'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Friday 23 August 2013

हे काही खरे वारकरी नव्हेत...

दोन-तीन दिवस खूपच अस्वस्थ गेले. बातमी होती, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या डोक्यात गोळ्या घालून खून... ठिकाण ओंकारेश्वर मंदिरासमोरचा पूल, पुणे. ओंकारेश्वराच्या मंदिरासह सारा परिसर न् आख्खं पुणं क्षणार्धात डोळ्यापुढं गरगर फिरलं. डॉ. दाभोलकरांचा लोळागोळा होऊन, बेवारशासारखा पडलेला मृतदेह सारखा डोळ्यासमोर येऊ लागला. आपण पुण्याचे आहोत याची भयंकर लाज वाटायला लागली. संताप, चिडचिड झाली. येरझाऱ्या घातल्या. वारंवार खिडकीशी येऊन उभा राहिलो. टीव्ही चॅनेल आलटून पालटून पाहिले. फेसबुकवरच्या पोस्ट खालीवर करून पाहिल्या, चैन पडेना..अस्वस्थता काही कमी होईना. चाळा म्हणून इंटरनेटवर जादूटोणा विधेयकाविषयीची माहिती शोधत बसलो. अचानक एका वेबसाईटवर माझाच निषेध केलेला दिसला. गमतीशीर वाटलं. बारकाईनं पाहिलं. हिंदू जनजागृतीची वेबसाईट होती ती.

आठवलं. काही दिवसांपूर्वी जय महाराष्ट्र चॅनेलवरील एका चर्चेत गेस्ट म्हणून गेलो होतो. विषय होता, जादूटोणा विधेयकाला वारकऱ्यांचा विरोध. त्यावेळी पंढरीची वारी सुरू होती. जादूटोणा विधेयकाचा मसुदा दाखवला नाही, मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही तर संतांच्या पालख्या पुढं जाऊ देणार नाही. वारी वाटेतच थांबवू. अगदी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातली विठुरायाची महापूजाही मुख्यमंत्र्यांना करू देणार नाही, असा सज्जड दमच वारकऱ्यांनी दिला होता.

स्टुडिओत आणखी दोन गेस्ट होते, जे वर्षानुवर्षे रखडलेल्या विधेयकाचे साक्षीदार होते. वारीच्या वाटेवरून वारकऱ्यांचे प्रतिनिधी होते. जे सकाळपासून विधेयकाच्या बाजूने बोलत होते. चर्चेच्या वेळी मात्र त्यांनी रंग पालटला होता. सर्वांचं बोलून झाल्यावर मला प्रश्न विचारण्यात आला. मी जरासं लांबलचक उत्तर दिलं. ते असं होतं… ”असं समजा की महाराष्ट्रातल्या कुठल्याही वारकरी घराचा, तरुण पिढीचा मी एक प्रतिनिधी आहे. माझे आईवडील आत्ता वारीच्या वाटेवर चालत आहेत. त्याआधी माझे आजोबा वारी करायचे. त्यांच्या आधी पणजोबा वारीला जायचे. पणजोबांच्याही आधीपासून घराण्यात वारी सुरू आहे.

लहानपणापासून मी घरी दारी वारकरी कीर्तनं, प्रवचनं, पारायणं ऐकत आलो. संत ज्ञानदेव-नामदेवांपासून ते संत तुकाराम-गाडगेबाबांपर्यंतचे सर्वांचे अभंग ऐकत आलो. टाळमृदुंगाच्या ठेक्यावर वारकऱ्यांच्या सुरात सूर मिसळून म्हणालो. माणसांनी माणसांवर, इतर प्राणीमात्रांवर प्रेम करावं, माणुसकीनं, दयाबुद्धीनं वागावं. कुठल्याही प्रकारचा भेदभाव बाळगू नये. सर्वांनी गुण्यागोविंदानं नांदावं. महत्त्वाचं म्हणजे देवधर्म, कर्मकांडाचं अवडंबर करू नये. आपण आपल्या कर्तृत्वावर, कर्मावर विश्वास ठेवून आत्मविश्वासावर जगावं. जीवनात कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा देऊ नये. त्या अभंगांतून, कीर्तन, प्रवचनांतून हेच तर सांगितलं गेलं होतं.

