पण हे करताना त्यांनी एक गोष्ट अत्यंत जाणीवपूर्वक केली आणि ती म्हणजे सर्वसामान्य माणसांचा विश्वास संपादन केला. पोलीस जे काही करतायत ते आपल्या भल्यासाठीच, अशी जाणीव त्यांच्यात निर्माण केली. त्यांच्या मनातली माफियांविषयीची भीती घालवली. पोलीस संकटात मदतीला धावतात, याचा अनुभव दिला. जिथं ठाणेदार किंवा साध्या पोलीस शिपायाला भेटण्यासाठी लोकांना वारंवार हेलपाटे मारायला लागायचे तिथं एसपी लांडेंनी त्यांचा खासगी मोबाईल नंबर सर्वांसाठी खुला करून दिला. अगदी रात्री बेरात्रीही कुणा नागरिकाचा फोन आला की अगदी पहिल्याच रिंगमध्ये तो उचलायचा. युनिफॉर्म चढवून तातडीनं घटनास्थळी पोहोचायचं. अत्याचार करणाऱ्यांना लगेच भिडायचं, असा शिरस्ता ठेवला. 

त्यामुळं सर्वसामान्य बिहारी माणसांना हा आपला तारणहार आहे, असं वाटू लागलं. लांडेंच्या सहकाऱ्यांमधलीही धास्ती पळाली. ते अलर्ट झाले. कामाला लागले. तरीही जे ढिम्म हलले नाहीत, त्यांना लांडेंनी सस्पेंडचा बडगा दाखवला. यामुळं स्टोनमाफियांना वेसन घातली गेली. गुन्हेगारीला पुरवला जाणाऱ्या पैशाचा ओघ तोडला गेला. मग स्टोनमाफियांनी वेगळाच पवित्रा घेतला. लांडे मराठी असल्याचं भांडवल केलं. ते बिहारींविरुद्धच्या आकसानं हे सगळं करत असल्याचा आरोप करत कोर्टात चार केसेस टाकल्या. कारण त्या वेळी मुंबईत मनसेची बिहारींविरुद्धचं आंदोलन जोरात सुरू होतं. 
राज ठाकरे बिहारींना तिथं मारतात आणि हे इथं येऊन बिहारींना मारतात, असं सांगून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न झाला. तिथल्या मीडियानंही ते उचलून धरलं. कारण साऱ्यांचे आर्थिक हितसंबंध त्यात अडकलेले होते. मुंगेरमधली रोजची दगड, वाळूची एक हजार ट्रक्सची बेकायदा वाहतूक बंद पडली होती. या ट्रक्सचे ड्रायव्हर तर गाडीत बसायलाही तयार होत नव्हते. कारण त्यांना असा पोलिसी प्रसाद मिळाला होता की, त्यांना नीट बुडावर बसताही येत नव्हतं. आपण काही तरी चुकीचं करतोय याची जाणीव त्यांना उठता बसता होऊ लागली. लोकांना भडकावण्याचा प्रयत्न झाला खरा पण बहुदा पहिल्यांदा असं झालं असावं की, लोकांनी ना मीडियावर विश्वास ठेवला ना कोर्टावर. ती केवळ पोलिसी कारवाई राहिली नाही तर ती सामान्य लोकांची चळवळ बनली. कारण तिथं माफिया होते, १० टक्के आणि सामान्य माणसं होती ९० टक्के. त्यांच्यातील आत्मविश्वास जागा केल्यावर काय होऊ शकतं, याचं प्रत्यंतर मुंगेरमध्ये पाहायला मिळालं.

शिवदीप यांना केवळ माफिया आणि गावगुंडांचाच नाही तर जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांचाही सामना करावा लागला. तिथं जम्मुई आणि बांका या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी कारवायांचा जोर आहे. हे नक्षलवादी आणि स्टोनमाफियांचं साटं लोटं असतं. कारण नक्षलवाद्यांना लागणारे पैसे हे माफिया पुरवतात. शिवदीप लांडे बेधडक जंगलात घुसून नक्षलवाद्यांच्या मागं लागायचे. दहा दहा दिवस जंगलातच राहायचे. पण नक्षलवाद्यांनी त्यांना उलट टार्गेट केलं नाही. कारण लांडे सर्वसामान्य, गोरगरीब माणसांसाठी झटतायत हे त्यांच्या लक्षात आलं होतं. अर्थात लांडेंच्या शत्रूंनी त्यांना अनेकदा मृत्यूच्या खिंडीत गाठायचा प्रयत्न केला. मुंगेरमध्ये तर ते तीनदा जीवावरच्या संकटातून वाचले. 

