'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Wednesday, 18 December 2013

विकासाचा लोकमंगल पॅटर्न

साप्ताहिक 'चित्रलेखा' नेहमीच चांगल्या माणसांना शोधत असते. त्यांच्या कामांना   समाजासमोर आणत असते. अशाच एका माणसाशी मी बोललो. हा माणूस सोलापुरातला माजी आमदार. इतर राजकारण्यांपेक्षा हटके. खरीखुरी कामं करणारा. त्यांच्याविषयी 'चित्रलेखा'नं २०१३च्या दिवाळी अंकात छापलं...

   
मी घरातला वाया गेलेला मुलगा. अकरावी बोर्डातूनच शाळा सोडली. क्रिकेटचा बॉल डोळ्याला लागल्याचं निमित्त झालं होतं. डॉक्टर म्हणाले, वाचू नकोस. त्रास होईल. मला आनंदच झाला. पण पुढं पस्तावलो. शिक्षण नसल्यानं नोकरी मिळेना. भाऊ पीएसआय बनला. दोघी बहिणी पदवीधर झाल्या. मलाच लाज वाटू लागली. आपण बसून खातोय, घरच्यांना भार होतोय असं वाटू लागलं. एक दिवस कामधंदा शोधण्यासाठी सरळ मुंबई गाठली. तिथं बदलापूरला कमल विचारे नावाच्या आमदार होत्या. त्यांच्या पोल्ट्रीवर लेबर म्हणून काम करायला लागलो. दोन वेळचं जेवण करून ५० रुपये मिळायचे. काम पहाटे पाच ते रात्री १० पर्यंत. 
कोंबड्यांची विष्ठा काढण्यापासूनते धुण्या-भांड्यापर्यंत पडेल ते काम केलं. तिथून पुन्हा सोलापूर जिल्ह्यातल्या माझ्या वडाळा गावी आलो. कमल विचारेंनी तीन चार हजार रुपये दिले होते. त्यातून गावात किराणा मालाचं दुकान टाकलं. पण ते वर्षभरही चाललं नाही. कारण उधारी थकली. मग ज्योतीराम गायकवाड आणि हंगरगेकर म्हणून कंत्राटदार होते. यांच्याकडं रस्त्याच्या कामावर मुकादम म्हणून काम केलं. त्यानंतर सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यात ऊस घेऊन येणाऱ्या १०० गाड्यांचा मॅनेजर म्हणून काम पाहिलं. तिथं मिळणाऱ्या ३०० रुपये पगारातून शेतीऔजारं विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

१९८०मध्ये गावात पाझर तलावाचं काम सुरू झालं होतं. तिथं सुपरवायझर म्हणून नोकरी मिळाली. तिथल्या ज्युनिअर इंजीनिअरशी ओळख झाली. त्यानं ८०० रुपयाचं कंत्राटी काम घेतो का, असं विचारलं. जवळ पैसे नव्हतेच. पण डेअरिंग केली. या पहिल्याच कामात मला १०० टक्के फायदा झाला. तलावाच्या मागच्या गटार खणून त्यात वाळू आणि मोठे दगड टाकायचं काम होतं. एकही मजूर न लावता एकट्यानं हे काम केलं. त्यामुळंच १०० टक्के फायदा झालामाझी मेहनत पाहून त्याच माणसानं १२ हजार रुपयांचं तलावाच्या पिचिंगचं काम दिलं. अनंत साळुंखे नावाचा मित्र होता. त्याला म्हटलं तू पैसे दे मी मेहनत करतो. कंत्राटं घेण्याच्या कामाला तिथूनच सुरुवात झाली. १९९७पर्यंत ही काम सुरू होती. आपण भले न् आपलं काम भलं. जगात काय चाललंय त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. मजूरकंत्राटदार, ड्रायव्हर हेच मित्रमंडळी, नातेवाईक, सगेसोयरे बनले होते.

