'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Monday 20 December 2010

बहुजनांचे कैवारी ठाकरे आणि अत्रे...

माझा द्रष्टा मित्र सचिन परब प्रबोधनकार ठाकरेंची वेबसाईट बनवत होता. मला म्हणाला, पत्रकार आचार्य अत्रेंवर पीएच. डी. केली आहेस ना, मग दे एक लेख लिहून. अत्रे आणि ठाकरेंवर. म्हटलं, आनंदानं! त्याप्रमाणं लेख लिहिला. त्यानं तो छापला...महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव साजरा होत आहे. हुतात्म्यांचे स्मरण केले जात आहे.
समारंभ, सत्काराचे कार्यक्रम होत आहेत. महाराष्ट्र संस्कृतीचे गोडवे गायले जात
आहेत. आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाचे आकडे सादर केले जात आहेत...सगळीकडं
असा उत्सव सुरू असताना एका बाबीकडं मात्र दुर्लक्ष होत आहे. केले जात आहे. ती
बाब म्हणजे महाराष्ट्राचा पुरोगामीपणा, सामाजिक न्यायाचा, सुधारणांचा वारसा. त्याची आठवणही कोणाला होताना दिसत नाही. नेत्यांनी ती दिली, तरी जनतेला त्यांचा भरोसा वाटणार नाही. राजकारणाचा धंदा थाटणार्‍या मंडळींपैकी आता कुणीही आपला कैवार घेणार नाही, याची लोकांना पक्की खात्री झालेली आहे.
अशा वेळी काही वर्षांपूर्वी मराठी मनांवर राज्य करणार्‍या दोघा शिलेदारांची,
रयतेच्या कैवार्‍यांची महाराष्ट्रातील जनतेला तीव्र आठवण येत आहे. अत्रे आणि
ठाकरे!...महाराष्ट्राच्या समाजजीवनातील दोन जागले... त्यांच्या कार्याविषयी,
मैत्रीविषयी अनेक चर्चा, किस्से, वाद, अफवा प्रत्येक मराठी माणसाने ऐकलेल्या
असतात. पण सर्वच लोकोत्तर पुरुषांचे दुदैर्व त्यांच्याही वाट्याला आले. ते
म्हणजे त्यांचे खरे विचार बाजूला पडले...ठाकरे फोटोपुरते आणि अत्रे विनोदापुरते
उरले.

समाजजीवनातील जागले

पण बारीक चणीचे प्रबोधनकार ठाकरे आणि अगडबंब देहाचे आचार्य अत्रे यांनी 50
वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठा धूमधडाका उडवून दिला होता.
हा धडाका होता, मुंबईसह महाराष्ट्राच्या चळवळीचा. त्यासाठीच्या जनजागृतीचा. आणि
महाराष्ट्राला विरोध करणार्‍यांना चेपून काढणार्‍या प्रबोधनकार आणि
अत्र्यांच्या लेखनी अन् वाणीच्या टणत्काराचा.

खरं तर समाजसुधारणेचा हा टणत्कार दोन दशकं आधीच घुमू लागला होता,
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत, समाजसुधारकांच्या माहेरघरात, पुण्यात.
स्त्री, शूद्र, उपेक्षित, बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा
जोतिराव फुल्यांच्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीची धुरा नंतरच्या काळात सांभाळली
ती छत्रपती शाहू महाराजांनी. या चळवळीच्या प्रचार, प्रसारात त्यांच्या मदतीला
धावले, ते कडवे समाजसुधारक, पत्रकार केशव सीताराम ठाकरे. या चळवळीच्या
प्रचारासाठीच त्यांनी सुरू केलेल्या प्रबोधन नावाच्या नियतकालिकानं आणि
त्यातल्या ठाकरी भाषेनं महाराष्ट्रातील जनतेवर गारूड केलं. आणि ठाकरे
'प्रबोधनकार' झाले...अर्थात सुरुवात झाली, ती जोतिरावांच्याच पुण्यातून.

जेधे, जवळकरांच्या सोबतीने सत्यशोधक चळवळीत व्यग्र असणार्‍या ठाकरेंचं लक्ष एका
खुडबुड्या, विद्वान पण व्रात्य तरुणाकडं गेलं. परिचय झाला. स्नेह वाढीला लागला.
त्याचं नाव, प्रल्हाद केशव अत्रे. अत्र्यांसाठी प्रबोधनकार म्हणजे जणू ज्येष्ठ
गुरुबंधू. ठाकरे जोतिरावांच्या विचारांचा प्रसार करत असताना अत्रे फुल्यांच्या
कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत बहुजन मुलांना शिकवत होते.
शूद्रातीशूद्रांचे मानसिक दास्य शिक्षणाने नष्ट करण्याची महात्मा फुल्यांची
प्रतिज्ञा होती. त्या शैक्षणिक कार्यात माझी उमेदीची वर्षे गेली. त्यांची सेवा
माझ्या हातून घडली, असे समाधान अत्र्यांना त्या नोकरीत गवसले होते.

