अत्रे विविध आहेत. ते महाराष्ट्राला माहितही आहेत. पण हे अत्रे मी पुन्हा एकदा सांगणार आहे. मला कळलेले. त्याला विश्लेषण म्हणा हवं तर. त्यांच्यावर जमेल तसं लिहित राहीन. त्यांच्या लेखनाचं झालेलं आकलन मांडीन. चर्चा करीन. कारण महाराष्ट्र आणि मराठी माणूस समजून घ्यायचा असेल, तर अत्रे वाचायलाच हवेत.
काळाचा आवाज
संतांचा समतेचा विचार
साहित्याची जाण आणि भान
नाटक आणि सिनेमा
भूमिका बदलल्या, निष्ठा कायम
'लोकप्रभा'तील लेखाची लिंक - http://www.loksatta.com/lokprabha/20111111/vyktimatva.htm
पीडीएफ पाने - http://lokprabha.loksatta.com/15738/Lokprabha/11-11-2011#p=page:n=46:z=2
'लोकप्रभा' दिवाळी अंकासाठी मी 'गर्दीची नशा, हशा-टाळ्यांची झिंग!' नावाचा भला मोठा लेख दिला होता. जागेअभावी तो मागे पडला. मग या अंकात तो कमी करून का होईना, छापला गेला...
‘‘त्यांचे व्याख्यान जाहीर झाले म्हणजे, लक्षावधी श्रोतृवृंद तासन् तास मार्गप्रतीक्षा करीत बसतो. चंद्रोदय होण्याआधीच जनसागराला भरती आलेली असते. आणि प्रत्यक्ष व्याख्यानाला सुरुवात झाली म्हणजे हास्यरसांच्या लाटांवर लाटा उसळू लागतात. हशा आणि टाळ्यांच्या गर्जनांनी आसमंत निनादून जातो...’’
‘‘त्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक कोटी, प्रत्येक इशारा नि प्रत्येक धमकी श्रोत्यांच्या कानात सारखी घुमत, गुणगुणत जाते. आणि प्रत्येकाच्या जीभेवर त्यांचे साद पडसाद घरीदारी उमटत राहतात. शिवाय त्यांचा विनोद! नवनव्या कोट्या करून श्रोत्यांना रंजविण्याचे त्यांचे हजरजबाबी कौशल्य, म-हाठदेशीयांच्या हमखास कौतुकाचे श्रद्धास्थान बनले आहे म्हणा ना... ’’
‘‘अस्सल मराठी पिंडाची काळीसावळी आबालवृद्ध मंडळी त्यांच्या व्याख्यानातून उदंड तकवा घेऊन जातात. उघड्या मैदानात बसून त्यांचे व्याखान ऐकून ज्यांनी मोकळ्या हसण्याचा आनंद एकदाही घेतला नाही आणि बेहोष होऊन टाळ्या वाजवल्या नाहीत, असा सुशिक्षित मराठी माणूस एक तर बहिरा असावा किंवा सुशिक्षित नसावा. असल्यास मराठी नसावा. आणि सुशिक्षित व मराठी असूनही मोकळेपणाने हसला नसल्यास माणूस तरी नसावा... ’’
‘‘अखंड जनता संपर्कामुळे त्यांची जनतेशी विलक्षण दिलजमाई झालेली आहे. त्यांची जनतेवर अमर्याद भक्ती. भक्तीचे सामर्थ्य मोठे दांडगे आहे. नामदेव कीर्तन करीत असताना, समोर पांडुरंग नाचत असे. साहेब भाषण करीत असताना जनताजनार्दन डोलतो आणि सहस्त्र हातांनी टाळ्या वाजवतो... ’’
‘‘दोन तास मी एकसारखा बोलत होतो. हास्यांच्या आणि टाळ्यांच्या पर्वतप्राय लाटा माझ्याभोवती उसळत होत्या. वक्तृत्वाचे सारे चमत्कार त्या व्याख्यानात मी करून दाखवले. माझ्या म्हणण्यातला शब्द न् शब्द, अक्षर न् अक्षर मी श्रोत्यांच्या गळी उतरवले. प्रतिपक्षाने घेतलेल्या आक्षेपांच्या आणि टीकेच्या मी अगदी चिंधड्या न् चिंधड्या उडवून टाकल्या. व्याख्यानाच्या अखेरीस मी माझ्या वक्तृत्वाचा पारा असा काही चढवीत नेला की, शेवटचे वाक्य संपवून खाली बसताच सा-या वातावरणामधून टाळ्यांचा आणि जयघोषांचा प्रचंड ध्वनी उमटला. शेकडो लोक व्यासपीठावर धावत आले. आणि एखाद्या पैलवानाने कुस्ती जिंकली म्हणजे लोक त्याचा गौरव करतात, त्याप्रमाणे अनेकांनी मला कडकडून मिठ्या मारून अभिनंदन केले. आखाड्यातल्या गर्दीतून बाहेर पडायला मला पाऊण तास लागला. त्यादिवशी पुणेकरांना बोलायला दुसरा विषय नव्हता. दुस-या दिवशी पुण्यातली वृत्तपत्रे माझ्या व्याख्यानाच्या वर्णनाने आणि वृत्तांताने शिगोशिग भरून वाहत होती... ’’
वरच्या चार परिच्छेदांमधला हा वक्ता-श्रोत्यांचा आनंद सोहळा वर्णनं केलाय, महाराष्ट्रातल्या थोर माणसांनी. एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, पु. ल. देशपांडे, दत्तू बांदेकर यांनी. आणि शेवटच्या परिच्छेदात आत्मविश्वास आणि तुडुंब समाधान व्यक्त केलंय, त्या वक्त्यानं. ज्याच्या भाषणांनं जनसागराला उधाण येत असे.
उसळणा-या या जनसागराचं नाव महाराष्ट्र. आणि त्यांना भरती आणणा-या वक्त्याचं नाव, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे! गर्दीचं व्यसन लागलेला वक्ता. आणि त्याच्या भाषणाचा चटक लागलेली, हशाटाळ्यांचा गजर करणारी मराठमोळी गर्दी.
महाराष्ट्रातल्या प्रमुख मैदानांवर ५० वर्षांपूर्वी हे अभूतपूर्व दृश्य सर्रास दिसे. आपली पन्नाशी अर्थात सुवर्णमहोत्सव साजरा करताना महाराष्ट्र राज्याच्या डोळ्यासमोर हे दृश्य पुन्हा तरळलं असणार.
महाराष्ट्रातल्या प्रमुख मैदानांवर ५० वर्षांपूर्वी हे अभूतपूर्व दृश्य सर्रास दिसे. आपली पन्नाशी अर्थात सुवर्णमहोत्सव साजरा करताना महाराष्ट्र राज्याच्या डोळ्यासमोर हे दृश्य पुन्हा तरळलं असणार.
गर्दी अत्र्यांच्या अन् अत्रे गर्दीच्या नसा नसांत भिनले होते. अत्र्यांनी गर्दीला झुलवलं, भुलवलं. गर्दीनंही अत्र्यांना वेड लावलं. या गर्दीच्या हशा टाळ्यांच्या बेहोश करणा-या नशेतच ते जगले.
अत्र्यांच्या मुलुखमैदानी तोफेनं म-हाठी मुलुखाला गदागदा हलवून जागं केलं. भानावर आणलं. अत्र्यांनी लेखणी, वाणीची बत्ती दिली न् जनक्षोभाचा वणवा धडाडून पेटला. इतिहास घडला. मुंबईवर मराठीचा झेंडा फडकला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला.
एखाद्या माणसाच्या हाकेसारखी इतकी मुंग्यांएवढी माणसं कशी जमत असतील? उधाणलेल्या जनसागरावर हा माणूस कोणती मोहिनी टाकत असेल? त्याचा शब्दा शब्दाला हशा टाळ्यांचा पाऊस का पडत असेल? असे प्रश्न हल्लीच्या सोशल नेटवर्कींगच्या जगात वावरणा-यांना, सर्व्हे करणा-यांना आणि टीआरपी मोजणा-यांना नक्कीच पडत असेल.
पुण्याजवळच्या सासवडसारख्या खेड्यातून एका छकड्यात बसून शहरात आलेला प्रल्हाद केशव अत्रे नावाचा दहा वर्षांचा मुलगा. पुढची साठ वर्षे महाराष्ट्राचं समाजजीवन व्यापून राहिला. मराठी मनांवर त्यानं अधिराज्य गाजवलं. कविता, कथा, विडंबन, विनोदी लेखन, नाटक, सिनेमा, पत्रकारिता, शिक्षण, व्याख्यान, राजकारण, अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यानं उत्तुंग शिखरं गाठली. सहसा कोणाच्याही आहारी न जाणारी, इथल्या राकट, कणखर देशातली माणसं त्याच्यावर भाळली. बाजरीची खरपूस भाकरी आणि ठेचा खाऊन ‘दोन घेणारी आणि दोन देणारी’, ही रांगडी माणसं त्याचं मन लावून ऐकू लागली. याचं कारण अत्रे त्यांच्या मनातलं बोलत होते.
निरूकाकीचा नातू
समाजाशी एकरुप होण्याचं हे बाळकडू अत्र्यांना घरातून मिळालं होतं.
आचार्य अत्रे जन्मले, सासवडमधल्या कोढीत गावचं कुळकर्णीपद सांभाळणा-या अत्रे कुटुंबात. हे कुटुंब होतं, गावकीचं कारभारपण करणारं. आणि त्याचं चालकत्व होतं, निरूकाकी या अत्र्यांच्या धिप्पाड कर्तबगार आजीकडं.
गावाच्या अडीनडीला धावणारी ही निरूकाकी जात-पात न पाहता पंचक्रोशीतल्या अडलेल्या बायकांना सोडवी. वाकडं पाऊल पडलेल्या विधवेच्या पाठी भक्कमपणे उभी राही. प्लेगच्या रोग्याचीही बेधडक सेवा करे. गावाचा प्रत्येक कार्यक्रम तिच्या कारभाराखाली पार पडे. तिचाच वारसा अत्र्यांच्या वडिलांकडं आला. कोढीत गावापासून ते सासवडच्या नगरपालिकेपर्यंत त्यांनी सासवडकरांचं पुढारपण केलं. त्यांचे गुण अत्र्यांमध्ये पुरेपूर उतरले. आणि स्वकर्तृत्वाने अत्रे पुढे महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले.
सासवड परिसरानं केलेल्या संस्काराचं फार सुंदर वर्णन अत्रे आपल्या आत्मचरित्रात करतात. एखादा परिसर एखाद्या माणसाची जडणघडण कशी करतो, याचं ते उत्तम उदाहरण आहे. ‘‘लहानपणापासून निसर्गाची अन् इतिहासाची मला सोबत मिळाली. ब्रम्हदेवाच्या कमंडलूतून उगम पावलेल्या क-हेच्या काठी मी जन्माला आलो आणि तिच्याच अंगाखांद्यावर जेजुरीच्या खंडोबाच्या भंडा-याने वाढलो. मोठा झालो. उशाला शिवाजी महाराजांचा पुरंदर किल्ला अष्टौप्रहर पहारा करी. तर सोपानदेवांची भक्तिवीणा शेजारी सदैव वाजे. शक्ती आणि भक्तीचे पावनतीर्थ होते माझे गाव. उदात्त आणि ओजस्वी जीवनाचा रोज तिथे साक्षात्कार घडे. हृदयात आणि मस्तकात नाना त-हेचे संचार होत. रस्त्यांतून जाऊ लागले की उंच उंच वाड्यांच्या पडक्या भिंतींवरून दोनतीनशे वर्षांचा इतिहास कानात कुजबुजू लागे.
