'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Wednesday, 27 October 2021

या 18 ऑक्टोबरला दोन वर्षे झाली त्या ऐतिहासिक घटनेला. होय, ऐतिहासिकच. राजकारणातले वयोवृद्ध सेनापती अर्थात ज्येष्ठ नेते शरद पवार विधानसभा प्रचाराच्या रणमैदानात उतरले. साताऱ्याच्या सभेत त्यांनी मुसळधार पावसात भिजत भाषण केलं आणि हातातून जवळपास निसटलेली निवडणूक जादूच्या कांडीसारखी त्यांच्या हातात आली... 'सकाळ'चा डिजिटल एडिटर म्हणून काम करताना तो कलाटणी देणारा क्षण मी अनुभवला आणि फेसबुकवर शेयर केला. त्यानंतर अशाच उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा पाऊसच सोशल मीडियावर बरसू लागला... दरम्यान मित्रवर्य चन्नवीर भद्रेश्वरठसोबत बोलत होतो. त्यानं या सर्व उस्फूर्त प्रतिक्रियांचं पुस्तक करण्याची कल्पना ऐकवली. ती प्रत्यक्षात उतरवलीही.. त्याच पुस्तकातला हा माझा लेख...

मुळात आम्हा पत्रकारांकडे अंगावर रोमांच येणारी त्वचा आणि संवेदनशील मन असणं वगैरे म्हणजे, अंधश्रद्धा निव्वळ! बातम्या येतात आणि जातात. राजकीय बातम्या तर खिशातल्या. 'मी सांगत होतो, हे असंच होणार म्हणून..', असा अनुभवातून आलेला आत्मविश्वास. व्हिज्युअल्सवर खेळणारे टीव्हीवाले बंधू तर, लहान-मोठ्या बातम्यांचं अख्खं जग 'स्पीड न्यूज'च्या चरकात घालतात. आमच्यातही आहेत, सोईनं लेखणी, वाणी उघडणारे. आणि आम्ही 'सिंहासन'फेम पत्रकार दिगू टिपणीस पंथाचा कर्मठपणा बाळगून! 

पण त्या दिवशी या सगळ्या गाठ सुटल्या. पाऊस सुरू होता. अधूनमधून उभं राहून खिडकीबाहेरच्या रस्त्याचा किती ओढा झालाय, याचा अंदाज घेत होतो. पुण्यातल्या यंदाच्या ऐतिहासिक पावसात अडकल्याचा अनुभव ताजा होता. माहौल निवडणुकांचा होता. कुणाकुणाच्या प्रचारसभा पावसानं रद्द करायला लावल्या होत्या. तशात न्यूजरूममधल्या टीव्हीवर पंतप्रधान मोदींची सभा सुरू झाली. पावसापासून संरक्षणासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त केलेला मंडप दिसत होता. काही कोटींचा! यांना काय ब्वा तोटा... असल्या भावनेनं तिकडं कटाक्ष टाकत होतो.

तेवढ्यात टीव्हीच्या अर्ध्या स्क्रीनवर क्षणभर एक दृश्य झळकलं. धो धो पावसात भिजत एक म्हातारा भाषण करतोय... त्वचा न कळत थरथरली. आणि काटाच आला अंगावर... 'अरे ते चालवा, दुसऱ्या विंडोत मोदींसोबत..,' असं उत्स्फूर्त उद्गारणार, तोच लक्षात आलं, आता आपण टीव्ही न्यूज चॅनलमध्ये नाही आहोत.. मग स्क्रीनभर फक्त मोदी दिसू लागले... आमची घालमेल. साताऱ्याच्या प्रतिनिधीला फोन लावला. द्या तातडीने ते व्हिज्युअल्स, अपलोड करतो. तर तो म्हणाला, सर प्रयत्न करतोय पण, पाऊस प्रचंड पडतोय आणि आम्हीही भिजतोय. त्यानंतर पुढची काही मिनिटं अंगात 'ब्रेकिंग'चं भूत शिरलं. खटपट करून मिळालेली व्हिज्युअल्स मोबाईलवर एडिट केली आणि टेक्स्टसह काही क्षणांत ई सकाळ आणि सोशल मीडियावर अपलोड झाली. कधी नव्हे तो त्याच व्हिडिओचा व्हाटस्अपवर स्टेटस ठेवला. अनेकांचे मेसेज येऊ लागले, आम्हालाही द्या तो व्हिडिओ आणि फोटो... पुढच्या काही क्षणांत मोबाईलमधले सर्व व्हाटस्अपचे स्टेट्स होते, वयोवृद्ध नेते शरद पवार प्रचंड पावसात भिजत भाषण करतानाचे. आम्ही म्हटलं, ही निवडणूक फिरली गड्या आता..! 

इतिहास डोळ्यापुढं घडताना दिसत होता. काय व्यक्त व्हावं हे सुचत नसताना ''असा जिगरबाज नेता आम्ही पाहिला होता..! पुढच्या पिढ्यांना सांगत राहू...'' असं एक वाक्य लिहून पोस्ट शेयर केली. क्षणार्धात ती व्हायरल झाली. लाखो लोकांनी पाहिली.

पवार अनेकांनी अनुभवलेत, पाहिलेत. आमचा तसा फार थेट संबंध नाही. विद्यार्थी बातमीदार असताना पुण्यात एक कार्यक्रम कव्हर करायला गेलो होतो बालगंधर्व रंगमंदिरात. स्टेजवरचा पडदा हळूहळू बाजूला झाला. झगझगीत उजेडात स्टेजवर मान्यवरांची रांग बसली होती. मध्यभागी होते, शरद पवार. प्रेक्षकांना न्याहाळत होते. मला ते एकदमच ओळखीचे, कुटुंबातले वाटले. 

रानडे इन्स्टिट्यूटमध्ये जर्नलिझमचा विद्यार्थी असताना मी 'आमदार कार्यकर्तृत्त्व' नावाचं पुस्तक लिहिलं. त्यात 1957पासूनच्या आमदारांच्या कामांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. आमचे आमदार दिलीप वळसे पाटलांच्या मध्यस्थीनं भीमाशंकर साखर कारखान्याच्या कार्यक्रमात त्याचं प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते झालं. एकटाच गेलो होतो भरल्या स्टेजवर. पवारसाहेबांसोबत गोपीनाथ मुंडे होते. पुस्तकाचं रॅपर उघडताना पवारांनी विचारलं, किती आमदार जमवलेत..? आत्ता लक्षात येतंय त्यांच्या डोक्यात आमदारांच्या आकड्यांचा हिशोब फार जुना आहे.

साहेबांचं राजकारण जुनं, सहकारी जुने, स्टाईल जुनी. त्यामुळं या सोशल मीडियाच्या जमान्यात ते तरुणांना अपिल होणार नाहीत, अशी विश्लेषकांची अटकळ होती. पण, या निवडणुकीत शरद पवार सोशल मीडियात भरून उरले.

आपल्याकडं सोशल मीडियाचा गाजावाजा सुरू झाला तेव्हाची गोष्ट आठवते. मी मुंबईत ज्येष्ठ पत्रकार नितीन वैद्य यांच्यासोबत काम करत होतो. तेव्हा पवारसाहेबांनी 'नितीन, ही सोशल मीडियाची काय भानगड आहे, मला जरा समजावून सांग', असं म्हणून त्यांच्याकडून सोशल मीडिया समजावून घेतला. त्याचवेळी पवारसाहेबांनी स्वत:चा ब्लॉग लिहायला सुरुवात केली. आपल्या कार्यकर्त्यांनाही या माध्यमाची ओळख व्हावी, यासाठी आग्रह धरला. 

सकाळचं 'एग्रोवन' हे देशातलं पहिलं कृषिदैनिक सुरू करण्यापूर्वी आमची तरुण पत्रकारांची टीम कृषिमंत्री शरद पवारांचं त्यांचं मार्गदर्शन घ्यायला गेली होती. एका लांबलचक टेबलावर आम्ही त्यांच्याभोवती बसलो. मी तर शेजारीच बसून त्यांना अनुभवत होतो. नाश्ता करता करता त्यांंचं बोलणं ऐकलं. ते आम्हाला व्यवस्थित जमिनीवर आणणारं होतं. दैनिकातून शेतकऱ्यांसाठी माहिती देताना काय काळजी घ्यायला हवी, याचं भानं देणारं होतं.

समाजाशी निगडीत प्रत्येक प्रश्न पवारसाहेब बारकाईनं समजून घेतात असं ऐकून होतो. त्याचाही अनुभव घेतला एकदा. मित्र आणि 'भवताल'चा संपादक अभिजित घोरपडे एका सकाळी म्हणाला, 'चल, पवारसाहेबांकडे जाऊ गप्पा मारायला'. गेलो मोदीबागेत. तिथं क्रिम कलरच्या मोठ्या सोफ्यावर साहेब बसले होते. डोक्यावर आई शारदाबाई पवारांचं पोर्ट्रेट. शेजारच्या भिंतीवर रंगबिरंगी झूल असलेला रुबाबदार नंदीबैल आणि त्याचा मालक. आम्ही काढलेला 'भवताल'चा 'जलयुक्त शिवार की नद्यांशी खेळ?' हा विशेषांक त्यांनी वाचून काढला होता. या सरकारी योजनेमुळं खरंच नद्यांचं नुकसान होतंय का, याची त्यांना उत्सुकता होती. तास-दीड तास ते ऐकत होते, मध्येच काही शंका विचारत होते. निघताना त्यांना मी संपादीत केलेली संतसाहित्यावरची काही पुस्तकं दिली.  

अजून एक आठवण, एका वर्षी वडिलांनी आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं होतं. मंदिरात आलेल्या पवार साहेबांनी त्यांची आवर्जून चौकशी केली. ते अजूनही त्याबद्दल कौतुकानं सांगतात.

एरवी 'मी देव, देवळांच्या वगैरे भानगडीत फारसा पडत नाही', असं सांगणारे पवारसाहेब पंढरपूरच्या पालखी प्रस्थानापूर्वी मीडियाचा डोळा चुकवून संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी देहूच्या मंदिरात जातात, तेव्हा ते 'माझे सांगाती' असल्याची भावना घट्ट होते.


Saturday, 16 October 2021

होय होय वारकरी...

आई गेली त्याला वर्ष होतंय परवा. तिच्या पाठोपाठ नाना गेले. अचानकच. कोरोनाचं निमित्त. त्यांच्याशिवाय काहीच सुचलं नाही वर्षभर. अजूनही सुचत नाहीये. आईची रोजची आठवण म्हणून चहा घेणं सोडलं. नानांची आठवण म्हणून जेवणात वरून मीठ खाणं सोडलं. लेखक म्हणून स्वत:चं लिहिताना वडिलांच्या नावासोबत आईचंही नाव लिहायचं ठरवलं.. श्रीरंग सुभद्रा निवृत्ती! हा काळ म्हणजे मानसिक पातळीवर पुनर्जन्मच म्हणायचा, एवढा मानवी स्वभावांचा अनुभव घेतला!

'थिंक पॉझिटव्ह'चे संपादक यमाजी मालकरांनी आषाढी वारी विशेषांकात लिहायला सांगितलं तेव्हा साहजिकच हातून सारांशानं का होईना आई-नानांविषयी लिहिलं गेलं. तोच हा लेख...



होय होय वारकरी। पाहे पाहे रे पंढरी।।

असा संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे.

मृगाची चाहूल लागली की, पावशा पक्षी 'पेर्ते व्हा, पेर्ते व्हा' म्हणजे पेरण्या करा, असं शेतकऱ्यांना ओरडून सांगत राहतो. तशीच आषाढीची चाहूल लागली, की शेतातली पेरणी आटोपलेल्या शेतकऱ्यांना आता 'वारकरी व्हा, वारकरी व्हा. माणुसकी पेरण्यासाठी पंढरीच्या वाटेला लागा, असं आवाहन तुकोबाराय या अभंगातून करतात.

वारकरी होणं म्हणजे केवळ पांढरे कपडे, गळ्यात तुळशीमाळ, भाळी अबीरबुक्का, खांद्यावर पताका, हाती टाळ घेऊन पंढरीची वाटचाल करणे नव्हे. तर, वारकरी होणं म्हणजे भला माणूस होणं. चांगुलपणा जपणं. अहंकार सोडून देणं. इतरांसोबत प्रेमानं वागणं. वाईट मार्गाला न जाणं. दुसऱ्यांना मदत करणं आणि मानवतेच्या वाटेवर सर्वांना सोबत घेणं.., आणि हेच सर्व संतांना अभिप्रेत आहे.

तरीही प्रश्न उरतातच. काहीसं अवघड वाटणारं संतांचं ओवीबद्ध साहित्य निरक्षर शेतकरी-वारकऱ्यांचं तोंडपाठ कसं असतं? वारीच्या वाटेवर ते सुख-दु:ख कसं विसरतात? वारीमध्ये ठीक आहे, पण एरवी वर्षभर ते कसे राहतात, वागतात? याची मला सापडलेली काही उत्तरं सांगतो. पुस्तकातली नाहीत, मी अनुभवलेली. माझ्या घरातली...

