'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Saturday 22 October 2016

मानवतेचं गाणं

'रिंगण'चा पहिला म्हणजे संत नामदेव विशेषांक प्रसिद्ध झाल्यावर दुसरा अंक काढणार होतो, त्यांचे लाडके शिष्य संत चोखामेळा यांच्यावर. पण जगाप्रमाणं आमचंही त्यांच्याकडं दुर्लक्ष झालं. त्यांच्या अंकासाठी पैसे नाहीत, हे कारण घेऊन त्या वर्षी आम्ही अंकच काढू शकलो नाही. चोखोबाराया, माफ करा म्हणालो. दुसर्‍या वर्षी मात्र आम्ही निर्धार केला आणि संत चोखोबा आमच्या रिंगणात आले. मराठी समाजजीवनात आणि साहित्यात चमत्कार किंवा दंतकथा वाटावी असं चोखोबा आणि त्यांचं कुटुंब. त्यांच्याविषयी 'रिंगण'मध्ये मी लिहिलेला हा लेख...


तेराव्या शतकात जेव्हा जगभरात कुठंही उपेक्षितांचा आवाज उमटत नव्हता, दलित मुक्ती, स्त्रीअधिकार आदी शब्दांनी जन्मही घेतला नव्हता, त्या काळात महाराष्ट्रातील मंगळवेढा, पंढरपुरात संत चोखामेळ्याचं कुटुंब वंचितांच्या वेदनांना शब्दरुप देत होतं. मानवतेचं गाणं गात होतं. दुर्देवानं आपल्याला त्यांचं मोठंपण कधीच कळलं नाही. जातीपातींच्या आणि धार्मिक चौकटींच्या बाहेर येऊन आपण त्यांचं दर्शन घेतलंच नाही. आजही ते घेतलं तर आपण मानवी इतिहास नोंदले जाऊ...    

पाऊस दरवर्षी ओढ देतो. चैत्र, वैशाखापासूनच टंचाईच्या झळांना सुरुवात होते. संपत आलेल्या चार्‍याकडं बघत गुरं हंबरत असता. आषाढी वारीला जाण्यापूर्वी चार्‍याच्या बेगमीसाठी वडील पंचक्रोशीत फिरतात. ण प्रत्येकाला आपापली काळजी. अशा वेळी वरच्या मळ्यातले बाळनाना हमखास मदतीला येतात. भोळाभाबडा शेतकरी, पण पोटात माया. एकदा म्हणाले, बुवा आता "…आणखी नका पडू गबाळाचे भरी..." वडील चमकतात. त्यावर बाळनाना हसून म्हणतात, अहो तुमच्याच भजना-कीर्तनात ऐकलंय...
लहानपणीचा हा प्रसंग मला काही दिवसांपूर्वी संत सोयराबाईचे अभंग वाचताना आठवला.
आणिक नका पडू गबाळाचे भरी।
म्हणतसे महारी चोखियाची।।
मी थरारूनच गेलो. प्रस्थापित साहित्यात कधीही न दिसलेलं या दलित महिला संताचं अर्थात संत सोयराबाईचं हे शब्दधन खेड्यातल्या एका निरक्षर शेतकर्‍यानं कसं जपून ठेवलं असेल? शिवाय वेळप्रसंगी ते चपखलपणानं वापरावं, याचं भान त्याला कुणी दिलं असेल?
सुमारे ७०० वर्षांपूर्वी गावकुसाबाहेरच्या अस्पृश्यांच्या वस्तीत राहणार्‍या, नवर्‍यासोबत महारकीची, मोलमजुरीची मिळेल ती कामं करणार्‍या, शिळा भाकरतुकडा खाऊन राबराब राबणार्‍या, जुनेर नेसून फाटका संसार ओढणार्‍या या माऊलीनं कसे लिहिले असतील एवढे नितांतसुंदर, अर्थगर्भ अभंग?
...आणि सार्‍या गावाला 'जी जी', 'जोहार माय बाप' म्हणणारा, त्यांची पडेल ती कामं करणारा, मेलेली गुरं ओढणारा, त्यातून सवड मिळेल तेव्हा पत्नीला लिहायला, वाचायला शिकवणारा, स्वत:च्या कर्तृत्वानं संतपदाला पोहोचलेला सोयराबाईचा पती चोखामेळा.

