'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Monday 3 October 2011

चैत्रामची गोष्ट

चैत्राम पुण्याजवळच्या मोशीच्या माळावर भेटला होता. २००४च्या डिसेंबर महिन्यात. कृषीप्रदर्शनात. गर्दीत अंग चोरून बसला होता. म्हटलं वा व्वा, नाव छानै तुझं चैत्राम. त्यावर मला कोपरखळी मारत आमचे मित्र सुनील माने म्हणाले, नावापेक्षाही काम मोठंय, रंगराव चैत्रामचं. मग बुजरा चैत्राम हळू हळू बोलता झाला.
युवा सकाळमध्ये या धडपड्या आदीवासी तरुणाची गोष्ट मी लिहिली होती.

गोष्ट वाचावी, ऐकावी, इतरांना सांगावी अन् बोध घ्यावी अशी आहे. गोष्ट आहे, धुळे जिल्ह्यात दूर डोंगरात वसलेल्या, विकासाचा वसा घेतलेल्या बारीपाडा या आदीवासी पाड्याची अन् पाड्याच्या भल्यासाठी झटणा-या चैत्राम नावाच्या तरुणाची. पाड्यात भिल्ल आणि कोकरी जातीचे साडेसातशे आदीवासी.


पैशाच्या मागं लागलेल्या पांढ-या कपड्यांतल्या लोकांची नजर पाड्याच्या जंगलावर पडली. जंगलतोड सुरू झाली. बेसुमार. पाड्यातले बुजुर्ग भिडस्त. त्यामुळं जंगल तोडणा-यांना मोकळं रान मिळालं. शाळकरी चैत्रामला मात्र चैन पडेना. तो मित्रांशी बोलला. विचार पक्का झाला. जंगल तोडू द्यायचं नाही. विरोध करायचा. शेजारच्या वारसा गावातल्या आदीवासी कल्याण आश्रमाच्या डॉ. आनंद फाटकांनी मदतीचा हात पुढं केला. जंगलतोड थांबली. 

नंतर फाटकांनीच तुटलेल्या जंगलाच्या जागी झाडं लावण्याची प्रेरणा दिली. चैत्रामनं गावाचं मन वळवलं. आणि गावक-यांनी जंगलात ११ हजार झाडांची रोपं लावली. ही झाडं जपण्यासाठी मग नियम तयार झाले. वनव्यवस्थापन समितीची स्थापना झाली. जंगल राखायला गावचाच रखवालदार नेमला गेला. त्याला राखणाच्या बदल्यात मिळतं धान्य. तेही लोकवर्गणीतून. रखवालदार दरवर्षी बदलला जातो.
कुणी ओलं झाड तोडल्यास १०५१ रुपये दंड. राखीव जंगलातून गाडी नेल्यास ७५१ रुपये दंड. झाडतोडीची चोरी पकडून देणा-यास १०१ रुपयांचं बक्षीस. चराईबंदी, कु-हाडबंदी काटेकोरपणानं पाळली जाते. सध्या पाडा एकूण ४४५ हेक्टर जंगलाची जोपासना करतोय. या जंगलात ६० टक्के सागाची झाडं आहेत. ३४० प्रकारच्या वनस्पती तर ४५ प्रकारचे पक्षी आहेत. जंगलात १०५ मोहाची झाडं आहेत.

पाड्याचं जंगलप्रेम बघायला डेहराडूनच्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे प्राचार्य सुरेंद्र पॉल आले. पाड्यात एक कुटुंब भूमीहिन होतं. पॉल साहेबांनी मदत केली न त्या कुटुंबाला १० एकर वनजमीन मिळाली. त्या कुटुंबप्रमुखालाच जंगलाचा पहिला रखवालदार म्हणून नेमण्यात आलं. या जंगलातल्या लाकडांपासून ५० आणि फुलाफळांचं १०० टक्के उत्पन्न पाड्याला मिळतं. 
पाड्याला जंगलाचा झालेला आणखी एक मोठा फायदा म्हणजे, भूजलाचा अर्थात पाण्याचा. हातानं घेता येईल एवढं पाणी पाड्यातल्या ४० विहिरींना वर्षभर असतं. शेजारच्या पाच गावांनाही बारीपाडाच पाणी पुरवतो. 
पाड्यात २०० दगडी बांध, सहा वनराई बंधारे, सहा पाझर तलाव, दोन सिमेंटचे बांध तर वनक्षेत्रात ५० हेक्टरवर समतल चर खोदले गेलेत.

बारीपाड्यातल्या लोकांची जिद्द पाहून चारसूत्री भातलागवडीचे जनक डॉ. एन. के. सावंत पाड्यावर आले. चारसूत्रीचे फायदे त्यांनी आदीवासींना समजावून सांगितले. सुरुवातीला साशंक असणा-या शेतक-यांना आता या लागवडीचं महत्त्व चांगलंच पटलं. दुस-याच वर्षी बहुतेक शेतक-यांनी या पद्धतीनं भातलागवड केली. आणि भाताचं भरघोस उत्पन्न मिळवलं. या कामगिरीबद्दल राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकरांनी पाड्यातल्या शेतक-यांचा सत्कार केला. डॉ. प्रकाश राव यांनी शेतक-यांना गव्हाची प्रत्यक्ष पेरणी करून दाखवली.

