'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Saturday 16 October 2021

होय होय वारकरी...

आई गेली त्याला वर्ष होतंय परवा. तिच्या पाठोपाठ नाना गेले. अचानकच. कोरोनाचं निमित्त. त्यांच्याशिवाय काहीच सुचलं नाही वर्षभर. अजूनही सुचत नाहीये. आईची रोजची आठवण म्हणून चहा घेणं सोडलं. नानांची आठवण म्हणून जेवणात वरून मीठ खाणं सोडलं. लेखक म्हणून स्वत:चं लिहिताना वडिलांच्या नावासोबत आईचंही नाव लिहायचं ठरवलं.. श्रीरंग सुभद्रा निवृत्ती! हा काळ म्हणजे मानसिक पातळीवर पुनर्जन्मच म्हणायचा, एवढा मानवी स्वभावांचा अनुभव घेतला!

'थिंक पॉझिटव्ह'चे संपादक यमाजी मालकरांनी आषाढी वारी विशेषांकात लिहायला सांगितलं तेव्हा साहजिकच हातून सारांशानं का होईना आई-नानांविषयी लिहिलं गेलं. तोच हा लेख...



होय होय वारकरी। पाहे पाहे रे पंढरी।।

असा संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे.

मृगाची चाहूल लागली की, पावशा पक्षी 'पेर्ते व्हा, पेर्ते व्हा' म्हणजे पेरण्या करा, असं शेतकऱ्यांना ओरडून सांगत राहतो. तशीच आषाढीची चाहूल लागली, की शेतातली पेरणी आटोपलेल्या शेतकऱ्यांना आता 'वारकरी व्हा, वारकरी व्हा. माणुसकी पेरण्यासाठी पंढरीच्या वाटेला लागा, असं आवाहन तुकोबाराय या अभंगातून करतात.

वारकरी होणं म्हणजे केवळ पांढरे कपडे, गळ्यात तुळशीमाळ, भाळी अबीरबुक्का, खांद्यावर पताका, हाती टाळ घेऊन पंढरीची वाटचाल करणे नव्हे. तर, वारकरी होणं म्हणजे भला माणूस होणं. चांगुलपणा जपणं. अहंकार सोडून देणं. इतरांसोबत प्रेमानं वागणं. वाईट मार्गाला न जाणं. दुसऱ्यांना मदत करणं आणि मानवतेच्या वाटेवर सर्वांना सोबत घेणं.., आणि हेच सर्व संतांना अभिप्रेत आहे.

तरीही प्रश्न उरतातच. काहीसं अवघड वाटणारं संतांचं ओवीबद्ध साहित्य निरक्षर शेतकरी-वारकऱ्यांचं तोंडपाठ कसं असतं? वारीच्या वाटेवर ते सुख-दु:ख कसं विसरतात? वारीमध्ये ठीक आहे, पण एरवी वर्षभर ते कसे राहतात, वागतात? याची मला सापडलेली काही उत्तरं सांगतो. पुस्तकातली नाहीत, मी अनुभवलेली. माझ्या घरातली...

वडील वारकरी होते माझे. म्हणजे कीर्तनकार बुवा म्हणूनच ओळखायचे लोक त्यांना. फार देखणे दिसायचे. गोरेपान. उंच. शुभ्र फेटा, धोतर शोभावे तर त्यांनाच. त्यांच्यामुळं घरात वातावरण कायम देहू-आळंदी-पंढरीच्या वारीचं असायचं. म्हणजे रोजची जगण्याची, शेतीभातीची कामधामं सुरूच असायची, पण त्या सगळ्यात आपण वारकरी आहोत, याची जाणीव सतत असायची. मला वडील नेहमी अनोळखी वाटायचे. कारण ते सतत लोकांमध्ये, भजना- कीर्तनात असायचे. जलाशयात दुरून एखादा डौलदार हंस दिसावा तसे. कीर्तनात उंच मान करून आलाप घ्यायचे, थयथय नाचायचे. लोक त्यांना हार घालायचे. पाया पडायचे. त्यामुळे ते त्या लोकांचेच आहेत असं वाटत राहायचं.

