'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Thursday, 25 August 2011

मावळ होईल इतिहासजमा !

त्या दिवशी समोरच्या सगळ्या चॅनेल्सवर व्हिज्युअल्स लूप करून करून दाखवली जात होती.. नेम धरून धरून सिनेमातल्यासारखं पोलीस ढिशक्याँव ढिशक्याँव गोळ्या झाडत होते.. लोक पळत होते. पोलीस पाठलाग करत होते. फायरिंग करत होते.. 
थोड्या वेळानं मृतांचे, जखमींचे आकडे झळकू लागले. मग पीडितांचे, पोलिसांचे बाईट. अरे, हे तर ओळखीचे चेहरे. मी मनात म्हणतो. 
उंच दिवालाच्या टोप्या, धुवट नेहरू शर्ट पायजमे, शर्टातून डोकावणा-या तुळशीच्या माळा. भोळी भाबडी, कष्टाळू, मायाळू मावळ परिसरातली मावळी माणसं. अटीतटीचं बोलत होती. फारच अस्वस्थ व्हायला झालं.



रात्री जेवतानाही टीव्हीवर तेच, ढिशक्याँव ढिशक्याँव…घास घशाखाली उतरेना. वाटलं, घाला गोळ्या.. म्हणून ज्यानं गोळीबाराचे आदेश दिले त्याला रात्रीचं जेवण गेलं असेल काय?
कोणाशी तरी बोलावंसं वाटू लागलं. गुरुजींना फोन लावला. ज्ञानदेव लोंढेगुरुजी. रिटायर झालेत. पुण्यात राहतात. नोकरीची सगळी वर्षे मावळातल्या दुर्गम गावांत गेली. गुरुजी म्हणजे मावळ्यांच्या गळ्यातला ताईत. सकाळ संध्याकाळ गुरुजींची चौकशी. राहवलंच नाही तर शाळेत जायचं. गुरुजींना काय हवं नको पाहायचं. घर, संसार, शेतीतल्या बारीकसारीक गोष्टी गुरुजींना सांगायच्या.



संध्याकाळी गुरुजींच्या भजनाला दमले खमले मावळे गडी आवर्जून हजेरी लावायचे. गुरुजी आठवणी सांगतात, नवीनच नोकरी मिळाली ती लोणावळ्याजवळच्या डोंगरगाववाडी या दुर्गम खेड्यात. मैलोन् मैल पायपीट करून गुरुजी न् बाई पोहोचल्या. गावातल्या बायकांनी अगोदरच घर लख्ख सारवून ठेवलं होतं. आख्खी वाडी जमली. बायकापोरं या ढवळ्या कापडातल्या उभयतांना न्याहाळू लागली. बॅगाबिगा ठेवतायत तोच गर्दीतल्या एकाला महत्त्वाचं काही तरी आठवलं. आन् गुरुजी तुम्हाला फाट्या हो?’ गुरुजी आणि बाईंनी न उमगून एकमेकांकडं पाहिलं. तोपर्यंत आणतो आम्ही म्हणत पंचवीसेक माणसं रानाकडं चालती झाली. संध्याकाळी फाट्यांच्या अर्थात कारवीच्या व्यवस्थित बांधलेल्या पंचवीसेक मोळ्या गुरुजींच्या अंगणात येऊन पडल्या. पुढं मावळातला धो धो पाऊस सुरू झाल्यावर गुरुजी आणि बाईंना फाट्यांचं महत्त्व लक्षात आलं.

बाळकै-यांचं लोणचं असो, म्हशीचा ताजा खरवस असो की आंबेमोहराचा पहिला भात गुरुजी आणि बाईंना दिल्याशिवाय गावाला गोड लागायचा नाही. आजारपणात गावक-यांनी धार पावसात गुरुजींना झोळीत घालून लोणावळ्याला दवाखान्यात नेलं होतं. दोनदा मरणाच्या वाटेवरून परत आणलं होतं.
गुरुजी गोळीबारात मेलेले ते साठे माहिती आहेत काय हो? मी गुरुजींना विचारलं. हो तर. गावातला सगळ्यात उंचधडंग माणूस. पण स्वभावानं फार गरीब. कोणाच्याही मदतीला धावायचा. ड्रायव्हर होता. बऊरच्या पुलावर आंदोलनासाठी गेलेल्या गाड्यांमध्ये हाही असणार. वाईट झालं. त्याला दोन मुली न् लहान मुलगा आहे. माणसं भोळी आहेत हो ती.

