'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Sunday, 11 September 2011

विघ्नकर्ता-विघ्नहर्ता

आज गणपतीविसर्जन. सर्वांनी जड अंत:करणानं बाप्पाला निरोप दिलाय. आजच्याच मटात स. रा. गाडगीळ यांच्या लोकायत नावाच्या पुस्तकाविषयी छापून आलंय. यात गणपतीच्या सांस्कृतिक प्रवासाची तोंडओळख करून देण्यात आलीय. श्रीगणेशाचा विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता हा प्रवास, त्यामागचं राजकारण याचा उहापोह करण्यात आलाय. यानिमित्तानं मला चार वर्षांपूर्वी लिहिलेल्या माझ्या लेखाची आठवण झाली. श्रीगणेशाचं मूळ रुप शोधणा-या या लेखाच्या चार पानांपैकी दोनच सापडली. त्यातला हा मजकूर...


आपण फार फार थोर लोक आहोत. इतरांना त्रास देणा-या उपद्रवी लोकांचं मन वळवून त्यांच्यातला चांगुलपणा जागा करणं, त्यांना सन्मार्गाला लावणं हे आपल्याकडं सातत्यानं घडत आलं आहे. पुराणात, इतिहासात असे वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे किती तरी दाखले मिळतात. आपल्या मंगलमूर्ती श्रीगणेशाची पुराणकथाही अशाच प्रकारची आहे...
स्मशानात राहणा-या श्री शंकर पार्वती या शक्तीमान राज्यकर्त्यांचा मुलगा विनायक हा अलक्ष्मी व भूतगणांच्या सहाय्याने लोकांना उपद्रव करू लागला. विनायकाची अवकृपा झालेल्या माणसांसमोर अडचणींचे डोंगर उभे राहायचे. राजाला राज्यकारभारात अडचणी निर्माण व्हायच्या. माणसांना भीतीदायक स्वप्नं पडायची. उपवर मुलींची लग्न व्हायची नाहीत. स्त्रियांना पुत्रप्राप्ती व्हायची नाही. शेतीतलं उत्पन्न घटायचं. व्यवहारात अपयश यायचं. या सर्वांतून सुटका करून घेण्यासाठी लोकांनी विनायकाची पूजा सुरू केली. मग कोणत्याही कार्यात विघ्न निर्माण होऊ नये म्हणून पहिल्यांदा विनायकपूजन करण्याची प्रथाच पडली.
विनायकजन्माच्या काही पौराणीक कथा सारांशरुपाने पुढीलप्रमाणे –

 १. माणसांना त्रास देणारी भुतं आणि त्यांचे स्वामी श्रीशंकर भूतानचे राजे होते. (अजूनही भूतानमध्ये भूत नावाची जात आहे.) या भुतांच्या संघांना गण म्हणतात. तर गणांच्या मुख्याला गणपती. एका टोळीला नायक नसल्याने त्यातील गण विनायक नावाने ओळखले जात. त्यातील एका विनायकाने युद्धात मोठं शौर्य गाजवलं. तोच विनायक किंवा गणपती म्हणून प्रसिद्ध पावला.
२. रुद्र आणि विनायक ज्या वनांत राहत तेथे विपुल हत्ती होते. हत्तींना त्या काळात मोठे महत्त्व होते. त्यामुळे विनायक हत्तींचा राजा म्हणूनच ओळखला जात असे. गजराजांमध्ये वावरणारा म्हणून त्याला गजानन असेही संबोधले जाऊ लागले.
३. श्री शंकराने तपसामर्थ्याने एक तेजस्वी पुत्र तयार केला. त्या पुत्राबद्दल पार्वतीच्या मनात मत्सर निर्माण झाला. तिने त्या पुत्राला लंबोदर, गजमुख हो असा शाप दिला. शंकर क्रोधीत झाले. त्यांनी हाताने आपले अंग घासले. त्यातून गजमुख, वक्रतुंड, नीलवर्ण आणि नानाशस्त्रधारी विनायकगण निर्माण झाले. त्यांत मुखापासून तयार झाला तो विनायक. तो गणांचा प्रमुख बनला. जे लोक तुझी पूजा करणार नाहीत, त्यांना खुशाल विघ्ने कर, अशी परवानगी शंभू महादेवाने विनायकाला दिली. त्यामुळे या विनायकाची अग्रक्रमाने पूजा होऊ लागली.
४. पार्वतीने अंघोळीच्या वेळी काढलेल्या अमंगळ मळीचा विनायक बनवला. त्याला द्वाररक्षक म्हणून नेमले. आत जाऊ देत नाही, म्हणून शंकराने त्याचा शिरच्छेद केला. नंतर पार्वतीने केलेल्या विलापाने द्रवलेल्या महादेवाने विनायकाला हत्तीचे मुंडके बसवले.
५. संकट निर्माण करणा-या शनीने टक लावून पाहिल्याने गणपतीचे मस्तक गळून पडले. त्यावर ब्रम्हदेवाच्या सल्ल्यानुसार पार्वतीने हत्तीचे मुंडके बसवून गणपतीला जिवंत केले.
६. हत्तीरुपात रतीक्रीडा करणा-या शंकर-पार्वतीला हा गजमुखी पुत्र झाला. त्यालाच गजानन संबोधले जावू लागले.

