'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Monday 10 January 2011

पुण्यातील देवळे

भाविकहो, कशी कोण जाणे या अगोदरची मंदिरं ब्लॉवरून उडाली आहेत. देवाची इच्छा. शोधून काढून पुन्हा टाकतो.... 
..............................................................................


भाविकहो, पुण्यात मुलुखावेगळ्या नावांचे आणखी देव सापडले आहेत..:) म्हणजे मला जुन्या कागदांमध्ये या देवांविषयीची माहिती आणि फोटो सापडले आहेत.  ते या जुन्या कात्रणांमध्ये डकवून देत आहे...

बिजवर विष्णू


शनिवार पेठेतील श्री विष्णू मंदिरात विष्णूची सुबक मूर्ती आहे. या मूर्तीशेजारीच श्री लक्ष्मीचीही मूर्ती आहे. पण ही मूर्ती लहान आहे. विष्णू-लक्ष्मीचा हा जोडा काहीसा विजोड वाटतो. त्यामुळे ही विष्णूची दुसरी बायको असावी, असा अंदाज बांधून पुणेकरांनी या विष्णूला बिजवर विष्णू नाव ठेवले.

लक्ष्मीची पहिली मूर्ती भंगल्याने ही दुसरी लक्ष्मीची मूर्ती आणली गेली असावी, असा अंदाज मंदिराचे मालक पद्ममाकर बापट व्यक्त करतात. २२ मार्च १९३८ रोजी रखुमाबाई लिमये यांनी या विष्णूमूर्तीची स्थापना केली. मंदिराची जागा रखुमाबाईंचे यजमान सरदार विठ्ठल लिमये यांना १८०७ मध्ये दुस-या बाजीरावाने बक्षीस दिली. सध्याच्या मंदिराची इमारत १८१०मध्ये बांधलेली आहे.

मंदिरात पूर्वीभिमुख असणारी विष्णूमूर्ती विठ्ठल रुपात आहे. मूर्तीचे दोन हात कमरेवर आहेत. शेजारी लक्ष्मीची लहान मूर्ती असून पायाशी गरूड आहे. या लोभस मूर्तीच्या दर्शनाने कोणालाही चैतन्यप्राप्तीची जाणीव होते, असे बापट सांगतात. प्रसिद्ध ज्योतिषी राजाभाऊ कर्वेगुरुजींना वयाच्या ९व्या वर्षी या मूर्तीसमोर साक्षात्कार झाला. गुरुजी आणि इतर क्षेत्रांतील अनेक मान्यवर या मंदिरात नियमित येतात.

फाल्गुन वद्य द्वादशी या मूर्तींच्या स्थापनादिवशी मंदिरात भजन-कीर्तनादी कार्यक्रम असतात. गोकुळअष्टमी, एकादशीच्या दिवशी धार्मिक कार्यक्रम होतात. पवमानीय सूक्तात मूर्तीला अभिषेक घालतात. रोजच्या पूजेत पुरुषसूक्त, स्त्रीसूक्त, महामृत्यूंजयमंत्र, आरती आदी उपचार केले जातात.
...............................................................................


उंब-या गणपती


पूर्वी लक्ष्मीरोडवर एका ठिकाणी उंबराची बरीच झाडे होती. उंबराच्या झाडाखाली पारावर हा गणपती होता, म्हणून त्याला उंब-या गणपती संबोधले जाऊ लागले. सध्या सिमेंट इमारतींच्या गराड्यात उंबराच्या झाडाखाली लहानशा मंदिरात हा गणपती विसावला आहे.

ही शेंदूरचर्चित गणेशमूर्ती एक फूट उंचीची असून नाजूक संगमरवरी मखरात बसवलेली आहे. मूर्ती किमान १०० वर्षे जुनी आहे. १९७६पर्यंत हा गणेश लक्ष्मीरोडच्या कडेला लक्ष्मणराव लिमये यांनी विकत घेतलेल्या वाड्यात ही मूर्ती होती. त्यांच्याकडेच या गणपतीच्या पूजेअर्चेची जबाबदारी आहे.
लोकमान्य टिळकांनी या गणपतीच्या उत्सवास सुरुवात केली.
.....................................................................................