संत चोखोबा आणि सोयराबाई हे संत दांपत्य म्हणजे भारतीय समाजातील एक सांस्कृतिक चमत्कारच. ज्यांना महार जातीचे, अस्पृश्य म्हणून समाजानं अत्यंत हीन, अमानवी वागणूक दिली त्याच समाजाचं भलं चिंतणारे अभंग या उभयतांनी लिहिले. त्यांच्या जन्म मृत्यूची नेमकी नोंद, नावा-गावाचा वास्तव इतिहास अजूनही सापडत नाही. तो नोंदवून, जपून तरी कोण ठेवणार होतं? तरी हे उभयता टिकले. तब्बल सातशे वर्षे टिकले. ते केवळ त्यांच्या प्रतिभेवर, शब्दसामर्थ्यावर, अभंगावर! कुटुंबप्रमुख म्हणून चोखोबाच्या नावा-गावाची, जन्ममृत्यूची काही का होईना नोंद सापडते. सोयराबाईंची तर तीही नाही.
काहींच्या मते बुलडाण्यातील मेहुणपुरा गाव चोखोबांचे जन्मस्थळ, काही म्हणतात पंढरपूर. तर अनेकजण म्हणतात, मंगळवेढ्यातच चोखोबांचा जन्म झाला. प्रा. देविदास इथापे यांच्या मते १४ जानेवारी १२६८, शके ११९० ही चोखोबांची जन्मतारीख आहे. चोखोबांच्या आईचे नाव सावित्रीबाई तर वडील सुदामा येसकर. चोखोबांच्या बहिणीचे नाव निर्मळा, मेहुण्याचे नाव बंका आणि मुलगा कर्ममेळा. त्यांच्या आणि इतर समकालीन संतांच्या अभंगांमधूनच या सर्वांची आपल्याला ओळख होते. सध्या संत चोखामेळा यांचे ३५८, सोयराबाईचे ६२, कर्ममेळाचे २७, बंका यांचे ४१, तर निर्मळाचे २४ अभंग उपलब्ध आहेत. चोखोबांच्या काळात त्यांचे संतसांगाती होते, निवृत्तीनाथ, नामदेव, ज्ञानदेव, जनाबाई, सोपानदेव, मुक्ताबाई, चांगदेव, गोरा कुंभार, जगमित्र नागा, सावतामाळी, नरहरी सोनार. या संतांच्या संगतीतच चोखोबांची प्रतिभा बहरली.
चोखोबांच्या मृत्यूची तारीख मात्र सर्वमान्य असल्याचे दिसते. मंगळवेढे येथे गावकुसू कोसळून त्याखाली काम करणार्‍या चोखोबांचा मृत्यू गुरुवारी वैशाख वद्य पंचमी, शके १२६० रोजी झाला.

चोखोबा कुटुंबाचं मुक्कामाचं कायमस्वरुपीचं ठिकाण, पोटापाण्याचा उद्योग नातेवाईक, याबद्दल ठोस माहिती मिळत नाही. विशेष म्हणजे त्याविषयी फारसं संशोधनही होताना दिसत नाही. चोखोबाचं बुलडाण्यातील कथित जन्मस्थळ मेहुणपुरा, मुक्कामस्थळ मंगळवेढा आणि कर्मस्थळ पंढरपूर या तीन ठिकाणी हे थोर संत कुटुंब आपलं ऐतिहासिक आयुष्य जगलं. या तीनही ठिकाणांशी त्यांचं जीवाभावाचं नातं होतं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते चोखोबा वर्‍हाडातील आहेत. चोखोबांचे चरित्रकार महिपतीबुवा ताहराबादकर यांच्या मते चोखोबा पंढरपूरचे आहेत.
मेहुणपुरामध्ये चोखोबा कटुंबाच्या स्मृतीखुणा पाहायला मिळतात. चोखोबांची बहीण निर्मळा आणि मेहुणा बंका याच गावात राहत. मेहुणपुराशी असलेलं नातं सोयराबाईच्या अभंगांतून उलगडतं.
झाली निर्मळेची भेटी। सोयरा पायी घाली मिठी।।
धन्य बाई मेहुणपुरी। म्हणे चोख्याची महारी।।
या नणंद भावजया एकमेकीच्या तेला-मीठा-पीठाला, सुख-दु:खाला आधार असणार हे दोघींच्याही अभंगांमधून जाणवत राहतं. बाकी त्यांच्या नात्याविषयी लोकप्रिय आख्यायिकाही प्रचलित आहेत. कर्ममेळ्याच्या वेळी सोयराबाईच्या पोटात दुखत असताना चोखोबा मदतीसाठी निर्मळेकडेच गेल्याचा उल्लेख आहे. चोखोबा निर्मळेला घेऊन लवकर येत नाही म्हणून देवच निर्मळेचं रुप घेऊन सोयराबाईचं बाळंतपण करतो, अशीही कथा प्रचलित आहे.


