'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Tuesday 12 October 2021

वसा विश्वशांतीचा...

पंढरीची आषाढी वारी म्हणजे मानवतेचा इतिहास आहे. ही पायी वारी म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक संचित आहे. या संचिताची ओळख नव्या पिढीला करून देणं हे आपलं पत्रकार म्हणून कर्तव्य आहे, अशी माझी भावना आहे. त्यातूनच 'सकाळ'मध्ये असताना 'विठाई' या आषाढी वारी विशेषांकाची सुरुवात केली. या विशेषांकाचा 2019चा विषय होता 'सलोख्याची वारी'! 

या अंकातून वारीनं सर्व जातीधर्मातील, समाजातील सर्व स्तरांतील लोकांना कसं सामावून घेतलं आहे, याचा 'रिपोर्ताज'च्या माध्यमातून शोध घेतला गेला. त्यांचे 'डिजिटल'साठी व्हिडिओही बनविले गेले. मुलाखती घेतल्या गेल्या. संतांनी रुजवलेल्या या सलोख्याच्या विचारांची पालखी वाहण्याचं मोठं काम 'सरहद' या संस्थेचे संस्थापक संजय नहार गेली अनेक वर्षे करत आहेत. 'विठाई'च्या निमित्तानं मी घेतलेली त्यांची ही मुलाखत...

प्रश्न : इथं मी शमिमा अख्तर या मुस्लिम कुटुंबातील मुलीनं गायलेलं पसायदान ऐकलं. ही मुलगी कोठून आली आहे? 
उत्तर : काश्‍मीरमधील बांदीपुरा या दहशतवादी भागातून २००३ मध्ये ‘सरहद’मध्ये १४ मुलं दाखल झाली. संस्थेत सध्या दीडशेपेक्षा जास्त मुलं आहेत. लहानपणीच शमिमानं ‘सरहद’मध्ये यावं, अशी तिच्या कुटुंबाची इच्छा होती. काही कारणास्तव ते झालं नाही. ती शिक्षणासाठी बाहेर आली आणि गाऊ लागली. त्यांनी म्युझिकमध्ये करिअर करायचं ठरवलं. तीन-साडेतीन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्ताने पुन्हा ‘सरहद’सोबत शमिमा जोडली गेली. संगीतामध्ये माणसांना जोडण्याची, संदेश देण्याची ताकद आहे, असं लक्षात आल्यावर तिला आम्ही संगीताची शिक्षक होऊन काश्‍मिरी मुलांना शिकवावं, यासाठी बोलवलं.
 
पसायदान गाणारी काश्मीरची शमीमा अख्तर.
तिची पार्श्वभूमी अशी आहे की, एकदा बसमधून जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला, यामध्ये तिची आत्या मारली गेली, आई रक्तबंबाळ, जखमी झाली. मांडीवरच्या शमिमाला अशा परिस्थितीत आईनं वाचवलं होतं. ज्यांनी रक्त पाहिलं, मृतदेह पाहिले, त्यांच्याशिवाय शांततेचा संदेश जास्त कोणाला कळू शकतो? त्यांनी शांततेचा संदेश द्यावा म्हणून आम्ही ‘गाश’ नावाच्या बॅंडची निर्मिती केली. जोगिंदर सिंग या मुलाच्या घरातील १५ लोक मारले गेलेत. मंजूर, अकीम आणि शमिमा बॅंडमधील लीड सिंगर होते. शमिमानं मराठी गाणी गायली. माझी पत्नी सुषमानं अशी संकल्पना मांडली की, माउलींच्या पसायदानामधून संदेश द्यायचा. कारण संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, घराघरात पोचलेल्या संदेशाला जागतिक परिमाण द्यावं. यासाठी शमिमानं पसायदान गावं अशी कल्पना पुढे आली.
 
पहिल्यांदा तिने वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दोन तास तयारी केली आणि गायली. तिनं ज्या पद्धतीनं ते गायलं त्या वेळी लोक विचारू लागले की, काश्‍मिरी मुस्लिम मुलीनं पसायदान गायलं? तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं, काश्‍मीरचा, महाराष्ट्राचा आणि पसायदानाचा खूप जवळचा संबंध आहे. ज्ञानेश्‍वर माउलींनी लिहिलेल्या पसायदान, अमृतानुभवावर काश्‍मिरी शैविझमचा मोठा प्रभाव आहे. मोठा ज्ञानेश्वर माउली तिथपर्यंत पोचले होते आणि काश्‍मीरचा जो संदेश होता तो संपूर्ण महाराष्ट्रभर पोचला होता.

