अस्सल मऱ्हाटी भाषा अनुभवायची असेल तर संतांचे अभंग
वाचावेत. थेट. तीक्ष्ण. परखड. त्याहूनही अधिक जिवंत भाषा आहे, या संतांच्या बायकांची.. त्यांचे अभंग
वाचणे हा एक रसरशीत अनुभव...
ज्येष्ठाच्या पावसाची ओल अंगाला लागली की मातीच्या पोटात झोपलेली बी-बीयाणं जागी होतात. आषाढाची चाहूल घेत त्यांचे हिरवे कोंब डोकं वर काढतात. हळू हळू साऱ्या रानाला हिरवा गहिवर येतो न् मग या दगडांच्या देशाला पिसं भरतं. खुळावलेली पावलं नकळत पंढरीची वाट चालू लागतात. 'उभारोनी बाहे' त्यांना 'पालवणारा' विठोबा आणि त्याच्या भेटीसाठी आतूर झालेले भक्त. दोघेही वेडेपिसे! हे वेड शतकानुशतकांचं. दर आषाढीला असं परस्पर प्रेमाचं भरतं येतं.
कुणी मायबाप म्हणावं, कुणी सखा, कुणी सोयरा, कुणी बंधू, कुणी चुलता, कुणी गुरू...ज्याला जे वाटेल त्यानं ते नातं लावावं. वाटेनं चालताना या सगळ्यांचं मिळून एक नातं बनतं. ते म्हणजे, 'माऊली'! वारकऱ्यांनी याच नावानं एकमेकांना संबोधावं. याच नावानं झोपेतून जागं करावं. याच नावानं घासातला घास द्यावा. हेच नाव घेऊन थकले भागलेले पाय चेपून द्यावेत आणि 'माऊली माऊली' म्हणतच परस्परांच्या न् विठुरायाच्या पायावर मनोभावे डोकं ठेवावं...
ही भावना येते कुठून? या हृदयीची त्या
हृदयी जाते कशी? हे विचारणं म्हणजे बाळाबद्दल आईच्या मनात लळा, वात्सल्य कसं निर्माण होतं, असं विचारणं
झालं. जरा नेमकंच सांगायचं तर ही वात्सल्यभक्ती रुजवली, विठूनामाचा झेंडा देशभर फडकवणारे देवाचे लाडके भक्त संत
शिरोमणी नामदेवराय यांनी. तत्कालीन समाजात भक्तीचे अनेकविध प्रकार प्रचलित होते.
पण आई आणि लेकराचं नातं हे विश्वाच्या अस्तित्वापर्यंत टिकणारं चिरंजीव नातं.
परस्परांना घास भरवता भरवता नामदेव आणि देवाचं हे नातं जडलं. तिथून पुढं त्याला
बहर आला. माऊली म्हणजे आई!
पंढरीची विठाई ही सर्वांचीच आई. म्हणून तर आजच्या स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीहक्काच्या चर्चेच्या जमान्यातही खेडोपाड्यातल्या लाखो महिला पंढरीच्या वारीत सहभागी होतात. पुरुषांच्या बरोबरीनं जमेल तसं, आपापल्या बोलीभाषेत देवाचं नाव घेतात. गुणगाण गातात. त्यांना हे शिकवलं ज्ञानोबामाऊलींच्या धाकुट्या मुक्ताईनं, तुकोबारायांच्या आवलीनं. नामयाची आई गोणाईनं, पत्नी राजाईनं, दासी जनीनं, चोखोबाची महारी सोयराबाईनं अजून अशा कितीतरीजणींनी!
पंढरीची विठाई ही सर्वांचीच आई. म्हणून तर आजच्या स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीहक्काच्या चर्चेच्या जमान्यातही खेडोपाड्यातल्या लाखो महिला पंढरीच्या वारीत सहभागी होतात. पुरुषांच्या बरोबरीनं जमेल तसं, आपापल्या बोलीभाषेत देवाचं नाव घेतात. गुणगाण गातात. त्यांना हे शिकवलं ज्ञानोबामाऊलींच्या धाकुट्या मुक्ताईनं, तुकोबारायांच्या आवलीनं. नामयाची आई गोणाईनं, पत्नी राजाईनं, दासी जनीनं, चोखोबाची महारी सोयराबाईनं अजून अशा कितीतरीजणींनी!
संतांनी आपल्या मृदू, शीतल शब्दांनी
समाजाच्या दु:खावर फुंकर घातली. पण या संतांना आणि प्रसंगी त्यांच्या देवालाही खरं
खोटं सुनावण्याचं, त्यांना
परिस्थितीची जाणीव करून देण्याचं, रोकड्या शब्दांनी
भानावर आणण्याचं, आत्मविश्वास
देण्याचं, त्या माध्यमातून समाजाच्या दांभिकपणावर कोरडे ओढण्याचं
मोलाचं काम त्यांच्या या आई, बहीण, पत्नी, शिष्यांनी केलं.