मेहुणपुर्‍यात चोखोबांचं जन्मस्थळ, बंका आणि निर्मळेची समाधी पाहायला मिळते. या गावात दरवर्षी १४ जानेवारी रोजी चोखोबांचा जन्मोत्सवही साजरा केला जातो.
सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा गावाचा उल्लेख आला की, पाठोपाठ संत चोखामेळा यांचं नाव येतं. एवढं त्यांचं मंगळवेढ्याशी नातं घट्ट आहे. मेहुणपुर्‍याहून चोखोबा कुटुंब मंगळवेढ्याला कधी आणि का आलं, याविषयी काही संदर्भ सापडत नाही. एक मात्र नक्की तत्कालीन समृद्धी, रोजगाराची सोय आणि महत्त्वाचं म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक स्वातंत्र्य जपणार्‍या या गावात राहणं चोखोबांना अधिक सोयीचं वाटलं असणार. मंगळवेढ्याला संतांच्या सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. वैदिक, जैन, बौद्ध, शैव, वैष्णव, लिंगायत, महानुभव, सूफी असे सर्व धर्म, पंथ मंगळवेढ्यात बहरले, नांदले. परिसरावर या संतविचारांचा मोठा प्रभाव पडला. स्त्री-शूद्रांना अधिकार देणार्‍या बसवेश्वरांच्या लिंगायच पंथांचं तर मंगळवेढा ठाणंच होतं. बसवेश्वरांच्या शिकवणुकीचीच उर्जा चोखामेळा कुटुंबाला मुख्यत: सोयराबाई आणि निर्मळेला मिळाली. मंगळवेढ्यातील विविध पंथांच्या विचारसरणीचं प्रतिबिंब चोखोबा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अभंगात पडलेलं दिसतं. या काळात सूफी संतांचा मोठा वावर या परिसरात होता. जवळच्या विजापुरात सूफी संतपीठ स्थापन झालं होतं. चोखोबा आणि सोयराबाईच्या अभंगात अरबी आणि फारसी शब्द विपुल प्रमाणात आढण्याचं कारण हेच असावं. 
आणिक नका पडू गबाळाचे भरी। म्हणतसे महारी चोखियाची।। या सुरुवातीला उल्लेख केलेल्या अभंगातील गबाळ (घैब या फारशी शब्दापासून- घैब-गाईब-गायब-गबाळ) या शब्दाचा अर्थ निरुपयोगी किंवा अव्यवस्थित असा आहे. चोखोबांच्या अभंगाlत तर फार्सी शब्द खूपदा येतात. उदा.
मी विठोबारायाचा महार। हिशोब देतो तारोतार।।
लंबे बाकीचा कारभार। मज नफराचे शिरी।।
अशी सर्व धर्म, पंथांना सुखानं सामावून घेणारी मंगळवेढ्याची भूमी. ज्ञानोबामाऊली म्हणतात, 'कोंभाची लवलव सांगे भूमीचे मार्दव'...मंगळवेढ्यात रुजलेल्या चोखामेळा कुटुंबाच्या बाबतीत हेच म्हणता येईल. अर्थात तत्कालीन रुढींप्रमाणे या कुटुंबाला इथं अस्पृश्यतेचे तीव्र चटके बसले, हेही खरं.
   