संतांची हीच शिकवण अंगी बाणवून तिची पंढरीच्या वाटेवरून चालताना अभंगांच्या माध्यमातून पुन:पुन्हा उजळणी करणारे वारकरी अंधश्रद्धा विधेयकाला विरोध करतीलच कसे? आणि जे करीत असतील ते खरे वारकरीच नसतील!...असं मी म्हणालो. यानिमित्तानं कर्मकांडं, अंधश्रद्धा यांच्या विरोधात बंड उभारत वारकरी सांप्रदाय कसा उभा राहिला, त्या पार्श्वभूमीची मी आठवण करून दिली.

शतक होतं तेरावं. मऱ्हाटी मुलुखावर राज्य होतं, देवगिरीच्या रामदेवरायाचं. स्थिर यादव राजवटीचा तो सुवर्णकाळ होता. पण या सुवर्णकाळाशी सामान्य माणसाचं काही घेणं देणं नव्हतं. त्यांचं कष्टाचं जगणं अधिकच अवघड झालं होतं. राजसत्तेनं धार्मिक कर्मकांडाच्या जोरदार पुरस्कार केलेला होता. राजदरबारातल्या विद्वान पंडितांनी व्रतवैकल्यं, धार्मिक परंपरांवरचे ग्रंथ लिहिणं धर्मकार्य मानलं होतं. त्या ग्रंथांची अमलबजावणी करण्यात प्रशासन गुंतलं होते.

स्वत: रामदेवरायाचा प्रमुख प्रधान हेमाद्री पंडित उर्फ हेमाडपंत यानं चतुर्वर्ग चिंतामणीनावाचा ग्रंथ लिहिला होता. ज्यात जनतेनं करावयाची तब्बल अडीच हजार व्रतवैकल्यं सांगितली होती. त्यामुळं कर्मकांडं करणाऱ्या देवाच्या दलालांचं मोठंच फावलं होतं. अमुक व्रत, विधी केला नाही तर देव देवतेचा कोप होईल, तुमच्या मुलाबाळांना सुख लाभणार नाही, अशी भिती घातली जाऊ लागली. त्यासाठी अगदी वेदपुराणांचे  दाखले दिले जाऊ लागले. सर्वसामान्यांचं जगणंच घुसमटवून टाकणारी ही परिस्थिती.

पंढरपुरात राहणाऱ्या एका तरुण चळवळ्या विठ्ठलभक्तानं समाजाची ही सारी व्यथा जाणली. समजावून घेतली. आणि फार फार विचारपूर्वक त्यावर मार्ग शोधला. तो मार्ग होता, तळागाळातल्या समाजाला जागं करण्याचा. माध्यम बनले पंढरपूरला येणारे वारकरी. त्यांचं कीर्तन, भजन, अभंग. प्रतिक ठरवला हातात कुठलंही शस्त्र धारण न केलेला कमरेवर हात ठेवलेला काळ्या रंगाचा विठुराया. 
अत्यंत विचारपूर्वक, सहिष्णू, अहिंसक आणि विनम्रतेनं नामदेवराया आणि त्याच्या सहकारी वारकऱ्यांनी कर्मकांडाविरोधातली लढाई सुरू केली. देवधर्माचं कुठलंही अवडंबर न माजवता आपलं रोजचं काम करता करता फक्त विठोबाचं नाव घ्यायचं, की आपल्या पाठिशी उभा राहतो. अशी श्रद्धा जनसामान्यांच्या मनात उभी राहिली.