त्यासाठी त्यांना तीक्ष्ण, कठोर, शेलक्या विशेषणांचे वापर करावा लागला. भले मग त्यासाठी
त्यांना फटकळ, तोंडाळ, कजाग अशी संबोधनं
सहन करावी लागली. अर्थात हे या माऊल्यांनी केलं ते भल्यासाठीच.
म्हणूनच तर संतांनीही त्यांचा मोठेपणा सांगण्यात उणं ठेवलं नाही.
म्हणूनच तर संतांनीही त्यांचा मोठेपणा सांगण्यात उणं ठेवलं नाही.
ज्ञानदेवादी भावंडांमध्ये मुक्ताई सर्वात लहान.
वाटचालीत दमली तर भावंडांपैकी कुणीही उचलून घ्यावं एवढी पिटुकली. थोरला भाऊ
निवत्तीनाथ देवाधिदेव महादेवाचा अवतार. तर ज्ञानदेव साक्षात श्रीविष्णू! श्रीकृष्णानं
सांगितलेली गीता सर्वसामान्यांसाठी प्राकृतात लिहून ज्ञानदेवांनी समाजाचं जगणं
सोपं केलं. विश्वाच्या सुखासाठी पसायदान मागितलं. पण त्यापूर्वी त्यांनाही झाली
होतीच की 'ग'ची बाधा. एकदा अवमान करणाऱ्या आळंदीकरांवर ते रुसले
आणि ताटी बंद करून आत बसले. काही केल्या बाहेर येईनात. तेव्हा इवलीशी मुक्ताबाई
माऊलींची 'माऊली' झाली.
चणे खावें लोखंडाचे। मग ब्रम्हपदी नाचे।।
मन मारुनि उन्मन करा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।
अपमान पचवलात, राग आवरलात तरच 'संत' व्हाल, असे खडे बोल तिनं सुनावल्यानंच ज्ञानदेव भानावर आले. संत नामदेव आणि चांगदेवालाही तिनं अशाच तिखट शब्दांनी जमिनीवर आणलं.
ज्ञानदेवांचा जिवीचा जीवलग म्हणजे संत नामदेव.
ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर हा संत वयाच्या 80व्या वर्षापर्यंत व्रतस्थ जगला.
विठोबाचा समतेचा संदेश देशभर पोचवण्यासाठी त्यानं आपलं दीर्घायुष्य वेचलं. कीर्तनातून
'जगी ज्ञानदीप' लावणारा हा थोर
प्रबोधनकार. शूद्रातीशूद्रांना भावना व्यक्त करण्यासाठी 'अभंग' या छंदाचा शोध
लावणारा महान मानवतावादी लेखक. पण या प्रतिभावंताची घरची परिस्थिती मात्र बिकट
होती. प्रसंगी याच्या बायकोमुलांवर उपासमारीची वेळ येई. जगाचा संसार करायला
निघालेल्या नामदेवांच्या आई, पत्नीला मात्र
त्याचा संसार चालवणं भाग होतं. मग कुटुंबाकडं दुर्लक्ष करणारा नामदेव आणि त्याचा
देव साहजिकच या दोघींच्या रागाचा लक्ष्य झाला.
गोणाई नामदेवाविषयी मोठी उद्वेगानं बोलते.
नवमासवरी म्या वाहिलासी उदरी। आस केली थोरी होसी म्हणूनी।।
देवपिसे नको करू ऐसे। बळे घर कैसे बुडविसी।।
कैसी तुझ नाही लौकिकाची लाज। हेचि थोर मज नवल वाटे।।
त्यानंतर ती आपला मोर्चा विठ्ठलाकडे वळवते.
माझे घर त्वा पूर्वीच बुडविले। जे दर्शनासी आले बाळ माझे।।
आम्हा दुर्बळांचा करुनिया घात । केला वाताहात घराचा।।
गोणाई देवावर अशी थेट सरबत्ती करत असताना दुसरीकडे नामदेवपत्नी राजाईनं एक हुकमी मार्ग शोधला. तो म्हणजे तिने देवाची तक्रार त्याच्याच बायकोकडं म्हणजे रुक्मिणीकडं केली.
अहो रखुमाबाई, विठोबासी सांगा। भ्रतारासी का गा वेडे केले।।
वस्त्र पास्त्र नाही खाया जेवयासी। नाचे अहर्निशी
निर्लज्जासी।।
चवदा मनुष्य आहेत माझ्या घरी। हिंडती दारोदारी
अन्नासाठी।।
बरा मार्ग तुम्ही ऊमजोनी सांगा। नामयाची राजा भली
नव्हे।।
तुझ्या नवऱ्याची तूच चांगली खरड काढ, नाही तर मग मी काही 'भली' नव्हे', असा सज्जड दमच राजाई रुक्मिणीला देते.
