'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Tuesday 30 August 2011

वायाळ गुरुजी

धोतर, टोपी घातलेले अण्णा क्लिक झाले. मीडियाचे, देशाचे हिरो झाले. पण हे होण्याअगोदर अण्णा कित्येक वर्षे राबलेत. गावच्या विकासासाठी त्यांनी दिवसरात्र एक केलेत. असे अनेक अण्णा महाराष्ट्राच्या खेडोपाड्यांत आहेत. माझ्या ओळखीचे असे एक गुरुजी आहेत, ज्यांना त्यांच्या कामातच रामसापडलाय.




भु-या आला..! म्हणताच, कोंबडीनं पटापट पिलं पंखाखाली घ्यावीत तशी अंगणात खेळणारी पोरंटोरं आज्यांच्या पाठीमागं दडली. झोपड्यांची गवती दारं बंद झाली. आणि कलकलणारी ठाकरवाडी चिडीचूप झाली. कर्ते बापे-बाया रानात गेले असताना वस्तीवर आलेलली ही पीडाच. पांढ-या कपड्यातला माणूस म्हणजे, त्यांच्या दृष्टीने पीडाच. कारण असा माणूस असायचा एखादा तणतण करत आलेला मळेवाला. किंवा हक्काचे मजूर न्यायला आलेला बागायतदार. त्याला ठाकरी भाषेत म्हणायचं भु-या’.
पण यावेळचा भु-या जरा वेगळा होता. शुभ्र पायजमा, शर्ट, गांधीटोपी. चेह-यावर मायाळू भाव. हे होते, गुरुजी. वाडीवर शाळा सुरू करायला आलेले, वायाळगुरुजी. गुरुजींना शाळेची इमारत काही दिसेना. झोपड्या बंद. विचारावं कोणाला?
गुरुजी समजले. उमजले. शाळा सुधारली तर ठाकरवाडी सुधारेल. मग त्यांनी कंबरच कसली.

सैंदाणे ठाकरवाडी
एका चंद्रमौळी झोपडीत शाळा सुरू झाली. पण शाळेत पोरं काही येईनात. मग गुरुजीच शाळा घेऊन एकेका झोपडीत गेले. झोपडीतल्या लोकांसोबत त्यांनी मीठभाकरी खाल्ली. गुरुजी त्यांची भाषा शिकले. त्यांच्यातलेच एक बनून गेले. ठाकरवाडीतल्या शेंबड्या पोरांना स्वच्छ अंघोळी घालू लागले. त्यांचे धूळमाखले कपडे धुवू लागले. मुलींचे वेणीफणी करू लागले. मग ही मुलं गुरुजींच्या शाळेत रमू लागली. सुरुवातीला मुलं शाळेत यायची ती गळ्यात गलोल अडकवलेली, लंगोट नेसलेली या वेषात. गुरुजींनी त्यांच्या पालकांना विनंती केली. पैसे एकत्र करून कापडाचा मोठा तागा आणला. वाडीतल्या शिंप्यांनं सवलतीत मुलांचे गणवेश शिवून दिले.




केवळ मुलंच नाही तर त्यांच्या पालकांनाही गुरुजींनी आपलंसं करून घेतलं. त्यासाठी शाळेव्यतिरिक्तच्या वेळात गुरुजी सकाळ संध्याकाळ या लोकांमध्ये मिसळू लागले. शाळेतली मुलं स्कॉलरशिपमध्ये चमकू लागली. काही दिवसांतच शाळेचं नाव जिल्ह्यात दुमदुमू लागलं. मुख्याध्यापक- रंगनाथ कोंडाजी वायाळगुरुजी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुक्काम- सैंदाणे ठाकरवाडी, पोष्ट- दोंदे, तालुका- खेड, जिल्हा पुणे.
पावसाळ्याचे तीन महिने वगळता डोंगराच्या कडेला वसलेली ही ठाकरवाडी पोटासाठी भटकत असायची. अपवाद फक्त शिमग्याचा. हा सण वाडी सलग पाच दिवस साजरा करते. हेच पाच दिवस गुरुजींनी हेरले. एकत्र जमलेल्या मंडळींची मनं वळविली. या दिवसांत वाडीजवळचा ओढा बुजवून जागा सपाट करण्यात आली. लाकूडफाटा, दगडधोंडे जमा झाले. आणि ठाकरवाडीची शाळा उभी राहिली. शाळेतले टेबल खुर्च्या या मंडळीनीच बनवल्या. शाळा म्हणजे वाडीच्या विकासाचा पाया ठरला.
पाईपलाईनचा लढा
गुरुजींनी डोकं चालवायला सुरुवात केली. वाडीत १७ कुटुंबं. पैकी १६ कुटुंबांकडं डोंगराळ का होईना पण ५४ एकर जमीन होती. ती कसायची न् भटकंती थांबवायची, असं ठरलं. जमिनीला पाणी नव्हतं. सरकारी बोअरलाही पाणी लागलं नव्हतं. काय करावं, विचार सुरू झाला. वाडीतल्याच गेना जाधव नावाच्या म्हाता-यानं युगत सांगितली. दूरवर असलेल्या भीमा नदीवरून पाईपलाईन करून पाणी आणण्याची. प्यायच्याबी पाण्याची सोय व्हईल म्हणाला.