गुरुजी मावळातल्या माणसांच्या आठवणी लिहितायत. वाचल्या, तर गो. नी. दां.चा पवना काठचा धोंडी डोळ्यापुढं उभा राहिला. तुंगी गडाखालच्या हरेक माणसाची काळजी वाहणारा, त्यांच्या अडीनडीला उपयोगी पडणारा. शिवरायांनी दिलेली हवालदारकी प्राणपणानं जपणारा न् काळ्या आईसाठी जीव टाकणारा.



बारा मावळ पाच परगणे
मावळातली माणसं म्हणजे या धोंडीचीच रुपं. बाभळीच्या बळकट बुंध्यासारखी, काळ्या कातळाच्या छातीची न् लोण्यासारख्या मऊ मनाची. त्यांचा चांगुलपणा पाहूनच जैन, बौध्द ज्ञानवंतांनी त्यांच्या डोंगरात लेणी खोदली. ज्ञानोबा, तुकोबानं त्यांच्या रानात समता, बंधुभावाची पेरणी केली. मोगलाई माजली तेव्हा त्यांच्या शेता शिवारात शिवरायानं जन्म घेतला.

नाचणीची लाल भाकरी, हिरव्या मिरच्यांचा ठेचा न् कांदा खाणा-या, उन्हाळा पावसाळा शेतात राबणा-या या काटक मावळ्यांनी साथ दिली आणि शिवबा रयतेचा राजा झाला. लंगोटी लावून भातखाचरांत राबणारे मावळी तरुण शिवरायांच्या दरबारात सेनापती, सरदार, मनसबदार बनले. अठरापगड जातीतले हे शिवरायांचे सवंगडी स्वराज्यासाठी शीर तळहातावर घेऊन उभे राहिले. स्वराज्याचे असे पाइक होण्याची शिकवण त्यांना देहूच्या तुकोबारायांनी दिली. त्यांनी या मावळ्यांसाठी पाइकीचे अभंग लिहिले.
पाइकीचे सुख पाइकासी ठावे। म्हणोनिया जीवें केली साटीं।।
येतां गोळ्या बाण सहिले भडमार। वर्षता अपार वृष्टी वरी।।
स्वामीपुढे व्हावें पडतां भांडण। मग त्या मंडन शोभा दावी।। या अभंगांनी त्यांची स्वराज्यभक्ती पक्की केली.

तर दुसरीकडं कड्याकपा-यांत राहणा-या रामदास स्वामींनी
वन्ही तो चेतवावा रे। चेतवीतांचि चेततो।।
केल्याने होत आहे रे। आधी केलेचि पाहीजे।। असं सांगत मावळ्यांच्या मनात राष्ट्रभक्तीचा वन्ही चेतवला. आणि या सह्याद्रीच्या छाव्यांनी जुलमी मोगलाईला आस्मान दाखवलं.


पुण्याजवळच्या या प्रदेशाला म्हणतात, मावळ. आणि त्यात राहणारे ते मावळे. हा परिसर म्हणजे शहाजीराजांच्या पुणे जहागिरीतले पाच परगणे आणि बारा मावळ. तशी पुणे जिल्ह्यातल्या डोंगररांगांत एकूण चोवीस मावळ आहेत. त्यातील बारा आहेत पुण्याच्या भोवताली आणि दुसरी बारा आहेत, जुन्नर शिवनेरी परिसरात. दोन डोंगररांगांच्या मधल्या खो-याला म्हणायचं मावळ.
एकेका मावळात आहेत पन्नास ते शंभर खेडी. या खेड्यांवर न् त्यात राहणा-या निष्ठावान मावळ्यांवर शिवरायांचा मोठा जीव. मोगलाईत भरडलेल्या इथल्या रयतेसाठी त्यांनी स्वराज्य उभारलं होतं. त्यामुळं परकीयच नाही, तर आपल्या सैनिकांकडून रयतेवर चुकूनही अन्याय होऊ नये म्हणून महाराजांनी खास आज्ञापत्रं जारी केली होती. फक्त जित्या माणसांचीच नव्हे तर रयतेच्या शेताची, गवताची, झाडांची, जनावरांचीही महाराजांना काळजी होती.

