'कोल्हापूर सकाळ'चा संपादक असताना कामाच्या निमित्तानं परिसर खूप फिरलो. सतत माणसांमध्ये जात राहिलो. त्यांच्याशी बोलत राहिलो. त्यामुळं कोल्हापूर, सांगली, बेळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागातील समस्या जवळून अनुभवल्या. त्या 'सकाळ'मधून मांडल्या. या भागात एक परस्परविरोधी समस्या नेहमीचीच आहे. ती म्हणजे कोल्हापूर परिसरात पाण्याचा सुकाळ तर, शेजारच्या सांगली जिल्ह्यातील आटपाडीसारखे सहा तालुके कायम पाण्याअभावी दुष्काळग्रस्त. जानेवारीपासूनच तिथं पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात होते. २०१९ च्या मे महिन्यात या तालुक्यांमध्ये फिरून मी हा दुष्काळ 'सकाळ'मध्ये मांडला. प्रिंटसोबतच डिजिटल मीडियावरही त्याचं कव्हरेज दिलं. या दुष्काळी स्थितीचा आढावा घेणारा 'साप्ताहिक सकाळ'मध्ये छापून आलेला हा लेख...
उन्हापासून संरक्षण करण्यासाठी दिघंची गावाजवळ शेतकऱ्यांनी डाळींबाच्या झाडांना गुंडाळलेल्या साड्या. |
‘इथं पाण्याचा सुकाळ आहे’ असं म्हणता म्हणता पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळानं कधी शिरकाव केला ते कळलंही नाही. निसर्गाच्या अवकृपेला टॅंकरमाफियांची, टेंडरबहाद्दरांची आणि आपल्याच शिवारात पाणी फिरवणाऱ्या धोरणकर्त्यांचीही साथ आहे. या सर्वांना आवडणारा दुष्काळ आता चांगलंच बस्तान बसवू लागला आहे. त्याला पळवून लावण्याच्या चर्चा रंगतात फक्त उन्हाळ्याच्या चार महिन्यांत. दुष्काळी गावं फिरून केलेला हा ग्राउंड रिपोर्ट...
कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी नदीखोऱ्यातली पाणीटंचाई पाहायला भल्या सकाळी निघालो. वाटेत आंबर्डे-वेतवडे गावाजवळच्या नदीच्या बंधाऱ्यावर थांबलो, तेव्हा खाली नदीत धुणं धुणाऱ्या बायकांचा कलकलाट सुरू होता. जवळ गेलो तसा कलकलाट बंद झाला. पाण्याविषयी विचारू लागलो, तर बायका सुरुवातीला बुजल्या. पण, नंतर घडाघडा बोलू लागल्या... ‘‘धामणी नदीवरचं धरण पुरं व्हईना. म्हणून नदीत १२ महिनं पाणी ठरंना. आमचा पुरा दिस जातूय पाण्याभवती. प्यायचं पाणी लांबच्या डोंगरातनं डोक्यावर आणावं लागतं...’ मला कोकणातील प्रसिद्ध कवी अजय कांडर यांची शाळेच्या पुस्तकातील ‘बाया पाण्याशीच बोलतात’ ही कविता आठवू लागली... डुंगलीतील झरा वाचवू पाहतोय जीव,
तिथे सर्वांचेच प्राण तहानलेले
चढणीचा घाट चढून बायांच्या पायांत गोळे
आणि डोळे ओले...
