'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Friday 29 July 2011

बंडखोर अत्रे

पीएच. डी. करताना मला भलतेच अत्रे सापडले. म्हणजे त्याला 'ठाऊक नसलेले' म्हणा, 'उपेक्षित', 'बंडखोर', 'दुर्लक्षित', 'खरे' असं काहीही म्हणा. 'शेतात सापडेला मोहरांचा हंडा', असं बहिणाईच्या  कवितांचं वर्णन आचार्य अत्र्यांनी केलं होतं. 
असंच गुप्तधन महाराष्ट्रात दडलं आहे. आणि ते म्हणजे, अत्रेय विचार. 
हे विचार जागे करणारे आहेत, भान देणारे आहेत. अंजन घालणारे आहेत. क्रांती घडवणारे आहेत. नुकतंच अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन पार पडलं. त्यानिमित्तानं 'आयडीयल इंटरनॅशनल २०११' हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. या अंकासाठी ही अत्रेय विचारांची झलक दाखवणारा लेख मी लिहिला होता. 

                                                                        ( कृपया फोटोवर क्लिक करा )


दिवस सोशल नेटवर्किंगचे आहेत. सीझन कॉमेंट घेण्यादेण्याचा आहे. खुशमस्करी, गुळचट, पाणचट, बुडाच्या-बिनबुडाच्या, पोस्ट शेअर केल्या जात आहेत. लाइक अनलाइकच्या आकड्यांची चलती आहे. टाइमपासच्या या दुनियेतही एक गोष्ट बाकी आपलं महात्म्य टिकवून आहे. ती म्हणजे विनोद उर्फ जोक. विनोद म्हटलं की मराठी माणसाला आठवतात ते अत्रे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. अजूनही मोठ्या चवी चवीनं, चढाओढीनं अत्र्यांचे खरे खोटे विनोद ऐकवले जाताहेत. एकमेकांना टाळ्या देत जवळपास तीन पिढ्यांनी अत्रेय विनादानं असा जीव करमवून घेतला आहे.

पण खरं तर या विनोदातच महाराष्ट्राचं दुर्दैव सामावलं आहे. दुर्दैव आहे, ख-या अत्र्यांना झाकून ठेवल्याचं. सर्वसामान्य, गोरगरीब, उपेक्षित बहुजन जनतेला जागे करणा-या अत्रेय विचारांकडं दुर्लक्ष केल्याचं. आता पन्नाशीतल्या महाराष्ट्रानं हा अत्रेय विनोदाचा पापुद्रा दूर केला पाहिजे. कारण त्याखाली दडले आहेत, महाराष्ट्राचं समाजकारण ढवळून काढणारे प्रचंड अत्रे. मराठी समाजाला गदागदा हलवून भानावर आणणारे बंडखोर अत्रे. होय, अत्रे बंडखोर होते. लोकहिताला बाधा पोहचवणा-यांना या अत्र्यांनी झोडून काढले. भल्याभल्यांना वठणीवर आणले. झोपी गेलेल्यांना आणि झोपेचे सोंग घेतलेल्यांनाही जागे केले. समाजजीवनाचा गढूळलेला झरा पुन्हा निव्वळशंख करण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यासाठी त्यांना बंडाचा झेंडाच हाती घ्यावा लागला. आणि ते त्यांनी नीट ठरवून केलं होतं.

प्रेरणा तुकोबांची
 अत्रेंच्या या बंडखोरीच्या नेमक्या प्रेरणा काय होत्या, हे शोधायला गेलं. तर पहिल्यांदा संत तुकोबारायांचं दर्शन होतं. अत्रे त्या काळी पूर्ण तुकोबामय होऊन गेले होते. तुकारामांची गाथा उशाला घेऊन झोपणा-या अत्र्यांना ख-या अर्थाने तुकोबांच्या तत्वज्ञानाचा साक्षात्कार झाला होता.
महाराष्ट्राचा बंडखोर लोककवी या त्यांच्या लेखातून त्यांची ही भूमिका स्वच्छपणे समोर येते. ते म्हणतात,

महाराष्ट्र ही बंडखोरांची भूमी आहे. या भूमीमध्ये गेल्या सातशे आठशे वर्षांत अनेक मोठमोठी बंडे झालेली आहेत. आणि अनेक महान बंडखोर निर्माण होऊन गेलेले आहेत. महाराष्ट्राच्या पठारावरून सैरावैरा वाहणा-या वा-यामध्येच मुळी बंड आहे. महाराष्ट्राच्या डोंगरावरून आणि खडकाळ प्रदेशांमधून झराझरा आणि भराभरा वाहणा-या नद्यांच्या पाण्यातच मुळी बंड आहे. महाराष्ट्राच्या कोरड्या आणि काळ्याभोर जमिनीत रडतखडत पिकणा-या बाजरी जोंधळ्यांच्या कणसांमधील प्रत्येक दाण्यादाण्यांत बंड भरलेले आहे. महाराष्ट्राचे हे बंडखोर वारे श्वासून, महाराष्ट्राचे हे बंडखोर पाणी प्राशून आणि महाराष्ट्राच्या बंडखोर भाकरी झणझणीत मिरच्यांच्या चटणीसोबत खाऊन महाराष्ट्राचा सारा पिंडच मुळी बंडाचा झाला आहे. महाराष्ट्राच्या रक्तात बंड आहे. ते कधी गोठत नाही. महाराष्ट्राच्या हाडांत बंड आहे. ते कधी मोडत नाही. महाराष्ट्राच्या डोक्यात बंड आहे. ते कधी वाकत नाही. महाराष्ट्राच्या डोळ्यांत बंड आहे. ते कधी विझत नाही. महाराष्ट्राच्या छातीत बंड आहे. ते कधी हटत नाही. महाराष्ट्राच्या मनगटात बंड आहे. ते कधी पिचत नाही. बंड करणे हा मुळी महाराष्ट्राचा स्वभावच आहे.

महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा कोणी दास्य लादण्याचा प्रयत्न करतो, महाराष्ट्राच्या हातापायांत गुलामगिरीच्या शृंखला अडकवण्याचा डाव मांडतो, तेव्हा तेव्हा ते दास्य झुगारून देण्यासाठी आणि त्या गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी महाराष्ट्रात बंडखोर निर्माण होत असतात. आणि त्या बंडखोराच्या हाकेला सा-या महाराष्ट्राकडून साद मिळते.

धर्ममार्तंडांनी आणि पंडितांनी धर्माची तत्त्वे आणि विद्या ब्राम्हणांच्या किल्ल्यांत आणि संस्कृताच्या कड्याकुलुपात बंदिस्त करून जनतेला वर्षानुवर्षे अज्ञानात आणि दास्यात ठेवले. त्याविरुद्ध ज्ञानेश्वरांनी गोदावरीच्या काठी बंडाचा झेंडा प्रथम उभारला आणि ते ज्ञानाचे आणि विद्येचे भांडार मराठी भाषेत वाहून घरोघर पोहोचते केले. परकीय मोगल सत्तेच्या महापुरात अवघे महाराष्ट्र भूमंडळ बुडून सर्व मराठी बुद्धी आणि कर्तबगारी नामशेष होण्याची पाळी आली तेव्हा त्या सत्तेविरुद्ध बंडाचा भगवा झेंडा तोरणागडावर उभारण्यासाठी हातात भवानी तलवार घेऊन आणि कृष्णा घोडीवर स्वार होऊन महाराष्ट्राचा पहिला बंडखोर छत्रपती अवतीर्ण झाला. वेदस्थापित धर्माचे देव्हारे माजवून, वर्णश्रेष्ठत्वाचे पोकळ नगारे वाजवून, टिळे टोपी घालणा-या आणि साधुत्वाचा आव आणणा-या दांभिकांनी जेव्हा महाराष्ट्रातील अडाणी बहुजनांना आत्मोद्धाराचे सारे मार्ग बंद करून टाकले, तेव्हा इंद्रायणीच्या काठी भंडा-याच्या डोंगरावर एका देहूच्या वाण्याने बंडाची पताका उभारली आणि नुसत्या नामसंकीर्तनाच्या सामर्थ्यावर वैकुंठपेठ खाली ओढून आणण्याचा अभंगमंत्र महाराष्ट्राला दिला.

ज्ञानेश्वर, तुकाराम आणि शिवछत्रपती यांनी केलेल्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्रांतीच्या बंडखोर परंपरा या क्षणापर्यंत महाराष्ट्राने चालू ठेवलेल्या आहेत आणि त्यांनी शिकवलेल्या बंडखोर मंत्रांचे पुनश्चरण महाराष्ट्र अद्यापही आपल्या मनामध्ये करीत बसलेला आहे. महाराष्ट्राच्या कलेत, वाड्मयात आणि जीवनात चोहिकडे बंडच बंड भरलेले आहे. लावण्या, पोवाडे हे कलेतले बंड आहे. डफ, कडे हे वाद्यातले बंड आहे. ओवी, अभंग हे काव्यातले बंड आहे. चटणी भाकरी हे भोजनातले बंड आहे. महाराष्ट्रातल्या या बंडाला आशीर्वाद देण्यासाठी एका हातात तरवार घेऊन अन् दुस-या हाताने भंडार उधळीत मल्हारी मार्तंड खंडोबा जेजुरीच्या डोंगरावर उभा आहे. तर महाराष्ट्राच्या या बंडाचे कौतुक करीत चंद्रभागेच्या वाळवंटात पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युगे विठोबा माऊली उभी आहे. 