'' प्रजेनें पोटच्या पोराप्रमाणें वाढविलेलीं झाडें, हयांची फळें खबरदार कोणी तोडून घेईल तर? रयतेच्या गवताच्या काडीसहि कोणी स्पर्श करतां कामा नये!'' असा त्यांचा सैनिकांना आदेशच होता. एका आज्ञापत्रात तर ते म्हणतात, गडावर तुम्ही शेकोट्या पेटवता, त्या नीट विझवा. एखाद्या ठिणगीने हाहा:कार होईल.
पहारेक-यांनो, तेलाच्या पणत्या विझवून झोपा. नाही तर पणतीतल्या तेलातल्या जळत्या वाती उंदीर पळवतील. ती वात गवताच्या एखाद्या गंजीखाली पडेल. शेतक-यांच्या जनावरांचा वर्षभराचा चारा खाक होईल. शेतक-यांच्या बांधावरची झाडं का तोडू नका, यामागचं कारणही ते आपल्या सैनिकांना समजावतात. काय म्हणोन की, ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होतात, असे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काळ जतन करून वाढवली. ती झाडे तोडलीयावरी त्यांचे दु:खास पारावार काय?’ आपली स्वराज्याची भूमिका आपल्या सामान्य स्वार, बारगीरांच्या मनात उतरवताना महाराज म्हणतात, एकास दु:ख देऊन जे कार्य करील म्हणेल ते करणारासहित स्वल्पकाळे बुडोन नाहिसे होते. धन्याचे पदरी प्रजा पीडण्याचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावी हानीही होते. मग स्वराज्याचे काम करावे तरी कसे, असे एखादा नक्कीच विचारेल हे लक्षात घेऊन महाराज आपल्या आज्ञापत्रात पुढे सांगतात, एखादे झाड, जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल, तर धन्यास राजी करून द्रव्य देऊन, त्याचा संतोष करून तोडून न्यावे. बलात्कार सर्वथा न करावा!’

ही माणसंही तेवढीच गुणी. इथल्या भातखाचरांत ती असा आंबेमोहोर पिकवतात की
द-याखो-या घमघमून जातात. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिहितात, शिजणा-या भाताच्या पेजेवर तुपाळ थर जमतो. खुशाल वात भिजवून ज्योत लावा. नाजूक व सोन्यासारखा उजेड पडेल. मावळमय झालेले गो. नी. दांडेकर लिहितात, पवनाकाठचा तांदूळ तर तापानं फणफणलेल्या माणसाला खाऊ घालावाच. पण नागली अन् जोंधळाही आजा-याला बाधायचा नाही.
मावळमातीची ही सय आली ती परवाच्या गोळीबाराच्या घटनेनं. तिघाजणांचे बळी गेले. जखमी कित्येक. एवढं काय आभाळ कोसळलंय? एवढी का पिसाळलीत ही माणसं? काय म्हणणं आहे त्यांचं? आता परवाचं निमित्त पवनेतल्या पाण्याचं.


पाणी केवळ निमित्त
पवना धरणातलं धरणातलं पाणी बंद पाईपलाईनमधून पिंपरी चिंचवडला नेण्याची योजना आहे. २०३५ ची जनगणना लक्षात घेऊन २९ लाख लोकांना पाणी पुरवण्यासाठी या पाईपलाईनचं नियोजन करण्यात आलंय.
पवना धरणात सध्या १०.५० टीएमसी पाणीसाठा आहे. ४० वर्षांत धरणातला गाळ काढलेला नाही. तो १ टीएमसी तरी आहे. बाष्पीभवन अर्धा आणि मृतसाठा दीड टीएमसी सोडून पाणीसाठा उरला साडेसात टीएमसी. त्यापैकी साडेसहा टीएमसी पाणी नवीन योजनेतून पिंपरी चिंचवडला दिलं जाईल. मग केवळ १ टीएमसी पाणी मावळासाठी शिल्लक राहील. हे पाणी १५ हजार हेक्टर शेतजमिनीला कसं पुरणार?. शिवाय याच पाण्यात ६५ गावांच्या नळपाणीपुरवठा योजनांनी भागवायचं आहे. शिवाय या पाण्यावर भली मोठी तळेगाव एमआयडीसीही अवलंबून आहे. पुन्हा बऊर इथं १२५० हेक्टरवर नवी एमआयडीसी होऊ घातलीय. त्यामुळं आम्हाला पाण्यासाठी दाही दिशा फिरावं लागेल, असं शेतकरी म्हणतायत.
सध्या पिंपरी चिंचवडसाठी पवना धरणातलं पाणी नदीत सोडलं जातं. ते ३० किलोमीटरवरील रावेत जवळ अडवलं जातं. तिथून ते शुद्धीकरण केंद्रांमध्ये जातं. आता बंद पाईपलाईनमधून पाणी गेल्यावर नदीत पाणी सोडणार नाहीत. मग नदीकाठच्या आमच्या शेताला पाणी मिळणार नाही. विहिरींना पाणी राहणार नाही, असा त्यांचा बिनतोड दावा आहे.