ज्ञानोबांची पालखी दरवर्षी गावातूनच पंढरपूरला जाई. त्यावेळी दिंड्यापताकांची अशी गर्दी उडे की, टाळमृदुंगाच्या नि ग्यानबा-तुकारामाच्या गजराने गाव दुमदुमून जाई अन् चंद्रभागेचे स्नान अंगणातच घडल्यासारखे वाटे. बालपणात झालेल्या या सर्व संस्कारांनी माझा पिंड घडविलेला आहे.’’ हा क-हेच्या पाण्याचा निर्मळपणा, पुरंदरचा उत्तुंगपणा, सोपानदेवांची भक्तिवीणा, खंडोबाचा भंडारा आणि ज्ञानोबा-तुकोबाचा गजर अत्र्यांनी आयुष्यभर उरात जागवला. माणसं जोडणारा हा ठेवा जीवापलिकडं जपून ठेवला.
स्फूर्तीचे उच्छवास
शाळकरी वयातच अत्रे पुण्यात राहायला आले ते तांबटाची ठकठक ऐकू येणा-या पुण्याच्या कसबा पेठेत. त्यावेळच्या पुण्याच्या जनजीवनाचे खास अत्रेय वर्णन त्यांच्या मी कसा झालो? या पुस्तकात वाचायला मिळते. ते म्हणतात, ‘‘पस्तीस वर्षापूर्वीचे पुणे उदासवाणे होते. कंटाळवाणे होते. ठरावीक चाकोरीने जाण्याची त्याची प्रवृत्ती होती. परंपरेची धूळ सर्वत्र साचून राहिलेली होती. एखाद्या जुनाट वृद्धाप्रमाणे ते डोक्याला गतवैभवाची विटकी कानटोपी घालून आणि अंगावर उदासवाण्या स्मृतीची फाटकी धाबळी पांघरून मुळामुळेच्या काठी अर्धवट पेंगत बसलेले होते.’’ पण तत्कालीन पुण्याचं असं उदासवाणं वर्णन करणा-या अत्र्यांना पुण्याच्या जागृत हृदयाचा मात्र साक्षात्कार झाला होता. ते म्हणतात, ‘‘कात्रजच्या पाण्याप्रमाणे पुण्यात त्यावेळी स्फूर्तीचे अनेक लहानमोठे उच्छवास होते. काही गुप्त होते. काही प्रगट होते. हे उच्छवास नुसते डोळ्यांनी बघणे आणि त्यांच्या अंत:करणातल्या खळखळाटाचा कानोसा घेणे हेच पुणे शहरातल्या त्यावेळच्या लोकांचे भाग्य होते.
लोकमान्य टिळकांच्या गायकवाडवाड्यावरून नुसती चक्कर मारणे हे केवढे तरी मोठे शिक्षण होते. त्यांनी स्थापन केलेल्या फर्ग्युसन कॉलेजात शिकण्यापेक्षाही ते जास्त महत्त्वाचे शिक्षण होते. कसबा पेठेत कोनकरांच्या वाड्यासमोर येरझारा मारल्या की, थोड्या वेळाच्या आत शिवराम महादेव परांजप्यांचे दर्शन होई. फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावर उभे राहिले की, घोड्यांच्या बग्गीत बसून फिरायला निघालेल्या गोपाळकृष्ण गोखल्यांचे ओझरते तरी दर्शन होण्याचा संबव असे. शनिवार पेठेत नाना वाड्याच्या मागच्या बाजूला जिथे एका घरात लोकांची गर्दी असे. तेथे गेले की, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांचे हमखास दर्शन होई. त्यांना नुसते पाहिले की रोग्यांच्या सा-या व्यथा आणि व्याधी दूर कुठच्या कुठं पळून जात. पुण्यातल्या शाळा आणि कॉलेजांतल्या तरुण पिढीला शिक्षण आणि स्फूर्ती मिळण्याची ही खरी त्यावेळची जागृत ठिकाणे होती. ज्ञान मिळवण्यासाठी पुणेकरांना त्यावेळी कुठे बाहेर जाण्याची गरज पडत नव्हती. दरवर्षी गणपतीच्या उत्सवात आणि वसंत ऋतूत भारत वर्षातले आणि महाराष्ट्रातले सारे ज्ञान आणि विद्वत्ता आपल्या पायांनी चालत पुण्याला येई.
कोणत्याही शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये कधीही न मिळणारे बहुमोल असे ज्ञान आणि शिक्षण पुण्यात नुसते राहिल्याने माणसाला मिळत असे. आणि तेच खरे पुण्याचे महात्म्य, पुण्याचे सामर्थ्य आणि पुण्याचे वैशिष्ट्य.’’ अत्रे जिथं आणि ज्या काळात लहानाचे मोठे झाले, त्या पुण्याचं हे वर्णन. देशाला आणि समाजाला दिशा देणारे पुण्यात्मे त्यावेळी पुण्यात होते.
कोणत्याही शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये कधीही न मिळणारे बहुमोल असे ज्ञान आणि शिक्षण पुण्यात नुसते राहिल्याने माणसाला मिळत असे. आणि तेच खरे पुण्याचे महात्म्य, पुण्याचे सामर्थ्य आणि पुण्याचे वैशिष्ट्य.’’ अत्रे जिथं आणि ज्या काळात लहानाचे मोठे झाले, त्या पुण्याचं हे वर्णन. देशाला आणि समाजाला दिशा देणारे पुण्यात्मे त्यावेळी पुण्यात होते.
आपल्या जहाल विचारांनी राष्ट्रीय चळवळ उभारणारे लोकमान्य टिळक असोत, मवाळांचं नेतृत्व करणारे महात्मा गांधीजींचे गुरू गोपाळकृष्ण गोखले असोत, सशस्त्र उठाव करणारे क्रांतीकारक असोत, आपल्या तेजस्वी लेखणीने आणि धार धार शब्दांनी लोकमत घडवणारे खाडीलकर, शिवराम महादेव परांजपे, अच्युत बळवंत कोल्हटकर इत्यादी मंडळी असोत, विविध क्षेत्रांत मौलिक संशोधन करणारे भांडारकर, वासुदेवशास्त्री खरे, राजवाडे, केतकर असोत, फुले, आगरकरांचे विचार असोत, बालगंधर्व, दीनानाथ, केशवराव भोसले, गणपतराव बोडस इत्यादी रंगभूमी गाजवणा-या नटांचा अभिनय असो, सुंदर आणि ओजस्वी साहित्य निर्माण करणारे बालकवी, गडकरी किंवा हरिभाऊ आपटे असोत, तेल्यातांबोळ्यांर्यंत पोहोचलेली स्वातंत्र्याची चळवळ असो, पुण्यातलं हे सारं संचित अत्रे टिपकागदाप्रमाणं शोषून घेत होते.
अंगात मुरवून घेत होते. या मुरवून घेण्यातूनच भविष्यात अत्र्यांच्या लेखणी, वाणीतून निव्वळशंख विचारांचे उचंबळते झरे उसळी मारून वर आले. माणुसकीच्या या देवझ-याभोवती सतत गर्दी, वर्दळ होत राहिली.
अंगात मुरवून घेत होते. या मुरवून घेण्यातूनच भविष्यात अत्र्यांच्या लेखणी, वाणीतून निव्वळशंख विचारांचे उचंबळते झरे उसळी मारून वर आले. माणुसकीच्या या देवझ-याभोवती सतत गर्दी, वर्दळ होत राहिली.
किंबहुना त्या काळाचा अत्रे आवाज बनले. त्याच काळात जग बदलवून टाकणारं पहिलं महायुद्ध झालं. या युद्धानंतर स्वातंत्र्य आणि समतेच्या मंत्र जगभर पसरला. समाजजीवन मोकळेपणासाठी धडपडू लागलं. रुढींच्या जाचातून सुटका करून स्त्रिया झगडू लागल्या. कामगारांचा आर्थिक समतेचा लढा अधिक आक्रमक झाला. रशियातल्या कम्युनिस्ट क्रांतीनं आणि समाजवादी विचारांनी जगावर प्रभाव टाकला. साहजिकच भारतात आणि महाराष्ट्रातही हे सुधारणेचं वारं आलं.
स्त्री पुरुष पाश्चात्य पेहराव वापरू लागले. खाण्यापिण्यात मोकळेपणा आला. चैनीच्या वस्तूंचा वापर वाढला. मुली शिकून नोकरी करू लागल्या. सोवळ्या-ओवळ्याच्या कल्पना कमी होऊ लागला. धार्मिक अवडंबरही ओसरू लागलं.
रस्त्यांवर कॉलेजात जाणारे अवखळ तरुण तरुणी दिसू लागल्या. गांधीजींना फॉलो करणारा वर्ग तयार होऊ लागला. पांढरपेक्षा, समाजात या घडामोडी सुरू असताना समाजाचे इतर घटकही जागे होऊ लागले होते. डॉ. आंबेडकर मागास जनतेत हक्कांबाबत जागृती निर्माण करत होते. मंदिरप्रवेश, झुणकाभाकर, सहभोजनं वगैरे चळवळी सुरू झाल्या होत्या. त्याचवेळी हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रसार होत होता. शिक्षणाचा प्रसार होत होता. अत्रे या काळात या वाढत होते. भोवताल समजावून घेत घडत होते. अशा काळात समाजाच्या भावनांना उदगार देणारा एका अवलियाची गरज होती. अत्र्यांच्या रुपानं त्यांना तो मिळाला.
शिक्षण हाच पाया
शिक्षक अत्रे नीट समजून घेतलं तर महाराष्ट्राच्या शिक्षणाचं अजूनही भलं होईल, इतकं काम अत्र्यांनी या क्षेत्रात करून ठेवलंय. प्राथमिक शिक्षणासाठी कोणतं बोर्ड असावं, कसा अभ्यासक्रम असावा, कसं शिकवावं याबाबत आपल्याकडं अजूनही घोळ सुरू आहे. अत्र्यांनी ते कधीच जाणलं होतं. त्यांचं खरं जीवनशिक्षण त्यांना पुण्यातल्या भावे स्कूलमध्येच मिळालं होतं. त्याविषयीची मौज सांगताना अत्रे म्हणतात, ‘‘विद्यार्थ्यांना ‘स्वातंत्र्य’ देण्याची चळवळ पाश्चात्य देशांत अलिकडे निघाली. पण भावे स्कूलने या चळवळीचा शोध कित्येक वर्षांपूर्वी पुण्यात लावून ठेवला होता. एक अभ्यास वजा केला तर शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाटेल ते करण्यास परवानगी होती. त्यामुळे टग ऑफ वॉर, नाटक आणि उडाणटप्पूपणा या चार क्षेत्रांत भावे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आणि पुण्याबाहेर किर्ती संपादून ठेवली होती.
निरनिराळ्या योग्यतेच्या आणि गुणांच्या इरसाल शिक्षकांची भावे स्कूलमध्ये त्यावेळी एगदी गर्दी उडून गेली होती. त्यामध्ये विद्वान होते, शास्त्री होते, लेखक होते, कवी होते, नाटककार होते. नाटकमंडळींचे चालक होते, दूधवाले गवळी आणि भाजीमास्तरदेखील होते. विद्यार्थ्यांना इराण्याच्या हॉटेलात चहा प्याला नेऊन सिगारेट ओढायला देणारे समतावादी शिक्षक तेथे होते. तसेच शनिवारी घोड्यांच्या शर्यतीचा जुगार खेळायला विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे दूतकार शिक्षकही तिथे होते. आणि त्या त्या दिवशी गावातल्या नाटकाचे पास वर्गात आपण होऊन वाटणारे नाट्यप्रेमी शिक्षकही होते.