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा।।

जगातील सर्व गरीबांना आणि दलितांना नवनीतासारख्या कोमल अंत:करणाने आणि समबुद्धीने जो आपल्या हृदयाशी धरतो, तोच खरा ईश्वराचा अवतार. हे पृथ्वीमोलाचे महान सत्य संसार सागराच्या तळाशी बुडी मारून तुकारामाने बाहेर काढले.

जगामधल्या कोणत्या धर्मसंस्थापकाने, तत्वज्ञाने आणि पंडिताने याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचे तत्त्व आजपर्यंत सांगितले आहे? तुकारामाचे हजारो अभंग ही समाजातील हजारो रंजल्या गांजल्यांना हृदयाशी धरून दिलेली सहानुभूतीची आलिंगणे होत आणि त्यांच्या दु:खित अंत:करणावर घातलेल्या समाधानाच्या शीतळ फुंकरा होत. केवढे शहाणपण, केवढी शांती आणि केवढा संतोष तुकारामाच्या एकेका शब्दांत आणि ओळीत भरलेला आहे. म्हणूनच तुकारामाचा एखादा रसाळ अभंग एखाद्या वारक-याच्या, भाविकाच्या किंवा भिका-याच्या तोंडून गोड स्वरांत कानावर पडला म्हणजे प्रापंचिक माणूस आपले दु:ख क्षणभर विसरून आनंदाने डोलू लागतो.

अहो, आम्हा महाराष्ट्रातल्या माणसांचे केवढे हे भाग्य की, तीनशे वर्षांपूर्वी इंद्रायणीच्या काठी शूद्र कुळात जन्माला आलेला एक सत्पुरुष गेली तीनशे वर्षे सतत आपल्या हातांनी आमच्या डोळ्यांमधले अश्रू पुसत आहे आणि आपल्या अभंगवाणीने आम्हाला आशा देऊन, धीर देऊन, जागृती देऊन, आमचा उद्धार करीत आहे! या महाराष्ट्रातले लक्षावधी भोळेभाबडे, अडाणी आणि गरीब प्रापंचिक लोक गेली तीनशे वर्षे तुकारामाची भाषा बोलत आहेत आणि तुकारामाचे तत्त्वज्ञान सांगत आहेत. एवढ्या साध्या, सुबोध आणि रसाळ भाषेत संसाराचे सार इतके सोपे करून या जगात कुठे कोणी तरी सांगितले असेल काय हो? ’

महाराष्ट्रातल्या आजच्या बहुजन समाजाने आम्ही तुकारामाचे वारस आहोत, आम्ही तुकारामाची मराठी भाषा बोलत आहोत आणि तुकारामाने आम्हाला विचार करायला शिकवले आहे’, असे मान वर करून अभिमानाने सांगायला हवे. डोहात बुडवलेले तुकारामाचे अभंग तेरा दिवस देखील इंद्रायणीला आपल्या उदरात ठेवता आले नाहीत. तीनशे वर्षे ती तुकारामाची गाथा आपल्या डोक्यावर घेऊन काळ वाट चालतो आहे. मानवतेचे हे अमर धन काळपुरुषाला आपल्या डोक्यावर घेऊन आणखी किती युगे मिरवावे लागणार आहे, ते कोण सांगू शकेल?’’


आपल्या बंडखोरीचा वारसा अत्रे असा ठसठशीतपणे पुढे ठेवतात. अत्र्यांवर तुकारामांचा मोठा प्रभाव होता. तुकारामबाबांची गाथा उशाला घेऊनच ते झोपत असत. लंडनला जातानाही त्यांनी तुकारामांची गाथा  सोबत नेली होती. प्रत्येक तुकारामबीजेला अत्रे आवर्जून तुकारामांवर लेख लिहित. मराठी माणसांची अत्र्यांनी एक व्याख्या केली होती. ‘‘तुकोबाचा निदान एक अभंग ज्याला पाठ येतो, तो मराठी माणूस. ज्याच्या घरी नाही तुकोबाची गाथा, त्याच्या शिरी लाथा हाणा चार.’’
संयुक्त महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून अत्र्यांनी मराठा नावाचा पेपर सुरू केला. श्री शिवछत्रपती, महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक या महाराष्ट्राच्या तीन दैवतांचे फोटो त्यांनी मराठाच्या शिरोभागी टाकले होते. शब्दांचे शस्त्र करून लढायचे ही तुकारामांची शिकवण त्यांनी अंगी बाणवली होती. म्हणूनच तर मराठाच्या अग्रलेखाच्या डोक्यावर ‘’भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा’’ ही मराठाची भूमिका सांगणारी तुकोबांच्या अभंगाची ओळ झळकत असे.

संत तुकाराम आणि इतर संतांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. संतांचे हे विचार समाजापर्यंत पुन्हा पोचवण्यासाठी त्यांनी तुकाराम साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकातून अत्रे संतांचे समाजप्रबोधनाचे विचार लिहित होते. म्हण सारे मंगल आहे या लेखात अत्रे तुकोबांसोबतच संत कबीर, गाडगेबाबा, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांचे ईश्वरविषयक विचार सांगतात. 
शेकडो लोक आपापली कामेधामे सोडून कुठल्या कुठे लांब यात्रेला जातात अन् रोगराईने किंवा अपघाताने किड्यामुंग्यांसाखे मरून जातात. देव का डोळ्यांनी दिसण्याची वस्तू आहे?’ महात्मा फुले म्हणतात, माध्यान्हीचा सूर्य डोळ्यांनी बघता येत नाही. मग अशा अनंत सूर्यांना आणि चंद्रांना निर्माण करणारा ईश्वर माणसाला कसा बघता येईल? मला ईश्वर भेटला, मला ईश्वर दिसला, असे जे म्हणतात, ते अज्ञ जनांचा बुद्धीभेद करतात. गाडगेबाबा म्हणतात, देवदर्शनाने आणि गंगास्नानाने पापे जातात असे जे सांगतात ते धर्माचा काळा बाजार करतात. जिवंत माणसांना पायाखाली तुडवायचे आणि दगडामातीच्या मूर्ती डोक्यावर घेऊन नाचायचे, ही धर्माची शुद्ध विटंबना होय. डॉ. आंबेडकर म्हणाले, ज्या राष्ट्राचा धर्म सडला आहे, त्याला भविष्यकाळ नाही. जे जे भेटे भूत ते ते जाणिजे भगवंत या मंगल आणि पवित्र धर्माची ओळख या देशातील यच्चयावत लोकांना ज्या दिवशी होईल तो सुदिन!’

ज्ञानदेव आणि चांगदेव असो की गांधीजी आणि रामनाम. तुकाराम साप्ताहिकातून अत्रे त्यांचे तत्वज्ञान सोप्या भाषेत उलगडून दाखवतात. गांधीजींचा राम म्हणजे दशरथाचा पुत्र राम नव्हे. त्या रामाला ज्या रामाचे नाव देण्यात आले तो. सर्वांच्या अंतर्यामी असणारा आत्माराम. निर्गुण रामाचा पहिला उपासक कबीर होता. निर्गुण निराकाराच्या पलिकडचे जे परब्रम्ह, त्याला कबीर राम म्हणतो. निर्गुण राम जय हुरे भाई. गांधीजीही निर्गुण रामाचेच भक्त होते. रामनाम हे आत्मशोधन आहे, असे गांधीजी म्हणत. याच साप्ताहिकातील लेखांमध्ये अत्र्यांनी मूर्तीपूजा, संतांचे जातीभेद निर्मूलनाविषयी विचार सांगितले आहेत. पवित्र ते कुळ, पावन तो देश या लेखात अत्रे तुकोबांनी वर्णन केलेली सर्व जातीधर्माच्या संतांची मांदियाळी सांगतात. 
तुळाधाराची जात वैश्य होती. गोरा कुंभार होता. रोहिदास हा चांभार. कबीर मोमीन. लतिफ मुसलमान. सेना न्हावी. कान्होपात्रा वेश्या. दादु हा पिंजारी. चोखामेळा महार. पण यापैकी कोणाचीही जात ईश्वरप्राप्तीच्या आड येत नाही. जनी नामयाची बोलूनचालून दासी. पण देवाच्या दरबारात तिचा केवढा भाव? म्हणून सांगतो, यातायाती धर्म नाही विष्णुदासा। निर्णय हा ऐसा वेदशास्त्री।। हरिचे दास जातीचा धर्म मानीत नाहीत. केवळ वर्णभेदाच्याच नव्हे तर वर्ग नि अर्थभेदाच्या मर्यादाही तुकोबांनी झुगारून दिलेल्या आहेत.
यातच अत्रे विनोबांचेही अध्यात्मिक तत्त्वज्ञान सांगतात.देवा, माझी हरवलेली वस्तू मला मिळू दे, अशी प्रार्थना कशाला करावायाची? वस्तू मिळो वा ना मिळो, माझ्या चित्ताची शांति न ढळो, अशी प्रार्थना करावी.

