'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Saturday 18 December 2010

उत्तम शुभशकुन

सुवर्णमहोत्सवी वर्षात महाराष्ट्राला एक उत्तम शुभशकुन झाला. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे साहित्य संमलेनाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या निवडीनिमित्तानं लिहिलेला हा लेख...भाद्रपदाचं टळटळीत ऊन सहन करणार्‍या आणि नेहमीच्या धावपळीत मग्न असणार्‍या मुंबई शहरात मतमोजणी सुरू होती. ही मतमोजणी राजकीय वगैरे नसल्यानं तिथं फारशी गर्दी नव्हती. पण महाराष्ट्रभर या निकालाची उत्सुकता लागली होती. निकाल जाहीर झाला. ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे 84व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विजयी...पन्नाशीतल्या महाराष्ट्रानं समाधानानं कूस वळवली!

मराठी साहित्यसृष्टीसोबतच गोरगरीब, उपेक्षितांना, आबाळ सोसत लेकरासाठी राबणार्‍या आया-बायांना आनंद झाला. भिरभिरं, पाळण्यांच्या रंगीबेरंगी जत्रेतून, मीठभाकरीच्या पैशांतून लहानग्या उत्तमला त्याच्या आईनं पुस्तक घेऊन दिलं. त्याच्या अडाणी आईची ही कृती हजारो पुस्तकप्रेमींची प्रेरणा बनली. 'आई समजून घेताना' या आपल्या आत्मचरित्रात उत्तम कांबळे आईनं मनात रुजवलेली ही बीजं उलगडून दाखवतात.

उत्तम कांबळे त्यांच्या कुटुंबातला शिकलेला पहिला माणूस. मोलमजुरी करणार्‍या दलित कुटुंबाला जे काबाडकष्ट करावे लागले, ते सर्व त्यांच्या वाट्याला आले. हमाल, बांधकाम मजूर, विक्रेता, कंपांऊंडर, रस्त्यावर उभं राहून पेपर विकणारा पोर्‍या, अशी नाना कामं करावी लागली.

हलाखीचं, उपेक्षिताचं जगणं म्हणजे काय, नेहमी नकार झेलावा लागणं म्हणजे काय, हे अनुभवत उत्तम कांबळे लढत, पुढं जात राहिले. त्यातून तयार झालेला हा लढवय्या पिंड राज्यशास्त्राची पदवी घेऊन वळला, तो पत्रकारितेकडं. आपल्या बांधवांना, जगण्याशी झगडणार्‍या उपेक्षितांना यातूनच आपण न्याय देऊन शकतो यांची त्यांना खात्री झाली. 79 सालापासून दै. समाजमधून पत्रकारिता सुरू करणारे कांबळे आता सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक झाले आहेत. पण ही वाटचाल करताना त्यांनी लेखणीचं आणि समाजाचं बोट कधीही सोडलं नाही. साहित्यिक पत्रकार म्हणून नावारुपाला आलेला हा माणूस रस्त्यावर उतरून लढणारा पत्रकार म्हणूनही महाराष्ट्राला ओळखीचा झाला आहे.

सामाजिक चळवळी लढताना त्यांच्यातील पत्रकार नेहमी जागा राहिला. म्हणूनच त्यांच्या हातून देवदासी आणि नग्नपूजा, कुंभमेळा साधूंचा की संधीसाधूंचा, अनिष्ट प्रथा, भटक्याचं लग्न, हे समाजातील वास्तवावर झगझगीत प्रकाश टाकणारं लिखाण झालं. त्यांच्या या लिखाणानं केवढी तरी खळबळ उडवून दिली.
आयुष्यभर पाहिलेल्या माणसांचे नाना रंग त्यांनी रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, या कथा संग्रहात चितारले.

उत्तम कांबळे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते कर्मवीर दादासाहेब गायकवाडांपर्यंतच्या दलित चळवळीची परंपरा जपणारा, हे तत्वज्ञान वास्तवात जगणारा, वंचितांचा, लोकपरंपरेचा खरा प्रतिनिधी. म्हणूनच त्यांच्या हातून, झोत सामाजिक न्यायावर, डोंगरासाठी काही फुले, लढणार्‍यांच्या मुलाखती, कर्मवीर दादासाहेब गायकवाड- काल आणि कर्तृत्त्व अशी दर्जेदार संपादनं झाली.