पार्शी, ख्रिस्ती आणि ज्यू विद्यार्थ्यांचा शाळेत विशेष भरणा असल्याने निर्भेळ ब्राम्हणी शाळेत जो शिक्षक व्यसनी आणि चंगी भंगी वाटला असता, तो या बकाली शाळेत अतिशय पुरोगामी वाटत असे. किंबहुना पार्शी आणि ख्रिस्ती विद्यार्थ्यांत तर असा शिक्षक विशेष लोकप्रिय असे. विद्यार्थ्यांचे कुठले डोहाळे कुठपर्यंत पुरवायचे, याला या शाळेमध्ये काही सीमा नव्हती. वार्षिक संमेलनात पारशी विद्यार्थी ब्राम्हण मुलांप्रमाणे जिलबी किंवा बटाटेभात खाणार नाहीत म्हणून त्यांच्यासाठी खास कोंबडीची बिर्याणी आणि बिअरच्या बाटल्या आणून निराळी व्यवस्था करणारा हौशी शिक्षक हिंदुस्थानात अद्याप कुठे पाहायला मिळेल का? मग असा शिक्षक पस्तीत वर्षांपूर्वी या भावे स्कूलमध्ये होऊन गेला. शिक्षक विद्यार्थ्यांशी जसे बरोबरीने वागत तसे विद्यार्थीही शिक्षकांशी बरोबरीने वागण्यास कमी करत नसत.
अशा विनोदी शाळेत माझ्या आयुष्याची चार वर्षे गेली. या चार वर्षांचे स्मरण झाले की नाटकांच्या, क्रिकेटच्या, खेळांच्या, मारामारीच्या, थट्टामस्क-यांच्या आणि वात्रट खोड्यांच्या शेकडो आठवणी मोटारीच्या चाकाप्रमाणे माझ्या डोळ्यांसमोरून फिरू लागतात.
भावे स्कूलने परीक्षेच्या अभ्यासाची विद्या मला फारशी शिकवली नाही किंवा ज्ञानाचेही फारसे संस्कार माझ्या मनावर केले नाहीत. पण माझ्या जीवनात खेळकरपणाचा मात्र पाया मजबूतपणे घालून ठेवला. मी न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी असतो तर आयुष्यात रुमाल आणि उपरणे गळ्याभोवती गुंडाळून कुठे तरी प्रोफेसर होऊन बसलो असतो. नूतन मराटीचा विद्यार्थी असतो तर कुठे तरी कलेक्टरचा चिटणीस किंवा प्रांत झालो असतो. पण भावे स्कूलचा विद्यार्थी नसतो तर आयुष्यात विनोदी लेखक मात्र मी कधीच होऊ शकलो नसतो, हे अगदी नक्की. या शाळेने माझ्या खेळाच्या वृत्तीचा विकास केला आणि आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टीकडे खेळकर आणि खोडकर वृत्तीने पाहायला शिकवले. ’’
भावे स्कूलमध्ये शिकलेले हे अत्रे पुढे कॅम्पातल्या शाळेत मास्तर होतात, हा योगायोग नक्कीच नव्हता. पूर्व पुण्यातल्या कँप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत ३५ रुपये पगारावर अत्रे हेडमास्तर झाले. या शाळेत त्यांनी क्रांती घडवून आणली. सुमारे २० वर्षे अत्र्यांनी चालविलेली ही शाळा म्हणजे, शिक्षणक्षेत्रातले एक मॉडेल ठरावे. कशी होती ही शाळा, हे अत्र्यांच्याच शब्दात वाचायला हवे.
‘‘पुण्याच्या पश्चिम भागात राहणा-या पुढारलेल्या वर्गाच्या मुलांसाठी विष्णूशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक आणि वामन शिवराम आपटे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी उभारली. त्यानंतर पूर्व भागात राहणा-या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी अशाच त-हेची शिक्षणसंस्था काढण्याची आवश्यकता त्यांच्या काही पुढा-यांना वाटू लागली. महात्मा फुल्यांच्या प्रेरणेने ज्यांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते, असे राजान्ना लिंगू वकील आणि सायन्ना मोटाडू नावाचे तेलगू समाजाचे दोघे प्रतिष्टित गृहस्थ लष्करात राहत होते. त्यांनी पुढाकार घेऊन १८८९ साली कँप एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. संस्थेच्या गव्हर्निंग बॉडीवर लष्करातील निरनिराळ्या जातींची मोठमोठी मंडळी होती. शहर आणि लष्कराच्या सरहद्दीवर कँप एज्युकेशनची शाळा. दोन परस्पर विरोधी संस्कृतीचे बकाली दर्शन होते.
शहर आणि लष्कराचे परस्पराशी काहीही साम्य नाही.
एका देशातून दुस-या देशात असल्यासारखे वाटते. शहराची वाढ पेशवाईत झाल्यामुळे त्यावर ब्राम्हणी संसकृतीची गडद छाया आहे. तर लष्करची वस्ती ही गो-या सैनिकांच्या गरजेतून निर्माण झालेली. त्यावर साहेबी संस्कृतीचा ठळक छाप. शहरातील पेठांची रचना जातवार. तर साहेबाला जातिभेदाचा विधिनिषेध असल्याने लष्करात अठरापगड जाती एकत्र येऊन बसल्या आहेत.
एका देशातून दुस-या देशात असल्यासारखे वाटते. शहराची वाढ पेशवाईत झाल्यामुळे त्यावर ब्राम्हणी संसकृतीची गडद छाया आहे. तर लष्करची वस्ती ही गो-या सैनिकांच्या गरजेतून निर्माण झालेली. त्यावर साहेबी संस्कृतीचा ठळक छाप. शहरातील पेठांची रचना जातवार. तर साहेबाला जातिभेदाचा विधिनिषेध असल्याने लष्करात अठरापगड जाती एकत्र येऊन बसल्या आहेत.
शहरात गल्लोगल्ली मारुती, गणपती आणि विठोबाची मंदिरं आहेत. त्यात एखाद्या वाट चुकल्यासारखी तांबोळी मशीद. उलट कँपात ख्रिस्ती आणि ज्यू लोकांची उंच कळसाची देवळे, आणि त्यात मधे मधे विखुरलेले मुसलमानांचे पीर आणि मशिदी पाहिल्या म्हणजे आपल्याला जेरुसलेममध्ये असल्याचा भास होतो. साहेबी टोपीचा आणि बूटविजारीचा गावाला जेवढा कंटाळा तेवढा पुणेरी पगडीचा, धोतराचा आणि जोड्याचा साहेबाला तिटकारा.
त्या काळी हातात केसरी किंवा ज्ञानप्रकाश घेऊन देशातल्या राजकारणाची मोठमोठ्याने चर्चा करीत बसलेल्या लोकांची टोळकी गावात ठिकठिकाणी आढळत. तर लष्करात हातात लखपति किंवा ‘मोती वधारो’ घेऊन उद्या घोड्यांच्या शर्यतीत कोणता घोडा ‘विन’ येईल आणि कोणता ‘प्लेस’ येईल या अश्वकारणाची चर्चा लष्करात चव्हाट्या चव्हाट्यावर ऐकू येई. सभा संमेलने अन् व्याख्याने यांचा धुमाकूळ गावात बाराही महिने चालले असे. तर पावसाळ्यात घोड्याच्या शर्यतींचा सीझन सुरू झाला म्हणजे लष्करी जनतेच्या उत्साहाला अमर्याद भरती येई.
त्या काळी हातात केसरी किंवा ज्ञानप्रकाश घेऊन देशातल्या राजकारणाची मोठमोठ्याने चर्चा करीत बसलेल्या लोकांची टोळकी गावात ठिकठिकाणी आढळत. तर लष्करात हातात लखपति किंवा ‘मोती वधारो’ घेऊन उद्या घोड्यांच्या शर्यतीत कोणता घोडा ‘विन’ येईल आणि कोणता ‘प्लेस’ येईल या अश्वकारणाची चर्चा लष्करात चव्हाट्या चव्हाट्यावर ऐकू येई. सभा संमेलने अन् व्याख्याने यांचा धुमाकूळ गावात बाराही महिने चालले असे. तर पावसाळ्यात घोड्याच्या शर्यतींचा सीझन सुरू झाला म्हणजे लष्करी जनतेच्या उत्साहाला अमर्याद भरती येई.
गावात अष्टौप्रहर मराठी भाषेखेरीज दुसरा एक शब्द शहरात ऐकू येत नसे तर लष्करातल्या लोकांचा एकूण व्यवहार हमेशा इंग्रजी किंवा हिंदुस्थानी भाषेतून चाललेला असे. अशा रितीने शहर आणि लष्कर हे पुण्याचे दोन भाग म्हणजे स्वतंत्र राष्ट्रेच होती. दोघांचे आचार निराळे, विचार निराळे आणि संस्कृतीही निराळी. शहर म्हणजे सनातनी लोकांचा प्रचंड बालेकिल्ला, तर लष्कर म्हणजे धड ना विलायती ना हिंदुस्थानी अशा बकाली संस्कृतीची आघाडी! सोवळे ओवळे, शिवाशिव, जातीभेद या गोष्टी औषधालासुद्धा लष्करात आढळायच्या नाहीत. तर अभक्ष्यभक्षण, अपेयपान करण्याची त्या काळी शहरात सुतराम कोठे सोय नसे. सारांश सांस्कृतिक दृष्ट्या दोन्ही भागांचे एकमेकांशी मुळीच दळणवळण नव्हते असे म्हटले तरी चालेल. क्वचित शहरातला कोणी ब्राम्हण दोराबजी किंवा म्युरेटॉर हॉटेलात मद्यपान आणि मांसाहार करावयाला रात्रीचे लष्करात जात, तर पार्शी किंवा बोहरी मंडईतली भाजी खरेदी करण्यासाठी सकाळचे शहरात येत. इतकेच काय ते!
कँप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत सायकलवर फिरणारे, वाटेल तेव्हा वर्गाबाहेर जाणारे, विड्या ओढणारे, जुगार, रेस खेळणारे विद्यार्थी होते. त्यांना मी छडीने झोडपून काढण्याचे सत्र सुरू केले. सात दिवसांत शाळा सुतासारखी सरळ आली.
कँप एज्युकेशनची पाचवीपर्यंतच्या शाळेचे रुपांतर हायस्कूलमध्ये केले. सुसंस्कृत, संपन्न कुटुंबातील टापटीप विद्यार्थी शाळेत येऊ लागले. ख्रिश्चन, ज्यू आणि पारशी मुला मुलींनी शाळेत प्रवेश घेतला. एकूणच शाळेची सुधारणा झाली.
पण निधीची उणीव भासू लागली. आम्ही शाळेला देणगी गोळा करण्यासाठी, फिरायचे ठरवले. अस्पृश्य आणि मागासलेल्या वर्गाच्या मुलांना शिक्षण देणे, हे आमचे ध्येय असल्याने जेव्हा मदत मागण्यासाठी आम्ही धनिकांकडे जात असू तेव्हा हात हलवीत परत यावे लागे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रि. अप्पासाहेब परांजपे, शिक्षण प्रसारक मंडळींचे प्रि. विनायकराव आपटे, हिंगण्याच्या अनाथ बालिकाश्रमाचे अण्णासाहेब कर्वे अशी तोलामोलाची माणसे त्याकाळी आपापल्या संस्थांसाठी निधी गोळा करावयास महाराष्ट्रातून हिंडत असत. त्यांच्यापुढे आमच्यासारख्या बुद्रुकांचा काय पाड लागावयाचा? कित्येक ठिकाणी रखवालदाराकडून हकालपट्टी व्हावयाची. मानहानी प्रसंग तर पावलोपावली इतके येत की, डोळ्यातून पाण्याच्या धारा वहायच्या तेवढ्या बाकी राहत. त्याची आठवण आली तरी अजूनही अंगावर काटा उभा राहतो.
लोकांच्या दारी जाऊन ह्या ज्या दातांच्या कण्या करीत आहोत, त्या काही स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी नसून मागासलेल्या गरीब विद्यार्थ्यांसाठीच करीत आहोत, ही जाणीव आम्ही सतत मनात बाळगली म्हणून आमचा स्वाभीमान आम्ही शाबूत राखू शकलो.’’