पिढ्यान् पिढ्या पारंपरिक शेती करणारे आदीवासी शेतकरी आता आपल्या शेतात कांदा, बटाटा, आणि भाजीपाल्यासारखी नगदी पिकं घेऊ लागलेत. कांदा पिकानं तर त्यांना मोठीच मदत केली. कांद्राविक्रीतून मिळालेल्या पैशामुळं त्यांची रोजगारांसाठी होणारी भटकंती थांबली.

पुढं जाऊन पाड्यातच दोन लाखांचं गु-हाळही उभं राहिलं. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला. आता आसपासच्या गावातले लोक बारीपाड्यात गूळ बनवायला येतात. बचत गटांनी गावात भरीव काम केलंय. त्यांनी तयार केलेले नागलीचे पापड, कुरडई, भगर, तांदूळ अहमदाबादच्या खाद्यमहोत्सवात भाव खाऊन गेले.

बारीपाड्यात कुठलाही यात्रा उत्सव होत नाही. मात्र पाड्यातली कुस्तीस्पर्धा प्रसिद्ध आहे. पंधरा वीस गावचे संघ या स्पर्धेत भाग घेतात. बारीपाड्याच्या या विकासकामांना विविध पुरस्कार मिळालेत. पाड्याच्या या सा-या प्रगतीमागे आहे. चैत्राम पवार! या धडपड्या तरुणाचं नेतृत्व बारीपाड्यानं स्वीकारलंय. पाड्यावर चैत्रामचं जीवापाड प्रेम. आणि डोक्यात सतत पाड्याच्या विकासाच्या नवनव्या आयडिया. 

परवा मोशीच्या कृषीप्रदर्शनात आला तेव्हा पायानं चालवायचा पाण्याचा पंप त्यानं पाहिला. बारीपाड्यातल्या माझ्या कष्टाळू शेतक-यांसाठी हा खूप उपयोगी पडेल, म्हणाला. प्रदर्शनातल्या किसानमंचावर बुज-या चैत्रामलाही आमंत्रित करण्यात आलं. बारीपाड्याच्या प्रगतीची माहिती नेमकेपणानं सांगत त्यानं उपस्थितांची मनं जिंकली.
पाड्यातल्या बचतगटांसाठी आवळा प्रक्रिया उद्योग उभारण्याचा त्याचा मानस आहे.

पाड्यातल्या महिलांचे कष्ट त्याला हलके करायचेत. त्यासाठी तो सध्या नाचणीपासून पापड बनवण्याच्या चांगल्या यंत्राच्या शोधात आहे. आदीवासी शेतक-यांनी उत्पादीत केलेली नाचणी एकत्रित करून त्याला पापड उद्योग उभारायचा आहे. आसपासच्या सुमारे ४० पाड्यांतील आदीवासी सुशिक्षित तरुणांना एकत्र करून त्यांच्या सहाय्यानं शेतमालाला बाजारपेठ शोधायची आहे. सौरउर्जेवर चालणारे पंप, सामुदायीक गोठा, असे प्रकल्प राबवण्याचेही त्याच्या मनात घोळते आहे.

चैत्रामला राज्यसरकारचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला. त्याने पुरस्काराची १० हजारांची रक्कम पाड्यात स्वच्छतागृहे बांधण्यासाठी वापरली. चैत्रामची आणि त्याच्या बारीपाड्याची दखल इटलीतील इंटरनॅशनल फंड फॉर एग्रीकल्चर डेव्हलपमेंट या संस्थेनं घेतली.

ग्रामीण तंत्रज्ञानाच्या शोधासाठी चैत्रामला २३ जुलै २००३ रोजी बँकॉकमध्ये गौरवण्यात आलं. तिथं सादर करण्यात आलेल्या ७८ प्रकल्पांमध्ये बारीपाड्यानं दुसरा नंबर मिळवला. बँकॉकवरून आल्यावर भर पावसात गावक-यांनी काढलेली मिरवणूक चैत्राम विसरू शकत नाही.
बारीपाड्यातल्या कामानं प्रभावीत होऊन कॅनडातील मॅनेटोबा युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी शैलैश शुक्ला बारीपाड्यात आला. तिथं राहून त्यानं बारीपाड्यावर पीएच. डी. केली. पाड्यात भरलेल्या वैदूंच्या मेळाव्यात त्याला पीएच. डी.साठी आवश्यक असलेली किती तरी माहिती मिळाली.

दुर्गम डोंगरात वसलेल्या या बारीपाड्याबद्दल सातासमुद्रापलिकडच्या लोकांना कुतूहल वाटतंय. चैत्रामनं केलेल्या कामाचं कौतुक वाटतंय.   

      

No comments:

Post a Comment