अशा वेळी अगदी अनावधानानं राजकारणात आलो. आलो म्हणजे आणलं गेलं. कैलासवासी माजी खासदार लिंगराज वल्याळकै. बाळासाहेब झवरशांतीलाल जैन यांनी बळजबरीनं स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी विधान परिषदेच्या निवडणुकीला मला उभं केलं. मला त्यावेळी विधानपरिषद,त्यासाठीची निवडणूक प्रक्रिया वगैरे काहीही माहिती नव्हतं. त्यातून सोलापूर जिल्हा या निवडणुकीसाठी कठीण. एकूण पावणेचारशे मतदार होते. त्यापैकी माझ्या म्हणजे भाजप सेनेच्या पक्षाची फक्त ६० ते ६५ मतं होती. गंमत म्हणजे त्यातले चार-पाचसुद्धा मतदार मला थेट ओळखत नव्हते. आणि माझी तर ग्रामपंचायत सदस्यही व्हायची इच्छा, मानसिकता नव्हती. पण एकदा मैदानात उतरलो म्हटल्यावर कंबर कसली. डोक्यानं लढायचं ठरवलं. त्यावेळी जिल्ह्यात ११ तालुके होते. प्रत्येक तालुक्यात एकडुप्लिकेट सुभाष देशमुख उभा केला. त्याच असं असतं की विधानपरिषदेचे मतदार एका ठिकाणी नसतात. अशा विखुरलेल्या मतदारांना डुप्लिकेट सुभाष देशमुख भेटले. केवळ वैयक्तिकरित्या उमेदवार भेटला म्हणून या मतदारांनी मतं दिली आणि मी ३० मतांनी निवडून आलो. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या प्रचारासाठी स्वतशरद पवार मतदार संघात मुक्काम ठोकून होते. त्यामुळं प्रचार करायला कुणी तयार नव्हतं. १०० टक्के पडणारं सीट. त्यामुळं सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं होतं. पण निवडून आल्यावर पेपरात फोटो येऊ लागले. आणि मला खूप फोन येऊ लागले. अहो, आमच्याकडं दुसरंच कुणी तरी मतं मागायला आलं होतं. मी क्षमा मागितली. आता येत जाईन तुम्हाला खरोखरचा नियमित भेटायला म्हणालो. मग स्वत:हून वाटलं की आता सामाजिक कामाची सुरुवात करायला पाहिजे. हे बाकी मनापासून होतं. 

एक जानेवारीला १९९८ला मी आमदार झालो. आणि २८ फेब्रुवारी १९९८ला लोकमंगल सहकारी बँकेची स्थापना केली. लोकमंगल समूह उभारणीची ती सुरुवात होती. कारण शेतकऱ्यांना आणि उद्योजक तरुणांना उभं करायचं झालं तर त्यांना आर्थिक बळ देणं गरजेचं होतं. मला माझ्या पोल्ट्रीच्या आणि तळ्याच्या कामाचे दिवस नेहमी आठवायचे. पैसा नसताना माणूस हतबल असतो. आपण जे भोगलं ते तरूण पोरांना भोगावं लागू नये, त्यांना उद्योगव्यवसायासाठी भांडवल उपलब्ध व्हावं म्हणून मी पहिल्यांदा बँकेची स्थापना केली. या बँकेला आयएसओ ९००१:२००८ हे सर्टिफिकेट आणि रिझर्व बँकेचा ग्रेड वनचा दर्जा मिळालाय. बँकेत लोकांनी १२७ कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्यात. त्यातून आम्ही ७९ कोटींहून अधिक कर्जाचं वाटप केलंय. बँक यशस्वी झाल्यानं आम्हाला जणू चावीच मिळाली. त्यातून आम्ही पुढं उद्योगांची साखळी उभी केली.

