जातीपातींची बंधनं तोडून वारकरी पंथाची ध्वजा फडकावण्याचं महान काम केलं, संत बहिणाबाईनं. ब्राम्हण जातीतल्या बहिणाबाईनं कुणबी समाजातल्या तुकोबारायांचं शिष्यत्व पत्करलं. आणि संतसाहित्यात मोलाची भर घातली.
‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ ही वारकरी सांप्रदायाची रचना सांगितली ती संत बहिणाबाईंनी. वारकरी पंथाचं तत्वज्ञान सांगणा-या बहिणाबाईंचा जन्म औरंगाबादमधील देवगावचा. वयाच्या तिस-याच वर्षी त्यांचं लग्न झालं, एका ३० वर्षांच्या बीजवराशी.
बहिणाबाईंचे पती मराठवाड्यातल्या शिऊर गावचे कर्मठ ब्राम्हण. लहानग्या बहिणाबाईला या नव-याचा जाच होऊ लागला. बहिणाबाईंनी आईवडील आणि नव-यासोबत गाव सोडलं. कोल्हापूरला एका बहिरंभट नावाच्या ब्राम्हणाच्या घरात त्यांना आश्रय मिळाला. इथंच त्यांना अध्यात्माची गोडी लागली.
एका लहान प्रसंगाने बहिणाबाई तुकोबारायांशी जोडल्या गेल्या. बहिरंभटाच्या घरी त्यांच्या एका गायवासरावर जीव जडला. यातील वासराचा मृत्यू झाल्याने दु:खाने बहिणाबाई बेशुद्ध पडल्या. या अवस्थेतच त्यांना तुकोबारायांचा दृष्टांत झाला.
तुकोबारायांच्या भेटीची ओढ लागलेल्या बहिणाबाईंना तुकोबारायांनी दृष्टांत देऊन ‘रामकृष्ण हरी’ हा मंत्र दिला. तुकोबारायांचा ध्यास घेतलेल्या बहिणाबाईंच्या नव-याचं मनही नंतर पालटलं. आणि ते दोघेही देहूला पोहोचले. देहूत त्यांना तुकाराममहाराजांचं मार्गदर्शन मिळालं. आणि तुकोबारायांप्रमाणंच त्यांनी आयुष्यभर संसारात राहून परमार्थ केला.
शिऊरमध्ये अभंगलेखन
तुकोबारायांचे मार्गदर्शन घेऊन बहिणाबाई आपल्या सासरी म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिऊर इथं परतल्या. इथंच बहिणाबाईंनी विपुल अभंग लिहिले.
बहिणाबाईचे असे अनेक अभंग वारकरी गातात. पदे, आरत्या, हमामा, पाळणा, पिंगा, झिंपा, सौरी, डोहो अशी विविध प्रकारची रचना बहिणाबाईंनी केली. त्यात काही हिंदी रचनाही आहेत.
तुकोबारायांप्रमाणे या अभंगांतून बहिणाबाईंच्या शब्दांना धार चढते. भोंदू संत, भ्रष्ट ब्राम्हण, अनिती, दुराचार व्यसने यांवर बहिणाबाई कोरडे ओढतात.
आपल्या अभंगातून बहिणाबाईंनी क्रांतीकारक विचार मांडले. बौद्धत्त्वचिंतक अश्वघोष यांनी लिहिलेल्या ब्राम्हण्यविध्वंसक ‘वज्रसूचि’वर बहिणाबाईंनी अभंगात्मक भाष्य केलं. ही वज्रसूचि जन्माधिष्ठीत ब्राम्हण्याला विरोध करते. वारकरी पंथाने सांगितलेला समतेचा विचार बहिणाबाईंनी ख-या अर्थाने उंच नेला.
शिऊरमध्ये भव्य मंदिर
संत बहिणाबाईचे अभंग तर अमर झाले आहेतच, पण तिच्या आठवणीही वारक-यांनी जपून ठेवल्यात. शिऊरमध्ये तिचे भव्य मंदिर उभारण्यात आलंय, तर देहूत बहिणाबाईंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलीय.
इथं बहिणाबाईची समाधीही आहे. तुकारामांची रांगडी भाषा बोलणा-या बहिणाबाई मूळच्या औरंगाबादमधील वैजापुरातल्या शिऊर गावातल्या. गावच्या या थोर लेकीचं गावक-यांनी भव्य मंदीर बांधलंय. इथं नियमितपणे भजन कीर्तनाचे कार्यक्रम होतात. मंदिराच्या भिंतीवर संगमरवरी दगडांवर बहिणाबाईंचे अभंग कोरण्यात आलेत. महिला भाविकांची मंदिरात सतत वर्दळ असते.
देहूत बहिणाबाईंची मूर्ती
बहिणाबाईंची अशीच आठवण जपलीय ती संत तुकोबारायांच्या देहू नगरीनं. इथं बहिणाबाईंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलीय.
बहिणाबाईंची ही स्मारकं माणुसकी शिकवणारी तसंच सर्वांना सर्व धर्म समभावाची प्रेरणा देणारी ठरली आहेत..............................................................................
No comments:
Post a Comment