'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Saturday 18 December 2010

महाराष्ट्राची थोर कॉपी परंपरा

दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी केलेल्या थेट आरोपाला राज ठाकरेंनी थेट उत्तर दिलं. मुद्दा होता कॉपीचा. मला लिहावं वाटलं. मी 'लोकप्रभा'च्या टोकेकरांना विचारलं. ते म्हणाले वा व्वा रंगराव, पाठवा लगोलग. पाठवला. त्यांनी तो लेख थेट कव्हर स्टोरी म्हणूनच छापला...

दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे म्हणाले, राज माझी कॉपी करतो. तर त्याला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, शिवसेनेनंच पहिली कॉपी केलीय प्रबोधनकार आणि आचार्य अत्र्यांची! त्यामुळं या दोन महाराष्ट्र पुरुषांची मूळ कॉपी काय होती, त्याची ही एक झलक..

शिवाजी पार्क दिनांक - २४ जानेवारी २००९.. प्रचंड जनसमुदायासमोर एका युवा नेत्याचं भाषण सुरू होतं.
‘शिवाजी महाराज की म्हटलं की ज्याच्या तोंडून जय येतो तो मराठी.. शिवरायांचं चरित्र वाचताना किंवा ऐकताना ज्याच्या अंगावर काटा येतो तो मराठी..’
शब्द तडातड उडत होते.. वाणीचा दांडपट्टा लखलखत वाक्यांचे हवेत सपासप तुकडे उडवत होता. थेट काळजात घुसणाऱ्या शब्दांनी मनं रोमांचित होत होती. लाखोंचा समुदाय भारला जात होता.. मुद्दा होता, मराठी स्वाभिमानाचा.. सभा होत राहिल्या, गर्दी वाढत गेली, पण या नव्या पक्षाकडं, त्याच्या युवा नेत्याकडं दुर्लक्ष केलं गेलं. मात्र लोकसभा निवडणुकीत या नवख्या पक्षानं पाणी दाखवलं. बडय़ा पक्षांना दखल घ्यावी लागली. सगळ्यात सावध झाला तो मराठी बाणा जपणारा मूळ पक्ष शिवसेना.. त्यातून बाहेर पडून नवी ललकारी ठोकणारा महाराष्ट्र निर्माण पक्ष आणि त्यांचा नेता राज ठाकरे. विधानसभा निवडणुकीत तब्बल १३ आमदार निवडून आणून या पक्षानं मैदान मारलं. मुद्दा होता मराठीचा. मराठीच्या राजकारणाचा..


सुरुवातीला घराण्याची इभ्रत सांभाळत नावं न घेता उणीदुणी सुरू होती, पण एकेका निवडणुकीनं टीकेची धार वाढत नेली. काहीही झालं तरी बाळासाहेबांना प्रत्त्युत्तर द्यायचं नाही, असं राज ठाकरेंनी मनोमन ठरवलेलं. बाळासाहेबही नात्याची ओल जपून होते पण लढाई हातघाईवरच आली. मराठी मतांच्या ताटात नवा वाटेकरी आल्याची खदखद शिवसेनाप्रमुखांकडून दसरा मेळाव्यात व्यक्त झाली. पुतण्यावर कॉपीबाजीचा शेरा मारला. उद्धवकडं त्यानंच धुरा सोपवल्याचं गुपित जाहीर करून टाकलं आणि अगदी अंगाखांद्यावर खेळवल्याची यादही करून दिली गेली. अखेर राज ठाकरेंनी मुहूर्त निवडला. कल्याण-डोंबिवलीच्या रणदुदुंभी वाजत असतानाच राज ठाकरेंची तोफ कडाडली. कॉपी त्यांनीच केलीय आजोबा प्रबोधनकारांची, आचार्य अत्र्यांची.. आणि यानिमित्तानं मराठी अस्मितेचे निखारे शिलगावणाऱ्या या शिलेदारांची आठवण मराठी मनांमध्ये पुन्हा जागी झाली.. प्रबोधनकारांच्या कोदंडाच्या टणत्काराची आणि मराठाकार अत्र्यांच्या भीमगर्जनेची..

अत्र्यांचे मराठीप्रेम

खडय़ा सुरांनी महाराष्ट्र जागवणारे हे जनतेचे जागले. त्यांच्या वाणीला आणि लेखणीला धार चढली ती, मुंबईसह महाराष्ट्र राज्य मिळवून देणाऱ्या या संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पंचायतनामध्ये ही दोन मोठी जागृत देवस्थानं होती. दोस्ती तर या लढय़ापूर्वीपासूनही घट्ट आणि ती जुळवणारा धागा म्हणजे प्रखर महाराष्ट्रप्रेम.