नामदेवरायांना सोबत केली आळंदीच्या ज्ञानेश्वरमाऊलींनी. या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवून कामकरी, कष्टकरी समाजातून, अधिकारहिन जातींमधून पुढं आलेल्या संतांनी अंधश्रद्धा माजवणारी वर्तवैकल्ये, शेंदरी हेंदरी दैवतं यांचा कठोर, परखड समाचार घेतला. 
भोळ्याभाबड्या लोकांना जगण्याचं शहाणपण सांगितलं. त्या यादव काळात तंत्रमंत्र विधी, कर्मकांडांचा किती बुजबुजाट झाला होता याचं वर्णन संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यथार्थपणे करतात. ज्ञानेश्वरमाऊली ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायात म्हणतात,
माथां जाळिजती गुगुळु। पाठीं घालिजती गळु।
आंग जाळिती इंगळु। जळतभीतां॥
दवडोनि श्वासोच्छ्वास। कीजती वायांचि उपवास।
कां घेपती धूमाचें घांस। अधोमुखें॥
हिमोदकें आकंठें। खडकें सेविजती तटें।
जितया मांसाचे चिमुट। तोडिती जेथ॥
ऐसी नानापरी हे काया। घाय सूतां पैं धनंजया।
तप कीजे नाशावया। पुढिलातें॥
म्हणजे मूढबुद्धीने, दुराग्रहाने आणि स्वत:च्या शरीराला अत्यंत कष्ट देऊन, तसेच दुसऱ्याच्या नाशासाठी काही लोक तप करतात. स्वत:च्या माथ्यावर गुगुळ जाळणे, पाठीला गळ टोचणे, बोवताली अग्नी पेटवून त्यात आपले शरीर जाळणे, श्वासोच्छवास बंद करून उपवास करणे, उलटे टांगून धूम्रपान करणे, थंडीत गळ्याइतक्या पाण्यात उभे राहणे असे नानाप्रकार केले जातात. असे लोक स्वत:सोबतच इतरांच्याही दु:खाला कारणीभूत ठरतात.

संत नामदेवांची भाषा तर अगदी थेट जनसामान्यांची भाषा होती. आपल्या अभंगांमधून भक्तांकडून सतत काही तरी मागणी करणाऱ्या दैवतांवर आणि ती पुरवणाऱ्या भक्तांवरही ते कोरडे ओढतात. जी दैवते शेंदूर आणि शेरणीची इच्छा व्यक्त करतात, ती तुमच्या काय इच्छा पूर्ण करणार? दैवतांच्या नाना धातूंच्या प्रतिमा तुम्ही तयार करवून घेता आणि दुष्काळात त्या विकून खाता, अशी दैवतं तुमची इच्छा काय पुरवणार? असा सवाल ते उपस्थित करतात.
नानापरिची दैवते। बहु असती असंख्याने।।
सेंदूर शेरणीजी इच्छिती। ती काय आर्त पुरविती।।
नाना धातूंची प्रतिमा केली, षोडोपचारे पुजा केली।।
दुकळी विकून खादली। ते काय आर्त पुरविती।।

नामदेवरायांचे शिष्य संत चोखोमेळा यांनी तर या रोखठोकपणात आपल्या गुरुवरही कडी केली. खरं तर चोखोबाराय अत्यंत बुजरे, स्वत:कडं कायमच कमीपणा घेणारे. पण धर्ममार्तंडांविरुद्धचा बंडाचा खणखणीत आवाज पहिल्यांदा चोखोबांनीच उठवला असं बिनदिक्कतपणं म्हणता येईल. कारण देवाच्या नावानं भोळ्याभाबड्या लोकांना फसवणाऱ्या भोंदू बाबांचं ढोंगी रुप त्यांनी समोर आणलं.
माकडाचे परि हालविती मान। दावी थोरपण जगामध्ये।।
स्वहिता मुकले, स्वहिता मुकले। बळी झाकी डोळे नाक धरी।।
माळा आणि मुद्रा दाविताती सोंग। डोलविती अंग रंग नाही।।
पोटाचा पोसणा विटंबना करी। भीक दारोदारी मागितले।।
चोखा म्हणे जगामध्ये भोंदू। तया कोण साधू म्हणे देवा।।

चोखोबांच्या बंडाची ही पताका उंच धरली ती त्यांच्या कुटुंबाने. त्यांची पत्नी सोयराबाईने विटाळाचे अभंग लिहून तत्कालीन धार्मिक रुढींवर प्रश्नचिन्ह उभं केलं.
देहाचा विटाळ म्हणती सकळ।आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध।।
देहीचा विटाळ देहीच जन्मला।सोवळा तो झाला कवण धर्म।।
विटाळ वाचोनी उत्पत्तीचे स्थान।कोण देह निर्माण नाही जगी।।
देहाचा विटाळ देहीच निर्धारी। म्हणतेच महारी चोखीयाची।।