जगण्यातील साम्य

पुढे एकमेकांचे जीवाभावाचे दोस्त बनलेल्या अत्रे-ठाकरेंना समाजसेवेचा वारसा
मिळाला होता, तो त्यांच्या घरातूनच. योगायोग म्हणजे या दोघांच्याही आयुष्यातील
घटना-घडामोडींमध्ये विलक्षण साम्य आहे. ठाकरेंच्या आयुष्यावर लहानपणीच मोठा
प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणजे त्यांची आजी, बय. जात-पात, धर्माच्या पलिकडं
जाऊन बयनं आयुष्यभर सुईणीचं काम केलं. लहानग्या केशवच्या अंगावर महाराची सावली
पडून तो विटाळला, असा गिल्ला करणार्‍या ब्राम्हण मुलाला, मग ब्राम्हणाची सावली
पडल्याने दादाही ब्राम्हण झाला, असे बयने ऐकवले होते. जन्मभर जातपात, हुंड्याला
विरोध करणार्‍या प्रबोधनकारांची प्रेरणा ही बयच होती.

अंगापिंडानं धिप्पाड असलेल्या अत्र्यांच्या निरूकाकी म्हणजेच आजीशिवाय
सासवडमधील पान हलत नसे. पापड-कुरड्या घालण्यापासून ते अडलेल्या बायकांना
सोडवण्यापर्यंत सगळ्या जबाबदार्‍या निरूकाकी समर्थपणे सांभाळी. सर्व धार्मिक
कार्ये, सणवारांमध्ये तिचा पुढाकार असे. पण त्यात कुठेही कर्मठपणा नसे.
तिच्यातील या सर्व गुणांचा वारसा माझ्याकडे आला, असे अत्रे नमूद करतात.

आयुष्यभर नाना उद्योग करणारे प्रबोधनकार ठाकरे समाजसुधारक, धर्मसुधारक, शिक्षक,
पत्रकार, लेखक, प्रकाशक, अनुवादक, नाटककार, इतिहासकार, वक्ते, नेते,
फोटोग्राफर, अभिनेते, चित्रपटकथा संवादलेखक, चित्रकार, संगीततज्ज्ञ म्हणूनही
नावारुपाला आले. तर शिक्षक, नाटककार, सिनेमाकार, कवी, साहित्यिक, विडंबनकार,
समीक्षक, समाजकारणी, राजकारणी, पत्रकार म्हणून अत्र्यांनी ही सगळी क्षेत्रे
गाजवून सोडली.

सुरुवातीला पुण्यात ब्राम्हण्याभिमानी हिंदुत्वनिष्ठांच्या छावणीत असलेले अत्रे
नकळत प्रबोधनकारांच्या सोबत सामाजिक समता आणि न्यायाच्या ब्राम्हणेतर चळवळीच्या
तंबूत दाखल झाले.


बायाबापड्यांचा पक्ष

'मराठीचा पक्ष हा सामान्यांचा, बायाबापड्यांचा, स्त्री, शूद्रांचा अतएव सकल
जनतेचा पक्ष आहे. हा द. वा. पोतदारांचा विचार त्यांनी मन:पूर्वक स्वीकारला.
आपल्या साहित्यात बहुजन हा शब्द अत्रे सातत्याने वापरतात. मराठी भाषेच्या
सोपेपणाविषयी बोलताना ते म्हणतात, बहुजन समाजाला जी भाषा समजते, तीच खरी शुद्ध
मराठी भाषा. राजर्षी शाहू पुष्कळदा मुद्दाम शेतकर्‍याची भाषा वापरत असत आणि
शेतकर्‍यासारखे उच्चार करत असत. ते त्यांचे बोलणे कानाला फारच गोड लागे.
शेतकर्‍यांच्या भाषेला कुणबी म्हणून हिणवणे बरे नाही. 'लई' म्हणण्यात काही
'वंगाळ' नाही.


अत्र्यांच्या भाषेबाबत बोलताना प्रबोधनकार म्हणतात, त्यांची वाणी नि लेखणी
शुद्ध बाळबोध मराठमोळी धाटणीची आहे. मनातली मळमळ नि खळबळ सामान्य लोकांच्या
भाषेत मांडण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. अत्र्यांची व्याख्याने
ऐकणार्‍यांच्या काळजाचा ठाव घेतात. अत्र्यांची बाळबोध भाषा लोकभाषाच असल्याने
त्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक कोटी, प्रत्येक इशारा नि प्रत्येक धमकी
श्रोत्यांच्या कानात सारखी घुमत, गुणगुणत जाते आणि प्रत्येकाच्या जीभेवर त्याचे
साद-पडसाद घरीदारी उमटत राहतात.

मराठी माणसाच्या हृदयाशी संवाद साधणारी हीच भाषा प्रबोधनकारही बोलत असत, हे
सांगताना अत्रे ठाकरेंच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मराठात लिहितात, कोणाचीही
भीडभाड न धरता मनात येईल ते रोख-ठोकपणे बोलायचे किंवा लिहावयाचे. मग जगाने काय
वाटेल तो शंख केला तरी त्याची पर्वा करायची नाही, हा त्यांचा खाक्या.