शिक्षक, नाटककार, सिनेमाकार, कवी, साहित्यिक, पत्रकार अशा विविध भूमिकांमधून प्रसिद्ध पावलेल्या आचार्य अत्र्यांचा मानबिंदू म्हणजे महाराष्ट्र! आणि मराठी माणूस!! भारतात जन्माला येणे दुर्लभ असेल तर महाराष्ट्रात जन्माला येणे दुर्लभतर आहे, असे ते मोठे गर्वाने म्हणत. ज्ञानदेव, नामदेव, तुकोबा, विनोबा आणि गाडगेबाबा यांसारखे ज्ञानी, समतावादी आणि मानवतावादी संत ज्या महाराष्ट्रात जन्माला आले, तेथल्या धुळीचा भाग्यवंत टिळा आपल्या भाळी आहे, या भावनेने अत्रे गहिवरत.

या महाराष्ट्रातील लक्षावधी भोळेभाबडे, अडाणी आणि गरीब प्रापंचिक लोक गेली तीनशे वर्षे तुकारामाची भाषा बोलत आहेत आणि तुकारामाचे तत्त्वज्ञान सांगत आहेत. एवढय़ा साध्या, सुबोध आणि रसाळ भाषेत संसाराचे सार इतके सोपे करून या जगात कुठे कोणी तरी सांगितले असेल काय हो? असा तुकोबांविषयीचा स्वाभिमान त्यांच्या बोलण्यात ओतप्रोत भरलेला असायचा. महाराष्ट्र या नुसत्या नावाचाही त्यांना कोण अभिमान होता. हे नाव शोधून काढणाऱ्या या अनामिकाच्या कल्पनाशक्तीचे त्यांना मोठे कौतुक वाटे. छत्रपती शिवराय हे त्यांचे लाडके दैवत. हिंदवी स्वराज्याची स्थापना जशी शिवरायांनी केली तशी मराठी भाषेची स्थापना सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी केली, असे अत्रे लिहितात. मराठीचा पक्ष हानाही रे वर्गाचा, गोरगरिबांचा, दलितांचा आणि बायाबापडय़ांचा पक्ष आहे, असे ते म्हणत. समाजातील बहुसंख्य लोक जी भाषा बोलतात, जी भाषा बहुसंख्यांना कळते, ती खरी मराठी भाषा असे ते म्हणत.

महाराष्ट्राच्या भूगोलाप्रमाणेच मराठी माणसांची मने ओबडधोबड, खडबडीत बनली आहेत. तथापि मराठय़ांइतके राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्यप्रियता भारतातील इतर कोणत्याही भाषकात नाही. व्यक्तिस्वातंत्र्य मराठी माणसाला प्राणप्रिय आहे. तो साधा, प्रामाणिक, निग्रही आणि करारी स्वभावाचा आहे. त्याच्या स्वाभिमान आणि बाणेदारपणाचा प्रत्यय शिवाजीमहाराजांपासून सीडी देशमुखांपर्यंत अनेक व्यक्तिमत्त्वांमधून पाहायला मिळतो, असे अत्रे म्हणत. महाराष्ट्र म्हटलं, की अत्र्यांच्या अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहत. छाती अभिमानाने भरून येई. महाराष्ट्राची स्तोत्रे गाताना त्यांच्या लेखणीला वेगळाच बहर येई. अशा प्रिय महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर अन्याय झाल्यावर अत्रे गप्प कसे बसणार? मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव लक्षात आल्याबरोबर अत्र्यांच्या लेखणीने रणचंडिकेचं रूप धारण केलं. शिवाजी पार्कवरच्या सभेसाठी जमलेल्या विराट मेळ्यानं अत्र्यांकडं महाराष्ट्रासाठी लढण्याचं लेखणीचं शस्त्र दिलं. लोकांनी दिलेल्या वर्गणीतून अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी गर्जणारं ‘मराठा’ नावाचं दैनिक काढलं. अर्थात त्यांना मदत करण्यासाठी ठामपणे उभे राहिले, त्यांचे परममित्र प्रबोधनकार ठाकरे. त्यांच्या मुलांनी म्हणजेच बाळ ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांनी महाराष्ट्र विरोधकांची रेवडी उडवणारी व्यंगचित्रं अत्र्यांच्या ‘नवयुग’ आणि ‘मराठा’साठी काढून दिली.