बँकेनंतर लोकमंगलनं २००४मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक असं कार्यक्षेत्र असणारी मल्टिस्टेट सहकारी सोसायटी सुरू केली. या सोसायटीनं दूध डेअरी सुरू केली. जैविक आणि रासायनिक खतांचं उत्पादन सरू केलं. इफको खतांचं वितरक म्हणून काम पाहिलं. सोसायटीचा १५०० एकरचा शेतीविभाग आहे. तसेच या सोसायटीमार्फत दाळमिल आणि संगणक दुरुस्ती, विक्रीचं काम सुरू करण्यात आलंय. याच सोसायटीच्या मार्फत लोकमंगल शेतीप्रतिक नावाचं कृषी मासिक चालवलं जातं. दरवर्षी कृषिमहोत्सव भरवण्यात येतात. सध्या सोसायटीच्या ५० शाखा आहेत. दोन्हीही राज्यात आणखी ५० शाखा सुरू करण्यात येणार आहेत.
ग्रामीण अर्थकारण मजबूत करण्यासाठी आम्ही लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था ही तिसरी आर्थिक पतसंस्था उभारली. या पतसंस्थेत सध्या ११५ कोटींच्या ठेवी आहेत.

या तीनही आर्थिक संस्था ग्रामोद्योग, ग्रामविकास, शेती, लघुउद्योग, स्वयंरोजगार प्रकल्प, आर्थिक दुर्बल घटकांना स्वावलंबी बनवण्यासाठी सहाय्य, करतात.
शेती हा इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा. म्हणून शेती आणि शेतीपूरक उद्योगांना मदत करण्याच्या भूमिकेतून आम्ही लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रिज लिमिटेडची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही केवळ सहा महिने सहा दिवसांत लोकमंगल साखर कारखाना  उभा केला. या रेकॉर्डची लिम्का बुकात नोंद झाली. पाच सात वर्षात कारखाना कर्जमुक्त केला. एवढंच नाही तर इतर कारखान्यांनाही कर्जमुक्त करण्याचा चंग बांधला. कारखाने कर्जमुक्त करून त्यांची पुनउर्भारणी करण्याचं काम सुरू केलं. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजा भवानी, किल्लारी साखर कारखाना हे कारखाने लोकमंगलला चालवायला मिळाले. आम्ही ते उत्तमरित्या चालवले. 

शेतकऱ्यांच्या मुलांनी नवं तंत्रज्ञान समजून उमजून सुधारीत आणि फायद्याची शेती करावी यासाठी आम्हीअॅग्री क्लिनिक अॅन्ड अॅग्री बिझनेस सेंटर सुरू केलं. केंद्रीय कृषिमंत्रालयाच्या मदतीनं चालवलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान आणि मार्केटींगचं प्रशिक्षण दिलं जातं.
आपल्याकडं आधुनिक शेतीतून उत्पादन वाढलं पण शेतीचा कस कमी झालाय. पाणी रसायनं आणि कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापरामुळं शेतीवर दुष्परिणाम होतायत. यावर संशोधन करण्यासाठी आम्हीमहाराष्ट्र रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं. जैविक खतं, जिवाणू संवर्धक, जैविक कीडनियंत्रण पद्धती, टिश्यूकल्चर यांचा शेती विकासासाठी कसा उपयोग होईल, याचा विचार या माध्यमातून केला जातो. या संशोधनातून आलेल्या निष्कर्षांमधूनच २००६मध्ये लोकमंगल बायोटेकची स्थापना झाली.  

या माध्यमातून लोकमंगलनं सुमारे ८५ सेंद्रीय उत्पादनं विकसित केलीत. सोलापूरअकोलाजळगाववडोदराउदयपूर आदी ठिकाणी हे उत्पादन केलं जातं. या लोकमंगल बायोटेकच्या महाराष्ट्रगुजरातमध्यप्रदेशराजस्थान, छत्तीसगडआंध्र प्रदेश या सात राज्यांत शाखा आहेत. बायोटेकच्या माध्यमातून खतं, बियाणं, जैविक कीटक आणि बुरशी नाशकं याचं उत्पादन केलं जातं.
सेंद्रीय उत्पादनांचा आम्ही खूप प्रचार, प्रसार केला. मला संपूर्ण सोलापूर जिल्हा सेंद्रीय करायचा होता. पण २००७मध्ये आम्हाला या उद्योगात खूप तोटा झाला. कारण आपल्याकडं सेंद्रीय खतं वापरण्याची मानसिकताच अजून तयार झालेली नाही. शिवाय हे खत तयार केल्यानंतर ते सहा महिन्यांनी नष्ट होतं. आता मी यात सावध झालोय. रासायनिक खत निम्मं वापरा. निम्मं सेंद्रीय वापरा, असं शेतकऱ्यांना सांगतोय. त्यातून हळू हळू लोक सेंद्रीय शेतीकडं वळतील.