वडील वारकरी होते माझे. म्हणजे कीर्तनकार बुवा म्हणूनच ओळखायचे लोक त्यांना. फार देखणे दिसायचे. गोरेपान. उंच. शुभ्र फेटा, धोतर शोभावे तर त्यांनाच. त्यांच्यामुळं घरात वातावरण कायम देहू-आळंदी-पंढरीच्या वारीचं असायचं. म्हणजे रोजची जगण्याची, शेतीभातीची कामधामं सुरूच असायची, पण त्या सगळ्यात आपण वारकरी आहोत, याची जाणीव सतत असायची. मला वडील नेहमी अनोळखी वाटायचे. कारण ते सतत लोकांमध्ये, भजना- कीर्तनात असायचे. जलाशयात दुरून एखादा डौलदार हंस दिसावा तसे. कीर्तनात उंच मान करून आलाप घ्यायचे, थयथय नाचायचे. लोक त्यांना हार घालायचे. पाया पडायचे. त्यामुळे ते त्या लोकांचेच आहेत असं वाटत राहायचं.

  अगदी अलिकडं मी आईला चिडवायचोही. आई त्यांना आपल्याला किती मुलं आहेत हे  तरी आठवत असेल का गं? त्यातही मी सगळ्यात धाकटा त्यांच्या लक्षात असेन का?... ज्ञानोबा माऊलींनी एके ठिकाणी असं म्हटलं आहे की,  कासवी आपल्या पिल्लांवर नजरेनंच माया करते. तसंच मला त्यांच्याबद्दल वाटायचं. त्यांचा प्रपंच आणि परमार्थ एकरुप झाला होता. म्हणजे वारीहून आले, की थेट शेतात दिसायचे. जेवढे तिथं तल्लीन व्हायचे, तेवढे शेतात रमलेले दिसायचे. लोक म्हणायचे तुकाराम महाराज आणि आवलीसारखा संसार आहे यांचा.

सगळी भावंडं त्यांच्या कीर्तन, भजनात सहभागी व्हायची. मी मात्र दुरूनच राहायचो. मला ते ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथा भजन, कीर्तनाचा कंटाळा यायचा. मला आत्ता आश्चर्य वाटतंय, ते म्हणजे वडिलांनीही यासाठी मला कधीच आग्रह केला नाही. कुणी तरी विचारलं होतं त्यांना त्याबद्दल, म्हणजे त्यांचा वारसा वगैरे. तर म्हणाले, 'माझा आग्रह नाही. माझ्या मुलांनी शिक्षण घ्यावं, शहाणं व्हावं. त्यांच्या बुद्धीला पटलं तर करतीलही मी करतोय ते..' आत्ता मला हे थोर वाटतंय. तथागत बुद्ध म्हणाले होते तसा, 'अत्त दीप भव' म्हणजे त्यांच्या अंतरीचा ज्ञानदिवा उजळलेला होता. मुलांच्याही मनात तो उजळेलच, असा त्यांना विश्वास होता. संत तुकाराम महाराज ज्या बौद्ध गुंफांमध्ये ध्यान-चिंतनाला बसत तिथं म्हणजे देहूशेजारच्या भामचंद्र डोंगरावर एकांतात जाऊन वडील तुकोबारायांचं चिंतन करत. साहजिकच तुकोबारायांचं बौद्ध चिंतन त्यांच्या मनात पाझरलं असावा. पण या मूळ विचारांचा झरा त्यांच्या वडिलांमध्ये होता. त्यांच्या वडिलांचा म्हणजे माझ्या आजोबांचा, ज्यांचं नावही तुकाराम होतं. त्यांचा तुकोबांचा अभंग गाथा पाठ होता. वडील सांगत, आजोबा तुकोबांचे अभंग सुंदर खड्या आवाजात म्हणायचे. त्यांनी आपल्या एका मुलीचं नाव भिकाबाई ठेवलं होतं. तिला बौद्ध लेण्यांच्या परिसरात म्हणजे जुन्नरच्या नाणेघाट रस्त्यावरच्या एका गावात दिलं होतं. जावयाचं नाव भिकोबा. म्हणजे बौद्ध भिख्खू आणि भिख्खुणी!

आजोबांची गोष्ट भन्नाटच आहे. थोडक्यात सांगतो. साडेसहा फुटी आडदांड माणूस. शरीराप्रमाणं स्वभावातही दांडगाई. मोठं कटुंब. घरात, शेतात लक्ष्मी नांदत होती. त्यांच्या आईनं खंडोबाला आणि विठोबाला नवस केला. दोन मुलं झाली. एकाच कुटंबात मग खंडोबा आणि विठ्ठलभक्ती सुरू झाली. एका घरात बेलभंडार, तर दुसऱ्या घरात अबीर बुक्का. एकीकडं मांसाहार तर, दुसरीकडं शुद्ध शाकाहार. पण दोन्ही भावांचा मोठा एकविचार. पंढरपूरच्या वाटेवर जेजुरीला माऊलींची पालखी थांबायची. तिथं खंडोबाचा येळकोट म्हणत दोघे भंडार-अबीरबुक्का उधळायचे. समाजाचं कारभारपण या कर्तृत्त्ववान भावांकडं होतं. एकदा समाजाच्या पैशांच्या हिशेबात काही तरी घोळ झाल्याची शंका आली अन् बंधुप्रेमात मीठाचा खडा पडला. वारीहून आल्यावर उभा वाद उभा राहिला. एका भल्या सकाळी गडी मोठे सोटे घेऊन आजोबाला शोधत आले. सुगावा लागताच ते पसार झाले आणि मारेकऱ्यांच्या हाती सापडली माझी आजी. एकामागोमाग एक घाव पडले आणि तिनं जागेवरच 'राम कृष्ण हरी' म्हटलं. दिवस होता दसऱ्याचा!

तिथून पुढं कोर्टकचेऱ्या झाल्या. तिघांना फाशीची शिक्षा होणार हे नक्की झालं. पण आजोबांनी पुण्याच्या कोर्टातही दांडगाई केली. ते कोर्टालाच उलटंपालटं बोलले. झालं, मारेकऱ्यांची फाशीची शिक्षा काळ्या पाण्यावर आली. लोक म्हणाले, वेडेपणा केला या माणसानं. मारेकऱ्यांना पापाची शिक्षा मिळाली असती. आजोबा शांतपणे घरी आले. शेतमळा फिरले. बैल सोडून दिले आणि मग परागंदाच झाले. कायमचे. मला वाटतं त्यांच्या मनातला सूडाचा वणवा तुकोबांचा गाथ्याने विझवला...

आजोबांच्या मागं वडिलांच्या रुपानं कुटुंबात एकच मोड राहिला. त्याचा सांभाळ बहिणीनं तिच्या सासरी केला. तरूण झाल्यावर वडील पुन्हा आपल्या गावी, शेतमळ्यात परतले. खरं तर आता हिंदी सिनेमातल्याप्रमाणं 'बदले की आग' भडकायला पाहिजे होती. 'खून का बदला खून से' घ्यायला पाहिजे होता. पण इथंही तुकोबा आड आले. कसे? तर लहानपणी वडील बहिणीच्या घरची गुरं राखत होते भामचंद्र डोेंगराच्या पायथ्याशी. वाटेनं डोक्यावर लाकडी पेटारा घेऊन चाललेला एक माणूस या गुराखी पोराला पाहून थांबला. त्याची विचारपूस केली. त्याला आपला पेटारा उघडून दाखवला. त्यात होते अनेक ग्रंथ. सांगितलं, हे तुकाराम चरित्र वर डोंगरावर जाऊन तुकोबारायांच्या गुहेत जाऊन नित्यनेमानं वाच. तुझं आयुष्य मार्गी लागेल. त्याप्रमाणं वडील डोंगरावर जाऊ लागले. तुकोबांचा त्यांना लळा लागला. एका वर्षी परिसरातल्या वारकऱ्यांसोबत ते पंढरीला गेले आणि मग जातच राहिले.

दुसरीकडं संसारही सुरू झाला. 'मनात सूडाची भावना ठेवायची नाही. क्रोध माणसाला संपवतो..' असे अभंगांतून समजलेले तुकोबारायांचे विचार वडील माझ्या निरक्षर आईला सांगत राहायचे. आई ते तिच्या भाषेत आम्हाला सांगायची. म्हणजे शाळेत कुणाशी भांडणं करू नको म्हणायची. शाळेतून आल्यावर कुणाशी भांडला तर नाहीस ना, विचारत खात्री करायची. आता संत साहित्यातलं तत्त्वज्ञान समजून घेताना लक्षात येतंय, आजोबा कोर्टात तसे का वागले ते. आपला तर संसार संपलाच आहे. आता किमान भावाचा तरी वेलविस्तार खुंटू नये, या भावनेनं त्यांनी स्वत:हून तो सूडाचा प्रवास संपवला. आपल्या वागण्यातून त्यांनी माणूसपणा पेरला, जो वडिलांच्या रुपानं पुन्हा उगवून आला.

पहाटेच उठून वडील आईसोबत जे बोलत बसायचे ते समजायचं नाही. पण आई आम्हाला ते रोजचं काम करता करता सोप्या पद्धतीनं समजून सांगायची. फार छोट्या छोट्या नैतिक गोष्टी होत्या त्या. आईनं प्रचंड गरीबीत संसार केला. पण आम्हाला सांगायची, 'आपल्याला कुणाचं सोनं रस्त्यात पडलेलं असलं तरी नको. आपली कष्टाची भाजीभाकरीच बरी'... 'तिनं सोने रुपे आम्हा मृत्तिकेसमान' हा संत तुकाराम महाराजांचा अभंग समजून घेतलेला होता. त्यामागची संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवरायांची गोष्ट ऐकलेली होती. शिवरायांनी एकदा गरीबीनं गांजलेल्या तुकोबारायांना सोन्यानाण्याचा नजराणा पाठवला होता. पण तुकोबारायांनी तो नम्रपणे नाकारला होता.

वडील वारीला गेले की, महिनाभर काहीच निरोप बातमी नसे. कधी तरी रात्री मुसळधार पावसात भिजत ते येत. त्यांनी दार वाजविण्याअगोदर आईला त्यांची चाहूल लागत असे. झोपेतच आम्ही त्यांच्या पायावर डोके ठेवत असू. दुसऱ्या दिवशी सकाळीच अधीरपणे त्यांची पडशी उघडायची. त्यात पंढरपुरातून आणलेल्या लाह्या-बत्तासं, एखादं खेळणं, बहिणींसाठी लाखेच्या बांगड्या असा आनंददायी ऐवज असायचा. आमचं घर शेतमळ्यात होतं. त्यामुळं शेताकडं येणारा प्रत्येक माणूस पंढरपूरचा लाह्यांचा प्रसाद घेऊन जायचा.

दुसऱ्या दिवसापासून वडिलांचं शेतात काम सुरू व्हायचं. महिनाभर पाऊस झाल्यामुळं शेतात तण आणि बांधावर गवत माजलेलं असायचं. भल्या पहाटेच ते शेतात जायचे. धोतराचा काचा मारून, डोक्यावर घोंगतं घेऊन गवत कापत बसायचे. दिवस उगवता आम्ही उठून पाहायचो तो उंच हिरव्या गवताच्या बऱ्याचशा पेंढ्या आणून त्यांनी गोठ्यात रचून ठेवलेल्या असायच्या. काही म्हशीपुढं टाकलेल्या असत. ते ताजं हिरवं गवत खाताना म्हशीचे डोळे लकाकताना दिसत. गवत तळापासून एकसारखं कापल्यानं बांधावरून छान वाट तयार झालेली असायची. अत्यंत एकाग्र होऊन वडील काम करायचे. मला त्यांचं फार आश्चर्य वाटायचं. म्हणजे कीर्तनात ते जेवढे तल्लीन होऊन गायचे तेवढेच एकरूप होऊन शेतात काम करायचे. मी त्यांच्या हालचाली निरखत बसायचो.

पेरणीपासून पीक काढणीपर्यंत ते शेतातली सगळी कामं करत. मी हायस्कूलला जाऊ लागलो. त्यांना कामात कधीमधी मदत करू लागलो. त्यांच्या लक्षात आलं की शेतात वाफे करणं, पाणी देणं हे काम हा सफाईनं करू शकतो. मग मला कंटाळा येईपर्यंत ते माझ्याकडून काम करवून घेत. मला ओला हरभरा आणि भुईमुगाच्या ओल्या शेंगा प्रचंड आवडायच्या. म्हणून की काय इतर पिकांसोबत ते हरभरा, भुईमूग हमखास पेरायचे. हरभऱ्याला घाटे आणि भुईमुगाला शेंगा येईपर्यंत मला कळ निघत नसे. त्या आल्या की हावरटासारखं भारेच उपटून आणायचो. त्यावर आई म्हणायची एवढं कशाला आणलं, तुझे वडील ओरडतील आता. पण या गोष्टीवरून ते मला कधीही ओरडले नाहीत. 

शेतातल्या कामांतून वेळ मिळाला की ते खोरं, टिकाव, कुदळ, कुऱ्हाड आदींसाठी दांडे बनवायचे. भेंडीचं वगैरे एक चांगलंसं लाकूड आणून ते त्याला काचेच्या तुकड्यानं साळत बसायचे. शिसपेन्सील तासल्यासारखी त्यातून निघालेली वर्तुळं मी खेळायला घ्यायचो. हे काम करताना ते सुंदर शीळ घालत असायचे. अभंगाची एखादी चाल गुणगुणत असायचे. गंमत सांगतो, त्यांच्या त्या सगळ्या पारंपरिक चाली माझ्या लक्षात आहेत. मी त्या अजूनही म्हणून दाखवू शकतो. असेच पंढरपूरहून आणलेले नवीन काशाचे टाळ वाजवून बघून ते त्यांच्या जोड्या जुळवून ठेवत.