पहिला मोठा प्रश्न उभा राहिला पैशांचा. तालुक्याची बँक गाठली. पण कंदमुळं खाऊन जगणा-या या फाटक्या लोकांवर विश्वास कोण ठेवणार? हे लोक कर्ज फेडतील याची काय गॅरंटी? मग यांनी जमीनच सरकारकडं गहाण ठेवली. शबरी पाणी पुरवठा संस्थेची नोंदणी झाली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनं दोन लाख सात हजार रुपये दिले. जानकीदेवी बजाज संस्थेनं काही पैसे दिले. कष्ट करायला मंडळी तयार होतीच. पाईपलाईन खोदाईला सुरुवात झाली. लेकुरवाळ्या आयाबाया लेकरांच्या झोळ्या झाडाला टांगून कामाला भिडल्या.
पण या लोकांपुढच्या अडचणींना इथूनच सुरुवात झाली. पाईपलाईनच्या कामात काही मंडळींनी अडथळे आणले. कारण सरळ होतं. हे लोक स्वत:च्या शेतीवर स्वावलंबी झाले तर आपल्या शेतीत मजुरीला येणार नाहीत. सर्व अडचणींना तोंड देत ४० दिवसांत पाईपलाईन पूर्ण झाली. नदीवरचं पंपहाऊस आणि २५ हजार लीटरची टाकीही श्रमदानातूनच उभी राहिली. विजेच्या पंपासाठी हवी वीज. त्यासाठी वीज अधिकारी, कर्मचा-यांच्या किती पायापडण्या. ते का कू करतात म्हणून गड्यांनी स्वत:च वीजेच्या तारा, खांब आणले. उभे केले. मग अडलं कनेक्शनवर. अधिकारी काही लक्ष देईनात. मग या मंडळींनी विद्युतमंडळाच्या ऑफिससमोर ठाणच मांडलं. तीन दिवस. शेवटी कनेक्शन मिळालं. नदीचं पाणी शेतात आलं.
वाडीनं पहिल्यांदाच शेतात कांद्याचं पीक घेतलं. पीकही भरपूर आलं. १० वर्षं मुदतीचं बँकेचं कर्ज एकाच वर्षात फिटलं. मजुरीच्या पैशांतून वाडीत नळकोंडाळी बांधली गेली.
याअगोदर गुरुजींनी वाडीत एक महत्त्वाचं काम केलं होतं. वाडीत घराघरांत दारूच्या भट्टया होत्या. बाप्ये दिवसरात्र नशेत झुलत असायचे. गुरुजींनी वाडीतल्या सगळ्या बायकांना एकत्र केलं. दारुच्या हातभट्टया बंद पाडल्या. बाप्यांची दारु सोडवण्यासाठी खूप प्रयत्न झाले. यश येईना. मग गुरुजींना आयडिया सुचली. प्यायलेल्या गड्याला शाळेत आणायचं. सर्वांसमोर उभं करायचं. हा उपाय बाकी रामबाण निघाला. ठाकरवाडी दारुमुक्त झाली.

शिकलेली आई घरादाराला पुढं नेई
गुरुजी एकेक टप्पा यशस्वीपणे पार करत होते. शिकलेली आई घरादाराला पुढं नेई या सत्याची गुरुजींना जाणीव झाली होती. त्यामुळे त्यांनी महिलांना साक्षर करण्याचे प्रयत्न सुरू केले. आज वाडीतल्या सर्व महिलाच काय पण सगळी वाडीच १०० टक्के साक्षर झालीय. गुरुजींच्या प्रेरणेनं महिलांनी इंदिरा महिला मंडळ स्थापन केलं. मंडळाने बचत गट सुरू केले.
आदर्श शाळा आणि आदर्श गाव बनलेल्या या ठाकरवाडीला अनेक मान्यवर भेटी द्यायला येऊ लागले. आपल्या मोलमजुरीतून आलेल्या पैशांतून महिला या पाहुण्यांचं आदरातिथ्य करतात. मजुरीवर गेल्यावरही वाडीला भेट द्यायला कोण आलं होतं, ते आम्हाला सांगा, अशी गळ त्यांनी गुरुजींना घातली. त्यासाठी त्यांनी एक कॅमेराही गुरुजींना घेऊन दिला. फोटो डेव्हलपिंग वगैरेचा खर्च महिलांचाच.
या महिलांनी निर्धूर चुलीचं प्रशिक्षण घेतलं. प्रत्येक झोपडी आणि संपूर्ण वाडी धूरमुक्त झाली. तशी पंचक्रोशीही व्हावी, ही त्यांची इच्छा. म्हणून त्या या निर्धूर चुली इतरांनाही बनवून देतात.
या महिलांनी साक्षरतेवर मोठी सुंदर गाणी रचली आहेत. पुणे आकाशवाणीने त्यांना या गाण्यांची कॅसेटही बनवून दिली आहे. कुटुंबनियोजनातही महिलांनीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळंच १९८४मध्ये ३७६ असलेली लोकसंख्या २०००सालापर्यंत ४००पर्यंतच मर्यादीत राहिली.
या लोकांनी मुलगा-मुलगी एक समान मानली आहे. वाडीतील एका जोडप्यानं दोन मुलींवर शस्त्रक्रिया करून घेतली आहे.