दिव्याखाली अंधार
सध्या धरणातून सोडण्यात येणा-या १४३० क्युसेक्स पाण्यावर १० मेगावॅट वीज तयार होते. ती आजूबाजूच्या गावांना मिळते. अधिकारी म्हणतात, पाईपलाईन झाल्यावर ४३० क्युसेक्स पाणी नदीत पाणी सोडू. मग वीज कशी तयार होणार? पुन्हा आम्हाला अंधारात राहावं लागणार. शेतक-यांचं हे गा-हाणं अधिका-यांना निरुत्तर करतंय. विशेष म्हणजे मावळ तालुक्यात पाच धरणं आहेत. त्यापैकी लोणावळ्यात टाटांची दोन खाजगी मालकीची. या धरणांत तयार होणारी वीज ठाण्याला जाते. आणि प्रत्यक्ष धरणक्षेत्रात अंधार! इथल्या वडीवळे धरणाचं पाणी खेड तालुक्यात जातं. पवना धरणाचं पाणी पिंपरी चिंचवड आणि पुण्याकडं जातं. पुढं उजनीला पाणी कमी पडलं तर पवना धरणाचं पाणी सोडलं जातं. असं असलं तरी पवना धरणग्रस्तांचं पुनर्वसन मात्र अजून शिल्लकच आहे.
याउप्परही पिंपरी चिंचवडला पाणी द्यायला मावळातल्या शेतक-यांचा विरोध नाही. विरोध आहे तो पाण्याच्या अयोग्य वाटपाला. शिवाय वडिवळेसारख्या धरणातलंही पाणी वापरावं, असं शेतकरी सुचवतायत. पण सरकार जादा खर्च नको म्हणतंय. पाईपलाईन योजनेच्या खर्च २३३ कोटींवरून तब्बल ७५० कोटींवर गेलाय. शिवाय मावळाला दुजाभावाची वागणूक देण्यात राजकारण आहेच. पुणे जिल्ह्यावर सत्तेत असणारी राष्ट्रवादी काँग्रेस वर्चस्व गाजवते. तर मावळ तालुका गेली अनेक वर्षे भाजपला कौल देतोय.

खरी धुसफूस जमिनींची
मावळ तेच आहे. मावळेही तेच आहेत. पण काळ बदललाय. मोगलाईची आठवण यावी, अशा मगरमिठीत हा मावळ आणि मावळे सापडलेत. ही मिठी आहे, धनदांडग्यांची, दलालांची, गुंडांची, राजकारण्यांची, इथल्या जमिनीवर टपलेल्या लांडग्यांची! ते टपलेत इथल्या जमिनींवर. दरवळणारा आंबेमोहोर, खरपूस नाचणी पिकवणारी मावळ खो-यातली जमीन म्हणजे त्यांच्यासाठी सोन्याची कोंबडी बनलीय. खरं तर इथली बहुतेक जमीन त्यांनी खिशात टाकलीय. इथल्या भूमीपुत्राचं पाप म्हणा, दुर्देव म्हणा किंवा गुन्हा. त्यांची गावं आहेत, मुंबई, पुण्याजवळ! विकेण्डची धम्माल करायची असेल, तर सुटा लोणावळा खंडाळ्याला. या निसर्गरम्य परिसरात हक्काचं घर हवंच. मग इथं विकेण्ड होम, फार्म हाऊसेस, रिसॉर्ट, टाऊनशिप उभ्या राहिल्या. जमिनी घेतल्या गेल्या. गोडीगुलाबीनं. पैसे दाखवून. कायदा दाखवून. प्रसंगी माना मुरगळून.

पवना धरणाच्या बांधापासून ते मुळशीच्या हद्दीपर्यंत मुंबईतल्या पैशावाल्यांच्या बंगल्यांची रांग उभी राहिलीय. अगदी दुर्गम तुंग, तिकोना गडांच्या आसपासच्याही जमिनी गेल्या. डोंगर टेकड्यादेखील सुटल्या नाहीत. माणसांना न् गुरांना पाय ठेवायला जागा राहिलेली नाही. मधल्या छोट्या भातखाचरांमध्ये माणसं दिसतात. पण गुरांची रानं गेली. मावळ तालुक्यात केवळ ३० टक्क्यांच्या आसपास जमीन आता शेतक-यांच्या ताब्यात राहिलीय. अगोदर जुन्या मुंबई पुणे हायवेसाठी जमिनी गेल्या. मग सरळ रेषेतल्या एक्सप्रेस हायवेसाठी. आता या दोन्ही हायवेंच्या रुंदीकरणासाठी जमिनी हव्या आहेत.