एक दिवस मी शाळेतून हुंदडत घरी येत असताना ओढ्याकाठच्या झाडीतून सुंदर पावा ऐकू आला. त्यासोबत आमच्या म्हशीच्या गळ्यातल्या घंटेचा ओळखीचा आवाज. पाहतो तर वडील. बासरीसारखं काही तरी वेगळंच वाद्य ते वाजवत होते. मला खूपच आश्चर्य वाटलं. मी पळत घरी जाऊन आईला सांगितलं. तर ती म्हणाली अरे ते अलगूज आहे, त्यांनी हातानं बनवलंय.वडील आणि मी आम्ही दोघेजण एकदा गावातून घरी चालत येत असताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. मी जोरात धावत सुटलो. शाळेत मी पळण्यात सर्व पोरांमध्ये सरस होतो. पण माझ्या सरसपणाला त्यांनी टाचणीच लावली. गंमतीने पण असे काही जोरात धावले की क्षणात पुढं निघून गेले. घरी येऊन मी आईला सांगितलं तर ती म्हणाली, अरे हे तर काहीच नाही. ते शर्यतीच्या बैलगाड्यांपुढं धावायचे... असंच मी त्यांना विहीरीत सफाईनं पोहताना पाहिलं. मी पुढं चांगला पोहणारा झालो पण, मला त्यांच्यासारखं सफाईदार कधीच पोहता आलं नाही.

सकाळी वडील अंघोळ करून बराच वेळ चालणारी देवपूजा करायला घ्यायचे. ग्रंथ वाचन हा देवपूजेतील मुख्य भाग. देवांना आणि स्वत:ला गंध लावायचा. मी शेजारी बसलो असेन, तर माझ्याही कपाळाला गंध लावायचे. गंध लावताना काही क्षण माझ्या नाकाला त्यांचा तळहात टेकायचा. त्याला चंदनाचा मंद गंध असे. अजूनही तो माझ्या नाकाला जाणवतो आहे. मग ग्रंथ वाचायला घेत. वाचण्यापूर्वी तो मनोभावे माथ्याला लावत. वाचन झाल्यावर पुन्हा माथ्याला लावून वंदन करत. मग पद्धतशीरपणे ग्रंथ केशरी कापडात गुंडाळून ठेवत. पोथी म्हणजे एकत्र असलेले तीन-चार ग्रंथ. त्यात प्रामुख्याने असे ज्ञानेश्वरी! पोषाख करून बाहेर पडताना 'माझी पोथीची पिशवी दे गं' असं ते म्हणाले की, समजायचे ते आज मुक्कामी घरी येणार नाहीत. कारण पोथी वाचल्याशिवाय ते जेवायचे नाहीत.

अखंड हरिनाम सप्ताहात पहाटेच्या काकड्यापासून ते रात्री उशीराच्या भजन जागरापर्यंत सोबतीला कुणी असो नसो. त्यांचा नित्यनेम चुकायचा नाही. ते उत्तम गायचे. टाळ, वीणा, पखवाज, पेटी वाजवायचे. त्यामुळं कीर्तनात जिथं कमी तिथं उभे राहायचे. वर्षातले काही ठिकाणचे त्यांचे कीर्तनाचे कार्यक्रम ठरलेले असायचे. मग गावातलं रामजन्माचं कीर्तन असो की, खेडच्या पोलीसस्टेशनमधील दत्तजयंतीचं. दरवर्षी न चुकता जायचे. बऱ्याचदा कीर्तनाची पूर्वतयारी म्हणून ग्रंथ चाळत बसलेले दिसायचे. दोन-तीन वर्षांपूर्वी एका दर्ग्यात कीर्तन होतं. त्यापूर्वी माझ्याकडं कोल्हापूरला आले होते. माझ्याकडं असलेलं रा. चिं. ढेरेंचं मुस्लिम संतांवरचं पुस्तक त्यांनी वाचून कीर्तनासाठी मुद्दे काढून ठेवले होते.पत्रकार म्हणून एकदा मी पंढरीचा वारी कव्हर करायला गेलो होतो. तेव्हा मी त्यांना दुरून पाहिलं. वय झालं होतं. पण ते इतर वारकऱ्यांसोबत टाळ मृदंगाच्या गजरात भजन म्हणत, हसत रस्त्यातील एका उतारावरून हळू हळू धावत होते. हीच ती उताराची जागा जिथून पंढरपूरच्या मंदिराचे कळस दिसल्यानं न राहवून तुकोबाराय धावत सुटले होते. वारकरी त्याच आवेगानं इथून दरवर्षी धावत सुटतात.

त्यांनी भावंडांनाही भजनं शिकवली होती आणि मला पेटी वाजवायला. त्यामुळं मी शाळेच्या भजनमंडळाचा म्होरक्या झालो होतो.आणखी एक, वारीला गेल्यावर ते बऱ्याचदा सोबत कुणाला तरी घेऊन येत. म्हणजे एखादा अनाथ किंवा संसाराला कंटाळलेला, नदीच्या घाटावर विमनस्क बसलेला... त्याचे खाण्यापिण्याचे हाल होऊ नयेत म्हणून ते त्याला घेऊन घरी येत. मग तो अनोळखी माणूस घरचाच होऊन जाई. पुन्हा त्याला घेऊन वारीला जात. मग तो तिकडेच गायब होई.

शूचिर्भूत होऊन गंध टिळा लावलेले, स्वच्छ टापटीप कपडे घातलेले, अस्खलित आणि रसाळ प्रवचन करणारे प्रवचन, कीर्तनकार पाहून भोळेभाबडे कष्टकरी वारकरी बुजतात. त्यांच्या ज्ञानाचा आदर करत त्यांना नमस्कार करतात. ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत, असं त्यांना वाटतं. पण माऊलींनी दाखवलेल्या समतेच्या वाटेवर सगळ्यांना सारखाच अधिकार. तिथं कुणीच लहान-थोर नाही. म्हणून वडील सोबतच्या गबाळ्या दिसणाऱ्या माणसाकडं वीणा द्यायचे. त्याला टाळ वाजवायला, गायला, वाचायला शिकवायचे. कधी अचानक त्याच्यासमोर ज्ञानेश्वरी ठेवायचे आणि लोकांसमोर प्रवचन करायला सांगायचे. अशी कितीतरी माणसं मी पाहिलीत, ज्यांना वडिलांनी आत्मविश्वास दिला. धीट केलं. त्यामुळं ती प्रवचन, कीर्तन करू लागलीत. असंच तमाशातल्या माणसांबाबत. तमाशातली माणसं कीर्तनात, वारीत आणण्याची किमया त्यांनी केली. ही माणसं कशाला कीर्तनात म्हणून काही मंडळी नाक मुरडायची. पण तमाशात ढोलकी वाजवणारा वडिलांच्या कीर्तनात मृदंग वाजवायचा. तुणतुणं वाजवणारा हाती वीणा घ्यायचा. लावणीचे झीलकरी टाळकरी व्हायचे. स्टेजवर गणगवळण म्हणणारे फार उत्तम भजन गायचे. ही सगळी मंडळी वडिलांचे जीवलग सोबती बनले. वडिलांनी त्यांना प्रतिष्ठेनं वागवलं. कीर्तना-भजनात त्यांनी महिलांनाही मान दिला. त्याची सुरुवात म्हणून आपल्या मुलींनाही त्यांनी प्रवचन, कीर्तन, भजन शिकवलं.

वडील आषाढी वारीला पंढरीला निघाले की, कुठली कुठली कष्टकरी माणसं त्यांना येऊन मिळायची. मग त्यात अगदी एखादा दारूच्या आहारी गेलेला माणूसही निघायचा. त्याचाही ते कंटाळा करायचे नाहीत. पंढरीच्या वाटेवर महिनाभर आपल्यासोबत राहिला म्हणजे आपोआप दारू विसरेल असं म्हणायचे. माऊलींचा तो पालखी सोहळा अनुभवून तो मनुष्यही भारावून जायचा. गळ्यात तुळशीची माळ घालून घरी यायचा. अर्थात यातले काही बहाद्दर पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' सुरू करायचे. पण वडील जिद्द सोडायचे नाहीत. अशा माणसांचा किंवा शाकाहारी नसणाऱ्या माणसांचाही त्यांनी द्वेष केला नाही. या सर्वांना एक गोष्टी मात्र ते आवर्जून सांगायचे, ती म्हणजे आपल्या मुलांना शिकवा. इतरांना सांगण्यापूर्वी त्यांनी स्वत:च्या मुलांना शिकवलं. गरजू विद्यार्थ्यांना, होस्टेल मिळवून देण्यासाठी, त्यांना वह्या पुस्तकं मिळवून देण्यासाठी नेते, अधिकाऱ्यांकडे त्यांनी वाऱ्या केल्या.बुवा वारीला निघाले म्हणजे गावातल्या घराघरांतून त्यांच्या दिंडीसाठी शिधा दिला जायचा. म्हणजे धान्य वगैरे. ते त्यांना अगदी १ किलो, २ किलोपण चालायचे. शिवाय देणगीदार म्हणून अहवालामध्ये त्यांची नावं छापायचे. मला हे सगळंच अजब वाटायचं. 

का कोण जाणे, मलाही हळू हळू संत साहित्याची आवड निर्माण झाली. संतवचनांचे, तत्वज्ञानाचे अर्थ लावताना वारकरी वडिलांचं जगणं, वागणं उलगडू लागलं. आदरयुक्त भीतीमुळं मी कधीही त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करू शकलो नाही. काही विषय बोलायचाच असेल तर तो आईच्या माध्यमातून. माझ्यासाठी वडील म्हणजे दूर सरोवरात पोहणारा राजहंसच. त्याच्या जवळपासही जाणं जमलं नाही. पण दैवाची लीला की काय म्हणतात ते... गेल्या वर्षी घडलं. आई-वडिलांना दोघांनाही कोरोनाची लागण झाली. आई अचानकच गेली. तिच्या जाण्यानंतर खचलेल्या वडिलांसोबत मी राहिलो. ते कोरोना वॉर्डात आणि मी बाहेर बसलेला. संपर्क फोनवर. ते त्यांचे शेवटचे दिवस. सरलेल्या वाटचालीचं चिंतन करत असावेत.फोनवर बोलता बोलता मला म्हणाले, ''मला काही करता आलं नाही तुम्हा मुलांसाठी...'' म्हणजे रुढार्थानं करिअरसाठी मदत, बँक बॅॅलन्स, प्रॉपर्टी असं, म्हणायचं होतं त्यांना... मला भरून आलं. मी नाना म्हणायचो त्यांना. 'नाना, मग आम्ही कसे मोठे झालो? कुठल्याही व्यसनात का नाही अडकलो? भलत्या मार्गाला भरकटत का नाही गेलो? अधिकार पदांवर असतानाही भ्रष्ट का नाही झालो? कुठल्याही काळात नैतिकता का नाही सोडली? अखेर वारकरी विचारांच्या पंढरीला कसे निघालो? हे तुमच्यामुळं नाही तर कुणामुळं..? असं बराच वेळ काहीबाही बोलत राहिलो... जे आयुष्यभर त्यांच्याशी बोलू शकलो नव्हतो. उशीरा का होईना, आमच्यातलं अंतर संपलं. मला म्हणाले, 'मला घरी घेऊन चल. तिथं माझी माणसं मला भेटायला येतील न् मी बरा होईन...'मी त्यांना घरी घेऊन गेलो. त्यांची माणसं त्यांना भेटत राहिली. ते त्यांच्याशी बोलत राहिले...

एक दिवस त्यांची तब्येत बिघडली. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी तातडीनं त्यांना गाडीत बसवलं. पुण्याच्या दिशेनं निघालो. ड्रायव्हिंग सीटवरून आरशात मागं बघितलं. नाना नेहमीप्रमाणं शांत, खंबीर दिसत होते. पण चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान विलसत होतं. मला म्हणाले, गाडी सावकाश चालव... पुण्यात पोहोचण्यापूर्वी खेडमध्येच रस्त्याकडेच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करावं लागलं. चंद्रभागा नदीच्या अगदी किनाऱ्यावरच हॉस्पिटल होतं ते. होय, चंद्रभागाच ती. भीमाशंकरहून आलेली भीमा नदी. तीच तर पुढं वाहत जाऊन पंढरपुरात पांडुरंगाच्या चरणी चंद्रभागा होते. जिच्या पवित्र पाण्यावर वडिलांचं भरण पोषण झालं, जिच्या सोबतीनं ते पंढरपूरला जात राहिले, त्याच भीमा-चंद्रभागेच्या काठावर त्यांनी विठ्ठलाचं नामस्मरण करत देह ठेवला. त्यावेळी त्यांचा हात हातात घेऊन मी त्यांना मनोमन वचन दिलं; नाना, मी वारकरी होईन...

24 नोव्हेंबर 2020 रोजी लिहिलेली फेसबुक पोस्ट - 

माझे आई-वडील गेले हो..! 

रखुमाई पाठोपाठ विठुराया वैकुंठाला गेले..!!

आमचं पंढरपूर पोरकं झालं.!!!

या कोरोनामुळं गेल्या ६८ वर्षांत त्यांची पंढरीची वारी पहिल्यांदा चुकली हो... म्हणून त्यांच्या देवाला भेटायला ते थेट वैकुंठालाच गेले...

आई-नाना,

तुमच्यावाचून दाही दिशा ओस पडल्यात... अनाथपणाच्या खोल अथांग कृष्णविवरात मी हरवलोय...

दिवस जातील, दिवस येतील पण, प्रत्येक दिवसाला तुमची आठवण असेल...

टाळ मृदुंगाचा आवाज आला की, तुमची आठवण येईल...

भजनाचे सूर कानावर आले की, तुमची आठवण येईल...

देवळाचा कळस दिसला की, तुमची आठवण येईल...

गाभाऱ्यातली विठु-रुखमाय पाहिली की, तुमची आठवण येईल...

