'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Saturday 18 December 2010

धन्य तो सुखसोहळा अनुपम्य

पंढरीची वारी हा आमचा कुळधर्म, कुळाचार. पण मी कायमच त्यापासून दूर राहिलो. शिक्षणाच्या निमित्तानं, नवविचारांची बाधा झाल्यानं...पण 'तुझी वाट पाहत मी विटेवर ताटकळलोय', असा जणू विठुरायाचा सांगावा आला. नोकरीच्या निमित्तानं का होईना वारीच्या रिपोर्टींगला जावं लागलं. काय असतो हा आनंदानुभव, याविषयी लिहिलं होतं, 'महाराष्ट्र टाइम्स'च्या जुलै २००७च्या वारी विशेषांकात...
राना-शिवारात पेरणीची लगबग उडालेली. भरभर चाललेल्या कारभाऱ्याच्या पाभारीमागे चपळाईने घेवड्या-चवळीची ओळ पेरणारी घरधनीण , त्यांच्यामागे झपाट्याने वाफे पाडणारा कुळव. मुसकी घालून नेटाने औत पळवणारे ढवळे-पवळे. बापाच्या हाळीसरशी बियाणांची ओटी घेऊन धावणारी पोरं. अशी शिवारभर नुसती झुंबड. बोलायला उसंत नाही. कारण या पेरणीवरच वर्षभराची बेगमी अवलंबून. मात्र एवढ्या धांदलीतही पायाखालची ओलसर माती कसलीशी अनामिक हुरहुर जागवते.

टाळ-मृदुंगाची लय मनात घुमू लागते. दिंड्या-पताकांचे भार न् त्यात हिंदोळणारा रथाचा कळस डोळ्यासमोर दिसू लागतो. माऊली! माऊली!! बळीराजा मनोमन दंडवत घालतो. ज्येष्ठाच्या तोंडावर साऱ्या महाराष्ट्राला पावसाच्या प्रतीक्षेबरोबरच पंढरीच्या वाटेची अशी ओढ लागते. पोरं-बाळं , गुरा-ढोरांची निरवानिरव करत कुटुंबाचा पोशिंदा देहू, आळंदीतल्या ज्ञानोबा, तुकारामाच्या पालख्यांच्या प्रस्थानाची वेळ गाठतो.

इंदायणी दुथडी भरून उसळणाऱ्या वारकऱ्यांच्या सागरात विरघळून जाते. बाहेरच्या या भक्तीलाटा झेलत देऊळवाडा मात्र शांत असतो. गाभाऱ्यातल्या समाधीवर होणारा दह्या-दुधाचा अभिषेक , चंदनउटी , भरजरी वस्त्रं , तुळसपानादी पुष्पसंभाराने सजणारं माऊलींचं मुख न्याहाळत असतो. देऊळवाड्याचं दार चोपदार उघडतात न् माऊलींच्या दर्शनासाठी आतुर झालेला वैष्णवलोंढा आत घुसतो. टाळ , मृदुंग , हरिनामाच्या गजराने अलंकापुरी दुमदुमून जाते. या हरिनाम जल्लोषात पाऊसही सामील होतो.

झालेले वारकरी आवारातच झिम्मा , फुगडी , मनोऱ्यांचे खेळ मांडतात. एवढ्यात मंदिराच्या दारात गलका होतो. मानकऱ्यांच्या खांद्यावरुन मंदिराच्या बाहेर येणारी माऊलींची पालखी नजरेस पडताच हजारो हात जोडले जातात. माऊलींनी पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवलेलं असतं. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे दिंड्या-पताकांच्या गदीर्त फुलांनी सजलेला माऊलींचा रथ टाळ-मृदुंगाच्या लयीत पंढरपूरकडे वाटचाल करू लागतो. आषाढीवारी सुरू होते. सीमेवरच्या थोरल्या पादुकांजवळ माऊलींना निरोप देताना आळंदीकरांची पावलं जड होतात.