तर त्यांच्या मुलानं कर्ममेळ्यानं खुद्द देवालाच जाब विचारला.
आमुची केली हीन याती तुज का नं कळे श्रीपती
जन्म गेला उष्टे खाता लाज न ये तुमच्या चित्ता।।
मंगळवेढ्याच्या या फाटक्या, दलित कुटुंबाकडे एवढी आत्मशक्ती आली कुठून? याचं उत्तर शोधायला गेलं तर ते वीरशैव संत बसवेश्वरांच्या कार्यात आणि शिकवणुकीत मिळतं. पंढरपुराजवळची मंगळवेढा ही कर्मभूमी असलेल्या बसवेश्वरांनी समाजसुधारणा, धर्मसुधारणा, अस्पृश्योद्धार, स्त्रियोद्धार, मातृभाषेतून शिक्षणप्रसार, विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाचा प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी प्रकारचं कालातीत कार्य केलं. बसवेश्वरांची हीच शिकवण मंगळवेढ्यात राहणाऱ्या चोखोबांच्या कुटुंबात झिरपली. 
तीच शिकवण चोखोबांना नामदेवरायांच्या वारकरी पंथात सापडली. अगोदरच्या, समकालीन सर्व लोककल्याणकारी धर्म, पंथातील चांगली मूल्ये वारकरी पंथानं कशी अंगीकारली, समन्वय, समानतेच्या वाटेवरून वाटचाल कशी सुरू केली, याचं हे उदाहरणच.

दुसरं उदाहरण तुकोबारायांच्या ब्राम्हण शिष्या संत बहिणाबाईंचं. बौद्धत्त्वचिंतक अश्वघोष यांनी ब्राम्हण्यविध्वंसक वज्रसूचिलिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी जन्माधिष्ठीत ब्राम्हण्याला विरोध केला आहे. या वज्रसूचिवर बहिणाबाईंनी अभंगात्मक भाष्य केलं. अर्थात प्रेरणा तुकाराममहाराजांची. बौद्ध धर्माचा वारकरी परंपरेवर किती प्रभाव होता, त्याचं हे बोलकं उदाहरण. गौतमबुद्धांनी इसवीसनपूर्व 500 वर्षांपूर्वी ईश्वरविषयक संकल्पना, बहुदेव उपासना, यज्ञयागाचे महत्त्व, इत्यादींविषयी भारतीय जनमानसांत दृढ झालेल्या अंधश्रद्धांच्या निरर्थकतेला पहिला टोला दिला होता. अहिंसा, अंधश्रद्धेला विरोध या वारकऱ्यांच्या भूमिकेवर तत्कालीन जैन, महानुभव विचारांचा प्रभाव होता.

वारकरी संतपरंपरेत असा एकही संत नाही की ज्याने या समाजाला छळणाऱ्या रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, ढोंगी बुवा यांच्या विरोधात अभंग लिहिले नाहीत.
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळसअसा आपल्या अभंगातून संत बहिणाबाईंनी वारकरी पंथाच्या उभारणीचा इतिहास सांगितलाय. संत ज्ञानदेव, नामदेवरायांनी रुजवलेल्या या बंडखोर वारकरी विचारांवर खऱ्या अर्थाने कळस चढविला तो संत तुकाराम महाराजांनी. बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणूनियाम्हणत त्यांनी लोकांच्या अंधश्रद्धाळू मानसिकतेवर सणसणीत कोरडे ओढले.
वैद्य वाचविती जीवा। तरी कोण ध्यातें देवा।।
काय जाणो कैसी परी। प्रारब्ध तें ठेवी उरी।।
नवसें कन्यापुत्र होती। तरि कां करणें लागे पती।
जाणे हा विचार। स्वामी तुकया दातार।।