शेतकऱ्यांमध्ये एकूणच आधुनिक शेतीबद्दल सजकता निर्माण व्हावी, कृषी तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी म्हणून लोकममंगलनं शेतकरी मंडळ स्थापन केलं.
ही कामं करत असताना जिल्ह्यात आरोग्यसुविधांची मोठी वाणवा असल्याचं लक्षात आलं. त्यासाठी मगलोकमंगल जीवक हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र सुरू झालं. या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रस्ट या संस्थेच्या वतीनं गरजू आणि गरीब लोकांना ना नफा ना तोटा तत्त्वावर आरोग्यसेवा पुरवली जाते. लोकमंगलचा सहभाग असलेल्या या उपक्रमात ६० बेडचं अद्ययावत हॉस्पिटल चालवलं जातं.
लोकमंगलनं केवळ ग्रामीण भाग आणि शेती यांच्याशीच संबंधीत काम केलंय असं नाही. तर शहरी नागरिकांच्या सोयीसुविधांचाही विचार केलाय. त्यासाठीच तर लोकमंगल माऊली ज्वेलर्सलोकमंगल सुपर बझार आणि लोकमंगल डेव्हलपर्स, प्रॉपर्टीज हे सेवा उद्योग उभारण्यात आलेत.

माझं शिक्षण अर्ध्यावर थांबलं. त्यामुळं पुढं खूप झगडावं लागलं. इतर मुलांचं तसं होऊ नये म्हणून आम्ही श्रीराम प्रतिष्ठान मंडळ स्थापन केलंय. त्याअंतर्गत माझ्या वडाळा या गावी दीडशेहून अधिक एकरांवर शैक्षणिक संकुल उभं राहिलंय. इथं उद्यान विद्या महाविद्यालय, कृषी विद्यालय, जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, संगणक पदवी अशी सात महाविद्यालयं या संकुलात आहेत. देशातला एकमेव असा बॅचलर ऑफ इंटरप्रिन्यूअरशिप हा अभ्यासक्रम इथं शिकवला जातो. स्वत:चा उद्योग, विविध कंपन्यांमध्ये नोकऱ्या, उच्च शिक्षणाची संधी मिळवण्यासाठी या अभ्यासक्रमाचा उपयोग होतो. या संकुलात सध्या ९५० विद्यार्थी शिक्षण घेतायत. त्यापैकी साडेचारशे विद्यार्थी इथल्या होस्टलमध्ये राहतात. ३०० मुलं आणि १५० मुली इथं काम करून शिक्षण घेतात.

शिक्षणाची खरी गरज असते गोरगरीबांनाच. केवळ पैशांअभावी त्यांच्या मुलांचं शिक्षण थांबू नये म्हणून आम्ही इथं आम्ही २०० विद्यार्थ्यांना मोफत शिकवतो. त्यांच्याकडून होस्टेलचे, खाण्याचे आरोग्य सुविधांचे पैसे घेत नाही.
यासोबतच आम्ही स्थापन केलेल्या अवंती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बालवाड्या, प्राथमिक, माध्यमिक शाळा चालवल्या जात आहेत.
या शैक्षणिक संकुलात शिकणारी माझी ही पोरं नवं जग घडवायला तयार होत आहेत.
लोकमंगलची विकासाची भूमिका जनतेपर्यंत जावी यासाठी आम्ही स्वतंत्रपणे लोकमंगल प्रिंट आणि पॅक ही संस्था सुरू केली आहे. त्यात विविध प्रकारचं प्रिंटींग होतं. याच ठिकाणी लोकमंगल महिला सहकारी मुद्रणालय सुरु करण्यात आलंय. त्यात शालेय वह्यांचं उत्पादन केलं जातं.   
या प्रमुख संस्थांशिवाय लोकमंगल समूहानं महिला बचत गटांची स्वयंरोजगार सहकारी संस्था, लोकमंगल कडबाकुट्टी, लोकमंगल वेअर हाऊस, लोकमंगल ट्रान्सपोर्ट, लोकमंगल गारमेंटस्, लोकमंगल इन्व्हेस्टमेंट, लोकमंगल इथेनॉल अॅन्ड को जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड, लोकमंगल टिश्यूकल्चर, लोकमंगल ट्रेनिंग अकादमी, लोकमंगल टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स, लोकमंगल प्लेसमेंट सेंटर, लोकमंगल रोपवाटिका, लोकमंगल हॅचरी, सार्वजनिक वाचनालय, कला क्रिडा, युवक सांस्कृतिक मंडळ, महात्मा जोतिराव फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, लोकमंगल दाळ मिल, वराहपालन सहकारी संस्था अशा विविध संस्था स्थापन केल्यात. त्यांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.

