'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Tuesday 23 August 2011

सावध ऐका पुढल्या हाकामुंबईतल्या धावपळीतून आणि उकाड्यातून सुटका करून घेतली. बायकोपोरासह चार दिवसांसाठी गाव गाठलं. उन्हाळा तिथंही हजर होताच. नांगरलेल्या शेतातली ढेकळं आभाळाकडं तोंड करून पडलेली. तापलेल्या तव्यावर उमललेल्या लाह्यांसारखी. माणसं, गुरं, पखरं सावलीचा आडोसा पकडून चिडीचूप बसलेली. सकाळी उन्हं चढण्यापूर्वी आणि संध्याकाळी उन्हं उतरल्यावर जरा बरं वाटायचं.

एका सकाळी आई म्हणाली, चल रे, आपुन जरा धान्याला ऊन दावू. लै सोंडे झालेत. लिंबाच्या पाल्यालाही दाद देत नाहीत. धान्याला ऊन दाखवायला मदत करणं हा लहानपणीचा माझा आवडता कार्यक्रम. पोत्यातलं धान्य शेणाणं स्वच्छ सारवलेल्या ओट्यावर ओतायचं. हातानं पसरवायचं. तो रवाळ स्पर्श मला फार आवडायचा. धान्य दिवसभर खरपूस तापायचं. त्यातले सोंडकिडे कुठं तरी पळून जायचे. मग संध्याकाळी धान्य पोत्यात भरून, लिंबाच्या पाल्यानं पोत्याचं तोंड बंद करायचं. पोती पुन्हा घरात नेऊन थप्पीला लावायची.

धान्य ओट्यावर आणताना आईची टकळी सुरू होती. आवंदाचा उन्हाळा काही इपरीतचै बाबा. दिवसा दिवसानं लांबतच चाललाय. ह्याचं आसं आन् पावसाचं तसं. येकदा त्वांड फिरावलं की फिरावलं. बरं आता नवीनच शिकलाय. एकदा ठाण मांडून बसला की जायचं नावच घेत नाही. हातातोंडाशी आलेली पिकं घिऊन जातो. गारठंही रेंगाळतं. पूर्वी असं नव्हतं बाबा. उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाळा. गारठ्याच्या दिवसांत गारठं. आता सगळं उलटं-पालटंच झालंय... मुंबईतल्या पावसाचा वगैरे अनुभव सांगत मीही तिच्या ऊन-पाऊस पुराणाला दुजोरा देत राहिलो.

सगळी पोती बाहेर काढली तेव्हा पोत्यांखाली बरीचशी माती दिसली. उधई लागलीय जणू.. आई पुटपुटली. उत्सुकतेनं माती उकरली तर लाल भगव्या डोक्यांच्या पांढ-या उधयांची (वाळवी) वसाहतच सापडली. मातीच्या मऊशार घरात त्यांनी कितीतरी धान्य साठवलं होतं. धान्याचं मातेरं केलं होतं.यांना एक बरकत आलीय. चांगली नसती बरं बाबा ही उधई. आई आता काही तरी शुभ अशुभ पुराण सांगणार म्हणून मी विषय बदलला.
त्या दिवशी ऑफिसात असताना एकदम त्या उधयांची आठवण झाली. लगेच इंटरनेटवर जाऊनगुगलगुरुंना विचारलं. त्यांनी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचा एक शोधनिबंध पुढं ठेवला. ग्लोबल वॉर्मिंगमुळं माणूस, प्राणी, वनस्पतींना अपायकारक असणा-या कीडा-मुंग्या, किटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होतेय. यानिमित्तानं ग्लोबल वॉर्मिंगविषयी अनेक भल्या-बु-या गोष्टी वाचायला मिळाल्या. मला आईच्या बोलण्याचा संदर्भ लागू लागला.

ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीभोवतीच्या तापमानात वाढ होणं. या तापलेल्या तापमानानं जगभर गडबड सुरू केलीय. म्हणजे उन्हाळा नको तेवढा तापू लागलाय. पाऊस नको तेवढा पडू लागलाय. उन्हाळ्यात आपल्या जळगाव भुसावळचं तापमान ५० अंशांवर तर पु्ण्याचं तापमानही ४२ अंशांवर जाऊ लागलंय. मुंबईतला २६ जुलैचा पाऊस आठवतोय का? तोही याच ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम, असा निष्कर्ष काढला जातोय. मुंबापुरीत धो धो बरसणा-या पावसानं त्याच वेळी राज्यातल्या कित्येक गावांकडं पाठ फिरवली होती. केवळ महाराष्ट्रालाच नाही तर आख्ख्या जगाला सध्या असल्या परिणामांना तोंड द्यावं लागतंय. त्सुनामीच्या संकटाचा संदर्भही या ग्लोबल वॉर्मिंगशी लावला जातोय. तसं निसर्गाचं रहाटगाडगं शतकानुशतके सुरूच आहे. पण गेल्या काही वर्षांपासून यात काही तरी बदल होतोय, हे जाणवायला लागलंय.

सुरुवात झाली उत्तर ध्रुवापासून. तिथल्या थंड वातावरणात राहणा-या सील, पेंग्विनसारख्या प्राण्या पक्षांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला. अंटार्क्टिकावरचं बरचसं बर्फ वितळू लागलं. हा सगळा ग्रीन हाऊस वायूंचा प्रताप आहे हे लक्षात आलं. होय ग्रीन हाऊस म्हणजे तेच, शेतातलं. ज्यात प्लॅस्टिकच्या घुमटाखाली, नियंत्रित तापमानात वेगवेगळ्या प्रकारची पिकं, भाज्या, फुलांची उत्तम वाढ होते. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये प्रत्यक्ष हे ग्रीन हाऊस नाही तर ग्रीन हाऊस ही फक्त संकल्पना वापरलीय. इथला घुमट आहे आकाशाचा. त्यात आहेत वातावरणातले विविध स्तर. हे स्तर भेदून सूर्याची अतितीव्र किरणं पृथ्वीपर्यंत येतात. आणि पृथ्वीवरून पुन्हा आकाशात जातात. यातली काही कमी तीव्रतेची किरणं धूळ, बाष्पकण आदींमुळं वातावरणातच अडवली जातात. यामुळं पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचा, तापमानाचा एक समतोल साधला जातो. पण याच प्रक्रियेत ग्लोबल वॉर्मिंगमुळं बिघाड होत चाललाय. जमिनीवरून अवकाशात जाणारी किरणं मिथेन, कार्बनडायऑक्साईड आदी वायूंमुळं वातावरणातच धरून ठेवली जाताहेत. त्यामुळं तापमानात वाढ होत चाललीय. वाढत्या औद्योगिकरणामुळं या तापमान वाढवणा-या वायूंचं प्रमाण वाढतंय.

जमिनीपासून साधारणत: ३० किलोमीटरवर ओझोन वायूचा स्तर आहे. सूर्याकडून येणारी अल्ट्राव्हायोलेट अर्थात अतीनील किरणं या स्तरात शोषली जातात. पण वाढत्या तापमानामुळं हा ओझोनचा स्तर विरळ होऊ लागलाय. अंटार्क्टिकासारख्या भागात ओझोनच्या स्तराला भोकं पडू लागलीत. कारण इथं मुळातच हा स्तर विरळ आहे. यात भर पडतेय CFC म्हणजेच क्लोरोफ्लुरो कार्बनची. याच्या निर्मितीला तर पूर्णपणे माणूसच कारणीभूत आहे. कारण CFC तयार होतो, शीतकरणासाठी वापरल्या जाणा-या वायूंमधून. त्यामुळं एसी, फ्रीज एवढंच काय पण परफ्यूम, दाढीचा फसफसणारा साबुण वापरणारे आपण सगळेच या वायूंच्या प्रमाणात वाढ करण्यास आणि परिणामी ग्लोबल वॉर्मिंग वाढवण्याच्या पापात सहभागी आहोत.