विघ्नहर्ता गणपती हा पूर्वी विघ्नकर्ताच होता, असे दर्शणारे अनेक संदर्भ पुराणात येतात. गणपतीचे स्तवन करणा-या रचल्या गेलेल्या गणपत्यथर्वशीर्षात नमो व्रातपतेय अशा शब्दांत व्रात्य, खोडकर अशा गणांचा अधिपती असलेल्या विनायकला नमन केले आहे. गणपतीला पुराणात गृत्समद म्हटले आहे. गृत्समद म्हणजे मदस्त्राव होणारा मदमस्त हत्ती. हा हत्ती जसा धुमाकूळ घालतो, तसा धुमाकूळ या विनायकानं घातला. त्यामुळं त्याला शांत करण्यासाठी त्याचे पूजन करण्याचा मार्ग अवलंबला गेला. धान्य, पिकांची नासाडी करणारा उंदीरही त्याचे उपद्रवमूल्य सूचित करतो.

हा विघ्नकर्ता गणेश वैदिक की अवैदिक यावरून विद्वानांत मतभेद आहेत. काहींच्या मते ही आर्येतरांची ग्रामदेवता आहे. इतर ग्रामदेवतांप्रमाणे त्यालाही बळी देवून रक्ताचा अभिषेक घातला जात असे. त्याचंच प्रतिक म्हणून अजूनही गणपतीला शेंदूर चर्चिला जातो. वैदिक काळात आर्य सप्तसिंधू प्रदेशात राहात. त्यावेळी त्यांना गणपतीच्या अस्तित्वाचा पत्ता नव्हता. पूर्वेकडे सरकत त्यांनी अनार्यांना जिंकले. साहजिकच या जेत्या आर्यांच्या संस्कृतीचे रंग अनार्यांवर चढले. मात्र अनार्यांच्या संस्कृतीचाही रंग त्यांना लागलाच. जंगलात राहणा-या अनार्यांच्या देवता सुबक नव्हत्या. त्यांच्या देवता पशू, पक्ष्यांच्या आकाराच्या, पिशाच्चासारखे तोंड, दात असणा-या होत्या.

याच अनार्य मंडळींकडून आर्यांनी फणा काढणारा नाग, गदर्भावर आरुढ होणारी शीतला, कुत्र्यावर बसणारा भैरव तसेच विविध पक्षी, प्राण्यांची वाहने बाळगणारे देव आणि त्याचसोबत उंदरावर बसणा-या हत्तीमुखी विनायकाचाही स्वीकार केला. विनायकालाही पूर्वी पाच सोंडा किंवा वराहमुख असल्याचीही वर्णने आढळतात. आर्यांच्या कल्पनेत असा ओबडधोबड देव बसत नव्हता. म्हणून त्यांनी विनायकाचा कायाकल्प केला. त्याला सुबकपणा द्यायचा प्रयत्न केला.

सुवर्ण परशू धारण केलेली वैदिक देवता ब्रम्हणस्पती हाच गणपतीचा पूर्वावतार असल्याचे ठामपणे सांगितले जाऊ लागले. कार्यात विघ्न निर्माण होऊ नये, म्हणून गणेशाची अग्रक्रमाने पूजा करण्याची प्रथा आर्यांनीच प्रथम रुळवली. हळू हळू मूळ पूजा विस्मृतीत जावून विनायकपूजा मंगलकार्यातील अनिवार्य अंग बनली.

दुष्ट, वाईट कृत्ये करणा-या व्यक्तींची पुराणांनी नेहमीच अमानवी, राक्षसी वर्णने केलेली आहेत. ती व्यक्ती किती वाईट वर्तणुकीची होती, हे सांगण्यासाठी अशा वर्णनांचा आधार घेतला जाई. गणपतीच्या रुपाचे वर्णनही याच अंगाने केलेले दिसते. एका वर्णनानुसार विनायक खर्व म्हणजे ठेंगणा, गूढ गुल्फ म्हणजे आखूड पोट-यांचा, लंबोदर म्हणजे मोठ्या पोटाचा, विकट म्हणजे ओबडधोबड, वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा, गजमुख खवाल्ट म्हणजे हत्तीचे डोके आणि टक्कल असलेला, शूर्पकर्ण म्हणजे सुपासारखे कान असलेला, -हस्व नेत्र म्हणजे लहान बेडौल डोळे असलेला, लंबनासिक म्हणजे लांब नाकाचा, श्यामदंत म्हणजे काळसर दातांचा, धूम्रवर्णम्हणजे पिवळसर, काळसर रंगाचा, चवर्णलालस म्हणजे नेहमी काही ना काही चघळणारा, कमंडलूधर म्हणजे हाताशी कमंडलू असणारा, असा आहे.

