'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Monday 7 November 2011

खुदा पंढरीचा

काल झाली कार्तिकी एकादशी आणि आज बकरी ईद. हिंदू-मुस्लिम बंधुभावाचं नातं सांगत हे सण दरवर्षी असे हातात हात घालून येतात. हे प्रेमाचं नातं जपलं, महाराष्ट्रातल्या वारकरी पंथानं. यानिमित्तानं आम्ही 'खुदा पंढरीचा' हा विशेष कार्यक्रम तयार केला. त्यात आम्ही श्रीविठ्ठलाच्या भक्तीत रमलेल्या मुस्लिम संतांचं जीवनकार्य दाखवलं. त्याचं हे स्क्रिप्ट...


भेदाभेद भ्रम अमंगळ
कार्तिकी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. हा दिवस म्हणजे भेदाभेद दूर करण्याचा दिवस. जगातली सर्व माणसं इथून तिथून सारखीच आहेत. त्यांच्यात कसला भेद? हा भेद म्हणजे सारा अमंगळपणा. सारा भ्रम, असं संत तुकोबारायांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगून ठेवलंय. वारकरी पंथाची समतेची परंपराच त्यांनी सांगून ठेवलीय.


संत कबीर
सावळ्या विठुरायानं केवळ महाराष्ट्राल्याच नाही, तर इतर देशभरातल्या भक्तांनाही वेड लावलंय. त्यातलेच एक संत कबीर. वारकरी आचारविचारानं प्रभावित झालेले संत कबीर साडेसातशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले. आणि इथल्या संतमांदियाळीत रमून गेले. जनी सब संतोंकी काशी’, असं दासी जनीला प्रशस्तीपत्रही कबीरांनी दिलं.

उत्तरेतून पंढरपुराला येताना संत कबीरांचं श्री क्षेत्र काशी इथं निधन झालं. पण त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा मुलगा कमाल यांनी पंढरपूरची वारी नित्यनियमानं केली. त्यांचं निधही पंढरपुरातच झालं. चंद्रभागेच्या तिरी उभ्या असलेल्या कबीरमठात कमालची समाधी आहे. हा कबीरमठ प्रादेशिक ऐक्याचं प्रतिक ठरलाय. काही वर्षांपूर्वी उत्तरेतून त्यांची दिंडीही पंढरपूरला येत होती. संत तुकाराममहाराजांनी ज्ञानदेव, नामदेव या आपल्या पूर्वसूरींमध्ये कबीरांचाही मोठ्या आदरानं उल्लेख केलाय. नित्यनेमाच्या भजनात वारकरी कबीरांचे दोहेही म्हणतात. 

कबीराचा शेखा
ज्ञानाचा एका, नामाचा तुका आणि कबीराचा शेखा अशी अवतारपरंपरा वारकरी पंथात सांगितली जाते. नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंद्याचे शेख अहमद हे संत कबीरांचे अवतार मानले जातात. त्यांचा अधिकार इतका मोठा होता, की समर्थ रामदासांनी त्यांची आरती लिहिलीय.
१७व्या शतकात शेख महंमदांनी मराठीतून ग्रंथ लिहिले. संतमांदियाळीनं त्यांना मानाचं स्थान दिलंय. तुकाराम महाराजांपासून ते मोरोपंतांपर्यंत अनेक संतांनी त्यांची स्तुती केलीय.

शिवरायांचे आजोबा मालोजीराव शेख महंमद यांना गुरुस्थानी मानत. महंमदांनी अंधश्रद्धा आणि जातीभेदावर कडाडून टीका केली. पुढे २०व्या शतकात नगरमध्ये शिर्डीचे साईबाबा आणि मेहेरबाबा यांनी सर्वधर्म समभावाचा प्रचार केला. या समतेचा पाया शेख महंमदांनीच घातला होता.   
श्रीगोंदा गावात शेख महंमद यांचा दर्गा आहे. सर्व जातीधर्माचे लोक इथं दर्शनाला येतात. त्यात हिंदू भाविकांची गर्दी लक्षणीय असते.


