८०व्या वाढदिवसाच्या निमित्तानं उमपांची मुलाखत घ्यायला गेलो तेंव्हा शाहिरांनी 'गाता गाता मरणाची इच्छा' इच्छा पहाडी आवाजात गाऊन दाखवली होती.. नियतीनं त्यांची ही इच्छा पूर्ण केली. त्यांच्या निधनानंतर ही मुलाखत 'लोकसत्ता'नं छापली. बहुधा शाहिरांची ही शेवटचीच मुलाखत...
शनिवार, २७ नोव्हेंबर २०१०
प्रश्न- तुमच्या आवाज काहीतरी वेगळा आहे. एरवी ऐकायला न मिळणारा दुर्मिळ आहे. त्यासाठी काही खास सराव केला का?
उमप - अहो, हा आवाज अनुवंशिक आहे. माझ्या वडिलांचा आवाज असाच होता. आत्या आणि ते या उंच काकसूरात ‘भेदिक’ म्हणजे अध्यात्म सांगणारे गाणे गात. त्या गाण्याने आमची नायगावची चाळ दणकून जायची. असा आवाज अनुवंशिकतेनेच मिळतो. माझ्या रक्तातच गाणं आहे. माझे आजोबा लोकगीतं गायचे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चिकणी हे आमचं गाव. तमाशात किंवा भारुडात गाणाऱ्या माणसाला सर्व लोकांपर्यंत आवाज पोहोचण्यासाठी उंच सुरात गावे लागे. तेव्हा लाऊडस्पीकर नव्हते. त्या उंच पट्टीतील गाण्याने गळा तयार झाला. पुढच्या पिढीत तो अनुवंशिकतेने आला.
तुमच्या गाण्याची सुरुवात नेमकी कधीपासून झाली?
उमप - खरे तर आपल्यासारख्या हालअपेष्टा मुलाच्या वाटयाला येऊ नयेत म्हणून त्यांनी मला गाण्याच्या वाटेला न लावता फक्त शिकवायचे ठरवले होते. पण चाळीतल्या गाणाऱ्या मंडळींमध्ये मी गायला कधी लागलो हे मलाही कळले नाही. मी आठ वर्षांचा असताना माझी भजने आणि कव्वाल्या लोकांना आवडू लागल्या.
यादरम्यान तुमचं शिक्षण सुरू होतं का? नोकरी कधी मिळाली?
उमप - बालपण झकास चाललं होतं. वडील माझ्यावर फार मेहनत घ्यायचे. मला कुस्तीही शिकवायचे. सहावीपर्यंत जाऊन माझं शिक्षण थांबलं. त्याला कारणीभूत ठरली गरिबी. वडिलांच्या दारूच्या व्यसनानं आणि आईच्या दुखण्यानं त्यात भर पडली. इथे-तिथे किरकोळ कामंही करीतच होतो. तरी गाणंही सुरूच होतं. मग सेंट्रल टेलिग्राफ खात्यात नोकरी मिळाली.
तुमचं गाणं खऱ्या अर्थानं लोकांसमोर कधी आलं?
उमप - टेलिग्राफमध्ये असतानाच. टपाल खात्यातर्फे दरवर्षी एक राष्ट्रीय पातळीवरील लोकगीत गायन स्पर्धा होत असे. त्यात मला प्रथम पारितोषिक मिळालं. या स्पर्धेला मन्ना डे आले होते. त्यांनी माझ्या उंच सुराचं कौतुक केलं. तिथंच टेलिग्राफ ऑफिसचे प्रमुख गुप्ता होते. त्यांनी माझं गाणं अजून रेकॉर्ड का झालं नाही, असं विचारलं. आणि मला १९५३ मध्ये मला पहिल्यांदा आकाशवाणीवर संधी मिळाली रेडिओवर बहुजन समाजाला जवळपास संधीच मिळत नव्हती. आकाशवाणी कंेद्रावर त्यावेळी जी. एम. जोशी नावाचे अधिकारी होते. त्यांनी गजानन वाटवेंना पुढं आणलं. पण मला डावललं. पण गुप्तासाहेबांनी जोशींना खडसावले. पुढे अनेक वर्षे मी रेडिओवर गायलो. एचएमव्हीच्या रेकॉìडगचीही अशीच कहाणी आहे. एकदा सत्यनारायणाच्या पूजेत रात्रभर गावं लागलं. आवाज पुरता बसला. बोलता येईनासं झालं. सकाळी एचएमव्हीमध्ये रेकॉìडग होतं. तासभर उशीरा पोहोचलो. बसल्या आवाजात रेकॉìडग होणार नाही म्हणून निश्चिंत बसलो. पण रेकाìडग झालं. गाणं होतं, ’फू बाई फू’..हे गाणं पुढं अतोनात लोकप्रिय झालं..