त्यांच्या प्रत्येक शब्दावर आणि वाक्यावर त्यांच्या तडफदार आणि बाणेदार लढाऊ
व्यक्तिमत्वाचा ठणठणीत आणि खणखणीत ठसा उमटलेला दिसून येतो. तमाशातले कडे जसे
खणाण खणाण कडकडते तसा त्यांचा वक्तृत्वाला एक प्रकारचा विलक्षण नाद आहे.

परस्परांच्या साहित्यिक गुणांची पुरेपूर ओळख असणार्‍या या दोघांचा साहित्यक
गोतावळाही मोठा होता. अत्र्यांच्या निसर्गरम्य खंडाळ्याच्या बंगल्यात झालेली
दोन साहित्य संमेलने आणि त्यात प्रबोधनकारांनी आपल्या विनोदी काव्यगायनाने
साहित्यिकांच्या हसून हसून वळवलेल्या मुरकुंडीचे अत्र्यांनी मोठे बहारदार वर्णन
केले आहे.


जाण आणि भान

हे सारे करत असताना आपल्याला काय करायचे आहे, याचे त्यांना नेमके भान होते.
सामाजिक सुधारणेसाठी दोघांनीही आपली प्रतिभा कल्पकतेने आणि कौशल्याने वापरली.
दलितांच्या मंदिर प्रवेशासाठी प्राण पणाला लावणार्‍या सानेगुरुजींवरचा सिनेमा
असो किंवा स्त्री शूद्रांना जगण्याचे भान देणारा महात्मा फुलेंवरचा सिनेमा,
अत्र्यांना प्रबोधनकारांनी मनापासून मदत केली. सिनेमांसाठी संदर्भग्रंथ
पुरवण्यापासून तर अगदी सिनेमांत भूमिका करण्यापर्यंत तनमनाने प्रबोधनकार
अत्र्यांच्या सिनेमा उद्योगात सहभागी झाले. श्यामची आई सिनेमात वृद्ध दलित
महिलेच्या डोक्यावर मोळी उचलून देणार्‍या श्यामला रागावणारा देवळातला
शास्त्रीबुवा असो किंवा महात्मा फुले सिनेमातला कर्मठ ब्राम्हण, प्रबोधनकारांनी
आपली वास्तवातली भूमिका सिनेमातही त्याच दणक्यात साकारली.

मुंबईतील 'लोकमान्य'चे संपादक पा. वा. गाडगीळ (हेच गाडगीळ पुढे अत्र्यांच्या
'नवयुग'चे सहसंपादक झाले) यांनी महात्मा फुले सिनेमावर एक लेख लिहिला. त्यात ते
म्हणतात, 'ब्राम्हणांना ओरखडे काढण्याची एकही संधी वाया जाऊ द्यायची नाही, हा
केशवरावांचा खट्याळ स्वभाव त्यांच्या वयाच्या पासष्टीतही ताजातवाना आहे.
संतश्रेष्ठ गाडगेमहाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, श्री. केशव ठाकरे यांसारख्या
थोर विचारवंत आणि प्रचारक व्यक्तींना पडद्यावर आणून अत्रे यांनी या चित्रपटात
आपला मुख्य हेतू करमणुकीबरोबरच समाजसुधारणाप्रचार आहे, हे सिद्ध केले आहे.'

समाजप्रबोधन डोळ्यापुढं ठेवूनच प्रबोधनकारांनी 24व्या वर्षी संगीत सीताशुद्धी
नाटक लिहिलं. संगीत विधिनिषेध, काळाचा काळ, टाकलेलं पोर आणि खरा ब्राम्हण या
त्यांच्या नाटकांनी समाजजागृतीचं मोठं काम केलं. हीच परंपरा अत्र्यांनीही
त्यांच्या नाटकांतून जपलेली दिसते. अत्र्यांच्या नाटकांतील तेजस्वी नायिकांनी
स्त्रीमुक्तीचा गजर केला. घराबाहेर, जग काय म्हणेल, उद्याचा संसार या नाटकांतून
स्त्रीची तीन उत्क्रांत रुपे मी हेतूपुरस्सर मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असे
अत्रे स्वत:च म्हणतात. अत्र्यांच्या त्यानंतरच्या 20हून अधिक नाटकांनी मराठी
रंगभूमीला एक नवी दिशा दिली. समाजाचे सर्व स्तर पाहिलेल्या अत्र्यांनी नाटक
अभिजनांच्या दिवाणखान्यातून बाहेर काढून बहुजनांच्या अंगणात आणले.