या शाळेच्या माध्यमातून अत्र्यांनी समाजातले विविध घटक, स्तर अनुभवले. या शाळेच्या निमित्तानं जणू त्यांनी दोन समाजांचा समन्वयच घातला.
अत्रे कोणती शैक्षणिक मूल्ये जोपासत होते, याचं एक उदाहरणच द्यायचं झालं तर हेडमास्तर अत्र्यांचा आणि दुस-या एका नावाजलेल्या शाळेच्या हेडमास्तरांचा संवाद पाहणं मौजेचं ठरेल.
‘समजा तुमच्या एखाद्या विद्यार्थ्याने सलून उघडले आणि तुम्हाला उदघाटनाला बोलावले तर काय कराल तुम्ही?’ अत्र्यांनी विचारले. त्यावर ते मुख्याध्यापक म्हणाले, ‘अर्थात जाणार नाही. आम्ही शाळा चालवतो, ती मुलांनी हे धंदे करावेत म्हणून नव्हे’. त्यावर अत्रे म्हणाले, ‘तुम्ही, तुमचा तो पश्चिम भाग आणि तुमचे ते पिढीजात बुद्धिमान विद्यार्थी! तुमच्या हातून हिंदुस्थानच्या ख-या समाजाला कधीच शिक्षण मिळायचे नाही.’ अत्र्यांचे एक सहकारी शं. ल. ओगले यांनी १९३२ सालची ही घटना नमूद करून ठेवली आहे.
मॅट्रिकचा निकाल कसा लागेल यापेक्षा बहुजन समाजाच्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड कशी निर्माण होईल, याकडे अत्र्यांचे लक्ष असे. आपले विद्यार्थी मागासलेले, कमी बुद्धीचे, शिक्षणाची परंपरा नसलेले म्हणून त्यांनी कधी कुरकूर केली नाही. उलट समाजातल्या सर्व स्तरातील लोकांशी समरस होण्याची संधी या शाळेमुळे आपणास मिळाली म्हणून ते आनंदच मानीत.
‘‘पुण्यातल्या नावाजलेल्या सलूनचा मालक माझा विद्यार्थी आहे. लष्करातील सुप्रसिद्ध बेकरी माझाच विद्यार्थी चालवतो. फोटो झिंकोच्या क्रिकेट संघाचा कप्तान आमच्याच शाळेचा विद्यार्थी. पुण्यातील इंग्रजी बोलणारा टांगेवाला कँप एज्युकेशनमध्येच चौथी इयत्तेपर्यंत शिकला’’, हे सांगताना अत्र्यांना केवढा अभिमान वाटायचा.
प्रत्येक शिक्षकाने सुशिक्षितांच्या आणि सुसंस्कृतांच्या मुलांचेच मास्तर होण्याचा हट्ट धरला असता तर त्या काळात पुण्यातल्या बहुजन समाजाच्या शिक्षणाकडे कोणी पाहिले असते? पण अत्र्यांसारखे शिक्षक पुण्यात राहून लष्कराच्या भाकरी भाजीत होते म्हणूनच आम्हाला थोडेफार शिक्षण मिळाले आणि आमचा धंदा बरा चालला, असे कृज्ञतेचे उदगार कितीतरी लोकांच्या तोंडून तुम्हाला ऐकायला मिळतील. अत्र्यांचे हेच विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार, त्यांचा अठरापगड जातीचा समाज अत्र्यांचे वाचक बनले. त्यांच्या नाटक सिनेमाचे प्रेक्षक बनले. त्यांच्या सभांचे श्रोते बनले.
अत्रे मराठी माणसाने डोळे झाकून स्वीकारले, कारण अत्रे संतांचे विचार सांगत होते. हे विचार होते, भेदाभेद मिटवणारे. समतेचे. समन्वयाचे. लहानपणी अत्र्यांनी आजोबांच्या मांडीवर बसून संतांचे अभंग ऐकले आणि मुखोदगत केले. पुढे विविध विचारधारांचा अभ्यास केल्यावर त्यांना संतविचारांचा झराच खरा वाटला. संघर्षापेक्षा संतांनी पत्करलेला हृदयपरिवर्तनाचा मार्ग त्यांना पटला. त्यामुळं त्यांच्या लेखणीत, वाणीत आणि विचारांत संतविचार पाझरू लागले. संत तुकोबारायांच्या अभंगात तर अत्र्यांना जगण्याचा खजिनाच सापडला. तुकोबारायांची गाथाच अत्रे उशाला घेऊन झोपत. रात्री, पहाटे कधीही जागे होऊन एखादा अभंग शोधू लागत. ही गाथा ते परदेशातही सोबत घेऊन गेले होते. तुकाराम विद्यापीठाची कल्पनाही अत्र्यांनीच पहिल्यांदा मांडली. तुकोबांविषयी लिहिता, बोलताना त्यांची प्रतिभा बहरून येई.
‘‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा।।
जगातील सर्व गरीबांना आणि दलितांना नवनीतासारख्या कोमल अंत:करणाने आणि समबुद्धीने जो आपल्या हृदयाशी धरतो, तोच खरा ईश्वराचा अवतार. हे पृथ्वीमोलाचे महान सत्य संसार सागराच्या तळाशी बुडी मारून तुकारामाने बाहेर काढले.
जगामधल्या कोणत्या धर्मसंस्थापकाने, तत्वज्ञाने आणि पंडिताने याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचे तत्त्व आजपर्यंत सांगितले आहे? तुकारामाचे हजारो अभंग ही समाजातील हजारो रंजल्या गांजल्यांना हृदयाशी धरून दिलेली सहानुभूतीची आलिंगणे होत आणि त्यांच्या दु:खित अंत:करणावर घातलेल्या समाधानाच्या शीतळ फुंकरा होत. केवढे शहाणपण, केवढी शांती आणि केवढा संतोष तुकारामाच्या एकेका शब्दांत आणि ओळीत भरलेला आहे. म्हणूनच तुकारामाचा एखादा रसाळ अभंग एखाद्या वारक-याच्या, भाविकाच्या किंवा भिका-याच्या तोंडून गोड स्वरांत कानावर पडला म्हणजे प्रापंचिक माणूस आपले दु:ख क्षणभर विसरून आनंदाने डोलू लागतो.
अहो, आम्हा महाराष्ट्रातल्या माणसांचे केवढे हे भाग्य की, तीनशे वर्षांपूर्वी इंद्रायणीच्या काठी शूद्र कुळात जन्माला आलेला एक सत्पुरुष गेली तीनशे वर्षे सतत आपल्या हातांनी आमच्या डोळ्यांमधले अश्रू पुसत आहे आणि आपल्या अभंगवाणीने आम्हाला आशा देऊन, धीर देऊन, जागृती देऊन, आमचा उद्धार करीत आहे! या महाराष्ट्रातले लक्षावधी भोळेभाबडे, अडाणी आणि गरीब प्रापंचिक लोक गेली तीनशे वर्षे तुकारामाची भाषा बोलत आहेत आणि तुकारामाचे तत्त्वज्ञान सांगत आहेत. एवढ्या साध्या, सुबोध आणि रसाळ भाषेत संसाराचे सार इतके सोपे करून या जगात कुठे कोणी तरी सांगितले असेल काय हो? ’’
‘‘तुकोबाचा निदान एक अभंग ज्याला पाठ येतो, तो मराठी माणूस. ज्याच्या घरी नाही तुकोबाची गाथा, त्याच्या शिरी लाथा हाणा चार.’’ अशी मराठी माणसाची व्याख्याच त्यांनी करून टाकली होती.
गाडगेबाबांच्या प्रेमात तर आकंठ बुडून गेले होते.
‘‘या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातल्या सुशिक्षित पुढा-यांनी किंवा सार्वजनिक संस्थांनी समाजसेवेचे जेवढे कार्य केले नसेल, त्याच्या अनेक पटींनी अधिक प्रभावी कार्य ह्या एका माणसाने हातात झाडू घेऊन आणि अंगावर चिंध्या घालून केले आहे. महाराष्ट्र हा संतांचा देश आहे. संतांची परंपरा गेली सात शतके महाराष्ट्रात अखंडित चालू आहे. त्याचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. त्याच्या भिंती नामदेवांनी बांधल्या. एकनाथांनी त्यावर घुमट चढवला. तुकोबा त्याचे कळस झाले आणि गाडगेबाबांनी त्यावर लोकजागृतीची पतका फडकवली.
म्हणूनच गाडगेबाबा हे तुकोबांचे अवतार होते, असे आम्ही मानतो.’’
संतविचारांतच समाजातील भेदभावाचा विखार शांत करण्याची ताकद आहे, अशी त्यांची भूमिका होती. म्हणूनच हे संतविचार सांगण्यासाठी त्यांनी ‘तुकाराम साप्ताहिक’ सुरू केले. यात तुकोबांसोबतच संत कबीर, गाडगेबाबा, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांचे ईश्वरविषयक विचार अत्र्यांनी सांगितले. ज्ञानदेव आणि चांगदेव असो की गांधीजी आणि रामनाम किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांचे विचार अत्र्यांनी आपल्या लेखणीतून समाजापर्यंत पोहचविले.
‘‘तुळाधाराची जात वैश्य होती. गोरा कुंभार होता. रोहिदास हा चांभार. कबीर मोमीन. लतिफ मुसलमान. सेना न्हावी. कान्होपात्रा वेश्या. दादु हा पिंजारी. चोखामेळा महार. पण यापैकी कोणाचीही जात ईश्वरप्राप्तीच्या आड येत नाही. जनी नामयाची बोलूनचालून दासी. पण देवाच्या दरबारात तिचा केवढा भाव? म्हणून सांगतो, ‘यातायाती धर्म नाही विष्णुदासा। निर्णय हा ऐसा वेदशास्त्री।।‘ हरिचे दास जातीचा धर्म मानीत नाहीत. केवळ वर्णभेदाच्याच नव्हे तर वर्ग नि अर्थभेदाच्या मर्यादाही संतांनी झुगारून दिल्या होत्या’’ हे, अत्र्यांनी वारंवार सांगितले. अत्र्यांची वाणीही जणू संतवाणीच बनली होती.
अत्र्यांच्या लोकप्रियतेचं वर्णन करताना पु. ल. देशपांडे म्हणतात, ‘‘देवाच्या आळंदीला निघालेला हा यात्रिक सा-या चोरापोरांसह साहित्य चंद्रभागेच्या तीरावर शेकडो वारकरी, टाळकरी घेऊन उभा आहे. त्यांनी चरण सांगावा आणि जोडीच्या लाखो वारक-यांनी तो बेभान होऊन उचलावा हे भाग्य त्यांना लाभले आहे.’’
ग्रामीण दलित साहित्य १९६० नंतर बहरलं. पण त्याहीपूर्वी आपल्या साहित्यात अशा प्रकारचं लिखाण होण्याची गरज आहे, असं अत्रे गर्जून सांगत होते. उदाहरणादाखल सांगायचं तर यासाठी १९३६मधील बडोद्याच्या वाड्.मय परिषदेतलं अत्र्यांचं भाषण.
त्यात ते म्हणतात, ‘‘बहुजन समाजाला नवयुगाच्या ज्ञानाचे व संस्कृतीचा सामर्थ्यवान संदेश पोहोचवून त्यांना हलवून जागे करणारे, समाजाच्या सुखासाठी अहोरात्र रक्ताचा घाम करून खपणा-या श्रमजीवी वर्गाच्या न्याय्य हक्कांसाठी झगडणारे लेखक हेच खरे महाराष्ट्रीय लेखक. या प्रगतीच्या प्रवाहाशी विसंगत असणारे लेखक, त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करणारे किंवा या प्रवाहाचे पाट भलत्याच मार्गाने फोडून त्याला दुर्बल करू पाहणारे लेखक हे महाराष्ट्रीय संस्कृतीचे, समाजाचे व वाड्मयाचे शत्रू म्हणून समजावयाला हरकत नाही. कुबट झालेल्या गाद्यागिरद्या, दुलया अंगणात आणून जशा झोडपून काढतात, त्याप्रमाणे कुबट विचारांच्या, प्रगती विरोधी व हटवादी सनातन्यांना झोडपून काढणारे, त्यांची कंबरडी मोडून त्यांची हाडे खिळखिळी करणारे वाड्.मयच आज निर्माण व्हावयास पाहिजे.