अलिकडच्या काळात या साऱ्या संतांच्या शिकवणुकीचं सार अत्यंत प्रभावीपणे सांगणारा एक महासंत होऊन गेला. तो म्हणजे संत गाडगेबाबा. अंगावर चिंध्या पांघरणाऱ्या या महामानवानं सर्व संतांचे क्रांतीकारी, अंधश्रद्धानिर्मूलनाचे विचार सांगत माणुसकीचं, स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. प्रबोधन विचारांनी समाजाला गदागदा हलवून जागं केलं, भानावर आणलं. नवस-सायास, पुराण-पोथी, पूजा-अर्चा, गंडा-दोरा, स्वप्न-साक्षात्कार, अंगारा-ताईत, भोंदूगिरी आणि बुवाबाजीचं अवडंबर, अंधश्रद्धा याविरोधात बाबा टाहो फोडून लोकांना सांगत असत.
देव आहे कोण? समाज देव आहे. त्याची सेवा करा आधी. जिवंत देवाची सेवा केली पाहिजे. तुमच्या अकलेत माती पडली की कुठे चरायला गेली तुमची अक्कल? तुमचं घर तुमचं देऊळ हाय. तुमची पोरंच तुमचे देव. तुमचे कामधाम तुमचा धर्म. लिहिण्या-वाचण्याचं बुक म्हणजे तुमची पोथी. बह्याळानो! कायले बुवांच्या आन् भटाईच्या मागे धावतां?”

असे हे संतांचे विचार. वारकऱ्यांनी ते वर्षानुवर्षे जपले. वाढवले. अशा वारकऱ्यांचा जादूटोणा विधेयकाला विरोध...अशा बातम्या ऐकून वाचून मनाला क्लेश होतात. असं का होऊ लागलंय? याचं उत्तर शोधत गेलं की लक्षात येतं, या विधेयकाला विरोध करणारे खरे वारकरी नव्हेतच. वारकऱ्यांचं रुप घेऊन वारकऱ्यांमध्ये घुसलेले ते सनातनी धर्ममार्तंड आहेत. त्यांनीच तर वारकऱ्यांचा बुद्धीभेद करण्याचा, त्यांचा डोके फिरवण्याचा नियोजित कार्यक्रम हाती घेतलाय.

म्हणजे अशा प्रसंगांमध्ये वारकऱ्यांच्या खांद्यावर आयती बंदूक ठेवता येते. सोयीनं त्यांना वापरून घेता येतं. वारकऱ्यांमधली ही घुसखोरी काही आजची नाही. ती आहे, जवळपास अठराव्या शतकातली. धाकटे बाजीराव पेशवे लवाजम्यासह पंढरपूरच्या वारीला जाऊ लागले तेव्हापासूनची. बाजीरावानं पंढरपूरचा जणू पिकनिक स्पॉटच केला. हीन राजकारणाचा अड्डा केला. इंग्रजांचा पाठींबा असलेले बडोदयाचे वकील गंगाधर शास्त्री पटवर्धनांच्या खुनाचा डाग याच पंढरपुरात बाजीरावाला लागला. पेशवाईच्या पतनालाही इथूनच सुरुवात झाली.

पण याच काळात घडू नये ते घडलं. शतकानुशतके समन्वय आणि एकी टिकवणाऱ्या वारकऱ्यांमध्ये दुफळी निर्माण होऊ लागली. आपल्या सोबत्यांच्या जातीपाती टोचू लागल्या. या गाफील वारकरी समूहात सनातनी घुसले. वारकऱ्यांकडून संतांचा क्रांतीकारी उपदेश मागे सुटू लागला. त्या पोकळीत  हिंदुत्त्ववाद्यांनी शिरकाव केला. वारकरी कट्टर धर्मवादी होऊ लागले. महाराष्ट्रातल्या अभ्यासकांनी, पुरोगामी, डाव्या विचारवंतांनीही या शेकडो वर्षांच्या सर्वसमावेशक वारकरी विचारधारेचा देव, धर्मवादी दैववादी म्हणत उपहास केला. तिथंच सगळा घोटाळा झाला.