वारीला निघालेले वारकरी पाहिले की, 

तुमची आठवण येईल!!

कुणाच्या कपाळाचा गंध, बुक्का पाहिला की, 

तुमची आठवण येईल...

डोक्यावर पांढराशुभ्र फेटा असलेला माणूस पाहिला की, 

तुमची आठवण येईल...

नऊवारी लुगडं, चोळी, कुंकू ल्यायलेली आजी, मावशी दिसली की, तुमची आठवण येईल...

आळंदी, देहू, पंढरपुरात गेलं की, तुमची आठवण येईल...

पंढरपुरातला हळद-कुंकवाची, तुळशी माळेची दुकानं पाहिली की, तुमची आठवण येईल...

भरलेली चंद्रभागा पाहिली की, तुमची आठवण येईल...

तुळशी वृंदावन पाहिलं की, तुमची आठवण येईल...

पहाटेचं झुंजूमुजू झालं की, तुमची आठवण येईल...

भल्या सकाळी वासुदेव गाणं म्हणत आल्यावर तुमची आठवण येईल...

भर उन्हातली डेरेदार वृक्षाची घनदाट सावली पाहून तुमची आठवण येईल...

सूर्य मावळतीला गेल्यावर, कातरवेळी तुमची आठवण येईल...

श्रावणातली पोथी सुरू झाल्यावर तुमची आठवण येईल...

धूप, दीप, अगरबत्तीच्या सुवासासोबत तुमची आठवण मनात दरवळेल...

माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकोबारायांच्या गाथा वाचायला घेतला की, तुमची आठवण येईल...

पंढरीच्या वाटेवर आषाढधारा झेलताना, आळंदीतली कार्तिकी वारीतली थंडी अनुभवताना तुमची आठवण येईल...

रंजल्या-गांजलेल्यांना, अनाथ-दीन-दुबळ्यांना कुणी पोटाशी धरताना पाहिलं की, तुमची आठवण येईल!!

शिवारात पेरण्या सुरू झाल्या की, तुमची आठवण येईल...

गाई-गुरं पाहिली, त्यांचं हंबरणं ऐकलं की, तुमची आठवण येईल...

शेणानं सारवलेली भुई पाहिल्यावर तुमची आठवण येईल...

चुलीवरल्या भाकरीचा खरपूस गंध आल्यावर तुमची आठवण येईल...

जेवताना पहिला घास घेताना तुमची आठवण येईल...

ठेच लागल्यावर तुमची आठवण येईल...

उचकी लागल्यावर तुमची आठवण येईल..!!!


Thursday, 14 October 2021

वारी म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास!

महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर पंढरीची वारी समजून घ्यायला पाहिजे. अजूनही वारीच्या वाटेवरील मुक्कामांच्या ठिकाणी उत्खनन केलं, तर आपल्याला किमान १२ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास सापडेल. कारण या मार्गाला ‘पॅस्टोरल नोमॅडीक’ असं म्हणतात. मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी ऋतुमानाप्रमाणे मेंढपाळ त्यांची मेंढरं घेऊन याच मार्गानं जा-ये करत होते, असं सांगताहेत प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ, सांस्कृतिक विचारवंत डॉ. गणेश देवी. सुमारे ४० भाषांना प्रमाणभाषांचा दर्जा मिळवून देण्याचं काम किंवा देशातील 700हून अधिक भाषांचा सहकाऱ्यांच्या मदतीनं शोध लावणारे, मानवी संस्कृतीच्या अभ्यासातील महत्त्वाचं नाव असलेले डॉ. देवी यांनी पंढरीच्या वारीवर 'सकाळ'च्या 'विठाई'ला दिलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून केलेलं हे चिंतन...



प्रश्न : राष्ट्र सेवादलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपलं पहिल्यांदा अभिनंदन. आपण आज बोलणार आहोत, पंढरपूरच्या वारीविषयी. संतांनी महाराष्ट्राची भाषा घडवली असं म्हणतात, यासंबंधी तुम्ही काय विवेचन कराल? 

उत्तर : महाराष्ट्रासारखी वारी देशातल्या कुठल्याही भागात अस्तित्वात नाही. फक्त महाराष्ट्रातच वारी का आहे, याचा विचार करत असताना, आपल्याला इतिहासात डोकावावं लागेल. आपल्या आशिया खंडात, भारतात जगण्याचं मुख्य साधन आहे. साधारणपणे आठ ते नऊ हजार वर्षांपूर्वी हे रुजलेलं आहे. पण त्याच्या आधीही इथं कोणी होतं का नाही? तर त्याचं उत्तर असं आहे, गेल्या वर्षी जेव्हा जेनेटिक अभ्यासानुसार भारताच्या लोकसंख्येची मांडणी करण्यात आली, तेव्हा दक्षिण भारतामध्ये साधारणपणे ४५ हजार वर्षे वस्ती आहे. महाराष्ट्रातदेखील ४५ हजार वर्षांपूर्वीपासून वस्ती आहे. मध्ये शीतयुग येऊन गेलं. त्या वेळी ही संख्या कमी झाली होती. त्या शीतयुगाच्या शेवटी म्हणजे साधारण दहा-बारा हजार वर्षांपूर्वीचा काळ वारी समजण्यासाठी फार महत्त्वाचा आहे.

प्राणी पाळून त्यांचं संगोपन करून जगणारा समाज अस्तित्वात होता. त्यात लोकरीला, मेंढपाळांना खूप महत्त्व होतं. मेंढ्यांच्या जगण्यासाठी जो आधार असतो, ते एखाद्या भागातलं गवत मेंढ्या फार लवकर संपवतात. म्हणून एकाच जागी राहून मेंढपाळ मेंढ्या पाळू शकत नाही. त्यामुळं त्याला फिरावं लागतं. याला ‘पॅस्टोरल नोमॅडीक’ असं म्हणतात. मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी मेंढपाळांचे ऋतुमानाप्रमाणे जाण्याचे मार्ग ठरले होते. साधारणपणे हिवाळ्यामध्ये आपल्या मूळच्या जागेहून निघून समुद्रकिनाऱ्याकडं कोकणाकडं जाणं, घाटमाथ्यावर जाणं आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर त्याच रस्त्यानं परत येणं आणि हळूहळू आपल्या गावामध्ये थोडी-थोडी शेती करणं हा त्यांचा क्रम होता. त्या वेळी शेतीची ही प्राथमिक अवस्था होती. त्या वेळी शेती ठरलेली नव्हती आणि रोपण करण्याच्या पद्धतीही ठरलेल्या नव्हत्या. फेकीच्या पद्धतीनं रोपण व्हायचं. त्या वेळी मजुरी व्हायची नाही. हा मेंढ्यांचा जो मार्ग आहे, तो दरवर्षी पावसाच्या आणि हिवाळ्याच्या आधारावर निश्‍चित झाला. साधारणतः तीन-चार महिन्यांमध्ये एका जागी राहून आणि बाकीच्या वेळी फिरायचा पल्ला निश्‍चित झाला होता. म्हणजे कोणी म्हटलं की, हे हजारो किलोमीटर का नाही गेले? तर तीनशे ते चारशे किलोमीटरचा हा जो रस्ता तयार झाला, त्यावर पॅस्टोरल नोमॅडीक समाज हळूहळू शेतीकडे सरकत चाललेला होता. ही प्रक्रिया साधारणपणे पाच ते सहा हजार वर्षं जर सतत सुरू राहिली, तर त्यांची थांबण्याची ठिकाणं, त्यांची झोपेची, पाणी पिण्याची ठिकाणंही ठरत जातात. 

काही जागी अडचणी येतात, प्रार्थना करावीशी वाटते, तर यांची देवस्थळं ठरत जातात. काही झाडं, काही टेकड्या, नद्या, दगड अशी ठिकाणं ठरतात. पंढरपूरचं देवस्थान आहे ते पॅस्टोरल नोमॅडीक लोकांचं. दरवर्षी पावसाळ्याच्या सुमाराला घाटमाथ्याकडून पंढरपूरपर्यंत, त्या नदीपर्यंत किंवा सोलापूरकडं जिथं जमिनीचा कस अत्यंत उत्कृष्ट आहे तिथं जाणं असा क्रम आहे. त्या भागामध्ये पाच ते सहा हजार वर्षांपूर्वी तांदूळ पिकवला जात होता. परंतु, हळूहळू आपण ज्वारीकडं वळलो आहोत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. पावसाळ्याच्या आरंभाला पश्‍चिम महाराष्ट्रातून निघून चंद्रभागा-भीमा नदीपर्यंत पोचतो. संत साहित्य याच्याबरोबर जोडलं गेलं. ही भटकणारी मंडळी ज्यांना हजारो वर्षं सांकेतिकरीत्या ठरलेला मार्ग आहे, असे लोक या सर्व प्रवासामध्ये, यात्रा वारीच्या वाटचालीमध्ये त्यांचं ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देण्याचे काही मौखिक प्रकार रूढ होते. ते सांकेतिक मौखिक होते. अमुक शब्द म्हटल्यानंतर अमुक अर्थ असा एक ज्ञानाचा कण. आपण काही वेळा म्हणी वगैरे वापरतो. उदाहरणार्थ, शहाण्याला शब्दाचा मार. हे म्हणजे आपलं ज्ञान आपण दुसऱ्या पिढीला देणं. हे लक्षात राहण्यासाठी त्याला चाली देऊन गाणी म्हणणं, जी मौखिक गीतं असतात त्यांना आपण लोकगीतं म्हणतो. 

ही लोकगीतं अशी शेकडो वर्षे चालत राहिली. ही गीतं पुढं बदलत राहतात. आणि जेव्हा आपल्या राज्यात संत साहित्याचा प्रभाव पडला, तेव्हा या लोकगीतांच्या जागी एखादं संतगीत आलं आणि हाही प्रकार शेकडो वर्षं म्हणजे संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत तुकाराम यांच्यापासून सुरूच आहे. ते अगदी दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या अंमलाच्या काळाच्या आधी घरोघरी पसरलेले जे लोकगीतांचे प्रकार होते, त्यात हळूहळू अभंग येत गेले. जात्यावर संतांची गाणी गायली जायची. त्याच्याआधी जात्यावरची गाणी वेगळी असतील. यातून ज्ञानाचं अभिसरण होत गेलं, नवीन ज्ञानाचे धडे यात येत गेले आणि आजही वारीमध्ये नव्या प्रकारची गीतं येत राहतात. काही गीतं असतात. मौखिक परंपरेनं स्मृतिआधारित परंपरा असते. भक्ती हा या प्रवास मार्गाचा मुख्य हेतू नव्हता; पण या प्रवास मार्गावर भक्ती करणं जरुरी होतं आणि ज्ञान दुसऱ्या पिढीला देणं जरुरी होतं. या दोन्हीचा संगम झाला. भीमा नदीच्या काठी पांडुरंगाचं देवस्थान हे त्यांच्या प्रवासाच्या मार्गावरचा महत्त्वाचा टप्पा होता. म्हणून वारी निश्‍चित जागी थांबते, दिंड्या निश्‍चित जागेवरून निघतात. ही परंपरा आहे. जर या मार्गावर, मुक्कामाच्या जागांवर उत्खनन झालं, तर उत्खननामध्ये साधारणपणे ११ ते १२ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडला जाईल.  

प्रश्न : माझे आजोबा शेतकरी. वारीच्या वेळी त्यांच्याकडील बैलं घेऊन ती चारत-चारत ते देहू-आळंदीला जायचे. ते निरक्षर होते. आम्हाला आश्‍चर्य वाटायचं, की निरक्षर असूनही त्यांना सगळे अभंग कसे पाठ आहेत? संत तुकारामांची गाथा त्यांना पाठ होती. याचा अर्थ शेतकरी, धनगर, मेंढपाळ यांचा संबंध आहे; तो हजार वर्षांचा आहे आणि त्याला चाली लावणं म्हणजे कदाचित त्यामुळं ते कंठस्थ होत असावं. त्याला ताल, वाद्य यांची साथ आहे. 

उत्तर :
हो, ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं देत असताना त्याला एक स्ट्रक्‍चर द्यावं लागतं, जे फॉर्मल स्ट्रक्‍चर असतं. त्याला फॉर्म द्यावा लागतो आणि माणसाच्या मेंदूची रचना अशी आहे की, संगीतमय शब्दरचना माणूस जास्त काळ लक्षात ठेवू शकतो. ज्या काळी कागद नव्हता त्या काळी संगीतातून ज्ञान लक्षात ठेवले जात असे. शब्द ऐकून त्याचं विश्‍लेषण मेंदूचा डावा भाग करतो. संगीतमय शब्द जास्त लक्षात राहतात. नंतर कागद आला, शाळांचं स्वरूप बदललं, त्याला मी माझ्या सोप्या शब्दात ‘घोंगडी परंपरा’ असं म्हणेन, जी चालता-चालता घोंगडी बनवायची. त्यांची ज्ञानाची रचना ही घोंगडीच्या रचनेची होती उभी-आडवी प्रकारची. पण हळूहळू अर्थकारण बदलत गेलं, अर्थकारणामध्ये शेती व्यवसायाला बैलांचे, गायीचे बाजार वेगवेगळ्या जागी होऊ लागले. आपल्याकडे कोल्हापूरमध्ये काही देवस्थळं आहेत, उत्तर कर्नाटकामध्ये गायींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार व्हायचे तिथं आजूबाजूला देवस्थळं निर्माण झाली आहेत. श्रद्धा ही अर्थकारणाला जोडूनच निर्माण होत असते. त्या वेळी कागद आपल्याकडे आला. नंतर संतांच्या रचना या मौखिक, त्याचबरोबर कागदावर पसरू लागल्या. वारीमध्ये अभंग, ओव्या म्हटल्या जातात. मौखिक गीतं म्हटली जातात. म्हणून बरेच लोकं या वारीशी जोडले गेले. वेगवेगळे पंथ हे या पद्धतीनं निर्माण झाले. कर्नाटक ते केरळ अशी एक वारी निघते; पण तिचं स्वरूप वेगळं आहे. देशात जिथं-जिथं पॅस्टोरल नोमॅडीक लोकांचे फिरायचे मार्ग होते, त्या मार्गावर देशातील अनेक धार्मिक स्थळं निर्माण झाली आहेत. त्या स्थळांशी तिथल्या लोकांचा यात्रेचा संबंध, फिरण्याचा, परिक्रमेचा, वारीचा संबंध वेगवेगळ्या प्रकारे रचला गेला आहे. महाराष्ट्राला याचा फार अभिमान वाटायला पाहिजे; कारण वारी ही फक्त आपली सांस्कृतिक श्रीमंती नाही; आपल्या इतिहासाचा तो जिवंत आरसा आहे. वारीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा १० ते १२ हजार वर्षांचा इतिहास कोणीही लिहू शकेल. फक्त त्याला संपूर्ण आयुष्य खर्च करावं लागेल. 

