'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Friday 16 September 2011

शाहिरांच्या देशा


आता कुठं जरी खुट्ट झालं की काही सेकंदात जगभर बातमीचा वणवा पसरतो. ही सगळी मीडियाची किमया. भारतभर लोकपाल आंदोलन चेतवणा-या अण्णांनीही मीडियाला श्रेय दिलं. पण ५० वर्षांपूर्वीचा मीडिया काय होता? तो लोकांपर्यंत किती पोहोचत होता? असा विचार करू लागलो तर समोर येतं, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन.
संयुक्त महाराष्ट्राचा हा लढा गावोगावी पोहचवण्याचं, मराठी मनं पेटवण्याचं ऐतिहासिक काम एका प्रभावी मीडियानं केलं. हा मीडिया म्हणजे लोकशाहीर आणि त्यांची गगन भेदून टाकणारी शाहिरी. या शाहिरांना टाळून महाराष्ट्राला पुढं जाताच येणार नाही.


याच शाहिरांच्या आठवणी आम्ही १ मे २०११ रोजी जागवल्या. निमित्त होतं, महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाचं. हयात असलेले तसंच काळाच्या पडद्याआड गेलेले अशा सगळ्या शाहिरांचं कार्य आम्ही मी मराठीवर दाखवलं.
यात शाहीर अण्णाभाऊ साठे, अमरशेख, गवाणकर, चंदू भरडकर, आत्माराम पाटील, विठ्ठल उमप, शाहीर साबळे, लीलाधर हेगडे, मधुकर नेराळे, सुबल सरकार, अजिज नदाफ, यांच्यासह नव्या दमाचे शाहीर संभाजी भगत, नंदेश उमप, सांगलीचे आदीनाथ विभुते तडफेनं गाताना दिसले.


तर अमरशेखांच्या थोरल्या कन्या प्रेरणा बर्वे, धाकटे जावई नामदेव ढसाळ, जीएल आणि तारा रेड्डींचे पुत्र प्रकाश रेड्डी, शाहिरी कलेचे अभ्यासक प्रकाश खांडगे आदींनी शाहिरी कलेचं योगदान विशद केलं. 
विशेष म्हणजे शाहीर आत्माराम पाटलांच्या पत्नी इंद्रायणीताई पाटील संयुक्त महाराष्ट्र उगवलाय माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा हा पोवाडा पुन्हा एकदा खड्या आवाजात त्याच तडफेनं म्हणाल्या.
टीव्हीवर पहिल्यांदाच शाहिरांचा एवढा मेळा दिसला.
शाहिरांच्या देशाया क्रार्यक्रमातून आम्ही त्यांना केलेला हा सलाम...

मनं चेतवणारी शाहिरी


हुतात्म्यांच्या बलिदानातून हजारोंच्या त्यागातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. या वीरांसोबतच संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्यात मोलाचा वाटा आहे, तो मराठी मनं चेतवणा-या रांगड्या शाहिरांचा.
संयुक्त महाराष्ट्रावरील कवणं गाऊन शाहिरांनी त्यावेळी सारा महाराष्ट्र दणाणून सोडला.
या शाहिरांनी रचलेली कवनं आणि पोवाडे म्हणजे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा चालता बोलता इतिहास. मराठी साहित्यातही शाहिरीचं मानाचं पान आहे. शाहिरी ही मराठी कवितेची पहाट मानली जाते.
सर्वसामान्य जनतेला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सामावून घेण्याचं मोठं कार्य शाहिरांच्या पोवाडयांनी केलं. जागा मराठा आम जमाना बदलेगा अशी डरकाळी फोडणा-या शाहिरांनी सारा महाराष्ट्रच चेतवला.
शाहीर आणि त्यांची शाहिरी लोकांना आपली वाटली याचं कारण, शाहिरांनी कवनांत वापरलेली जनसामान्यांची रोजच्या जगण्यातली भाषा. ही भाषा लोकांना पटली. रुचली. त्यामुळंच शाहिरी लोकप्रिय झाली. या शाहिरीनेच संयुक्त महाराष्ट्राची विजयी मशाल प्रज्वलीत केली.

लढाईतलं त्रिशूळ

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेचा हुंकार होता. हा हुंकार पाहायला मिळाला तो शाहिरांच्या पोवाड्यांतून.
अण्णाभाऊंचे सहकारी शाहीर अमरशेख आणि शाहीर गवाणकर यांच्या लाल बावटा कला पथकानं अवघा महाराष्ट्र घुसळून काढला. शाहीर अमरशेख यांच्या कवनानं संयुक्त महाराष्ट्राच्या सभेतलं वातावरणच बदलून जाई. लोक भारावून जात. पेटून उठत.

मुंबईत शिवाजी पार्कपासून गिरगावापर्यंत लोक गनिमी काव्यानं पोलिसांशी लढले. मुंबईच्या गिरणीकामगारांनी सारा गिरणगाव किल्ल्यासारखा लढवला. प्रताप गडाचा मोर्चा शाहिरांनी गाजवला. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,  असं या शाहिरांनी गडावर आलेल्या पंडीत नेहरुंना ठणकावलं.
या शाहिरांनी कामगार आणि शेतक-यांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आणलं.