बहुजन समाजाच्या आयुष्याची खात्रीलायक व खरीखुरी चित्रे रंगविणारे त्यांच्यातीलच सुशिक्षित प्रतिभाशाली लेखक पुढे यावयास पाहिजेत. त्याशिवाय बहुजनांचे वाड्.मय निर्माण होणार नाही, ही गोष्ट निर्विवाद आहे.
प्रस्तुतच्या काळात मराठी वाड्.मयावर ब्राम्हणी सोवळेपणाची जी एक गडद छाया पडलेली आहे, त्यामुळे मात्र त्या वाड्.मयाबद्दल बहुजनांना आपुलकी व सहानुभूती वाटणे शक्य नाही, ही गोष्ट प्रामुख्याने दर्शविणे जरुर आहे.
सरकारी नोक-यांतून ब्राम्हणांचे किंवा इतर पांढरपेशांचे जे प्रमाण आहे, तेच प्रमाण गोष्टी, नाटके, कादंब-यांमधील जातवारी काढली, तर तीमध्येही असल्याचे आढळून येईल. अस्पृश्याला तर देवाच्या मंदिरात प्रवेश करायला जी बंदी, तीच वाड्.मयाच्या मंदिरात पाऊल टाकण्याच्या बाबतीतही लागू आहे.
या दृष्टीने पाहता शारदेच्या मंदिरातील ब्राम्हणांच्या सोवळेपणाची वतनदारी कमी होऊन इतर हिंदूंच्या अस्तित्वाची दखलगिरी बाळगणारे सर्वसंग्राहक व प्रातिनिधिक स्वरुपाचे वाड्.मय अधिक व्यापक प्रमाणावर निर्माण व्हावयास पाहिजे. शारदेच्या मंदिरात ब्राम्हण, अब्राम्हण, हरिजन, पुरुष. स्त्रिया, डॉक्टर, वकील, कारखानदार, पानवाले, सलूनवाले, या सर्वांच्या जीवनाचा नि:पक्षपातानं समावेश व्हावयाला पाहिजे.
बहुजन समाजाच्या आयुष्याची खात्रीलायक व खरीखुरी चित्रे रंगवणारे त्यांच्यातील सुशिक्षित प्रतिभाशाली लेखक पुढे यावयास पाहिजेत.
दलित समाजाचा उद्धार करणारे डॉ. आंबेडकर हेच खरे ‘आजचे शंकराचार्य’ असा त्यांचा गौरव अत्र्यांनी केला होता. आंबेडकरांवर त्यांनी ‘नवयुग’चा विशेषांकही प्रसिद्ध केला होता. डॉ. आंबेडकरांच्या महानिर्वाणानंतर जमलेल्या लाखोंच्या शोकाकूल समुहापुढे श्रद्धांजली वाहण्याचे काम एकट्या अत्र्यांकडे सोपवण्यात आले होते. अत्र्यांच्या वाक्या वाक्याला हजारो स्त्रीपुरुष धाय मोकलून रडत होते. त्यानंतर सलग बारा दिवस अत्र्यांनी ‘मराठा’तून अग्रलेख लिहिले.
डॉ. आंबेडकरांच्या महान कार्याचा परिचय आणि गौरव करून आंबेडकरांचे मोठेपण त्यांनी समग्रपणे लोकांसमोर ठेवले. आज काळाने आंबेडकरांचे युगप्रवर्तकत्व मान्य केले आहे. पण एक काळ असा होता की, आंबेडकरांच्या प्रगाढ बुद्धीमत्तेची, विद्वत्तेची, ज्ञानाची, देशभक्तीची सतत आणि सर्वत्र उपेक्षाच होत होती. पण अत्र्यांनी आंबेडकरांविषयी वेळोवेळी लिहून दलितांनाच नव्हे तर उच्चभ्रू समाजालाही त्यांचे मोठेपण विशद करून सांगितले. मतांच्या राजकारणासाठी सध्या प्रत्येक पक्षात, राज्यात आणि राज्याबाहेरही आंबेडकरांची गुण गाण्याची स्पर्धा लागली आहे. पण जेव्हा आंबेडकरांची उपेक्षा होत होत, तेव्हा अत्रे समाजाला गर्जून सांगत होते, ‘भारताच्या इतिहासातील एक युगप्रवर्तक पुरुष असाच आंबेडकरांचा गौरव उद्या जगाला करावा लागेल.’
अगदी तळागाळातला समाज अत्र्यांच्या भाषणाला गर्दी का करायचा, याचं उत्तर अत्र्यांचे हे विचार वाचले की मिळतं.
आयुष्यभर सद्गुणांच्या दारात माधुकरी मागणा-या अत्र्यांनी चांगले साहित्य, चांगले लेखक यांचे भरभरून कौतुक केले. ‘शेतात अचानकपणे सापडलेला मोहरांचा हंडा’, ‘बावनकशी सोने’ अशा मथळ्यांची प्रस्तावना लिहित अत्र्यांनी बहिणाबाईंच्या अवीट कविता महाराष्ट्रासमोर आणल्या.
लोकशाहीर अमरशेख यांच्या ‘कलश’ या काव्यसंग्रहाला ‘कलशपूजन’ असे भावभक्तीपूर्ण शीर्षक देत अत्र्यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिली. ‘‘अमर शेख म्हणजे रग. अमर शेख म्हणजे धग. अमर शेख म्हणजे आग, धुंदी आणि बेहोशी यांची जिवंत बेरीज. तळहाती शीर घेऊन रणांगणात एखादा वीर लढावा तसेच शाहीर अमर शेख संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लढले.’’ असं अमर शेखांचं यथोचित आणि जाहीर कौतुक अत्र्यांनी केलं.
‘सोपी भाषा लिहायची असेल तर, लावण्या, पोवाडे, अभंग वाचा’, असा आदेश त्यांचे साहित्यिक गुरू राम गणेश गडक-यांनी अत्र्यांना दिला होता. हा आदेश अत्र्यांनी शेवटपर्यंत कसोशीने पाळला.
अत्र्यांच्या भाषेबद्दल ना. सी. फडके म्हणतात, ‘‘सामान्य वाचकाला अतिरेकी भाषा आवडते. अमका मनुष्य वाईट आहे, अशा सभ्य भाषाप्रयोगापेक्षा तो नरपशू आहे, नराधम, हलकट, पाजी आहे, असे लिहिण्याने परिणाम वाढत असतो. त्याचप्रमाणे ‘अमूक मनुष्य चांगला आहे’, असे म्हणण्यापेक्षा ‘असा मनुष्य गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही’, असे म्हटल्याने वृत्तपत्राचा वाचक अधिक संतुष्ट होत असतो. अत्र्यांच्या भाषेत निवडणुकीतला उमेदवार केवळ ‘पडत’ नाही तर त्याचा ‘बो-या’ वाजतो. अत्र्यांची ही अतिरेकी भाषा अग्रलेखात किंवा व्याख्यानात शोभून जाते. गर्दीसाठी असंच बोलावं लागतं. असली भाषा अत्र्यांना यशस्वी संपादक आणि वक्ता करणारी प्रभावी हत्यारं आहेत.’’
अत्र्यांचा प्रचारकी तोफखाना सर्वांना हवा आहे. परंत युद्ध संपलं की, मानसन्मानापासून, जबाबदारीपासून त्यांना दूर ठेवलं गेलेलं आहे.’’
आपल्या कवितांमधूनही अत्रे सामाजिक भान जपत होते. सुमारे ४७ कवितांचा गीतगंगा हा काव्यसंग्रह लिहिणा-या अत्र्यांनी पस्तीशीत कविता करणं थांबवलं.
त्याविषयी ते लिहितात, ‘जे मनाला पटत नाही, ते आपल्याला काव्यात कित्येकदा लिहावे लागते, जाणीव कविता लिहिताना माझ्या मनाला सारखी टोचते. बाह्य जगात बैलगाडीपासून विमानापर्यंत व चकमकीपासून विजेच्या बत्तीपर्यंत प्रगती झाली आहे. तरी काव्याच्या सृष्टीत चंद्र, चांदण्या, चातक व चकोर ही सौंदर्याची मिरासदार मंडळी आपापली वतने अद्यापही सांभाळून आहेत. झाडावर ओरडणा-या कोकीळेपेक्षा पोटात कोकलणा-या कावळ्यावर आज काव्य लिहिण्याची पाळी आली आहे. रात्रीच्या अंधारात कुंपणावर चमकणा-या काजव्यावर कविता करण्यापेक्षा दिवसाढवळ्या डोळ्यापुढे चमकणा-या काजव्यांवर काव्य लिहिणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
आजच्या समाजाचे जीवन. त्याच्या धडपडी त्याचे दु:ख, त्याच्या आकांक्षा ज्यात जिवंतपणे व्यक्त करता येईल, ते खरे काव्य. व ते ज्या साधनांनी उत्कृष्ट त-हेने व्यक्त करता येईल ते खरे काव्याचे तंत्र. या माझ्या नवीन दृष्टीकोनाला पटणारे काव्य जोपर्यंत मला स्वत:ला निर्माण करता येणार नाही, तोपर्यंत मी कविता लिहिण्याच्या भानगडीत पडणार नाही.’
आजच्या समाजाचे जीवन. त्याच्या धडपडी त्याचे दु:ख, त्याच्या आकांक्षा ज्यात जिवंतपणे व्यक्त करता येईल, ते खरे काव्य. व ते ज्या साधनांनी उत्कृष्ट त-हेने व्यक्त करता येईल ते खरे काव्याचे तंत्र. या माझ्या नवीन दृष्टीकोनाला पटणारे काव्य जोपर्यंत मला स्वत:ला निर्माण करता येणार नाही, तोपर्यंत मी कविता लिहिण्याच्या भानगडीत पडणार नाही.’
यानंतर अत्रे नाटकांकडं वळले.
साहित्य किंवा कथा, कादंब-या, कविता म्हणजे सुशिक्षित, पांढरपेशा जनतेची मक्तेदारी. अडाणी बहुजनांना ते कसे आपले वाटणार? म्हणून मग अत्रे नाटक आणि सिनेमाकडं वळले.
अत्रे म्हणतात, ‘समाजातील विविध स्वभावाच्या चालत्या बोलत्या नमुन्यांवरून आपली पात्रे तयार करण्याची माझी पद्धत माझ्या पहिल्या नाटकापासून आढळून येईल. ज्याला प्रभावी नाटककार व्हायचे आहे, त्याला पुस्तकी जगात वावरून चालणार नाही. त्याला जीवनाच्या ज्वलंत ज्वालामुखीच्या मुखात उडी घालून रसरशीत अनुभवाचा ‘लाव्हा’ बाहेर घेऊन यावयाला पाहिजे.’
अत्र्यांनी ‘साष्टांग नमस्कार’, ‘कवडीचुंबक’, ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकांमध्ये सामाजिक विकृतीचे दर्शन घडविले. तर ‘डॉ. लागू’, ‘बुवा तेथे बाया’, ‘तो मी नव्हेच’मधून गुन्हेगारी प्रवृत्तींचे दर्शन घडवले. ‘वंदे भारतम्’, ‘मी उभा आहे’ या नाटकांमधून तत्कालीन राजकीय परिस्थिती चितारली. समाजजीवनातील विविध प्रवाह, बदल, दुस-या महायुद्धाचे परिणाम, दारू, रेस, अहंकारी मन इत्यादी मानवी आचारविचारांशी, नितिमत्तेशी निगडीत असलेल्या प्रश्नांचा विचार अत्रे नाटकांमध्ये करतात.
