'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Thursday 14 October 2021

वारी म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास!

महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर पंढरीची वारी समजून घ्यायला पाहिजे. अजूनही वारीच्या वाटेवरील मुक्कामांच्या ठिकाणी उत्खनन केलं, तर आपल्याला किमान १२ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास सापडेल. कारण या मार्गाला ‘पॅस्टोरल नोमॅडीक’ असं म्हणतात. मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी ऋतुमानाप्रमाणे मेंढपाळ त्यांची मेंढरं घेऊन याच मार्गानं जा-ये करत होते, असं सांगताहेत प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ, सांस्कृतिक विचारवंत डॉ. गणेश देवी. सुमारे ४० भाषांना प्रमाणभाषांचा दर्जा मिळवून देण्याचं काम किंवा देशातील 700हून अधिक भाषांचा सहकाऱ्यांच्या मदतीनं शोध लावणारे, मानवी संस्कृतीच्या अभ्यासातील महत्त्वाचं नाव असलेले डॉ. देवी यांनी पंढरीच्या वारीवर 'सकाळ'च्या 'विठाई'ला दिलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून केलेलं हे चिंतन...



प्रश्न : राष्ट्र सेवादलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपलं पहिल्यांदा अभिनंदन. आपण आज बोलणार आहोत, पंढरपूरच्या वारीविषयी. संतांनी महाराष्ट्राची भाषा घडवली असं म्हणतात, यासंबंधी तुम्ही काय विवेचन कराल? 

उत्तर : महाराष्ट्रासारखी वारी देशातल्या कुठल्याही भागात अस्तित्वात नाही. फक्त महाराष्ट्रातच वारी का आहे, याचा विचार करत असताना, आपल्याला इतिहासात डोकावावं लागेल. आपल्या आशिया खंडात, भारतात जगण्याचं मुख्य साधन आहे. साधारणपणे आठ ते नऊ हजार वर्षांपूर्वी हे रुजलेलं आहे. पण त्याच्या आधीही इथं कोणी होतं का नाही? तर त्याचं उत्तर असं आहे, गेल्या वर्षी जेव्हा जेनेटिक अभ्यासानुसार भारताच्या लोकसंख्येची मांडणी करण्यात आली, तेव्हा दक्षिण भारतामध्ये साधारणपणे ४५ हजार वर्षे वस्ती आहे. महाराष्ट्रातदेखील ४५ हजार वर्षांपूर्वीपासून वस्ती आहे. मध्ये शीतयुग येऊन गेलं. त्या वेळी ही संख्या कमी झाली होती. त्या शीतयुगाच्या शेवटी म्हणजे साधारण दहा-बारा हजार वर्षांपूर्वीचा काळ वारी समजण्यासाठी फार महत्त्वाचा आहे.

प्राणी पाळून त्यांचं संगोपन करून जगणारा समाज अस्तित्वात होता. त्यात लोकरीला, मेंढपाळांना खूप महत्त्व होतं. मेंढ्यांच्या जगण्यासाठी जो आधार असतो, ते एखाद्या भागातलं गवत मेंढ्या फार लवकर संपवतात. म्हणून एकाच जागी राहून मेंढपाळ मेंढ्या पाळू शकत नाही. त्यामुळं त्याला फिरावं लागतं. याला ‘पॅस्टोरल नोमॅडीक’ असं म्हणतात. मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी मेंढपाळांचे ऋतुमानाप्रमाणे जाण्याचे मार्ग ठरले होते. साधारणपणे हिवाळ्यामध्ये आपल्या मूळच्या जागेहून निघून समुद्रकिनाऱ्याकडं कोकणाकडं जाणं, घाटमाथ्यावर जाणं आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर त्याच रस्त्यानं परत येणं आणि हळूहळू आपल्या गावामध्ये थोडी-थोडी शेती करणं हा त्यांचा क्रम होता. त्या वेळी शेतीची ही प्राथमिक अवस्था होती. त्या वेळी शेती ठरलेली नव्हती आणि रोपण करण्याच्या पद्धतीही ठरलेल्या नव्हत्या. फेकीच्या पद्धतीनं रोपण व्हायचं. त्या वेळी मजुरी व्हायची नाही. हा मेंढ्यांचा जो मार्ग आहे, तो दरवर्षी पावसाच्या आणि हिवाळ्याच्या आधारावर निश्‍चित झाला. साधारणतः तीन-चार महिन्यांमध्ये एका जागी राहून आणि बाकीच्या वेळी फिरायचा पल्ला निश्‍चित झाला होता. म्हणजे कोणी म्हटलं की, हे हजारो किलोमीटर का नाही गेले? तर तीनशे ते चारशे किलोमीटरचा हा जो रस्ता तयार झाला, त्यावर पॅस्टोरल नोमॅडीक समाज हळूहळू शेतीकडे सरकत चाललेला होता. ही प्रक्रिया साधारणपणे पाच ते सहा हजार वर्षं जर सतत सुरू राहिली, तर त्यांची थांबण्याची ठिकाणं, त्यांची झोपेची, पाणी पिण्याची ठिकाणंही ठरत जातात. 