परवडणार्‍या किंमतीच्या लहान लहान पुस्तिकाच सर्वसामान्य आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहचू शकतात, हे लक्षात घेऊन त्यांनी राजर्षी शाहू महाराज आणि वेदोक्त प्रकरण, राजर्षी शाहू महाराज आणि महिला मुक्ती, महात्मा फुल्यांची जलनीती, नव्या शतकात संतसाहित्य टिकेल काय?, ओबीसींचे राजकारण या विषयांवरच्या पुस्तिका लिहिल्या आहेत.

तळपणार्‍या लेखणीप्रमाणंच उत्तम कांबळेचं भाषण म्हणजे जणू कुस्तीच्या आखाड्यातील कडाडणारी हलगी. त्यांचं भाषण श्रोते अगदी पिनड्रॉप सायलेन्स ठेऊन ऐकतात. त्यांचे कामगार साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण, अमरावतीत झालेलं आंबेडकरी साहित्यावरील भाषण ते अगदी अलिकडं सांगलीतल्या साहित्य संमेलनातलं स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या भाषणांच्या पुस्तिका हातोहात खपल्या आहेत.

बालपण कर्नाटकात गेलेल्या या साहित्यिकावर कानडीनंही तेवढीच माया केली आहे. त्यामुळंच त्यांच्या गजाआडच्या कवितांची कन्नड आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. वाचनापासून दूर जाणार्‍या या काळात पुस्तकाच्या सहा-सहा आवृत्या छापल्या जाण्याचं भाग्य त्यांना मिळालं आहे.
आई समजून घेताना या त्यांच्या आत्मचरित्राला मराठी वाचकांनी सानेगुरुजींच्या 'श्यामच्या आई'एवढा प्रतिसाद दिला आहे. पण आपल्याकडं दुदैर्व हे की त्यावर सिनेमा काढावा, असं अजून कोणाला वाटलेलं नाही. (अर्थात अगदी ऑस्करला जिंकण्याची ताकद असणारं लिखाण मराठीत उदंड असताना सिनेमावाल्यांना त्याकडं लक्ष द्यायला कुठं वेळ आहे म्हणा!)

उत्तम कांबळेंच्या लेखणीला सहवास मिळाला तो कवीवर्य नारायण सुर्वे, बाबूराव बागूल आदी दिग्गजांचा. आंबेडकरी जलसा, सत्यशोधकी परंपरा, ब्राम्हणेतर चळवळीनं त्यांना दिलेलं भान त्यांच्यातील कार्यकर्त्यात उतरलं. त्यांच्या पत्रकारितेत, लिखाणात उतरलं. त्यामुळंच त्यांचं साहित्य हे बहुजन समाजानं आपलं मानलं.

शोषितांचा प्रतिनिधी अशी प्रतिमा मिळवलेल्या कांबळेंनी मात्र जाणीवपूर्वक सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं धोरण ठेवलं. त्यामुळंच अध्यक्षपदाच्या शर्यतीतील ज्येष्ठ साहित्यिक गीरिजा कीर यांच्या वादग्रस्त विधानावर त्यांनी मतही व्यक्त करण्याचं टाळलं. त्यामुळंच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अलिकडच्या काळातली सर्वाधिक मतं त्यांना मिळाली.

पत्रकारिता करताना त्यांनी सामाजिक चळवळींचा विसर कधीही पडू दिला नाही. समाजासाठी राबणार्‍या माणसांचा विसर पडू दिला नाही. म्हणूनच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना, ज्यांच्या विचारांवर महाराष्ट्राचा पिंड पोसला गेला, अशा साहित्यिकांची उतारवयात आबाळ होऊ नये यासाठी आरोग्य फंड उभारण्याचा निश्चय ते व्यक्त करतात.
खरं तर साहित्य संमेलन हा जत्रा किंवा उत्सव असं, चेष्टेनंही म्हटलं जातं. पण जत्रेतून पुस्तकांचं आणि वास्तव जग शोधणार्‍या उत्तम कांबळेंचं जग यंदाच्या संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.

बदलणार्‍या काळाचंही कांबळेंनी उत्तम भान बाळगलं आहे. म्हणूनच जागतिकीकरणाच्या अनुषंगानं बदलणार्‍या समाजाचं ते विश्लेषण करत आहेत. अशा या समाजभान जपणार्‍या आणि सर्वांना सोबत घेऊन जाणार्‍या पत्रकार, साहित्यिकाला मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळणं याला महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मोठं औचित्य आहे. यानिमित्तानं बदलत्या काळासोबत सांस्कृतिक, सामाजिक, परंपरा जपणारा महाराष्ट्रही कूस बदलतो आहे ही मोठ्ठी समाधान देणारी गोष्ट आहे.

No comments:

Post a Comment