वारकरी पंथाचं तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी एकट्या जनाबाईचं चरित्र पुरेसं आहे. कोण कुठली खालच्या जातीतली, शेण गोवर्या गोळा करणारी, दुसर्याच्या घरी झाडलोट करणारी दासी जनी, पण वारकर्यांनी तिला खूप मोठं स्थान दिलंय.
संतमांदियाळीला कौतुक
संत जनाबाई आयुष्यभर राहिल्या त्या पंढरपुरात संत नामदेवांच्या घरी. दासी म्हणून राहिलेल्या जनाबाईंच्या वाट्याला इथं काबाडकष्ट आले. पण तिला या कामांमध्ये मदत केली प्रत्यक्ष विठूरायानं. जातं, मडकी, गोवर्या असा सगळा जनीचा संसारच पंढरपूरकरांनी इथं जपून ठेवलाय. तिचा हा संसार पाहिल्याशिवाय वारकरी पंढरपुरातून परतत नाहीत.
संत जनाबाईने लिहिलेले अभंग गाऊनच वारकर्यांची पहाट होते. नित्यनियमाचे भजनही जनाबाईच्या अभंगांशिवाय होत नाही. नामदेवाच्या घरी दासी अर्थात मोलकरीण म्हणून राहिलेली अनाथ जनाबाई अर्थातच उपेक्षित होती. कारण पंढरपुरातल्या संत नामदेवांच्या गजबजलेल्या म्हणजे तब्बल १४ जणांच्या कुटुंबात आश्रीत जनीकडं लक्ष द्यायला वेळ तरी कोणाला असणार?
जनी दिवसभर राब राब राबते. दळण दळते, पाणी भरते, शेण्या थापते. पडेल ते काम करते. तिच्या मदतीला कोणीच येत नाही. मग प्रत्यक्ष विठुरायाच तिला काम करू लागतो. एवढंच काय पण तिला अंघोळ घालतो, तिची वेणीफणी करतो. देवाचे पदक चोरीला गेल्याचा आळ घेतला गेल्यावर जनीच्या बाजूने उभे राहणारे कोणीच नाही, त्यावेळीही ती देवाचाच धावा करते. ‘दळीता कांडिता तुज गाईन अनंता’ म्हणणारी जनाबाई आणि तिचे अभंग भाबड्या वारक-यांना आपले वाटतात. म्हणून तर तिच्या नावाचा जयघोष करत, तिच्या पादुका पालखीत घालून हजारो वारकरी दरवर्षी नाचत गात पंढरपूरला जातात.
संतमांदियाळीला कौतुक
नामदेवाच्या घरी दासी म्हणून राहणार्या अनाथ जनीचे संतमांदियाळी कोण कौतुक होते. पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या संतांचा पाहुणचार संत नामदेव आणि जनाबाई मोठ्या आपुलकीनं करीत. पंढरीचा विठोबा आणि संतांचं मायलेकराच्या नात्याचं वर्णन जनाबाईनं ‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा’ या अभंगातून अतिशय सुंदरपणे वर्णन केलंय.
सर्व संतांचं आणि त्यांच्या कार्याचं वर्णन जनाबाईंनी आपल्या अभंगातून केलं आहे. संत नामदेव आणि ज्ञानदेवांसोबतच ती संत चोखोबा, सेना न्हावी आदींचे वर्णन करते. नामदेव तर जनाबाईची प्रेरणा. जनाबाई नामदेवाला पावलोपावली सोबत करते. कीर्तनात त्याच्या पाठीशी उभी राहते. नामदेवाच्याच प्रेरणेने मी अभंग लिहू शकले, अशी कृतज्ञता ती व्यक्त करते. या दासी जनीचं मोठेपण ज्ञानदेवांनी ख-या अर्थानं ओळखलं होतं. ते जनीच्या घरी जातात, तेव्हा त्यांना तिथं देव जनाबाईचे अभंग लिहिताना दिसतो. जनाबाईची कामे करून देताना दिसतो. तर ‘ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर’ असं जनाई मोठ्या आत्मीयतेनं म्हणते.
या सर्व संतमांदियाळीच्या ओढीनं उत्तरेतून आलेल्या संत कबिरांनाही जनाबाईचं केवढं कौतुक आहे. जनी म्हणजे संतांमधील ‘काशी’ आहे, असं वर्णन ते आपल्या दोह्यांमधून करतात.
सारे आयुष्य नम्र दासी म्हणून जगलेल्या जनाबाईच्या अभंगातून नंतर स्त्रीमुक्तीचा हुंकार उमटतो. ‘डोईचा पदर आला खांद्यावर, भरल्या बाजारा जाईन मी’ असे ती बिनदिक्कतपणे ठणकावते. स्त्रीमनाचे खरेखुरे प्रतिबिंब जनाबाईच्या अभंगात पडलेले दिसते.
जनाबाईच्या जीवनाचा आढावा घेता, ती संत नामदेव आणि ज्ञानदेवांच्या जीवनकार्याला प्रेरणा होती, हे वास्तव लक्षात येते.