संतांवर टीका करणारे इतिहासाचार्य राजवाडे यांचाही या माध्यमातून अत्र्यांनी समाचार घेतला आहे. ज्ञानेश्वर-तुकारामासारख्या संताळ्यांनी महाराष्ट्राचा नाश केला आणि त्याला तीन शतके पंगू करून टाकले. अन् समर्थ रामदासांनी महाराष्ट्रधर्माची दीक्षा देऊन महाराष्ट्राचे संरक्षण केले, हे इतिहासाचार्य राजवाड्यांचे भ्रामक मत प्रा. न. र. फाटकांनी कसे खोडून काढले हे अत्रे ज्ञानेश्वर काय नुसतेच कवी होते काय?’ या लेखात सांगतात.
गाडगेबाबांच्या प्रेमात तर आकंठ बुडून गेले होते. बाबांच्या दैनंदिनीचे, कीर्तनाचे ते इत्थंभूत वर्णन करतात. बाबा त्यांच्या खंडाळ्याच्या बंगल्यावर येतात. बाबांसोबत अत्रे आळंदीला जातात. वाळवंटातलं त्यांचं कीर्तन ऐकतात. बाबांचा उपदेश अत्रे लोकांपर्यत पोहोचवतात. गाडगेबाबा कोणत्याही देवळात पाय ठेवीत नाहीत, किंवा मूर्तीचे दर्शन घेत नाहीत. पंढरपूरला कोणी तरी बाबांना म्हणाले, बाबा, देवळात चला की!’ बाबांनी विचारले, काय हाय रे देवळात?’ वा! बाबा, देवळात विठोबा आहे ना!’ त्या माणसाने सांगितले. बाबा म्हणाले, अन तिथे त्यो काय करतोय?’ कमरेवर हात ठेवून उभा आहे ना तो!’ माणूस म्हणाला. तेव्हा तोंड वेडेवाकडे करून बाबा म्हणाले, अरे, अरे, अरे, कमरेवर हात ठेवून का उभा हाय त्यो? त्याला म्हणावं हातात खराटा अन् पाटी घे अन् बाहेर ये. बाहेर तुझ्या भक्तांनी एवढी घान करूनशान ठेवली हाये, ती काढून टाक.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल अत्रे म्हणतात, ईश्वराची भक्ती ही केवळ वैयक्तिक मोक्षप्राप्तीचे साधन नसून ती समाजसेवेचे आणि राष्ट्रोध्दाराचे उत्तम हत्यार होऊ शकते, हे तुकडोजी महाराजांनी आपल्या कृतीने दाखवून दिले. समाजात खोल रुजून बसलेल्या अनिष्ट रुढी आणि दुराग्रही प्रवृत्ती उखडून काढून समाजाला नवे आचार-विचार शिकवण्यासाठी तुकडोजीमहाराजांनी आपल्या खंजिरी भजनांचा अतिशय कल्पकतेने उपयोग करून घेतला.
हे संतविचारच अत्र्यांची आयुष्यभराची प्रेरणा बनले होते.

निरूकाकीचा वारसा
पुढं विविध क्षेत्रांत धुमाकूळ घालणारे अत्रे आपली बीजं सांगताना अर्थात जन्मभूमीचं सासवडचं वर्णन करताना म्हणतात, शक्ती आणि भक्तीचे पावनतीर्थ होते माझे गाव. उदात्त आणि ओजस्वी जीवनाचा रोज तिथे साक्षात्कार घडे. हृदयात आणि मस्तकात नाना त-हेचे संचार होत. रस्त्यांतून जाऊ लागले की उंच उंच वाड्यांच्या पडक्या भिंतींवरून दोनतीनशे वर्षांचा इतिहास कानात कुजबुजू लागे. ज्ञानोबांची पालखी दरवर्षी गावातूनच पंढरपूरला जाई. त्यावेळी दिंड्यापताकांची अशी गर्दी उडे की, टाळमृदुंगाच्या नि ग्यानबा-तुकारामाच्या गजराने गाव दुमदुमून जाई अन् चंद्रभागेचे स्नान अंगणातच घडल्यासारखे वाटे. खरोखर संतांनी आणि वीरांनी कृतार्थ केलेल्या या महाराष्ट्रात जन्माला येण्यासारखे भाग्य नाही दुसरे.

सासवडमधल्या कोढीत गावचे कुळकर्णीपद सांभाळणारं अत्र्यांचं घर म्हणजे गावाचं पालक होतं. हे घर गावच्या सुख दु:खात सामील होई. अडीअडचणीला धावून जाई. अत्र्यांची धिप्पाड आजी अर्थात निरूकाकी गावची कारभारीण होती. समाजाचा कारभार करण्यासाठी लागणारी प्रचंड उत्साह, उर्जा आणि प्रेरणा अत्र्यांकडे कोठून आली असावी असा विचार करता, ही निरूकाकीच जणू आयुष्यभर अत्र्यांच्या अंगात संचारली होती, तिची राहिलेली कामे अत्र्यांकडून पूर्ण करून घेत होती असे म्हणावे वाटते.

अत्रे आपल्या आत्मचरित्रात तिच्याबद्दल सांगतात, आजी धिप्पाड. पापड, कुरड्या घालण्यापासून ते अडलेल्या बायांना सोडवण्यापर्यंत निरूकाकीच्या कर्तृत्वाचे क्षेत्र पसरलेले होते. मुंज, लग्नादी सार्वजनिक कार्यक्रमात स्वयंपाकाची सूत्रे निरूकाकीच्या हातात असत. पंगतीमधून पायातील जोडवी वाजवत फिरे. शेवया, पापड, सांडगे, मसाले, इत्यादी कामांवर सल्लागार. पाव्हण्यारावळ्यांचा स्वयंपाक एकटी करे. प्लेगच्या रोग्याचीही बेधडक सेवा करे. एखाद्या विधवेचे पाऊल वाकडे पडून तिला दिवस गेले तरी निरूकाकी तिच्या पाठीशी डोंगरासारखी उभी राही. मग तिची जात काहीही असो. अवसेची रात्र किंवा मुसळधार पावसातही आजी डोक्यावर गाठोडे घेऊन आजूबाजूच्या गावाला एकटी जात असे. नैमत्तिक धर्मकृत्ये व्यवस्थित साजरे करीत असे. पण तिच्या आचारविचारात कर्मठपणा औषधापुरताही नव्हता. तिच्या गुणांचा सर्व वारसा तिच्या आग्रही आणि आक्रमक स्वभावासह माझ्या वडिलांकडे चालत आला. सासवडातल्याच नव्हे तर पंचक्रोशीतल्या नाना त-हेच्या उठाठेवी करण्याचा त्यांना नादच लागला.

देवपूजा न करणा-या या नास्तिक वडिलांचा दरारा सासवड आणि पंचक्रोशीत होता. दैवत मानलेल्या व्यक्तीवरही प्रसंगी प्रहार करण्याचा गुण वडिलांमधूनच अत्र्यांमध्येही उतरला.
अत्रे अगडबंब आहेत. प्रचंड आहेत. आडवेतिडवे आहेत. त्यांचं हे आडमाप कर्तृत्व आजमावण्यासाठी त्यांनी गाजवलेल्या विविध भूमिकांमधून त्यांच्याकडं पाहण्याचा शॉर्टकट आपल्याकडं उपलब्ध आहे.

कवी केशवकुमार
शालेय जीवनातच अत्रे भावकवी झाले. बालकवी, गोविंदाग्रज यांना आदर्श मानून त्यांची कविता फुलू लागली. त्यांच्या कविता शाळेतल्या पुस्तकांमध्ये जागा पटकावून बसल्या. एवढेच नव्हे तर त्यांच्या या शालेय कवितांनी मक्तेदारीच निर्माण केली. आजीचे अद्भुत घड्याळसारखी कविता बालमनांमध्ये कायमची घर करून बसली आहे. या कवितेत निरक्षर आजी घड्याळातली वेळ बिनचूकपणे कशी सांगते, याचे कुतूहल नातवाला वाटते. या बालमनांवर संस्कार करणा-या कवितांमधूनही अत्रे सामाजिक भान जपत होते. जादुई परीराज्यात रमणा-या मुलांना वास्तव जीवनाचेही दर्शन घडावे, असा त्यांचा कटाक्ष होता. खाली आणि वरसारख्या कवितेतून तेच तर दिसते. मुंबईच्या फूटपाथवर झोपणारा मजूर आणि पलिकडच्या सात मजली हवेलीत झोपेसाठी तळमळणारा श्रीमंत माणूस रंगवला आहे.

अत्र्यांनी चित्रपटगीतेही लिहिली. यमुनाजळी खेळ खेळू कन्हैय्या, अंगणात फुलल्या जाईजुई, घ्या हो घ्या हो कुणी माझी फुले ताजी यांसारखी त्यांची गीते कमालीची लोकप्रिय झाली.
अत्र्यांचे साहित्यिक गुरू राम गणेश गडकरी. त्यांचा मोठा प्रभाव अत्र्यांवर होता. सुरुवातीला संस्कृतप्रचूर लिहिणा-या अत्र्यांना त्यांनी सोपी भाषा लिहायला सांगितले. आणि त्यासाठी लावण्या, पोवाडे, अभंग वाचण्यास सांगितले. त्यांचा उपदेश अत्र्यांनी शेवटपर्यंत कसोशीने पाळला.
त्यांच्या सुमारे ४७ कवितांचा गीतगंगा हा काव्यसंग्रह लिहिणा-या अत्र्यांनी पस्तीशीत कविता करणे थांबवले. कारण कवीमनाच्या अत्र्यांच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण झाली होती. ती व्यक्त करण्यासाठी ते नाटकांकडे वळले.