चोखोबांच्या मंगळवेढ्याहून पंढरपूर अवघ्या १४ मैलांवर. अनेक दिंड्या मंगळवेढ्याहूनच पंढरपूरला जातात. वेगवेगळ्या उपासना पद्धती पाहिलेल्या चोखोबांना नाचत गात पंढरीला निघालेल्या वारकर्‍यांविषयी विशेष आपलेपण वाटलं असावं. त्यांच्यासोबतच कधीतरी पंढरपूरला गेल्यानंतर वाळवंटातील आषाढी-कार्तिकीचा समतेचा सोहळा त्यांनी अनिमिष नेत्रांनी पाहिला. इथंच त्यांची वारकर्‍यांची चळवळ उभारणार्‍या संत नामदेवांशी भेट झाली. अधिकारहीन जातींना त्यांचा अधिकार मिळवून देण्याचा चंग बांधलेल्या संत नामदेवांनी महार चोखोबाच्या पाठीवर हात ठेवला. त्यांच्यात गुरुशिष्याचं नातं तयार झालं. अर्थात हे नातं कसं होतं, त्याबद्दल चोखोबा म्हणतात,
चोखा म्हणे माझा नामदेव प्राण।
घालीन लोटांगण जीवें भावे।।
नामदेवही काही चोखोबाशी गुरुच्या तोर्‍यात वागले नाहीत. उलट
चोखा माझा जीव। चोखा माझा भाव।।
कूळ, धर्म देव। चोखा माझा।।
एवढं उच्चतम स्थान त्यांनी चोखोबाला दिलं. त्यातून तत्कालीन समाजाला त्यांनी योग्य तो संदेश दिला. नामदेवांसोबतच्या ज्ञानदेवादी अनेक संतांचा चोखोबांना सहवास लाभला. त्यामुळं चोखोबाचं आयुष्यच बदलून गेलं. पंढरपुरात दाखल झालेल्या चोखोबा आणि सोयराबाईला सर्वाधिक जीव लावला तो नामदेवांच्या घरच्या दासी जनीने. संतमंडळीत जनाबाईचा अधिकार खूप मोठा होता.  
चोखामेळा संत भला। तेणे देव भुलविला।।
अशा शब्दांत तिने चोखोबाच्या भक्तीची ताकद जगाला सांगितली. चोखोबा आणि इतर संतांमध्ये संवाद घडवून दिला. त्यांच्यातील अनुभव, विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून प्रयत्न केला. संतांना कडेखांद्यावर घेतलेल्या विठोबाचं जे चित्र जनाबाईनं रंगवलं आहे, त्यात देवाने चोखामेळ्याला आवर्जून बरोबर घेतल्याचं वर्णन जनाबाई करते. या अस्पृश्य संताच्या घरी देव काम करत असल्याचं, म्हणजे अगदी चोखामेळ्याला मेलेली ढोरेसुद्धा देव ओढू लागल्याचं जनाबाईनं लिहून ठेवलंय.
इतर समकालीन संतांनीही चोखोबाबद्दल लिहून ठेवलंय.


समाजातील भेदाभेद मिटवण्याच्या नामदेवांच्या खटाटोपाला बर्‍यापैकीच यश येत होतं. नामदेवांनी शैव आणि वैष्णवांमध्ये दिलजमाई घडवून आणल्याचं ठळक उदाहरण म्हणजे संत नरहरी सोनार. त्यानं थोर थोर संतांच्या मेळ्यात चोखोबा उभा असल्याचं वर्णन केलंय. तसंच चोखोबा महाद्वाराशी तिष्ठत उभा असे, याची साक्षही दिली आहे.
याशिवाय सोयराबाई, बंका, निर्मळा आणि कर्ममेळा यांच्या अभंगातून चोखामेळ्याचं दर्शन होतं. समकालीन संतांनंतर संत एकनाथ महाराज, तुकाराम महाराज तसेच मोरोपंत यांनी चोखोबांची थोरवी गायली आहे.
चोखोबाला मार्गदर्शक मानणारे मेहुणे बंका आपल्या अभंगातून चोखोबांचं मोठं सुंदर, निर्मळ वर्णन करतात.
चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ।।
चोखा सुखाचा सागर। चोखा भक्तीचा आगर।।
चोखा प्रेमाची माउली। चोखा कृपेची साउली।।
यासोबतच चोखामेळ्याची आरती लिहून बंकामहाराजांनी चोखोबांना चिरंजीव करून ठेवलं आहे. नंतरच्या काळात
चोखोबाची भक्ती कैसी। प्रेमे आवडी देवासी।।
ढोरे ओढी त्याचे घरी। नीच काम सर्व करी।।
असे एकनाथ महाराज चोखोबांचे वर्णन करतात.
तर
चोखोबा माझा गणपती।
राधाई महारीण सरस्वती।
 असं तुकाराममहाराज पहिलं नमन चोखोबा आणि सोयराबाईला करतात.
समकालीन पंतकवी मोरोपंत म्हणतात,
गावा न मानावा चोखामेळा महार सामान्य।
ज्याच्या करि साधूचा चोखामेळा महार असामान्य।।
संत संताजी जगनाडे, महिपतीबुवा यांनीही चोखोबाची महती गायली आहे.