पुण्यात उडवली धमाल

सातार्‍यातून पुण्यात राहायला आलेल्या प्रबोधनकारांनी संस्कृतीरक्षकांच्या
पुण्यात अगदीच धमाल उडवून दिली.
प्रबोधन नियतकालिकासाठी त्यांनी बुधवारात निंबकरांचा छापखाना चालवायला घेतला.
तिथे त्यांनी प्रबोधनचे एक दोन अंक प्रकाशित केले. दीडेक महिन्यांनी
'ब्राम्हणेतर चळवळीतील एक नाठाळ-लेखक नि वक्ते ठाकरे हे पुण्यासारख्या
सोवळ्यांच्या नगरात येऊन प्रकाशनाचे ठाण मांडतात, म्हणजे काय?' असा सवाल
सनातन्यांनी उपस्थित केला. आणि चक्क प्रबोधनकारांच्या छापखान्याची जाळपोळ
करण्यात आली.
पण मग काढीन तर पुण्यातच प्रबोधन काढीन, असा असा निर्धार आणि संकल्प
प्रबोधनकारांनी केला. मुंबईवरून छापखान्याचे साहित्य ते पुण्यात पाठवत.
पुण्यातून, सदाशिव पेठेतून प्रबोधनचा चौथा अंक बाहेर पडला. आणि पुणेरी
शहाण्यांचा तीळपापड झाला.

मग प्रबोधनचे वितरणच होऊ न देण्याची खेळी खेळण्यात आली. प्रबोधनकारांच्या
छापखान्यातून बाहेर पडणारा लोकहितवादी अथवा कोणतेही पत्रक पुण्यातील धंदेवाईक
तरुणांनी विकण्यासाठी घेतल्यास त्यांना केसरी, ज्ञानप्रकाश वगैरे दैनिके,
साप्ताहिके मिळणार नाहीत, असा डाव एजंटांनी सुरू केला.
पुण्यातील या जातीयवादी राजकारणाला प्रबोधनकार कंटाळले. प्रबोधन छापखाना बंद
करून त्यांनी पुण्याला राम राम ठोकला. आणि आपल्या पूर्वीच्याच दादरच्या मिरांडा
चाळीत परतले. पण पुण्यातल्या वास्तव्यात त्यांनी मारलेल्या ब्राम्हणेतर
चळवळीच्या मुसंडीला तोड नव्हती.

त्यांनी सत्यशोधक चळवळ थेट टिळकवाड्यात नेली. लोकमान्य टिळकांचे सुपुत्र
श्रीधरपंत आणि रामभाऊ गायकवाड यांनी प्रबोधनकारांच्या प्रेरणेने केसरी
वाड्यातील गणपतीत अस्पृश्यांचे मेळे नेले. एवढेच नव्हे तर तिथे समता सैनिक
संघाची स्थापना झाली. जातिभेद मोडून एकत्र पंगती मांडल्या गेल्या.


प्रबोधनकारांच्या पावलावर पाऊल

प्रबोधनकारांचा हा वसा मग अत्र्यांनी उचलला. 1925मध्ये पुण्याच्या बुधवार चौकात
महात्मा फुले यांचा पुतळा 20 हजार रुपये खर्च करून बसवावा, असा ठराव श्री.
केशवराव जेधे यांनी पालिकेत मांडला. पण तो नापास झाला. यावेळी फुल्यांचा उद्धार
करण्याचा कळस गाठला गेला. त्यावर प्रबोधनकारांनी 7 सप्टेंबर 1925च्या
प्रबोधनच्या अंकात 'पुतळ्याचा प्लेग' या शीर्षकाखाली अग्रलेख लिहिला.

हा सगळा घटनाक्रम अत्र्यांच्या लक्षात होता. 1938मध्ये अत्रे म्युनिसिपल
काँग्रेसचे नेते म्हणून निवडून गेले. तेव्हा फुल्यांचे स्मारक ताबडतोब करून
टाकायचे त्यांनी ठरवले.
1886मध्ये पुण्यातील जुनी मंडई मोडून रे मार्केटची इमारत बांधण्यात आली.
फुल्यांचा या रे मार्केटला पहिल्यापासून विरोध होता. या इमारतीच्या पैशांचा
विनियोग नगरपालिकेने सक्तीचे शिक्षण देण्याकरता करावा, असे त्यांचे म्हणणे
होते. हा इतिहास लक्षात ठेऊन अत्र्यांनी रे मार्केटचे नाव महात्मा फुले मार्केट
असे नगरपालिकेत मंजूर करून घेतले. भांबुर्ड्याचे नाव शिवाजीनगर ठेवण्याचे कामही
अत्र्यांनीच केले.

वयाच्या तेराव्या वर्षी अत्रे सासवडहून पुण्यात राहायला आले. ब्राम्हण
कुटुंबातील अत्र्यांना सांस्कृतिक पुण्याने घडवले. पुढे महात्मा फुल्यांच्या व
बहुजन समाजाच्या पूर्वेकडील पुण्यात कॅम्पातील शाळेत अत्र्यांनी 18 वर्षे
शिकवले. समाजातील सर्व स्तरांतील माणसांचा अत्र्यांच्या कॅम्पातील घरी राबता
असे. त्यांच्या घरी दिवाळीप्रमाणे ईद, नाताळचे सण साजरे होत.
अत्र्यांनी हे पूर्वेकडचे पुणे पाहिले होते. जगून दाखवले होते. आणि त्यांचे हे
जीवन सदाशिवपेठी नव्हे तर गंजपेठी होते.