  अगदी अलिकडं मी आईला चिडवायचोही. आई त्यांना आपल्याला किती मुलं आहेत हे  तरी आठवत असेल का गं? त्यातही मी सगळ्यात धाकटा त्यांच्या लक्षात असेन का?... ज्ञानोबा माऊलींनी एके ठिकाणी असं म्हटलं आहे की,  कासवी आपल्या पिल्लांवर नजरेनंच माया करते. तसंच मला त्यांच्याबद्दल वाटायचं. त्यांचा प्रपंच आणि परमार्थ एकरुप झाला होता. म्हणजे वारीहून आले, की थेट शेतात दिसायचे. जेवढे तिथं तल्लीन व्हायचे, तेवढे शेतात रमलेले दिसायचे. लोक म्हणायचे तुकाराम महाराज आणि आवलीसारखा संसार आहे यांचा.

सगळी भावंडं त्यांच्या कीर्तन, भजनात सहभागी व्हायची. मी मात्र दुरूनच राहायचो. मला ते ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथा भजन, कीर्तनाचा कंटाळा यायचा. मला आत्ता आश्चर्य वाटतंय, ते म्हणजे वडिलांनीही यासाठी मला कधीच आग्रह केला नाही. कुणी तरी विचारलं होतं त्यांना त्याबद्दल, म्हणजे त्यांचा वारसा वगैरे. तर म्हणाले, 'माझा आग्रह नाही. माझ्या मुलांनी शिक्षण घ्यावं, शहाणं व्हावं. त्यांच्या बुद्धीला पटलं तर करतीलही मी करतोय ते..' आत्ता मला हे थोर वाटतंय. तथागत बुद्ध म्हणाले होते तसा, 'अत्त दीप भव' म्हणजे त्यांच्या अंतरीचा ज्ञानदिवा उजळलेला होता. मुलांच्याही मनात तो उजळेलच, असा त्यांना विश्वास होता. संत तुकाराम महाराज ज्या बौद्ध गुंफांमध्ये ध्यान-चिंतनाला बसत तिथं म्हणजे देहूशेजारच्या भामचंद्र डोंगरावर एकांतात जाऊन वडील तुकोबारायांचं चिंतन करत. साहजिकच तुकोबारायांचं बौद्ध चिंतन त्यांच्या मनात पाझरलं असावा. पण या मूळ विचारांचा झरा त्यांच्या वडिलांमध्ये होता. त्यांच्या वडिलांचा म्हणजे माझ्या आजोबांचा, ज्यांचं नावही तुकाराम होतं. त्यांचा तुकोबांचा अभंग गाथा पाठ होता. वडील सांगत, आजोबा तुकोबांचे अभंग सुंदर खड्या आवाजात म्हणायचे. त्यांनी आपल्या एका मुलीचं नाव भिकाबाई ठेवलं होतं. तिला बौद्ध लेण्यांच्या परिसरात म्हणजे जुन्नरच्या नाणेघाट रस्त्यावरच्या एका गावात दिलं होतं. जावयाचं नाव भिकोबा. म्हणजे बौद्ध भिख्खू आणि भिख्खुणी!