संतांच्या संगतीचे सुख लुटणार्‍या चोखोबाला मात्र त्यानं वर्णन केलेल्या भूवैकुंठात, पंढरपुरात अस्पृश्यतेचे जबर चटके, फटके सहन करावे लागले. नामदेवादी संतांनी समतेचा धर्म सांगणार्‍या ज्या विठोबाला शरण जा, असं चोखोबाला सांगितलं, त्या विठोबाचं प्रत्यक्ष दर्शन सनातन्यांनी त्याला घेऊ दिलं नाही. विठुरायाच्या मुखदर्शनासाठी सदैव महाद्वाराशी तिष्ठत उभ्या असणार्‍या चोखोबाला सतत हाकलून देण्यात आलं. त्यानं पुन्हा येऊ नये म्हणून त्याच्यावर नाना आळ घेऊन त्याला जबर मारहाण करण्यात आली. कधी विठोबाचा हार चोरला म्हणून, तर कधी स्पर्श करून देव बाटवला म्हणून त्याला अगदी बैलांना बांधून ओढण्याची शिक्षा देण्यात आली. या छळाचं अत्यंत हृदयद्रावक वर्णन चोखोबांनी आपल्या अभंगातून केलंय.
धाव घाली विठू आता चालू नको मंद।
बडवे मज मारिती काय केला अपराध।।
विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला।
शिव्या देती मजला म्हणती देव बाटविला।।
शेवटी त्या दांडग्यांनी देवळापाशी घुटमळणार्‍या ओढाळ चोखाबाची उचलबांगडी करून त्याला नदीच्या पल्याड नेऊन सोडला. इथून हालायचं नाही, अशी सक्त ताकीद दिली.
भरल्या डोळ्यांनी चोखोबांनी तिथूनच देवाला हात जोडले,
नेत्री अश्रूधारा उभा भीमातीरी।
लक्ष चरणावरी ठेवोनिया।।
का गा मोकलीले न येसी देवा।
काय मी केशवा चुकलोसे।।
असं स्वत:च्या अवस्थेचं वर्णन केलंय. मग चोखोबांनी इथं एक थोर गोष्ट केली. तिथल्या शेतातच झोपडी बांधून तिथं दगडी दीपमाळ उभारली. ही दीपमाळ म्हणजे, विरहाचं, बंडाचं, ज्ञानाचं, जागृतीचं, आत्मभानाचं प्रतिकच जणू. आषाढीला पंढरपूरला येणारी सर्व संतमंडळी मग चोखोबाला भेटायला त्याच्या या दीपमाळेच्या झोपडीत जाऊ लागली. खुद्द देवही त्या झोपडीत जाऊन जेवल्याची अख्यायिका आहे. या सर्व गोष्टींचा या जागेवर आता मागमूसही उरलेला नाही.
याच जागेवरून मंगळवेढ्याचं गावकूस बांधण्यासाठी त्याला जबरदस्तीनं नेण्यात आलं. काम सुरू असताना ते कूस कोसळून इतर मजुरांसोबत आपल्या या थोर संतकवीचंही निधन झालं. आयुष्यभर देवाजवळ स्थान मिळण्याची त्याची अपूर्ण राहिलेली इच्छा त्याच्या मत्यूनंतर त्याच्या गुरूने, संत नामदेवांनी पूर्ण केली. मंगळवेढ्याहून चोखोबांची हाडं आणली. पंढरपुरात विठ्ठलाच्या महाद्वारात चोखोबा जिथं गहिवरून, हात जोडून उभा राहत असे, त्या ठिकाणी पुरली. तिथंच त्याची समाधीही बांधली.
   
आयुष्यभराच्या प्रतिकूल परिस्थितीत चोखोबांनी एक नित्यनेम मात्र सोडला नाही, तो म्हणजे अभंग लिहिणं. मग ते मंगळवेढ्यात गावकीचं काम करताना, ढोरं ओढताना असो, संतांच्या सोबत चंद्रभागेच्या वाळवंटात असो की मंगळवेढ्याच्या गावकुसाचं काम करताना असो, चोखोबा आणि सोयराबाईची लेखणी थांबली नाही. म्हणून तर आज सर्व पाउलखुणा पुसल्या जाऊनही केवळ शब्दांच्या संजीवनीवर हे दांपत्य जिवंत आहे.
चोखोबांनी सध्या उपलब्ध असलेल्या अभंगांपेक्षाही अधिक अभंग लिहिले असावेत. कारण संशोधकांना अजूनही त्यांच्या अभंगांची हस्तलिखितं सापडत आहेत. चोखोबांनी विवेकदीप नावाचा एक ग्रंथही लिहिल्याचा उल्लेख आहे, मात्र तो अजून उपलब्ध झालेला नाही. तसंच सोयराबाईनेही कृष्णचरित्र नावाचं काव्य लिहिल्याचा उल्लेख येतो, पण तोही संशोधकांना सापडलेला नाही.