त्याविषयी ते लिहितात, जे मनाला पटत नाही, ते आपल्याला काव्यात कित्येकदा लिहावे लागते, जाणीव कविता लिहिताना माझ्या मनाला सारखी टोचते. बाह्य जगात बैलगाडीपासून विमानापर्यंत व चकमकीपासून विजेच्या बत्तीपर्यंत प्रगती झाली आहे. तरी काव्याच्या सृष्टीत चंद्र, चांदण्या, चातक व चकोर ही सौंदर्याची मिरासदार मंडळी आपापली वतने अद्यापही सांभाळून आहेत. झाडावर ओरडणा-या कोकीळेपेक्षा पोटात कोकलणा-या कावळ्यावर आज काव्य लिहिण्याची पाळी आली आहे. रात्रीच्या अंधारात कुंपणावर चमकणा-या काजव्यावर कविता करण्यापेक्षा दिवसाढवळ्या डोळ्यापुढे चमकणा-या काजव्यांवर काव्य लिहिणे अत्यंत आवश्यक झाले आहे. आजच्या समाजाचे जीवन. त्याच्या धडपडी त्याचे दु:ख, त्याच्या आकांक्षा ज्यात जिवंतपणे व्यक्त करता येईल, ते खरे काव्य. व ते ज्या साधनांनी उत्कृष्ट त-हेने व्यक्त करता येईल ते खरे काव्याचे तंत्र. या माझ्या नवीन दृष्टीकोनाला पटणारे काव्य जोपर्यंत मला स्वत:ला निर्माण करता येणार नाही, तोपर्यंत मी कविता लिहिण्याच्या भानगडीत पडणार नाही.

अत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे त्यावेळची मराठी कविता आणि कवी कशा प्रकारच्या स्वप्नाळू, कृत्रिम विश्वात वावरत होते याचा अंदाज येतो. ही काव्यसृष्टी सामान्य माणसांपासून अंतर राखून होती. १९२० दरम्यानचा या सारस्वतांच्या बंदिस्त दरबाराचा लोकांना एक भीतीयुक्त दरारा वाट होता. त्यामुळे त्यांचे भावविश्व या कवितांच्या कवितेत उमटणे अशक्यच होते. १९६० नंतर सारस्वतांनो, मी थोडासा गुन्हा करणार आहे, असे म्हणत कवी नारायण सुर्वे यांना या दरबारी काव्यविश्वाच्या विरोधात तलवार उपसावी लागली होती. तर त्याही पूर्वी अत्र्यांनी या मंडळींविरुद्ध झेंडूची फुले लिहून बंडाचा झेंडा रोवला होता. अत्र्यांचा रोख प्रामुख्याने रविकिरण मंडळ आणि त्यातील पुस्तकी कवींवर होता. आम्ही कोण ?’ ही पहिली विडंबन कविता लिहून केशवसुतांच्या कवितेचे विडंबन केले.

आम्ही कोण? म्हणून काय पुसता दात वेंगाडूनी? अशा खास केशवसुती स्टाईलने सुरुवात करून
ते आम्ही - परवाड्.मयातील करू चोरून भाषांतरे,
ते आम्ही – न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी!
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेरा घरी!
त्यांचे वाग्धन वापरून लपवूनही आमुची लक्तरे!
दोस्तांचे घट बैसवून करू या आम्ही तयांचा उदे!
साहित्यक्षेत्रातील कंपूशाहीवर अत्र्यांनी असा घणाघात केला होता. चारचौघे जमवून स्वत:चा उदो उदो करून घेणा-या कोणत्याही काळात आढळणा-या प्रवृत्तींचा आणि कंपूशाहीचा अत्र्यांनी असा जाहीर उपहास केला होता.

रविकिरण मंडळात माधव ज्यूलियन हे एकटे रवी तर बाकीची किरणे असल्याची मार्मिक टिपण्णी अत्र्यांनी केली. आणि या रविला टार्गेट केले. माधव ज्यूलियन पुण्यात फर्ग्युसन कॉलेजात प्राध्यापक होते. फार्शी भाषा आणि फार्शी कवितेचा त्यांच्यावर विलक्षण पगडा बसला होता. त्यांचेच अनुकरण इतर कवी करू लागले. ही फार्शी स्टाईल स्रर्वसामान्यांच्या आकलनापलिकडे होती. हे पाहून अत्रे म्हणतात, गणपतीची आरती चालू असताना त्याच ठिकाणी गॉड सेव्ह द किंग हे गाणे एखाद्याने सुरू करावे म्हणजे भाविक मनाला कसे वाटेल, तसे मला वाटले. वन्दे त्वमेकम् अल्लाहु अक्बर हे त्यांचे काव्य मला डोक्यावर पगडी आणि कमरेला लुंगी नेसल्याप्रमाणे वाटले.

माधव ज्यूलियनांच्या प्रेममकवितांतील इराणी मुखवट्यावर नेहमीच्या व्यवहारातल्या गावरान प्रतिमा लावून अत्र्यांनी श्यामला नावाची भन्नाट विडंबन कविता रचली.
माजूम मी, तू याकुती। मी हिंग काबुली, तू मिरी,
अन् भांग तू, चंडोल मी। गोडोल मी तू मोहरी!
मी तो पिठ्यातील बेवडा। व्हिस्कीतली तू माधुरी,
काडेचिराइत मी कडू। तू बालिका खडीसाखरी
पॅटीस तू, कटलेट मी। ऑम्लेट मी तू सागसी
कांदे-बटाटे-भात मी। मुर्गी बि-यानी तू परी!

आपल्या विडंबनात या कवींचे शाब्दिक दोष आणि रचनेतल्या विक्षिप्त लकबी तर अत्र्यांनी दाखवल्याच. पण तत्त्कालीन कवींनी निवडलेले विषय आणि काव्यात ठिकठिकाणी प्रगट झालेल्या त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आम्ही कोण?, मोहरममधील मर्दुमकी, रस्त्यावर पडलेले विडीचे थोटूक, कषाय-पेय-पात्र-पतिन-मक्षिके-प्रत, श्यामले, सखे बोल बोल, मम बावाची ती आवा, मनाचे श्लोक, ही विडंबन गीते कवी आणि चोर, नवरसमंजी, ही विडंबन खंडकाव्ये आणि त्यांचे काव्यलेखन, प्रेमाचे अद्वैत, प्रेममाचा गुलकंद, परिटास या कवितांतून अत्रे या कवींची स्वभाव वैशिष्ट्येही सांगतात.

डॉ. स. ग. मालशे म्हणतात, एकीकडे संस्कृतप्रचूर, जडबंबाल शब्दालंकार घेऊन सोवळी मंडळी सिद्ध, तर दुसरीकडे फार्शी फॅशनचे जडजवाहीर घेऊन ओवळी मंडळी सज्ज! काव्यदेवतेची ही विचित्र कुचंबणा पाहून अत्र्यांची जन्मजात विनोदबुद्धी जागृत झाली. आणि आपल्या काव्यदैवतांच्या अवमूल्यनाच्या चिडीतून त्यांची टीकाबुद्धी उफाळून आली. तीच झेंडूची फुले! या कवींच्या कवितेतील संस्कृतचे अवडंबर, पांडित्याचे दर्शन, शुद्ध मराठीचा आग्रह, फारसी-मराठीचा धेडगुजरी वापर, एकाच विषयावर ठरवून काव्य करण्याची कृत्रिम पद्धती, इतरांच्या काव्याची चोरी यांची जाहीर हजेरी अत्र्यांनी विडंबनातून घेतली. बंदिस्त टोळ्या आणि कळपांच्या काव्यविश्वाचं दर्शन झेंडूच्या फुलांमधून सामान्य जनतेला घडलं. त्यातला फोलपणा त्यांच्या लक्षात आला. कविता म्हणजे काही तरी गूढ, अप्राप्य चीज आहे, त्यांचा गैरसमज दूर झाला.


नाटकांमागील दृष्टी
कवितेच्या तत्कालीन कृत्रिम भावविश्वाला अत्रे लवकरच कंटाळले. आजच्या समाजाचे जीवन, त्याच्या धडपडी, त्याची दु:खे, त्याच्या आकांक्षा ज्यात जिवंतपणे व्यक्त करता येईल असे तंत्र अत्र्यांना नाटक क्षेत्रात सापडले. अत्रे नाटयक्षेत्रात उतरले तेव्हा मराठी रंगभूमीचा पडता काळ सुरू होता. नाटकमंडळ्या लयाला चालल्या होत्या. बोलपटांचा बहर सुरू झाला होता. ऐतिहासिक, पौराणिक विषयांत गुंतून पडलेल्या नाटकांना या बोलपटांचा सामना करणे आवाक्याच्या पलिकडे गेले होते. हे बारकाईने हेरलेल्या अत्र्यांनी सामाजिक वास्तव सांगणारी नाटके रंगभूमीवर आणली. त्यांच्या नाट्यसृष्टीत सामान्य माणसं आणि त्यांचं जगणं व्यक्त होऊ लागलं. त्याबाबत आपली भूमिका मांडताना अत्रे म्हणतात,समाजातील विविध स्वभावाच्या चालत्या बोलत्या नमुन्यांवरून आपली पात्रे तयार करण्याची माझी पद्धत माझ्या पहिल्या नाटकापासून आढळून येईल. ज्याला प्रभावी नाटककार व्हायचे आहे, त्याला पुस्तकी जगात वावरून चालणार नाही. त्याला जीवनाच्या ज्वलंत ज्वालामुखीच्या मुखात उडी घालून रसरशीत अनुभवाचा लाव्हा बाहेर घेऊन यावयाला पाहिजे.