अभंगांना खडीसाखरेची गोडी
शेकडो वर्षे महाराष्ट्राच्या मुखात दोन संतांचे अंभंग खडीसाखरेप्रमाणे घोळतायत. आणि ते म्हणजे संत तुकोबाराय आणि संत जनाबाईंचे गोड अभंग.
पंढरीची सावळी विठाई म्हणजे दीनदुबळ्यांची आई. सुखदु:ख जाणून घेणारी माऊली. अनाथ जनी असा या विठाईच्या नावाने टाहो फोडते. या विठाईची वाट पाहून जनाई व्याकूळ होते.
पांडुरंगाच्या देवळासमोरच झोपडीत राहणार्या गरीब जनाबाईने देवाच्या गळ्यातले पदक चोरले, असा आरोप तिच्यावर होतो. मग आपण सोन्यानाण्याची नव्हे तर विठुरायाची चोरी केली आणि त्याला हृदयात बंदिस्त केल्याचे ‘धरिला पंढरीचा चोर’ या अभंगातून ती सांगते. ‘माझे अचडे बचडे छकुडे गं राधे रुपडे’ सारखे तिचे श्री विठ्ठलाच्या बाळरुपाचे वात्सल्याने ओतप्रोत भरलेले अभंग तर अप्रतिम ठरलेत.
जनीची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं. ‘दळीता कांडिता तुज गाईन अनंता’ हे तिचं तत्वज्ञान खेडोपाड्यातील अडाणी माणसांनाही आपलं वाटतं आहे. जनीनं दाखवलेला ‘लेकुरवाळा विठूराया’ संसारात रमलेल्या, मुलंबाळं सांभाळणा-या आयाबायांना नेहमीच भावलेला आहे.
‘नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे’ हा जनाबाईचा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालतात.
जनाबाईच्या पाऊलखुणा
अतिशय सामान्यातली सामान्य, अशी जनाबाईची ओळख. पण आयुष्यभर मोलकरणीचं काम करणार्या या दासीनं एक असामान्य काम केलं. ते म्हणजे, तिनं काळजाचा ठाव घेणारे अभंग लिहिले. आणि मराठवाड्यातल्या गंगाखेडची जनी संत जनाबाई बनली.
तत्कालीन खालच्या सामाजिक स्तरातून वर उठून स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण करणार्या संत अशी जनाबाईची ओळख. अत्यंत सामान्य जीवनातून अलौकिक अशी यशाची झेप घेणार्या जनाबाईचा जन्म परभणी जिल्ह्यातल्या गोदातीरी असलेल्या गंगाखेडमध्ये झाला. दमा आणि करुंड अशी त्यांच्या आईवडिलांची नावं. हे दोघंही पंढरपूरच्या विठूरायाचे निस्सीम भक्त होते. दोघंही पंढरीची वारी न चुकता करत. जनाबाईंच्या वडिलांनी तिला संत नामदेव यांचे वडिल दामाशेटी यांच्या पदरात टाकलं. तेव्हापासून त्या नामदेव यांच्या कुटुंबाच्या एक घटक बनल्या.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर त्यांचा वाडा असल्यामुळे जनाबाईला विठूरायाचं दर्शन रोज घडायचं. त्यातच नामदेवांच्या घरी विठूभक्तीचा सातत्यानं गजर होत असल्यानं त्यांच्या जीवनात पंढरपूर, पंढरीनाथ आणि नामदेव यांना विशेष स्थान होतं. नामदेवांच्या सहवासात त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यास घेतला. ते जनाबाईचे पारमार्थिक गुरु बनले. त्यामुळेच त्यांना नामयाची दासी म्हणूनही ओळखलं जातं.
जनाबाईच्या मनातील श्रेष्ठ गुरूभाव ही तिची शक्ती होती. आयुष्यभर नामदेवांच्या भक्तीमार्गाच्या पाऊलखुणांवरून प्रवास करणारी जनाबाई अखेरच्या क्षणीदेखील गुरूची सावली बनून राहिली. इ. स. १३५० मध्ये आषाढ महिन्यात, कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या मुहूर्तावर नामदेवांनी देह ठेवला. संत जनाबाई देखील त्याच वेळी नामयाच्या पायरीवर विसावून पांडुरंगात विलीन झाली.
अभंग, गवळणी, ओव्यांच्या रुपात अजूनही संत जनाबाई खेडोपाड्यांतील घराघरांत जागती आहे. लाडक्या जनाईच्या आठवणी तिच्या भक्तांनी जीवापाड जपून ठेवल्या आहेत.
जनाबाईच्या माहेर म्हणजे, परभणीतलं गंगाखेड गाव. याच गावात जनाबाईचा जन्म झाला. पुढं संत बनलेल्या जनाबाईची इथं गावकर्यांनी समाधी बांधलीय. जनाबाईला जातं ओढू लागणार्या देवाची मूर्ती इथं दिसते. तिच्या सर्व घरकामांत मदत करणारा विठूराया भिंतीवरच्या चित्रांमध्ये दिसतो. दासी जनीचं संत कबिरांनी केलेल्या कौतुकाचा प्रसंगही इथं चितारण्यात आलाय. इथून दरवर्षी जनाबाईची दिंडी पंढरपूरला जाते.
No comments:
Post a Comment