चोखामेळा कुटुंबाचा हा सारा प्रवास जिच्या जीवावर झाला किंबहुना चोखाबा संत म्हणून जिच्यामुळं नावारुपाला आले ती व्यक्ती म्हणजे चोखोबांची पत्नी संत सोयराबाई. कष्टप्रद आयुष्यात चोखोबाला पंढरीच्या विठुरायानं जगण्याचं बळ किती दिलं ते माहीत नाही; पण एक नक्की, सोयराबाईची भक्कम साथ असल्यामुळंच चोखोबा नाना प्रकारच्या छळवणुकीला तोंड देत उभे राहिले. लिहिते राहिले. दरिद्री संसाराचा गाडा ओढता ओढता सोयराबाई चोखोबांकडून लिहायला-वाचायला शिकली. चोखोबासोबत मजुरी करता करता अभंग लिहित राहिली. वारकरी पंथाची समतेची शिकवण सांगत राहिली. देवानं चोखोबा कुटुंबाला अडीअडचणीत मदत केल्याच्या अख्यायिकांमध्ये सोयराबाई प्रामुख्यानं आहे. देव सोयराबाईच्या हातचा दहीभात खातो. चोखोबाच्या झोपडीत सोयराबाईच्या हातचा स्वयंपाक जेवायला सर्व संतमेळा जमा होतो. त्या पंगतीत देवही जेवायला येतो. या कथा चोखोबासोबतच सोयराबाईचाही संतांमधील अधिकार सांगणार्‍या आहेत.

सर्व संतांच्या अभंगांत गोड आहेत, ते चोखोबांचे अभंग आणि त्याहूनही गोड आहेत ते सोयराबाईनं लिहिलेले अभंग. आपल्याला सोयराबाईचे बहुदा दोनच अभंग परिचित असतात. एक म्हणजे, किशोरी अमोणकरांनी गायलेला ‘अवघा रंग एक झाला...’ आणि दुसरा पंडित भीमसेन जोशींनी पहाडी आवाजात गायलेला सुखाचे हे नाम आवडीने गावे। वाचे आळवावे विठोबासी।। हा अभंग. केवळ तत्त्वज्ञानात्मकच नाही तर, आपलं साधंभोळं जगणं आणि जगण्यातले बारीक-सारीक आनंदही सोयराबाईच्या अभंगांचे विषय बनले. अगदी नणंदेच्या प्रेमाचे, तिच्या घरी राहण्याचं सुखही सोयराबाई आपल्या अभंगात आनंदानं सांगते. नणंद निर्मळेच्या घरात अंघोळ करणे म्हणजे, कोटी कोटी वेळा प्रयागाला जाण्यासारखं आहे, असं ती म्हणते. त्यापुढं तिला गंगा, इंद्रायणी, न् चंद्रभागेचं स्नानही फिकं वाटतं. आनंददायी अभंग लिहिणार्‍या सोयराबाईनं रणरागिणीचा अवतार धारण केल्याचं खुद्द संत नामदेवांनी पाहिलं. त्यांनी ते अभंगात लिहून ठेवलंय. पंढरपुरात चोखोबाला मारहाण होताना शांत बसणार्‍या विठोबाला ती झणझणीत शब्दांत सुनावते.
खाइलें जेविलें त्याचा हा उपकार।
दुबळीचा भ्रतार मारुं पाहसी।।
काढी हात आतां जाय परता उसण्या।
जाय पोटपोसण्या येथोनियां।।
देवाला अशा कडक शब्दांत सुनावणारी आपली आईच पुढं कर्ममेळ्याची प्रेरणा ठरली. चोखोबा अन्याय निमूटपणे सहन करत असताना सोयराबाईनं खमकी भूमिका घेतली. कर्ममेळ्यावर तसे संस्कार केले. म्हणून तर कर्ममेळ्यानं पुढं जाऊन   
आमुची केली हीन याती।
तुज कां न कळे श्रीपती।।
असा थेट सवाल देवालाच केला.

