'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Wednesday 18 December 2013

जादूटोणा विरोधी कायदा पास करा!

 डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला १०० दिवस उलटून गेल्यानंतरही त्यांच्या खुन्याचा तपास लागला नाही. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या मागणीसाठी मुंबईत २ डिसंबर २०१३ रोजी मोर्चा काढण्यात आला होता. त्याचा 'चित्रलेखा'नं छापलेला हा वृत्तांत...
गेली ४० वर्षे डॉ. नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धा, जादूटोणा विरोधी विचार समाजात रुजवत होते. त्यासाठी कायदा व्हावा म्हणून सरकारचे उंबरठे झिजवत होते. पण अखेर त्यांचा त्यात बळी गेला. त्यानंतर सरकारला जाग आली आणि डॉ. दाभोळकरांच्या हत्येनंतर दोनच दिवसांत जादूटोणा विरोधी वटकुकूम जारी करण्यात आला. आता येत्या अधिवेशनात या वटहुकुमाचे कायद्यात रुपांतर करण्याची वेळ आलेली आहे. त्याचवेळी सरकारनं धर्मांध शक्तींपुढे गुडघे टेकलेत. डॉ. दाभोळकरांच्या हत्येच्या कटात कट्टरतावादी संघटनांचा हात नसल्याचं प्रतिज्ञापत्र कोर्टात दाखल केलंय. हा कायदा पास केला नाही तर सरकारच्या पदरी नामुष्की येईल, पुरोगामी महाराष्ट्राची शोभा जाईल, अशा तीव्र भावना सोमवारी (ता. २) मुंबईतील आझाद मैदानावर हजारो लोकांच्या साक्षीने व्यक्त करण्यात आल्या.
डॉ. दाभोळकरांच्या हत्येला १०० दिवस उलटून गेले तरी त्यांचे खुनी किंवा सूत्रधार सापडले नाहीत. 


त्याचा निषेध करण्यासाठी तसेच सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा पास करावा आणि सनातनी प्रवृत्तींचा प्रतिकार करावा या प्रमुख मागण्यांसाठी मुंबईतील राणीचा बाग ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. दुपारच्या चटके देणाऱ्या उन्हात घामानं निथळत, बायाबापड्या, लेकुरवाळ्या, बुरखेवाल्या, म्हातारेकोतारे, आदिवासी, कामगार, वारकरी, शाळकरी मुलं, युवक युवती, सिनेस्टार, हातात महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. दाभोळकर यांचे फोटो घेऊन बेंबीच्या देठापासून घोषणा देतपरिवर्तनवादी पोवाडे आणि अंधश्रद्धेला विरोध करणारे अभंग गात हजारोंच्या संख्येनं जे. जे. ओव्हरब्रीजवरून चालले होते. अगोदरच माणसांनी फुललेल्या आझाद मैदानात मोर्चा दाखल झाला आणि त्याला भल्या मोठ्या सभेचं रुप आलं. स्टेजवर शाहिरांची हलगी कडाडत होती.
अभिवादन करून डॉ. दाभोळकर तुम्हाला
जोमानं नेऊ पुढं चळवळ
तुम्ही विचार आम्हाला दिले
जनमानसात रुजविले
विवेक आणि विज्ञानाचं
दिलंय आम्हाला बळ
जोमानं नेऊ पुढं चळवळ...
स्वागताचं कवन गाणारे लोककलाकार सभेतल्या प्रत्येकाचं मन चेतवत होते. स्टेजच्या उजव्या बाजूला रचना संसदच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली भानामतीची बाहुली आणि लिंबू मिरच्यांची प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. तर स्टेजवर वक्त्यांच्या पुढंच काळी कपडे घालून बसवलेलं अंधश्रद्धेचं भूत उपस्थितांना वाकुल्या दाखवत होतं. स्टेजच्या मागं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व परिवर्तनवादी पक्ष संघटना आयोजित जाहीर सभा, असा दोन्ही बाजूंना डॉ. दाभोळकरांचे फोटो असलेला मोठा बोर्ड लावला होता. सभेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील होते. 