नामदेव घरी
आले की राजाईच्या तोंडाचा पट्टा सुरू होई.
कन्या आणि पुत्र झाली ऊपवरी। अजोनि न धरी घर प्राणनाथ।।
जन लोकामाजी केले येणे हसे। म्हणति लागले पिसे
नामयासी।।
जन्मी न देखे ऊपाय येणे केले अपाये। कोणा सांगे माय
सुखदुःखा।।
पण हळू हळू नामदेवरायांच्या लोकमान्यतेची थोरवी तिच्या मनाला पटत जाते. नामदेवांच्या थोर कार्यात अर्थात शतकोटी अभंग लिहिण्याच्या कामात तीही हातभार लावते.
आता ये संसारी मीच धन्य जगी। जे तुम्हा अर्धांगी विनटले।।
परि मला एक वेळा घाला, विठोबाचे पायी।
विनविते राजाई नामदेवा।।
नामदेव कुटुंबाचाच आणखी एक अविभाज्य सदस्य म्हणजे संत जनाबाई. खरं तर ती या कुटुंबाची दासी. पडेल ते काम करावं आणि आपल्या झोपडीत अभंग, गौळणी लिहित बसाव्यात, असा दिनक्रम. आपल्या अवीट गोडीच्या लिखाणातून जनाबाई सर्वसामान्यांच्या घराघरांत पोहोचली. नामदेवांचं कार्य तिनं खऱ्या अर्थानं पुढं नेलं. म्हणून तर खुद्द नामदेवांनी जनाबाईच आपला खरा अध्यात्मिक वारसदार असल्याचं घोषीत केलं.
बरं, देव तर तिच्या
एवढा अंकित की, तिला प्रत्येक कामात मदत करायचा. 'माझ्या जनीला नाही कोणी', अशी त्याला कणव.
त्यामुळं
'झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी'
किंवा
दळीता कांडिता तुज गाईन अनंता।
अशी जनी विठ्ठलमय झालेली. जनी तशी कोणाचीही भीडभाड न ठेवणारी म्हणून प्रसिद्ध. तिच्या कचाट्यातून देवही सुटला नाही.
अरे विठ्या विठ्या। मूळमायेच्या कारट्या।।
तुझी रांड रंडकी झाली। जन्मसावित्री चुडा ल्याली।।
तुझे गेले मढे। तुला पाहून काळ रडे।।
उभी राहून अंगणी। शिव्या देते दासी जनी।।
अंगणात उभे राहून असा उद्धार करणाऱ्या जनीचे शब्द असे सणसणत जातात, की विठ्ठल काकुळतीला येतो. मग या 'चोराच्या गळ्यात दोर बांधून' ती त्याला पंढरीभर मिरवून आणते. अर्थात हे सारं अभंगातून. जनाबाईची प्रतिभाशक्ती अशी अचाट आहे.
पिढ्यान पिढ्या ज्यांच्या वाट्याला अस्पृश्यता, नाकारलेपण आलं त्या समाजातल्या संतश्रेष्ठाला चोखोबाला वारकरी पंथाचे आधारस्तंभ नामदेवरायांनी पोटाशी धरलं. त्याच्या कुटुंबाला आपल्या कुटुंबात सामावून घेतलं. देवाला भुलवणाऱ्या या संताच्या पत्नीनं सोयराबाईनं अठराविश्व दारिद्र्यात राहून 'अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग' यांसारखे नितांत सुंदर अभंग लिहिले. अर्थात तिलाही जनाबाईच्या सहवासाचा वारा लागला होताच. त्यामुळं
देहींचा देहींच जन्मला। सोवळा तो धर्म कवण झाला।।
असं ती समाजाला ठणकावून विचारू लागली. एकदा तर तिनं देवालाही आपला मंगळवेढी हिसका दाखवला. प्रसंग आहे, पंढरपुरातला. देवाला दही पाजले म्हणून चोखाबाला प्रचंड मारहाण सुरू आहे. शेवटी चोखोबाला बैलांना जुंपले जाते. आणि हे सर्व पाहत देव तिथं उभा आहे. त्याप्रसंगी सोयरा देवावर अशी काही कडाडते की यंव्...त्याचं वर्णन खुद्द नामदेवरायांनीच करुन ठेवलंय -
खाइलें जेविलें त्याचा हा उपकार । दुबळीचा भ्रतार मारूं पाहसी।।
पाळिलें पोसिले माझिया धन्यासी । उतराई झालासी
ओढावया।।
अन्नाची त्वां क्रिया नाही रे राखिलीं। रांडकी त्वां
केली चोखियाची।।
काढी हात आतां जाय परता उसण्या। जाय पोट पोसण्या
येथूनियां।।
गोड अभंग लिहिणाऱ्या सोयराबाईचे शब्द प्रत्यक्षात कसे असावेत, याचा अनोखा नमुना संत दासगणू महाराजांनी लिहून ठेवलाय.