चोखा मेळ्यानं प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंड केलं नाही. पूर्वजन्माचं पाप म्हणून आपण हीन जातीत जन्मालो,  आपण अत्यंत क्षुद्र, तुमच्या दारीचा कुतरा, असं म्हणत चोखोबानं वारंवार स्वत:कडे कमीपणा घेतला. इतरांना क्षणोक्षणी जोहार घातला. त्यांनी दुष्ट वागणूक दिली तरी नम्रतेनं त्यांना मायबाप म्हटलं. त्याविरोधात कधी विद्रोह केला नाही, म्हणून चोखोबा आणि त्याची पत्नी सोयराबाई हे प्रतिकच आम्हाला नको, अशी भूमिका आंबेडकरी चळवळीनं घेतली. पण या विनम्रतेच्या राखेखाली विद्रोहाचे चटके देणारे निखारे दडले होते, याकडं विचारवंतांचंही दुर्लक्ष झालं. प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र ते ओळखलेलं होतं. म्हणून तर आपलं The Untouchables हे पुस्तक त्यांनी संत चोखामेळा, नंदनार आणि रोहिदास या संतांना अर्पण केलं. 
आयुष्यभर विठोबाच्या दर्शनासाठी तळमळ करणार्‍या चोखोबाला मंदिरात जाऊ न देणार्‍या तत्कालीन मानसिकतेला आंबेडकरी भीमटोला बसणेच गरजेचंच होतं. तसा तो बसलाही. पण सुमारे ७०० वर्षांपूर्वीचा काळ लक्षात घेता चोखोबांचा व्यवस्थेविरोधातला एल्गार हा यत्किंचितही कमी नव्हता. देवाधर्मावर टीका करणे, त्यांची परखड चिकित्सा करणं यासाठी डॉ. आंबेडकरांनाही विरोध झाला. अजूनही त्याबाबत टोकाच्या भावना असतात. या पार्श्वभूमीवर चोखोबांनी त्या काळात लिहिलेले अभंग पाहावेत.
वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ।
पुराणे अमंगळ विटाळाची।।
जीवासी विटाळ शिवासी विटाळ।
काया अमंगळ विटाळाची।।
ब्रम्हिया विटाळ विष्णूसी विटाळ।
शंकरा विटाळ अमंगळ।।
जन्मतां विटाळ मरतां विटाळ।
चोखा म्हणे विटाळ आदिअंती।।
ब्रम्हा, विष्णू, महेशदेखील विटाळापासून वेगळे नाहीत, असं सोवळंओवळं पाळणार्‍या धर्ममार्तंडांना त्यांनी त्या काळात ठणकावलं.
सोयराबाई तर त्याही पुढे गेल्या,
देहासी विटाळ म्हणती सकळ।
आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध।।
देहीचा विटाळ देहीच जन्मला।
सोवळा तो झाला कवण धर्म।।
असे विटाळाचे अभंग लिहिले.
तत्कालीन धर्मठकांची या उभयतांनी चांगलीच उत्तरपूजा करून ठेवली. चोखोबा एका अभंगात म्हणतात,
धिक् तो आचार धिक् तो विचार।
धिक् तो संसार धिक् जन्म।।
धिक् ते पठण धिक् ते पुराण।
धिक् यज्ञ हवन केले तेणे।।
असा कर्मकांडाचा सरळ सरळ धिक्कार करणार्‍या चोखोबाचा तो मंदिराजवळ गेला नसता तरी छळ होणार होताच, हे उघड आहे. त्याने विठ्ठलमंदिरात जाण्याचा प्रयत्न करणं हे केवळ त्या छाळासाठी निमित्त ठरलं. अर्थात सध्याचा बडवेमुक्त विठुराया म्हणजे पहिल्यांदा चोखोबांनीच बडव्यांविरोधात पुकारलेल्या बंडाचं फळ आहे, हेही लक्षात घ्यायला हवं. 
मारहाणीनंतरही चोखोबा त्या सनातन्यांच्या 'बा'लाही धूप घालत नाही. उलट
माकडाचे परि हालविती मान।
दावी थोरपण जगामध्ये।।
स्वहिता मुकले, स्वहिता मुकले।
बळी झाकी डोळे नाक धरी।।
माळा आणि मुद्रा दाविताती सोंग।
डोलविती अंग रंग नाही।।
असे त्यांच्या ढोंगाचे बुरखे टराटरा फाडतात. चोखोबा केवळ धर्ममार्तंडांbjवरच प्रहार करून थांबत नाहीत तर तत्कालीन यादव राजसत्तेचीही परखड चिकित्सा करतात.
एकासी कदान्न एकासी मिष्टान्न।
एका न मिळे कोरान्न मागताचि।।
एकासी वैभव राज्याची पदवी।
एक गावोगावी भीक मागे।।
अशी सामाजिक विषमता निदर्शनास आणून देतात.