भाकपचे नेते डॉ. प्रकाश करात, भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, पुष्पा भावे, डॉ. शैला दाभोळकर, मुक्ता आणि हमीद दाभोळकर, लोकभारतीचे अध्यक्ष आमदार कपील पाटील, राष्ट्रवादीच्या आमदार विद्याताई चव्हाण, भालचंद्र कांगो, प्रकाश रेड्डी, अरविंद कपोते, अशोक ढवळे, सेवादलाचे प्रा. सुभाष वारे, लोकजनशक्ती पक्षाचे मोहन अडसूळकामगार नेते दत्ता इस्वलकरवारकरी सेवा समितीचे ज्ञानेश्वर वाबळे, अभिनेता नंदू माधव, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, संदीप कुलकर्णी, शाहीर संभाजी भगत, राज्यभरातून आलेल्या अनेक छोट्या-मोठ्या संघटना तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेनर्मदा बचावघर बचाव घर बनाव संघटना,आत्मभान संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

सभेच्या सुरुवातीला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मोर्चाचे उद्देश सांगतानाच जादू टोणा विरोधी कायद्याबद्दल कसा अपप्रचार केला जातो, याकडं लक्ष वेधलं. हा कायदा हिंदूविरोधी आहे. इतर धर्मांतील अपप्रवृत्तींना तो हात लावणार नाही हे सांगितलं जातं होतं. पण या कायद्यांतर्गतचा पहिला गुन्हा नांदेडला एका मुस्लिम भोंदू बाबावर नोंदवण्यात आला. त्यामुळं सर्वच धर्मांतील अनिष्ट गोष्टींना हा कायदा बडगा दाखवू शकतो हे सिद्ध झालं आहे, असं पाटील म्हणाले.

महाराष्ट्राची रोजगार हमी योजना आणि माहितीचा अधिकार जसा देशपातळीवर स्वीकारला गेला, तसाच हा कायदाही देशपातळीवर स्वीकारला जाईल. म्हणून सरकारनं त्यासाठी पुढाकार घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी कायदा पास करण्याचं आश्वासन दिलंय. त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही १० डिसेंबरला नागपुरात विधानभवनासमोर धरणं धरणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.   
वक्ते भालचंद्र कांगो आणि पुष्पा भावे यांनी आपल्या भाषणात अंधश्रद्धा, धर्मांधता, आणि जातीयता या विरोधात विवेक जागराची आवश्यकता असल्याचं म्हटलं. शिवाय ही माणसं काही ट्रकनं मागवलेली नाहीत, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ती स्वयंस्फूर्तीनं आलीत, असं पुष्पाताई म्हणाल्या. १० तारीख हा मनुष्य हक्क दिन आहे. म्हणून याच दिवशी हा कायदा होणं औचित्यपूर्ण आहे, असंही त्या म्हणाल्या.

या आवाहनं करणाऱ्या भाषणानंतर वातावरण गरम केलं ते राज्याच्या सत्ताधारी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी. त्यांनी थेट महाराष्ट्र पोलिसांवर आरोप केले. पोलिसांमध्येच अंधश्रद्धाळू आहेत. पोलिसांना डॉ. दाभोळकरांचे मारेकरी माहिती आहेत. पोलीस आता खुनी पकडण्याचा बनाव करतील. गुन्हेगारांच्या नावाखाली गरिबांना पकडतील. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणीच त्यांनी केली.

तर लोकभारती पक्षाचे आमदार कपील पाटील म्हणाले, दलवाई म्हणतात तशी पोलिसांमध्ये अंधश्रद्धा नाही. माझा पोलिसांवर विश्वास आहे. पण सरकारवर नाही. नाही तर सरकारनं कोर्टात धर्मांध शक्तींना क्लीन चीट दिलीच नसती. वटहुकुमाचं कायद्यात रुपांतर करण्याच्या वेळी जर सरकार गुडघे टेकत असेल, तर सरकारवर विश्वास तरी कसा ठेवायचा? सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचं फिक्सिंग आहे. नाही तर सरकारला बहुमताच्या जोरावर कायदा पास करता आला असता. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा कायदा मंजूर करावा. डॉ. दाभोळकरांच्या खुन्यांना अटक करावी, नाही तर तुम्ही त्यांना सामील आहात, असे आम्ही समजू, असं पाटील यांनी ठणकावलं.