पुण्यातल्या पहिल्या मुक्कामात पावसात अंगावर पांघरण्यासाठी लागणाऱ्या प्लॅस्टिकच्या कागदापासून मुक्कामासाठी लागणारे तंबू , भांडी , धान्य आदींची खरेदी होते. एरवी पै-पैचा धंदा बघणारे दुकानदार वारकऱ्यांसाठी हात सैल सोडतात. त्यांना प्रेमाने जेवू घालतात. पुणे सोडल्यावर खरी वाटचाल सुरू होते. दिवेघाट चढताना पायात पेटके येतात. बहुदा याच दिवशी येणारी एकादशी वारकऱ्यांची परीक्षा पाहते. रथाला जादा बैलजोड्या लावून दिवेघाट पार होतो. हिरव्या घाटातून नागमोडी वळणं घेणारा पालखी सोहळा विहंगम दिसतो. पण हे दर्शन दूरचं. वरवरचं. याच ठिकाणाहून वारकऱ्यांच्या गदीर्त मिसळलात तर सोहळ्याच्या अंतरंगाशी ओळख होईल.

पांढरा शुभ्र नेटका पोषाख घातलेले , क्रमांकाच्या दिंडीत चालणारे तुमच्याशी फार मृदू , शुद्ध बोलतील. त्यांची पालखीसोहळ्याचं प्रशासन पाहणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी ओळख असते. सोहळ्याच्या नियम नियमावल्या माहीत असतात. वारीच्या वाटेवर त्यांची मुक्काम व खाण्या-पिण्याची उत्तम व्यवस्था असते. खरंतर सर्व वारकरी असेच असायला हवेत असं तुम्हाला वाटेल. पण तुम्हाला याउलटचं चित्रच मोठं दिसेल. धुवट धोतराचा काचा मारलेले , गावंढळ हेलकाव्यात भजन म्हणणारे तुम्ही बोलायला गेलात तर बिचकतील.

ही मंडळी कुठल्याही दिंडीत किंवा रस्त्याच्या कडेने दिंडीतल्या भजनाशी सूर मिळवत टाळ्या वाजवत चाललेली दिसतील. मुक्कामाच्या ठिकाणी कुठल्याही पंगतीत जेवताना दिसतील. सोहळ्यात रात्री चक्कर टाकलीत तर रस्त्याच्या कडेलाच उघड्यावर झोपलेली मंडळी हीच असल्याचं तुमच्या लक्षात येईल. त्यांना थंडी वाजत नाही किंवा मच्छर चावत नाहीत. पहाटे साडेतीन-चारलाच जागी होऊन ती वाटचाल करू लागतील. वाटेतल्या ओढे-नाल्यांवर आंघोळ करतील , कपडे धुतील न् वाळवतील. आणि एव्हाना तुम्हाला ओळखू लागलेले असतील. अडकित्त्याने कातरलेली सुपारी तुम्हालाही देत तुमच्याशी हळू-हळू गप्पा मारू लागतील.

एक गोष्ट तुम्हाला नक्की जाणवेल , मन मोकळं करण्यासाठी पंढरीच्या वाटेसारखी योग्य जागा नाही! पाण्याअभावी पीक जळालंय , सावकाराने कर्जाचा तगादा लावलाय , उभा ऊस शेतातच वाळून चाललाय , पोरगं शेतात राबायला नको म्हणतंय , लेक-सून वेगळं राहायचं म्हणताहेत , सासूचा जाच सोसवत नाही , जावा-नणंदा पाण्यात पाहतात , कामाच्या रगाड्यातून सुटका होत नाही या आणि अशा कित्येक तक्रारी न् गाऱ्हाणी एकमेकांना ऐकवली जातात. आपलं कोणी तरी ऐकून घेतंय यात केवढं समाधान! परस्परांना आग्रह करत जेवतात. वाटचालीने थकलेले जीव एकमेकांचे पाय चेपून देतात.

ऊन , पावसात अनवाणी चालणारी पावलं वाटेतल्या रिंगणसोहळ्यात मृदुंगाच्या टाळ-विणेच्या ठेक्यावर ताल धरतात. मृदुंगाच्या तालावर मनमुराद खेळतात. रिंगणसोहळा म्हणजे आनंदाची पर्वणीच. रिंगणात रंगलेल्या झिम्मा-फुगड्या पुन्हा आयाबायांना बालपणाची , माहेराचं सुखाची सय आणून देतात. रिंगणात धावून माऊलींच्या पालखीवर डोकं ठेवणारे अश्व पाहून डोळे पाणावतात. रिंगण पाहायला आसपासच्या गावचे लोक सजवलेल्या बैलगाड्या जुंपून पोराबाळांसह येतात. त्यांनी आणलेली पिठलं-भाकरी वारकरी आवडीने खातात. सोहळ्याचा मुक्काम ज्या गावात असेल त्या गावात सणच साजरा होतो.