अत्र्यांना घडवणार्‍या पुण्यावर अत्र्यांचे उत्कट प्रेम होते. या पुण्यात
अत्र्यांचे नवयुग वृत्तपत्र लोकप्रिय झाले. पण लोकप्रियतेचे 'घी'देणार्‍या या
पुण्यातच त्यांना मनस्तापाचा 'बडगा'अनुभवायला मिळाला. नवयुगमधील लिखाणावरून
त्यांनी अनेक वाद, खटले आणि मारामार्‍या ओढवून घेतल्या. पुढे नवयुगमधीलच
अत्र्यांनी एक आणि प्रबोधनकारांनी लिहिलेल्या एका लेखामुळे अत्र्यांना मुंबई
सरकारकडे सहा हजारांचा जामीन भरावा लागला. नवयुगातले हे लिखाण जातीजातींमधील
वैमनस्य वाढवणारे आणि हिंसेला प्रेरणा देणारे आहे, असा आरोप अत्र्यांवर
ठेवण्यात आला. ज्या नवयुग चित्रपट कंपनीच्या प्रचारासाठी अत्र्यांनी नवयुग
काढला, मतभेदामुळे अत्रे त्या कंपनीतून बाहेर पडले. दरम्यान काँग्रेस
पक्षातर्फे महापालिकेच्या राजकारणात पडलेल्या अत्र्यांनी स्वपक्षाच्या गद्दारी
करणार्‍या 15 हरामखोरांवर लेख लिहिला आणि बदनामीकारक खटला ओढवून घेतला. अखेर या
पुणेरी भामटेगिरीला ते कंटाळले आणि त्यांनी मुंबईला प्रस्थान ठेवले. हा 1940
सालचा जुलै महिना होता. प्रबोधनकारही मुंबईत परतले होते.
नियतीला बहुदा या दोघांची ताटातूट होऊ द्यायची नव्हती. यापुढचा इतिहास आहे, तो
संयुक्त महाराष्ट्राचा. या लढ्यात लेखणी नि वाणीने तळपलेल्या प्रबोधनकार आणि
अत्रे या दोन शिलेदारांचा.


संयुक्त महाराष्ट्राचे शिलेदार

संयुक्त महाराष्ट्राचे यज्ञकुंड धगधगू लागले होते. मराठी माणूस आणि महाराष्ट्र
ज्यांचा श्वास आहे, त्या प्रबोधनकार आणि आचार्य अत्रे यांनी मराठा आणि प्रबोधन
पत्रिकेतून संयुक्त महाराष्ट्राचा तडाखेबंद प्रचार सुरूच ठेवला होता.
दरम्यान डॉ. आंबेडकरांनी शेवटच्या आजारपणात प्रबोधनकारांना बोलावून घेतले. आणि
सर्व राजकीय पक्ष आल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्र होणार नाही, असे लक्षात आणून
दिले. ही मुलाखात त्यांनी छापल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्थापनेची
चर्चा सुरू झाली. अखेर 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेधे याच्या
अध्यक्षतेखाली टिळक स्मारक मंदिरात झालेल्या बैठकीत संयुक्त महाराष्ट्र समितीची
स्थापना झाली. धनंजयराव गाडगीळ, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, आणि अत्रे
यावेळी उपस्थित होते.

प्रबोधनकार आणि अत्र्यांच्या तडाखेबंद भाषणांनी आणि जळजळीत लिखाणाने मराठी मने
पेटत होती. महाराष्ट्राला विरोध करणारी काँग्रेस, केंद्रसरकार आणि पंडीत नेहरू
हे या दोघांच्या टीकेचे प्रमुख लक्ष्य होते.
पंडीत नेहरुंनी शिवाजीमहाराजांना वाट चुकलेला देशभक्त म्हटले. त्याचा जोरदार
समाचार प्रबोधनकारांनी घेतला. तर ढोंगी नेहरू, नाटकी नेहरू अशा विशेषणांनी
अत्र्यांनी नेहरूंवर टीकेची झोड उठवली. नेहरू महाराष्ट्रद्वेष्टे आहेत, असा
आरोप अत्रे करत. नेहरूही जनक्षोभ उसळवणार्‍या या मराठाच्या बुलंद तोफेवर लक्ष
ठेवून होते. अत्र्यांविषयीची एक फाईलच त्यांच्याकडे होती.