अत्र्यांनी साष्टांग नमस्कार, कवडीचुंबक’, भ्रमाचा भोपळा या नाटकांमध्ये सामाजिक विकृतीचे दर्शन घडविले. तर डॉ. लागू, बुवा तेथे बाया, तो मी नव्हेचमधून गुन्हेगारी प्रवृत्तींचे दर्शन घडवले. वंदे भारतम्, मी उभा आहे या नाटकांमधून तत्कालीन राजकीय परिस्थिती चितारली. समाजजीवनातील विविध प्रवाह, बदल, दुस-या महायुद्धाचे परिणाम, दारू, रेस, अहंकारी मन इत्यादी मानवी आचारविचारांशी, नितिमत्तेशी निगडीत असलेल्या प्रश्नांचा विचार अत्रे नाटकांमध्ये करतात.

पत्रकार, चित्रपटकार, राजकारणी क्षेत्रांतले अत्र्यांचे अनुभव नाटकांमध्ये उतरले. डॉ. अ. चिं. लागूने पैशाच्या लोभाने विधवेचा खून करणे, कमांडर नानावटी आहुजा खटला, विम्याचे पैसे भरण्यासाठी प्रभाकर हसबनीसने पत्नीचा खून करणे, माधव  काझीने केलेली स्त्रियांची फसवणूक या १९६०च्या दरम्यानच्या प्रत्यक्षातल्या घटना अत्र्यांच्या नाटकाचे विषय बनल्या. आश्वासने देणारे मंत्री आणि या मंत्र्यांना लोकांकडून मिळणारी संत्र्यासारखी वागणूक, बुवा-बुविणी, संत-संतिणी यांच्या थेरांचे अत्र्यांनी नाटकातून वाभाडे काढले. या नाटकांना अत्र्यांनी त्यांच्या हुकमी विनोदाची फोडणी दिलेली आहे. अत्रे जीवनासाठी कलाच्या बाजूने होते. त्यामुळे केवळ मनोरंजन करणारी आशय नसलेली कोणताही हेतू नसलेली नाटके करणे अत्र्यांनी टाळले.

फालतू मनोरंजनाच्या भरीस न पडता आकाशातले तारे, चंद्र, सूर्य न दाखवता वास्तवातील, घरगुत जीवनातील कथ व्यथांचा, वेदनांचा त्यांनी आपल्या नाटकातून मागोवा घेतला. १९४१ मध्ये नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाचे भाषण करताना त्यांनी मराठी रंगभूमीच्या पिछेहाटीचे परखड विश्लेषण केले. दुस-या महायुद्धानंतरच्या काळात रंगभूमीची हळूहळू पीछेहाट होत गेली. नाटक हा प्रकार केवळ सुसंस्कृत, बुद्धीमान आणि सुशिक्षित आजपर्यंत प्रचलित होता. त्यामुळे रंगभूमीची हाक अडाणी आणि असंस्कृत जनतेच्या हृदयापर्यंत कधी पोहोचू शकली नाही. बहुजन समाजात वावरणा-या निरनिराळ्या सामान्य व्यक्तींची चित्रे, त्यांच्या धडपडी आणि चळवळी, त्यांचे स्वभाव, त्यांच्या आकांक्षा यांची चित्रे नाटकामध्ये किंवा रंगभूमीवर रंगभूमीवर होणा-या नाट्यप्रयोगात कधीच उमटू शकली नाहीत. राजे लोकांचे पराक्रम त्यांच्या लढाया, त्यांचे सद्गुण, राजपुक्षत्र-राजकन्या यांचे प्रणयप्रसंग आणि विलास, श्रीमंत-धनिक अशा वर्गांतील व्यक्तींचे कनक आणि कांता यांच्या लाभासाठी चाललेले प्रयत्न, ती मिळाल्यामुळे प्रक्षुब्ध झालेल्या त्यांच्या भावनांचे उद्रेक, त्यांच्या हातून घडलेले अत्याचार आणि प्राणघात हे सामान्यत: पूर्वीच्या नाटकांचे विषय ठरलेले असत. रंगभूमी म्हणजे सर्व गुणालंकारयुक्त, श्रीमंत आणि सुस्वरुप माणसांची मिरासदारी म्हणून मानण्यात येत होती. त्यामुळे सामान्य, गरीब, अनेक शारीरिक नि मानसिक दुर्गुण असलेल्या, पदोपदी चुकणा-या, सत्ताधा-यांकडून नाडल्या गेलेल्या अशा अडाणी बहुजन समाजाला नाटकाविषयी आणि रंगभूमीविषयी आपलेपणा वाटणे शक्य नव्हते.

केवळ पांढरपेशा समाजाच्याच आयुष्याची चित्रे आजपर्यंत मराठी रंगभूमीवर पाहायला मिळत असत. त्यामुळे बहुजन समाजाला रंगभूमीबद्दल कधीच आपुलकी वाटली नाही त्याला आपले समाधान लळिते आणि तमाशे यांवरच करून घ्यावे लागले. यापुढे मराठी रंगभूमीवर बहुजन समाजाचे विविध जीवन अधिक आपुलकीने आणि अगत्याने चित्रित व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करणा-या अत्र्यांनी अभिजनांची मक्तेदारी असलेली नाटके त्यांनी बहुजनांच्या ताब्यात दिली.
याच भाषणात त्यांनी नाटकातील स्त्रियांच्या भूमिकांविषयीही परखड मत मांडले. ते म्हणाले, स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनी कराव्यात काय, हा प्रश्न आज आपणाकडे निष्कारण वादाचा होऊन बसलेला आहे. वास्तविक या प्रश्नावर मतभेद होण्याचे कारण नाही, इतकी ती गोष्ट स्वयंसिद्ध आहे. म्हणे कुलीन स्त्रियांनी रंगभूमीवर कामे करावीत काय? स्त्रिया रंगभूमीवर गेल्या तर त्यांची निती बिघडेल काय? खरे पाहता रंगभूमीच्या दृष्टीने हे प्रश्न अगदी अनावश्यक आहेत. नाटकातील स्त्रीच काम स्त्रीने केले पाहिजे, पुरुषाने करता कामा नये, ही एकच गोष्ट रंगभूमीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मग ती स्त्री कुलीन असो अगर नसो. त्यांच्याशी प्रेक्षकांना काही एक कर्तव्य नाही. स्त्रीभूमिका करणारा नट हा कुलीन आहे, लेकावळा आहे की अक्करमाशा आहे, याची समाजाने कधी पर्वा केली नाही त स्त्रीभूमिका करावयास स्त्री पुढे आल्यावर तिच्या कुलीनत्वाबद्दल नसत्या चांभार चौकशा करण्याचा प्रेक्षकांना काय अधिकार आहे?’

ज्यावेळी स्त्रीमुक्ती हा शब्दही प्रचलित नव्हता त्यावेळी अत्र्यांनी आपल्या नाटकांमधून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडली. घराबाहेर, उद्याचा संसार आणि जग काय म्हणेल या नाटकांमधून अत्र्यांनी हेच साधले आहे. सासुरवासाला कंटाळलेली त्यांच्या घराबाहेरची नायिका निर्मला रंगमंचावर मंगळसूत्र तोडण्याचे धाडस करते. हा प्रसंग गाळून नाटक करण्याची इच्छा बालगंधर्वांनी व्यक्त केली होती. पण अत्र्यांनी ती धुडकावली. उद्याचा संसारमधून पुरुषी वृत्तीवर कोरडे ओढणारी नायिका करुणा, नवरेशाहीचा धिक्कार करत, बंड पुकारत घराबाहेर पडणारी जग काय म्हणेलची नायिका उल्का, अत्र्यांच्या नाटकातल्या या सर्व नायिका स्त्रीमुक्तीचा उदघोष करताना दिसतात.

शिक्षणात बंड
अत्र्यांचा आयुष्याचा खूप मोठा काळ म्हणजे सुमारे २० वर्षे शिक्षण क्षेत्रात गेला. पुढील आयुष्यातल्या भन्नाट अत्र्यांची पायाभरणी याच शिक्षक अत्र्यांच्या भूमिकेत असताना झाली. वडिलांच्या मृत्यूनंतर पोटासाठी अत्र्यांना मुंबई गाठावी लागली. तिथं गिरगावात सँडहर्स्ट हायस्कूल, रॉबर्ट मनी नावाची ख्रिस्ती मिशनरी शाळा, तसेच न्यू हायस्कूल या पारसी शाळेत त्यांनी संस्कृतचे शिक्षक म्हणून काम केले. दोन वर्षांनी अत्रे मुंबईहून पुण्यात परतले. चुलते दिनकर विनायक यांनी पुण्यातल्या कँप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील शिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागेवर अत्र्यांना नोकरी मिळाली. कँपातली ही शाळा म्हणजे अत्र्यांच्या सार्वजनिक आयुष्याचा पाया ठरावी. ३५ रुपयांवर हेडमास्तर झालेल्या अत्र्यांनी या शाळेत क्रांती घडवून आणली.