‘‘दुस-या महायुद्धानंतरच्या काळात रंगभूमीची हळूहळू पीछेहाट होत गेली. नाटक हा प्रकार केवळ सुसंस्कृत, बुद्धीमान आणि सुशिक्षित आजपर्यंत प्रचलित होता. त्यामुळे रंगभूमीची हाक अडाणी आणि असंस्कृत जनतेच्या हृदयापर्यंत कधी पोहोचू शकली नाही. बहुजन समाजात वावरणा-या निरनिराळ्या सामान्य व्यक्तींची चित्रे, त्यांच्या धडपडी आणि चळवळी, त्यांचे स्वभाव, त्यांच्या आकांक्षा यांची चित्रे नाटकामध्ये किंवा रंगभूमीवर रंगभूमीवर होणा-या नाट्यप्रयोगात कधीच उमटू शकली नाहीत. रंगभूमी म्हणजे सर्व गुणालंकारयुक्त, श्रीमंत आणि सुस्वरुप माणसांची मिरासदारी म्हणून मानण्यात येत होती. त्यामुळे सामान्य, गरीब, अनेक शारीरिक नि मानसिक दुर्गुण असलेल्या, पदोपदी चुकणा-या, सत्ताधा-यांकडून नाडल्या गेलेल्या अशा अडाणी बहुजन समाजाला नाटकाविषयी आणि रंगभूमीविषयी आपलेपणा वाटणे शक्य नव्हते.’’ असे विश्लेषण अत्र्यांनी तत्कालीन रंगभूमीचे केले.
‘केवळ पांढरपेशा समाजाच्याच आयुष्याची चित्रे आजपर्यंत मराठी रंगभूमीवर पाहायला मिळत असत. त्यामुळे बहुजन समाजाला रंगभूमीबद्दल कधीच आपुलकी वाटली नाही त्याला आपले समाधान लळिते आणि तमाशे यांवरच करून घ्यावे लागले. यापुढे मराठी रंगभूमीवर बहुजन समाजाचे विविध जीवन अधिक आपुलकीने आणि अगत्याने चित्रित व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करणा-या अत्र्यांनी अभिजनांची मक्तेदारी असलेली नाटके त्यांनी बहुजनांच्या ताब्यात दिली.
ज्यावेळी ‘स्त्रीमुक्ती’ हा शब्दही प्रचलित नव्हता त्यावेळी अत्र्यांनी आपल्या नाटकांमधून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडली. ‘घराबाहेर’, ‘उद्याचा संसार’ आणि ‘जग काय म्हणेल’ या नाटकांमधून अत्र्यांनी हेच साधले. सासुरवासाला कंटाळलेली त्यांच्या ‘घराबाहेर’ची नायिका निर्मला रंगमंचावर मंगळसूत्र तोडण्याचे धाडस करते. हा प्रसंग गाळून नाटक करण्याची इच्छा बालगंधर्वांनी व्यक्त केली होती. पण अत्र्यांनी ती धुडकावली. ‘उद्याचा संसार’मधून पुरुषी वृत्तीवर कोरडे ओढणारी नायिका करुणा, नवरेशाहीचा धिक्कार करत, बंड पुकारत घराबाहेर पडणारी ‘जग काय म्हणेल’ची नायिका उल्का, अत्र्यांच्या नाटकातल्या या सर्व नायिका स्त्रीमुक्तीचा उदघोष करताना दिसतात.
सिनेमा क्षेत्रातही अत्रे रमले. विनोदी बोलपटांच्या माध्यमातून अत्रे गावोगावच्या प्रेक्षकांच्य गळ्यातले ताईत बनले.
अत्र्यांनी केवळ दोनच सिनेमे काढले असते तरी ते यशस्वी सिनेमाकार म्हणून
प्रसिद्ध पावले असते. ते सिनेमे म्हणजे, ‘महात्मा फुले’ आणि ‘श्यामची आई’. ज्या काळात महात्मा फुलेंची महाराष्ट्राला आठवणही होत नव्हती, त्या काळात अत्र्यांनी त्यांच्या जीवनावर चित्रपट काढला. आणि आपल्या पुरोगामी व परिवर्तनवादी जीवनदृष्टीचा परिचय दिला.
या चित्रपटाचे मंगलाचरण संत गाडगेबाबांनी म्हटले. कथानिवेदन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. देशभक्त केशवराव जेधे, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर बाबूराव जगताप, डॉ. अण्णा नवले, अमर शेख, विठ्ठलराव घाटे आणि स्वत: अत्र्यांनी यांनी या चित्रपटात काम केले. प्रदर्शनासाठी डॉ. आंबेडकरही उपस्थित होते. या चित्रपटाने राष्ट्रपतींचे रौप्यपदकही पटकावले.
‘दुबळे आणि रडूबाई’ अशी सानेगुरुजींची संभावना करणा-यांना सानेगुरुजी आणि त्यांच्या साहित्याचा दर्जा अत्र्यांशिवाय कोण सांगणार होतं? सानेगुरुजींचं ‘श्यामची आई’ ही जागतिक दर्जाची साहित्यकृती आहे, हे त्यांनी उच्चरवात सांगितलं. सानेगुरुजींच्या अश्रूंचं वर्णन करताना अत्रे म्हणतात, ‘‘गुरुजींचे सर्व सामर्थ्य त्यांच्या अश्रूंत होते. त्यांच्या सहानुभूतीत होते. अश्रू हाच त्यांचा नारायण होता. माझ्या अश्रूंनी मी पर्वताला बुडवीन. वज्राचा चुरा करीन. पाषाणाचे नवनीत बनवीन. असा त्यांना विश्वास वाटत होता. आणि तसे त्यांनी करूनही दाखवले. शेकडो वर्षे अस्पृश्यांना बंद असलेली पंढरपूरच्या मंदिराची दारे गुरुजींच्या अश्रूंच्या पुरांत विरघळून गेली.
बडव्यांच्या काळजातल्या दगडाचे लोणी झाले. गांधीहत्येनंतर महाराष्ट्राच्या अंत:करणात निर्माण झालेली हिंस्त्र कलुषता गुरुजींनी आपल्या अश्रूंनी धुवून काढली.’’
गुरुजींच्या करुणेनं ओथंबलेल्या ‘श्यामची आई’ कादंबरीवर अत्र्यांनी सिनेमा काढला. या सिनेमाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले. मराठी सिनेमाक्षेत्रात ‘श्यामची आई’नं एक मानदंड उभा केला.
पत्रकार अत्रे
शिवाजी पार्कवर विराट सभा भरली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या बातम्या भांडवलदारांचे पेपर छापत नाहीत, म्हणून वक्ते निषेध नोंदवत आहेत. आणि अशा वेळी स्टेजवर बसलेल्या अत्र्यांकडं समोर बसलेले हजारो लोक मागणी करत आहेत. ‘अत्रे, तुम्ही पेपर काढा. तुम्ही पेपर काढा...’ अत्रेही लगेचच एका पायावर तयार होतात. पण त्यासाठी पैसा? लगेच स्वयंसेवक सभेत टोप्या फिरवतात. आणि अत्रे लोकांच्या इच्छेसाठी अत्रे ‘मराठा’ दैनिक सुरू करतात. आणि ‘मराठा’ची मुलुखमैदान तोफ घेऊन मैदान जिंकतात. हा इतिहास आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या आघाडीवर ‘मराठा’सह बेभान होऊन लढतानाही अत्र्यांनी सामाजिक भान जपलं होतं. या ‘मराठा’च्या शिरोभागी अत्र्यांनी श्री शिवछत्रपती, महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक या महाराष्ट्राच्या तीन दैवतांचे फोटो टाकले होते. शब्दांचे शस्त्र करून लढायचे, ही तुकारामांची शिकवण त्यांनी अंगी बाणवली होती. म्हणूनच तर ‘मराठा’च्या अग्रलेखाच्या डोक्यावर ‘‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा’’ ही ‘मराठा’ची भूमिका सांगणारी तुकोबांच्या अभंगाची ओळ झळकत असे. खरं तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापूर्वीही अत्रे पत्रकार म्हणून गाजत होते. त्यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकानं लोकप्रियतेचे उच्चांक गाठले होते. कर्तृत्ववान व्यक्तिंवरचे विशेषांक ही तर ‘नवयुग’ची खासीयत.
वृत्तपत्रीय लिखाणाचे अनेकानेक आदर्श अत्र्यांनी घालून दिले.
नवयुग हे तेल्यातांबोळ्याचे आणि न्हाव्यापरटांचे पत्र आहे, अशी टवाळी होऊ लागली. अत्रे सांगतात, ‘‘पुण्याच्या स्टेशनसमोर एक न्हाव्याचे दुकान आहे. त्या दुकानाचा मालक मला एकदा स्टेशनावर भेटला आणि म्हणाला, अत्रेसाहेब तुमच्या नवयुगचे तीन अंक मी माझ्या सलूनमध्ये घेतो. त्यामुळे माझ्या दुकानात गि-हाईकांची एवढी गर्दी होते की, काही विचारू नका. हजामत करीत असतानाही ते नवयुग वाचतात. म्हणून मला मग सांगावे लागते की नवयुग बाजूला ठेवा नाही तर कापून घ्याल.
त्या काळात कागद पुरेसा नव्हता. म्हणून मागणीएवढ्या प्रती काढणे मला शक्य नव्हते. त्यामुळे नवयुगच्या अंकांचा काळा बाजार होऊ लागला. तीन आण्यांचा अंक बारा आण्यांना विकला जाऊ लागला. खेडेगावांतून आणि गरीब वस्तींमधून नवयुग अधिक वाचला जाऊ लागला. मुंबईच्या गिरणीमजुरांच्या चाळीत दहा दहा पंधरा पंधरा माणसे एकत्र बसत आणि एक माणूस खड्या स्वराने नवयुग वाचून दाखवित असे. असे दृश्य मी डोळ्यांनी पाहिले आहे.’’
साधी सोपी भाषा
सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचणं, हे अत्र्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि म्हणूनच त्यांनी अत्यंत अत्यंत साध्या, सोप्या, सर्वसामान्यांना कळेल, अशा मराठीत लेखन केलं.
स्वयंपाकघरात, घरगुती बैठकीत, बाजारात आणि देवळात माणसं जे सहजपणं बोलत असत, त्या अस्सल मराठीत त्यांनी भाषणं केली, लेखन केलं. हे करताना त्यांनी कधी भाषाशुद्धीविषयी दुराग्रह धरला नाही. गावरान भाषेतही गोडवा असतो हे सांगताना ते तुकोबाराय, बहिणाबाई, नाना पाटील, गाडगेबाबा यांच्या भाषेची उदाहरणं देत.
जी भाषा बहुसंख्यांना कळते तीच शु्द्ध मराठी भाषा, असे ते म्हणत. ‘लई’ म्हणण्यात काही ‘वंगाळ’ नाही. उलट महाराष्ट्रात हीच बहुसंख्यांची लोकभाषा आहे, असं ते लक्षात आणून देत.
मराठी लिहिताना आणि बोलताना शब्दबंबाळ संस्कृत शब्द बोलणा-यांची ते टरच उडवित. इंग्रजी भाषेतील शब्दांचे बेंगरूळ भाषांतर करून ते वापरण्यापेक्षा रुढ झालेले हिंदी, इंग्रजी शब्द वापरावेत असे त्यांचे मत होते. उदा. स्टेशनला ‘अग्निरथविश्रामधाम’ असा हास्यास्पद पर्याय शोधण्यापेक्षा ‘स्टेशन’ हाच शब्द वापरणं योग्य, असं ते म्हणत.