कोल्हापूरच्या धामणी खोऱ्याने मतदानावर टाकलेला बहिष्कार |
उन्हाळ्यातल्या तहानलेल्या महाराष्ट्राचं हे प्रातिनिधिक चित्र आंबर्डे-वेतवडेच्या नदीवर पाहायला, ऐकायला मिळालं. पुढं नदीकाठची गावं पाहत गेलो. निवडणुकीचा काळ होता. धामणी नदीखोऱ्यातील जवळपास ६० गावांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला. गावकऱ्यांनी गावात लावलेले बहिष्काराचे होर्डिंग्ज दाखवले. भर उन्हात कोरड्या नदीपात्रात नेऊन टंचाईची दाहकता अनुभवायला लावली. या भागातील पाणीटंचाई उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळी. कारण इथं पाऊस भरपूर पडतो. अडचण ही, की तो साठवता येत नाही. त्यासाठी धरण बांधायला घेतलं, पण ते निधीअभावी अपुरंच राहिलं. सरकार लक्ष देईना, लोकप्रतिनिधी फिरकेनात. मग ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांची कोंडी करायची म्हणून गावकऱ्यांनी बहिष्काराचं शस्त्र उपसलं. प्रशासनानं समजूत घालायचा प्रयत्न केला, पण ही गावं निश्चयापासून ढळली नाहीत. तसा कोल्हापूर जिल्हा पाण्याने समृद्ध. पाऊस आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची कृपा. त्यांनी पंचगंगा नदीवर राधानगरी धरण बांधलं आणि हा जिल्हा सुजल-सुफल केला; परंतु धरणापासून दूर असलेली काही दुर्गम गावं अजूनही पाण्यापासून वंचितच आहेत. त्यात शाहूवाडी आणि भुदरगड तालुक्यांचा दुर्गम भाग आहे. उंचावरील धनगरवाड्यांना झऱ्याच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागतंय. गडहिंग्लज तालुक्यातील चित्री प्रकल्पाचं पाणी तालुक्याच्या पूर्व भागाला मिळत नाही. त्यामुळं तिथं पाण्यासाठी भटकंती पाहायला मिळाली.
आटपाडीच्या बाजारावर दुष्काळाची छाया
कोल्हापूरहून पहाटेच निघून आटपाडीला पोचलो तेव्हा जनावरांचा बाजार संपत आला होता. सांगली जिल्ह्यातील आटपाडी हा दुष्काळी तालुका. आटपाडीप्रमाणंच जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, मिरज या तालुक्यांच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलाय. हा दुष्काळ आटपाडीच्या बाजारात पाहायला मिळाला. ‘‘माणसांनाच प्यायला पाणी मिळंना, तर जनावराला कुठनं द्यायचं, म्हणून त्यास्नी दावला बाजार. अर्ध्या निम्म्या किमतीत मेंढरं इकून टाकली. विलाज न्हाई...’’ असं धनगर, शेतकरी सांगत होते. जनावरं विकत घेणारे खाटीक समाजाचे व्यापारीही हळहळत होते. ‘हे शेतकरी आणि त्यांची जनावरं जगली तरच आमचंबी पोट चालंल’ असं म्हणत होते. सातारा, सोलापूर, मंगळवेढा भागातूनही बाजारात जनावरं विक्रीसाठी आली होती.
पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्न मोठा. कोल्हापूर परिसरातील उसाचा हंगाम संपला. त्यामुळं जनावरांना हिरवा चारा मिळणं बंद झालंय. बाजारात अक्कलकोट, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा या भागातून व्यापारी, शाळूचा कडबा विकायला घेऊन आले होते. गेल्या महिन्यात दोन हजार रूपये शेकडा असलेला कडबा आता तीन हजार रुपयांपर्यंत पोचला आहे. म्हणजे एक पेंडी ३० रुपयांना. परवडत नसतानाही शेतकरी हा कडबा घेतात. आता तर अक्कलकोट भागातील कडबाही संपत आला आहे.
बाजारातून बाहेर पडून दिघंची गावाकडं निघालो. वाटेत एका शेतात रंगीबेरंगी साड्या वाळत घातलेल्या दिसल्या. काय प्रकार आहे म्हणत जवळ जाऊन पाहिलं तर विशेषच वाटलं. त्या साड्या डाळिंबांच्या झाडांना गुंडाळलेल्या होत्या. शेताचे मालक सीताराम चंद्रकांत बाड सांगत होते, ‘‘डाळिंब फळाला उन्हामुळं डाग पडू नये म्हणून बांधल्यात या साड्या. आधीच कमी पाण्यात कशीबशी जगवलीत झाडं. त्यात फळांना डाग पडले तर त्यांना बाजारभाव मिळणार नाही...’’ त्यांच्या पत्नीनं या जुन्या साड्या जवळच्या पंढरपुरातून आणल्याचं सांगितलं. एक साडी १५ रुपयांना!
https://www.youtube.com/watch?v=BleJ3ANFF9U&ab_channel=ShreerangGaikwad
बायकांची पाण्याची कहाणी ऐकून झरे गावाकडं निघालो. सांगली जिल्हा द्राक्ष पिकासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. पण झरे गावच्या शिवारातील द्राक्षबागा शेतकऱ्यांनी पाण्याअभावी सोडून दिल्यात. पोटासाठी शेतकरी कुटुंबं मुंबईकडं निघून गेली आहेत.