काही जागी अडचणी येतात, प्रार्थना करावीशी वाटते, तर यांची देवस्थळं ठरत जातात. काही झाडं, काही टेकड्या, नद्या, दगड अशी ठिकाणं ठरतात. पंढरपूरचं देवस्थान आहे ते पॅस्टोरल नोमॅडीक लोकांचं. दरवर्षी पावसाळ्याच्या सुमाराला घाटमाथ्याकडून पंढरपूरपर्यंत, त्या नदीपर्यंत किंवा सोलापूरकडं जिथं जमिनीचा कस अत्यंत उत्कृष्ट आहे तिथं जाणं असा क्रम आहे. त्या भागामध्ये पाच ते सहा हजार वर्षांपूर्वी तांदूळ पिकवला जात होता. परंतु, हळूहळू आपण ज्वारीकडं वळलो आहोत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. पावसाळ्याच्या आरंभाला पश्‍चिम महाराष्ट्रातून निघून चंद्रभागा-भीमा नदीपर्यंत पोचतो. संत साहित्य याच्याबरोबर जोडलं गेलं. ही भटकणारी मंडळी ज्यांना हजारो वर्षं सांकेतिकरीत्या ठरलेला मार्ग आहे, असे लोक या सर्व प्रवासामध्ये, यात्रा वारीच्या वाटचालीमध्ये त्यांचं ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देण्याचे काही मौखिक प्रकार रूढ होते. ते सांकेतिक मौखिक होते. अमुक शब्द म्हटल्यानंतर अमुक अर्थ असा एक ज्ञानाचा कण. आपण काही वेळा म्हणी वगैरे वापरतो. उदाहरणार्थ, शहाण्याला शब्दाचा मार. हे म्हणजे आपलं ज्ञान आपण दुसऱ्या पिढीला देणं. हे लक्षात राहण्यासाठी त्याला चाली देऊन गाणी म्हणणं, जी मौखिक गीतं असतात त्यांना आपण लोकगीतं म्हणतो. 

ही लोकगीतं अशी शेकडो वर्षे चालत राहिली. ही गीतं पुढं बदलत राहतात. आणि जेव्हा आपल्या राज्यात संत साहित्याचा प्रभाव पडला, तेव्हा या लोकगीतांच्या जागी एखादं संतगीत आलं आणि हाही प्रकार शेकडो वर्षं म्हणजे संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत तुकाराम यांच्यापासून सुरूच आहे. ते अगदी दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या अंमलाच्या काळाच्या आधी घरोघरी पसरलेले जे लोकगीतांचे प्रकार होते, त्यात हळूहळू अभंग येत गेले. जात्यावर संतांची गाणी गायली जायची. त्याच्याआधी जात्यावरची गाणी वेगळी असतील. यातून ज्ञानाचं अभिसरण होत गेलं, नवीन ज्ञानाचे धडे यात येत गेले आणि आजही वारीमध्ये नव्या प्रकारची गीतं येत राहतात. काही गीतं असतात. मौखिक परंपरेनं स्मृतिआधारित परंपरा असते. भक्ती हा या प्रवास मार्गाचा मुख्य हेतू नव्हता; पण या प्रवास मार्गावर भक्ती करणं जरुरी होतं आणि ज्ञान दुसऱ्या पिढीला देणं जरुरी होतं. या दोन्हीचा संगम झाला. भीमा नदीच्या काठी पांडुरंगाचं देवस्थान हे त्यांच्या प्रवासाच्या मार्गावरचा महत्त्वाचा टप्पा होता. म्हणून वारी निश्‍चित जागी थांबते, दिंड्या निश्‍चित जागेवरून निघतात. ही परंपरा आहे. जर या मार्गावर, मुक्कामाच्या जागांवर उत्खनन झालं, तर उत्खननामध्ये साधारणपणे ११ ते १२ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडला जाईल.  