मराठी भाषकांचे स्वतंत्र राज्य निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारचा कारभार इंग्रजीऐवजी मराठीतून करण्याचे धोरण संमत झाले. त्यासाठी इंग्रजीला मराठी प्रतिशब्द शोधण्यासाठी यशवंतरावांनी एक समिती नेमली. या समितीने निरनिराळ्या खाती, त्यांचे प्रमुख, अधिकारी, यांना जी इंग्रजी नावे रुढ झाली होती, त्याला पर्यायी शब्द सुचविणारा एक शब्दकोश प्रसिद्ध केला. त्याला ‘पदनामकोश’ असं नाव देण्यात आलं होतं. तथापी समितीने सुचवलेल्या पर्यायी शब्दांत मराठीपण कुठेच जाणवत नव्हते. संस्कृत शब्दांचा त्यात अतिरेकी वापर करण्यात आला होता. अप्रचलित हिंदू, उर्दू, फारशी, कानडी शब्द घुसडले होते. त्यामुळे अत्र्यांनी त्याला ‘बदनाम कोश’ असं संबोधलं.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मात्र अत्र्यांच्या लेखणीनं आणि भाषेनं रणचंडिकेचं रुप धारण केलं. प्रतापगड मोर्चाच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर झालेल्या भाषणात अत्रे म्हणाले,
‘अमानुष अत्याचाराने संतप्त झालेल्या तीन कोटी जनतेला वाघनखं फुटतील आणि द्विभाषिकाचा कोथळा बाहेर काढला जाईल.’ ते ऐकत असताना अंगावर रोमांच उभे राहिले, अशी आठवण एस. एम. जोशींनी सांगितली आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या मुंबईतल्या त्या अमानुष गोळीबाळानंतर अत्र्यांनी भयानक तळतळाट व्यक्त केला होता. ‘‘गोळ्या झाडणारांची बोटे झडोत, त्यांना महारोग होवो,..’’ ही भाषा फार कडक आहे. असं पु. ल. देशपांडे त्यांना म्हणाले त्यावर अत्रे गरजले, ‘‘ती माझी भाषा नाही पीएल. ज्या आयांनी आपल्या पोरांच्या मेंदूच्या चिंध्या पाहिल्या, त्यांच्या तोंडचे तळतळाट आहेत ते...’’
मैदानात गरजणारा सिंह
१९३१ पासून अत्र्यांची भाषणं पुण्यातल्या ज्ञानप्रकाश वृत्तपत्रात अगदी हशाटाळ्यांसह सविस्तरपणे छापून येऊ लागली. अच्युतराव कोल्हटकरांच्या भाषणाची विनोदी आणि शेवटी शिखर गाठणारी शैली अत्र्यांनी आत्मसात केली.
या प्रभावी वक्तृत्वानं अत्र्यांना लोकप्रिय केलं.
अत्यंत साधी सोपी भाषा, लोकांना कळेल, पटेल आणि रुचेल असा युक्तिवाद, त्यांची मनं भरून टाकणारं चैतन्य, त्यांना स्फुरण चढवणारी ओजस्विता आणि त्यांना सतत प्रसन्न, हसत-खेळत ठेवणारा विनोद यांनी त्यांचं वक्तृत्व नटलेलं असे. गर्दी खेचून घेण्याचं आणि तिला खिळवून ठेवण्याचं विलक्षण सामर्थ्य त्यात होतं.
सुरुवातीला साहित्यिक म्हणून व्याखाने देत तेव्हा ती शेकड्यांनी मोजता येई. पण राजकारणात उतरले तेव्हा मैदानातली गर्दी मोजता येईनाशी झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तर ही गर्दी मैदान ओसंडून वाहू लागली. कधी कधी अत्र्यांच्या सभा लाखा लाखाच्या होऊ लागल्या.
अत्र्यांच्या आक्रमक आणि प्रतिपक्षाचे वाभाडे काढणा-या वक्तृत्वाला अनुकूल परिस्थिती संयुक्त महाराष्ट्राच्या काळात निर्माण झाली. अत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी सुशिक्षित, अशिक्षित कामगार, शेतकरी, पांढरपेशे स्त्रिया आणि मुलं हजारोंच्या झुंडीनं मैदानात जमत.
बुलंद आवाजातल्या ते ठणाणारं मैदानी वक्तृत्व संतापलेल्या, ज्वालाग्रही मनांना क्षणार्धात चेतवून देई. योद्धयाला साजेल असा धिप्पाड देह, ठणठणीत आवाज, जळजळीत संताप, वाघाच्या नखांसारखी विनोदबुद्धी, नि:शंक आत्मविश्वास, आक्रमक आणि लढावू वृत्ती आणि वादांतून तावून सुलाखून निघालेलं हे वादपटुत्व संयुक्त महाराष्ट्राच्या सभांमध्ये गर्जू लागलं. या सभांमधून ते लोकांच्या हृदयाला हात घालत. त्यांना मंत्रमुग्ध करीत. त्यांच्या अंतरीच्या भावना व्यक्त आणि संताप व्यक्त करीत.
आपल्या वक्तृत्वाविषयी अत्रे म्हणतात, ‘‘आत्तापर्यंत शेकडो व्याख्याने देऊन महाराष्ट्राला मी हसविले आहे. नाचविले आहे. लेखणी श्रेष्ठ की वाणी, या नादात मी पडणार नाही. पण लिहिण्याच्या नादापेक्षा व्याख्यानाची नशा अधिक आहे, यात शंका नाही. यशस्वी वक्ता होण्यासारखा आनंद नाही या आयुष्यात. माझी कल्पना सारखी हेच चित्र रेखाटत असते की, माझ्या व्याख्यानाची आगाऊ जाहिरात झालेली आहे.
श्रोत्यांची गर्दी उसळलेली आहे. थोड्याशा उशिराने मी सभागृहात पाऊल टाकताच टाळ्यांचा प्रचंड गजर होतो आहे. मी एकसारखा बोलतो आहे. श्रोत्यांनी सभागृह डोक्यावर घेतले आहे. इतके की शेवटी अध्यक्षांचे भाषणदेखील कोणी ऐकून घेण्यास तयार नाही. आणि मग श्रोत्यांच्या प्रचंड गर्दीतून मुश्कीलीने वाट काढीत काढीत मी बाहेर पडतो आहे...
अत्र्यांमध्ये दोषही होते. ते त्यांनी जाहीरपणेही मान्य केले होते. पण लोकांनी ते स्वीकारले होते. अत्र्यांना सर्व गुन्हे माफ होते. त्यांच्या वागण्याबद्दलच्या हकिकती आणि आख्यायिका लोक चवीचवीनं एकमेकांना सांगत.
संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचारसबेत एका श्रोत्याला अत्र्यांनी त्यांना जाहीर प्रश्न विचारायची परवानगी दिली. त्याने स्टेजवर येऊन ध्वनीक्षेपकावरून अत्र्यांच्या पूर्वाश्रमीच्या काही प्रसिद्ध दुर्वर्तनांचा पाढा वाचला. आणि त्याच्या प्रत्येक मुद्द्याला अत्रे ‘हो हो हो’ म्हणत त्रिवार मान्यता देत होते. शेवटी तो श्रोता म्हणाल, ‘काय अत्रे साहेब, नको त्या गोष्टी करता आणि खुशाल त्याची जाहीर कबुली देता...’ त्यावर अत्रे त्याला पुन्हा बाजूला सारून म्हणाले, ‘‘अहो, या सगळ्या गोष्टी मी केल्यात हे खरे आहे. पण त्यावेळी मी काँग्रेसमध्ये होतो!’’ सभा हास्यकल्लोळात बुडून गेली.
काँग्रेसचे नेते विठ्ठलराव गाडगीळ एकदा म्हणाले, ‘अत्र्यांचे सगळे चांगले आहे, पण काही वेळा ते फार अतिशयोक्ती करतात. तिकडे दुर्लक्ष करायचे’. त्यावर अत्रे म्हणाले, ‘जीवनात मला जे दिसतं, जे मी पाहतो, तेच मी बोलतो अन् लिहितो. त्यात कसली आली आहे अतिशयोक्ती? आता विठ्ठलराव गाडगीळ हे काकासाहेब गाडगीळांचे चिरंजीव आहेत, ही काय अतिशयोक्ती झाली?’
हिंदू महासभेच्या ‘ढमढेरे’ नावाच्या उमेदवाराची खिल्ली उडवताना ते म्हणाले, ‘ज्याच्या नावात दोन ‘ढ’ आणि एक ‘मढे’ आहे हे काय आडनाव आहे? असे बोचकारे काढणारी अत्र्यांची भाषा एखाद्याचा गुणगौरव करताना बहरून येई.
एसएम जोशी संयुक्त महाराष्ट्राचे नेतृत्व करत होते. तेव्हा त्यांच्या भव्य सत्काराच्या भाषणाचा शेवट करताना अत्रे म्हणाले होते,
‘‘एसएम म्हणजे सौजन्य आणि माणुसकी,
एसएम म्हणजे सौंदर्य आणि मांगल्य,
एसएम म्हणजे समाजवाद आणि मानवतावाद,
एसएम म्हणजे, संयुक्त महाराष्ट्र!’’
अत्रे म्हणत, ‘‘उत्तम वक्ता व्हावयाचे असेल तर, शुद्ध आणि सोपे मराठी बोलता आले पाहिजे. मराठी भाषा वाटेल तितक्या सोप्या शब्दांमध्ये परिणाम होईल, अशा पद्धतीने बोलता येणे. आता विद्वानांचा काळ संपलेला आहे. सामान्य माणसांचा काळ आलेला आहे. आज गण्या, गोंद्या आणि गोप्या यांना जागृत करावयाचे आहे. लोकमान्य टिळक एवढे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान, पण स्वातंत्र्याचे राजकारण ते शेतक-यांना अगदी त्यांच्या भाषेत आणि कल्पनेत समजावून देत. त्यांनी एकदा स्वातंत्र्याची व्याख्या केली. स्वातंत्र्य म्हणजे काय? तर साहेबाला आपल्या देशात जसे वाटेल, तसे तुम्हा आम्हाला आपल्या देशात वाटले पाहिजे.’’
चारचार पाचपाच दिवसांपूर्वी जाहीर सभांत दिलेली आपली व्याख्याने, घरी आल्यावर अत्रे जशीच्या तशी शब्दश: अगदी बिनचूक लिहून काढत आणि छापत.
पु. ल. देशपांडेंनी आचार्यांच्या व्यक्तिमत्वाचं नेमकं वर्णन केलं आहे.
‘‘अत्र्यांच्या धिप्पाड देहात धिप्पाड मन दडलेले आहे. त्यांच्या मराठी मित्रांनाच काय, पण शत्रूंनादेखील त्या धिप्पाड मनाचे कौतुक आहे. अत्र्यांच्या दांडगाईने रागावलेला माणूसदेखील मनातल्या मनात म्हणत असतो, हे शब्द आहेत की गोफणीचे गुंडे? त्यांच्या वाणीला आणि लेखणीला कुचकुच करीत लिहायची वा बोलायची सवयच नाही. भरमसाटपणा हा त्यांचा महानगुण आणि महान दोष. गरीबश्रीमंतीचे सर्व नमुने चाखलेले अत्रे बोलण्याच्या ओघात म्हणाले होते, आमचा पैसा आमच्याकडे येतानाही आगीच्या बंबासारखा ठणाणा करीत येतो आणि जातानाही ठणाणा करीत जातो. आमच्या खिशालाही चोरकप्पे नाहीत आणि मनालाही.
त्यांच्या जीवनातले सारे अनुभव ठणाणा करत त्यांच्यापाशी येतात आणि लेखणीतून ठणाणा करत बाहेर पडतात. म्हणून त्यांच्या भाषेत झीगकाम नाही. प्रत्येक लेख म्हणजे सरळ ठसठशीत रंगाच्या धारावड खणांची नऊ तुकड्यांची चोळी. त्या भाषेला काशिद्याबिशिद्याची नजाकत नाही. परंतू हा ठसठशीतपणा, मराठी मनाला आवडणारी ही दांडगाई अत्र्यांपाशी भरपूर आहे.