लेकीबाळी माहेराला येतात. तान्ह्या पोरांना माऊलींच्या पायावर घातलं जातं. चाकरमाने सुटी काढून गावात येतात. घराघरांत गोडधोड होतं. वारकऱ्यांना जेवायला घालून गावकरी अन्नदानाचं पुण्य पदरात पाडून घेतात. यानिमित्ताने गावात यात्राच भरते.
पाळणे, फुगे , मिठायांची दुकानं थाटली जातात. तुमच्याशी ओळख झालेली मंडळी या यात्रेत अप्रुपाने फिरताना दिसतील. गावातल्या दैवताची यात्रा म्हणजे त्यांच्या कष्टकरी जीवनातला एकमेव विरंगुळा. मात्र वारीबरोबर ही मौज रोजच अनुभवायची. मिष्टान्नाचा लाभ तर वारीच्या वाटेवर रोजच. गावचं विचारलं तर मंडळी सांगतील , ' पंढरीच्या वारीला गेलो म्हणून गावात मान वाढतो. पंढरपूरहून आल्यावर लोक दर्शन घेतात. माळकरी बुवा म्हणून गाव आदर करतं. ही सारी पांडुरंगाची कृपा. ' हे सारं सुखावणारं असतं. त्यापुढं संसारदु:खाचा विसर पडतो.

आळंदीहून निघून दोन आठवडे झालेले असतात. पंढरीच्या दर्शनासाठी डोळे उतावीळ झालेले असतात. वेळापूरच्या अलीकडे असलेल्या उंचवट्यावर आनंदाचं भरतं येतं. तुकोबारायांना इथूनच पंढरपूरच्या मंदिरांचे कळस दिसले होते.


झळझळीत सोनसळा, कळस दिसतो पिवळा
बरवे बरवे पंढरपूर,
विठोबारायाचे नगर

अशा त्या वैकुंठाच्या दर्शनानंतर धीर न राहून महाराज धावू लागले. म्हणून या जागेचं नाव ' धावा '. तुका म्हणे धावा , आहे पंढरी विसावा हा अभंग म्हणत अबालवृद्धांचा सोहळा अवखळपणे धावू लागलेला असतो. ऊन , वारा झेलत , परस्परांचे सुखदु:ख ऐकत , वाटेवरचा पाहुणचार घेत , रस्त्याकडेची हिरवळ , खळाळणारे ओढे आदी निसर्गदर्शनानं उल्हासित होत वाटचाल करणारा पालखी सोहळा पंधराव्या मुक्कामाला वाखरीत येतो.

महाराष्ट्रभरातून आलेल्या ६०-७० पालख्या वाखरीत विसावलेल्या असतात. आळंदीहून श्री ज्ञानेश्वर महाराज , देहूहून संत तुकोबाराय , पैठणहून एकनाथ महाराज , त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ , खान्देशातल्या एदलाबादहून मुक्ताबाई , सासवडहून सोपानमहाराज या संतश्रेष्ठांना भेटीसाठी पंढरीहून संत नामदेव महाराज सामोरे येतात. वाखरीच्या माळावर वैष्णवभक्तांचा मळा फुलतो. टाळ , मृदुंगाचा सूर टिपेला चढतो. दिंड्या , पताकांचे भारांबरोबर जणू गगनच डोलू लागते. झिम्मा , फुगड्या , हमामा , लगोऱ्या , हुतूतू खेळांमध्ये पावलं नाचू लागतात. भेदभाव , अहंकार गळून पडतो. या अनुपम्य सुखसोहळ्यात डुंबण्यासाठी विठूरायाही पंढरपुरातून वाखरीला येतो...!

पंढरपूर केवळ तीन मैलांवर राहिलेलं असतं. पण वाखरीतून पाय निघत नाही. याचसाठी केला होता अट्टाहास म्हणत गहिवरल्या मनाने सोहळा पंढरपूराकडे निघतो. खरंतर पंढरपुरात पोहोचणं हा फक्त उपचारच उरलेला असतो. एकादशीच्या दिवशी चंदभागेत स्नान करून दर्शनबारीत उभं राहिल्यावर तुम्हाला वारीच्या वाटेवर भेटलेल्या मंडळींची आठवण होईल. तुमची नजर त्यांना आजूबाजूला शोधू लागेल. पण ही मंडळी कळसदर्शन घेऊन केव्हाच परतीच्या वाटेला लागलेली असतील. कारण त्यांना त्यांचा विठोबा वाखरीतच भेटलेला असतो!
मटामधील लेखाची लिंक - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3164941.cms

No comments:

Post a Comment