'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Sunday, 10 October 2021

सेवा 'विठाई'ची...



आषाढी वारीला निघालेल्या वारकऱ्यांना कुणी फराळ देतं, कुणी पायताण सांधून देतं, कुणी दाढी करून देतं, कुणी मुक्कामाला जागा देतं... प्रेम-बंधुभावाचा विचार जागवत वाटचाल करणाऱ्या या वारकऱ्यांची आपल्या हातून काही ना काही सेवा घडावी, अशी सगळ्यांचीच धडपड असते.

अशीच धडपड पत्रकारितेत आल्यापासून मी दरवर्षी केली. 'सकाळ ऍग्रोवन'मध्ये असताना पायी आषाढी वारीचं रिपोर्टिंग केलं. 'मुंबई महाराष्ट्र टाइम्स'मध्ये असताना आषाढी विशेषांकात सहभाग घेतला. 'आयबीएन-लोकमत'मध्ये असताना 'भेटी लागी जीवा' हा प्रोग्रॅम सुरू करण्यात पुढाकार घेतला. मराठी न्यूज चॅनेल्सनी वारीसाठी अर्धा तास देण्याची ती सुरुवात होती.

त्यानंतर चॅनेल्समध्ये तो पायंडाच पडला. 'मी मराठी' चॅनेलमध्ये असताना 'महिला संत, मुस्लिम संत' असे वेगळे प्रोग्रॅम दिले. तिथं असतानाच 'रिंगण' आषाढी विशेषांक सुरू केला. 'कलर्स मराठी' वाहिनीवर वारकरी संगीतावर सलग 18 दिवस कार्यक्रम सादर केला. काहीच नाही जमलं तेव्हा वारीच्या निमित्ताने न्यूज चॅनेल्सवर 'गेस्ट' म्हणून संत परंपरेचं विवेचन केलं.  ब्लॉग लिहिला, फेसबुक, यू ट्यूबसाठी व्हिडिओ केले.

'विठाई'च्या पहिल्या (2018) अंकाचे प्रकाशन.
2018 मध्ये पुन्हा 'सकाळ' परिवारात दाखल झालो. वारीच्या निमित्तानं 'सकाळ'कडून दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मी आषाढी अंकाची संकल्पना मांडली. म्हणजे दिवाळी अंकाप्रमाणे पंढरपूरच्या दर आषाढी वारीच्या वेळी वारी आणि संतसाहित्याला वाहून घेतलेला विशेषांक प्रसिद्ध करायचा. ही कल्पना मान्य झाली आणि राज्यभरातल्या सहकाऱ्यांनी पूर्णत्त्वास नेली. पालख्या पुण्यात असताना वारकऱ्यांच्या हस्ते 'सकाळ'मध्येच एका छोट्या कार्यक्रमात अंकाचं प्रकाशन झालं. कॉफी टेबल स्वरुपातला हा अंक फारच देखणा झाला. त्यात भाषा संशोधक गणेश देवींपासून ते भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक प्रकाश आंबेडकर आदिंनी लिहिलं. 
या पहिल्या अंकासाठी मी लिहिलेलं हे संपादकीय - 

विठ्ठला, माय-बापा!
कमरेवर हात ठेवून उभ्या विश्वाकडं मायेनं पाहणारी विठो-रुख्माय पाहिल्यावर आई-वडील आठवतात. अठ्ठावीस युगे उभ्या राहिलेल्या या वात्सल्यमूर्तीचं दर्शन होताच मन भरून येतं. डोळे झरू लागतात. हृदय शांतता आणि करुणेनं काठोकाठ भरल्याची भावना तुडुंब होते.
आषाढाचे ढग आभाळात जमू लागताच महाष्ट्रातल्या हजारो वाटा 'आपुल्या माहेरा' पंढरीकडे चालू लागतात. चिंता, दुःखाची गाठोडी पाठीवर टाकून वारीच्या वाटेवर आनंदाच्या दशम्या सोडल्या जातात. 'खेळीमेळी, आनंदे' वाटचाल केल्यानंतर पंढरपुरात माय-बापाचं दर्शन होतं आणि 'भाग गेला, शीण गेला अवघा जाहला आनंद' अशी अवस्था होते.
या अनोख्या वात्सल्यभक्तीची जगभरात उत्सुकता आहे. ओबडधोबड काळ्या दगडाचा, हातात कुठलंही  शस्त्र नसलेला, कष्टकरी, गोरगरीबालाही पायावर डोकं ठेवू देणारा हा देव म्हणजे एक विचार आहे. हा विचार आहे, समतेचा, बंधुभावाचा. आपल्या कामात आणि संसारातच देव शोधण्याचा!