'मराठा'ची ललकारी

शिवाजी पार्कवर भाई माधवराव बागल यांच्या अध्यक्षतेखाली एक लाख लोकांचा मेळावा
भरला होता. या मेळाव्याची बातमीसुध्दा मराठी वर्तमानपत्रांनी देऊ नये याबद्दल
बागल यांनी खेद व्यक्त केला. यावेळी अत्र्यांनी घोषणा केली की, आपण मदत केली तर
मी येत्या विजयादशमीपासून नवे दैनिक काढतो. या मेळाव्यात स्वयंसेवकांनी पेट्या
फिरवल्या आणि 62 रुपये 12 आणे जमा झाले. या दैनिकाचे नाव काय ठेवायचे, असे
अत्र्यांनी विचारल्यावर सेनापती बापट म्हणाले, अर्थात मराठा!
संयुक्त महाराष्ट्राच्या या पत्रावर ठाकरे कुटुंबीयांचा ठसा होता. मराठाचे
मास्टहेड चित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी तयार करून दिले. 'मराठा तितुका
मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।' हे मराठ्याचे ब्रीदवाक्य श्री शिवछत्रपती,
महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक यांच्या चित्रासह शिरोभागी झळकत असे. 15
नोव्हेंबर 1956 रोजी मराठाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. यावेळी पहिले
स्फूर्तीदायक संदेश पाठवणार्‍यांमध्ये आघाडीवर होते, प्रबोधनकार ठाकरे.
त्याबाबत प्रबोधनकार लिहितात, मराठा जन्माचा दरिद्री. दैनिक काढायचे काम
व्याख्याने देण्याइतके का सोपे असते? पण 'पण मारीन पन्नग नि फोडीन शेषटाळू ,
भूगोल हा उलथिता मज नाही वेळू' या उक्तीप्रमाणे हिंमतीने माणूस कसा नि किती
गर्भश्रीमंत असतो हे महाशय अत्रे यांनी मराठा दैनिक काढण्यात दाखवलेल्या कमाल
धाडसाने सिद्ध केले.

घमघमत्या लोकमताच्या गुलालाने सालंकृत झालेल्या नाममात्र द्रव्याक्षता
अत्र्यांच्या माथ्यावर पडताच जवळ कपर्दिकेचाही उबारा नसताना, या दैनिकाच्या
निश्चित जन्माचा त्यांनी पुकारा केला. आणि अडचणींचे शेकडो डोंगर पालथे घालून
मराठा दैनिकाच्या प्रथमांकाने विरोधकांच्या नाकाच्या बोंड्या मुळापासून
छाटल्या. आज दैनिक मराठा मर्‍हाठदेशी जनतेचे लाडके दैनिक झाला आहे. त्याने
संयुक्त महाराष्टाच्या आंदोलनाला चढत्या वाढत्या शिगेला नेऊन, हरामखोर
काँंग्रेस पक्षाच्या उच्चाटणाची बजावलेली कामगिरी मराठी वृत्तपत्र-सृष्टीच्या
इतिहासातला अजरामर चमत्कार म्हटला तरी चालेल.

ठाकरे बंधूंची कामगिरी

अत्र्यांच्या या उद्योगाला केवळ प्रबोधनकारच नव्हे तर त्यांचे दोन्ही चित्रकार
चिरंजीवही मदत करत होते. अत्र्यांचा नवयुग आणि मराठा लोकप्रिय होण्यामागे एक
प्रमुख कारण होते, ते म्हणजे या प्रबोधनकारपुत्रांची अर्थात बाळ आणि श्रीकांत
ठाकरे यांची व्यंगचित्रे. या चित्रांनी या वृत्तपत्रांना जनमानसात एक स्वतंत्र
ओळख दिली. बी. के ठाकरे, मावळा अशा टोपणनावांनी बाळासाहेबांनी ही चित्रे काढली.
तर श्रीकांत ठाकरेंच्या चित्रांनी विशेषत: संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या
वेळी विशेष कामगिरी बजावली. नवयुगला 20 वर्षे झाली त्यावेळी अत्र्यांनी बाळ आणि
श्रीकांत ठाकरेंचे तोंडभरून कौतुक केले. या दोघांनीही नवयुगच्या लोकप्रियतेत जी
भर टाकली, तिला तोड नाही, असे ते म्हणाले.
दैनिक मराठा निघाल्यानंतर 15 दिवसांनी अत्र्यांच्या अभिनंदनासाठी शांतारामाच्या
चाळीत सभा भरली. या सभेत मुख्य वक्ते होते, आप्पा आणि लालजी पेंडसे. या सभेचे
अध्यक्ष होते, प्रबोधनकार ठाकरे.


ठाकरे आणि अत्रे शैली

संयुक्त महाराष्ट्राच्या काळात या दोघांच्याही लेखणीची तलवार आणि वक्तृत्वाचा
दांडपट्टा महाराष्टाच्या विरोधकांवर सपासप चालत होता.
त्याची दोन नमुने पाहा - अत्रे लिहितात, अमानुष अत्याचाराने संतप्त झालेल्या
तीन कोटी जनतेला वाघनखे फुटतील आणि द्विभाषिकाचा कोथळा बाहेर काढला जाईल.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलकांवर गोळ्या घालणारांचे हात महारोग होऊन झडून
जावोत. त्यांना रक्तपिती होऊन मरण येवो. 'त्यावर एवढी जहाल भाषा बरी नव्हे',
अशी टीका करण्यात आली. त्याला उत्तर देताना अत्रे म्हणाले, 'हे शब्द माझे
नाहीत. ज्यांची कर्ती मुले या गोळीबारात मारली गेली, त्यांच्या आईबापांचे हे
शिव्याशाप आहेत.'
दुसरीकडे शिवाजी पार्कवरच्या सभेत प्रबोधनकार म्हणाले, 'काँग्रेसच्या पेटीत काय
आहे? या पेटीत जागोजागी शिवरायांची बदनामी, भगिनींच्या कुंकवाचे सारवण,
पिचलेल्या बांगड्या, एकशे पाच भावांचे रक्त आहे, तिथे तुम्ही आपले मत द्याल
काय?'
अत्रे आणि ठाकरेंची लेखणी वाणी संयुक्त महाराष्ट्राच्या काळात अशी आग ओकत होती.