प्रश्न : माझे आजोबा शेतकरी. वारीच्या वेळी त्यांच्याकडील बैलं घेऊन ती चारत-चारत ते देहू-आळंदीला जायचे. ते निरक्षर होते. आम्हाला आश्‍चर्य वाटायचं, की निरक्षर असूनही त्यांना सगळे अभंग कसे पाठ आहेत? संत तुकारामांची गाथा त्यांना पाठ होती. याचा अर्थ शेतकरी, धनगर, मेंढपाळ यांचा संबंध आहे; तो हजार वर्षांचा आहे आणि त्याला चाली लावणं म्हणजे कदाचित त्यामुळं ते कंठस्थ होत असावं. त्याला ताल, वाद्य यांची साथ आहे. 

उत्तर :
हो, ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं देत असताना त्याला एक स्ट्रक्‍चर द्यावं लागतं, जे फॉर्मल स्ट्रक्‍चर असतं. त्याला फॉर्म द्यावा लागतो आणि माणसाच्या मेंदूची रचना अशी आहे की, संगीतमय शब्दरचना माणूस जास्त काळ लक्षात ठेवू शकतो. ज्या काळी कागद नव्हता त्या काळी संगीतातून ज्ञान लक्षात ठेवले जात असे. शब्द ऐकून त्याचं विश्‍लेषण मेंदूचा डावा भाग करतो. संगीतमय शब्द जास्त लक्षात राहतात. नंतर कागद आला, शाळांचं स्वरूप बदललं, त्याला मी माझ्या सोप्या शब्दात ‘घोंगडी परंपरा’ असं म्हणेन, जी चालता-चालता घोंगडी बनवायची. त्यांची ज्ञानाची रचना ही घोंगडीच्या रचनेची होती उभी-आडवी प्रकारची. पण हळूहळू अर्थकारण बदलत गेलं, अर्थकारणामध्ये शेती व्यवसायाला बैलांचे, गायीचे बाजार वेगवेगळ्या जागी होऊ लागले. आपल्याकडे कोल्हापूरमध्ये काही देवस्थळं आहेत, उत्तर कर्नाटकामध्ये गायींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार व्हायचे तिथं आजूबाजूला देवस्थळं निर्माण झाली आहेत. श्रद्धा ही अर्थकारणाला जोडूनच निर्माण होत असते. त्या वेळी कागद आपल्याकडे आला. नंतर संतांच्या रचना या मौखिक, त्याचबरोबर कागदावर पसरू लागल्या. वारीमध्ये अभंग, ओव्या म्हटल्या जातात. मौखिक गीतं म्हटली जातात. म्हणून बरेच लोकं या वारीशी जोडले गेले. वेगवेगळे पंथ हे या पद्धतीनं निर्माण झाले. कर्नाटक ते केरळ अशी एक वारी निघते; पण तिचं स्वरूप वेगळं आहे. देशात जिथं-जिथं पॅस्टोरल नोमॅडीक लोकांचे फिरायचे मार्ग होते, त्या मार्गावर देशातील अनेक धार्मिक स्थळं निर्माण झाली आहेत. त्या स्थळांशी तिथल्या लोकांचा यात्रेचा संबंध, फिरण्याचा, परिक्रमेचा, वारीचा संबंध वेगवेगळ्या प्रकारे रचला गेला आहे. महाराष्ट्राला याचा फार अभिमान वाटायला पाहिजे; कारण वारी ही फक्त आपली सांस्कृतिक श्रीमंती नाही; आपल्या इतिहासाचा तो जिवंत आरसा आहे. वारीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा १० ते १२ हजार वर्षांचा इतिहास कोणीही लिहू शकेल. फक्त त्याला संपूर्ण आयुष्य खर्च करावं लागेल. 

प्रश्न : दक्षिण भारताचं मोठं नातं पंढरपूरच्या विठोबाशी आहे. तसेच उत्तर भारतातून कबिराची दिंडी पंढरपूरला यायची. याचबरोबर भाषेच्या बाजूनं संपूर्ण देश या वारीशी जोडला गेलेला आहे. संत तुकाराम महाराज यांनी दख्खनी भाषेमध्ये अभंग लिहिले आहेत. संत नामदेवांनी गोरखबानीमध्ये अभंग लिहिले. केरळ, तमिळनाडूमधील गायकही मराठी संतांचे अभंग गातात. वारीच्या अनुषंगाने ही जी भाषेची देवाण-घेवाण आहे याबद्दल जरा सांगा. 