मुळात विठोबा पंढरपुरात आला तोच भक्त पुंडलिकाला भेटायला. त्यावेळी पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करत होता. तोपर्यंत त्यानं देवायला थांबायला सांगितलं. उभं राहायला वीट दिली. माझ्यापेक्षा याला आपले आई-बाप प्रिय आहेत म्हणून देव कोपला नाही, उलट प्रसन्न झाला. आणि पुंडलिकाची विनंती मान्य करून भक्तांसाठी अठ्ठावीस युगे चंद्रभागेतटी उभा राहिला. पंढरपुरात गेल्यावर चंद्रभागेत स्नान करून पहिल्यांदा भक्त पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं आणि मग देवाच्या पायावर डोकं ठेवायचं, हा वारकऱ्यांचा नेम. तो अत्यंत समजून-उमजून केलेला आहे. म्हणजे आपण आपल्या संसारात, मुलाबाळांमध्ये रमलो, आई-वडिलांची सेवा केली तर, त्यांच्यातच आपला विठोबा असतो, ही संतांची शिकवण निरक्षर वारकऱ्यालाही पक्की ठाऊक असते. ती त्याने अंगी बाणवलेली असते.
अलिकडच्या काळात संत गाडगेबाबा, तुकडोजीबाबा यांनीही हीच संतांची शिकवण वारंवार सांगितली.
जीवाभावानं जवा मी पाहिलं
माझं गावच मंदिर शोभलं
विठ्ठल-रखुमाई घरी दारी
पुंडलिक ही मुले गोजिरी
त्यांना सेवेचं फूल मी वाहिलं...
असं तुकडोजी महाराज एका अभंगात म्हणतात.

या संतविचारांनी महाराष्ट्र घडविला आहे. याच विचारांना पुन्हा उजाळा मिळावा यासाठी 'सकाळ' आणि 'फिनोलेक्स केबल्स'ने यंदा #saathchal अर्थात 'वारी विठुरायाची अन्‌ आई-वडिलांच्या संगोपनाची' ही संकल्पना राबविली आहे. आषाढी वारीला निघालेल्या आई-वडिलांसोबत काही पावलं चालायची आणि त्यांच्या संगोपनाची शपथ घ्यायची, असा हा उपक्रम. आपण सगळेजण वारीच्या या समता आणि ममतेच्या प्रवाहात एकरूप होऊया. आपल्या वाडवडिलांची थोर परंपरा पुढं नेऊया.

माउलींच्या आळंदी परिसरात उगम पावून ज्ञानोपासना आणि लोकसेवेचा वसा घेतलेला 'सकाळ' यंदापासून आषाढी विशेषांक प्रसिद्ध करत आहे. वारकरी विचारांचे पाईक असल्याची ग्वाही यानिमित्तानं आम्ही देत आहोत. त्याचं तुम्ही स्वागत कराल, याची खात्री आहेच. मग, बोला पुंडलिक वर दे हरी विठ्ठल...

'विठाई'च्या दुसऱ्या (2019) अंकाचे प्रकाशन.
२०१९च्या प्रिंट अंकासोबतच मी डिजिटल अंकाचीही सुरुवात केली. संकल्पना होती, 'सलोख्याची वारी.' म्हणजे या वारीनं सर्व जातीधर्मातील, समाजातील सर्व स्तरांतील लोकांना कसं सामावून घेतलं आहे, याचा 'रिपोर्ताज'च्या माध्यमातून शोध घेणं. हे रिपोर्ताज जसे अंकासाठी लिहिले गेले, तसे त्यांचे डिजिटलसाठी व्हिडिओही बनविले गेले. मुलाखती घेतल्या गेल्या. ही दोन्हीही कामं एकहाती करणं हा सुखद अनुभव होता. या अंकासाठी लिहिलेलं हे संपादकीय...