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर दिल्लीकरांनीही शाहिरांना मोठा प्रतिसाद दिला. राजधानीवर धडकलेल्या शाहिरांची भाषा समजत नसूनही दिल्लीकरांनी शाहीर अमर शेखांना भरभरून दाद दिली. अण्णाभाऊ, शाहीर गवाणकर या चळवळीचं त्रिशूळ होतं. त्यांची कवनं पोवाडे ऐकून, त्यातून स्फूर्ती घेऊन मराठी माणूस लढत होता. या त्रिशूळाचाच वारसा शाहीर साबळे, शाहीर चंदू भरडकरांनी पुढं चालवला.

आग + धुंदी + बेहोशी = अमर शेख   


अमर शेख म्हणजे रग. अमर शेख म्हणजे धग. अमर शेख म्हणजे आग, धुंदी आणि बेहोशी यांची जिवंत बेरीज. तळहाती शीर घेऊन रणांगणात एखादा वीर लढावा, तसेच शाहीर अमर शेख संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लढले, असं वर्णन आचार्य अत्र्यांनी केलं.
अमर शेखांच्या पहाडी आवाज हजारो लोकांच्या काळजाला भिडला. त्य़ाचं नाव मेहेबूब हसन शेख. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी गावी जन्म झालेलं हे रत्न झळाळून उठलं ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात. सामाजिक चळवळीशी बांधिलकी असणा-या या शाहिरानं आपल्या उत्तुंग पहाडी आवाजानं महाराष्ट्रासोबतच दिल्लीही गाजवून सोडली.
अमर शेखांवर गाण्याचे संस्कार झाले ते मुन्नेरबी या त्यांच्या अशिक्षित मातेच्या ओव्यांमधून. आयुष्याची परवड सहन करत या मातेनं आपल्या मुलावर राष्ट्रप्रेमाचे संस्कार केले.

प्रतिभेचा हा स्पर्श झालेल्या अमरशेखांनी अमरगीत हा गीतसंग्रह; कलश, धरतीमाता हे काव्यसंग्रह आणि पहिला बळी हे नाटकही लिहिलं. प्रपंचमहात्मा जोतिबा फुलेया चित्रपटांतील भूमिकांमुळे ते देशभर पोहोचले. गिरणी कामगार असलेले अमर शेख पुढं कामगार आंदोलनात सक्रीय सहभागी झाले. त्यात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. पण या जेलयात्रेनं त्यांच्या आयुष्याला वळण दिलं आणि कष्टक-यांमध्ये जागृती निर्माण करण्याचा त्यांनी वसाच घेतला. 

क्लीनर, पाणक्या व गिरणी मजूर म्हणून जगणा-या अमर शेखांना शाहिरीची प्रेरणा मिळाली ती १९४२ च्या चळवळीत. गोवामुक्ती आंदोलनाही ते आघाडीवर होते. पण वावटळ घुमावी तसा त्यांचा आवाज घुमला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात. या वावटळीनं महाराष्ट्रविरोधकांचा पालापाचोळा केला. या बहाद्दरानं संयुक्त महाराष्ट्राचं रणमैदान अक्षरश: गाजवलं. आणि शेवटी मराठी माणसाचं स्वप्न साकार झालं. आणि पंतप्रधान पंडित नेहरूंना मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचं दिमाखात उदघाटन करावं लागलं.
                                                                                                                     अण्णाभाऊ साठे

जशी गरुडाला पखं, वाघाला नखं..


‘‘जशी गरुडाला पखं, वाघाला नखं तशी ही मुंबई महाराष्ट्राला’’…मुंबई महाराष्ट्राचा कसा अविभाज्य घटक आहे, हे सांगणारा शाहीर अण्णाभाऊ साठेंचा हा पोवाडा. अण्णाभाऊंच्या पोवाड्यांनी आणि कवनांनी कष्टकरी जनतेत जागृती घडवून आणली...
माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली... कामगारांच्या व्यथेतून मुंबईची आणि महाराष्ट्राची व्यथा सांगणारं हे अण्णाभाऊंचे शब्द. या शब्दांनीच कामगारांमध्ये चैतन्याचा        वणवा पेटवला. १९४८च्या संयुक्त महाराष्ट्राच्या अधिवेशनासाठी अण्णाभाऊंनी मुंबई कुणाची हा तमाशा लिहिला. त्यानंतर अकलेची गोष्ट, निवडणुकीत घोटाळे, माझी मुंबई, शेटजींचे इलेक्शन असे त्यांचे तमाशे गाजू लागले. हे तमाशे होते सर्वसामान्य माणसाला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी पेटून उठण्याचा संदेश देणारे.
सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावात जन्मलेले अण्णाभाऊ घरच्या बिकट परिस्थितीमुळं फारसे शिकू शकले नाहीत. पण प्रभावी लेखणी आणि वाणींनं ते रसिकांच्या गळ्यातला ताईत बनले. अण्णाभाऊ ख-या अर्थानं द्रष्टे कलाकार होते. लोकरंजन करणा-या तमाशाला त्यांनी लोकमानस घडवणा-या लोकनाट्याचा दर्जा दिला.
अण्णाभाऊंच्या लेखणीतली विनोद आणि उपहासाची धार सर्वसामान्यांच्या मनाला सहज जाऊन भिडायची.