जमिनी खाणारा बकासूर
बहुचर्चित एसईझेडसाठी कार्ला परिसरातल्या सहा गावांमधली एक हजार तर बऊर परिसरातली बाराशे एकर जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण गेली पाच वर्षे शेतकरी त्याला विरोध करतायत. कार्ल्यातील जमिनी एमआयडीसी ताब्यात घेणार आहे, तर महिंद्रा कंपनी तिथं प्रकल्प उभारणार आहे. जपान आणि भारत यांच्यातील करारानुसार डीएमआयसी अर्थात दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या अंतर्गत हे प्रकल्प उभे राहत आहेत. या प्रकल्पासाठीच्या जमिनी घेण्यात मुख्य वाद आहे तो मोबदल्याचा. सरकार एका एकराला देऊ करतंय ३० ते ४० लाख रुपये. तर शेतकरी मागतायत ७० ते ८० लाख रुपये. कारण खासगी प्रकल्पांवाले तेवढा रेट द्यायला आहेत. मावळातलं बऊर म्हणजे निसर्गसौंदर्याची खाण. इथंही सरकार बाराशे एकर जमीन ताब्यात घेणार आहे. पण त्याला शेतक-यांचा जोरदार विरोध आहे.

जवळच्या तळेगाव चाकण परिसरात तर प्रचंड मोठी एमआयडीसी उभी राहिलीय. अजूनही त्यात वाढ होतेच आहे. तळेगाव एमआयडीसीसाठी तर जिल्ह्यातील सर्वाधिक जमीन ताब्यात घेण्यात आलीय. चाकणच्या नव्या एमआयडीसीचा विस्तार करून ती थेट पिंपरी चिंचवड एमआयडीसीला जोडली जातेय. आता तर या परिसरात मोठ्ठं आंतरराष्ट्रीय विमानतळही होऊ घातलंय. त्यासाठीही शेकडो एकर जमिनीची आवश्यकता आहे.   
देहूरोड आणि तळेगाव परिसरात तर ७० वर्षांपूर्वी संरक्षण विभागानं दारुगोळा निर्मितीच्या कारखान्यांसाठी हजारो एकर जमिनी ताब्यात घेतल्यात. त्यांचा मोबदला अजूनही शेतक-यांना मिळायचाय. तारांच्या उंच कंपाऊंडआड गेलेल्या आपल्या जमिनी हताशपणे पाहण्याखेरीज शेतक-यांच्या हाती आता काही राहिलेलं नाही. याशिवाय आता तळेगावजवळ ४०० एकरवर डॉ. अब्दुल कलाम यांचा महत्त्वाकांक्षी मिसाईल प्रोजेक्ट उभा राहतोय. सीआरपीएफ, आयएनएस शिवाजीसाठीही शेकडो एकर जमिनी ताब्यात घेतल्या गेल्यात. तळेगाव सोडल्यावर रेल्वेट्रॅकच्या बाजूला दिसणारी मोकळी शेते म्हणजेच ही ताब्यात घेतलेली जमीन.



टाऊनशीपचा फंडा
सरकारी आणि खाजगी उद्योगांसाठी जमिनींचं अधिग्रहण सुरू आहेच. तर दुसरीकडं खाजगी बिल्डरांनाही या निसर्ग सुंदर मावळात पैशाची झाडं दिसू लागलीत. बड्या बड्या उद्योगपतींपासून ते सिनेमातल्या स्टार्सपर्यंत सा-यांनाच लोणावळा खंडाळा भुरळ घालतो. त्यामुळं त्यांनी इथं जमिनी खरेदी केल्यात, आलिशान बंगले, फार्म हाऊसेस उभारलेत. फार्म हाऊससाठी जमिनी मिळेनात. मग निघाला टाऊनशिपचा फंडा. तो मात्र क्लिक झाला. चालला नव्हे धावला. त्यामुळे बडे बडे यात उतरले.
आपण एक्सप्रेस वे वरून पुण्याकडं जाऊ लागलो की हायवेकडेला जाहिरातींची मोठमोठी होर्डिंग्ज दिसतात. त्यात ठळक जाहिराती दिसतात त्या लवासा प्रकल्पाच्या. 