पुण्याच्या पश्चिम भागात राहणा-या पुढारलेल्या वर्गाच्या मुलांसाठी विष्णूशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक आणि वामन शिवराम आपटे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी उभारली. त्यानंतर पूर्व भागात राहणा-या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी अशाच त-हेची शिक्षणसंस्था काढण्याची आवश्यकता त्यांच्या काही पुढा-यांना वाटू लागली. महात्मा फुल्यांच्या प्रेरणेने ज्यांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते, असे राजान्ना लिंगू वकील आणि सायन्ना मोटाडू नावाचे तेलगू समाजाचे दोघे प्रतिष्टित गृहस्थ लष्करात राहत होते. त्यांनी पुढाकार घेऊन १८८९ साली कँप एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. संस्थेच्या गव्हर्निंग बॉडीवर लष्करातील निरनिराळ्या जातींची मोठमोठी मंडळी होती. शहर आणि लष्कराच्या सरहद्दीवर कँप एज्युकेशनची शाळा. दोन परस्पर विरोधी संस्कृतीचे बकाली दर्शन होते.

शहर आणि लष्कराचे परस्पराशी काहीही साम्य नाही. एका देशातून दुस-या देशात असल्यासारखे वाटते. शहराची वाढ पेशवाईत झाल्यामुळे त्यावर ब्राम्हणी संसकृतीची गडद छाया आहे. तर लष्करची वस्ती ही गो-या सैनिकांच्या गरजेतून निर्माण झालेली. त्यावर साहेबी संस्कृतीचा ठळक छाप. शहरातील पेठांची रचना जातवार. तर साहेबाला जातिभेदाचा विधिनिषेध असल्याने लष्करात अठरापगड जाती एकत्र येऊन बसल्या आहेत. शहरात गल्लोगल्ली मारुती, गणपती आणि विठोबाची मंदिरं आहेत. त्यात एखाद्या वाट चुकल्यासारखी तांबोळी मशीद. उलट कँपात ख्रिस्ती आणि ज्यू लोकांची उंच कळसाची देवळे, आणि त्यात मधे मधे विखुरलेले मुसलमानांचे पीर आणि मशिदी पाहिल्या म्हणजे आपल्याला जेरुसलेममध्ये असल्याचा भास होतो. साहेबी टोपीचा आणि बूटविजारीचा गावाला जेवढा कंटाळा तेवढा पुणेरी पगडीचा, धोतराचा आणि जोड्याचा साहेबाला तिटकारा. त्या काळी हातात केसरी किंवा ज्ञानप्रकाश घेऊन देशातल्या राजकारणाची मोठमोठ्याने चर्चा करीत बसलेल्या लोकांची टोळकी गावात ठिकठिकाणी आढळत. तर लष्करात हातात लखपति किंवा मोती वधारो घेऊन उद्या घोड्यांच्या शर्यतीत कोणता घोडा विन येईल आणि कोणता प्लेस येईल या अश्वकारणाची चर्चा लष्करात चव्हाट्या चव्हाट्यावर ऐकू येई. सभा संमेलने अन् व्याख्याने यांचा धुमाकूळ गावात बाराही महिने चालले असे. तर पावसाळ्यात घोड्याच्या शर्यतींचा सीझन सुरू झाला म्हणजे लष्करी जनतेच्या उत्साहाला अमर्याद भरती येई.

गावात अष्टौप्रहर मराठी भाषेखेरीज दुसरा एक शब्द शहरात ऐकू येत नसे तर लष्करातल्या लोकांचा एकूण व्यवहार हमेशा इंग्रजी किंवा हिंदुस्थानी भाषेतून चाललेला असे. अशा रितीने शहर आणि लष्कर हे पुण्याचे दोन भाग म्हणजे स्वतंत्र राष्ट्रेच होती. दोघांचे आचार निराळे, विचार निराळे आणि संस्कृतीही निराळी. शहर म्हणजे सनातनी लोकांचा प्रचंड बालेकिल्ला, तर लष्कर म्हणजे धड ना विलायती ना हिंदुस्थानी अशा बकाली संस्कृतीची आघाडी! सोवळे ओवळे, शिवाशिव, जातीभेद या गोष्टी औषधालासुद्धा लष्करात आढळायच्या नाहीत. तर अभक्ष्यभक्षण, अपेयपान करण्याची त्या काळी शहरात सुतराम कोठे सोय नसे. सारांश सांस्कृतिक दृष्ट्या दोन्ही भागांचे एकमेकांशी मुळीच दळणवळण नव्हते असे म्हटले तरी चालेल. क्वचित शहरातला कोणी ब्राम्हण दोराबजी किंवा म्युरेटॉर हॉटेलात मद्यपान आणि मांसाहार करावयाला रात्रीचे लष्करात जात, तर पार्शी किंवा बोहरी मंडईतली भाजी खरेदी करण्यासाठी सकाळचे शहरात येत. इतकेच काय ते!

हे सारे वर्णन द्यायचे कारण म्हणजे, याच वातावरणात अनेक वर्षे राहून दोन भिन्न संस्कृतीचा मेळ अत्र्यांनी घातला. आणि आयुष्यभर सर्व क्षेत्रात हाच समन्वय ते घालत राहिले. कँप एज्युकेशन सोसायटीतल्या शाळेत सायकलवर फिरणारे, वाटेल तेव्हा वर्गाबाहेर जाणारे, विड्या ओढणारे, जुगार, रेस खेळणारे विद्यार्थी होते. अत्र्यांनी त्यांना छडीने झोडपत शाळा सुतासारखी सरळ आणली. कँप एज्युकेशनची पाचवीपर्यंतच्या शाळेचे रुपांतर हायस्कूलमध्ये केले. सुसंस्कृत, संपन्न कुटुंबातील टापटीप विद्यार्थी शाळेत येऊ लागले. ख्रिश्चन, ज्यू आणि पारशी मुला मुलींनी शाळेत प्रवेश घेतला. एकूणच शाळेची सुधारणा झाली.
शाळेसाठीच्या निधीसाठी अत्रे दारोदार फिरले. त्याबाबतचा अनुभव सांगताना ते म्हणतात, अस्पृश्य आणि मागासलेल्या वर्गाच्या मुलांना शिक्षण देणे हे आमचे ध्येय असल्याने जेव्हा मदत मागण्यासाठी आम्ही धनिकांकडे जात असू तेव्हा हात हलवीत परत यावे लागे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रि. अप्पासाहेब परांजपे, शिक्षण प्रसारक मंडळींचे प्रि. विनायकराव आपटे, हिंगण्याच्या अनाथ बालिकाश्रमाचे अण्णासाहेब कर्वे अशी तोलामोलाची माणसे त्याकाळी आपापल्या संस्थांसाठी निधी गोळा करावयास महाराष्ट्रातून हिंडत असत. त्यांच्यापुढे आमच्यासारख्या बुद्रुकांचा काय पाड लागावयाचा? कित्येक ठिकाणी रखवालदाराकडून हकालपट्टी व्हावयाची. मानहानी प्रसंग तर पावलोपावली इतके येत की, डोळ्यातून पाण्याच्या धारा वहायच्या तेवढ्या बाकी राहत. त्याची आठवण आली तरी अजूनही अंगावर काटा उभा राहतो. लोकांच्या दारी जाऊन ह्या ज्या दातांच्या कण्या करीत आहोत, त्या काही स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी नसून मागासलेल्या गरीब विद्यार्थ्यांसाठीच करीत आहोत, ही जाणीव आम्ही सतत मनात बाळगली म्हणून आमचा स्वाभीमान आम्ही शाबूत राखू शकलो.

कँप एज्युकेशनच्या दीड तपाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्या संस्थेचा कायापालट घडवून आणला. मुलींचे आगरकर हायस्कूल व राजा धनराज गिरजी हायस्कूल यांची मुहूर्तमेढ त्यांनीच घातली.
पुढे अत्र्यांनी मुंबईच्या ट्रेनिंग कॉलेजातून बी. टी. पदवी तर लंडनला जाऊन टी. डी. पदवी घेतली. विद्यापीठ आणि राज्यशासकीय शैक्षणिक समित्यांवर, परीक्षामंडळांवर काम केले. शिक्षक परिषदांची अध्यक्षपदे भूषविली. अध्यापन, नवे अध्यापन, इलाखा शिक्षक या शैक्षणिक मासिकांचे संपादन केले. शालेय अभ्यासक्रमात अजूनही आदर्श असणा-या नवयुग वाचनमाला, अरूण वाचनमाला, सुभाष वचनमाला लिहिल्या. अत्र्यांनी वासंती काव्यसंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना खूपच गाजली. शालेय मराठी पाठ्यपुस्तकांचे स्वरुप किती रुक्ष, नीरस, कल्पनादरिद्री व अशास्त्रीय आहे, हे या प्रस्तावनेतून अत्र्यांनी प्रभावीपणे निदर्शनास आणून दिले. यशस्वी अध्यापन यांसारख्या शैक्षणिक पुस्तकांनाही त्यांनी उद्भबोधक प्रस्तावना लिहिल्या. अत्र्यांचे शिक्षण क्षेत्रातले कार्य आजही दिशादर्शक आहे. खरे तर नंतर राजकारणात गेलेल्या अत्र्यांना शिक्षणमंत्री व्हायचे होते. त्यांचे ते स्वप्न काही पूर्ण झाले नाही. पण तसे झाले असते तर महाराष्ट्राचे शैक्षणिक चित्र आज वेगळे दिसले असते.