रस्त्याकडेला दिघंचीच्या माळावर मेंढरं चरताना दिसली. बोडक्या माळरानावर वाळलेल्या गवताचं पातंही दिसत नसताना मेंढरं काय खात असतील, असं उत्सुकतेनं मेंढपाळबाबा सावंत यांना विचारलं. ते म्हणाले, ‘‘मेंढरं माती फुंकून गवताची मुळं शोधतात आणि ती खातात...’’ जाता जाता सातारा जिल्ह्याची सीमा ओलांडली गेली. दुष्काळप्रसिद्ध माण तालुका लागला. रस्त्याच्या कडेला माळावर जनावरांची छावणी दिसली. वळलो. शेणवडी गावच्या विकास सोसायटीनं नुकतीच छावणी सुरू केली होती. हजारभर जनावरं, दीडदोनशे माणसं, असं नांदतं गावच माळावर वसलं होतं. ते पावसाची वाट पाहत तिथंच उन्हाळाभर बसून राहणार होतं.
झरे परिसरातील विभूतवाडीच्या शिवारात पोचलो. दिवस मावळला होता. निराश माणसं पाय ओढत आलेली. वातावरणात खिन्नता भरून उरली होती. पाठीमागं पाण्याअभावी वाळून गेलेल्या बागा उभ्या होत्या. डोळ्यातलं पाणी लपवत शेतकऱ्यांनी त्यांची कर्मकहाणी सांगितली. त्यांच्यात सरपंच चंद्रकांत पावणेर होते. म्हणाले, ‘‘टेंभूचा कालवा गेलाय शेजारून. त्याच्या चाऱ्या दक्षिणोत्तर काढल्या असत्या, तर आमच्या शिवारात पाणी आलं असतं. पण टेंडरबहाद्दरांनी त्यांच्या सोयीनं सगळं करून घेतलं. त्यामुळं इथला शेतकरी उजाड झालाय.’’ अंधारासोबत मनात खिन्नता दाटून आली...
कोल्हापूरकडं निघालो. अंधारात दूर दूर एकेकट्यानं बसलेल्या वस्त्यांवरचे दिवे मिणमिणत होते. आठवडाभरापूर्वीचा कोकणदौरा आठवला. एरवी निसर्गवैभवानं नटलेला कोकण उन्हाळ्याचे तीन महिने पाण्याअभावी तडफडत असतो. अथांग अरबी समुद्राच्या कडेला वसलेल्या गावांतील विहिरींमधील गोड्या पाण्याची पातळी घटते आणि उरतं पिण्याच्या लायक नसलेलं मचूळ पाणी! मग गुजारा टॅंकरवर. डोंगरावर राहणाऱ्या धनगरपाड्यांच्या नशिबी तर तेही नाही. पाण्याअभावी ही माणसं जगतात, हेच आश्चर्य.