आजोबांची गोष्ट भन्नाटच आहे. थोडक्यात सांगतो. साडेसहा फुटी आडदांड माणूस. शरीराप्रमाणं स्वभावातही दांडगाई. मोठं कटुंब. घरात, शेतात लक्ष्मी नांदत होती. त्यांच्या आईनं खंडोबाला आणि विठोबाला नवस केला. दोन मुलं झाली. एकाच कुटंबात मग खंडोबा आणि विठ्ठलभक्ती सुरू झाली. एका घरात बेलभंडार, तर दुसऱ्या घरात अबीर बुक्का. एकीकडं मांसाहार तर, दुसरीकडं शुद्ध शाकाहार. पण दोन्ही भावांचा मोठा एकविचार. पंढरपूरच्या वाटेवर जेजुरीला माऊलींची पालखी थांबायची. तिथं खंडोबाचा येळकोट म्हणत दोघे भंडार-अबीरबुक्का उधळायचे. समाजाचं कारभारपण या कर्तृत्त्ववान भावांकडं होतं. एकदा समाजाच्या पैशांच्या हिशेबात काही तरी घोळ झाल्याची शंका आली अन् बंधुप्रेमात मीठाचा खडा पडला. वारीहून आल्यावर उभा वाद उभा राहिला. एका भल्या सकाळी गडी मोठे सोटे घेऊन आजोबाला शोधत आले. सुगावा लागताच ते पसार झाले आणि मारेकऱ्यांच्या हाती सापडली माझी आजी. एकामागोमाग एक घाव पडले आणि तिनं जागेवरच 'राम कृष्ण हरी' म्हटलं. दिवस होता दसऱ्याचा!

तिथून पुढं कोर्टकचेऱ्या झाल्या. तिघांना फाशीची शिक्षा होणार हे नक्की झालं. पण आजोबांनी पुण्याच्या कोर्टातही दांडगाई केली. ते कोर्टालाच उलटंपालटं बोलले. झालं, मारेकऱ्यांची फाशीची शिक्षा काळ्या पाण्यावर आली. लोक म्हणाले, वेडेपणा केला या माणसानं. मारेकऱ्यांना पापाची शिक्षा मिळाली असती. आजोबा शांतपणे घरी आले. शेतमळा फिरले. बैल सोडून दिले आणि मग परागंदाच झाले. कायमचे. मला वाटतं त्यांच्या मनातला सूडाचा वणवा तुकोबांचा गाथ्याने विझवला...

आजोबांच्या मागं वडिलांच्या रुपानं कुटुंबात एकच मोड राहिला. त्याचा सांभाळ बहिणीनं तिच्या सासरी केला. तरूण झाल्यावर वडील पुन्हा आपल्या गावी, शेतमळ्यात परतले. खरं तर आता हिंदी सिनेमातल्याप्रमाणं 'बदले की आग' भडकायला पाहिजे होती. 'खून का बदला खून से' घ्यायला पाहिजे होता. पण इथंही तुकोबा आड आले. कसे? तर लहानपणी वडील बहिणीच्या घरची गुरं राखत होते भामचंद्र डोेंगराच्या पायथ्याशी. वाटेनं डोक्यावर लाकडी पेटारा घेऊन चाललेला एक माणूस या गुराखी पोराला पाहून थांबला. त्याची विचारपूस केली. त्याला आपला पेटारा उघडून दाखवला. त्यात होते अनेक ग्रंथ. सांगितलं, हे तुकाराम चरित्र वर डोंगरावर जाऊन तुकोबारायांच्या गुहेत जाऊन नित्यनेमानं वाच. तुझं आयुष्य मार्गी लागेल. त्याप्रमाणं वडील डोंगरावर जाऊ लागले. तुकोबांचा त्यांना लळा लागला. एका वर्षी परिसरातल्या वारकऱ्यांसोबत ते पंढरीला गेले आणि मग जातच राहिले.

दुसरीकडं संसारही सुरू झाला. 'मनात सूडाची भावना ठेवायची नाही. क्रोध माणसाला संपवतो..' असे अभंगांतून समजलेले तुकोबारायांचे विचार वडील माझ्या निरक्षर आईला सांगत राहायचे. आई ते तिच्या भाषेत आम्हाला सांगायची. म्हणजे शाळेत कुणाशी भांडणं करू नको म्हणायची. शाळेतून आल्यावर कुणाशी भांडला तर नाहीस ना, विचारत खात्री करायची. आता संत साहित्यातलं तत्त्वज्ञान समजून घेताना लक्षात येतंय, आजोबा कोर्टात तसे का वागले ते. आपला तर संसार संपलाच आहे. आता किमान भावाचा तरी वेलविस्तार खुंटू नये, या भावनेनं त्यांनी स्वत:हून तो सूडाचा प्रवास संपवला. आपल्या वागण्यातून त्यांनी माणूसपणा पेरला, जो वडिलांच्या रुपानं पुन्हा उगवून आला.