पत्रकारितेत बंडाचा झेंडा
झुंजार पत्रकार म्हटले की आपोआप आपल्याला पत्रकार अत्रे आठवतात. पत्रकारितेत अत्र्यांनी आपल्या लेखणीने इतिहास निर्माण केला आहे.मराठा या त्यांच्या वृत्तपत्राने तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात केलेले जनजागृतीचे कार्य अविस्मरणीय आहे. नवयुग आणि मराठा ही त्यांची वृत्तपत्रे लोकांनी डोक्यावर घेतली होती. अत्रे आयुष्यभर ज्या ज्या क्षेत्रात फिरले, त्या सगळ्याचे प्रतिबिंब अत्र्यांच्या पत्रकारितेत पडले. संयुक्त महाराष्ट्राचा लढवय्या पत्रकार म्हणून अत्रे ठळकपणे लक्षात राहतात. पण त्याही अगोदर अत्र्यांनी पत्रकारितेत प्रचंड काम करून ठेवले होते.
त्यांनी संपादन केलेली वृत्तपत्रे आणि लिहिण्यासाठी घेतलेल्या टोपण नावांवर नजर टाकली तरी याची थोडीफार कल्पना येऊ शकते.

वृत्तपत्रे - अध्यापन मासिक, रत्नाकर मासिक, मनोरमा मासिक, नवे अध्यापन मासिक, इलाखा शिक्षण मासिक, नवयुग साप्ताहिक, समीक्षक मासिक, नाट्यभूमी मासिक, जयहिंद सायंदैनिक, तुकाराम साप्ताहिक, दैनिक मराठा आणि सांजमराठा.

टोपण नावे – मकरंद, केशवकुमार, आनंदकुमार, अत्रेय, घारुअण्णा घोडनदीकर, सत्यहृदय, प्रभाकर, साहित्य फौजदार, वायूपुत्र, बोलघेवडा, बापूराव भाऊराव कोढीतकर, केशवपौत्र, काकाकुवा, अस्सल धुळेकर, निकटवर्ती, महाराष्ट्र सेवक, जमदग्नी तर झेंडूची फुले या काव्यसंग्रहात जॉर्ज थॉमसन, कवड्या पीर, सवाई जननीजनकज, सॅन्टाक्रूझ, फूलीश, मौलाना अल्लाउद्दीन खिलजी, श्रीयुत भगवंत भांबुर्डे

साहित्य आणि पत्रकारिता यांची बेमालून सांगड अत्र्यांनी घातली. आत्रेय मृत्यूलेखांना मोठी साहित्यिक उंची लाभली आहे. अत्र्यांनी वृत्तपत्र क्षेत्रात अनेक पायंडे पाडले. त्यात पत्रकारितेला चांगल्या हास्यविनोदाची गरज आहे, हे आवर्जून सांगितले. प्रत्येक गंभीर लेखाच्या तळाशी एक तरी विनोदी चुटका टाकण्याची सूचना त्यांनी केली. वृत्तपत्र वाचकाचे वय सरासरी १३ वर्षांचे असते, असे समजून सोप्या भाषेत लिहावे, पत्रकाराने राजकारण लिहावे पण खेळू नये. गुणांचा गौरव  करणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे पण समाजातील ढोंग, बुवाबाजी, लुच्चेगिरी, प्रतिगामित्व, अन्याय व जुलूम यांच्याविरुद्ध प्राणपणाने आवाज उठवणे हे पत्रकारितेचे कर्तव्य आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली. अत्र्यांच्या बंडखोरपणाच्या मुळाशी या सार्वजनिक मूल्यांचे अधिष्ठान होते.

अत्र्यांनी लिहिलेले लेख आणि विशेषांक पाहिले तरी अत्र्यांची ही सार्वजनिक मूल्यनिष्ठा, चांगुलपणा नजरेस येतो. नाना पाटील विशेषांक, डॉ. आंबेडकर विशेषांक, बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले, महात्मा गांधी गाडगेबाबा, विनोबा भावे, सानेगुरुजी, पंडित नेहरू, प्रबोधनकार ठाकरे, तुकडोजी महाराज यांच्यावर अत्र्यांनी भरभरून लिहिले आहे.

आपल्या झुंजार पत्रकारितेबद्दल स्वत: अत्रेच सांगतात, पानभर लेखाने पंधरा फौजदारी फिर्यादी एकदम स्वत:वर ओढवून घेण्याचा विक्रम मी केलेला आहे. तीन लेख लिहिल्याबद्दल दोनशे लोकांकडून मरमरेतो मार खाऊनदेखील पुन्हा पहिल्याप्रमाणे जिवंत कसे राहता येते, हा चमत्कार मी करून दाखविला आहे. धमक्या, नोटीसा, दिवाणी नि फौजदारी फिर्यादी, हल्ले, मारामा-या अन् जामिनक्या या सर्व कटकटींतून व किटाळांतून मी सहिसलामत पार पडलेलो आहे.

पत्रकारितेतील घी आणि बडगा या दोन्ही गोष्टी अत्र्यांनी अनुभवल्या होत्या. अत्र्यांनी अच्युतराव कोल्हटकरांना मराठी पत्रकारितचे शिखर मानले आहे. टिळकांच्या तेल्या-तांबोळ्यांच्या राजकारणाचा संदेश अक्षरश: तेल्या-तांबोळ्यांना वाचायला लावून अच्युतरावांनी मराठी पत्रसृष्टीत मोठा विक्रम केला, असे अत्रे म्हणतात. कोल्हटकरांचाच हा वारसा अत्र्यांनी आपल्या पत्रकारितेत जपला. त्यांचा नवयुग, मराठा न्हाव्याच्या दुकानापासून ते शेताच्या बांधापर्यंत वाचला गेला. तेली तांबोळी, न्हावी, नि परटाचं पत्र म्हणून नवयुग प्रसिद्ध पावला होता. पत्रकारिता धंदा की धर्म याबाबत भाष्य करताना अत्रे म्हणतात, ‘‘पत्रव्यवसाय हा धंदा असला तरी पत्रकाराची वृत्ती हा एक महान धर्म आहे. धंद्याला धर्माचे स्वरुप द्यावे, पण धर्माचा मात्र धंदा करू नये. वृत्तपत्रे ही क्रांतीरसाची कारंजी व्हावीत. जनताक्रांतीचा जयजयकार करणे हाच खरा पत्रकाराचा धर्म आहे.’’

साहित्यातले बंड
घाईघाईत झालेल्या वृत्तपत्रीय लिखाणाला साहित्यक दर्जा प्राप्त करून देणा-या अत्र्यांची विशिष्ट अशी वाड्.मयीन भूमिका होती. ती सर्वसमावेशक होती. बहुजन हिताची होती. आपली भूमिका मांडताना अत्रे म्हणतात, बहुजन समाजात वैचारिक क्रांती घडवून आणणे साहित्यिकांचे कर्तव्य आहे. शेतक-यांचे व खेडुतांचे प्रश्न ललित वाड्.मयात यावयाचे आहेत. समाजाच्या गतिमान जीवनाचे निदान करणारे साहित्य म्हणजे पुरोगामी साहित्य. ललित वाड्.मयामध्ये जीवनविषय तत्त्वज्ञानाची बैठक हवी आणि सर्व जनतेला सुखी करण्याचे तत्वज्ञान म्हणजे जीवनविषयक तत्त्वज्ञान. लेखकांनी जीवनाच्या प्रवाहात उडी घेतली पाहिजे.’ अत्रे संतप्रणीत साहित्य कल्पना विशद करताना म्हणतात, भूतांची दया। हे भांडवल संता।। आणि हेच ललित साहित्याचे प्रयोजन आहे. तर मार्क्सवादी संघर्षशीलतेपेक्षा ममतेमधून समता प्रस्थापित करण्याचा संतप्रणीत मार्गच योग्य आहे, हेही आवर्जून स्पष्ट करतात. साहित्यसमीक्षेला अत्रे संतसाहित्याचे निकष लावतात. बडोद्याच्या कुमार साहित्यसंमेलनात (१९४७) अत्रे म्हणतात, अंत:करणात माणुसकीचे देवटाके तुडुंब भरलेले असले तर, तरच माणसाला कवी होता येईल, कलावंत होता येईल. उत्तम लेखकाला प्रतिभेपेक्षा चांगुलपणाची आवश्यकता आहे.
आयुष्यभर सद्गुणांच्या दारात माधुकरी मागणा-या अत्र्यांनी चांगले साहित्य, चांगले लेखक यांचे भरभरून कौतुक केले. इतर लेखक, कवींच्या पुस्तकांना त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनांना खास अत्रेय दाद म्हणता येईल. अत्रे या लेखनाचं प्रचंड कौतुक करताना दिसतात. नवख्या लेखकांना व्यासपीठ मिळवून देताना दिसतात. बहिणाई चौधरींच्या कविता याच गुणग्राहकतेने अत्र्यांनी उजेडात आणल्या. शेतात अचानकपणे सापडलेला मोहरांचा हंडा, बावनकशी सोने अशा मथळ्यांनी ते बहिणाईंच्या कवितांचा परिचय करून देतात. ते बहिणाईंना मदर महाराष्ट्र म्हणतात. बहिणाईच्या कवितेने अर्वाचिन मराठी साहित्याला प्राचीन मराठी साहित्याचे वैभव आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्याचे अत्रे सांगतात.