  जिलब्या मारुती

तुळशीबागेच्या तोंडाशी पूर्वी हलवायांची दुकाने होती. इथे असलेल्या मारुतीजवळ दोन प्रसिद्ध जिलेबीची दुकाने होती. हलवाई या मारुतीला जिलेबीची माळ घालत. त्यामुळे या मारुतीला जिलब्या मारुती नाव पडले. येथील मंदिरात हनुमानाची सुबक संगमरवरी मूर्ती आहे. तुळशीबागेतील पुजारी पूर्वी या ठिकाणी राहत असत. त्यापैकी फाटक यांची ही जागा होती.

जिलब्या मारुतीची मूळ मूर्ती रस्तारुंदीकरणात भंगल्यानंतर इथे नवीन मूर्तीची लहान देवळात प्रतिष्ठापना करण्यात आली. हे मंदिर दक्षिणाभिमुखी आहे. जिलब्या मारुतीमागे आंबीलओढ्याकाठी पूर्वी स्मशानभूमी होती. काही वर्षांपूर्वी महापालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी खोदला असता इथे रेखीव आणि भक्कम असे सतीचे मंदिर सापडले. या मंदिरात सतीच्या पूजा साहित्यादी वस्तूही सापडल्या. हे मंदिर शितोळे घराण्यापैकी असावे, असाही निष्कर्ष काढण्यात आला.

हे मारुतीमंदिर रायाकाका पटवर्धन यांच्या खाजगी मालकीचे आहे. जिलब्या मारुती मंडळाकडून येथे हनुमान जयंती आणि गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जातो......................................................................................
 
खुन्या मुरलीधर


सदाशिव रघुनाथ उर्फ दादा गद्रे पेशव्यांचे सावकार होते. ते पेशव्यांना कर्ज देत. दादा गद्रेंना मुरलीधराने स्वप्नात दर्शन देऊन मूर्ती घडवण्यास सांगितली. जयपूरच्या बखतराम या शिल्पकाराने श्री मुरलीधराच्या सुंदर मूर्तीसोबतच राधा, दोन गायी आणि गरुडाचीही मूर्ती घडवली. दुस-या बाजीरावाला या सुंदर मूर्तींचा मोह झाला. त्यांनी गद्र्यांकडे या मूर्तींची मागणी केली. पण गद्र्यांनी मूर्ती देण्यास नकार दिला. त्यानंतर आता पेशवे मूर्ती नेणारच या खात्रीने आणि भीतीने मंदिराच्या गाभा-याचे काम झालेल्या ठिकाणी रातोरात मूर्ती बसवायचे गद्र्यांनी ठरवले.

एकदा प्रतिष्ठापना झाल्यावर कोणीही मूर्ती हलवू शकणार नव्हते. त्यानुसार ६ मे १७९७ रोजी सकाळी धार्मिक विधी सुरू झाले. गद्रेवाड्यातून मूर्ती हलवल्याची वार्ता पेशव्यांच्या कानावर गेल्यावर त्यांनी आपल्या पदरच्या तैनाती फौजेला मंदिराकडे जाण्यास सांगितले. या सैन्याचा अधिकारी कॅप्टन बॉईड होता. गद्रेंनी आपल्या पदरचे दीड-दोनशे अरब सैनिक मूर्तींच्या रक्षणासाठी उभे केले होते. मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सुरू असताना तैनाती फौजेतील सोल्जर आणि अरब सैनिकांमध्ये जोरदार चकमक होऊन त्यात शे-दीडशेजण मृत्यूमुखी पडले.
मूर्ती हलविता येणार नाही, हे लक्षात आल्यावर संतापलेल्या पेशव्यांनी गद्र्यांची सर्व मालमत्ता जप्त करून त्यांना नगरच्या तुरुंगात टाकले. मूर्ती बसवण्यास आलेले त्र्यंबकेश्वरचे नारायणभट्ट खरे यांनी पुढे या मुरलीधराचे पुजारपण स्वीकारले. १८२०ला पेशवाई बुडून इंग्रजांची सत्ता आल्यावर त्यांनी गद्रेंची तुरुंगातून सुटका केली. मात्र गद्र्यांनी खरे यांच्यावर मुरलीधराची जबाबदारी टाकून स्वत: त्र्यंबकेश्वरला जाऊन संन्यास घेतला.
वासुदेव बळवंत फडके आणि चाफेकर बंधू हे क्रांतीकारक खरे यांच्याकडे राहत. त्यांच्याच समोर राहणारे द्रवीडबंधू याविषयी इंग्रजांकडे फितूर झाले. म्हणून वासुदेव फडकेंनी द्रवीड बंधूंना येथेच गोळ्या घातल्या. या क्रांतीकारकांसोबतच खरे यांनाही तुरुंगवास भोगावा लागला. अशा या खुन्या मुरलीधराची नोंद इंग्लडमधील म्युझियममध्ये असलेल्या नकाशावर इंग्रज सत्तेला धोकादायक म्हणून करण्यात आली आहे.
या मंदिरातच १ फूट ११ इंच उंचीची मुरलीधराची आणि १ फूट साडेआठ इंच उंचीची राधेची मूर्ती आहे. देहुडा चरण ठेऊन हा मुरलीधर मुरली वाजवतो आहे. गायी आणि त्यांची वासरे मुरलीधराकडे कान वर करून पाहत आहेत. मुरलीधराची मूर्ती प्रभावळीच्या आधाराशिवाय एक पाय आणि दुस-या पायाच्या अंगठ्यावर उभी आहे.
येथे बाराही महिने पुराण चालते. रोज विष्णू सहस्त्रनाम आणि भगवद्गगीता पठण होते. दिनविशेषाप्रमाणे कथा-कीर्तने होतात. गोकुळअष्टमी हा इथला प्रमुख उत्सव आहे.
पूर्वी पुण्यात घरमोडे असत. एका ठिकाणचे घर, वाडा वगैरे विकत घेऊन हे घरमोडे दुसरीकडे जसाच्या तसा वठवीत. अशा सुंदर लाकडी वाड्याचा सभामंडप या मंदिराला आहे.
....................................................................................