पहाटेच उठून वडील आईसोबत जे बोलत बसायचे ते समजायचं नाही. पण आई आम्हाला ते रोजचं काम करता करता सोप्या पद्धतीनं समजून सांगायची. फार छोट्या छोट्या नैतिक गोष्टी होत्या त्या. आईनं प्रचंड गरीबीत संसार केला. पण आम्हाला सांगायची, 'आपल्याला कुणाचं सोनं रस्त्यात पडलेलं असलं तरी नको. आपली कष्टाची भाजीभाकरीच बरी'... 'तिनं सोने रुपे आम्हा मृत्तिकेसमान' हा संत तुकाराम महाराजांचा अभंग समजून घेतलेला होता. त्यामागची संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवरायांची गोष्ट ऐकलेली होती. शिवरायांनी एकदा गरीबीनं गांजलेल्या तुकोबारायांना सोन्यानाण्याचा नजराणा पाठवला होता. पण तुकोबारायांनी तो नम्रपणे नाकारला होता.

वडील वारीला गेले की, महिनाभर काहीच निरोप बातमी नसे. कधी तरी रात्री मुसळधार पावसात भिजत ते येत. त्यांनी दार वाजविण्याअगोदर आईला त्यांची चाहूल लागत असे. झोपेतच आम्ही त्यांच्या पायावर डोके ठेवत असू. दुसऱ्या दिवशी सकाळीच अधीरपणे त्यांची पडशी उघडायची. त्यात पंढरपुरातून आणलेल्या लाह्या-बत्तासं, एखादं खेळणं, बहिणींसाठी लाखेच्या बांगड्या असा आनंददायी ऐवज असायचा. आमचं घर शेतमळ्यात होतं. त्यामुळं शेताकडं येणारा प्रत्येक माणूस पंढरपूरचा लाह्यांचा प्रसाद घेऊन जायचा.

दुसऱ्या दिवसापासून वडिलांचं शेतात काम सुरू व्हायचं. महिनाभर पाऊस झाल्यामुळं शेतात तण आणि बांधावर गवत माजलेलं असायचं. भल्या पहाटेच ते शेतात जायचे. धोतराचा काचा मारून, डोक्यावर घोंगतं घेऊन गवत कापत बसायचे. दिवस उगवता आम्ही उठून पाहायचो तो उंच हिरव्या गवताच्या बऱ्याचशा पेंढ्या आणून त्यांनी गोठ्यात रचून ठेवलेल्या असायच्या. काही म्हशीपुढं टाकलेल्या असत. ते ताजं हिरवं गवत खाताना म्हशीचे डोळे लकाकताना दिसत. गवत तळापासून एकसारखं कापल्यानं बांधावरून छान वाट तयार झालेली असायची. अत्यंत एकाग्र होऊन वडील काम करायचे. मला त्यांचं फार आश्चर्य वाटायचं. म्हणजे कीर्तनात ते जेवढे तल्लीन होऊन गायचे तेवढेच एकरूप होऊन शेतात काम करायचे. मी त्यांच्या हालचाली निरखत बसायचो.