तुमची लोकगीते तुफान लोकप्रिय झाली. त्याबद्दल सांगा.
उमप - नोकरी करताना मी गायनाचा सुराव सुरूच ठेवला. याच दरम्यान माझ्यावर कव्वाली गायनाचाही प्रभाव पडला. लोकसंगीतात मला तालवाद्यातले अण्णा जोशी यांनी आणले. १९७७ मध्ये त्यांनी ‘महाराष्ट्राचं लोकसंगीत’ असा एक कार्यक्रम केला. त्यात मी ‘फू बाई फू’ हे भारूड सादर करायचो. ते लोकांनी एवढं डोक्यावर घेतलं की, लोक मला या गाण्यानेच ओळखू लागले. अशोक परांजपे यांनी माझ्यातली कला हेरून मला आयएनटीतील लोककला विभागात घेतले. तिथे नानाविध लोकसंगीताचे प्रकार मी लोकांसमोर आणले. एचएमव्ही कंपनीने माझ्या गाण्यांची पहिली रेकॉर्ड १९६१ मध्ये काढली. कोळीगीतांनी मला विशेष लोकप्रियता आणि कोळी समाजाचं प्रेम मिळवून दिलं. ‘महाराष्ट्राची लोककला’ हा एक आगळा कार्यक्रम मी अनेक वर्षे सादर केला. मी आणि माझी मुलं मिळून ‘मी मराठी’ हा मराठमोळा कार्यक्रम सादर करतो.
तुमच्या गाण्यासह तुम्ही आंबेडकरी चळवळीत सामील झालात?
उमप - १९२५-३० नंतर आंबेडकरी चळवळीने जोर धरला. बाबासाहेब आमच्या बीडीडी चाळीतही आले होते. भीमराव कर्डक, कांबळे मास्तर, अडागळे यांनी आंबेडकरी जलशातून मागासवर्गीयांच्या वेदना समाजापुढे प्रभावीपणे मांडण्यास सुरुवात केली. त्यामुळे दलित समाजात जागृती होऊ लागली. मा या जलशांतूनही कामे केली. पण जलशापेक्षा आपण कव्वालीतून हे काम अधिक प्रभावी होईल, असे मला वाटू लागले. आणि या कव्वाली गायनातून दलित जागृतीचे काम मी सुरू केले.
तिथून पुढे तुम्ही आंबेडकरी चळवळीचे शाहीर झालात?
उमप - नाही, मी केवळ आंबेडकरी नव्हे तर सर्वाचा शाहीर झालो. मी कोणत्याही पक्षाला बांधून घेतले नाही. अण्णाभाऊ, अमरशेख डाव्यांकडे झुकले. पण मला कम्युनिस्टांची हुकुमशाही, िहसा मान्य नव्हती. माणसा-माणसांतील तफावत दूर झाली पाहिजे, ही माझी भावना होती आणि आहे. या लोककलेचा वापर मी समाजप्रबोधन, लोकजागृतीसाठी सतत केला. देशात आणि परदेशातही लोककला पोहोचवली.
तुमची लोकगीते लोकप्रिय झाली, तरी लोक तुम्हाला शाहीर म्हणूनच ओळखतात. या शाहिरी कलेविषयी सांगा.