या संस्था, उपक्रमांतून सुमारे साडेसहा हजार लोकांना रोजगार मिळाला आहे.
मी २०१५पर्यंत दीड हजार उद्योजकांना उभं करण्याचा संकल्प सोडलाय. त्यासाठी कष्ट उपसायची तयारी असणाऱ्या जिगरबाज तरुणांचा मी शोध घेतोय. माझ्याकडं नोकरी मागायला अनेक तरुण येतात. मी त्यांना म्हणतो, नोकऱ्या कसल्या मागताफाडा त्या डिग्र्यांची कागदं. स्वत:चा व्यवसाय सुरू करा. मोठे व्हा. मी मदत करतो. तुळजापूरहून आलेल्या एका सुतार नावाच्या मुलानं खरोखरच त्याची डिग्री माझ्यासमोर फाडून टाकली. मी अवाक् झालो. पण तो माझ्यावर दाखवलेला विश्वास होता. त्याला फर्निचरचा व्यवसाय करायचा होता. त्यासाठी मी त्याला लोकमंगल मल्टिस्टेटमधून आर्थिक मदत केली. चौधरी मसले गावातलं एक जोडपं माझ्याकडं आलं. नवरा माझ्याकडं दोन तीन हजार रुपये पगाराची नोकरी मागत होता. मी त्यांना आमच्या कॉलेजचं कॅँटीन चालवायला दिलं. त्यासाठी त्यांना ५० हजार रुपयांची गरज होती. ते मी मिळवून दिले. त्यांनी कँटीन अत्यंत व्यवस्थित सांभाळलं. त्याच्या जोरावर शेतावरचं ७५ हजारांचं कर्ज फेडलं. सादिक शेख म्हणून एक शिक्षक आहेत. त्यांचं मोठी पोल्ट्री उभारण्याचं स्वप्न होतं. पण या सामान्य शिक्षकाला एवढं कर्ज कोण देणारमी धाडस करून त्याला सव्वा कोटींचं कर्ज दिलं. आज त्याची वार्षिक उलाढालच सव्वा कोटींची आहे.

पारधी समाजातली एक बारावी झालेली तरुणी आहे. शेळीपालन आणि त्याला जोडून काही कुटीरोद्योग करण्याचं तिच्या मनात होतं. तिला विनातारण २० लाखांचं कर्ज दिलं. उत्तम रितीनं तिनं चालवलेला व्यवसाय इतर तरुणींसाठी आज मार्गदर्शक ठरलाय. 
अक्कलकोट शेगावचा एक अपंग मनुष्य आहे. तो दंतमंजन तयार करतो. त्याला दोन लाखांचं कर्ज दिलं. सोलापूर शहरात यशोदास गायकवाड नावाचा तरूण आहे. साधी पानपट्टी टाकायलाही त्याच्याकडं भांडवल नव्हतं. आता त्याचा शोभेचे मासे विकण्याचा मोठा व्यवसाय आहे. वैरागजवळच्या सासूर गावात एक आईसकँडी विकणारा आहे. एक एक रुपया कमावणाऱ्या या माणसानं आता मोठा बंगला बांधलाय. मला अशी कितीतरी उदाहरणं आठवतात. माणसाकडं जिगर असतेच. फक्त त्याला हवी असते थोडीशी मदत आणि विश्वास. त्या दोन्हीही मी देतो. त्या माणसाचं, कुटुंबाचं आयुष्य मार्गी लागतं.  