शास्त्रांच्या मते या ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम लवकरच दिसू लागेल. उत्तर ध्रुवावरचं बर्फ वितळेल आणि समुद्राची पातळी दीड फुटानं वाढेल. यामुळं किना-यालगतची शहरं पाण्याखाली जातील. हे ग्लोबल वॉर्मिंग माणसांच्या जगण्याशी खेळायला सुरुवात करेल. कारण तापमान वाढल्यानं वातावरणात विषाणूंची वाढ होईल. आणि विषाणूजन्य आजारांच्या साथी सुरू होतील. नाही तरी हे विषाणूजन्य आजार येऊ नयेत यासाठी पूर्वकाळजी घेणं एवढंच माणसाच्या हातात आहे. शिवाय अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळं त्वचेच्या कॅन्सरचं प्रमाण वाढेल. (नशीब, भारतासारख्या देशांमधल्या काळ्या कातडीच्या लोकांना हा धोका कमी आहे.) पृथ्वीवर माणसासह १५० लाख जीव प्रजाती आहेत. त्यापैकी १० लाख प्रजाती ग्लोबल वॉर्मिंगमुळं संकटात येणार आहेत. तर एकवीसशे प्रजाती नष्ट होण्याची शक्यता आहे.

ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वात गंभीर आणि चिंताजनक परिणाम म्हणजे, अन्न धान्य आणि शेतीउत्पादनात होणारी घट. यामुळं जगभर अन्नाचा तुटवडा जाणवेल. गरीब देशांना अन्नासाठी श्रीमंत देशांकडं हात पसरावा लागेल. १९७२चा भारतातला दुष्काळ आठवा. अमेरिकेतून आलेला नित्कृष्ट दर्जाच्या लाल मिलूवर दिवस काढायची वेळ भारतातल्या गोरगरीबांवर आली होती. अमेरिकेनं या मिलूसोबत गाजरगवत उर्फ काँग्रेसची भेट पाठवली होती. शेतात माजणा-या या गवतानं शेतक-यांच्या नाकात दम आणालाय. अजूनही कमी उत्पादनामुळं भारताला गहू आयात करावा लागतोय.
भारतासारख्या देशातली शेती अवलंबून आहे, ती मान्सूनच्या पावसावर. मान्सूनच्या निर्मितीला कारण ठरणा-या एल् निनोवर वाढतं तापमान परिणाम करू लागलंय. मान्सून केरळमध्ये उशिरा किंवा लवकर दाखल होणं, हा त्याचाच परिणाम. ग्लोबल वॉर्मिंगनं हवामान खात्याला तर केव्हाच चकव्यात अडकवलंय. यामुळं पेरणीचं, पिक काढणीचं तसंच रब्बी आणि खरीप हंगामाचं वेळापत्रक दिवसेंदिवस विस्कळीत होत जाईल.

तापमानात बदल झाल्यानं वाढणा-या विषाणूंचा, किडीचा प्रादुर्भाव पहिल्यांदा पिकांवर होतो. त्यामुळं पीकउत्पादनात मोठी घट होते. कोकणातले आंबाउत्पादक, नाशिक, सांगलीचे द्राक्षउत्पादक यांना दरवर्षी या बदलत्या हवामानाचा फटका बसू लागलाय. हवामान बदलताच द्राक्ष, आंब्याचा मोहोर गळून पडतोय. काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारीसारख्या धान्यपिकांचीही तीच गत. पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजीपाल्यासारख्या नगदी पिकांचीही त्यातून सुटका नाही. पण दुर्दैवानं त्याबाबत अजूनही अंधश्रद्धा जोपासल्या जातायत. मध्यंतरी पश्चिम महाराष्ट्रात एका प्रकारच्या किडीमुळं भाजीपाल्याच्या पानांवर सापाच्या आकाराची नागमोडी नक्षी उमटली होती. अर्थात किडीनं पानांमधला रस शोषून घेतला होता. पण हा काही तरी नागदेवाचा प्रकोप म्हणून गावागावांत बेमोसमी नागपंचमी साजरी करण्यात आली होती!

एका अभ्यासानुसार ग्लोबल वॉर्मिंगमुळं तापमानात अशीच वाढ होत राहिली तर भारत, बांगला देश, व्हिएतनाममधील भातपिकाला याचा मोठा फटका बसेल. दक्षिण आशियातील बहुतेक देशांमधलं भाताचं उत्पादन १० टक्क्यांनी घटेल. पंजाब, हरियाणामधलं गव्हाचं उत्पादन तर आताच ०.९५ टक्क्यांनी घटलंय. २०३०मध्ये मका, ज्वारी, बाजरी, नाचणीसारख्या धान्यांच्या उत्पादनात दक्षिण आफ्रिकेत ३० टक्के घट होईल. भारतातल्या शेतीउत्पादनात ३० टक्के तर पाकिस्तानात २० टक्के घट येईल. लॅटिन अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये १५ ते १८ टक्के शेतीउत्पादन घटेल.