पेरणीपासून पीक काढणीपर्यंत ते शेतातली सगळी कामं करत. मी हायस्कूलला जाऊ लागलो. त्यांना कामात कधीमधी मदत करू लागलो. त्यांच्या लक्षात आलं की शेतात वाफे करणं, पाणी देणं हे काम हा सफाईनं करू शकतो. मग मला कंटाळा येईपर्यंत ते माझ्याकडून काम करवून घेत. मला ओला हरभरा आणि भुईमुगाच्या ओल्या शेंगा प्रचंड आवडायच्या. म्हणून की काय इतर पिकांसोबत ते हरभरा, भुईमूग हमखास पेरायचे. हरभऱ्याला घाटे आणि भुईमुगाला शेंगा येईपर्यंत मला कळ निघत नसे. त्या आल्या की हावरटासारखं भारेच उपटून आणायचो. त्यावर आई म्हणायची एवढं कशाला आणलं, तुझे वडील ओरडतील आता. पण या गोष्टीवरून ते मला कधीही ओरडले नाहीत. 

शेतातल्या कामांतून वेळ मिळाला की ते खोरं, टिकाव, कुदळ, कुऱ्हाड आदींसाठी दांडे बनवायचे. भेंडीचं वगैरे एक चांगलंसं लाकूड आणून ते त्याला काचेच्या तुकड्यानं साळत बसायचे. शिसपेन्सील तासल्यासारखी त्यातून निघालेली वर्तुळं मी खेळायला घ्यायचो. हे काम करताना ते सुंदर शीळ घालत असायचे. अभंगाची एखादी चाल गुणगुणत असायचे. गंमत सांगतो, त्यांच्या त्या सगळ्या पारंपरिक चाली माझ्या लक्षात आहेत. मी त्या अजूनही म्हणून दाखवू शकतो. असेच पंढरपूरहून आणलेले नवीन काशाचे टाळ वाजवून बघून ते त्यांच्या जोड्या जुळवून ठेवत.

एक दिवस मी शाळेतून हुंदडत घरी येत असताना ओढ्याकाठच्या झाडीतून सुंदर पावा ऐकू आला. त्यासोबत आमच्या म्हशीच्या गळ्यातल्या घंटेचा ओळखीचा आवाज. पाहतो तर वडील. बासरीसारखं काही तरी वेगळंच वाद्य ते वाजवत होते. मला खूपच आश्चर्य वाटलं. मी पळत घरी जाऊन आईला सांगितलं. तर ती म्हणाली अरे ते अलगूज आहे, त्यांनी हातानं बनवलंय.वडील आणि मी आम्ही दोघेजण एकदा गावातून घरी चालत येत असताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. मी जोरात धावत सुटलो. शाळेत मी पळण्यात सर्व पोरांमध्ये सरस होतो. पण माझ्या सरसपणाला त्यांनी टाचणीच लावली. गंमतीने पण असे काही जोरात धावले की क्षणात पुढं निघून गेले. घरी येऊन मी आईला सांगितलं तर ती म्हणाली, अरे हे तर काहीच नाही. ते शर्यतीच्या बैलगाड्यांपुढं धावायचे... असंच मी त्यांना विहीरीत सफाईनं पोहताना पाहिलं. मी पुढं चांगला पोहणारा झालो पण, मला त्यांच्यासारखं सफाईदार कधीच पोहता आलं नाही.

सकाळी वडील अंघोळ करून बराच वेळ चालणारी देवपूजा करायला घ्यायचे. ग्रंथ वाचन हा देवपूजेतील मुख्य भाग. देवांना आणि स्वत:ला गंध लावायचा. मी शेजारी बसलो असेन, तर माझ्याही कपाळाला गंध लावायचे. गंध लावताना काही क्षण माझ्या नाकाला त्यांचा तळहात टेकायचा. त्याला चंदनाचा मंद गंध असे. अजूनही तो माझ्या नाकाला जाणवतो आहे. मग ग्रंथ वाचायला घेत. वाचण्यापूर्वी तो मनोभावे माथ्याला लावत. वाचन झाल्यावर पुन्हा माथ्याला लावून वंदन करत. मग पद्धतशीरपणे ग्रंथ केशरी कापडात गुंडाळून ठेवत. पोथी म्हणजे एकत्र असलेले तीन-चार ग्रंथ. त्यात प्रामुख्याने असे ज्ञानेश्वरी! पोषाख करून बाहेर पडताना 'माझी पोथीची पिशवी दे गं' असं ते म्हणाले की, समजायचे ते आज मुक्कामी घरी येणार नाहीत. कारण पोथी वाचल्याशिवाय ते जेवायचे नाहीत.