उत्तर : हे जर समजून घ्यायचं असेल तर सोप्यात सोपं उदाहरण देतो; पण ते उदाहरण मेकॅनिकल कोणी समजू नये. म्हणजे एक विद्यापीठ असतं, तिथं वेगवेगळ्या गावांवरून विद्यार्थी येतात. तसं वारी हे एक विद्यापीठच आहे. या विद्यापीठात वेगवेगळ्या जातींचे, धर्मांचे, पंथांचे, भक्तिभावाचे समुदाय आल्यानंतर त्यांची भाषा, त्यांची भक्ती, त्यांच्या समुदायांचे देव, श्रद्धा यांना लेजेटेमेन्सी मिळायची. त्यामुळं ते वारीला जोडले जायचे आणि ते मग जोडल्यानंतर ते आपली ठेव या वारीत ठेवून जायचे. त्यांनी सोडलेला वारसा पुढे चालत राहिला. वारी जेव्हा मौखिक परंपरा आणि कागद यांच्या युद्धात सापडली होती, संघर्ष होत होता. त्याच वेळेस दक्षिण भारतात प्रस्थापित हिंदू धर्माच्या विरुद्ध, हिंदू श्रद्धांच्या विरुद्ध मोठं बंड सुरू झालं होतं. त्याला ‘सेक्‍टेरियन मूव्हमेंट’ म्हणतात किंवा ‘भक्ती चळवळ’ म्हणतात. पहिल्यांदा दक्षिण तमिळनाडूमध्ये अल्वर्ट, बसवेश्वर लिंगायत कर्नाटकमध्ये, नंतर आपल्याकडे देवाला माणसाच्या जवळ आणणारे ‘विठू माझा लेकुरवाळा’ असं म्हणणारे पंथ निर्माण झाले. या सगळ्या पंथांना वारी विद्यापीठामध्ये वैचारिकतेने मुक्त राहू शकतो, असा विश्वास होता. सामाजिक मुक्तीचा प्रवास करण्याची हमीची जागा वारी, ही आपल्या स्वातंत्र्याची हमी आहे. जोपर्यंत वारी आहे, तोपर्यंत आपली माणसं स्वतंत्र होऊ शकतात; म्हणून मध्ययुगामध्ये सोळाव्या-सतराव्या शतकामध्ये महाराष्ट्रातून स्वातंत्र्याचा झेंडा फडकवला गेला. 

प्रश्न : संतांनीही मराठी भाषा घडवली, टिकवली आणि मराठीवरचं अतिक्रमणही रोखलं, असं म्हणता येईल का? 

उत्तर : वारीमुळं मराठीमध्ये खूप सुंदर सुंदर तेलगू शब्द, कानडी शब्द, कोकणी शब्द येत राहिले. जेव्हा मौखिक परंपरेतून लिखित परंपरेमध्ये मराठी प्रवेश करत होती; त्या वेळेला नव्या शब्दांची संपत्ती मराठीत येत गेली. याचा मराठीला समृद्ध होण्यासाठी खूप मोठा फायदा झाला. म्हणून त्यानंतर ज्याला प्रिंट कॅपिटॅलिझम म्हणतो, म्हणजे जगभर प्रिंटिंग आल्यामुळे जगभरातल्या हजारो भाषा संपूर्णपणे नष्ट होत गेल्या; परंतु आपल्याकडे मराठी भाषा अधिक उफाळून आली. हे उफाळून येण्यासाठी जे सत्त्व लागतं ते वारीच्या या शब्दसंपत्तीच्या शिंपडण्यानं निर्माण झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जिवंत इतिहास लिहायचा असेल तर वारी हे फार प्रचंड आणि प्रभावी माध्यम आहे. पण त्याच्यासाठी ऑर्किऑलॉजी, जेनेटिक्‍स, भाषाशास्त्र, डेमोग्राफी, सोशालॉजी, इकॉनॉमी, पॉलिटिक्‍स या सगळ्या अंगाने अभ्यास करायला हवा. हे काम सरकार एकटं करू शकणार नाही. म्हणून लोकांनी, म्हणजे वारीत सहभागी होणाऱ्या लोकांनी, म्हणजे ज्यांना वारीची आवड आहे त्यांनी करावं. त्यासाठी त्यांनी एकत्र येऊन ‘पीपल्स स्टडी ऑफ हिस्टरी ऑफ महाराष्ट्र थ्रु वारी’, असा २५-५० वर्षांचा मोठा प्रकल्प हाती घ्यावा. त्यातून जे फलित हाती येईल, त्यातून प्रत्येक मराठी माणसाला अत्यंत सार्थ अभिमान वाटू शकेल, असा इतिहास पुढं येईल. खोटा अभिमान गळून पडेल. तोही आपला दुर्गुण आहे आणि वारी हा आपल्या सत्याचा आरसा आहे. 

