'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Friday 8 October 2021

कोल्हापूरकरांच्या स्वप्नांना विमानाचे पंख

कोल्हापूर ते तिरुपती अशी विमानसेवा सुरू झाल्यानंतर श्री बालाजीच्या दर्शनाला जाणारे भाविक आणि पर्यटकांचा प्रवासाचा वेळ फक्त दोन तासांवर आला. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा हा प्रवास कोल्हापूरच्याही विकासाला चालना देणारा आहे. त्यानिमित्तानं 'कोल्हापूर सकाळ'चा संपादक म्हणून केलेलं हे विवेचन...



कोल्हापूरजवळील उजळाईवाडीच्या माळावरचा विमानतळ एरवी शांत-निवांत असतो. रविवारी (ता. 12) या विमानतळावर भल्या सकाळपासून लगबग सुरू होती. ढोलताशांच्या गजरात, लेझीमच्या ठेक्‍यावर ताल धरलेल्या शालेय विद्यार्थिनी पाहुण्यांचे स्वागत करत होत्या. भगवे फेटे बांधलेले कर्मचारी, रंगीबेरंगी नऊवारी साड्या परिधान केलेल्या महिला कर्मचारी उत्साहाने मिरवत होत्या. ही सगळी तयारी सुरू होती कोल्हापूर-तिरुपती आणि कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावरील विमानसेवेच्या उद्‌घाटनाची.

सकाळी नऊ वाजता हैदराबादहून सुमारे 65 प्रवासी घेऊन इंडिगो कंपनीचे विमान विमानतळावर उतरले. टाळ्यांच्या कडकडाटात 'वॉटर सॅल्यूट' देत त्याचे स्वागत करण्यात आले. विमानातून आलेल्या प्रवाशांचे लाडू देऊन तोंड गोड करण्यात आले. त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. नंतर तिरंगा दाखवत कोल्हापूर-तिरुपती विमानसेवेला ग्रीन सिग्नल देण्यात आला. सकाळी पावणेदहा वाजता 65 प्रवासी घेऊन विमानाने तिरुपतीच्या दिशेने उड्डाण केले आणि एकच जल्लोष झाला. 

चौदा जुलैपर्यंतचे बुकिंग फुल

या 'फर्स्ट फ्लाइट'ला कोल्हापूरकरांनी 'फुल' प्रतिसाद दिला. यातही विशेष बाब म्हणजे तिरुपतीला जाणाऱ्या विमानांचे 14 जुलैपर्यंतचे बुकिंग झाले आहे. या विमानसेवेमुळे करवीरनिवासिनी श्री अंबाबाई आणि तिरुपती बालाजी या दोन देवस्थानांतील दोन दिवसांचे अंतर आता दोन तासांवर आले आहे. कोल्हापूरहून मोठ्या प्रमाणावर भाविक तिरुपतीला जातात. तिरुपतीचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईला दर्शनाला येण्याची प्रथा आहे. त्यामुळे तिरुपती-कोल्हापूर विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळेल. कारण कोल्हापूरबरोबरच सांगली, सातारा परिसरातील भाविकही या सेवेचा लाभ घेतील. आतापर्यंत तिरुपतीला जायचे म्हणजे रेल्वे किंवा गाडी हेच पर्याय होते. त्यांतून दोन दिवसांचा प्रवास करावा लागायचा. शिवाय राहण्या-खाण्याचा खर्च वेगळा. मात्र, नव्या सुविधेमुळे हा प्रवास मुठीत आला आहे.

सातारा, सांगली परिसरातील भाविकांना कोल्हापुरात येण्यासाठी एक-दीड तास लागतो. त्यांनाही हा प्रवास सोयीचा आणि किफायतशीर आहे. इंडिगो कंपनीने कोल्हापूर-हैदराबाद विमानसेवेसाठी 1999 रुपये; तर कोल्हापूर ते तिरुपती सेवेसाठी 2499 ते 3077 रुपये तिकीट दर आकारला आहे. तिरुपती-कोल्हापूरसाठीही हाच दर आहे.