चोखोबा-सोयराबाईचा मुलगा कर्ममेळा या रोखठोकपणात या दोघांपेक्षाही सवाई निघाला.
जन्म गेला उष्टे खातां।
लाज न ये तमच्या चित्ता।।
हा कर्ममेळ्यानं देवाला केलेला हा सवाल लाखो दलितांच्या दबलेल्या भावनांना मिळालेला उदगार होता. आईबापाच्या काव्याच्या विनम्र राखेखालचे विद्रोहाचे लालबुंद निखारे कर्ममेळ्याच्या अभंगात धगधगू लागलेले दिसतात.
मुळात हे कुटुंब म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्थेतील एक चमत्कारच होता. अजूनही प्रतिकूल परिस्थितीत वैश्विक दर्जाचे काव्य लिहिणार्‍या या कुटुंबाकडं आपण पुरेसं लक्ष दिलेलं नाही. रात्रंदिवस गावकीचं पडेल ते काम करणारा हा महार संत स्वत: तर जिद्दीनं साक्षर झालाच पण त्यानं पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, बहीण निर्मळा आणि मेहुणा बंका यांनाही लिहायला वाचायला शिकवलं. अभंगांतून व्यक्त व्हायला शिकवलं. चोखोबाची ही कृती कालातीत होती.

तेराव्या शतकात जेव्हा जगभरात कुठंही उपेक्षितांचा आवाज उमटत नव्हता, दलित मुक्ती, स्त्रीअधिकार आदी शब्दांनी जन्मही घेतला नव्हता, त्या काळात चोखोबांचं कुटुंब वंचितांच्या वेदनांना शब्दरुप देत होतं. मानवतेचं गाणं गात होतं. त्यांच्या या कार्याला केवळ धार्मिक लेबल लावून बाद करणं हा मोठा कृतघ्नपणा ठरेल. चोखोबा म्हणजे संत नामदेवांनी लावलेल्या समतेच्या वृक्षाला आलेलं पहिलं फळ होतं, असं ठामपणानं म्हणता येतं. नामदेवांनी त्या काळी चंद्रभागेच्या वाळवंटात राबवलेला सोशल इंजीनिअरिंगच्या प्रयोगाला सर्वजातीय संतांच्या रुपानं यश मिळालं होतं. म्हणून तर ज्ञानदेवादी ब्राम्हण संत वाळवंटात चोखा मेळ्याची उराउरी भेट घेऊ शकत होते. चोखा मेळ्यानं आपल्या अभंगातून ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीची महती गायली, तर आपल्या कर्मठ ब्राम्हण वडिलांच्या विरोधाला न जुमानता कर्नाटकातल्या अनंतभट्ट नावाचा युवक चोखामेळ्याच्या अभंगांचा लेखक बनला. या अनंतभट्टामुळं तर चोखोबांचे हे अभंग आज आपल्याला वाचायला मिळतात.

परदेशाची तुलना करण्याचा मोह आवरत नाही. पण हेच साहित्यिक कुटुंब युरोपातील एखाद्या प्रगत राष्ट्रात होऊन गेलं असतं तर, त्यांच्या स्मृती भव्यदिव्य स्वरुपात जतन करून ठेवल्या गेल्या असत्या. मेहुणपुरा, मंगळवेढा, पंढरपूर या ठिकाणी त्यांची यथोचित स्मारकं उभी राहिली असती. त्यांच्या नावाच्या संशोधन संस्था निघाल्या असत्या. महाराष्ट्राची खरी ओळख बनलेल्या, वारकरी कुटुंबाचं प्रतिनिधीत्व करणाJdर्‍या या कुटुंबाचं एखाद भव्य शिल्प चंद्रभागातिरी उभं राहिलं असतं.
इथल्या सर्वच संतांचं दुर्दैव हे की ते ज्या जातीत जन्मले त्याच जातीत बांधले गेले. चोखोबाचं दुर्दैवं तर त्याहूनही अधिक. दलितमुक्तीच्या चळवळीत सामील झालेल्या त्याच्या जातीबांधवांना तर त्याचा उल्लेखही नकोसा वाटतो. दुसरीकडं आपली परंपरा समृद्ध करणार्‍या या संताच्या महाद्वारातील समाधीवरचं छप्पर तरी नीट करू, असं त्याच्या वारकरी संप्रदायाला अजूनही वाटलेलं नाही.




No comments:

Post a Comment