ज्यांनी वारकऱ्यांचा सर्वसमावेशक, समन्वयवादी धर्म समाजाला समजावून सांगितला, कोणाही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचेअसा तुकोबारायांचा दाखला देत खरा बंधुभाव सांगितला, त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र विसरला. दुर्दैव असं त्यांच्या नावाने पुण्यात असलेल्या पुलावरच विद्वेषवादी प्रवृत्तींनी डॉ. दाभोलकरांचा निर्घृण खून केला!

मनाला वाटतं, हे विधेयक होण्यासाठी जर वारकऱ्यांनीच पुढाकार घेतला असता तर? त्यासाठी आपलं संघटन, विचार खर्ची घातले असते तर? तर ते नक्कीच वारकरी परंपरा उजळवणारं ठरलं असतं. कारण अंधश्रद्धा निर्मूलनाचं मूळचं त्यांचंच तर काम डॉ. दाभोलकर आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहेत.
नव्या पिढीतल्या वारकऱ्यांनी तरी हे वेळीच सांभाळायला हवं. समजून घ्यायला हवं. 

या सगळ्या घडामोडींमुळं खिन्नता आलेल्या मनाला एक खूप मोठा दिलासा देणारी गोष्ट झाली. दाभोळकर गेले त्या दिवशी सारा महाराष्ट्र आक्रोश करत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा बांध फुटला होता. डॉक्टरांच्या खुन्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी करत राज्यभर मोर्चे निघाले होते. त्याच दरम्यान एबीपी माझा चॅनेलवर डॉ. दाभोलकरांची दोन तरुण मुलं पाहिली. मुलगा हमीद आणि मुलगी मुक्ता. अत्यंत शांतपणे संवाद साधत होते. अँकरच्या प्रत्येक प्रश्नागणिक असं वाटत होतं की, आता हे भाऊबहिण नक्की भावविवश होतील. वडिलांच्या आठवणीनं गहिवरतील. एका क्षणी न राहवून चिडतील. शिव्याशाप देतील. कोणावर तरी खापर फोडतील. 
पण एवढ्या दीर्घ मुलाखतीत तसं काहीही झालं नाही.
अत्यंत शांत, संयत, संथ पण ठाम पद्धतीनं डॉ. दाभोलकरांचे हे वारस मुद्दे मांडत होते. आपली व्यापक सहिष्णु, अहिंसावादी भूमिका सांगत होते. अंधश्रद्धा निर्मूलनाची दिशा दाखवत होते. सर्वांना जबाबदारीचं भान देत होते... म्हटलं हेच तर या युगातले ज्ञानोबा-तुकोबा आणि गाडगेबाबा... हेच तर फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे पाईक... हेच तर खरेखुरे वारकरी! म्हणत होते, ‘अजून खूप चढण आहे. बरीच लढाई बाकी आहे. ती विचारपूर्वक, कणखरपणे, लढायची आहे...यारहो सलाम तुमच्या जिगरीला!
आम्ही तुमच्या सोबत आहोत!! हा काळही तुमच्याच सोबत आहे!!

5 comments:

  1. Excellent Shrirang. Very thought provoking writing.

    ReplyDelete
  2. Farach sundar lekh. Shakya tithe share kartoy...

    ReplyDelete
  3. Excellent. You have explained this with facts quoting right from 13th century. Dr.'s son & daughter shall follow the path which father has shown them 'express thoughts which shall not disturb any one'. Where our community is leading blindly.

    ReplyDelete
  4. khupch dolaspane vachala tar dole ughadtat....khare varkari kiti ani varkari ani devachya navakhali rajkaran karnare ase varkari kiti????

    Sir,kharya varkaryala hya goshti kalalya tar chapalene martil asya lokaana...

    please ha lekh saglya newspaperla dya..

    ReplyDelete
  5. Lekh chan...warkari pantha ha veidik pantha aahe tyamule tyane vedala nakarle nahi pan tyachya navavar honary anishtha prathanwar korde odhale aahet. ek goshta khatakli, andhashrdhewar kadadun prahar karnarya sant Eknath maharajancha sadha ullekh hi nahi he pahun wait watala. ka kela nahi te dev jane !!!

    ReplyDelete