प्रश्न : दक्षिण भारताचं मोठं नातं पंढरपूरच्या विठोबाशी आहे. तसेच उत्तर भारतातून कबिराची दिंडी पंढरपूरला यायची. याचबरोबर भाषेच्या बाजूनं संपूर्ण देश या वारीशी जोडला गेलेला आहे. संत तुकाराम महाराज यांनी दख्खनी भाषेमध्ये अभंग लिहिले आहेत. संत नामदेवांनी गोरखबानीमध्ये अभंग लिहिले. केरळ, तमिळनाडूमधील गायकही मराठी संतांचे अभंग गातात. वारीच्या अनुषंगाने ही जी भाषेची देवाण-घेवाण आहे याबद्दल जरा सांगा. 

उत्तर : हे जर समजून घ्यायचं असेल तर सोप्यात सोपं उदाहरण देतो; पण ते उदाहरण मेकॅनिकल कोणी समजू नये. म्हणजे एक विद्यापीठ असतं, तिथं वेगवेगळ्या गावांवरून विद्यार्थी येतात. तसं वारी हे एक विद्यापीठच आहे. या विद्यापीठात वेगवेगळ्या जातींचे, धर्मांचे, पंथांचे, भक्तिभावाचे समुदाय आल्यानंतर त्यांची भाषा, त्यांची भक्ती, त्यांच्या समुदायांचे देव, श्रद्धा यांना लेजेटेमेन्सी मिळायची. त्यामुळं ते वारीला जोडले जायचे आणि ते मग जोडल्यानंतर ते आपली ठेव या वारीत ठेवून जायचे. त्यांनी सोडलेला वारसा पुढे चालत राहिला. वारी जेव्हा मौखिक परंपरा आणि कागद यांच्या युद्धात सापडली होती, संघर्ष होत होता. त्याच वेळेस दक्षिण भारतात प्रस्थापित हिंदू धर्माच्या विरुद्ध, हिंदू श्रद्धांच्या विरुद्ध मोठं बंड सुरू झालं होतं. त्याला ‘सेक्‍टेरियन मूव्हमेंट’ म्हणतात किंवा ‘भक्ती चळवळ’ म्हणतात. पहिल्यांदा दक्षिण तमिळनाडूमध्ये अल्वर्ट, बसवेश्वर लिंगायत कर्नाटकमध्ये, नंतर आपल्याकडे देवाला माणसाच्या जवळ आणणारे ‘विठू माझा लेकुरवाळा’ असं म्हणणारे पंथ निर्माण झाले. या सगळ्या पंथांना वारी विद्यापीठामध्ये वैचारिकतेने मुक्त राहू शकतो, असा विश्वास होता. सामाजिक मुक्तीचा प्रवास करण्याची हमीची जागा वारी, ही आपल्या स्वातंत्र्याची हमी आहे. जोपर्यंत वारी आहे, तोपर्यंत आपली माणसं स्वतंत्र होऊ शकतात; म्हणून मध्ययुगामध्ये सोळाव्या-सतराव्या शतकामध्ये महाराष्ट्रातून स्वातंत्र्याचा झेंडा फडकवला गेला. 

प्रश्न : संतांनीही मराठी भाषा घडवली, टिकवली आणि मराठीवरचं अतिक्रमणही रोखलं, असं म्हणता येईल का? 

उत्तर : वारीमुळं मराठीमध्ये खूप सुंदर सुंदर तेलगू शब्द, कानडी शब्द, कोकणी शब्द येत राहिले. जेव्हा मौखिक परंपरेतून लिखित परंपरेमध्ये मराठी प्रवेश करत होती; त्या वेळेला नव्या शब्दांची संपत्ती मराठीत येत गेली. याचा मराठीला समृद्ध होण्यासाठी खूप मोठा फायदा झाला. म्हणून त्यानंतर ज्याला प्रिंट कॅपिटॅलिझम म्हणतो, म्हणजे जगभर प्रिंटिंग आल्यामुळे जगभरातल्या हजारो भाषा संपूर्णपणे नष्ट होत गेल्या; परंतु आपल्याकडे मराठी भाषा अधिक उफाळून आली. हे उफाळून येण्यासाठी जे सत्त्व लागतं ते वारीच्या या शब्दसंपत्तीच्या शिंपडण्यानं निर्माण झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जिवंत इतिहास लिहायचा असेल तर वारी हे फार प्रचंड आणि प्रभावी माध्यम आहे. पण त्याच्यासाठी ऑर्किऑलॉजी, जेनेटिक्‍स, भाषाशास्त्र, डेमोग्राफी, सोशालॉजी, इकॉनॉमी, पॉलिटिक्‍स या सगळ्या अंगाने अभ्यास करायला हवा. हे काम सरकार एकटं करू शकणार नाही. म्हणून लोकांनी, म्हणजे वारीत सहभागी होणाऱ्या लोकांनी, म्हणजे ज्यांना वारीची आवड आहे त्यांनी करावं. त्यासाठी त्यांनी एकत्र येऊन ‘पीपल्स स्टडी ऑफ हिस्टरी ऑफ महाराष्ट्र थ्रु वारी’, असा २५-५० वर्षांचा मोठा प्रकल्प हाती घ्यावा. त्यातून जे फलित हाती येईल, त्यातून प्रत्येक मराठी माणसाला अत्यंत सार्थ अभिमान वाटू शकेल, असा इतिहास पुढं येईल. खोटा अभिमान गळून पडेल. तोही आपला दुर्गुण आहे आणि वारी हा आपल्या सत्याचा आरसा आहे. 

प्रश्न : भाषेची वारी अशी संकल्पना तुम्ही मांडली होती. सहा हजार भाषांचे प्रतिनिधी त्यात सामील व्हावेत, १२० देशांमधील साहित्यिक यावेत, ही संकल्पना नेमकी काय होती? 

उत्तर : २०१९ हे ‘इअर ऑफ इंडिजिनियस लॅंग्वेजेस’ असं ‘युनेस्को’नं जाहीर केलंय. भाषा अस्तंगत होत आहेत, मरत आहेत, ही ‘युनेस्को’ची चिंता आहे. जगातल्या सहा हजारांपैकी तीन-चार हजार भाषा अगदी मरणासन्न अवस्थेजवळ येऊन ठेपल्या आहेत. मला असं वाटतं की, या सगळ्यांनी एकत्र यावं. एकत्र येण्यामागं ताकद असते आणि ते लोक पुण्याला येणार होते. तर आपल्या महाराष्ट्राला जगाला देण्यासारखं काय आहे? असं जर एका शब्दात उत्तर विचारलं तर मी वारी म्हणेन... 

म्हणून मला वाटलं की, आपण भाषांना वारी काय असते याचा विचार करायला लावूया. म्हणून मी ‘भाषा वारी’ काढायचं ठरवलं. सहा हजार भाषांचे प्रतिनिधी ८७ देशांतून आले होते. परदेशांतून ३०० लोक आले होते. ते पाच-सहा किलोमीटर चालले. जे विदेशातून आले होते, त्यांना वारी म्हणजे काय असतं? वारी म्हणजे फेस्टिवल नसतो, तर एक वेगळा पवित्र गंभीर प्रकार असतो; परंतु तो लोकतांत्रिक असतो आणि तो कोणी ऑर्गनाईझ केलेला नसतो, हे ध्यानात यायला हवं. म्हणून मी त्यांना वारीची झलक दाखविली. त्यात प्रत्येक संताचे एक गीत, एक अभंग म्हणणारे असे ग्रुप होते. तर ते सगळं बघितलेल्यांचे परदेशातून मला अजूनही मेल येतात, टेलिफोन येतात की, तो आनंद आमच्यासाठी खूप वेगळा होता. 

वारी म्हणजे सामाजिक मुक्तीचा प्रवास आणि आपल्या स्वातंत्र्याची गॅरंटी आहे, असं म्हणता येईल. लोक उत्स्फूर्तपणे वारीत येतात. जोपर्यंत वारी आहे, तोपर्यंत आपण स्वतंत्र राहू शकतो. म्हणून मध्ययुगात, सोळाव्या-सतराव्या शतकात महाराष्ट्रातून स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला गेला. 

यानिमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, पंढरपूरमध्ये साने गुरुजींनी १९४७ मध्ये अस्पृश्‍यांना, दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून प्राणांतिक उपोषण करायचं ठरवलं आणि त्यांनी आपले प्राण पणाला लावले. त्यांच्या लढ्याला यश आलं आणि अस्पृश्‍यांना मंदिर प्रवेश मिळाला. हा सगळा समतेचा खेळ आहे. राष्ट्र सेवादलामार्फत आणि समविचारी लोकांमार्फत जिथं साने गुरुजींनी उपोषण केलं होतं त्या ठिकाणच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, नव्या पिढीच्या वारकऱ्यांनाही माहिती व्हाव्यात, यासाठी तिथं स्मारक उभारलं जातंय. बहुधा यावर्षी त्याचं उद्‌घाटन होईल आणि मला वाटतं, ती एक मोठी कृती असेल.

प्रश्न : सर, तुम्ही राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालात. आता एक नवी दिशा सेवादलाला मिळेल. तुम्ही दोन कार्यक्रम दिलेत. त्यापैकी एक आहे सगळ्या समविचारी, सलोख्याचा विचार करणाऱ्या लोकांना, संस्थांना एकत्र करणं, आणि दुसरा म्हणजे पर्यावरणाचा विचार करणं; याबद्दल समजावून सांगा..

उत्तर : फ्रेंच भाषेसाठी व्हिक्‍टर बिगोचं जे महत्त्व आहे तेवढंच महत्त्व मराठीसाठी साने गुरुजींचं आहे. कुठल्याही खेड्यातून येऊन, शहरात कोणत्याही पक्षाच्या लोकांना, कोणत्याही धर्माच्या लोकांना जर विचारलं ‘श्‍यामची आई’ तुम्हाला कसं वाटतं, तर प्रत्येक माणसानं ‘श्‍यामची आई’साठी अश्रू गाळलेले असतात. साने गुरुजींनी पंढरपूरमध्ये जो लढा दिला त्याच्यामधील निर्भयतेतून, समाजात समानता असावी या तळमळीतून. हीच तळमळ आताच्या काळामध्ये हवी आहे. निर्भयता आणि समानता असावी, अशी तळमळ समाजात जर निर्माण झाली तर ते समाजाच्या हिताचं आहे. 

साने गुरुजींनी करुणा या भावनेला त्यांच्या आयुष्यात सर्वांत जास्त महत्त्व दिलं होतं. सध्या अनेकांच्या मनामध्ये तिरस्कार आहे. एवढा तिरस्कार समाजाला खंडित करू शकतो, तो एकत्र आणू शकत नाही. म्हणून करुणेच्या मदतीने समाज एकत्र आला, निर्भय बनला आणि समानतेवर जर विश्वास ठेवायला लागला तर आपल्या देशालाच नाही, तर संपूर्ण जगाला हवं आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अंतापासून खास करून पहिल्या महायुद्धानंतर ते दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीपर्यंत आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिली ३० वर्षं ‘शॉर्ट सप्लाय इकॉनॉमी’ची होती. प्रत्येक गोष्टीचा तुटवडा असायचा. पॅराफीन नाही म्हणून मेणबत्त्या नसायच्या, केरोसीनसाठी रांगा लागायच्या. अन्न शिजवायला पुरेसं तेल नसायचं. गाड्या चालवायच्या तर इंधन नसायचं, वीज नसायची. शॉर्ट सप्लाय इकॉनॉमी जगभर होती. लोकसंख्या स्थिर करत करत साधारणपणे २०३० पर्यंत जगाची लोकसंख्या स्थिर झालेली असेल ९०० कोटीपर्यंत. एवढ्या लोकांना पुरेल इतकी संसाधने जगभर आहेत; पण ती मूठभरांमध्ये एकवटली आहेत. संसाधनं ओरबाडून घेतल्यामुळं त्यांचे स्रोत घटत आहेत. याची वेगळी व्यवस्था करावी लागेल. प्रत्येकाला पुरेशा होतील एवढ्या गोष्टी पण पृथ्वीला हानी न पोचवता पुरवता येतील, अशी व्यवस्था व्हावी. त्याच्यासाठी पृथ्वीकडे संवेदनशीलतेनं बघणारा समाज जगभर असायला पाहिजे.