माझ्या पंढरीच्या विठ्या। का निसूर बससी तरी।
तुझ्या नामावाचून मेल्या। काही नसे रे आमुच्या घरी।।
धडधुडके न नेसायला। न गाठही येते पुरी।
मग उसन्यासाठी कुठे। जाऊ मेल्या मी बाहेरी।
निर्मळेच्या तोंडीही दासगणू महाराजांनी असेच शब्द घातले आहेत. चोखोबाच्या संगतीनं देवाच्या नादी लागलेल्या त्याच्या मित्रांचा समाचार घेताना ती म्हणते,
मेले टाळकुटे, जगि लुच्चे मोठे।
सोडले बायकापोरांवर पाणी।
कशी येईना मरी, गं या संतांवरी।
मधल्या काळात चोखोबादी संतांच्या अभंगावर पुस्तकी भाषेचे संस्कार झाले. मूळ स्वरुपात हे अभंग उपलब्ध झाले असते तर अस्सल, सोलापुरी, कोल्हापुरी, मराठवाडी भाषेचा झटका आपल्याला अनुभवायला मिळाला असता.
या महिला संतांनंतर सुमारे तीनशे वर्षांनी देहूत संत
तुकारामांनी अवतार घेतला. त्यांच्या मावळी मातीतल्या देशी भाषेनं जगाला वेड लावलं.
पण अस्सल मराठी भाषा तर आपली पत्नी आवली उर्फ जिजाई बोलते, असं शिफारसपत्रच त्यांनी देऊन टाकलं. कजाग आणि कर्कशा अशी
प्रतिमा असलेली जिजाई एकदा नेहमीप्रमाणं तणतणत होती. संसारात लक्ष द्यायचं सोडून
देवाच्या भजनी लागल्याबद्दल तुकोबा आणि त्यांच्या देवाला लाखोल्या वाहत होती.
त्याला उत्तर न देता, अगदी शांतपणानं
तुकोबारायांनी आवलीचे हे शब्द लिहून घेत होते.
चालुनिया घरा सर्व सुखे येती।
माझी ती फजिती चुकेचिना।।
काही नेदी वाचो धोवियेले घर।
सारवावया ढोर शेण नाही।।
अशी भणभण करता करता तिचं लक्ष तुकोबांच्या भोवती बसलेल्या वैष्णवांकडे जातं. मग त्यांच्यावरही ती कडाडते.
न करवे धंदा। आइता तोंडी पडे लोंदा।।
उठितें ते कुटितें टाळ। अवघा मांडिला कोल्हाळ।।
जिवंतची मेले।लाजा वाटोनिया प्याले।।
संसाराकडे। न पाहती, ओस पडे।।
तळमळती त्यांच्या रांडा। घालिती जीवा नावे धोंडा।।
यानंतर तुकोबा आवलीची समजूत घालतात. तिला बोध करतात. त्यांनी केलेला हा उपदेश 'पूर्णबोध' नावाने प्रसिद्ध आहे. नवरा-बायकोतला हा 'वाद-संवादबोध' वाचायलाच हवा, असं तुकोबाराय आवर्जून सांगतात.
आवली अशी कजाग असली तरी तिचं स्थान आणि कर्तृत्व काय
होतं हे ऐकावं वारीच्या वाटेनं चालणाऱ्या खेडोपाड्यातल्या बायकांच्या तोंडून.
सरोजिनी बाबर यांनी ऐकलेल्या या ओव्या ड़़ॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या 'तुकाराम दर्शन' या ग्रंथात नमूद
केल्या आहेत.
देहू गावामधी भागीरथी करी धावा।
तुकाराम महाराज गेल्या कुण्या गावा।।
देहूईच्या वाटे सांडला जाई बुक्का।
तुका गेला वैकुंठीला मागे हाले नांद्रुका।।
तुका निघाले वैकुंठी वस्त्रे ठेविली भिंतीवरी।
जिजा निघाली माघारी सोताच्या हिंमतीवरी।।
नवऱ्याच्या मागे राहिलेल्या स्त्रीला हिमतीने प्रपंच सावरावा लागतो. आवली आयुष्यभर तुकोबांना भक्कम साथ देत राहिलीच. पण तुकोबांच्या माघारीही तिने त्यांच्या प्रपंच सावरून धरला. पंढरीचा पालखी सोहळा सुरू करणाऱ्या नारायण महाराजांना तिने घडविले. त्यांच्यावर संस्कार केले. मराठी स्त्रीचं हे प्रातिनिधिक कर्तृत्व आहे!आपण ते समजून घ्यायलाच हवं.
No comments:
Post a Comment