पौड खो-यातल्या अर्थात मुळशीतल्या लवासा प्रकरणाची चर्चा सध्या खूप आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध झाला. धरणाच्या जलाशयाकडेला वसवलेल्या या टाऊनशीपमुळं पुण्याच्या पाण्यावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जातेय. इथं आता नवं बांधकाम करायला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं परवानगी नाकारलीय. तब्बल साडेबारा हजार एकर डोंगर टेकड्यांवर ही टाऊनशीप उभी राहिलीय. लवासाच्या धर्तीवर मुळशीत आता ७०० एकरांवर नांदेड सीटी प्रोजेक्ट उभा राहतोय. टाटांनीही या टाऊनशीप बिझनेसमध्ये उडी घेतलीय. वडगाव मावळजवळ त्यांची भव्य टाऊनशीप उभी राहतेय. यांच्या मागोमाग हिंजवडीत १४० एकरांवर परांजपेंची, १३० एकरांवर मेगॉपोलीस टाऊनशीप उभी राहतेय. या बड्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक छोटेमोठे बिल्डर या धंद्यात उतरलेत. एक टाऊनशिप उभी राहण्यासाठी किमान १०० एकर सलग जमीन लागते. एक हजार एकरांवरची ऑक्सफर्ड सेवलेकर आणि ४००हून अधिक एकरांवरची मगरपट्टा सीटी तर केव्हाच सेटल झालीय. टाऊनशीपचा हा अजगर लोणावळ्यापासून ते अगदी कात्रजपर्यंत पसरलाय.

झिंग पैशांची
काही दिवसांपूर्वी इथल्या जमिनीचा एकरी एक लाखांचा भाव आता एक कोटींवर गेलाय. जमिनी ताब्यात घेण्यासाठी सरकारी बडगा तर आहेच. पण खासगी बिल्डर भल्याबु-या मार्गांनी जमिनी लाटतायत. यातूनच तळेगाव पट्टयात गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलंय. माहितीच्या अधिकारासाठी लढणा-या सुनील शेट्टींची हत्या तुम्हाला आठवत असेल. गरीब घरातले तरुण या गुन्हेगारीच्या जाळ्यात सापडतायत. सरकारी अधिकारीही यात मागे नाहीत. मध्यंतरी लोणावळ्यात जमिनीचं बनावट खरेदीविक्री प्रकरण उघड झालं होतं. क्षीरसागर नावाच्या एका महिला उपनिबंधकानं तब्बल दहा ते पंधरा हजार बनावट खरेदी खतं केली. अखेर ती निलंबित झाली.

मावळचं नशीब की डान्स बार बंद झाले. नाही तर इथल्या डान्स बारमध्ये दौलतजादा करायला पार सातारा सांगलीकडून चंगीभंगी मंडळी यायची. अजूनही उघड वा लपूनछपून हा उद्योग सुरूच आहे. ढाबेसंस्कृती तर चांगलीच फोफावलीय. बाप्यांना घरचं अन्न गोड लागेना झालंय. ढाब्यावर खाऊन पिऊन संध्याकाळी लेझिम खेळत घरी निघालेले कारभारी सर्रास पाहायला मिळतात.
जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांनी इथलं सगळं सामाजिक जीवनच ढवळून टाकलंय. बाराही महिने शेतात राबणा-या शेतक-याच्या पडीक माळरानालाही सोन्याचा भाव मिळाला. एकरकमी हातात आलेल्या एवढ्या पैशांचं नेमकं काय करायचं हेच या मंडळींना सुधरेना. मग जुनी घरं मोडून नवे कलरफुल बंगले उभे राहिले. पोराटोरांच्या बुडाखाली धूमस्टाईल बाईक आल्या. गळ्यात किलो किलोचे सोन्याचे गोफ आले. पिवळ्याधम्म साखळ्या, अंगठ्यांनी दोन्ही हात लगडले.
पांढ-या झोकदार गाड्या दारात उभ्या राहिल्या. शेजा-याशी भारीतली वस्तू घ्यायची इर्षिरी सुरू झाली. खेडमधल्या एका गावानं तर रेकॉर्ड ब्रेक केला. दस-याच्या दिवशी एकाच वेळी ८० स्कॉर्पिओ ओळीनं वाजतगाजत गावात आणल्या!

अगदी डोंगर पठारावर राहणा-या ठाकरवस्तीच्या जमिनीलाही प्रचंड भाव आला. खिशात नोटांच्या गड्ड्या ठेवून गॉगल लावलेले ठाकर तरूण बाईकवरून भिर्रर्र करत तालुक्याच्या गावातून फिरू लागले. एखाद्या हवालदारानं अडवलंच तर नोटांचं एखादं पुडकं त्याच्या अंगावर भिरकावलं जाऊ लागलं.     
या पैशांनी होत्याचं नव्हतं केलं. घरं फुटली, नाती तुटली. माणूस माणसात राहिलं नाही. भावाच्या जमिनीला लाखो रुपयांचा मोबदला मिळतोय म्हटल्यावर बहिणींच्याही तोंडाला पाणी सुटलं. त्यांनीही त्यांचा वाटा मागितला. प्रकरणं कोर्टात गेली. खेड कोर्टात अशा दिवाणी खटल्यांची थप्पी लागलीय. आता राखी बांधायला बहिण भावाकडं जात नाही आणि भाऊबीजेला ओवाळून घ्यायला भाऊ बहिणीकडं जात नाही.       