बुंदेलखंडाच्या छत्रसाल राजाने पहिल्या बाजीरावाला दिलेल्या मदतीच्या
हाकेप्रमाणे प्रबोधनकारांनी केंद्रात असलेल्या सी. डी. देशमुखांना म्हटले, 'जो
गत भई गजेंद्र की सो गत भई आज। बाजी जान बंबई की महाराष्ट्र की राखो सीडी
लाज।।'
संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावर चिंतामणरावांनी राजीनामा देताच अत्र्यांनी
लिहिले, चिंतामणी देशाचा कंठमणी झाला!
तर सीडींनी द्वैभाषिकाचा तोडगा स्वीकारल्यावर द्वैभाषिकाचे गाडलेले मढे
तुम्हाला लखलाभ, असे प्रबोधनकारांनी पुन्हा ठणकावले.
चळवळीत एकत्र काम करणार्‍या या मित्रांचे परस्परांच्या महाराष्ट्र प्रेमाचेही
कोण कौतुक होते.

झुंजार महारथी

15 नोव्हेंबर 1959 रोजी झालेल्या मराठाच्या तिसर्‍या वर्धापन दिनाच्या
कार्यक्रमात बोलताना प्रबोधनकार म्हणतात, जगेन तर महाराष्ट्राकरता नि मरेन तर
महाराष्ट्राकरता ही मराठ्याची जिद्द आहे. काँग्रेस निष्क्रीय झाली तेव्हा
लोकमान्य टिळक आणि ऍनी बेजंट यांनी होरूल लीग काढून स्वराज्याचा झेंडा फडकावला.
त्याचप्रमाणे समितीतील शैथिल्य नष्ट करण्यासाठी जनता आघाडीचा आणि मराठ्याचा
जन्म आहे. इतिहासाची पुनरावृत्ती आहे. आचार्य अत्रे हे जनता जनार्दनाने बनवलेले
संयुक्त महाराष्ट्राचे यंत्र आहे.

तर ठाकरेंच्या 75व्या वाढदिवसानिमित्त अत्रे मराठात लिहिलेल्या लेखात म्हणतात,
केशवराव संयुक्त महाराष्ट्राच्या महाभारतातले एक झुंजार महारथी आहेत. जन्मभर
महाराष्ट्रावर जाज्वल्य प्रेम करणारा माणूस.
मराठी जनतेच्या हितासाठी 'शुद्ध महाराष्ट्रीय पक्ष' स्थापन करण्याची आवश्यकता
त्यांनी दोन तपापूर्वी व्यक्त केली आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या
निमित्ताने त्यांची ही इच्छा पूर्ण झाली.

त्यांचे सारे आयुष्य धार्मिक आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध बंड करण्यात आणि
लढण्यात गेले. म्हणून त्यांच्या 60व्या वाढदिवशी नवयुगमध्ये अभिनंदन करताना
आम्ही त्यांचा उल्लेख महाराष्ट्राचे ब्राम्हणेतर बंडखोर असा केला होता.
लोकहितवादी, महात्मा फुले, आगरकर यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातल्या बहुजन
समाजाला जागृत करण्याचे जे महान कार्य सतत दोन तप ठाकरे यांनी केले, ते संयुक्त
महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी बजावलेल्या अविस्मरणीय कामगिरीने खचित सार्थकी
लागले आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एके ठिकाणी जमाव संतप्त झाला होता. प्रबोधनकार
आणि अत्रे गाडीतून जात होते. अत्र्यांनी लगोलग जाऊन जमावाला शांत केले. तेव्हा
प्रबोधनकार म्हणाले, अरे या बाबुरावाला माझं उरलेलं आयुष्य मिळू दे...


मैत्रीला दृष्ट

संयुक्त महाराष्ट्रासाठी राजकीय पक्षांशी संबंधित नसलेले पाच प्रमुख सेनापती
एकत्र आले होेते. सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, पुण्याच्या प्रभात दैनिकाचे
संपादक वालचंद कोठारी, माधवराव बागल आणि आचार्य अत्रे. त्यांना संयुक्त
महाराष्ट्राचे पंचायतन म्हणत. त्यांना एकत्र ठेवण्याचे काम केले होते अत्रे आणि
ठाकरेंच्या मैत्रीने. पण लोकांच्या हृदयातील या देवतांच्या मैत्रीला दुदैर्वाने
दृष्ट लागली. संयुक्त महाराष्ट्र समिती तर फुटलीच, पण प्रबोधनकार आणि
अत्र्यांमध्ये मोठा दुरावा निर्माण झाला.