पंढरपूर-सोलापूर परिसरातील ग्रामीण भागात एक म्हण आहे. ‘पंढरपूर पाण्याचं, मंगुडं दाण्याचं अन सांगोला सोन्याचं...’ म्हणजे पंढरपुरात बक्कळ पाणी, मंगळवेढा हे ज्वारीचं कोठार आणि सांगोल्यात सोन्यानाण्याची समृद्धी... हे चित्र फार पूर्वीच्या काळी होतं, असं म्हणण्यासारखी परिस्थिती आज आहे. सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्यांच्या खाली गेला आहे. सोलापूर शहराला चार दिवसांआड पिण्याचं पाणी मिळतं. जिल्ह्यात सव्वादोनशे टॅंकरनं पाणी पुरविलं जात आहे. मंगळवेढा तालुक्यात त्यांची संख्या सर्वाधिक आहे. म्हैसाळ प्रकल्पाचं पाणी तब्बल २० वर्षांनी मंगळवेढ्यात पोचलं. त्याचा लाभ अजून शेतकऱ्यांना मिळायचा आहे. अक्कलकोट तालुक्यातील चार गावांनी पाण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता. सोलापूरच्या नशिबातला दुष्काळ हटता हटत नाहीये. कर्नाटकातील बेळगाव कोल्हापूरचे शेजारी. कृष्णा नदी कोरडी पडल्यानं बेळगाव जिल्ह्यातील नदीकाठावरच्या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्रानं कोयना धरणातून पाणी सोडावं, अशी मागणी करण्यात आली आहे. कर्नाटकातील भाजप नेत्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. कोयनेच्या बदल्यात कर्नाटकानं अलमट्टी धरणातून महाराष्ट्राला पाणी द्यावं, या अटीवर फडणवीस यांनी पाणी सोडण्याचं मान्य केलं. पण याआधीही याच अटीवर महाराष्ट्रानं कोयनेतून पाणी सोडलं होतं. पण कर्नाटकानं एकदाही अलमट्टीचं पाणी महाराष्ट्राला दिलेलं नाही. कृष्णा कोरडी पडल्यामुळं चिकोडी, रायबाग, अथणी या तीन तालुक्यांत पाणीटंचाई आहे. जिल्ह्यात सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या खानापूर तालुक्यातही पाणीटंचाई आहे. बेळगाव तालुक्याचा पूर्व भाग, रामदूर्ग, सौदत्ती, बैलहोंगल या तालुक्यांमध्येही तीव्र पाणीटंचाई सतावते आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पूर्व भागातील ४२ गावं कर्नाटक सीमेलगत आहेत. त्या उंचवट्यावर असलेल्या भागात म्हैसाळ प्रकल्पाचं पाणी चढणं अवघड आहे. त्याऐवजी कर्नाटकातील ‘तुबची-बबलेश्वर’ प्रकल्पाचं पाणी या गावांना आणणं सोपं. त्यासाठी कोयनेच्या कराराप्रमाणं महाराष्ट्र-कर्नाटकात करार होणं गरजेचं आहे. तसा प्रस्ताव पाटबंधारे विभागानं महाराष्ट्र सरकारला दिला आहे. गेली दोन वर्षं केवळ बैठका सुरू आहेत. पण ठोस काहीच होत नाही. आता कोयनेच्या पाण्याच्या बदल्यात तरी कर्नाटक पाणी देईल, असं या भागातील जनतेला वाटते आहे.
सांगली जिल्हा -
- जिल्ह्यातील ५२० गावांत दुष्काळ
- १५४ गावे, ९८४ वाड्या-वस्त्यांवरील ३ लाख ३४ हजार ४८९ लोकसंख्येला १५९ टॅंकरनं पाणीपुरवठा
- दुष्काळी टापूत ५ लाखांवर पशुधन
- प्रशासनाकडं ६० छावण्यांसाठी प्रस्ताव
- गेली ३ वर्षं समाधानकारक पाऊस नाही
- जिल्ह्यात ८० हजार लिटरनं दूध संकलनात घट
रत्नागिरी -
- जिल्ह्यात २९ गावांतील ५४ वाड्यांत ६ टॅंकरनं पाणी
- जिल्ह्यातील ६ हजारांहून अधिक गावकरी टॅंकरवर अवलंबून
- यावर्षी ५ गावांतील १५ वाड्यांना अधिक टंचाईची झळ
- विहिरींच्या पाणीपातळीत घट; भूजल विभागाचा सर्व्हे
- सर्वाधिक टंचाई खेड तालुक्यात
- मंडणगडात ५ धरणांतील पाणीपातळी खालावली
- रत्नागिरी शहरात एक दिवसाआड पाणी
सिंधुदुर्ग -
- ३ गावं, ३९४ वाड्या टंचाईनिर्मूलन आराखड्यात
- ४ कोटी ७८ लाख ४५ हजारांचा आराखडा मंजूर
- आत्तापर्यंत ३८१ टंचाई निर्मूलन कामांचं सर्व्हेक्षण
- २७० प्रस्ताव; त्यातील २०८ कामं मंजुरीच्या प्रतीक्षेत
- गतवर्षी ११९ कामे मंजूर, पैकी ४५ कामे पूर्ण
साप्ताहिक सकाळमधील लेखाची लिंक - http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-water-story-shrirang-gayakwad-marathi-article-2881
No comments:
Post a Comment