गुंडांचा गणपती
कसबा पेठेतील या सिद्धीविनायक गणेशावर १९३६ मध्ये गुंड नावाच्या माणसाने ताबा सांगितला. प्रकरण कोर्टात गेले. तेव्हापासून हा गणपती गुंडांचा म्हणून प्रसिद्ध आहे. सिद्धीविनायकाची ही मूळ मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे. मूर्तीचा डावा पाय उभा दुमडलेला, तर अंगावर सर्पाकार यज्ञोपवीत आहे. उजव्या हातातील पात्रातील लाडू हा गणेश सोंडेने उचलित आहे. बैठक अष्टकोनी गणेशयंत्रावर आहे. ही मूर्ती शिलाहारानंतरची पण शिवकालाच्या ब-याच आधीची म्हणजे साधारणत: १५व्या शतकातील असावी, असा अंदाज आहे.

गणेशमूर्तीवरील शेंदराची पुटे काढून ४ फेब्रुवारी १९७६ रोजी नूतन मूर्तीची प्रतिष्ठावना करण्यात आली. मूर्तीचे शेंदूरकवच पुण्यातील केळकर म्युझियमध्ये ठेवण्यात आले आहे.

पेशव्यांच्या कागदोपत्री य़ा गणेळशाचा उल्लेख आहे. लोकमान्य टिळकांचे गुरू  अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म या गणपतीच्या कृपार्शिवादाने झाला, असे सांगतात. या मंदिराला २५ बाय २५ फुटांचा गाभारा असून गाभा-याभोवती प्रदक्षिणामार्ग आहे.

माघ महिन्यात इथे गणेशयाग केला जातो. भागवत सप्ताहही आयोजित केला जातो. कार्तिक महिन्यात काकडा होतो.

...............................................................


7 comments:

  1. मस्तय एकदम...
    श्रीरंग सही...

    ReplyDelete
  2. व्वा मस्त रे.. जरा टेक्स्ट मोड मध्येच बदडून काढा की वाचायला सोपे.. आम्हाला आपणच सवय लावलीत इरगोंडा टाईप मोठ्या अक्षरात वाचायची... कीप इट ऑन ..

    ReplyDelete
  3. sirji.... layout mast aahe blog cha......

    ReplyDelete
  4. भक्तहो, धन्यवाद!@ भक्ती - रंग बदलता ठेवणार आहे, ब्लॉगचा.

    ReplyDelete
  5. मस्त रे...मजा आली वाचायला...

    ReplyDelete
  6. well and updated information ..this is a research work ..but it should be done with broad canvas....Some one should have to submit a research project on it ...best information

    ReplyDelete