जपानसारख्या देशाच्या समुद्रशेती, मासेमारीवर संकट येईल. हवामान बदलाचा हा परिणाम वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळा पाहायला मिळेल. म्हणजे पाकिस्तानातलं धान्यउत्पादन ५० टक्क्यांनी घटू शकेल. तर थंड हवामान असलेल्या युरोपियन देशांमधलं मक्याचं उत्पादन २५ टक्क्यांनी वाढेल! ग्लोबल वॉर्मिंगमुळं अन्नधान्याचं उत्पादन वाढेल, असं काही संशोधकांचं मत आहे. कारण कारबनडायऑक्साईडचा वापर करून थंड प्रदेशातली पिकं फोफावतील. पण हे उत्पादन बाळसं नसून सूज असल्याचं मत काही तज्ज्ञांचं आहे.
तापमानवाढीचा विपरीत परिणाम शेतजमिनींमधल्या खनिजांवर होऊन जमिनीची सुपिकता कमी होईल. क्षारपड जमिनींमध्ये वाढ होईल.
ग्लोबल वॉर्मिंगमुळं वनस्पतींना नायट्रोजन कमी मिळाल्याचा एक वेगळाच साईड इफेक्ट समोर आलाय. तो म्हणजे, शेळ्या मेंढ्यामधील प्रजननक्षमतेत होत असलेली घट. शेळीपालनासारखा शेतीपूरक व्यवसाय करणा-या शेतक-यासाठी भविष्यात एक मोठीच डोकेदुखी ठरेल.

तापमानातील वाढीमुळं प्रामुख्यानं कोरड्या दुष्काळाचं संकट ओढावेल. पाण्यावाचून पिकं सुकून जातील. अलिकडं म्हणजे २००३मध्ये अनेक युरोपीय देशांनी अशी दुष्काळाचा अनुभव घेतलाय. वाढणा-या तापमानामुळं २०३५पर्यंत हिमालयात उगम पावणा-या गंगा, ब्रम्हणपुत्रा, सिंधू, यांगत्सी, मकॉन, साल्वी, यलो या नद्या आटण्याची शक्यताही एका अभ्यासात व्यक्त करण्यात आलीय. भारत,चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान बांगलादेश, नेपाळ, म्यानमार या देशांमध्ये पूर तसंच दुष्काळाचं संकट येऊ शकतं. एकटी गंगा नदी ५०० दसलक्ष लोकांची जीवनदायिनी आहे. भविष्यात गंगेसारख्या इतर नद्यांवर अवलंबून असणारी किती शेती आणि जनजीवन संकटात येईल, याचा अंदाज आपण बांधू शकतो. दक्षिण अमेरिकेलाही अशा संकटांचा सामना करावा लागेल. त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरणा-या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वांनाच कंबर कसावी लागेल. पर्यावरणाचा हास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
विकसनशील देशांना तर या ग्लोबल वॉर्मिंगचा मोठाच फटका बसणार आहे. कारण शेती हा त्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. उद्योगक्षेत्रात मुसंडी मारणा-या चीनसारख्या देशानं याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. कार्बनडायऑक्साईड निर्माण करणारा जगातला दुस-या क्रमांकाचा देश म्हणून चीनची ओळख होऊ लागलीय. आणि भारतानं या शेजारी चीनपासून धडा घेणं गरजेचं आहे. अजूनही भारतातली कोट्यवधी जनता शेतीवर जगते. नव्हे इतरांना जगवते. मात्र प्रगती करण्यासाठी आपण चीनचंच सेझ मॉडेल देशात राबवण्याचा प्रयत्न करतोय. शेतकरी या सेझला विरोध करतायत. त्यांचा विरोधही आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यांच्याकडं दुर्लक्ष करणं संकटाला आमंत्रण देणारं ठरू शकेल.
आईच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. विषय टाळून चालणार नाही, हे एव्हाना माझ्या लक्षात आलंय. ते तुमच्याही लक्षात येवो. काळ्या आईच्या हाका तुम्हालाही ऐकू येवोत.
('ग्लोबल वॉर्मिंग : खरे काय खोटे काय?' या कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या विशेषांकात हा लेख छापला गेला आहे.) 

No comments:

Post a Comment