प्रश्न : सरहद संस्था नेमकं काय काम करते? संस्थेच्या कामाचं स्वरूप काय?

उत्तर : देशभक्ती सांगायची नसते, जगायची असते. आम्ही घोषणा देत चाललो होतो हिंदू-सीख भाई-भाई. एक शीख पुढे आला आणि म्हणाला, ओरडताय काय? मी म्हणालो, आम्ही भाऊ आहोत. त्यावर ते म्हणाले, ‘भाऊ आहात तर कृतीतून दाखवा, ओरडू नका.’ कृतिशीलतेच्या उद्देशानं २३ मार्च १९८४ रोजी वंदेमातरम संघटनेची स्थापना केली. वंदेमातरम या नावामुळं आम्हाला अडचणी आल्या. काश्‍मीरमधील मुलांसाठी काम करायचं होतं. संस्थात्मक कामाची उभारणी करायची होती. यातून ‘सरहद’ची उभारणी झाली. लहान मुलांचे दौरे सुरू झाले, दुभंगलेली मनं सांधण्याचे प्रयत्न केले. त्या वेळी लक्षात आलं, लहान प्रयत्नांचाच एवढा परिणाम होतोय तर याची लाट यायला पाहिजे. सकारात्मक घटना कमीच घडत असतात. अशा गोष्टी घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ‘सरहद’ची स्थापना त्यातून झाली. सरहद ही दहशतग्रस्त भागातील नागरिक, महिला, मुले यांच्या पुनर्वसनासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नरत असलेली संस्था आहे.

पंजाबशी आम्ही आधीपासून जोडले गेलोय. पंजाबातील घुमानमध्ये संत नामदेवांच्या कार्यस्थळी गेल्यावर असं जाणवलं, १० किलोमीटर अंतरावर घराघरांतला एक मुलगा  दहशतवादी आहे. त्यांच्या घरात फोटो होते भिंद्रनवाले, भगतसिंग आणि गुरुगोविंदसिंग यांचे. त्यातले दोन हिरो तर माझेच होते. पुढं आठ किलोमीटरवर संत नामदेवांचं घुमान होतं. त्या घुमानमध्ये विनोबा भावेंनी संदेश लिहिलाय, ‘जो पंजाब सिकंदराला सैन्याच्या बळावर जिंकता आला नाही, तो पंजाब महाराष्ट्रातून जाऊन संत नामदेवांनी प्रेमानं जिंकला.

’१९८६ मधली गोष्ट आहे. ‘सरहद’च्या स्थापनेच्या काळात अशा घटना घडत गेल्या, त्याने ‘सरहद’च्या दिशा ठरत गेल्या. भाषा, साहित्य, संस्कृती यांच्या माध्यमातून देश जोडायचा तर आपण त्यांच्याशी जोडलं गेलं पाहिजे, असं जाणवलं. सुरवातीला थोडी गर्वाची भावना होती; पण जसजसं पुढं जात राहिलो तेव्हा कळालं, कधी काळी काश्‍मीरनं देशाचं, जगाचं बौद्धिक नेतृत्व केलंय. एक टोकाची भूमिका जेव्हा मांडली जाते तेव्हा समन्वयाचा, सलोख्याचा, शांततेचा विचार जास्त प्रभावीपणे मांडला पाहिजे. त्याची गरज जास्त असते. अशा भावनेतून घुमानमध्ये मराठी साहित्य संमेलन झालं.

१६ वर्षांपूर्वी काश्‍मीरची १०५ मुलं आली. कारगिल युद्धातील ३८ मुलं आमच्याजवळ आली. ती केवळ शिक्षण, नोकरीसाठी आली नाहीत तर, ‘सरहद’ एक कुटुंब झालंय. अशी ही मुलं जेव्हा इथं येऊन विश्वाच्या शांततेसाठी मागणं मागतात, हे खूप सकारात्मक आणि आशावादी आहे. त्यामुळं त्यांची कृती लोकांसमोर यायला पाहिजे. सुदैवानं वारी येत आहे. अशा काळात महाराष्ट्र आणि काश्‍मीरचे ऋणानुबंध दृढ व्हावेत, किंबहुना हिंसाचाराचं केंद्र वाटणाऱ्या काश्‍मीरमधून शांततेचा संदेश जाण्याला मोठा अर्थ आहे, असं मला वाटतं. 