परिश्रमाची फळं
वायाळगुरुजी वाडीत आले तेव्हा शेजारचा डोंगर आणि परिसर उघडाबोडका होता. मग सुरू झाला वृक्षारोपणाचा उपक्रम. एकेकाळी फक्त लाकडाच्या मोळ्या विकणे हाच पोट भरण्याचा मार्ग असणा-या ठाकरमंडळींनी डोंगर, परिसर, शेताचा बांध जिथं मोकळी जमीन दिसेल तिथं झाडं लावली. ती वाढवली. आज १६ हजारांहून अधिक झाडांच्या गर्दीनं वाडीला वेढलंय. या राईत शेकडो मोर राहायला आलेत. या वनराईसाठी लागणारी रोपंही गुरुजींच्या विद्यार्थ्यांनीच बनवली. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांनी तयार केलेल्या रोपांतून शाळेला पैसे मिळाले.
झाडं जगवण्याच्या कामानं मात्र सत्वपरीक्षा पाहिली. झाडांना पाणी घालण्यासाठी गुरुजींना दूरवरच्या विहिरीतून स्वत: पाणी शेंदून आणावं लागलं. अर्थात मुलं मदतीला होतीच. एकदा विहिरीतून पाणी काढताना दोन मुलं विहिरीत पडली. गुरुजींनी धावत जाऊन त्यांना वाचविलं. तेंव्हापासून गुरुजी एकटेच झाडांना पाणी घालू लागले. हाताला फोड येईपर्यंत.
टेबलखुर्च्यांप्रमाणेच शाळेचे वर्गही बांधले गेले या ठाकरमंडळींच्या मजुरीच्या पैशातूनच. गवंडी, सुतारकामही त्यांनीच केलं.
पुण्यात राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांचं जंगी आयोजन झालं होतं. विद्यार्थ्यांना त्या पाहायला मिळाव्यात म्हणून वाडीतल्याच लोकांनी पुन्हा मजुरीतल्या पैशांतून टीव्ही आणला. त्यांनाही एकत्र जमायचं निमित्त मिळालं.
गुरुजींच्या प्रयत्नातून ठाकरवाडीला विकासाची वाट सापडली. शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय, शेळीपालन वाडीत यशस्वी झाले.
२०००मध्ये गुरुजींच्या शाळेत गेलो होतो. गुरुजी शाळा आणि ठाकरवाडीबद्दल भरभरून सांगत   होते. एवढ्यात एक मुलगी आत आली. गुरुजींच्या पायाशी वाकली. गुरुजींनी मायेनं विचारपूस केली. तिचं नाव पारुबाई.
ही माझी विद्यार्थिनी. पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये नर्सचं ट्रेनिंग घेतेय. माझ्या परिश्रमाला आलेली ही फळं आहेत...गुरुजींना भरून आलं.आयुष्यभराचं समाधान त्यांच्या डोळ्यांतून ओघळत होतं.
जेथे जातो तेथे...
त्यानंतर गुरुजींचा संपर्क तुटला. एकदा तालुक्याच्या गावी जाताना रस्त्याकडेच्या एका वाडीतली शाळा पाहून थांबलो. काय सुंदर शाळा आहे असं म्हणत, गेटच्या आत गेलो. अचानक वायाळगुरुजी आठवले. मी विचारलं, मुख्याध्यापक कोण आहेत हो इथं?  उत्तर मिळालं वायाळगुरुजी!
तिथंच समजलं. नंतरच्या काळात ब-याच घडामोडी घडल्या. गुरुजींची ठाकरवाडीच्या शाळेतून बदली झाली. ठाकरमंडळी ऐकेनात. पोरंबाळं घेऊन आख्खी वाडी पंचायतसमितीसमोर जाऊन बसली. पण शेवटी राजकारणी सरस ठरले. त्यानंतर गुरुजींची बदली दोन शाळांमध्ये झाली. गुरुजींनी तिथंही नंदनवन फुलवलं.
गुरुजी रिटायर झालेत. पण काम अखंड सुरू आहे. शेजारपाजारची मुलं जमव, एखाद्या शाळेत जाऊन मुलांना शिकव, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना व्याख्यानं दे, असं सारं सुरू आहे. हे सांभाळून शेतीत राबतात. समाधानानं डोलणारं एखादं शेत कधी तुम्ही पाहिलंय का? पाहायचं असेल तर वायाळ गुरुजींचं शेत पाहायला चला. गुरुजी हात जोडून उभे राहतील. आणि मळ्याविषयी भरभरून सांगायला सुरुवात करतील.

No comments:

Post a Comment