वारकरी पंथानं समाजात सर्व धर्म समभावाचा विचार रुजवला. त्याची जोपासना केली. आपण म्हणाल, या वारकरी संतांना तर शेकडो वर्ष होऊन गेली. अलिकडच्या वर्षांमध्ये असा एखादा संत झालाय का? त्याचं उत्तर आहे, संत जैतुनबी उर्फ जयदास महाराज !
मुस्लिम संत परंपरा
वारकरी पंथाचं समन्वयाचं तत्वज्ञान या महिलेनं अगदी हल्लीच्या काळातही जगून दाखवलं. मात्र त्यासाठी त्यांना घ्यावी लागली वारक-यांची बंडाची पताका. मुस्लिम आणि हिंदू धर्मातील काही लोकांचा विरोध पत्करून त्यांनी लहान वयातच विठ्ठलाची भक्ती सुरू केली.
बारामतीजवळच्या माळेगावात गवंडी व्यवसाय करणारे मकबूल सय्यद यांची ही मुलगी. मकबूल यांचे गवंडी मित्र गुण्याबुवा अर्थात हनुमानदास महाराज हे वारकरी. त्यांच्याकडून लहानगी जैतुनबी हरिपाठ शिकली. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत वाचण्याची तिला आवड लागली. आणि ती चक्क कीर्तनही करायला लागली. चोवीसाव्या वर्षी तर तिने स्वत:ची दिंडीही सुरू केली.
स्वातंत्र्य लढ्यात सहभाग
याच काळात जैतुनबी स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी झाली. सातारच्या नाना पाटलांच्या पत्री सरकारच्या कार्यात त्या सहभागी झाल्या.
हळू हळू जैतुनबीला होणारा विरोध मावळला. आणि तिच्या कीर्तनाला लोक गर्दी करू लागले. साध्या जैतुनबीचं रुपांतर कीर्तन, प्रवचन करणा-या ह. भ. प. संत जयदास महाराज यांच्यात झालं.
संत लतिफा मुसलमान यांच्यासारख्या मुस्लिम वारक-यांचा आदर्श जैतुनबींच्या समोर होताच. पण आपल्या अनुभवातून जैतुनबींनी स्वत:चं तत्वज्ञान मांडलं. आपल्या कीर्तन, प्रवचनांतून त्या मानवतेचा धर्म सांगू लागल्या.
संत कबीर, संत शेख अहमद, संत लतिफा मुसलमान आदी मुस्लिम वारकरी संतांनी हिंदू मुस्लिम ऐक्य तसंच सर्वधर्म समभावाचा प्रसार केला. त्यांचाच आदर्श जैतुनबींनी डोळ्यासमोर ठेवला. प्रत्येक धर्म मानवताच शिकवतो. हिंदू-मुस्लिम असा भेद करू नका, असं आवाहन त्या करत.
‘‘आदम को खुदा मत कहो, आदम खुदा नही
लेकीन खुदा के नुरसे, आदम जुदा नही’’ असं तत्वज्ञान त्यांनी मांडलं होतं.
मुस्लिम धर्माचं आचरण
विठ्ठलभक्तीत रमलेल्या जैतुनबींनी मुस्लिम धर्माच्या आचरणाकडंही दुर्लक्ष केलं नाही. त्या नियमित नमाज अदा करत. रोजे ठेवत. माऊलींच्या पालखी सोहळ्यात सर्व दिंड्यांचे मिळून एकच कीर्तन करण्याचा दंडक आहे. पण इथंही जैतुनबींनी आपला स्वतंत्र वारकरी बाणा दाखवला. जैतुनबींच्या कीर्तनासाठी त्यांची दिंडी चक्क पालखी सोहळ्यापासून काही अंतर ठेवून चालू लागली.
पंढरीच्या वाटेवरच मरण यावं, अशी प्रत्येक वारक-याची इच्छा असते. ते भाग्य जैतुनबींच्या वाट्याला आलं. गेल्या वर्षी माऊलींच्या पालखी सोहळा पंढरपूरच्या वाटेवर असताना पुण्यात जैतुनबींचं निधन झालं. जैतुनबींनी दाखवलेल्या मार्गावरून त्यांची दिंडी आता चालत आहे.
कीर्तन, प्रवचनातून जैतुनबी सांगत असलेले विचार सर्वसामान्यांना पटणारे होते. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला गर्दी होत असे. जन्मगाव माळेगाव, कर्मभूमी पंढरपूर आणि जैतुनबींनी सुरू केलेली दिंडी यांच्या माध्यमातून त्यांचे विचार जतन केले जात आहेत.
जैतुनबींचा वारसा
गेल्या वर्षी जैतुनबींचं निधन झालं. त्यांचा वारसा त्यांच्या सहका-यांनी सुरू ठेवलाय.
जैतुनबींच्या जन्मगावी माळेगाव इथंही त्यांच्या आठवणी जपून ठेवण्यात आल्यात. त्यांच्या घरासमोरच त्यांची समाधी उभारण्यात आलीय. शेजारपाजारच्या बायका जैतुनबींच्या आठवणी सांगतात.
जैतुनबी यांची कर्मभूमी पंढरपूर इथं त्यांचा भव्य मठ आहे. राज्यभरातून येणा-या गोरगरीब, गरजू भाविकांची इथं राहण्याची सोय होते. इथं आता जैतुनबींचीही मूर्ती बसवण्यात आलीय. त्यांना मिळालेली सन्मानचिन्हंही इथं पाहायला मिळतात.
जातीधर्माच्या नावावर समाजात दुहीची बीजं रोवणा-यांच्या डोळ्यात जैतुनबींचं हे कार्य अंजन घालणारं आहे. आणि सर्वधर्म समभावाचं त्याचं आचरण प्रत्येकानं अंगीकारावं असंच आहे.............................................................................................................................
No comments:
Post a Comment