युरोपमध्ये निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असे लोक निवडून आले, एका बाजूला हिटलर, मुसोलिनीला सलाम करणारे, जे पुढं जगाला युद्धाकडे घेऊन जातील आणि दुसऱ्या बाजूला पृथ्वीला जास्त महत्त्व देणारे, त्या दृष्टीने समाजरचना, अर्थरचना, राज्यरचना असावी असा विचार करणारे निवडून आलेत. तर मी म्हणतो, आपल्याला निवड स्वातंत्र्य हवं आहे. मला जर कोणी विचारलं की, तुम्ही युद्ध पत्कराल की पृथ्वीला सांभाळून ठेवणं पत्कराल? तर मला नम्रपणे एक जबाबदारी आहे, की पृथ्वीला सांभाळून ठेवावं, कारण तिनं मला सांभाळलं आहे.

छायाचित्र सौजन्य : मुकुंद पारखे, श्रीधर पलंगे, स्वप्निल मोरे


डॉ. गणेश देवी यांच्या मुलाखतीची लिंक : https://www.youtube.com/watch?v=j6m9DoI5RBA


सलोख्याची वीण

''राजकीय सत्ता कोणाचीही असो; वारकरी संतांनी हिंदू-मुस्लिम एकोपा कायम ठेवला. इतरही सर्व पंथांशी सलोखा ठेवला. वारकरी विचारांनी प्रभावित असलेल्या महादजी शिंदेंसारख्या राज्यकर्त्यानं वारकरी भजन आणि त्यातील विचार जपण्याचा प्रयत्न केला. आजही वारीमध्ये कोणालाही जातीच्या मुद्द्यावर, धर्माच्या मुद्द्यावर प्रवेश नाकारला जात नाही. आजच्या काळात महाराष्ट्रात जी सलोख्याची वीण दिसते, ती वारकरी संप्रदायाच्या लोकांनी विणली आहे, असं आपण निश्‍चितपणे म्हणू शकतो...'' संत साहित्याचे विश्लेषक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी 'सकाळ'च्या 'विठाई'साठी दिेलेल्या मुलाखतीत केलेले चिंतन...


प्रश्न : वारकरी आषाढी वारीसाठी चालतात ते केवळ भौगोलिक अंतर नाही, तर ती माणसा-माणसांतील अंतर कमी करण्यासाठीही केलेली वाटचाल आहे. वारकऱ्यांचा समतेच्या विचारांचा झेंडा घेऊन संत नामदेवांनी समन्वयाचा संदेश काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नेला. देशपातळीवर किंवा महाराष्ट्रातही या समन्वयाच्या पाउलखुणा कुठं पाहायला मिळतात?

उत्तर : आपण ज्या अंतराचा उल्लेख केला, आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढरपूर हे भौगोलिक अंतर झाले. हे अंतर वारकरी कापतातच; पण एकमेकांच्यामधील जे अंतर आहे, माणसा-माणसातले जे अंतर आहे ते कमी करणे फार महत्त्वाचे आहे. वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय असेल, तर माणसा-माणसातलं अंतर कमी करणे. हाच संतांचा संदेश होता. त्यामुळं आपण आज जरी शब्द वापरला असला ‘सलोख्याची वारी’ तरी महाराष्ट्रात आज जो काही सलोखा काही शतकं टिकून राहिला, त्याचं खूपसं श्रेय आपल्याला संतांच्या शिकवणुकीला आणि वारकऱ्यांच्या कार्याला दिलं पाहिजे.

वारी ही मुळातच सलोख्यावर आधारित आहे. समता हा वेगळा मुद्दा आला, आपण त्याचाही उल्लेख केला; पण एकमेकांमध्ये प्रत्यक्ष मिसळणं, समता हा एक तात्त्विक मुद्दा आहे. व्यवहारात ज्या वेळी तुम्ही प्रत्यक्ष उतरता त्या वेळी तुमच्या एकमेकांबद्दल ज्या काही कृती असतात, त्यातून ते दिसते. त्यामुळे या बाबतीत आपण आता नामदेवांचाही उल्लेख केला, की पंजाबमध्ये जाऊन काम करणं. ज्या कामापासून स्फूर्ती घेऊन नंतरच्या काळात गुरुनानक यांनी एक स्वतंत्र धर्म निर्माण केला. अशा काळामध्ये एखादी गोष्ट आपण म्हणू, की भारतातला जो धर्म आहे; मग तो हिंदू धर्म म्हणा किंवा इतर कोणताही धर्म म्हणा, त्या धर्मामध्ये सगुणाच्या उपासनेला जास्त महत्त्व आहे. बहुतेक लोक मूर्तिपूजा करणारे होते. 

अगदी मागील शतकात निर्माण झालेला प्रार्थना समाज वा ब्राह्मो समाजसुद्धा याला विरोध करणाराच होता; पण ते अपवाद आहेत. याची गाठ केव्हा तरी निराकाराची उपासना करणाऱ्या दुसऱ्या एका जगभर साम्राज्य स्थापन करायला निघालेल्या धर्माशी पडली. त्याला ज्यांना शक्‍य झालं त्यांनी प्रतिकार केला. पण एकूण समाजामध्ये जे काही वातावरण आहे, ते कसं नीट राखलं पाहिजे, यासाठी संतांनी मनापासून प्रयत्न केले. ज्ञानदेव आणि त्यांची भावंडं महाराष्ट्र हा अल्लाउद्दीन खिल्जीकडे जाण्यापूर्वीच समाधिस्थ झाली होती.

नामदेवांच्या गुरुग्रंथ साहिबामधील पद पाहिलीत तर असं लक्षात येईल, की त्यांनी दोन विरोधी दिसणाऱ्या धारांमध्ये समन्वय घडवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ते असे म्हणतात, की मूर्ती फुटल्याने देव फुटत नाही, तर या म्हणण्याला फार अर्थ आहे, की मूर्ती प्रतीक आहे. तुम्ही परमेश्वर मानता, तो तुमच्या आवाक्‍यात यावा म्हणून तुम्ही मूर्तीची स्थापना केली आणि जर ती कुणी फोडली तर त्यामुळे धर्म संपला असे म्हणायची गरज नाही. एका बाजूला या धर्माच्या इथल्या लोकांना, मूर्तिपूजकांना बळ देणारा मुद्दा आहे. शेवटी आपण एकच आहोत, हा जो मुद्दा आहे तो संत एकनाथ महाराजांनी खूप प्रकर्षाने मांडला आहे. कारण एकनाथ महाराजांच्या काळामध्ये देवगिरी (दौलताबाद) ही निजामशाहीची राजधानी होती. 

अशा परिस्थितीत एकनाथांनी स्पष्टपणे ही भूमिका मांडली, की दोन धर्म आहेत हिंदू आणि मुसलमान. यांच्यामध्ये संघर्ष होता कामा नये, ही भूमिका एकनाथ मांडत. त्यांच्या भारुडामध्ये हिंदू-तुर्क संवाद हे भारूड खूप महत्त्वाचे आहे. या भारुडामध्ये हिंदू मुसलमान धर्माची निंदा करतो आणि मुसलमान हिंदू धर्माची निंदा करतो आणि हळूहळू त्यांच्या लक्षात येतं, की आपल्या धर्मांमध्ये तसा काही फार फरक नाही आणि मग दोघे सांगतात, की आपल्याला एकाच परमेश्वराने निर्माण केलं आहे. यामुळे संघर्षापासून सुरवात झाली, ती सलोख्यात संपते. दोघे एकमेकांना आलिंगन देतात. या तत्त्वाची प्रॅक्‍टिस वारीमध्ये पाहायला मिळते. वारीमध्ये कोणालाही जातीच्या मुद्द्यावर, धर्माच्या मुद्द्यावर प्रवेश नाकारला जात नाही. आज सलोख्याची वीण महाराष्ट्रात आहे, ती वारकरी संप्रदायाच्या लोकांनी विणली आहे, असं आपण निश्‍चितपणे म्हणू शकतो.

प्रश्‍न : संत एकनाथांचे गुरू जनार्दन स्वामी, त्यांचे गुरू चाँद बोधले आणि नंतरची सूफी परंपरा वारकऱ्यांकडे आली असं म्हणता येईल का?

उत्तर : त्यातली एक शाखा तुम्हाला शेख महंमद श्रीगोंदेकर यांच्या रूपाने श्रीगोंद्यात दिसते. आता शेख महंमद बाबाजी आहेत ते अभंग रचतात मराठीमध्ये, ते योगसंग्राम नावाचा योगावरचा ग्रंथ लिहितात, ते विठ्ठलाची उपासना करतात. त्याचा अर्थच मुळात असा होतो, की त्यांनाही भेद मान्य नाही. सगळ्या प्रक्रियेमध्ये परंपराही सांगते, की शेख महंमद बाबा आणि तुकाराम महाराज यांचे जवळचे संबंध होते. या आधुनिक जगात त्यांना तुम्ही दंतकथा म्हणायचं असेल तर म्हणा; पण त्या कथांच्या मागचं लॉजिक महत्त्वाचं आहे. तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं देहूला आणि तिकडं शेख महंमद बाबांनी आग विझवण्याचे हावभाव केले, हात चोळले. तर ते लोक म्हणाले, की तुम्ही काय करताय? तर ते म्हणाले, तिकडं तुकोबांचं कीर्तन चालू आहे तिथं आग लागली आहे, ती मी विझवली. मंडपात आग लागली आहे हे ऐकून लोकांना आश्‍चर्य वाटलं. त्यांनी तिथं जाऊन पाहिलं तर तसंच घडलं होतं. तिथं आग लागली होती आणि ती विझलीसुद्धा होती. या वेळी प्रश्न असा पडतो, की तुकाराम महाराज आणि शेख महंमद बाबा यांच्यामधला जो परस्पर संबंध आहे तो संबंध या कथेच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. अशा वेळी विशेषतः बुद्धिवादी लोकांची गल्लत काय होते, ते असा प्रश्न उपस्थित करतात, की असं कसं घडेल? काही लोकं म्हणतील, की शेख महंमद बाबा आणि तुकाराम महाराज समकालीन होते की नाही? पण तुम्ही ज्या वेळेला सगळ्या प्रश्नांकडे सामाजिक अंगाने बघता तेव्हा हे लक्षात येतं, की तुमचे हे प्रश्न निरर्थक आहेत. 

प्रश्न : असं म्हटलं जातं की, ‘ज्ञानियाचा एका, नामयाचा तुका आणि कबिराचा शेखा.’ संतांचा हा वारसा आहे, त्याबद्दल सांगा...

उत्तर : ही परंपरा निर्माण झाली त्यामध्येही कबीर यांचा समावेश होतो. म्हणजे तुकाराम महाराजांनी त्यांना पूज्य श्री संत कोण हे सांगितलेलं आहे. जणू काही ते गुरुस्थानी आहेत. असे कोण, तर यामध्ये त्यांनी चार लोकांची नावं सांगितली. यामध्ये ज्ञानेश्वर महाराज आहेत, नामदेव आहेत, एकनाथ महाराज आहेत आणि कबीर आहेत. म्हणजे तुकोबांना कबीर महत्त्वाचे वाटणं, त्यांना तुकोबांनी गुरुस्थानी मानलं हे बरंच काही सांगून जाते आणि वारकरी संप्रदायामध्ये कबिरांचे दोहे म्हटले जातात. वैशिष्ट्य म्हणजे उत्तरेतील इतर संतांची आपल्याकडं वचनं वगैरे म्हटली जात नाहीत; पण कबिरांची म्हटली जातात. कारण कबीर हा वारकऱ्यांना आपलाच वाटतो. हे एक वेगळेपण आहे.

संत कबीर यांची पंढरपुरातील कबीर मठातील समाधी.
उदाहरणार्थ, तुम्हाला पंढरपूरमध्ये कबीरमठ सापडला तर आश्‍चर्य वाटणार नाही. कबीर यांच्या कवित्वामध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाचे खूप उल्लेख आहेत. तुम्ही म्हणाल की, कबीर तर निर्गुण उपासक होते, तर हे असं नसतं. हे अभ्यासकांनी मारलेले शिक्के आहेत. नामदेवांची जी पदे ग्रंथसाहेबामध्ये गेली, त्या ग्रंथसाहेबांच्या पदांमध्ये विठ्ठलाचे उल्लेख आहेत, पंढरपूरचे आहेत. हे जे सगळं काही घडलं ते त्यांनी समाजाला एकत्रित करण्यासाठी अध्यात्माचा उपयोग केला किंवा त्यांचं अध्यात्मच समाजनिष्ठ होतं. यामध्ये आमचे नगरचे मित्र अनिल सहस्रबुद्धे यांनी एक चांगला शब्द वापरला, लोकनिष्ठा अध्यात्मवाद. अध्यात्म म्हटल्यावर काही तरी लोकांच्यापासून बाजूला जाऊन एकटं राहून काही तरी साधना करायची, मठात बसून किंवा डोंगरात जायचं तसं इथं नाही. इथं पहिल्यापासून महाराष्ट्रातल्या अध्यात्माला एक सामाजिक अंग राहिले आहे आणि त्यातून तुम्ही म्हणता तो सलोखा शक्‍य झाला आहे.

प्रश्न : जसं कबिरांच्या दोह्यांमध्ये पांडुरंग किंवा विठ्ठलाचा उल्लेख आहे तसं जनाबाईच्या अभंगांमध्ये पण हा उल्लेख आहे आणि तो देखील फार सुंदर आहे. हा उल्लेख पहाटे काकड आरतीमध्ये सर्व वारकरी म्हणतात, याविषयी काय सांगाल?