मधल्या काळात अशा विघ्ने निर्माण करणा-या तांत्रिक गणेशाची पूजा मोठ्या प्रमाणात होऊ लागली. हा तांत्रिक गणेश अगदी देशविदेशांतही जाऊन पोहोचला. बौद्ध धर्माच्या माध्यमातून तो तिबेट, तुर्कस्तान, चीन, जपान, ब्रम्हदेश, सयाम, कंबोडीया, जावा, बाली आदी देशांत पोहोचला. बुद्धाने आपल्या आनंद नावाच्या शिष्यास रहस्यमय गणपतीहृदय मंत्र सांगितल्याचा उल्लेख आहे.

मांत्रिक लोक तीव्रा, ज्वलिनी, नंदा, भोगदा या शक्तींसह तांत्रिक गणेशाचे पूजन करतात. वाममार्गी मांत्रिक नग्न गणेशमूर्तींची पूजा करतात. तंत्रग्रंथात एकाच गणपतीचे अनेक प्रकार करून त्यांची विविध ध्याने सांगितली आहेत. एकमेकांना आलिंगन देणा-या गणेश आणि शक्तीच्या गजमुख मूर्तींचीही पूजा केली जाते.

या वाममार्गी उपासनेचा संप्रदाय चिनी सम्राट चेंन त्सुंगने आज्ञापत्र काढून बंद केला. सध्या ही उपासना भारतातही जवळपास  बंद झाली आहे. हिमालयात एक मुंडकटा गणेशाचे मंदिर आहे. या मूर्तीला मुंडकं नाही. पार्वतीने मळापासून बनवलेला आणि शिरच्छेद झालेला गणपती हाच. याच मुंडकटा गणपतीची तांत्रिक लोक अघोरी कार्यसिद्धीसाठी पूजा करतात. पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये अशा प्रकारच्या मुंडकटा गणपतीची पंचधातूंची मूर्ती पाहावयास मिळते.

विघ्नकर्ता गणेश विघ्नहर्ता, मांगल्याची देवता बनला तरी त्याच्या उपासनेत अजूनही पूर्वीच्या प्रथांचा अंश पाहायला मिळतो. ग्रहबाधा, रोगबाधा, विघ्नबाधा दूर व्हावी म्हणून  संकष्टीचे व्रत केले जाते. त्यात अथर्वशीर्षाची सहस्त्र आवर्तने, मोदकांचे हवन, लक्ष दुर्वा वाहून, जपजाप्य करून विनायकाची पूजा केली जाते. उजव्या सोंडेच्या गणपतीची शंकरासह देवांनी पूजा केली. डाव्या सोंडेचा गणपती मात्र मानवाच्या इच्छापूर्तीसाठी, पूजनासाठी योग्य समजण्यात आला. सर्वसामान्य लोक अजूनही डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करतात. तर उजव्या सोंडेच्या गणपतीची ठराविक घराण्यांमध्येच पूजा होते. कारण उजव्या सोंडेचा गणपती कडक असून त्याची त्रिकाळ पूजा करावी लागते. अन्यथा विघ्ने कोसळतात, अशी समजूत आहे.


गणपतीची जनमाणसातली प्रतिमा सकारात्मक झाली, ती गुप्तकाळात, असे म. म. काणेंचे मत आहे. गुप्तांचा इ.स. ३००पासूनचा २०० वर्षांपासूनचा काळ भारतवर्षाचा सुवर्मकाळ समजला जातो. या काळात कला, साहित्य, संस्कृतीची भरभराट झाली. नव्या पिढ्यांवर सुसंस्कार करणा-या सर्व पुराणग्रंथांना या काळात उजाळा देण्यात आला. या ग्रंथांमध्ये घुसडण्यात आलेल्या अनिष्ट बाबी काढण्यात आल्या. त्यातूनच गणपतीचे मंगलदायी रुप पुढे आले. तेथून पुढील सर्व वाड्.मयात गणपतीची एकमुखी प्रशंसा आढळते. त्यामुळे स्मृतीकारांची गणेशनिंदा लोकांच्या विस्मृतीतून लुप्त झाली. आणि श्रीगणेश मांगल्याची देवता म्हणून सर्वत्र पूजली जाऊ लागली...
(अपूर्ण)

No comments:

Post a Comment