प्रश्न : उत्तर भारतातील संतांच्या कार्याविषयी काय सांगाल?
उत्तर : तेराव्या शतकाच्या प्रारंभी संत नामदेव महाराष्ट्रातून निघून मथुरा, उत्तर भारत, राजस्थान असे फिरत घुमानमध्ये स्थिरावले. घुमान त्या काळात जंगल होतं. आजूबाजूच्या लोकांना मदत करणं, जगण्याचा संदेश देणं असं कार्य संत नामदेवांनी केलं. १४७९ मध्ये गुरुनानक यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माला साडेपाचशे वर्षे या वर्षी पूर्ण होताहेत. संत नामदेवांची प्रचार करण्याची पद्धत होती ती साधं जीवन जगणं, पदांची निर्मिती करणं. एका बाजूला अंधश्रद्धेशी लढा देणं, दुसऱ्या बाजूला देवाचं अस्तित्व मान्य करणं, अशी कोंडी होती. नामदेवांना हे माहीत होतं की, जो सामान्य, गरीब समाज आहे तो देवावर श्रद्धा ठेवतो. त्या श्रद्धा कायम ठेवून अंधश्रद्धेबद्दल लढायला लावणं, प्रसंगी कठोर टीका करायला लावणं, देवाच्या, धर्माच्या नावावर अवडंबर माजविणाऱ्यालासुद्धा बोलणं हे काम संत नामदेवांनी केलं.

घुमानपासून जवळ कर्तारपूर आहे, ज्या ठिकाणी गुरुनानकांनी शीख धर्माचा पाया घातला. दुसऱ्या बाजूला राधास्वामी सत्संग आहे. त्याच्या एका बाजूला कादीयान गाव आहे. अहमदिया पंथ इथं रुजला. या ठिकाणी आज जर आपण गेलो तर भगवद्‌गीता, संस्कृत, रामायण, महाभारत यांच्यावर तिथं काम सुरू असलेलं दिसतं. जगामध्ये जो शांततेचा संदेश आहे तो संत नामदेवांनी प्रभावीपणे दिला. अनेक इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की, शीख धर्म स्थापनेवर संत नामदेवांच्या विचाराचा प्रभाव पडला होता. पंजाबमधील कवी जसवंत जफर यांचं म्हणणं आहे की, शिखांनी जर गुरुपरंपरा मान्य केली असेल तर त्यातले पहिले गुरू गुरुनानकांच्या आधी संत नामदेव आहेत. गुरु गोविंदसिंगांनी युद्धं केली; पण त्यांचा अंतिम काळ महाराष्ट्रात गेला.

महाराष्ट्राशी त्यांचा जो संपर्क होता तो ‘गुरु मानीयो ग्रंथ’ हे अंतिम काळात गुरुगोविंदसिंग यांनी नांदेडमध्ये सांगितलं. यापुढे माझी मूर्तिपूजा नाही करायची, ग्रंथ हेच गुरू आहेत, असा त्याचा अर्थ. त्या ग्रंथसाहेबमध्ये वेगवेगळ्या धर्मांतील संतांची वाणी एकत्र केली आहे. स्वतःचं असं काही सांगितलं नाही. त्यामध्ये संत नामदेवांची सर्वांत जास्त पदं आहेत. त्या खालोखाल छोटी एक किंवा दोन त्रिलोचन आणि परमानंद यांची पदं आहेत. आज जगभर संत नामदेवांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम शीख ग्रंथांनी आणि पंजाबी माणसांनी केलंय. पाकिस्तान, पठाणकोट, जम्मू-काश्‍मीर, अफगाणिस्तान अशी सगळीकडे संत नामदेवांची मंदिरं आहेत. संत नामदेवांना वीसपेक्षा जास्त भाषा अवगत होत्या. नामदेवांना आदरांजली वाहण्यासाठी घुमान बहुभाषा संमेलन सुरू केलं. गेल्या शेकडो वर्षांत देश जोडण्याची जी प्रतीकं आहेत, त्यांचं नेतृत्व संत नामदेवांनी केलं असं म्हटल्यास वावगं होणार नाही. 

प्रश्‍न : महाराष्ट्र आणि काश्‍मीरचं नातं काय आहे?
उत्तर :
 काश्‍मिरी शैविझमचं महाराष्ट्राशी जुनं नातं आहे. अभिनवगुप्ताचे पूर्वज त्र्यंबकेश्‍वरहून काश्‍मीरला गेले, असं संशोधक रा. चिं. ढेरे यांनी त्र्यंबकमठ नावाच्या पुस्तकात लिहिलं आहे. ज्ञानदेवांच्या अमृतानुभवावर शैविझमचा प्रभाव आहे. काश्‍मीरच्या संत कवयित्री लल्लेश्‍वरीनं ज्ञानदेवांच्या भिंत चालवण्याचा उल्लेख केला आहे. मला वाटतं, ज्ञानदेव त्याही काळात काश्‍मीरमध्ये पोचले होते. बौद्धिक विचारांची कृती महाराष्ट्रानं, संत ज्ञानेश्‍वरांनी केली.
संत नामदेव महाराज महाराष्ट्रात पायरीवर असतील; पण आमच्यासाठी ते कळस आहेत, अशी भावना शीख बांधवांनी एकदा माझ्याजवळ व्यक्त केली होती. त्यामुळंच घुमानचं मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी या पंजाबी मंडळींनी प्रचंड मेहनत केली. संत नामदेवांना उत्तर भारतात काय स्थान आहे, हे अनुभवायचं असेल तर मराठी माणसांनी नामदेव ज्या मार्गानं उत्तरेत गेले, त्या मार्गानं एकदा तरी जाऊन यायला पाहिजे.