ग्रामीण भागात कल्पकता असणारी खूप पोरं आहेत. त्यांना छोटे छोटे व्यवसाय करायचे असतात. पीठाची चक्की सुरु करायची असते. त्यासाठी छोटी जागा, छोटं शेड बनवायचं असतं. अडचण येते पैशांची. मी ती बँकेच्या माध्यमातून सोडवतो. मी आवाहन करतो, उद्योग व्यवसाय करू इच्छिणारा माणूस राज्यातला कुठलाही असो मी त्याच्या पाठीशी उभा राहीन. अनेक तरूण लोकमंगच्या माध्यमातून उद्योजक झालेत. शिवाय लोकमंगलनं उभारलेल्या प्रकल्पांतून सुमार वीसेक हजार तरुणांना नोकरी मिळाली आहे.

आपली लोकसंख्या जास्त आहे, त्याची सगळ्यांना चिंता वाटते. मला त्यात संधी दिसते. प्रत्येकाकडं काही ना काही कौशल्य असतंच. म्हणून मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर व्हायला हवा. आपापल्या गावात, परिसरात जर हे उद्योजक उभे राहिले तर मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे जाणारे तरुणांचे लोंढे थांबतील. शहरांवरचा ताणही कमी होईल.

सोलापूर आणि जवळच्या परिसरात श्री सिद्धेश्‍वरअक्कलकोट स्वामी समर्थसंत दामाजीसंत सावता माळीवडवळचे नागनाथ मंदिरकरमाळ्याची कमलादेवीतुळजापूरची तुळजाभवानीपंढरपूरचे विठ्ठल मंदिर अशी नऊ तीर्थक्षेत्रं आहेत. ज्यावर अनेक पूरक उद्योग चालतात. इतर उद्योजकांना चालना मिळते.त्यामुळं पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही तीर्थक्षेत्रे विकसित होणं आवश्यक आहे.
मनापासून ठरवलं तर प्रतिकूल परिस्थितीतले लोकही काय करू शकतात, याचं उत्तम उदाहरण मी पाहिलंय, इस्त्रायल देशात. 
हा देश आमच्या सोलापूर किंवा उस्मानाबादएवढाच आहे. तेवढीच लोकसंख्या आहे. आमच्यापेक्षा हलकी जमीन आणि आमच्यापेक्षा कमी पाणी. तरीही शेतीउत्पन्न विक्रमी. कारण त्या लोकांनी उपलब्ध साधनसामुग्रीचा योग्य तो वापर करण्याची शिस्त अंगी बाणवलीय. तिथं शेतीत १०० टक्के ठिबक सिंचन केलं गेलंय. त्याचे हे सगळे फायदे आहेत. आम्हीही ठरवलंय, जे गाव १०० टक्के ठिबक सिंचन करेल त्याला आम्ही एक लाखाचं बक्षीस देणार. आम्हाला तुमच्या कॅनॉलचं पाणी नको. आम्हाला तुमच्या उजनी धरणातलंही पाणी नको. पडलेल्या पावसाचं थेंब थेंब पाणी साठवू आणि हिरवी क्रांती करून दाखवूअसं स्वप्न आम्ही पाहतोय. आपल्या कार्यक्षेत्रात शिरपूर पॅटर्नचे अनेक बंधारे, पाझर तलाव उभारून लोकमंगल कारखान्यानं या स्वप्नाला हातभार लावलाय.