सलोख्याची वारी

माणसं उठता-बसता, बोलता-चालता, खाता-पिता, वेळी-अवेळी मोबाईल बघत बसलेली दिसतात. एकमेकांशी न बोलणारी ही माणसं सोशल मीडियासारख्या व्हर्च्युअल जगात व्यक्त होतात, तेही मिळणाऱ्या माहितीची खातरजमा न करता. मग हळूहळू परस्परांमध्ये अकारण द्वेषाच्या भिंती उभ्या राहू राहतात.

आपण सारे एक आहोत. अनादी कालापासून संवाद साधत, एकमेकांना मदत करत आनंदानं इथं राहत आहोत, हेच आपण विसरू लागलो आहोत. परस्पर द्वेश पसरविण्याचं व्यासपीठ होऊ पाहत असलेला सोशल मीडिया हे एक छोटं उदाहरण. असे प्रयत्न इतर अनेक गोष्टींमधूनही होताना दिसतात. पण, इतिहास असा आहे, की त्याला इथला निकोप समाज कधीच बळी पडलेला नाही. किती बलाढ्य राजवटी आल्या आणि गेल्या. इथला समाज एकसंधच राहिला. एकोप्याची वीण कधीच उसवली नाही. ही वीण घट्ट करण्याचं काम संतांनी केलं. त्यांच्या विचारांचा जागर करणं म्हणजे पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची वारी.

ही वारी म्हणजे इथं नांदत असलेल्या हजारो वर्षांच्या बंधुभावाचं चालतं-बोलतं उदाहरण. वारीच्या रुपानं ही बंधुभावाची चंद्रभागा आपल्याला पंढरपुराच्या दिशेनं वाहताना दिसते. परंतु तिला येऊन मिळणारे सलोख्याचे झरे हे गावागावांतून आलेले असतात. या झऱ्यांचा उगम शोधण्याचा प्रयत्न म्हणजे ही #वारी_सलोख्याची विशेषांक. सकाळ माध्यम समूहाच्या या आषाढी वारी विशेषांकात आपल्याला महाराष्ट्रभरातील अशा अनोख्या सलोख्याच्या ठिकाणांची माहिती मिळेल.

जी ठिकाणं माहितीच्या जगापासून दूर किंवा दुर्लक्षित आहेत. उदाहरणार्थ औरंगाबादमधले निपट निरंजनबाबा खुद्द आलमगीर औरंगजेबाला त्याच्या अनैतिक वागणुकीबद्दल रोखठोक भाषेत सुनावतात, शेजारच्या दौलताबाद किल्ल्यावरील चाँद बोधले जनार्दन स्वामींच्या माध्यमातून संत एकनाथांना समाज एकसंध राखण्याचा संदेश देतात, रोज सायंकाळी साडेसात वाजता आळंदीच्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात जो नगारा वाजतो, त्याला निधी देण्याची व्यवस्था हैद्राबादच्या निजामानं करून ठेवलेली आहे.

सांगलीच्या इस्लामपुरात संभुअप्पा-बुवाफन मठामध्ये पंढरपुरात वारकरी भरवतात तसाच सर्व जात, धर्मियांचा गोपाळकाला भरवला जातो. महाराष्ट्रातील अशी कितीतरी सलोख्याची ठिकाणं या अंकात आपल्याला वाचायला मिळतील. आणि ‘सकाळ’च्या सोशल मीडियावर #वारी_सलोख्याची या हॅशटॅगवर पाहायला-ऐकायलाही मिळतील. आपणही या सलोख्याच्या वारीत सहभागी व्हा आणि बंधुभावाचा अखंड धागा बना, याच आषाढी वारीच्या शुभेच्छा.


विठाई - 2019 - #वारी_सलोख्याची या विशेषांकात काय काय आहे?

https://www.youtube.com/watch?v=O2cUfH4f8MY


विठाई - 2019 - #वारी_सलोख्याची या विशेषांकाचे प्रकाशन - 

https://www.youtube.com/watch?v=4892sotG1No

No comments:

Post a Comment