अनगडशहा विसावा
भेदाभेद भ्रम अमंगळ असा समतेचा वारकरी विचार सांगणा-या तुकोबारायांचं आचरणही आदर्शवत होतं. विविध जातीधर्माचे सवंगडी, मित्र त्यांनी जोडले होते. त्यापैकीच एक अनगडशहा. पुण्यात राहणारे त्यांचे हे मुस्लिम मित्र नियमाने देहूला येत. देहूत या मित्रांच्या गप्पा रंगत. त्यातून सुफी विचारांची देवाण-घेवाण होई.
विचारांचा हा वारसा देहूत आजही जोपासला जातोय. 

आषाढी वारीला पंढरीला निघालेल्या तुकोबारायांच्या पालखीची पहिला विसावा अनगडशहा बाबांच्या दर्ग्यात होतो. इथं मोठ्या भक्तीभावानं तुकोबारायांची आरती होते. त्यानंतरच पालखी पुढं निघते. पालखीसोबतचे वारकरी अनगडशहाबाबांचं दर्शन घेतात. तर मुस्लिम बांधव एकादशीचा उपवास ठेवतात. बंधुभावाचा हा सेतू पिढ्यानपिढ्या अभंग आहे.

राजू बाबा शेख
बंधुभावाची ही परंपरा महाराष्ट्रात अजूनही जपली जातेय. ती
जपणा-यांमध्ये एक ठळक नाव आहे, ते बीडच्या राजू बाबा शेख यांचं. धर्मानं मुस्लिम असलेले राजूबाबा अखंड विठ्ठलभक्तीत रमलेले असतात. एवढंच नाही तर वयाची सत्तरी ओलांडलेले राजूबाबा आजही गावोगावी कीर्तन करत फिरतात. त्यांचं हे कीर्तनही मोठं वैशिष्टयपूर्ण असतं. पायात चाळ बांधून, परातीत नाचत ते कीर्तन करतात. लहानपणापासून त्यांना ही विठ्ठलभक्तीची आवड लागली.

परधर्माचं आचरण केलं म्हणून त्यांना सुरुवातीला मुस्लिम समाजातून विरोध झाला. तर एक मुस्लिम माणूस कीर्तन करतो म्हणून हिंदू धर्मियांनी त्रास दिला. पण बाबांची निष्ठा पाहून हळूहळू हा विरोध मावळला. आज त्यांना गावोगावची कीर्तनाची निमंत्रण मिळतात. पुरस्कारांनी घर भरलंय. राजकारण्यांनीही त्यांच्या कामाची दखल घेतलीय. पण बाबांची हलाखी संपलेली नाही. मुलांच्या शिक्षणासाठी ते सरकारदरबारी मदत मागतायत. सरकार मायबापाला विठुराया नक्कीच सदबुद्धी देईल, असा विश्वास त्यांना वाटतोय.

जैतुनबी उर्फ जयदास महाराज
सध्याचा काळ आहे तो, धार्मिक द्वेषावर राजकारण करणा-यांचा. अशा काळातही काही अगदी साधी सुधी माणसं सर्वधर्म समभाव रुजवण्याचं मोलाचं काम करत असतात. पण हयातभर त्यांच्याकडं कोणाचं लक्षही जात नाही. त्यांना आदर्श मानावं वाटत नाही. त्यांना प्रकाशात आणावं वाटत नाही. 
अशाच उपेक्षेचं एक उदाहरण म्हणजे, संत जैतुनबी उर्फ जयदास महाराज. दोन वर्षांपूर्वी या मुस्लिम स्त्री संताचं निधन झालं. त्यांचं गाव पुण्याजवळच्या बारामतीतलं माळेगाव. गवंडी व्यवसाय करणा-या मकबूल सय्यद यांच्या या मुलीनं लहानपणीच हरिपाठ, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत वाचण्यास सुरुवात केली. नंतर ती चक्क कीर्तनही करायला लागली. चोवीसाव्या वर्षी तर तिने स्वत:ची दिंडीही सुरू केली.
हळू हळू जैतुनबीला होणारा विरोध मावळला. आणि तिच्या कीर्तनाला लोक गर्दी करू लागले. साध्या जैतुनबीचं रुपांतर कीर्तन, प्रवचन करणा-या ह. भ. प. संत जयदास महाराज यांच्यात झालं.