उत्तर : याबद्दल थोडी अडचण आहे. कारण कबीर उत्तरकालीन होते, कदाचित तो अभंग जनाबाईचा नसेल; पण हा माझा मुद्दा नाही. कुणीतरी जनाबाईच्या नावानं तो अभंग रचला. जनाबाईंचं नाव आहे म्हणून कुणाला तरी वाटलं असेल की, आपण जनाबाईंच्या नावानं अभंग रचावा, त्यांनी रचला. कुठल्याही सामाजिक जाणिवा व्यक्त करणारं हे काव्य आहे. इथं इतिहासशास्त्र जास्त असण्यापेक्षा समाजशास्त्र जास्त आहे.

प्रश्न : अलीकडच्या काळात टीव्ही चॅनेल्सवरूनपण दाखवतात, वारी निघाल्यावर तुकोबारायांची पालखी निघते, तेव्हा पहिली आरती त्यांची होते तिथं वेशीबाहेर जो अनगडशहा बाबांचा दर्गा आहे, तीही याच पद्धतीची परंपरा आहे का?  

उत्तर : म्हणजे देहूची हद्द सोडल्यानंतर पहिल्यांदा पालखी थांबते आणि पहिली आरती होते, देहूबाहेर अनगडशहा बाबांचा दर्गा आहे. अनगडशहा बाबा हे तुकोबाकालीन त्यांचे मित्र असणारे एक सूफी संत होते. पुण्यात त्यांचं मुख्य ठिकाण आहे. पुण्यातल्या गुरुवार पेठेमध्ये त्यांचा दर्गा असणं, तुकोबांची पालखी थांबणं या गोष्टी सलोख्याचे द्योतक आहे. तुकोबांचे दख्खनी भाषेतील अभंग आहेत. उदाहरणार्थ अल्ला देवे, अल्ला खिलावे. एकनाथांचे तर किती तरी आहेत. 

राजकीय संघर्ष काहीही असो; लोकांनी एकमेकांशी असलेला सलोखा सोडू नये, असा संतांचा प्रयत्न. उर्दू उत्तरेत तशी दख्खनी भाषा ही दक्षिणेत निर्माण झाली. पर्शियन आणि स्थानिक मराठी भाषा आणि थोडं फार कन्नड अशी मिळून ही दख्खनी भाषा तयार झाली होती. या भाषेत तुकोबाराय अभंग लिहीत होते. महाराष्ट्रात तुकोबांच्या काळात ती बोललीही जायची. नंतरच्या काळात ज्यांनी तुकोबांच्या गाथेचं संपादन केलं त्यांनी या भाषेला हिंदुस्तानी भाषेतील अभंग असं चुकीचं नाव दिलं. ते हिंदुस्तानी भाषेतील नाही तर दख्खनीतील अभंग आहेत. 

अनगडशाहबाबा यांचा देहू येथील दर्गा.
संत एकनाथ एके ठिकाणी, विटेवर अल्ला उभा आहे, असं विठ्ठलाला उद्देशून म्हणतात. आपल्याकडील ज्ञानेश्वरांची परंपरा आहे ती आदिनाथांपासून सुरू झाली. निवृत्तीनाथांना आदिनाथांचा म्हणजेच शंकराचा अवतार मानला जातो. याला समांतर तिकडं इस्लाममध्ये काय आहे, एकनाथ म्हणतात की, निवृत्तीनाथ हे आदमचे अवतार आहेत. त्यांना हा सलोखा ठेवायचा होता. राजकीय वातावरण जरी काही असलं तरी सामाजिक वातावरण शुद्ध राहिलं पाहिजे, हा त्यांचा ॲप्रोच होता. 

प्रश्न : मधल्या काळात एक अशी टीका होत होती की, वारकऱ्यांचा राजकीय, सामाजिक घडामोडींशी काही संबंध नाही. ते उगाच शेतीची कामंधामं सोडून पंढरपूरला जातात. त्यामुळं इतिहासावर आणि आजच्या काळावरही संतांच्या विचारधारेचा प्रभाव कुठं आणि कसा पडला आहे, ते सांगा. 

उत्तर : सरदार महादजी शिंदे यांनी जशी तलवार गाजविली तसेच अभंगही रचले आहेत. त्यांनी भगवद्‌गीतेवर एक मराठी टीका लिहिली. तिचं नाव ‘माधव दासरी’. त्यात विठ्ठलावर अभंग आहेत. महादजी शिंदे हे कृष्णभक्त होते, सर्वधर्म समभाव बाळगणारे होते. त्यांचे एक गुरू बीडजवळचे सूफी होते. तिथं ते वारंवार यायचे. मथुरेला त्यांनी तळ टाकला होता. जवळजवळ वर्षभर दिल्लीचा बादशहा जो इंग्रजांनी अलाहाबादला डांबून ठेवला होता, त्याची दिल्लीला जाण्याची इच्छा होती; पण इंग्रजांची तयारी नव्हती. त्यांची राजधानी कलकत्याला होती. बंगालचा सुभा त्यांच्या ताब्यामध्ये होता. बादशहा सतत सांगायचा, मला जायचं आहे. महादजी आले आणि त्यांनी हेस्टिंगच्या देखत त्याला उचललं आणि आपल्या ताब्यात घेतलं. दिल्लीत वातावरण थोडं वेगळं होतं म्हणून मधल्या काळात त्यांनी बादशहाला मथुरेत ठेवलं. 

महादजी कृष्णभक्त होते. आपण मथुरेतच थांबावं, अशी त्यांची इच्छा होती. बादशहा तख्तावर असला, तरी प्रत्यक्ष कारभार महादजी बघायचे. बादशहाला नंतर मथुरेत कंटाळा येऊ लागला. त्याने आग्रह धरला की, माझं तख्त दिल्लीलाच असलं पाहिजे. मग महादजींनी त्याला दिल्लीला हलवलं. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की महादजींच्या काळामध्ये काही दिवस मथुरा ही भारताची अघोषित राजधानी होती. बादशहा महादजींच्या पद्धतीनं सगळं वागत होता. महादजी भजन करायचे. महादजींनी जी भजनाची परंपरा सुरू केली ती परंपरा ग्वाल्हेरच्या शिंदेंच्या राजघराण्यामध्ये कित्येक पिढ्या अबाधित होती. माधवराव शिंदेंच्या वडिलांपर्यंत तिथं भजन व्हायचं. महाराज स्वतः वीणा घेऊन उभे राहायचे. त्या वेळेला तत्कालीन सगळे मोठे गायक-वादक तिथं येत. ज्याला आपण ग्वाल्हेर घराणं म्हणतो त्यातले आणि बाहेरचे म्हणजे बडे महंमद खाँ, हाद्दू खाँ, हसु खाँ, बिनकाल मोहम्मद अली तिथं यायचे आणि हे सगळे लोक अभंग म्हणायचे. या सगळ्या मंडळींनी एकदा पंढरपूरला येऊन भजन केलं होतं. 

या गोष्टी लोकांना माहीत नाहीत नीट. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांचे बंधू संपतराव गायकवाड यांच्यावर महाराजांचा खूप विश्वास होता. ते चांगले वरिष्ठ अधिकारी होते. एकदा ते ग्वाल्हेरला गेले असताना त्यांनी दरबारातलं भजन पाहिलं आणि मग त्यांनाही असं वाटलं की, आपणही भजन करायला पाहिजे. आपलीही परंपरा आहे. मग त्यांनी बडोद्याला येऊन स्वतःचं भजनी मंडळ काढलं. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते. त्यामध्ये अब्दुल करीम खाँ यांचाही समावेश होता. अशा पद्धतीनं वारकरी संगीत आणि शास्त्रीय संगीत यांची देवाण-घेवाण झाली. बडोद्याच्या या संपतरावांनी भजनाचं पुस्तकच काढलं. भजनाला जे प्रत्यक्ष येत त्या सगळ्यांचा त्यात समावेश आहे. असा हा सर्व मोठा पट आहे. महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती अशी सलोख्याची आहे, हे आपल्या लोकांना माहीत नाही. 

डॉ. सदानंद मोरे

प्रश्न : आपण या काळात ‘सकलजनवाद’ मांडत आहात. ही संकल्पना नेमकी काय आहे? 

उत्तर : मी १९९२-९३ मध्ये ‘तुकाराम दर्शन’ जेव्हा लिहिलं त्या वेळी ‘बहुजनवादा’चा उल्लेख सतत होत होता. काही लोक अभिजनवाद आणि बहुजनवाद यांमध्ये वाद उभा करण्याचा प्रयत्न करत होते. मला असं वाटलं की, वारकऱ्यांच्यामध्ये तरी अशा प्रकारचा काहीही भेद नाही. तुम्ही पाहिलं तर, एकनाथ पंडित होते. भागवतावर त्यांनी भाष्य लिहिलं. दुसऱ्या बाजूला ते बहुजनांच्या लोकपरंपरेतील भारुडपण लिहायचे. म्हणजे संत एकनाथ हे अभिजनपण आहेत आणि बहुजनपण आहेत. या विचारधारेनं सर्वांना आत्मसात केलं आहे. म्हणून मी त्याला ‘सकलजनवाद’ असं नाव दिलं.

डॉ. सदानंद मोरे यांच्या मुलाखतीची यू ट्यूबवरील लिंक -

https://www.youtube.com/watch?v=VfqHaOvpabs

Tuesday, 12 October 2021

वसा विश्वशांतीचा...

पंढरीची आषाढी वारी म्हणजे मानवतेचा इतिहास आहे. ही पायी वारी म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक संचित आहे. या संचिताची ओळख नव्या पिढीला करून देणं हे आपलं पत्रकार म्हणून कर्तव्य आहे, अशी माझी भावना आहे. त्यातूनच 'सकाळ'मध्ये असताना 'विठाई' या आषाढी वारी विशेषांकाची सुरुवात केली. या विशेषांकाचा 2019चा विषय होता 'सलोख्याची वारी'! 

या अंकातून वारीनं सर्व जातीधर्मातील, समाजातील सर्व स्तरांतील लोकांना कसं सामावून घेतलं आहे, याचा 'रिपोर्ताज'च्या माध्यमातून शोध घेतला गेला. त्यांचे 'डिजिटल'साठी व्हिडिओही बनविले गेले. मुलाखती घेतल्या गेल्या. संतांनी रुजवलेल्या या सलोख्याच्या विचारांची पालखी वाहण्याचं मोठं काम 'सरहद' या संस्थेचे संस्थापक संजय नहार गेली अनेक वर्षे करत आहेत. 'विठाई'च्या निमित्तानं मी घेतलेली त्यांची ही मुलाखत...

प्रश्न : इथं मी शमिमा अख्तर या मुस्लिम कुटुंबातील मुलीनं गायलेलं पसायदान ऐकलं. ही मुलगी कोठून आली आहे? 
उत्तर : काश्‍मीरमधील बांदीपुरा या दहशतवादी भागातून २००३ मध्ये ‘सरहद’मध्ये १४ मुलं दाखल झाली. संस्थेत सध्या दीडशेपेक्षा जास्त मुलं आहेत. लहानपणीच शमिमानं ‘सरहद’मध्ये यावं, अशी तिच्या कुटुंबाची इच्छा होती. काही कारणास्तव ते झालं नाही. ती शिक्षणासाठी बाहेर आली आणि गाऊ लागली. त्यांनी म्युझिकमध्ये करिअर करायचं ठरवलं. तीन-साडेतीन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्ताने पुन्हा ‘सरहद’सोबत शमिमा जोडली गेली. संगीतामध्ये माणसांना जोडण्याची, संदेश देण्याची ताकद आहे, असं लक्षात आल्यावर तिला आम्ही संगीताची शिक्षक होऊन काश्‍मिरी मुलांना शिकवावं, यासाठी बोलवलं.
 
पसायदान गाणारी काश्मीरची शमीमा अख्तर.
तिची पार्श्वभूमी अशी आहे की, एकदा बसमधून जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला, यामध्ये तिची आत्या मारली गेली, आई रक्तबंबाळ, जखमी झाली. मांडीवरच्या शमिमाला अशा परिस्थितीत आईनं वाचवलं होतं. ज्यांनी रक्त पाहिलं, मृतदेह पाहिले, त्यांच्याशिवाय शांततेचा संदेश जास्त कोणाला कळू शकतो? त्यांनी शांततेचा संदेश द्यावा म्हणून आम्ही ‘गाश’ नावाच्या बॅंडची निर्मिती केली. जोगिंदर सिंग या मुलाच्या घरातील १५ लोक मारले गेलेत. मंजूर, अकीम आणि शमिमा बॅंडमधील लीड सिंगर होते. शमिमानं मराठी गाणी गायली. माझी पत्नी सुषमानं अशी संकल्पना मांडली की, माउलींच्या पसायदानामधून संदेश द्यायचा. कारण संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, घराघरात पोचलेल्या संदेशाला जागतिक परिमाण द्यावं. यासाठी शमिमानं पसायदान गावं अशी कल्पना पुढे आली.
 
पहिल्यांदा तिने वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दोन तास तयारी केली आणि गायली. तिनं ज्या पद्धतीनं ते गायलं त्या वेळी लोक विचारू लागले की, काश्‍मिरी मुस्लिम मुलीनं पसायदान गायलं? तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं, काश्‍मीरचा, महाराष्ट्राचा आणि पसायदानाचा खूप जवळचा संबंध आहे. ज्ञानेश्‍वर माउलींनी लिहिलेल्या पसायदान, अमृतानुभवावर काश्‍मिरी शैविझमचा मोठा प्रभाव आहे. मोठा ज्ञानेश्वर माउली तिथपर्यंत पोचले होते आणि काश्‍मीरचा जो संदेश होता तो संपूर्ण महाराष्ट्रभर पोचला होता.