हुसेन दलवाई आणि कपील पाटील यांच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्याताई चव्हाणांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. हा कायदा पास होण्यासाठी विरोधी पक्ष अडथळा आणतात, असं त्या म्हणाल्या. अंधश्रद्धा, जादूटोण्याचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागतो, म्हणून हा कायदा पास होणं गरजेचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

या आरोप प्रत्यारोपाच्या भाषणानंतर वातावरणात जान आणली ती वारकऱ्यांचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी. ते म्हणाले, संत नामदेव, संत ज्ञानेश्वरमहाराजांना हेच विचारमंथन अभिप्रेत होतं. संतांनी आपल्याला ज्ञानावर श्रद्धा ठेवायची शिकवण दिली. दुकानं मांडून बसलेल्या धर्ममार्तंडांना संतांनी ७०० वर्षांपूर्वी विरोध केला. सर्व जातीधर्माच्या लोकांना, स्त्रियांना सोबत घेतलं. तुकोबांचे अभंग गाणारे वारकरी या कायद्याला विरोध करतीलच कसे? जे करतील, त्यांना संतसाहित्य माहितीच नाही, असेच म्हणावे लागेल.

प्रकाश करात यांनी डॉ. दाभोळकरांच्या खुनाच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली. हा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी त्यांनी केली. राज्यसरकारनं कोर्टात धर्मांध शक्तींना क्लीन चीटकशी दिली याबाबत त्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं. सध्या अंधश्रद्धेचा, बाबा बुवांचा उद्योग देशात खूप फोफावलाय. महाराष्ट्रानं जर याविरोधातला कायदा पास केला तर संसदेतही हा कायदा करण्यासाठी प्रयत्न करता येईल, असं करात म्हणाले.

सभेत भानावर आणणारे वास्तव मुद्दे मांडले भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी.सध्या आपले विरोधक काय करतायत त्यावरही आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण डॉ. दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर पुण्यात दुसरा मोर्चा निघाला होता, तो सनातन्यांचा. त्यांनी घरोघर जाऊन तसेच वारकऱ्यांमध्ये अपप्रचार केला. आताही ते प्रतिमोर्चे काढतील. अधिवेशनाच्या ठिकाणीही विरोधाचे झेंडे फडकावतील. माझ्या माहितीप्रमाणे अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत या कायद्याचा विषयच नमूद केलेला नाही. त्याचा खुलासा सरकारनं केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांनी डॉ. दाभोळकरांचा खुनाचा तपास सीबीआयकडं देण्यास विरोध दर्शवला. ती जबाबदारी राज्यसरकारचीच आहे, असं ते म्हणाले. सरकारनं आता हा कायदा होण्यासाठी इच्छाशक्ती दाखवणं गरजेचं आहे. त्यासाठी विरोधकांचाही आधार घेण्याचं कारण नाही. कारण सरकारकडं पुरेसं बहुमत आहे, हे स्पष्ट करतानाच हा कायदा झाला नाही तर पुरोगामी महाराष्ट्राची शोभा जाईल. सरकारवर नामुष्की ओढवेल, असं त्यांनी नमूद केलं.
कायदा होवो अथवा न होवो, अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ पुढे नेतच राहू, असा ठाम निश्चय व्यक्त करत हम होंगे कामयाब हे गीत गात सभेची सांगता झाली.

जोशपूर्ण घोषणा 
मोर्चात आणि सभेच्या ठिकाणी अनेक जोशपूर्ण घोषणा दिल्या जात होत्या. सभा सुरू असताना सर्व सिनेकलाकार स्टेजवर आले आणि त्यांनीही हात उंचावत घोषणा दिल्या. त्यात दाभोळकरांचे खुनी- सनातनी सनातनी, सनातन्यांची मोडण्या खोड कायद्याची हवी जोड, विवेकाचा आवाज बुलंद करा, जादू टोणा विरोधाचा आवाज बुलंद करा, डॉ. दाभोळकरांच्या आरोपींना अटक झालीच पाहिजे. हमसब एक है, लडेंगे जितेंगे...अशा घोषणांनी आझाद मैदान दुमदुमून टाकलं.

 मतनोंदणीसाठी आवाहन
जादू टोणा विधेयकाच्या बाजूने मत नोंदवण्यासाठी सभेत आवाहन करण्यात आलं. त्यासाठी सर्वांना १८००१२१९७०० या टोल फ्री नंबरवर मिस कॉल देण्यास सांगण्यात आलं.
सभेत डॉ. दाभोळकर आणि मोहन धारिया यांचा विशेष संदर्भ असणाऱ्या राष्ट्र सेवादलाच्या कॅलेंडरचं प्रकाशन करण्यात आलं. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक विशेषांकाचंही प्रकाशन करण्यात आलं.


No comments:

Post a Comment