प्रश्न : भाषेची वारी अशी संकल्पना तुम्ही मांडली होती. सहा हजार भाषांचे प्रतिनिधी त्यात सामील व्हावेत, १२० देशांमधील साहित्यिक यावेत, ही संकल्पना नेमकी काय होती? 

उत्तर : २०१९ हे ‘इअर ऑफ इंडिजिनियस लॅंग्वेजेस’ असं ‘युनेस्को’नं जाहीर केलंय. भाषा अस्तंगत होत आहेत, मरत आहेत, ही ‘युनेस्को’ची चिंता आहे. जगातल्या सहा हजारांपैकी तीन-चार हजार भाषा अगदी मरणासन्न अवस्थेजवळ येऊन ठेपल्या आहेत. मला असं वाटतं की, या सगळ्यांनी एकत्र यावं. एकत्र येण्यामागं ताकद असते आणि ते लोक पुण्याला येणार होते. तर आपल्या महाराष्ट्राला जगाला देण्यासारखं काय आहे? असं जर एका शब्दात उत्तर विचारलं तर मी वारी म्हणेन... 

म्हणून मला वाटलं की, आपण भाषांना वारी काय असते याचा विचार करायला लावूया. म्हणून मी ‘भाषा वारी’ काढायचं ठरवलं. सहा हजार भाषांचे प्रतिनिधी ८७ देशांतून आले होते. परदेशांतून ३०० लोक आले होते. ते पाच-सहा किलोमीटर चालले. जे विदेशातून आले होते, त्यांना वारी म्हणजे काय असतं? वारी म्हणजे फेस्टिवल नसतो, तर एक वेगळा पवित्र गंभीर प्रकार असतो; परंतु तो लोकतांत्रिक असतो आणि तो कोणी ऑर्गनाईझ केलेला नसतो, हे ध्यानात यायला हवं. म्हणून मी त्यांना वारीची झलक दाखविली. त्यात प्रत्येक संताचे एक गीत, एक अभंग म्हणणारे असे ग्रुप होते. तर ते सगळं बघितलेल्यांचे परदेशातून मला अजूनही मेल येतात, टेलिफोन येतात की, तो आनंद आमच्यासाठी खूप वेगळा होता. 

वारी म्हणजे सामाजिक मुक्तीचा प्रवास आणि आपल्या स्वातंत्र्याची गॅरंटी आहे, असं म्हणता येईल. लोक उत्स्फूर्तपणे वारीत येतात. जोपर्यंत वारी आहे, तोपर्यंत आपण स्वतंत्र राहू शकतो. म्हणून मध्ययुगात, सोळाव्या-सतराव्या शतकात महाराष्ट्रातून स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला गेला. 

यानिमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, पंढरपूरमध्ये साने गुरुजींनी १९४७ मध्ये अस्पृश्‍यांना, दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून प्राणांतिक उपोषण करायचं ठरवलं आणि त्यांनी आपले प्राण पणाला लावले. त्यांच्या लढ्याला यश आलं आणि अस्पृश्‍यांना मंदिर प्रवेश मिळाला. हा सगळा समतेचा खेळ आहे. राष्ट्र सेवादलामार्फत आणि समविचारी लोकांमार्फत जिथं साने गुरुजींनी उपोषण केलं होतं त्या ठिकाणच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, नव्या पिढीच्या वारकऱ्यांनाही माहिती व्हाव्यात, यासाठी तिथं स्मारक उभारलं जातंय. बहुधा यावर्षी त्याचं उद्‌घाटन होईल आणि मला वाटतं, ती एक मोठी कृती असेल.