संत लतिफा मुसलमान यांच्यासारख्या मुस्लिम वारक-यांचा आदर्श जैतुनबींच्या समोर होताच. पण आपल्या अनुभवातून जैतुनबींनी स्वत:चं तत्वज्ञान मांडलं. आपल्या कीर्तन, प्रवचनांतून त्या मानवतेचा धर्म सांगू लागल्या.

संत कबीर, संत शेख अहमदसंत लतिफा मुसलमान आदी मुस्लिम वारकरी संतांनी हिंदू मुस्लिम ऐक्य तसंच सर्वधर्म समभावाचा प्रसार केला. त्यांचाच आदर्श जैतुनबींनी डोळ्यासमोर ठेवला. प्रत्येकधर्म मानवताच शिकवतो. हिंदू-मुस्लिम असा भेद करू नका, असं आवाहन त्या करत.
‘‘आदम को खुदा मत कहोआदम खुदा नही
लेकीन खुदा के नुरसे, आदम जुदा नही’’ असं तत्वज्ञान त्यांनी मांडलं.

विठ्ठलभक्तीत रमलेल्या जैतुनबींनी मुस्लिम धर्माच्या आचरणाकडंही दुर्लक्ष केलं नाही. त्या नियमित नमाज अदा करत. रोजे ठेवत. माऊलींच्या पालखी सोहळ्यात सर्व दिंड्यांचे मिळून एकच कीर्तन करण्याचा दंडक आहे. पण इथंही जैतुनबींनी आपला स्वतंत्र वारकरी बाणा दाखवला. जैतुनबींच्या कीर्तनासाठी त्यांची दिंडी चक्क पालखी सोहळ्यापासून काही अंतर ठेवून चालू लागली.

पंढरीच्या वाटेवरच मरण यावं, अशी प्रत्येक वारक-याची इच्छा असते. ते भाग्य जैतुनबींच्या वाट्याला आलं. गेल्या वर्षी माऊलींच्या पालखी सोहळा पंढरपूरच्या वाटेवर असताना पुण्यात जैतुनबींचं निधन झालं. जैतुनबींनी दाखवलेल्या मार्गावरून त्यांची दिंडी आता चालत आहे.

वारक-यांच्या हातात हात घालूनच मुस्लिम संतकवींची ही धारा शेकडो वर्षं वाहतेय.
बिदरच्या शहा मुंतोजी कादरींपासून शाहीर सगनभाऊंपर्यंत अनेकांनी ही परंपरा वाढवली. एकनाथ महाराजांनी मुस्लिम धर्माबद्दल बरंच लिहिलंय.
तर अशा सुमारे ४० संतांची नोंद रा. चिं. ढेरेंनी केलीय.

संतविचारांच्या मशागतीमुळंच इथं द्वेषाच्या विषवल्लीनं कधी मूळ धरलं नाही.
वारकरी धर्माच्या पान्ह्यावरच महाराष्ट्रचं पोषण झालंय. त्यामुळं हिंदू-मुस्लिम वैराची हवा महाराष्ट्राच्या था-यालाही उभी राहिलेली नाही.

1 comment:

  1. warkari samprdayat sate chya hi pudhe jaun samarsta manali jate he khupch chan watat...

    ReplyDelete