उमप - १९६२मध्ये माझी शाहिरी सुरू झाली आणि ती लोकांना आवडू लागली. शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे माझे शाहिरीतील आदर्श. त्या काळी जणू शाहिरांची फौजच होती. शाहिरांच्या डफाने अंगावर रोमांच उभा केला. जगण्याची उभारी दिली. शाहिरी ही महाराष्ट्राची पारंपरिक कला आहे. या कलेतून अनेकांना स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली. त्याबरोबरच या कलेने महाराष्ट्र धर्मही शिकवला. त्यामुळे ही कला चिरंतन टिकणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र ५० वर्षांचा झाला आहे. पण ना सरकार ना एखादी संघटना या कलेला पुनर्जन्म देण्यासाठी धडपडत आहे. जुन्या नेत्यांना शाहिरीची कदर होती. शाहिरीचा परिचय मुलांना शाळेपासूनच होणे गरजेचे आहे. मराठी टिकवायची तर पहिल्यांदा शाहिरी टिकवायला पाहिजे. शाहिरीला प्रतिष्ठा दिली पाहिजे. सभा, संमेलनामध्ये पहिल्यांदा शाहिराचा डफ कडाडला पाहिजे. स्वातंत्र्यलढयातील शाहिरांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे सवलती द्याव्यात.
तुम्ही ८० वर्षांचे झालात. पण आजही ‘जांभूळ आख्यान’ म्हणजे उमप असे समीकरणच आहे. या लोककलेविषयी सांगा.
उमप - आपल्याकडे समृद्ध लोकसंस्कृती आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने आप्तेष्ट, मित्रमंडळी एकत्र येतात. गोंधळ, जागरणासारख्या कार्यक्रमातून ईशचिंतनासोबतच प्रबोधन व्हावे, रोजच्या जगण्यातील सुख-दु:खावर फुंकर घातली जावी, असा उद्देश असतो. अनेक पौराणिक गोष्टी लोककथेत गुंफून रसाळपणे सादर केल्या जातात. गोंधळ हा प्रकारही त्यातलाच. त्यात गाणं आहे, नाटय आहे. नृत्य आहे. हिंदू धर्मातील अनेक जाती-जमातींमध्ये ही गोंधळ प्रथा आहे. गोंधळ ही अंगणात सादर होणारी कला आहे. देवीपुढच्या दिवटीच्या प्रकाशात हा गोंधळ रात्र रात्र जागवतो. त्यानंतर सुरू होते, आख्यान म्हणजेच एखादे पौराणिक कथानक. जांभूळ आख्यान असेच एक कथानक आहे. गोंधळ महर्षी राजाभाऊ कदम विजेसारखे नाचत हे आख्यान सादर करत. यांच्यानंतर मी ही कला जिवंत ठेवली. आयएनटीच्या लोककला संशोधन विभागाकडून या जांभूळ आख्यानाचे मी अनेक प्रयोग सादर केले. या आख्यानात आत ४६ वारांचा पायघोळ अंगरखा घालून काही वेळा पदर घेऊन, काही वेळा पदर हटवून घुंगराच्या ठेक्यावर मी द्रौपदी साकार करतो. मी या आख्यानात सूत्रधार आणि द्रौपदीची भूमिका करतो. उडी, नृत्य, संवाद, श्रृंगार, टीपेचा सूर असे सर्व काही या जांभुळाख्यानात आहे. हे सारं मी आणि माझे साथीदार कुठलंही नेपथ्य न वापरता सादर करतो.
यामागची सामाजिक भावना काय आहे?