एकमेकांवर कौतुकाची फुले उधळणार्‍या अत्रेंनी मराठातून तर प्रबोधनकारांनी
मार्मिकमधून एकमेकांवर प्रचंड चिखलफेक केली.
या वादाचे तत्कालिक कारण सांगितले जाते ते ठाकरेंच्या घराशेजारी असलेल्या लालन
नावाच्या गुजराथी मारवाड्याच्या रबरी गमबुटाच्या गोडाऊनचे. मार्मिक आणि
प्रबोधनमधील काही लेखांमुळे अत्र्यांचा प्रबोधनकारांवर रोष होता. या
गोडाऊनविषयी ठाकरेंनी तक्रार करताच अत्र्यांनी या प्रकरणाला मराठातून प्रसिद्धी
दिली. आणि दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. या दोघांवरही प्रेम
करणार्‍या मराठी माणसाच्या मनाला या वादामुळे खूप क्लेश झाले.
या वादाबाबत ठाकरे म्हणतात, फुले पुतळा प्रकरण, वि. का. राजवाडेंशी वाद,
ब्राम्हण-ब्राम्हणेतर वाद, असे आम्ही पुष्कळ वाद खेळलो पण अत्र्यांनी यात
सभ्यतेची पातळी सोडली.

खरे तर अत्र्यांचे डाव्या पक्षांकडे झुकणे, हे या मतभेदामागचे खरे कारण
सांगितले जाते. अत्रे कम्युनिस्ट आहेत, असा ठाकरेंनी जाहीर आक्षेप घेतला.
त्यामुळे अत्रे चवताळले. आणि सांजमराठात प्रबोधनकारांविरोधात कठोर लिखाण करू
लागले. त्यांनी असे न करता मुद्दे खोडून काढायला हवे होते, असे ठाकरेंचे मत
होते.


वैराची दरी बुजली

एका भारावल्या क्षणी बाबुरावाला माझं आयुष्य मिळू दे...ही प्रबोधनकारांची
प्रार्थना पूर्ण झाली नाही. प्रबोधनकारांआधीच अत्र्यांनी 13 जून 1969 रोजी
एक्झिट घेतली. त्यानंतर 22 जून रोजी 'असा पुरुष होणे नाही', या नावाचे
मार्मिककारांनी संपादकीय लिहिले.
मार्मिककार म्हणतात, बाबुरावांविषयी आमच्या मनात वैरभाव किंवा अनादराचा
किंचितही लवलेश नव्हता. म्हणूनच शिवसेनेच्या शिवाजीपार्कावरच्या 30 ऑक्टोबर
1966 रोजी झालेल्या पहिल्या विराट मेळाव्यात आम्ही त्यांना 'आपण या
नवसंघटनेच्या धुरेवर येऊन उभे राहा' असे जाहीर आवाहन केले.
शिवसेनेच्या सुरुवातीच्या प्रत्येक मेळाव्यात आम्ही या आवाहनाचा पुनरुच्चार
केला. परंतू कम्युनिस्टांच्या विळख्यात सापडलेल्या बाबुरावांना तो शक्य झाला
नाही. अत्रे आणि ठाकरे यांच्यातील द्वैताची दरी कायम ठेवण्यात कम्युनिस्ट
यशस्वी झाले, पण आता हा पहाड कोसळल्याने ती दरी कायमची बुजली आहे.


मृत्यूपत्राचे काव्य

अत्र्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूपत्राचा वाद सुरू झाला. अत्र्यांनी
आपली सगळी इस्टेट महाराष्ट्राला अर्पण केल्याचे खोटे मृत्यूपत्र बनवले गेले.
अत्रेकन्या शिरीष पै यांनी ही गोष्ट दादांच्या कानावर घातली. प्रबोधनकारांनी
पुन्हा कंबर कसली. आणि मोठ्या बारकाव्याने, अभ्यासूपणे, एकेक दाखला देत या
मृत्यूपत्रातील खोटेपणा सिद्ध केला.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपूर्वी प्रबोधनकारांनी बहुजन समाज जागृतीचा वसा
घेतला होता. संयुक्त महाराष्ट्राचे ध्येय साध्य झाल्यानंतर त्यांच्या या
कार्याचा परीघ वाढायला हवा होता. पण तसे झाले नाही. तसे का झाले असावे, याचे एक
कारण प्रबोधनकारांनीच सांगून ठेवले आहे. समाजकारणात जो ढवळाढवळ करतो, त्याचा
वर्णवर्चस्ववादी तिरस्कार करतात. जे जे सामाजिक समतेच्या महान मूल्यांच्या
प्रस्थापनेसाठी झगडले ते ते रोषास प्राप्त ठरले. लोकहितवादी, आगरकर,
राजारामशास्त्री भागवत, बाळशास्त्री जांभेकर नि सावरकरही त्यामुळे अप्रिय झाले.
मग प्रबोधनकारांचा त्यांनी द्वेष केला तर त्यात नवल ते काय? यात
प्रबोधनकारांच्या नावानंतर आचार्य अत्र्यांचे नाव जोडले गेलेले आहे. त्यामुळेच
त्यांच्याही वाट्याला उपेक्षा आलेली आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या
निमित्ताने किमान सामाजिक समतेचा, सुधारणेचा प्रवाह पुन्हा स्वच्छ होऊन खळखळून

No comments:

Post a Comment