त्यांच्या आठवणीतून एक घटना अजूनही जात नाही. जमालपूरचा धरारा परिसरातील तो मतदानाचा दिवस होता. दिवसभराचं मतदान संपलं होतं. संध्याकाळ झाली होती. सकाळीच नक्षलवाद्यांनी मतदानाला विरोध करणारे काळे बॅनर फडकवले होते. त्या दहशतीच्या वातावरणात शिवदीप यांनी नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता. ड्युटी बजावून लांडे जिप्सी घेऊन निघाले. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला वाहणारी नदी अशा हेरूदियारा गावाजवळच्या हायवेवरून ते जात होते. नेहमीप्रमाणं स्वत:च जिप्सी चालवत होते. समोरच्या टर्नवर उभा असलेला ट्रक त्यांना दिसत होता. अचानक ट्रक सुरू झाला आणि भरधाव वेगानं समोरून येऊ लागला. दरीच्या कडेनं जाणाऱ्या लांडेंच्या जिप्सीला त्यानं सरळ समोरून जोरदार धडक दिली. आठ नऊ पलट्या खाऊन जिप्सी दरीत कोसळली. लांडेंनी डोळे उघडले तेव्हा त्यांना भोवती लोक जमलेले दिसले.
लांडे सांगतात, “माझ्या छातीवर चेपून दामटी झालेली जिप्सी पडलेली होती. गॉगल वाकडा झाला होता. माझे बाकीचे गार्ड बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. मी कपडे झटकत उठलो. साधं खरचटलंदेखील नव्हतं. गार्डना घेऊन आयसीयूत दाखल केलं. मुंगेरमधील सामान्य बिहारी लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असावेत. मी या घटनेची बातमी होऊ दिली नाही. नाही तर तीनॅशनल न्यूज झाली असती. घरी आईला समजलं असतं. त्या निवडणुकीत चांगले उमेदवारच निवडून आले. नक्षलवाद्यांचे उमदवार पडले.

लांडेंची कीर्ती मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्या कानावर गेली. त्यांनी राजधानी पाटणाचे सीटी एसपी म्हणून लांडेंची नियुक्ती केली. ज्या दिवशी बदली झाली त्याच दिवशी लांडे यांनी मुंगेर सोडलं. त्यांची जिप्सी रस्त्यानं जात होती तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा सुमारे सहा किलोमीटर लोक फुलांचे हार घेऊन उभे होते. बायाबापड्या शेतातली कामं सोडून लांडेंना फुलं द्यायला आल्या होत्या. त्यांची जिप्सी फुलांनी भरून वाहत होती. गावाच्या बाहेर पडायलाच त्यांना सहा तास लागले.