आणखी एक महत्त्वाचा उपक्रम लोकमंगल सोलापुरात राबवतं. तो म्हणजे, सामूहिक विवाह. लेकीचं लग्न जमवण्यापासून ते हुंडा, लग्नाचा खर्च, त्यासाठी सावकारी पाशात अडकणं आणि मग नाईलाजानं आत्महत्या, असं शेतकऱ्याच्या मागचं दुष्टचक्र मी पाहिलंय. त्यातूनच माझ्या मनात ही सामुहिक विवाहाची कल्पना घोळत होती. २००६मध्ये ती प्रत्यक्षात आली. आम्ही आत्तापर्यंत साडेसहाशे विवाह लावून दिलेत. सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावरील तीन लाख चौरस फुटांच्या मंडपात हे विवाह थाटामाटात पार पडतात. लाखभर लोक जेवतात. जोडप्यांना संसारउपयोगी साहित्य, कन्यादान, अनुदान दिलं जातं. शेवटी सगळ्यांची रिक्षात बसवून थाटात मिरवणूक काढली जाते. या सोहळ्यात आंतरजातीय विवाहासोबतच अंध, अपंग, अनाथांचेही विवाह लावून दिले जातात. आम्ही इथंच थांबत नाही तर या लेकीजावयांना नंतर पाहुणचारासाठी बोलावतो. त्याचाही ऋणानुबंध सोहळा होतो. लोकमंगलचे कर्मचारीही सामुहिक विवाहसोहळ्यात मुलामुलींची लग्नं लावतात. 
विवाह सोहळ्यात येणारे वऱ्हाडी स्वेच्छेनं रक्तदान करतात. शेतकरी आणि मजूर आपल्या मुलामुलींचे विवाह या सामुदायीक विवाह सोहळ्यात लावतात.
सरकारकडून नवरी मुलीच्या आईच्या नावे १० हजार रुपये अनुदान मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आत्तापर्यंत २६७ पालकांना सुमारे २६ लाख ७० हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळवून देण्यात आलेत. याच पद्धतीनं मागासवर्गीय अनुदान योजनेअंतर्गत ५३ वधुमातापित्यांना पाच लाख ३० हजार रुपये अनुदान मिळवून दिलं गेलं आहे.

या जोडप्यांच्या मुलीच्या जन्मानंतर तिला 18व्या वर्षी एक लाख  रुपये मिळावेत, एवढी तरतूद करून ठेवतो. कुटुंबाला स्वत:चा उद्योग व्यवसाय उभारून देण्याचा प्रयत्न करतो.
या विवाहांसाठी सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांमध्ये सुमारे ६३ नोंदणी कार्यालयं उघडण्यात आली आहेत.
हे सगळं उभारत असताना यशासोबत अपयशही मिळालं. ते एक बरंच झालं. नाही तर मी मुजोर झालो असतो. जनतेपासून तुटलो असतो. लोकमंगल यशस्वी होण्यामागचं मोठं कारण म्हणजे मला मिळालेले जीवाला जीव देणारे, झोकून देऊन काम करणारे तरूण कार्यकर्ते. त्यांच्यामुळंच तर मी लायकी आणिबॅकग्राऊंड नसताना हे लोकमंगलचं विश्व उभं करू शकलो. या माध्यमातून आपण समाजाच्या उपयोगी पडतोय. याबदद्ल खूप समाधान वाटतंय. 

माझी दोन्हीही मुलं यूएसमधून शिकून आलीत. ते दोघेही आता लोकमंगलच्या कामात लक्ष घालतायत. पत्नी सीमा, मुलगी अश्विनी यांच्या सहकार्यामुळंच मी लोकमंगलचा हा भला थोरला गाडा हाकू शकतो.
लोकमंगलचं बोधचिन्ह कासव आहे. तर अखंड गतीतून सार्थकता हे ब्रीदवाक्य आहे. प्रयत्नात, कामात सातत्य ठेवून प्रगतीचं ध्येय निश्चितपणे गाठायची प्रेरणा हे बोधचिन्ह आम्हाला देतं. 
मला असं वाटतं, की लोकमंगल हा विचार आहे. लोकविकासाची ती अंतरीची प्रेरणा आहे. समाजातील सर्व घटकांना डोळ्यासमोर ठेवून सहकार्यातून तयार झालेलं लोकमंगल नावाचं ते विकासाचं मॉडेल आहे. त्याच्या अखंड वाटचालीसाठी तुमच्याही सहकार्याची आणि शुभेच्छांची आवश्यकता आहे.




2 comments:

  1. बापू तुमच्या कार्यास hats of ...

    ReplyDelete
  2. बापू तुमच्या कार्यास hats of ...

    ReplyDelete