रात्रंदिन आता युद्धाचा प्रसंग
मावळातले बहुतेक शेतकरी आता भूमीहिन किंवा अल्पभूधारक झालेत. अनेक प्रकल्पांचं जुनंच पुनर्वसन अजून बाकी आहे. तरी नवीन प्रकल्पांचा जोर वाढतो आहे. त्यांना विरोध करता करता गावकरी टेकीस आले आहेत. अस्वस्थपणा, चीडचीड वाढली. त्यातूनच पुण्याजवळच्या हिंजवडी आयटी पार्कच्या भूसंपादनाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले. दगडफेक झाली. पोलिसांच्या गोळीबारात दोघे जखमी झाले. त्यानंतर मोठा विरोध झाला तो चाकणजवळच्या डाऊ प्रकल्पाला. भोपाळच्या गॅसगळतीतून झालेल्या हजारो बळींना जबाबदार असणारी डाऊ ही कंपनी. इंद्रायणी काठी भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी हा प्रकल्प होऊ घातला होता. तोच भामचंद्र डोंगर, ज्यावर संत तुकाराम महाराजांना साक्षात्कार झाला होता. वारक-यांनी डाऊविरोधात आंदोलन उभारलं. अखेर राज्य सरकार आणि डाऊ नमली. मावळ तालुक्यातल्या नवलाख उंब्रे गावात हिरानंदानींचा हिंदुस्थान जनरेशन कंपनीचा गॅस वीज प्रकल्प उभा राहतोय. हा प्रकल्पही शेती आणि पर्यावरणाला हानी पोहचत असल्याचा आरोप करत शेतक-यांनी या प्रकल्पाचं काम बंद पाडलं. 

असे अनेक प्रकल्प मावळ परिसरात होतायत. पुनर्वसन किंवा भरपाई म्हणून ज्यांची जमीन घेतली आहे, अशा भमीपुत्रांना  नोकरी देऊ असं आश्वासन देण्यात आलं होतं. पण ते कोण पाळणार? एकट्या मावळ तालुक्यातच सुमारे ४५ हजार सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत. तालुक्यातल्या ५५ हजार कामगारांमध्ये बाहेरच्या कामगारांची संख्या या ४८ हजार आहे. तर चारशे ठेकेदारांपैकी मावळ तालुक्यातले फक्त नऊ आहेत.
हे केवळ मावळ तालुक्यातलंच चित्र नाही तर शेजारचं चाकणही असंच अस्वस्थ आहे. इथल्या बेरोजगार तरुणांनी अनेकदा आंदोलनं केली आहेत. कोणी दखल घेईनात म्हणून तर एका तरुणानं दोन वर्षांपूर्वी थेट मंत्रालयासमोरच जाळून घेतलं.

हातात एकदम आलेला पैसा कापरासारखा उडून जातो. पोराबाळांना भलत्याच मार्गाला लावतो. वाडवडिलांनी जपलेला जमिनीचा तुकडा विकला तर पोटच्या पोरांनाही परागंदा व्हावं लागेल, हे सत्य एवढ्या उशिरानं त्यांच्या लक्षात आलंय. त्यामुळं मावळात आता जमीन अधिग्रहणाला प्रचंड विरोध होतोय. या वर्षात तर शेतक-यांनी एकाही ठिकाणी जमिनीचं अधिग्रहण होऊ दिलं नाही.

शेताशिवारावर तुळशीपत्र
चाकणजवळच्या तुकोबारायांच्या भामचंद्राच्या डोंगरावर उभं राहिल्यावर पूर्वी आख्खा मावळ नजरेत मावायचा. पूर्वी संथ वाहणारी इंद्रायणी दिसायची. तुकोबांच्या वह्या तारलेला डोह दिसायचा. भातखाचरांचे पोपटी चौकोन, हिरव्या गर्दीत लपलेल्या वाड्या वस्त्या दिसायच्या. याच ठिकाणी साक्षात्कार झाला न् तुकोबाराय निर्मोही झाले. खाली येऊन त्यांनी जमीनजुमल्याच्या सावकारीची गहाणपत्रं मागवली आणि शांत चित्तानं इंद्रायणीत सोडून दिली. बहुदा त्यांचंच राहिलेलं काम त्यांच्या वारसांकडं आलंय. उद्योगधंद्यांच्या विकासासाठी त्यांनी आपल्या शेताशिवारावर तुळशीपत्र ठेवलंय. भामचंद्रावरून आता अथांग पसरलेली एमआयडीसी दिसते. नजर जाईल तिथपर्यंत कारखान्यांची गर्दी दिसते.