राजधानी पाटणात फेरफटका मारल्यावर परिस्थिती लांडेच्या लगेचच लक्षात आली. रोडरोमियोंचा, बाईकर्सचा रोज दारू पिऊन रस्त्यात धिंगाणा सुरू होता. बेकायदेशीर धंदयांना ऊत आला होता. पोलिसांनी कुणाला आत टाकलं तर लगेचच कुणा थोरामोठ्याचा फोन यायचा. रस्त्यावर महिलांची छेडछाड, रिक्षाचालक, फेरीवाल्यांना मारहाण हे तर नेहमीचंच झालं होतं. मग तिथं लांडेंनी जोरदार दबंगगिरी सुरू केली. आपला मोबाईल नंबर सर्वांसाठी खुला केला. तक्रार काहीही असो, थेट फोन करा!रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींचे फोन येऊ लागले. तीन चार बाईकर्स त्रास देतायत... लांडे विचारायचे, ‘बाई तू कुठं आहेस? त्या हिरोंना सहा-सात मिनिटं गुंगवून ठेव, मी आलोच...की, जिप्सी घेऊन एसपी लांडे पाचच मिनिटांत तिथं हजर. पोरांना वाटायचं हे नेहमीचेच पोलीस..यांना काय भ्यायचं..लांडेंकडं असं तुच्छ नजरेनं पाहत असताना, खाडकन् एखाद्याच्या मुस्काटात बसायची. मग काही समजायच्या आत अख्ख्या टोळीची बेदम धुलाई...नंतर पोलीस बोलावून सर्वांची मिरवणूक पोलीस स्टेशनमध्ये. तरीही पोट्टे एकदम कॉन्फिडन्ट. 
आपल्यासाठी नक्की फोन येणार म्हणून. एक दोन नेत्यांनी फोन लावूनही पाहिले. तर त्यांना झटकाच बसला. ना मै भडवोंकी सुनता हूँ, ना भडवेगिरी करता हूँ.. शेर की तरह बैठा हूँ.. आना हो तो आ जाओ.. नियम के साथ सब हो जाएगा...’, समोरून एसपी लांडेंची  अशी डरकाळी ऐकून भल्या भल्या नेत्यांची टरकली. हा बाबा आपल्याला फोनवरूनच भडवा म्हणतोय. प्रत्यक्षात काय करील...कशाला अब्रू दवडा. शिवाय याला आणलाय थेट सीएमनं. उगाच भानगड नको, म्हणून पुढारी गप्प बसले. लांडेंनीही याबाबतीत अकारण शो शायनिंग केली नाही. डोक्यात हवा जाऊ दिली नाही. पोरांना उगाचच मारपीट केली नाही. प्रत्येक वेळी त्यांना सुधारण्याची संधी दिली. त्यांच्यावर एफआयआर नोंदवला नाही. कारण पुढं त्यांना नोकरी मिळण्यात अडचण आली असती. जी परिस्थिती माणसाला गुन्हेगार बनवते ती परिस्थितीच बदलवण्यावर लांडेंचा भरवसा आहे. पोलीस स्टेशनमध्ये या मुलांचे पालक यायचे. लांडे त्यांना समजावायचे. पोरांना तंबी द्यायचे. या पद्धतीचा मोठा सकारात्मक परिणाम झाला. पोरं त्यांची फॅन बनली. यह एसपी पिटता है और मदत भी करता है...किसीके बाप की सुनता नही है..सब कायदे से करता है...अशी पाटण्यात त्यांच्याविषयी चर्चा होऊ लागली.

 अर्थात यातही माज दाखवणारे सत्ताधारी रगील दोडके होतेच. एका सत्तारुढ आमदाराचा दिवटा त्याच्या मित्रांसोबत स्कॉर्पिओ घेऊन पाटण्याच्या रस्त्यावरून भरधाव जात होता. एक हाफ चड्डी आणि फाटकं बनियन घातलेला, अनवाणी रिक्षावाला त्यांच्या गाडीच्या समोर आला. डाक बंगला नावाचा तो पाटण्यातील वर्दळीचा चौक. ही टप्पोरी गँग गाडीच्या खाली उतरली. आणि त्यांनी त्या बिचाऱ्या रिक्षावाल्याला बेदम मारायला सुरुवात केली. लोक जमले. गर्दीतल्या कुणी तरी लांडेंना फोन लावला... बेचारा बुरी तरहसे पीटा जा रहा है.. देखा नही जाता..थोड्याच वेळात लांडे तिथं हजर. तोपर्यंत ते टगे सटकले होते. रिक्षावाल्याने दाखवलेल्या दिशेने लांडे निघाले. वायरलेसवरून संदेश दिला. त्या पोरांना गाठलं. गाडीत घालून पुन्हा त्याच चौकात आणलं. तोपर्यंत चौकात तोबा गर्दी.. मीडियाचे कॅमेरे.. लांडेंनी मीडियावाल्यांना विनंती करून कॅमेरे खाली करायला लावले. टग्यांना त्या रिक्षावाल्याची माफी मागायला लावली. नाही म्हणताच, सर्वांसमोर त्यांना धू धू धुतलं. लांडे म्हणतात,‘त्या क्षणी त्या रिक्षावाल्याच्या डोळ्यातले आधार मिळाल्याचे अश्रू मी पाहिले. मला तेच माझं रिवॉर्ड वाटलं...