एकच ध्येय

वयाच्या साठीत म्हणजे रिटायरमेंटच्या आयुष्यात आराम करण्याचं सोडून हा महारथी संयुक्त महाराष्ट्राच्या मैदानात वाणी आणि लेखणी घेऊन उतरला.
मला आता कशाचीही गोडी वाटेनाशी झाली आहे. द्विभाषिकाचा नाश हा लेखनाचा आणि भाषणाचा एकमेव विषय होऊन बसला आहे. लौकिक कीर्तीचा मला मोह नाही, की दीर्घायुष्याचा लोभ नाही. संयुक्त महाराष्ट्र हे असे एकच ध्येय आहे, की जे मिळवण्यासाठी केवळ जगावे आणि ते मिळवता मिळवता मरावे, असे मला उत्कटतेने वाटते, असे अत्र्यांनी सांगून टाकले होते. त्या वेळी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करताना ते लिहितात, संयुक्त महाराष्ट्र मिळेपर्यंत मराठी माणसाने दुसरा कोणताही विचार करू नये. कवी आणि लेखकांनी आपल्या लेखणीचा उपयोग द्विभाषिकाविरुद्ध प्रचार करण्यासाठी करावा. चित्रकारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या वैभवाची आणि गौरवाची चित्रे रेखाटावीत. प्रत्येक मराठी आईने आपल्या मुलांना संयुक्त महाराष्ट्राचा जयजयकार करण्यास शिकवावे. वकिलांनी महाराष्ट्रविरोधकांचे वकीलपत्र घेऊ नये आणि डॉक्टरांनी या लोकांना औषधपाणीही देऊ नये. क्रोधाचा आणि संतापाचा असा ज्वलंत अंगार एकसारखा प्रज्वलित ठेवल्यावाचून द्विभाषकाची राखरांगोळी होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अत्र्यांची लेखणी अशी मराठी माणसाच्या काळजाला हात घालत होती.

लेखणीचे वैरी

दिल्लीच्या दबावापुढे झुकणारे काँग्रेसचे पुढारी तर त्यांच्या लेखणीचे वैरी बनले होते. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास लिहिताना आपल्या राजकीय बुवाबाजीने तीन कोटी महाराष्ट्रीयांचा विध्वंस करणारा रासपुटीन असाच शंकरराव देवांचा उल्लेख करावा लागेल, असे अत्रे संतापून लिहितात तर त्रिंबकमामा देवगिरीकरांनी आपल्या नालायकीने आणि बेवकूफपणामुळे संयुक्त महाराष्ट्राचा सपशेल विश्वासघात केला आहे. पेशवाईचे वाटोळे करण्याच्या कामी त्रिंबकजी डेंगळ्यांनी जी कामगिरी केली तीच या त्रिंबकजी ऊर्फ शकुनीमामाने केली आहे. असे अत्रे त्यांच्यावर कोरडे ओढतात. धूर्त काँग्रेसवाल्यांचा कावा, सदोबा कोळसे पाटील, या महाराष्ट्रशत्रूंच्या वाऱ्यालाही उभे राहू नका, यशवंतरावांच्या वल्गना, शंकरराव देवांनी धर्मातर केले, अशा लेखांमधून या पुढाऱ्यांचा त्यांनी धुव्वा उडवला.

निरपराध्यांवर गोळीबार करणाऱ्या मोरारजींना ‘नवयुग’च्या विशेषांकात त्यांनी जनतेचा कसाई मोरारजी देसाई, असे नाव दिले. ते देसाईंना नरराक्षस मोरारजी म्हणत.
ज्यांच्याबद्दल आदर वाटे, त्या व्यक्तींनी संयुक्त महाराष्ट्राला विरोध करताच अत्रे त्यांच्यावरही तुटून पडले. मग विनोबांचे वानरोबा झाले. पंतप्रधान नेहरू कपटी आणि ढोंगी झाले. काका गाडगीळ हरामखोर तर भाऊसाहेब हिरे नकली हिरे ठरले.