यानिमित्ताने कोल्हापूरच्या विमानसेवा क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या चर्चेला पुन्हा सुरवात झाली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नुकतीच बैठक घेऊन कोल्हापुरातील विमानतळावर नियोजित नाईट लॅंडिंगसाठी येणारे अडथळे दूर करावेत, रात्रीच्या वेळी विमानतळ दिसण्यासाठी ऑप्टिकल दिवे लावावेत, विस्तारीकरणाचे काम गतीने करावे, अशा सूचना दिल्या. विस्तारीकरणात जाणाऱ्या नेर्ली-तामगाव रस्त्याला पर्यायी रस्ता देणे, विमान लॅंडिंगमध्ये अडथळा ठरणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीचे स्थलांतर करणे, विस्तारीकरणासाठी वनजमीन अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण करणे, विस्तारीकरणात जाणाऱ्या चिकूच्या साठ झाडांच्या बागेची भरपाई देणे आदींचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

कोल्हापूरच्या विकासालाही चालना

केंद्र सरकारच्या 'उडे देश का आम नागरिक' अर्थात 'उडान' योजनेअंतर्गत 'इंडिगो'ने कोल्हापूर-तिरुपती आणि कोल्हापूर-हैदराबाद या मार्गांवर ही विमानसेवा सुरू केली आहे. विमानतळावर इंधन भरण्याची सुविधा सुरू झाली आहे. प्रशासकीय इमारत चकाचक करण्यात आली आहे. चेक इन काऊंटर, प्रवाशांना बसण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, सुरक्षा यंत्रणा, एक्‍स-रे स्कॅनिंग मशीन आदी सुविधा आहेत. यामुळे एरवी शांत असणाऱ्या विमानतळावर वर्दळ वाढली आहे. कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटकांसाठी ही सुविधा नवी पर्वणी ठरणार आहे. या निमित्ताने कोल्हापूरच्या विकासालाही चालना मिळेल.

शेतमालाची हवाई वाहतूक व्हावी 

अर्थात, केवळ प्रवासी वाहतूकच नव्हे, तर या विमानतळावरून कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतमालाची हवाई वाहतूक सुरू होणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव दिल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. त्या वेळी त्यांनी कोल्हापूर विमानतळावर लवकरच नाईट लॅंडिंग सुविधेसह कार्गो हब, पार्किंग, सर्व्हिसिंग सेंटर आणि लॉजिस्टिक पार्क निर्माण केले जाईल, असे आश्वासन दिले होते. कोल्हापूरकर या आश्वासनांची पूर्तता होण्याची वाट पाहत आहेत.

दळणवळण आणि व्यापारवाढीसाठी कोल्हापुरातून विमानसेवा सुरू करण्याचे स्वप्न छत्रपती राजाराम महाराजांनी पाहिले. त्यासाठी 170 एकर जमीन संपादित करून आणि अनेक प्रयत्न करून त्यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. त्याची पुढची पायरी म्हणून कोल्हापूर-तिरुपती विमानसेवेकडे पाहता येईल. हे पाऊल छोटे असले, तरी आशादायी आहे. यानिमित्ताने दिवसभरात आठ विमानांच्या फेऱ्या सुरू होऊन विमानतळ जागता राहणार आहे. आगामी काळात कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू व्हावी, विमानतळाच्या विस्तारीकरणातील अडथळे दूर व्हावेत, तेथे आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, विमानसेवेत सातत्य असावे, या प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार, विमानतळ प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न पाहणारे राजर्षी शाहू छत्रपतींच्या करवीरनगरीच्या विकासासाठी ते आवश्‍यक आहे.

'सकाळ'मधील लिंक - https://www.esakal.com/sampadakiya/dr-shringang-gaikwad-writes-article-about-air-travel-started-kolhapur-tirupati-188951

No comments:

Post a Comment