उमप - अहो, लोकमनाचे खेळ मोठे विचित्र असतात. धर्म, न्याय, नीती, सामाजिक संकेत, आणि मानवी स्वभाव यांची अनाकलनीय सांगड लोकपरंपरांनी वारंवार घातली आहे. जगताना माणसाच्या हातून काही नैतिक-अनैतिक गोष्टी घडतच असतात. या गोष्टींना रामायण, महाभारतासारख्या काव्यातील कथांमध्ये रुपांतरित करून एक प्रकारचे भावनांचे विरेचनच लोककलांतून होते. देवादिकांनाही लोभ, माया, मत्सर टाळता आले नाहीत. आपण तर मर्त्य मानव आहोत. अशी समजूत घालून शेवटी आख्यानादी कलांमधून जगण्याचे तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न होतो. शिवाय सामाजिक वास्तवाची किनारही त्याला असतेच. गोंधळी हा समाजव्यवस्थेतील शूद्रातीशूद्र घटकांपैकी एक होता. ते जिणे जगणाऱ्या गोंधळ्याचे सामाजिक उपेक्षा अन् अपमानाचे दु:ख आणि कर्णाचे दु:ख हे एकाच जातीतील. एका दु:खिताने दुसऱ्या दु:खिताची बाजू घेऊन उभे राहणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया. जांभूळ आख्यान हा उपेक्षितांवरील सामाजिक अन्यायाचा भावनिक प्रतिकार आहे. सूत्रधाराला आडवे-तिडवे प्रश्न विचारून वास्तवाचे आणि समकालीनत्वाचे भान साथीदार आणून देतो. ग्रामीण भागात रुजलेला हा कलाप्रकार नागर जनतेपर्यंत पोहचवण्याचा आयएनटीचा हा प्रयत्न म्हणजे समाजमनाचा तळ ढवळून तेथील वेदना पृष्ठभागावर आणण्याचा एक प्रयत्न आहे.
लोककला जपणुकीसाठी काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते?
उमप - वासुदेवाच्या घुंगरांनी जागे होणारे, डफ-ढोलाच्या थापेने हरखून जाणारे मराठी मन हळू हळू इतिहासजमा होत आहे, असे म्हटले जाते. पण सरकारने मदत केली, लोकांनी सहकार्य केले तर ही कला पुढच्या पिढयांपर्यंत जाईल. पण एक खंत माझ्या मनात सतत टोचतेय. ती म्हणजे मराठमोळ्या वस्त्या आज कुठे गायब झाल्या? मराठी माणूस कुठे गेला? त्याचा रांगडा प्रतिसाद कुठे गेला? अस्सल जल्लोष कुठे हरवला? सांस्कृतिक कार्यक्रमांतून एके काळी होणारी संस्कारांची परंपरा कुठे, कशी थांबली? याला जबाबदार कोण? प्रत्येक मराठी माणसानं आत्मचिंतन करून ही उत्तरं शोधावीत..काळाच्या ओघात लोककला, लोकजागरण, लोकसंस्कृती मंदावत चालली आहे, याचं दु:ख मनात दाटून येतं. नवोदित कलाकारांना माझं सांगणं आहे, भरपूर रियाज करा. जे जे चांगलं आहे, ते आत्मसात करत राहा. महाराष्ट्राचं ब्रीद राखा. हिंदुस्थानची अस्मिता जोपासा. रसिकांनी इतर कलांचा आस्वाद घ्यावाच पण आपल्या गानसंस्कृतीला विसरु नये. या लोकसंगीतावरूनच लोकसंस्कृती ओळखता येते.
तुम्हाला आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत..
उमप - होय, पण तुम्हाला खरं सांगू, रसिकांनी दिलेली दाद हाच खरा पुरस्कार आहे. मन्ना डेंनी दिलेली अध्र्या सुराची कबुली, लताबाईंनी ‘फू बाई फू’ला दिलेली दाद, अमर शेखांची, शाहीर शम्स लखनवी साहेबांची मैत्री, दूरदर्शनच्या दिवाकरांचं भारावलेलं पत्र, शोभा गुर्टूनी ‘मी तुमची फॅन आहे’, अशी दाखवलेली आपुलकी, हे माझं खरं संचित आहे. वयाच्या ८०व्या वर्षी मी सारं काही भरून पावलो आहे. रसिक मायबापाकडं आता एकच मागणं आहे,
रसिक मायबापा तुला भेटावं
जाता जाता एवढंच सांगावं
गाता गाता मज मरण यावं
माझं गाणं मरणानंही ऐकावं..
लोककला माझा प्राण आहे. मी जगेन ते मराठमोळ्या लोककलेच्या प्रांतात. आणि मरेनही लोककला सादर करता करता..
'लोकसत्ता'ने छापलेल्या लेखाची लिंक - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=117688:2010-11-26-18-57-22&catid=212:2009-08-18-16-27-53&Itemid=210
No comments:
Post a Comment