प्रश्न : सर, तुम्ही राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालात. आता एक नवी दिशा सेवादलाला मिळेल. तुम्ही दोन कार्यक्रम दिलेत. त्यापैकी एक आहे सगळ्या समविचारी, सलोख्याचा विचार करणाऱ्या लोकांना, संस्थांना एकत्र करणं, आणि दुसरा म्हणजे पर्यावरणाचा विचार करणं; याबद्दल समजावून सांगा..

उत्तर : फ्रेंच भाषेसाठी व्हिक्‍टर बिगोचं जे महत्त्व आहे तेवढंच महत्त्व मराठीसाठी साने गुरुजींचं आहे. कुठल्याही खेड्यातून येऊन, शहरात कोणत्याही पक्षाच्या लोकांना, कोणत्याही धर्माच्या लोकांना जर विचारलं ‘श्‍यामची आई’ तुम्हाला कसं वाटतं, तर प्रत्येक माणसानं ‘श्‍यामची आई’साठी अश्रू गाळलेले असतात. साने गुरुजींनी पंढरपूरमध्ये जो लढा दिला त्याच्यामधील निर्भयतेतून, समाजात समानता असावी या तळमळीतून. हीच तळमळ आताच्या काळामध्ये हवी आहे. निर्भयता आणि समानता असावी, अशी तळमळ समाजात जर निर्माण झाली तर ते समाजाच्या हिताचं आहे. 

साने गुरुजींनी करुणा या भावनेला त्यांच्या आयुष्यात सर्वांत जास्त महत्त्व दिलं होतं. सध्या अनेकांच्या मनामध्ये तिरस्कार आहे. एवढा तिरस्कार समाजाला खंडित करू शकतो, तो एकत्र आणू शकत नाही. म्हणून करुणेच्या मदतीने समाज एकत्र आला, निर्भय बनला आणि समानतेवर जर विश्वास ठेवायला लागला तर आपल्या देशालाच नाही, तर संपूर्ण जगाला हवं आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अंतापासून खास करून पहिल्या महायुद्धानंतर ते दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीपर्यंत आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिली ३० वर्षं ‘शॉर्ट सप्लाय इकॉनॉमी’ची होती. प्रत्येक गोष्टीचा तुटवडा असायचा. पॅराफीन नाही म्हणून मेणबत्त्या नसायच्या, केरोसीनसाठी रांगा लागायच्या. अन्न शिजवायला पुरेसं तेल नसायचं. गाड्या चालवायच्या तर इंधन नसायचं, वीज नसायची. शॉर्ट सप्लाय इकॉनॉमी जगभर होती. लोकसंख्या स्थिर करत करत साधारणपणे २०३० पर्यंत जगाची लोकसंख्या स्थिर झालेली असेल ९०० कोटीपर्यंत. एवढ्या लोकांना पुरेल इतकी संसाधने जगभर आहेत; पण ती मूठभरांमध्ये एकवटली आहेत. संसाधनं ओरबाडून घेतल्यामुळं त्यांचे स्रोत घटत आहेत. याची वेगळी व्यवस्था करावी लागेल. प्रत्येकाला पुरेशा होतील एवढ्या गोष्टी पण पृथ्वीला हानी न पोचवता पुरवता येतील, अशी व्यवस्था व्हावी. त्याच्यासाठी पृथ्वीकडे संवेदनशीलतेनं बघणारा समाज जगभर असायला पाहिजे.

युरोपमध्ये निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असे लोक निवडून आले, एका बाजूला हिटलर, मुसोलिनीला सलाम करणारे, जे पुढं जगाला युद्धाकडे घेऊन जातील आणि दुसऱ्या बाजूला पृथ्वीला जास्त महत्त्व देणारे, त्या दृष्टीने समाजरचना, अर्थरचना, राज्यरचना असावी असा विचार करणारे निवडून आलेत. तर मी म्हणतो, आपल्याला निवड स्वातंत्र्य हवं आहे. मला जर कोणी विचारलं की, तुम्ही युद्ध पत्कराल की पृथ्वीला सांभाळून ठेवणं पत्कराल? तर मला नम्रपणे एक जबाबदारी आहे, की पृथ्वीला सांभाळून ठेवावं, कारण तिनं मला सांभाळलं आहे.

छायाचित्र सौजन्य : मुकुंद पारखे, श्रीधर पलंगे, स्वप्निल मोरे


डॉ. गणेश देवी यांच्या मुलाखतीची लिंक : https://www.youtube.com/watch?v=j6m9DoI5RBA


No comments:

Post a Comment