प्रश्न : तुमचे पुढचे उपक्रम काय आहेत?
उत्तर : ज्या दिवशी ‘सरहद’ची पायाभरणी झाली त्या दिवशी मी भावनेच्या भरात म्हटलं होतं की, जगातली अनाथांसाठीची मोठी संस्था मला उभी करायची आहे. तेव्हा एक माणूस पुढं आला आणि म्हणाला, ‘तुमची इच्छा आहे का लोक अनाथ व्हावेत?’ तेव्हा असं वाटलं की, आपली इच्छा त्या डॉक्‍टरच्या बायकोसारखी असू नये की, डॉक्‍टरचा धंदा किंवा त्याचं हॉस्पिटल मोठं व्हावं यासाठी लोकांनी आजारी पडावं. म्हणून ‘सरहद’ने अशा प्रसंगांमध्ये एका बाजूला पुनर्वसनाचं काम करताना दुसऱ्या बाजूला मुलं, महिला, विधवा भगिनी यांच्यासाठीही काम केलं, जेणेकरून समस्येची तीव्रता कमी होईल. समस्येवर मुळापासून तोडगा निघेल.

एका बाजूला साहित्य, भाषा, संस्कृती, नाट्य यांच्याद्वारे परिवर्तन आणि त्याचबरोबर ही व्यवस्था बदलण्यावर आपण प्रभाव पाडला पाहिजे. हा संदेश फक्त आपण देऊन चालणार नाही, तर तो जगभरात नेण्यासाठी ‘सरहद’नं पुढाकार घ्यायचं ठरवलंय. घुमानमध्ये आम्ही भाषा केंद्र उभं करतोय. ज्या पुलवामामध्ये दहशतवादी कारवाया जास्त आहेत, तिथं आम्ही पुस्तकांचं गाव करतोय. तिथं काश्‍मिरी म्युझियम, ॲम्पिथिएटर उभं करतोय. अशा छोट्या छोट्या कृतीतून काश्‍मीर आणि देश जोडला जाईल. अशा अनेक प्रयत्नांनी हे कार्य होणार आहे; पण यामध्ये खारीचा वाटा आपला असला पाहिजे, असा आमचा हेतू आहे. आपण त्या रवींद्रनाथ टागोरांच्या गोष्टीप्रमाणं एकदा रात्र झाल्यावर ज्याप्रमाणे अंधारात आता सूर्य उगवणार नाही असं जेव्हा कळतं; तेव्हा सगळे म्हणतात आता काय होईल? तेव्हा एक पणती पुढं येते. ती म्हणते, मला माहितीये की अंधार मोठा आहे. मला हेपण माहिती आहे, की मी सूर्याची जागा घेऊ शकत नाही. पण मी किमान माझ्या भोवतीचा अंधार दूर करू शकते. अशा पणतीचं काम आपण केलं पाहिजे. अशा शेकडो पणत्यांनी एकत्र यायला पाहिजे.

संतांची जी परंपरा आहे त्यांच्या शिकवणीतून समाजात सौहार्द पेरूया. काश्‍मिरी मुलगी जर पसायदान गात असेल, तर त्यातून काश्‍मीर आणि महाराष्ट्राच्या नात्याचं पुनरुज्जीवन होत असेल, तर कधी काळी देशाचं बौद्धिक नेतृत्व करणारा काश्‍मीर आणि आता जगाचं बौद्धिक नेतृत्व करण्याची क्षमता असणारा महाराष्ट्र, पंजाब एकत्र आलो तर विश्‍वशांततेची मोठी चळवळ आपण उभी करू शकतो, याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही.

पसायदान गाणारी काश्मिरी मुस्लीम मुलगी शमीमा अख्तर...
https://youtu.be/CS98wJia5t8


संजय नहार यांची मुलाखत

No comments:

Post a Comment