स. का. पाटील हा तर त्यांच्या लेखणीचा शत्रूच. एका सभेत यावश्चंद्र दिवाकरौ म्हणजेच चंद्र, सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, अशी गर्जना स. का. पाटलांनी केली. त्याला उत्तर देताना अत्रे म्हणाले, जसे काही चंद्र-सूर्य यांच्या बापाचे नोकर. जणू काही सूर्य आणि चंद्र यांची थुंकी झेलणारे आणि जोडे पुसणारे केशव बोरकर आणि रामा हर्डीकर..
संयुक्त महाराष्ट्राचा जो शत्रू तो आमचा शत्रू. त्यांच्याबद्दल एक चांगला शब्द आम्ही कधी चांगला लिहिणार नाही. आम्ही त्यांचे वाभाडे काढू. हा आमचा मराठी बाणा आहे. आम्ही सध्या लढतो आहोत. ही लढाई संपली म्हणजे बाकीचे सगळे नखरे. महाराष्ट्राच्या भवानीमातेला तोपर्यंत आमची एवढीच प्रार्थना आहे की, सिंहगडच्या कडय़ाला चिकटून बसणाऱ्या यशवंती घोरपडीची वज्रशक्ती अन् शत्रूला विदारण करणाऱ्या शिवरायांच्या वाघनखांची धार तिने आम्हाला नि आमच्या लेखणीला द्यावी, बस्स!
भवानीमाता जणू अत्र्यांच्या लेखणीवर प्रसन्न झाली. त्यामुळेच जणू अमानुष अत्याचाराने संतप्त झालेल्या तीन कोटी जनतेला वाघनखे फुटतील आणि द्विभाषिकाचा कोथळा बाहेर काढला जाईल, अशी धार-धार भाषा अत्रे लिहू लागले.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलकांना गोळ्या घालणाऱ्यांचे हात महारोग होऊन झडोत, त्यांना रक्तपिती होऊन मरण येवो, असे अत्रे तळतळून लिहितात. ही भाषा बरी नव्हे, असे त्यांना ज्यांनी सांगितले त्याला उत्तर देताना अत्रे म्हणाले, हे शिव्याशाप माझे नाहीत. ज्यांची कर्ती मुले गोळीबारात मरण पावली, त्यांच्या माता-पित्यांनी दिलेले हे शिव्याशाप आहेत.

आमचे नाव महाराष्ट्रच

संयुक्त महाराष्ट्राचा ठराव पास झाला, पण त्याचे नाव महाराष्ट्र ठेवणार नाहीत म्हटल्यावर अत्रे पुन्हा उसळून उठले. म्हणाले, आम्ही त्यांना कडाडून सांगतो, महाराष्ट्र या नावात ब्रह्मांड भरलेले आहे. या नावासाठी मराठी जनता आकाशपाताळ एक करील. मराठी राज्याचे नाव महाराष्ट्र नसेल तर मराठी माणसांना जगता येणार नाही, नव्हे श्वासही घेता येणार नाही.

अत्र्यांप्रमाणेच प्रबोधनकारांची मुलुखमैदान तोफ संयुक्त महाराष्ट्राच्या रणकंदनात गर्जत होती. शिवाजी पार्कवरच्या एका सभेत प्रबोधनकार म्हणाले, काँग्रेसच्या पेटीत काय आहे? या पेटीत जागोजागी शिवरायांची बदनामी, भगिनींच्या कुंकवाचे सारवण, पिचलेल्या बांगडय़ा, एकशे पाच भावांचे रक्त आहे, तिथे तुम्ही आपले मत द्याल काय?
प्रबोधनकारांची थेट ठाकरी भाषा अशा पद्धतीने गर्जत होती. खरे तर प्रबोधनकार अत्र्यांना ज्येष्ठ. सामाजिक सुधारणांच्या आघाडीवर लढणाऱ्या या लोकनेत्याने केवळ मराठीच्या प्रेमाखातर संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात उडी ठोकली. त्याबाबत अत्रे म्हणतात, लोकहितवादी, महात्मा फुले, आगरकर यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला जागृत करण्याचे जे महान कार्य सतत दोन तप ठाकरे यांनी केले, ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात त्यांनी बजावलेल्या अविस्मरणीय कामगिरीने खचित सार्थकी लागले आहे.