लोकशाहीर अमरशेख यांच्या कलशया काव्यसंग्रहाला कलशपूजन असे भावभक्तीपूर्ण शीर्षक देत अत्रे सविस्तर प्रस्तावना लिहितात. महाराष्ट्रात कविता रचणा-यांच्या तीन जाती पडतील. कवी, लावणीकार आणि शाहीर. जनतेचे मनोरंजन करणे हे कवींचे व लावणीकारांचे कार्य असते, तर जनतेला प्रेरणा देण्यासाठी शाहिरांचा अवतार असतो...कवी आणि लावणीकार हे रिकामपणाचे सोबती आहेत. तर शाहीर हा जीवनाच्या संग्रामातील सांगाती आहे. या प्रस्तावनेच्या निमित्ताने अत्रे शाहिरी काव्याची परंपरा सांगतात. अमरशेख यांचे जीवन व कार्य श्रमिक क्रांतीचे तत्त्वज्ञान, समाजातील दलित पतितांच्या व्यथा वेदनांचे अमर शेखांनी केलेले भेदक आणि भावोत्कट चित्रण अत्रे करतात. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले त्यांचे योगदान सांगतात.   
महात्मा फुल्यांवरील सिनेमा काढून आपल्या पुरोगामी व परिवर्तनवादी जीवनदृष्टीचा परिचय दिला. अगदी पुण्यात राजकारणात प्रवेश करून स्टँडिंग कमिटीचे चेअरमन झाल्यावर त्यांनी याच दृष्टीने पुण्यात अनेक सुधारणा घडवून आणल्या. बस सर्व्हिस, रे मार्केटचे महात्मा फुले मार्केट' आणि भांबुर्ड्याचे शिवाजीनगर ही दोन नामांतरे हे त्यांचे विशेष कार्य आहे.

बहुजन साहित्य संस्कृतीचा पुरस्कार
ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव म्हणतात, आचार्य अत्र्यांचे व्यक्तिमत्व, बालपणापासून ज्या पर्यावरणात ते वाढले, त्या पर्यावरणाचे संस्कार, त्यांनी केलेले विविध उद्योग व व्यवसाय, ते बदलले गेले किंवा वाढत गेले त्या प्रक्रियेमागील प्रेरणा, त्यांची साहित्यनिर्मिती व साहित्यविचार आणि त्यांच्या जीवनाचा व कर्तृत्वाचा कालखंड या सर्व घटनांचा रोख प्रामुख्याने बहुजन साहित्य संस्कृतीच्या संगोपन वर्धापनाकडे होता, असे म्हणता येईल. आपल्या समकालीन साहित्य संस्कृतीमधील हळवेपण, पुस्तकी प्रत्यय, फसवे स्वप्नरंजन, मध्यमवर्गीय सोवळेपण व संकुचितपणा, अवास्तवता, आत्मकेंद्रीत कोळीवृत्ती, उच्चभ्रू तुच्छतावाद आणि आत्मवंचक व परवंचक विचारप्रणाल्या अत्र्यांनी झिडकारल्या व त्यांचा गावरान संस्काराशी सुसंगत अशा खट्याळ, मार्मिक विडंबन व विनोदवृत्तीने समाचार घेतला. अभिजनवर्गाला प्रिय असणा-या तत्कालीन कथा-कादंब-यांची पायवाट टाळून त्यांनी बहुजनप्रिय असा नाटकाचा साहित्यप्रकार आणि चित्रपटमाध्यम यांची निवड केली. तत्कालीन रंगभूमी बहुजनांना आपली वाटत नाही, हे त्यांनी निर्भीडपणे दाखवून दिले. अवघ्या साहित्य-संस्कृतीला बहुजनप्रिय व बहुजनप्रबोधक वळण देण्याचा त्यांनी लेखनातून व समीक्षेतून अथक प्रयत्न केला. त्यांनी अखेरीला समाजवादी वास्तवाचा पुरस्कार केल्याचे दिसते; पण त्याचे वास्तव स्वरुप पश्चिमी नसून, बहुजन परंपरेतील समतेशी व ममतेशी जुळणारे होते. यावरून साठोत्तरी कालखंडातील परिवर्तनवादी वाड्.मयीन आणि सांस्कृतीक चळवळींची आद्य बीजे या अत्रेवादातच होती, असे ठामपणे म्हणता येईल. अत्र्यांच्या बहुजन संस्कृतीला लगतचा संदर्भ सत्यशोधक समाजाच्या व ब्राम्हणेतर चळवळीच्या वारशाचा होता. तुकाराम विद्यापीठाची कल्पना म्हणूनच अत्रे मांडू शकले. चित्रे-कोलटकर-नेमाडे-मोरे या सर्वांच्या खूप आधी तुकाराम विद्यापीठाची, मंडई विद्यापीठाची भाषा बोलणारा हा द्रष्टा होता. आंबेडकरांना आमचे आजचे शंकराचार्य म्हणणारा हा बहुजनवादी समीक्षक होता. म्हणूनच बंडखोर अशा मराठी साहित्य-संस्कृतीचा १९२० ते १९५० या कालखंडातील खरा प्रतिनिधी म्हणून अत्र्यांकडे पाहावे लागेल.

महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरांपासून प्रेरणा घेऊन १९६० नंतर दलित साहित्याचा प्रवाह रुंदावला. पण ज्या काळात महात्मा फुलेंची महाराष्ट्राला आठवणही होत नव्हती त्या काळात अत्र्यांनी त्यांच्या जीवनावर चित्रपट काढला. २५ डिसेंबर १९५४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे मंगलाचरण संत गाडगेबाबांनी म्हटले. कथानिवेदन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. देशभक्त केशवराव जेधे, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर बाबूराव जगताप, डॉ. अण्णा नवले, अमर शेख, विठ्ठलराव घाटे आणि स्वत: अत्र्यांनी यांनी या चित्रपटात काम केले.
डॉ. आंबेडकरही यावेळी उपस्थित होते. या चित्रपटाने राष्ट्रपतींचे रौप्यपदकही पटकावले.
१९५५मधल्या मिरजेच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात भाषण करताना अत्रे म्हणाले, स्वातंत्र्य आले आहे. पण अद्याप समता आलेली नाही. जातीभेद आणि अस्पृश्यता हे समतेच्या मार्गातील दोन प्रचंड अडथळे आहेत. हे अडथळे कसे नाहिसे करावयाचे? देशात ९० टक्के लोक निरक्षर आहेत. त्यामुळे आमच्या वाड्.मयाची हाक लांबवर ऐकूच मुळी जात नाही. भारताच्या जीवनातील हे सर्व दोष आपणाला नष्ट करून टाकावयाचे आहेत. भारताचे तत्वज्ञान विश्वशांती आणि विश्वप्रीतीचे आहे. या सर्व मूल्यांचा वाड्.मयकारांनी आपल्या लेखनात पुरस्कार केला पाहिजे. महात्मा फुले यांचा उज्ज्वल ध्येयवाद साहित्यिकांनी आपल्यासमोर ठेवावा. निर्मिकाची प्रार्थना म्हणून अत्रे या भाषणाचा समारोप करतात. अत्र्यांची ही भूमिकाच १९६० नंतरच्या दलित साहित्य चळवळीचे बीज रोवणारी ठरली, असे म्हटले तर वावगे ठरू नये. अत्र्यांनी दलित, बहुजन लेखकांना व्यासपीठ मिळवून दिले.

दुर्देवाने अत्र्यांचे हे समाजक्रांतीकारी विचार दुर्लक्षिले गेले. महात्मा फुले या चित्रपटाचा विषय आपला न वाटल्याने अभिजन, ब्राम्हणवर्ग या चित्रपटाला आला नाही. आणि बामणाने चित्रपट काढला म्हणून बहुजन या चित्रपटाला गेले नाहीत, असे अत्रे एकदा म्हणाले होते. आचार्याच्या संपूर्ण कार्याचीच अशा प्रकारे उपेक्षा झाल्याचे यानिमित्ताने म्हणावेसे वाटते. पण अत्रे म्हणजे महाराष्ट्राचा अर्धशतकाचा इतिहास आहे. हा इतिहास लोकहिताचा, समतेचा आणि उपेक्षित, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक घेतलेल्या व्रताचा आहे, हे सुवर्ण महोत्सव साज-या करणा-या महाराष्ट्राने सुजाणपणे लक्षात घ्यायला हवे. बहिणाईंच्या कवितेला अत्र्यांनीच संबोधल्याप्रमाणे हे अत्रेय विचार शेतातल्या गुप्तधनाच्या हंड्याप्रमाणे आहे. हे विचारधन लपवून न ठेवता मराठी माणसांनी एकमेकांना वाटून टाकायला पाहिजे.    

3 comments:

  1. हे अत्रेय विचार शेतातल्या गुप्तधनाच्या हंड्याप्रमाणे आहे. हे विचारधन लपवून न ठेवता मराठी माणसांनी एकमेकांना वाटून टाकायला पाहिजे.

    ReplyDelete
  2. खूपच सुरेख सर..

    ReplyDelete
  3. खुप मनापासून आचार्य अत्रे यांच्या प्रचंड व्यक्तिमत्वचा लेख वाचायला मिळाला. आपले मनापासून आभार आणि प्रेम. आचार्य अत्रे यांच्यावर वेबसिरीज स्वरुपात त्यांच्या प्रचंड व्यक्तिमत्वचा वेध घेणारी मालिका शत पैलू आचार्य अत्रे आमच्याकडून केलेला छोटासा प्रयत्न आम्ही घेऊन येणार आहोत या साठी कमलाकर बोकील मीरा फोटो फिल्म्स या चॅनेलला सबस्क्राईब करा. एक लिंक शेअर केली आहे
    https://studio.youtube.com/channel/UCm5U_XUXe7FYv2MOtuSaWsQ/editing/images
    https://www.youtube.com/watch?v=j_l_z2vFJeI&t=380s

    ReplyDelete