लांडेंनी पाटण्यातले नाना प्रकारचे बेकायदा धंदे उखडून काढले. फेक मेडसीन रॅकेट, सेक्स रॅकेट, ब्युटीपार्लर रॅकेट, सायबर रॅकेट, जेलमधली गुन्हेगारी यांचा बीमोड केला. त्या दहा महिन्यांत लांडे मीडियाचे हिरो बनले. पेपरची चार चार पानं त्यांच्यादबंगगिरीच्या बातम्यांनी सजू लागली. जातील तिथं स्वाक्षरीसाठी तरुणांची झुंबड उडू लागली. खरं वाटणार नाही पण लांडेंनी त्या काळात अगदी लालूप्रसाद आणि नीतिशकुमार यांनाही प्रसिद्धीत मागं टाकलं. विशेष म्हणजे ही प्रसिद्धी आणि क्रेझ अजूनही कायम आहे.

त्यानंतर लांडेंची बदली झाली, अरारिया जिल्ह्यात. जिथं पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी जायला राजी नसतात तो नेपाळ बॉर्डरवरचा धुमसता मुस्लिमबहुल जिल्हा म्हणजे अरारिया! तिथं २८ लाख लोकसंख्येत २२ लाख मुस्लिम आहेत. सामाजिक वातावरण नेहमीच बिघडलेलं. लांडे जॉईन होण्यापूर्वी पोलीस गोळीबारात चार मुस्लिम लोक मारले गेले होते. शिवाय अरारिया हा जिल्हा दुर्गम. भारतातील सर्वाधिक अविकसित जिल्हा असं त्याचं वर्णन करता येईल. पायाभूत सोयीसुविधांचा पत्ता नाही. जिल्ह्यात २४ पोलीस स्टेशन्स. त्यापैकी १४ पोलीस स्टेशन्समध्ये चारचाकी वाहन नाही. पोलीस स्वत:चीच दुचाकी वापरायचे. १६ ठिकाणी तर पोलीस स्टेशनसाठी इमारतच नव्हती. एखाद्या पत्र्याच्या झोपडीत, गोडाऊनमध्ये पोलीस स्टेशने थाटलेली. संपूर्ण जिल्ह्यात फक्त ३९० पोलीस. त्यात महिला पोलीस केवळ चार. शिवाय स्थानिक जनतेत पोलीस विरोधी भावना प्रचंड. थोडं काही झालं तरी तुफान दगडफेक व्हायची. रस्ता जाम व्हायचा. पोलीस गेले तर त्यांची जीप पेटवून दिली जायची. हे ऐकून खरं तर कुणीही हबकून जावं. पण लांडेंनी ते आव्हान पेललं. त्यांच्या लक्षात आलं की इथलं सामाजिक वातावरण पहिल्यांदा सुधारलं पाहिजे. पोलिसांविषयी विश्वास निर्माण केला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे सरकारी योजना नीट राबवल्या पाहिजेत. उदाहरणार्थ तिथं गरिबांना निवारा मिळवून देणारी इंदिरा आवास योजना होती. या योजनेत दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबाला ४५ हजार रुपये मिळत. पण हे पैसे गरजूंपर्यंत पोहोचत नसत. ते पैसे गहाळ करणाऱ्यांवर लांडेंनी सरळ एफआयआर दाखल करायला सुरुवात केली. असे तब्ब्ल ७८ एफआयआर दाखल झाले. त्यात ३००जणांना अटक झाली. त्यापैकी ८९ तर अतिरिक्त जिल्हाधिकारी, बीडीओ, तहसीलदार असे अधिकारी होते. आपला सर्व्हिस रिपोर्ट तयार करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करणारे लांडे पहिलेच पोलीस अधिकारी असतील.

 अरारियामध्ये पीडित महिलांची संख्या खूप होती. नवऱ्यानं मारलं, सासरनं टाकलं अशी तक्रार घेऊन बापड्या पोलीस स्टेशनमध्ये यायच्या. एसपी लांडेंनी त्यांना धीर दिला. त्यांना कायद्याची लढाई लढण्यासाठी तयार केलं. उपाशीपोटी, अनवाणी पायांनी पोलीसस्टेशनपर्यंत आलेल्या या महिलांच्या हातात गार्डकरवी लांडे जाण्या-येण्याचं भाडं ठेवायचे. त्यांच्या वकिलाचीही फी द्यायचे. त्यांच्या केस लवकर निकाली काढा म्हणून कोर्टाला विनंती करायचे. त्यामुळं दहा वीस वर्षे चालणारे खटले अगदी दहा दिवसांत मार्गी लागू लागले. तुरुंगात जाण्याच्या भीतीनं पती ताबोडतोब पत्नीला भरपाई देऊ लागले...