शाहीर गव्हाणकर

अण्णाभाऊंच्या या शब्दांना सूर दिला तो शाहीर द. ना. गव्हाणकर यांनी. खणखणीत आवाज आणि साध्या सोप्या चालींमध्ये बांधलेली अण्णाभाऊंची गीतं त्यांनी कामगार आणि कष्टक-यांपर्यंत पोचवली. अण्णाभाऊ आणि गव्हाणकर ही जोडगोळी तमाशातून सवाल-जबाबांचा बार उडवून देई. त्यांच्या या लोकजागृतीच्या कामाला खरोखर तोड नाही. त्यांनी केलेल्या लोकरंजन आणि लोकप्रबोधनातून संयुक्त महाराष्ट्राची लोकचळवळ उभी राहिली. आणि अखेर मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला.

खुशाल कोंबडं झाकून धरा

 ‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा खुशाल कोंबडं झाकून धरा’, या आत्माराम पाटलांच्या पोवाड्यानं अवघा महाराष्ट्र ढवळून काढला. शाहिरांच्या पत्नी इंद्रायणीताई पाटील आजही तेवढ्याच तडफेनं हा पोवाडा म्हणतात. शाहिरांचे प्रश्न सोडवण्यासाठी शाहीर मधुकर नेराळे आपल्या वयोवृद्ध साथीदारांसह महाराष्ट्रभर फिरतायत. या शाहिरांच्या ताफ्यात इंद्रायणीताईही फिरतायत.
                                                          आत्माराम पाटील                                                                     

घुसून पुढं चला जाऊ रं...

जाती घडी पुन्हा येणार नाही रं घुसून पुढं चला जाऊ रं’... सोलापूरचे सत्तरीतले प्रा. अजिज नदाफ आजही तन्मयतेनं हा पोवाडा म्हणतात. संयुक्त महाराष्ट्राच्या जनजागृतीसाठी त्यांनी आयुष्य झोकून दिलं. पोवाडे आणि नाटकांतून त्यांनी खेडोपाड्यातून महाराष्ट्राचं आंदोलन पोहोचवलं. 
शाहीर विश्वासराव फाटे, जंगमस्वामी हे शाहीर गावागावांत पोहोचले.
मुंबईतले वृद्ध शाहीर सुबल सरकारांचे डोळे आपल्या दिवंगत सहका-यांच्या आठवणीनं पाणावतात. त्यांना अनेक शाहिरांचा सहवास लाभला. त्यांच्या पराक्रमाच्या गाथा त्या घरी येणा-यांना गाऊन ऐकवतात. 
तर सांगलीचे शाहीर आदीनाथ विभुते आपल्या वडिलांचा वारसा जोमानं पुढं नेतायत.

बेळगाव कारवारचं शल्य

उठा रं उठा प्रसंग आलाय वंगाळ मोठा, बेळगाव कारवारपाई खाल्ल्या आम्ही गोळ्या...हा पोवाडे तडफेनं गातायत बेळगावचे ८० वर्षांचे शाहीर गणपती तंगणकर. बेळगाव महाराष्ट्रात यावा यासाठी ते तमाम मराठी माणसांना साद घालतायत. ते राहतात बेळगावातल्या चिरमुरी गावात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अजून अपुरीच असल्याची खंत ते बोलून दाखवतात.
     
     संभाजी भगत

नवे शिपाई

पहाडी आवाज. तरुणाला मागे टाकणारा उत्साह घेऊन, लोककलेच्या सर्व प्रकारांत मुक्त संचार करणारे, परंपरा आणि नवता यांचा सुरेख, सुरेल संगम घालणारे शाहीर विठ्ठल उमप. जगाचा नुकताच निरोप घेतलेल्या शाहीर उमपांनी ख-या अर्थाने शाहिरीचा वारसा पुढं नेला. आता त्यांचा वारसा मुलगा नंदेश उमप चालवतोय.
शाहीर साबळेंचं कार्य तर अतुलनीय आहे.
नव्या दमाचे शाहीर संभाजी भगत यांचा पोवाडा ऐकला की अंगावर काटा उभा राहतो. भगतांना नव्या फॉर्ममध्ये नवी शाहिरी उभी करायचीय. त्यासाठी ते तरुण शाहिरांना घडवतायत.  


2 comments:

  1. thank you... annabhau ni amar shekh yanchya palikadchi naav mahit navhti... tee mahit zhali... thnks a lot..

    ReplyDelete
  2. होय सिद्धेश. या शाहिरांचे व्हिडिओही आहेत. लवकरच तेही अपलोड करेन.

    ReplyDelete