त्यांच्या जीवनातले सारे अनुभव ठणाणा करत त्यांच्यापाशी येतात आणि लेखणीतून ठणाणा करत बाहेर पडतात. म्हणून त्यांच्या भाषेत झीगकाम नाही. प्रत्येक लेख म्हणजे सरळ ठसठशीत रंगाच्या धारावड खणांची नऊ तुकड्यांची चोळी. त्या भाषेला काशिद्याबिशिद्याची नजाकत नाही. परंतू हा ठसठशीतपणा, मराठी मनाला आवडणारी ही दांडगाई अत्र्यांपाशी भरपूर आहे.
जातीच्या या वारक-याला तुकाराम कोणता आणि सालोमालो कोणता हे चटकन उमगते.
अत्र्यांना सदाशिव पेठ चांगली ठाऊक होती. आणि भवानी, गंज, निहाल या उपेक्षित पेठांतून तर त्यांनी ज्ञानज्योत पेटवली. महाजनसमाजाइतकाच नव्हे, त्याहूनही अधिक बहुजनसमाजाशी त्यांचा घनिष्ट संबंध होता.
धिप्पाड व्यक्तीमत्वाच्या चुकाही धिप्पाड. पण त्यांच्या जीवनाचा जमाखर्च मांडणा-याला हे नक्की उमगेल की, महाराष्ट्राच्या नशिबाने लाभलेल्या ह्या अफाट माणसाने आम्हाला उदंड आनंदच दिला. अन्यायाविरुद्ध झुंजण्याचे सामर्थ्य दिले. लेखणीला केवळ वीणावादिनी सरस्वतीच केली नाही, तर उग्रचंडी चामुंडीही केली.’’
आदर्शांची पायमल्ली, मनाविरुद्ध मते मांडली की तुटून पडणे, चारित्र्यहनन, माहितीची शहानिशा करून ने घेता प्रहार करणे, अशा अने उणिवांवर बोट ठेवले जाते. असे असले तरी अत्र्यांच्या काही निष्ठा पक्क्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे सामाजिक बांधिलकी. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसं, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला. अत्र्यांच्या या प्रखर जीवननिष्ठेमागे बहुसंख्य जनतेच्या हिताची पोटतिडिक होती. यात दांभिकता नव्हती. जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, अण्णासाहेब कर्वे, बाबासाहेब आंबेडकर वगैरे समाज सुधारकांच्या पुरोगामी विचारांचा, आचरणाचा फार मोठा प्रभाव अत्र्यांच्या वैचारिकतेवर होता.
अत्रे बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते. जेव्हा समाजात आंतरजातीय विवाह त्याज्य मानला जाई, त्या वेळी अत्र्यांनी मिश्रविवाह केला. सहभोजनांमध्ये हिरिरीने भाग घेतला. पुण्याच्या पूर्व भागात मागासलेल्या मुलांसाठी शाळा काढली. मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढून तिला समाजसुधारक आगरकरांचे नाव दिले आणि महाराष्ट्रात त्यांचे पहिले चिरस्थायी स्मारक केले. रे मार्केटला महात्मा फुल्यांचे नाव, त्यांच्या जीवनावर सिनेमा हे त्याचेच उदाहरण.
शेवटच्या काळात अत्र्यांना शाहीर सगनभाऊ नाटक लिहायचं होतं. चार्वाक या प्राचीन काळातल्या प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करून उठलेल्या एका तत्त्ववेत्त्यावरही नाटक लिहायचं होतं. त्यासाठी त्यांनी माहिती गोळा करायलाही सुरुवात केली होती.
अत्र्यांनी ‘तुकाराम’ नाटक लिहायचं ठरवलं होतं. त्याबाबत ते नटवर्य बापू मानेंना म्हणत, ‘‘मी देहूला जाणार तिथं व्रतस्थ होऊन देवळाच्या ओवरीत राहणार. पहाटे इंद्रायणीवर स्नान करणार. स्वत:चे अन्न स्वत:च शिजवून खाणार. एकभुक्त राहणार. सकाळी, रात्री, प्रार्थना, अभंग म्हणणार. मृगाजिनावर झोपणार आणि फावल्या वेळात महाराजांचे नाट्यमय चरित्र रंगभूमीवर आणणार?..’’
‘महाकवी कालीदास’ आणि ‘गानअवलिया तानसेन’ अशी दोन नाटके ते बालगंधर्वांसाठी लिहिणार होते. ‘संत नामदेव’, ‘संत जनाबाई’ ही नाटके छोटा गंधर्व आणि जयमाला शिलेदार यांच्यासाठी आणि ‘शाहीर सगनभाऊ’ तुकाराम शिंदे व मेघमाला संजीवनी बीडकरसाठी लिहिणार होते. दत्ता भट यांच्यासाठी ‘महात्मा फुले’ हे नाटक ते लिहिणार होते. वासुदेव चंद्रचूडसाठी ‘पुंडलीक’ ठरवला होता. ‘शिवसमर्थ’ नाटकाचा तर एक दीड अंकही त्यांनी लिहिला होता. नानासाहेब शिरगुपीकर यांच्या ‘तुका म्हणे मी वेगळा’ नाटकाचे अध्यक्ष व्हायचं त्यांनी कबूल केलं होतं.
मराठीचा ध्यास, महाराष्ट्र श्वास
अत्र्यांचा मोठा मानबिंदू म्हणजे, महाराष्ट्र. भारतात जन्माला येणे दुर्लभ असेल तर महाराष्ट्रात जन्माला येणे दुर्लभतर आहे, असे अत्रे म्हणत. महाराष्ट्रावर इतक्या उत्कटतेने आणि प्रामाणिकपणे प्रेम केलेला दुसरा माणूस सापडणे विरळाच. महाराष्ट्र या नावाचाही त्यांना प्रखर अभिमान होता. हे नाव शोधून काढणा-या कोणा अनामिकाच्या कल्पनाशक्तीचे, द्रष्टेपणाचे त्यांना कोण कौतुक होते.
अत्रेप्रेमी सुधाकर वढावकर त्यांच्या या महाराष्ट्रप्रेमाचं सुंदर वर्णन करतात.
‘‘महाराष्ट्र हे नाव उच्चारताच या प्रदेशाचा इतिहास भूगोल अन् संस्कृती कशी चटकन् डोळ्यासमोर उभी राहते. महाराष्ट्र म्हटला की उठलेच अत्र्यांच्या अंगावर आनंदाचे रोमांच. फुगलीच त्यांची छाती. केलाच त्यांनी महाराष्ट्राच्या राष्ट्रप्रेमाचा, तेजस्वी परंपरांचा, साहित्याचा आणि कलेचा. गायलीच त्यांनी स्तोत्रं सह्याद्रीच्या आणि सातपुड्याच्या कडयाकपारींची. ओवाळलीच आरती महाराष्ट्रातील वंद्य पुरुषांची. आणि अशा या प्रिय महाराष्ट्रावर कोणी काही बोललं लिहिलं, की कडाडलीच अत्र्यांची वाणी आणि त्यांच्या लेखणीची तलवार. दिल्लीश्वरांनी संयुक्त महाराष्ट्र देण्याचे ठरवले तेव्हा नव्या राज्याचे नाव मुंबईच ठेवावे असे सुचवले.
यशवंतरावांनी याबाबतीत एस. एम. यांचेही मन वळवले. ते अत्र्यांना म्हणाले, बाबुराव, आता मुंबईसह महाराष्ट्र मिळतोय ना, मग महाराष्ट्र नावाचा आग्रह सोडायला काय हरकत आहे? त्यावर अत्रे एकदम उसळून म्हणालो, अण्णा म्हणजे काय? अहो, मग एवढं महाभारत आपण कशासाठी केलं? जर नव्या राज्याला महाराष्ट्र नाव दिलं नाही, तर मी तुमच्यासकट कोणालाही स्वस्थ बसू देणार नाही...’’ अत्र्यांच्या हट्टामुळं नवीन राज्याला महाराष्ट्र नाव मिळालं. ठिकठिकाणी महाराष्ट्र नावाच्या पाट्या पाहून आमच्या अंगावर आनंदाचे चोरटे रोमांच कसे उभे राहतात, याची कल्पना आम्ही इतरांना कशी करून देणार? असं अत्रे म्हणत.
इतिहासच सांगतो की, महाराष्ट्राने राष्ट्रहितासाठी राजकारण केले. भारताचे राजकारण हेच महाराष्ट्राचे राजकारण होते. ‘‘शिवाजीराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली महाराष्ट्राच्या स्वराज्याची नाही. मराठे वीरांनी तहातावर शीर घेऊन दिल्लीपर्यंत आणि अटकेपर्यंत घो़डदौडा केल्या त्या काय फक्त महाराष्ट्राच्या रक्षणार्थ? अठराशे सत्तावन साली इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्याचा मराठ्यांनी जो अचाट प्रयत्न केला तो काय फक्त महाराष्ट्र स्वतंत्र व्हावा म्हणून? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांच्या छातीत जी धडकी भरवली ती कशासाठी? महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळावे म्हणून की हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळावे म्हणून? मराठी जनतेला संयुक्त महाराष्ट्रासाठी संग्राम करावा लागला कारण, महाराष्ट्रावर घोर अन्याय केला म्हणून.’’
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जसे शिवाजी महाराज तसे मराठी भाषेचे संस्थापक ज्ञानेश्वर महाराज. सातशे वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या मराठी भाषेची स्थापना केली, असं ते अभिमानानं सांगत.
‘‘महाराष्ट्राच्या भूगोलाप्रमाणेच मराठी माणसांची मने ओबडधोबड बनली आहेत. तथापि, मराठ्यांइतके राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्यप्रियता भारतातील इतर कोणत्याही भाषकांत नाही. महाराष्ट्राला काही काळ परकीयांचे दास्य पत्करावे लागले तरी, ते आपले स्वातंत्र्य पुन्हा खेचून आणू शकतात. व्यक्तिस्वातंत्र्य मराठी माणसाला प्राणप्रिय आहे. तो साधा, प्रामाणिक निग्रही, करारी स्वभावाचा आहे. त्याचा स्वाभिमान, बाणेदारपणा अपवादात्मक आहे.’’, असे अत्रे म्हणत.
जीवनाच्या विविध क्षेत्रांतून अत्रे हिंडून आले. खांद्यावरची पताका वारंवार बदलली. पण अत्र्यांच्या मनातले चांगुलपणाचे देवटाके कधी आटले नाही. ते तुडुंब भरून वाहतच राहिले. हे कशामुळे याचा शोध त्यांचे जीवलग स्नेही महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांना लागला होता. ते म्हणतात, ‘‘संतवाणीच्या प्रसादामुळे अंत:करणाची शुद्धी अत्र्यांच्या ठायी स्थिर झाली. ‘अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळा माळ असो नसो’, हे तुकोबांचे वर्णन त्यांनी हृदयावर कोरून ठेवले होते. त्यांचे मन शेवटपर्यंत उदार आणि उदात्त राहिले. क्षुद्रता, कटुता असल्या गोष्टी त्यांच्या अंतरंगात प्रवेश करू शकल्या नाहीत. ते थोर आणि उदारच राहिले.’’
महाराष्ट्रपंढरीचा हा वारकरी अखेरपर्यंत मायमराठीचा झेंडा नाचवत, जयघोष करत राहिला. भोवती जमलेले हजारो टाळकरी बेभान होऊन त्याला साथ देत राहिले.
'लोकप्रभा'तील लेखाची लिंक - http://www.loksatta.com/lokprabha/20111111/vyktimatva.htm
पीडीएफ पाने - http://lokprabha.loksatta.com/15738/Lokprabha/11-11-2011#p=page:n=46:z=2
No comments:
Post a Comment