अरारियात देहव्यापार करणाऱ्या १०० मुलींची लांडेंनी सोडवणूक केली. त्यांच्या पुनर्वसनासाठी स्वत: खर्च केला. त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला. त्या राहतात त्या पूर्णिया आश्रमाला मदत केली. लांडे एक अनुभव सांगतात, ‘शन्नो खातूम नावाची एक महिला होती. तिला जुळी मुलं आणि आठ वर्षांची मुलगी होती. शन्नो स्टेशनवर भीक मागायची. पोटासाठी तिनं आपल्या पोटच्या गोळ्याला म्हणजे एका मुलाला १०० मोरंगला (नेपाळचं चलन) विकलं. गरिबी वाईट असते. आम्ही त्या विक्री झालेल्या मुलाचा खूप शोध घेतला. पण तो सापडला नाही. मग आम्ही शन्नोला इंदिरा आवास मिळवून दिलं. त्यातून तिला ५० हजारांची मदत मिळाली. मीही वैयक्तिक दहा हजारांची मदत केली. एक दिवस तिथल्या नरपतगंज पोलीस स्टेशनमध्ये असताना एका शेतकऱ्याचा फोन आला. साहेब, इथं एक विकली गेलेली मुलगी आहे. तिला नेपाळला घेऊन चाललेत. मी जिप्सी घेऊन ३२ किलोमीटरवर गेलो. तिथं अंधारात मुलीची विक्री करणाऱ्या तिघांच्या मुसक्या वळल्या. मुलीची सुटका केली. ती मुलगी मी मदत केलेल्या शन्नोची होती. मला धक्का बसला. पण मुलगी हुशार होती. तिला मी कोर्टाच्या मदतीनं पूर्णिया आश्रमात पाठवलं. तिथं ती आता शिकते आहे. स्वत:च्या पायावर उभी राहते आहे.

लांडेंनी अरारियामध्ये असं सामाजिक सद्भावनेचं वातावरण तयार केलं. द्वेषाचं विष संपवलं. आजही अरारियामधल्या हजारो घरांमध्ये एसपी शिवदीप लांडेंचा फोटो लावलेला पाहायला मिळतो. गावातल्या लहान मुलांना तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचंय? असं विचारलं तर ती सांगतात, आम्हाला एसपी शिवदीप लांडे व्हायचंय!
अखेर लांडेंची अरारियामधून बदली झाली. त्या बदलीला विरोध करण्यासाठी अख्खा अरारिया रस्त्यावर उतरला. लांडेंच्या निवासस्थानाला गराडा घालून लोक दोन दिवस झोपून राहिले. पूर्णिया आश्रमातील मुलींनीही दोन दिवस अन्न पाणी घेतलं नाही. हायवेवर जाळपोळ झाली. ट्रेन थांबवल्या गेल्या.

कर्तव्यासोबतच शिवदीप लांडेंमध्ये गोरगरिबांविषयीचा कळवळा आणि एवढं सामाजिक भान आलं कुठून? असं विचारताच ते म्हणतात, “ते आलं माझ्या बालपणातून. दारिद्र्यातून. विदर्भातल्या मागासलेल्या अकोल्याजवळच्या पारस नावाच्या गावातून. अकोल्याहून अवघं २२ किलोमीटरवर असलेलं हे गाव कायमचं दुष्काळी. कोरडवाहू. ४४ अंश सेल्सियस तापमान सोसणारं. आई गीताबाई आणि वडील वामनराव अल्पभूधारक शेतकरी. हा भाग शेतकरी आत्महत्याग्रस्त. शेती आईच्या नावावर असल्यानं वाचली. शेतीचा आणि घराचा गाडा आईच चालवायची. पण शेत आमची गरिबी हटवू शकत नव्हतं. जुनं पडकं घर. त्याला दरवाजाही नव्हता. पावसाळा सुरू झाला की झोप लागायची नाही. कारण सगळं घर गळत राहायचं. रात्रभर भांडी इथं ठेव तिथं ठेव, असं सुरू असायचं. घरात लाईट तर नव्हती. दहावीत असताना अभ्यासासाठी शेजारीपाजारी लाईटचं कनेक्शन उसनं मागितलं. कुणी दिलं नाही. आईला कुणी किराणा सामानही उधार द्यायचं नाही. समाज चालत्या गाडीत बसतो नेहमी!