उरणार फक्त इतिहास    
पुणे जिल्ह्यातला बारा मावळ नावाचा हा डोंगर कपा-यांचा, भातखाचरांचा, आंबेमोहर तांदूळ पिकवणारा प्रदेश आहे. हा धडा आता भूगोलातल्या पाठ्यपुस्तकात दिसणार नाही. पावसात इरलं घेऊन भातलागवड करणा-या मावळी शेतक-यांचं चित्रही त्यासोबत गायब होईल. लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला, इंडस्ट्रीयल झोन, आयटी हब म्हणून नकाशावर हा परिसर नोंदवला जाईल. मुंबईतल्या गिरण्यांच्या जागी आलिशान मॉल उभे राहिले. पण स्मारक म्हणून गिरण्यांच्या चिमण्या तेवढ्या राखल्या. दयाळू मायबाप सरकारनं ऐतिहासिक आणि पुरातत्व वारसा म्हणून मावळातले गड, किल्ले राखावेत, अशी विनंती आता होऊ लागेल. आणि माणसं? ‘असा होता मावळा माणूस, असं लेबल चिकटवलेले मेणाचे वगैरे पुतळे पर्यटकांना काचेत पाहायला मिळतील. झालंच तर शिवाजी महाराजांना स्वराज्य उभं करायला मदत करणारी निष्ठावान कडवी जमात पूर्वी या परिसरात होती, असा कदाचित इतिहासाच्या पुस्तकात उल्लेख असेल.

सरकार मायबाप हो जरा दमानं घ्या
मुंबई-पुणे मेट्रोपॉलिटन सीटीच्या पोटात मावळ खोरं गुडूप होणार, ही काळ्या दगडावरची रेघ समजा. कारण मावळ आणि मावळ्यांचा सहानुभूतीनं वगैरे विचार करायला कोणालाच वेळ नाही. बदलत्या जगासोबत नाही चालला तो संपला. पण सरकार मायबापहो, पिढ्यान् पिढ्या जपलेल्या त्यांच्या जमिनींचा योग्य मोबदला तरी द्याल की नाही? प्रकल्पासाठी हुसकावलेल्या लोकांचं नीट पुनर्वसन तरी करणार की नाही? त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणानोक-यांचं बघणार की नाही?
बरं, तेही नसेल जमणार तर तिजोरीतलं थोडं बजेट राखून ठेवा. हे लोक अजून काही दिवस आंदोलन करतीलच. त्यांना पांगवायला पाण्याचे फवारे विकत घ्या. रबराच्या गोळ्या खरेदी करा. अगदीच अंगावर आले तर काठ्या दाखवा, बाणीच आली तर गुडघ्याखाली गोळ्या मारा. पण डोक्यात, छातीत गोळ्या घालू नका हो मायबाप. ही कष्टाळू, निष्ठावान, स्वाभीमानी, भोळ्या मनाची जमात बहुदा पुन्हा इथं पाहायला नाही हो मिळणार. 

आणि हो, आणखी एक कराच. जनाची नाही तरी मनाची कधी तरी वाटेलच. गोळ्या घालण्याचे आदेश देणा-यांनी एकदा गुपचूप का होईना रायगडावर जाऊन महाराजांसमोर कान पकडा. देहूला जाऊन तुकोबारायांच्या पायावर डोकं ठेवा.  जमलंच तर ऑफिसातल्या भिंतीवर फ्रेम करून लावलेली महाराजांची आज्ञापत्रं जळमटं झटकून वाचा. तरीही जीव नाही शांत झाला तर एसी गाडीत जाता येताना कधी तरी दीडशे पानांचं पवना काठचा धोंडी वाचा. तुंगी गडाचा त्यो धोंडी हवालदार तुम्हाला नक्कीच उदार मनानं माफ करील.

'लोकप्रभा'नं छापलेल्या लेखाची लिंक -http://lokprabha.loksatta.com/
10417/Lokprabha/02-09-2011#p=page:n=39:z=2

No comments:

Post a Comment