अस्वस्थ प्रबोधनकार

अखेर संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला. १ मे १९६० रोजी पंडित नेहरूंनी महाराष्ट्र राज्याची घोषणा केली. प्रबोधनकार, अत्रे या तोफा थंडावल्या पण प्रबोधनकारांमधील सुधारक थंड बसणे शक्य नव्हते. मराठी माणसाची होत असलेली पीछेहाट त्यांना पाहवत नव्हती.
महाराष्ट्र हे मराठी माणसांचं राज्य आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, परंतु मुंबईत मराठी माणूस अपमानाचं जिणं जगत होता. १९६१च्या शिरगणतीनुसार मुंबईतला मराठी टक्का कमी झाला होता. शहरात बिगरमराठी लोकांचं प्रमाण ५७ टक्क्यांहून अधिक झालं होतं. हा अ-मराठी टक्का सरकारी नोकऱ्यांवर खुलेआम डल्ला मारत होता. यात दाक्षिणात्य मंडळी आघाडीवर होती. तत्कालीन काँग्रेस पुढाऱ्यांना मुंबईची आणि मुंबईतल्या मराठी माणसांची पर्वा नव्हती. या नेते मंडळींचं सगळं राजकारण ग्रामीण महाराष्ट्रात रुजलं होतं, फोफावलं होतं. मराठी मन अस्वस्थ होतं. मराठी माणसाची हीच नस प्रबोधनकार आणि त्यांच्या चिरंजीवांनी हेरली. त्यासाठी माध्यमाची गरज भासू लागली. अत्र्यांच्या ‘मराठा’चं उदाहरण समोर होतंच आणि १३ ऑगस्ट १९६०ला ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू झालं.

त्या वेळच्या परिस्थितीविषयी शाहीर अमरशेख म्हणत..

मारवाडी गुजराती खनुखनु काढलं
साऱ्या म्हराटय़ात भगदाड पाडलं
ह्याच घुशीमागं गोरंबी दडलं
मराठय़ाच्या पोरा उभा राहा मर्दा
उडवाया खुर्दा पुरारं..

परप्रांतीयांवर तोफ

अशा पद्धतीनं कातावलेल्या मराठी माणसाच्या संतापाला ‘मार्मिक’मुळं एक धार चढली.
केंद्र सरकारच्या ऑफिसातील अमराठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी (खास करून दाक्षिणात्यांची) दर आठवडय़ाला प्रसिद्ध होऊ लागली.
अर्थात या सगळ्यामागे प्रबोधनकारांचे विचार होते.
७०च्या दशकात प्रबोधनकार ‘मार्मिक’मधून लिहित होते, आमच्या राज्यात परकीय उपऱ्यांना आव जाव मकान तुम्हाराचे सुस्वागतम आणि खास संरक्षण. त्यांनी मन मानेल तिथे स्मगलिंग, दारूचे पीठे, कुंटणखाने चालवावेत, गुंडगिरी करावी, पाण्याचे हायड्रंड उघडून लाखो गॅलन पाणी बर्बाद करावे, हत्तीच्या अंगाएवढय़ा नळांनाही भोके पाडून पाणी वापरावे, ना आमचे सरकार, ना पोलीस, ना ती म्युनिसिपल कापरेरेशन कोण्णी कोण्णी त्या उपऱ्या या समाजविध्वंसक खटाटोपांना अडवायला समर्थ. परप्रांतीयांविरुद्ध महाराष्ट्र सरकारची करंगळीही चुकून हलायची नाही..

इतर राज्यांतल्या लोकांनीच अवघा महाराष्ट्र व्यापून महाराष्ट्रातल्या अन्न, अस्तर, आसऱ्याला महाग करून स्वदेशातल्या स्वदेशात उपरे नि परके बनवले आहे..
सगळ्या राज्यांतून आणि प्रामुख्याने मद्रास, आंध्र नि केरळातून उपऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी टोळधाडीसारख्या मुंबई नि महाराष्ट्रभर लोटल्या आहेत. रोज शेकडय़ांनी लोटत आहेत..
हे सारे थांबवायचे असेल तर वैयक्तिक, कौटुंबिक, जातीय, ग्रामीण यच्चयावत सर्व भेदांवर निखारे ठेवून अभेद्य एकवटीचा श्रीगणेशा काढला पाहिजे. महाराष्ट्रधर्म म्हणजे महाराष्ट्रालाच परमेश्वर मानून त्यांच्या आत्यंतिक भक्ती-पूजनासाठी मराठा तितुका मेळवावा ही समर्थाची हाक आहे.. प्रबोधनकारांच्या विचारातूच १९ जून १९६६ रोजी शिवसेनेनं जन्म घेतला.