बारावीनंतर शिवदीप यांना शेगावला इलेक्ट्रीकल इंजीनिअरिंगसाठी अॅडमिशन मिळालं. वार्षिक फी होती, चार हजार रुपये. म्हणजे चार वर्षांचा किमान ५० हजारांचा खर्च होता. त्यासाठी आईने दागिने मोडले. शेती तर गहाण होतीच. शिवदीप आणि भावंडं दुसऱ्याकडून पुस्तकं उधार घेत जिद्दीनं शिकली. लहान भाऊ आयटीआय झाला. बहिण कान्व्हेंट शाळेत शिक्षिका झाली. सगळ्यांनी आईच्या संसाराला हातभार लावला.
परिस्थितीमुळं लहानपणापासूनच त्यांचा व्यवस्थेसोबत संबंध येऊ लागला. उदा. सातबाऱ्याच्या दहापंधरा रुपयांसाठी तलाठ्यांनं खेटे मारायला लावणं, सरकारी मदतीसाठी बीडीओ ऑफिससमोरच्या रांगेत उभं राहणं, सरकारी मदत, योजना खऱ्या गरजूंना न मिळणं, केवळ वशिल्यावाल्यांची कामं होताना नाईलाजानं पाहाणं हे सगळं शाळकरी वयातच लांडेंनी अनुभवलं. याच काळात त्यांनी एक गंमतीशीर प्रकार पाहिला. तो म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी एखादे वेळी कलेक्टर आला तर अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडायची. त्याच्यापुढं सगळे त त प प करायचे. शेतकऱ्यांनी तक्रारी करू नये याची काळजी घ्यायचे. लांडेंना वाटायचं, आपणही या माणसासारखं ऐटबाज साहेब व्हायला पाहिजे. आठवीत असताना शिक्षकांनी सर्वांना विचारलं, तुम्हाला भविष्यात काय व्हायचं? लांडेंनी उत्तर देऊन टाकलं होतं, ‘मला कलेक्टर व्हायचंय!पण त्यांनी पाहिलेले कलेक्टर छोट्या गावांपर्यंत पोहचायचेच नाहीत. त्यामुळं त्यांना लोकांचे खरेखुरे प्रश्न समजायचे नाहीत. लांडे सांगतात, “बिहारमधील मुंगेरी किंवा अरारियामधली छोटी खेडी, त्यात राहणारी गोरगरीब माणसं पाहिली तेंव्हा मला माझं गाव, बालपण, कुटुंब आठवलं. त्यामुळं एखादा माणूस माझी बकरी चोरांनी पळवली’, ‘दहा किलो धान्याची चोरी झालीय’, अशा छोट्या तक्रारी घेऊन आला, तरी त्या मी गांभीर्यानं घेतल्या. त्या सोडवल्या. मी पहिल्यांदा त्यांच्यातलाच माणूस आहे आणि नंतर पोलीस! हे मी कधीच विसरलो नाही. अजूनही मी तक्रार घेऊन येणाऱ्याच्या भूमिकेत जातो. त्याची समस्या माझी होऊन जाते. मग मी पोलिसाच्या भूमिकेत येऊन ती सोडवतो.’’