प्रश्न : सरहद संस्था नेमकं काय काम करते? संस्थेच्या कामाचं स्वरूप काय?

उत्तर : देशभक्ती सांगायची नसते, जगायची असते. आम्ही घोषणा देत चाललो होतो हिंदू-सीख भाई-भाई. एक शीख पुढे आला आणि म्हणाला, ओरडताय काय? मी म्हणालो, आम्ही भाऊ आहोत. त्यावर ते म्हणाले, ‘भाऊ आहात तर कृतीतून दाखवा, ओरडू नका.’ कृतिशीलतेच्या उद्देशानं २३ मार्च १९८४ रोजी वंदेमातरम संघटनेची स्थापना केली. वंदेमातरम या नावामुळं आम्हाला अडचणी आल्या. काश्‍मीरमधील मुलांसाठी काम करायचं होतं. संस्थात्मक कामाची उभारणी करायची होती. यातून ‘सरहद’ची उभारणी झाली. लहान मुलांचे दौरे सुरू झाले, दुभंगलेली मनं सांधण्याचे प्रयत्न केले. त्या वेळी लक्षात आलं, लहान प्रयत्नांचाच एवढा परिणाम होतोय तर याची लाट यायला पाहिजे. सकारात्मक घटना कमीच घडत असतात. अशा गोष्टी घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ‘सरहद’ची स्थापना त्यातून झाली. सरहद ही दहशतग्रस्त भागातील नागरिक, महिला, मुले यांच्या पुनर्वसनासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नरत असलेली संस्था आहे.

पंजाबशी आम्ही आधीपासून जोडले गेलोय. पंजाबातील घुमानमध्ये संत नामदेवांच्या कार्यस्थळी गेल्यावर असं जाणवलं, १० किलोमीटर अंतरावर घराघरांतला एक मुलगा  दहशतवादी आहे. त्यांच्या घरात फोटो होते भिंद्रनवाले, भगतसिंग आणि गुरुगोविंदसिंग यांचे. त्यातले दोन हिरो तर माझेच होते. पुढं आठ किलोमीटरवर संत नामदेवांचं घुमान होतं. त्या घुमानमध्ये विनोबा भावेंनी संदेश लिहिलाय, ‘जो पंजाब सिकंदराला सैन्याच्या बळावर जिंकता आला नाही, तो पंजाब महाराष्ट्रातून जाऊन संत नामदेवांनी प्रेमानं जिंकला.

’१९८६ मधली गोष्ट आहे. ‘सरहद’च्या स्थापनेच्या काळात अशा घटना घडत गेल्या, त्याने ‘सरहद’च्या दिशा ठरत गेल्या. भाषा, साहित्य, संस्कृती यांच्या माध्यमातून देश जोडायचा तर आपण त्यांच्याशी जोडलं गेलं पाहिजे, असं जाणवलं. सुरवातीला थोडी गर्वाची भावना होती; पण जसजसं पुढं जात राहिलो तेव्हा कळालं, कधी काळी काश्‍मीरनं देशाचं, जगाचं बौद्धिक नेतृत्व केलंय. एक टोकाची भूमिका जेव्हा मांडली जाते तेव्हा समन्वयाचा, सलोख्याचा, शांततेचा विचार जास्त प्रभावीपणे मांडला पाहिजे. त्याची गरज जास्त असते. अशा भावनेतून घुमानमध्ये मराठी साहित्य संमेलन झालं.

१६ वर्षांपूर्वी काश्‍मीरची १०५ मुलं आली. कारगिल युद्धातील ३८ मुलं आमच्याजवळ आली. ती केवळ शिक्षण, नोकरीसाठी आली नाहीत तर, ‘सरहद’ एक कुटुंब झालंय. अशी ही मुलं जेव्हा इथं येऊन विश्वाच्या शांततेसाठी मागणं मागतात, हे खूप सकारात्मक आणि आशावादी आहे. त्यामुळं त्यांची कृती लोकांसमोर यायला पाहिजे. सुदैवानं वारी येत आहे. अशा काळात महाराष्ट्र आणि काश्‍मीरचे ऋणानुबंध दृढ व्हावेत, किंबहुना हिंसाचाराचं केंद्र वाटणाऱ्या काश्‍मीरमधून शांततेचा संदेश जाण्याला मोठा अर्थ आहे, असं मला वाटतं. 

प्रश्न : उत्तर भारतातील संतांच्या कार्याविषयी काय सांगाल?
उत्तर : तेराव्या शतकाच्या प्रारंभी संत नामदेव महाराष्ट्रातून निघून मथुरा, उत्तर भारत, राजस्थान असे फिरत घुमानमध्ये स्थिरावले. घुमान त्या काळात जंगल होतं. आजूबाजूच्या लोकांना मदत करणं, जगण्याचा संदेश देणं असं कार्य संत नामदेवांनी केलं. १४७९ मध्ये गुरुनानक यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माला साडेपाचशे वर्षे या वर्षी पूर्ण होताहेत. संत नामदेवांची प्रचार करण्याची पद्धत होती ती साधं जीवन जगणं, पदांची निर्मिती करणं. एका बाजूला अंधश्रद्धेशी लढा देणं, दुसऱ्या बाजूला देवाचं अस्तित्व मान्य करणं, अशी कोंडी होती. नामदेवांना हे माहीत होतं की, जो सामान्य, गरीब समाज आहे तो देवावर श्रद्धा ठेवतो. त्या श्रद्धा कायम ठेवून अंधश्रद्धेबद्दल लढायला लावणं, प्रसंगी कठोर टीका करायला लावणं, देवाच्या, धर्माच्या नावावर अवडंबर माजविणाऱ्यालासुद्धा बोलणं हे काम संत नामदेवांनी केलं.

घुमानपासून जवळ कर्तारपूर आहे, ज्या ठिकाणी गुरुनानकांनी शीख धर्माचा पाया घातला. दुसऱ्या बाजूला राधास्वामी सत्संग आहे. त्याच्या एका बाजूला कादीयान गाव आहे. अहमदिया पंथ इथं रुजला. या ठिकाणी आज जर आपण गेलो तर भगवद्‌गीता, संस्कृत, रामायण, महाभारत यांच्यावर तिथं काम सुरू असलेलं दिसतं. जगामध्ये जो शांततेचा संदेश आहे तो संत नामदेवांनी प्रभावीपणे दिला. अनेक इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की, शीख धर्म स्थापनेवर संत नामदेवांच्या विचाराचा प्रभाव पडला होता. पंजाबमधील कवी जसवंत जफर यांचं म्हणणं आहे की, शिखांनी जर गुरुपरंपरा मान्य केली असेल तर त्यातले पहिले गुरू गुरुनानकांच्या आधी संत नामदेव आहेत. गुरु गोविंदसिंगांनी युद्धं केली; पण त्यांचा अंतिम काळ महाराष्ट्रात गेला.

महाराष्ट्राशी त्यांचा जो संपर्क होता तो ‘गुरु मानीयो ग्रंथ’ हे अंतिम काळात गुरुगोविंदसिंग यांनी नांदेडमध्ये सांगितलं. यापुढे माझी मूर्तिपूजा नाही करायची, ग्रंथ हेच गुरू आहेत, असा त्याचा अर्थ. त्या ग्रंथसाहेबमध्ये वेगवेगळ्या धर्मांतील संतांची वाणी एकत्र केली आहे. स्वतःचं असं काही सांगितलं नाही. त्यामध्ये संत नामदेवांची सर्वांत जास्त पदं आहेत. त्या खालोखाल छोटी एक किंवा दोन त्रिलोचन आणि परमानंद यांची पदं आहेत. आज जगभर संत नामदेवांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम शीख ग्रंथांनी आणि पंजाबी माणसांनी केलंय. पाकिस्तान, पठाणकोट, जम्मू-काश्‍मीर, अफगाणिस्तान अशी सगळीकडे संत नामदेवांची मंदिरं आहेत. संत नामदेवांना वीसपेक्षा जास्त भाषा अवगत होत्या. नामदेवांना आदरांजली वाहण्यासाठी घुमान बहुभाषा संमेलन सुरू केलं. गेल्या शेकडो वर्षांत देश जोडण्याची जी प्रतीकं आहेत, त्यांचं नेतृत्व संत नामदेवांनी केलं असं म्हटल्यास वावगं होणार नाही. 

प्रश्‍न : महाराष्ट्र आणि काश्‍मीरचं नातं काय आहे?
उत्तर :
 काश्‍मिरी शैविझमचं महाराष्ट्राशी जुनं नातं आहे. अभिनवगुप्ताचे पूर्वज त्र्यंबकेश्‍वरहून काश्‍मीरला गेले, असं संशोधक रा. चिं. ढेरे यांनी त्र्यंबकमठ नावाच्या पुस्तकात लिहिलं आहे. ज्ञानदेवांच्या अमृतानुभवावर शैविझमचा प्रभाव आहे. काश्‍मीरच्या संत कवयित्री लल्लेश्‍वरीनं ज्ञानदेवांच्या भिंत चालवण्याचा उल्लेख केला आहे. मला वाटतं, ज्ञानदेव त्याही काळात काश्‍मीरमध्ये पोचले होते. बौद्धिक विचारांची कृती महाराष्ट्रानं, संत ज्ञानेश्‍वरांनी केली.
संत नामदेव महाराज महाराष्ट्रात पायरीवर असतील; पण आमच्यासाठी ते कळस आहेत, अशी भावना शीख बांधवांनी एकदा माझ्याजवळ व्यक्त केली होती. त्यामुळंच घुमानचं मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी या पंजाबी मंडळींनी प्रचंड मेहनत केली. संत नामदेवांना उत्तर भारतात काय स्थान आहे, हे अनुभवायचं असेल तर मराठी माणसांनी नामदेव ज्या मार्गानं उत्तरेत गेले, त्या मार्गानं एकदा तरी जाऊन यायला पाहिजे.

प्रश्न : तुमचे पुढचे उपक्रम काय आहेत?
उत्तर : ज्या दिवशी ‘सरहद’ची पायाभरणी झाली त्या दिवशी मी भावनेच्या भरात म्हटलं होतं की, जगातली अनाथांसाठीची मोठी संस्था मला उभी करायची आहे. तेव्हा एक माणूस पुढं आला आणि म्हणाला, ‘तुमची इच्छा आहे का लोक अनाथ व्हावेत?’ तेव्हा असं वाटलं की, आपली इच्छा त्या डॉक्‍टरच्या बायकोसारखी असू नये की, डॉक्‍टरचा धंदा किंवा त्याचं हॉस्पिटल मोठं व्हावं यासाठी लोकांनी आजारी पडावं. म्हणून ‘सरहद’ने अशा प्रसंगांमध्ये एका बाजूला पुनर्वसनाचं काम करताना दुसऱ्या बाजूला मुलं, महिला, विधवा भगिनी यांच्यासाठीही काम केलं, जेणेकरून समस्येची तीव्रता कमी होईल. समस्येवर मुळापासून तोडगा निघेल.

एका बाजूला साहित्य, भाषा, संस्कृती, नाट्य यांच्याद्वारे परिवर्तन आणि त्याचबरोबर ही व्यवस्था बदलण्यावर आपण प्रभाव पाडला पाहिजे. हा संदेश फक्त आपण देऊन चालणार नाही, तर तो जगभरात नेण्यासाठी ‘सरहद’नं पुढाकार घ्यायचं ठरवलंय. घुमानमध्ये आम्ही भाषा केंद्र उभं करतोय. ज्या पुलवामामध्ये दहशतवादी कारवाया जास्त आहेत, तिथं आम्ही पुस्तकांचं गाव करतोय. तिथं काश्‍मिरी म्युझियम, ॲम्पिथिएटर उभं करतोय. अशा छोट्या छोट्या कृतीतून काश्‍मीर आणि देश जोडला जाईल. अशा अनेक प्रयत्नांनी हे कार्य होणार आहे; पण यामध्ये खारीचा वाटा आपला असला पाहिजे, असा आमचा हेतू आहे. आपण त्या रवींद्रनाथ टागोरांच्या गोष्टीप्रमाणं एकदा रात्र झाल्यावर ज्याप्रमाणे अंधारात आता सूर्य उगवणार नाही असं जेव्हा कळतं; तेव्हा सगळे म्हणतात आता काय होईल? तेव्हा एक पणती पुढं येते. ती म्हणते, मला माहितीये की अंधार मोठा आहे. मला हेपण माहिती आहे, की मी सूर्याची जागा घेऊ शकत नाही. पण मी किमान माझ्या भोवतीचा अंधार दूर करू शकते. अशा पणतीचं काम आपण केलं पाहिजे. अशा शेकडो पणत्यांनी एकत्र यायला पाहिजे.

संतांची जी परंपरा आहे त्यांच्या शिकवणीतून समाजात सौहार्द पेरूया. काश्‍मिरी मुलगी जर पसायदान गात असेल, तर त्यातून काश्‍मीर आणि महाराष्ट्राच्या नात्याचं पुनरुज्जीवन होत असेल, तर कधी काळी देशाचं बौद्धिक नेतृत्व करणारा काश्‍मीर आणि आता जगाचं बौद्धिक नेतृत्व करण्याची क्षमता असणारा महाराष्ट्र, पंजाब एकत्र आलो तर विश्‍वशांततेची मोठी चळवळ आपण उभी करू शकतो, याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही.

पसायदान गाणारी काश्मिरी मुस्लीम मुलगी शमीमा अख्तर...
https://youtu.be/CS98wJia5t8


संजय नहार यांची मुलाखत