शिवसेनेचा जन्म

शिवसेनेच्या जन्माचं भाकीत अत्रेंनी अगोदरच केले होते.
जन्मभर महाराष्ट्रावर जाज्वल्य प्रेम करणाऱ्या या माणसाला मराठी जनतेच्या हितासाठी ‘शुद्ध महाराष्ट्रीय पक्ष’ स्थापन करावयाचा होता, असे त्यांनी प्रबोधनकारांविषयी सांगितले होते. प्रबोधनकारांच्या या इच्छेतूनच शिवसेनेचा जन्म झाला.
पण अत्र्यांनी मात्र शिवसेनेला विरोध केला. कारण शिवसेनेचे धोरण, हिंसात्मक कार्यक्रम अत्र्यांना मान्य नव्हते. त्यामुळे अत्रे विरुद्ध शिवसेना अशी मार्मिक आणि मराठातून परस्परांवर मोठी चिखलफेक झाली. १९६७ साली मुंबईतून लढवलेली लोकसभेची निवडणूक अत्रे चार ते पाच हजार मतांनी हरले आणि त्यासाठी शिवसेनेनंच कंबर कसली होती.
पण त्यानंतर दिलजमाईचे प्रयत्न झाले. शिवाजी पार्कवरच्या ३० ऑॅक्टोबर १९६६ रोजी झालेल्या पहिल्या विराट मेळाव्यात आम्ही त्यांना ‘आपण या नवसंघटनेच्या धुरेवर येऊन उभे राहा’ असे जाहीर आवाहन केले. शिवसेनेच्या सुरुवातीच्या प्रत्येक मेळाव्यात आम्ही या आवाहनाचा पुनरुच्चार केला, असे मार्मिककार म्हणतात. पण अत्रे गेले नाहीत. तसे झाले असते तर अत्रे कदाचित पहिले शिवसेनाप्रमुख झाले असते..

वाणी, लेखणीचं प्रतिबिंब

प्रबोधनकारांसोबतच अत्र्यांच्या वाणीचा आणि लेखणीचे प्रतिबिंब बाळासाहेबांच्या भाषणात आणि मार्मिक आणि सामनाच्या लेखणीत पडलेले दिसते.
मार्मिक किंवा सामनाचे मथळे पाहिले तरी अत्र्यांच्या लेखाचे मथळे आठवतात. ऊठ मराठय़ा ऊठ, भोपाळचा भोपळा, स्वातंत्र्याचे पानशेत, पाचोऱ्याची पाचर, मुंदडा समितीचा मुडदा, माशा मारा सप्ताह, चंद्र कम्युनिस्ट झाला ही मराठय़ाच्या मथळ्यांची काही उदाहरणे.
तर महामूर्ख, हरामखोर, नराधम, गाढव, म्हसोबा, जमालगोटा, शेंदूर फासलेले वरवंटे, करवंटय़ा हे अत्रे आणि ठाकरेंच्या सर्रास वापरातील शव्द.

राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेमध्ये विलक्षण साम्य आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे सध्याची पिढी अगोदरच्या पिढीची कॉपी करते, हे ऐतिहासिक सत्य.
तशा अर्थाने अत्रे, प्रबोधनकारांनीही कॉपीच केली होती. शब्दांचे शस्त्र वापरून लढायचे ही कॉपी अर्थात परंपरा अत्र्यांनी लोकमान्य टिळक आणि शि. म. परांजपे यांच्याकडून घेतली.
तसेच आपले गुरू राम गणेश गडकरी आणि अच्युतराव कोल्हटकरांची खुसखुशीत भाषाशैली त्यांनी प्रभावी भाषणांसाठी वापरली.

तर समाजसुधारणेचे बंड उभारणाऱ्या महात्मा जोतिराव फुल्यांच्या रांगडय़ा भाषेचा थेट वसा प्रबोधनकारांनी घेतलेला. त्यामुळे या दोघा महाराष्ट्र पुरुषांची भाषा म्हणजे गोफणगुंडय़ातून सणसणत सुटणारे गोटे. पण हे गोफणगुंडे महाराष्ट्रविरोधकांचा, मराठी विरोधकांचा वेध घेत होते.
पण दुर्दैव म्हणजे हेच मराठीप्रेमाचे गोफणगुंडे आता मराठीचे राखणदार एकमेकांवरच भिरकावू लागले आहेत. पण यामुळं मराठी मनं हुळहुळत आणि हळहळत असणार यात शंका नाही!

लोकप्रभातील लेखाची लिंक - http://www.loksatta.com/lokprabha/20101119/copy.htm

No comments:

Post a Comment