कॉलेज संपून आयपीएस होईपर्यंत लांडेंना पुन्हा परिस्थितीशी झगडावं लागलं. या संघर्षात पावसाळ्यातलं भिजणं, उहाळ्यातलं तळणं लांडेंच्या कामी आलं. त्यांच्यातलं किलर इन्स्टिंक्ट आणखीच टोकदार झालं. इंजीनिअरिंगला असेपर्यंत त्यांनायूपीएससीच्या तब्बल २२ ऑल इंडिया क्लास वन सर्व्हिसेस असतात हेही माहिती नव्हतं. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी लांडे मुंबईला आले आणि कल्याणला सुनील धाळकर नावाच्या मित्राकडे थांबले. त्यांचं नंतर ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं. खर्च करायला पैसे हवेत म्हणून लांडेंनी डोंबिवलीच्या जोंधळे इंजीनिअरिग कॉलेजमध्ये लेक्चरशिप करायला सुरुवात केली. ते काम त्यांनी दीड वर्ष केलं. पण मग स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाकडं दुर्लक्ष होऊ लागलं. म्हणून ते काम सोडलं. पण पैशांची गरज तर होतीच. मग ते विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन वैयक्तिक कोचिंग घेऊ लागले. 
त्यांनी बरेच दिवस ठाणे, कल्याण, मुलुंड, भांडूप या परिसरात इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतले. संभाजी काटे नावाचा लांडेंचा एक सहकारी होता. तो म्हणाला, ‘हे क्लासेस घेणं सोड. तुझा अभ्यास कर. मी तुझा खर्च करतो..त्याच्यासोबत लांडे ठाण्याच्या वृंदावन सोसायटीत एक वर्षे राहिले. त्यानंतर एसआयसीमध्ये प्रवेश मिळाला. तिथं सगळेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी. मस्त ग्रुप जमला. अभ्यास सामुदायिक झाला. २००४मध्ये लांडेंचं इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये पहिलं सिलेक्शन झालं. चार वर्षे त्यांनी रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये काम केलं. २००६ला आयपीएसला सिलेक्शन झालं. २००८ला हैदराबादचं ट्रेनिंग घेतलं. २०१०ला बिहार जॉईन केलं. तिथं त्यांनी जे काम केलंय ते पोलीस डिपार्टमेंटला भूषणावह आहे. मुख्यमंत्री नीतिशकुमारांनी बिहारमध्ये बोकाळलेली जी गुन्हेगारी आटोक्यात आणली, त्यासाठी शिवदीप लांडेंनी हातभार लावलाय.


बिहारमध्ये हे सगळं करत असताना लांडे आपल्या जन्मभूमीला, गावाला विसरलेले नाहीत. आपण समाजाचं देणं लागतो हे त्यांच्या पक्कं लक्षात आहे. त्यामुळंच तर ते गावातील गरजूंना नेहमी मदत करतात. त्यासाठी त्यांनी त्यांच्या पारस गावात युवकांची संघटना बांधलीय. ही संघटना अनेक सामाजिक कामं करते. लांडेंनी बहिणीच्या लग्नातला हुंड्याचा त्रासदायक प्रकार अनुभवला होता. सामान्य शेतकऱ्याच्या मागं सावकारीचं लचांड लावणारा हा प्रकार. त्यामुळं लांडेंच्या संघटनेनं पहिल्यांदा सामुहिक विवाहाचा उपक्रम हाती घेतला. पहिल्या वर्षी आठ सामुदायिक विवाह लावण्यात आले. गेल्या वर्षी ही संख्या दीडशेवर गेलीय. आर्थिक अडचणीमुळं जे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही त्यांना संघटना मदत करते. अशा ४०हून अधिक विद्यार्थ्यांना मदत केली जाते. यामध्ये मुस्लिम समाजातले विद्यार्थी अधिक आहेत. काही विद्यार्थ्यांना लांडेंनी वैयक्तिकरित्या दत्तक घेतलंय. त्यांचा आर्थिक भार ते उचलतात. त्यासाठी कधी कधी त्यांचा पूर्ण पगार खर्च होतो. विश्वास बसणार नाही पण २००४पासून सरकारी सेवेत असलेल्या शिवदीप लांडेंच्या बँक खात्यात ६० हजारांहून अधिक बचत नाही!तीही कुटुंबात काही मेडिकल इमर्जन्सी आली तर त्यासाठी त्यांनी राखून ठेवलीय. संघटनेतर्फे पेशंटवर अकोल्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात. रक्तदान शिबीरं घेतली जातात. स्थानिक कार्यकर्ते राजदत्त मानकर संघटनेचं काम पाहतात.
लांडे आयपीएस आहेत हे महाराष्ट्रालाच काय पण त्यांच्या गावातही माहिती नव्हतं. ते पाटण्याचे एसपी झाल्यावर नॅशनल मीडियामुळं सर्वांना माहिती झालं.

