आज रामनवमी. वाडीतल्या मंदिरात वडिलांचं रामजन्माचं कीर्तन सुरू असेल. फुलांनी सजवलेल्या पाळण्यात देहुडा रामराया ठेवून पाळणा म्हटला जात असेल. मार्गशिर्षातल्या या दुपारी डवरलेले गुलमोहोर टवकारून पाळणा ऐकत असतील. देवळाच्या आवारातला चाफा पे-या पे-यांनी फुलून घमघमत असेल. देवळात आणि देवळाबाहेर असा उत्सव सुरू असेल...
आणि त्याही आधी भल्या सकाळपासून,
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा।
भक्ताचिया काजा पावतसे।।...हा अभंग ऐकत घराघरांत सुंठवड्याची तयारी झाली असेल.
लहानपणाच्या या आठवणी अशा अभंगवाणीत मिसळून डोळ्यासमोर तरळतायत. अभंगवाणी ऐकली तर या आठवणी जाग्या होतात. आणि आठवणींसोबतच मनाच्या गाभा-यात अभंगवाणी घुमू लागते. बाळपण घडवणा-या या अभंगवाणीचे उद्गाते पंडीत भीमसेन जोशी जाऊन चार महिने होत आले. आता रामनवमीच्या निमित्तानं पुन्हा ते सूर ऐकू येतायत.
मंदिरात टाळ-मृदुंगाचा गजर सुरू आहे. गाभा-यात विठूरायाच्या मूर्तीवर दह्या-दुधाचा अभिषेक सुरू आहे. गजर हळू हळू शांत होत जातात. आणि गाभा-यातून ते भारून टाकणारे सूर आवर्तनं घेत येतात.
सावळे सुंदर रूप मनोहर। राहो निरंतर हृदयी माझे।।
आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड। तुझे नाम गोड पांडुरंगा।।...
अभंगाचा अर्थ उमगत नाही. पण पंचामृताच्या धारांत न्हालेला सावळा विठ्ठल आणि ते स्वर्गीय स्वर हृदयात पाझरत जातात. बालपण असं त्या कटेवर कर ठेवलेल्या मूर्तीशी आणि त्या जादुई सुरांशी जोडलेलं.
दुसरी आठवण आहे, अंधारात आईच्या पाठंगुळी बसून निघालोय. अर्धवट पेंग. आईसोबत चालणा-या बायाबापड्या एका सुरात म्हणतायत,
इंद्रायणी काठी देवाची आळंदी। लागली समाधी ज्ञानेशाची।।
मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड। अंगणात झाड कैवल्याचे।।...कंदीलाचा हेलकावणारा उजेड अंधार उजळत चाललाय. दूरच्या वस्तीवर प्रौढ शिक्षणाच्या वर्गाला असं सुरांच्या हिंदोळ्यावर बसून जायचं. हेच हिंदोळे अनुभवले, पहिल्यांदा आळंदी पाहिली तेव्हा. सळसळणारा सोन्याचा पिंपळ. अजान वृक्षाची सावली आणि समाधीच्या गाभा-यातला तुळशीपानांचा, अबीर बुक्क्याचा सुवास... 'लागली समाधी ज्ञानेशाची' चे सूर मन भरून टाकतात.
दिवाळी पहाट असो की खिडकीतून उतरणारी मावळतीची उन्हं. ती धीरगंभीर, पहाडी आवाजातली संतवाणी मन निर्मळ करत राहिली.
आषाढी वारीसाठी माऊलींच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं की, आळंदीपासून थोरल्या पादुकांपर्यंत पालखीसोबत निघायचं. सोबत ते आभाळ व्यापणारे सूर येतातच...
ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार।
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे।।
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।
आनंदे केशव भेटताचि।।...
वारीची आनंदवाट चालत पंढरीत पोहोचायचं...
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान।
आणिक दर्शन विठोबाचे।।
हेचि घडो मज जन्मजन्मांतरी।
मागणे श्रीहरी नाही दुजे।।...
चंद्रभागेत स्नान करून निव्वळशंख मनानं पांडुरंगाच्या दर्शनाला निघायचं...
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल।
नांदतो केवळ पांडुरंग।।...सूर कानावर पडत असतात. मग...
माता विठ्ठल पिता विठ्ठल। बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल।।
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल। देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल।।... असं विठ्ठलमय होऊन जायचं.
पुढं कधी तरी समजलं, ते भारावणारे पहाडी सूर आहेत, पंडित भीमसेन जोशींचे. शास्त्रीय संगीतातल्या पितामहाचे, ख्यालगायकीच्या सम्राटाचे. सवाई गंधर्व महोत्सवाच्या उद्गात्याचे.
थंडीनं वेढलेल्या पुण्यातल्या रम्य पहाटे हजारो कान त्या आसमंत घुमवणा-या सुरांनी तृप्त होत. लपेटलेल्या मलमली शालींमधून वाहव्वा वाहव्वाची दाद उमटे. हा गंधर्वमेळा काहिसा अनोळखी, परका वाटत राहिला. पण ते सूर आणि त्या गाणा-या पहाडाशी आपलं जन्मोजन्मीचं नातं असल्याची भावना मात्र कधी सोडून गेली नाही. समेवर जाताना भीमाण्णांच्या गळ्याच्या तटतटलेल्या शिरा, निथळणारा चेहरा पाहिला की या पहाडानं खूप सोसलेलं असणार, जीवापाड, जिद्दीनं कष्ट केले असणार असं वाटायचं. ते खरं होतं. गाण्यासाठी घर सोडून निघालेला हा पठ्ठया पंजाबात जाऊन गुरुंच्या कडक तालमीत घुमला. चिमणीतलं रॉकेल संपेपर्यंत रात्र रात्र रियाज करायचा.
पहाटे चारला उठून पन्नास-साठ घागरी पाणी भरायचं. हजार जोर काढायचे. दूध, जिलेबीचा खुराक घ्यायचा. ही तालीम पुढं आयुष्यभर कामी आली. अण्णा शेकडो किलोमीटर ड्रायव्हिंग करत जायचे आणि भल्या सकाळपर्यंत मैफल रंगवायचे. मोठ्या आवडीनं पिठलं भाकरी खाणारा, गुलाम रसूल खाँसोबत दर्ग्यात जाणारा हा मनुष्य गवई नव्हे, तर दिलदार पहेलवान वाटायचा. गायनासाठी एकदा मांड ठोकली की, जसे कातळावर जणू खण् खण् करत घणाचे घाव पडायचे. पंढरीचा काळा विठोबाही या रांगड्या सुरांनी खुळावला होता.
सोमवारी सकाळी पंडितजी गेल्याची बातमी आली तेव्हा, कुणा वारक-याच्या पोरानं भरल्या मनानं इंटरनेटवर भावना लिहिली, 'पंडितजी आता विठूरायाच्या पायाशी बसलेले असणार!' अंतर्बाह्य थरारून गेलो...तो पर्यंत गाभा-यातून आवर्तनं घेत निघणा-या त्या आवाजानं अवघं अवकाश भारून टाकलं होतं...
याजसाठी केला होता अट्टाहास।
शेवटचा दिस गोड व्हावा।।
आता निश्चिंतीने पावलो विसावा।
खुंटलिया धावा तृष्णेचिया।।...
No comments:
Post a Comment