शिवदीप यांच्या आईला मात्र त्यांच्याबद्दल लहानपणापासूनच प्रचंड कॉन्फिडन्स होता. ती म्हणते, ‘माझा पोरगा जगातला सर्वात जिद्दी पोरगा आहे. लहानपणी तो फोटोच काढू द्यायचा नाही. म्हणायचा, मी माझा फोटो काढून घेणार नाही. लोकच माझे फोटो काढतील. खिशात ठेवतील. घरात लावतील. त्यानं त्याचं म्हणणं खरं केलंय..
महाराष्ट्रातील नेते आणि त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांची बिहारचे ३४वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हा राजभवन आणि सरकारमध्ये तणाव होता.  त्या पार्श्वभूमीवर सरकार आणि राजभवन यांच्यातील दुवा म्हणून शिवदीप लांडे यांची स्पेशल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. खरं तर फिल्डवर जाण्यासाठी शिवदीप यांचे हात शिवशिवतायत.

ते म्हणतात, “मला महाराष्ट्रात पोस्टिंग नको. देशातला कुठलाही अनागोंदी असलेला जिल्हा, शहर सहा महिने ताब्यात द्या. पोलीस प्रामाणिकपणे कसं काम करतात आणि लोक पोलिसांच्या मागे कसे उभे राहतात हे मी दाखवून देतो. मृत्यूला मी भीत नाही. त्याला सोबत घेऊनच तर फिरतो. कधी तरी आम्ही दोघे आमनेसामने येऊच. म्हणूनच तर मी अजून लग्न केलेलं नाही. कारण मी नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टमध्ये टॉपवर आहे. झोपतानाही मी एके ४७ उशाला घेऊन झोपतो. एक तर ते माझा गेम करतील किंवा मी त्यांचा. त्यासाठीच मी अंगावर हा खाकी ड्रेस चढवलाय. अर्थात मला धक्का लागला तर सगळा बिहार खवळून उठेल हेही तेवढंच खरं..!

21 comments:

 1. ग्रेट... थॅंक्स श्रीरंगराव. आपणही आपापल्या क्षेत्रातील शिवदीप होवूया...

  ReplyDelete
  Replies
  1. हा हा हा...धन्यवाद, संतोषभाऊ!

   Delete
  2. sir aapan khara singam vachaka paryanta pohchavla
   manapasun dhanyawad ....shivdeep sir is great......................

   Delete
  3. He is a really Singham.
   Biharchya safaiche Shiva Dhanushya pelanyasathich hya Shivadeep chi nivad zali Ahe.

   Ani Ashi mahiti samajaparyant anlyabaddal aplehi Abhar


   Delete
  4. खूप छान लिहिलंय आपण.... दुसऱ्या एका महत्वाच्या कामात होतो, आणि फेसबुकवरील आपली लिंक दिसली सहज ओपन केली आणि बिहारमधील महाराष्ट्रीय सिंघमच्या प्रेमातच पडलो. बाकीची सर्व कामे बाजूला कधी पडली समजलेच नाही.

   Delete
 2. Very impressive Shrirang and very well written too!

  ReplyDelete
 3. श्रीरंगजी अशा शिवदीपजींची दबंगगिरी फक्त बिहारमध्ये नको तर संपुर्ण देशामध्ये पुन्हा--पुन्हा होण्याची गरज आहे.अशा शिवदीपजींची देशाला खरी गरज आहे,अशा ख-या दबंगगिरीला माझा पुन्हा-पुन्हा सलाम....

  ReplyDelete
 4. Great.hats of u Mr shivdeep lande

  ReplyDelete
 5. कदर करण्याची भावना सदा वाढत जाओ श्रीरंग भाऊ !👍

  ReplyDelete
 6. दादा,अप्रतिम शब्दचं नाहीत. पण हे सगळं फेसबुक पुरतं मय्रादित नको.मला हे पुस्तक रूपाने वाचायला विशेष आवडेलं.आपल्यातल्या 'जाणीवा' संपन्न पञकाराला सेल्युट....!!!

  ReplyDelete
 7. दादा,अप्रतिम शब्दचं नाहीत. पण हे सगळं फेसबुक पुरतं मय्रादित नको.मला हे पुस्तक रूपाने वाचायला विशेष आवडेलं.आपल्यातल्या 'जाणीवा' संपन्न पञकाराला सेल्युट....!!!

  ReplyDelete
 8. Interesting and brave. best and more best. mazya kade ek biharchi kadambari aahe tyacha kardankal hee likhan zale Shreerang.

  ReplyDelete
 9. खूप म्हणजे खूप छान व अप्रतिम लेख

  ReplyDelete
 10. जबरदस्त माणसाबद्दलचा लेखही तेवढाच जबरदस्त. अप्रतिम.

  ReplyDelete