अखंड हरिनाम सप्ताहात पहाटेच्या काकड्यापासून ते रात्री उशीराच्या भजन जागरापर्यंत सोबतीला कुणी असो नसो. त्यांचा नित्यनेम चुकायचा नाही. ते उत्तम गायचे. टाळ, वीणा, पखवाज, पेटी वाजवायचे. त्यामुळं कीर्तनात जिथं कमी तिथं उभे राहायचे. वर्षातले काही ठिकाणचे त्यांचे कीर्तनाचे कार्यक्रम ठरलेले असायचे. मग गावातलं रामजन्माचं कीर्तन असो की, खेडच्या पोलीसस्टेशनमधील दत्तजयंतीचं. दरवर्षी न चुकता जायचे. बऱ्याचदा कीर्तनाची पूर्वतयारी म्हणून ग्रंथ चाळत बसलेले दिसायचे. दोन-तीन वर्षांपूर्वी एका दर्ग्यात कीर्तन होतं. त्यापूर्वी माझ्याकडं कोल्हापूरला आले होते. माझ्याकडं असलेलं रा. चिं. ढेरेंचं मुस्लिम संतांवरचं पुस्तक त्यांनी वाचून कीर्तनासाठी मुद्दे काढून ठेवले होते.पत्रकार म्हणून एकदा मी पंढरीचा वारी कव्हर करायला गेलो होतो. तेव्हा मी त्यांना दुरून पाहिलं. वय झालं होतं. पण ते इतर वारकऱ्यांसोबत टाळ मृदंगाच्या गजरात भजन म्हणत, हसत रस्त्यातील एका उतारावरून हळू हळू धावत होते. हीच ती उताराची जागा जिथून पंढरपूरच्या मंदिराचे कळस दिसल्यानं न राहवून तुकोबाराय धावत सुटले होते. वारकरी त्याच आवेगानं इथून दरवर्षी धावत सुटतात.

त्यांनी भावंडांनाही भजनं शिकवली होती आणि मला पेटी वाजवायला. त्यामुळं मी शाळेच्या भजनमंडळाचा म्होरक्या झालो होतो.आणखी एक, वारीला गेल्यावर ते बऱ्याचदा सोबत कुणाला तरी घेऊन येत. म्हणजे एखादा अनाथ किंवा संसाराला कंटाळलेला, नदीच्या घाटावर विमनस्क बसलेला... त्याचे खाण्यापिण्याचे हाल होऊ नयेत म्हणून ते त्याला घेऊन घरी येत. मग तो अनोळखी माणूस घरचाच होऊन जाई. पुन्हा त्याला घेऊन वारीला जात. मग तो तिकडेच गायब होई.

शूचिर्भूत होऊन गंध टिळा लावलेले, स्वच्छ टापटीप कपडे घातलेले, अस्खलित आणि रसाळ प्रवचन करणारे प्रवचन, कीर्तनकार पाहून भोळेभाबडे कष्टकरी वारकरी बुजतात. त्यांच्या ज्ञानाचा आदर करत त्यांना नमस्कार करतात. ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत, असं त्यांना वाटतं. पण माऊलींनी दाखवलेल्या समतेच्या वाटेवर सगळ्यांना सारखाच अधिकार. तिथं कुणीच लहान-थोर नाही. म्हणून वडील सोबतच्या गबाळ्या दिसणाऱ्या माणसाकडं वीणा द्यायचे. त्याला टाळ वाजवायला, गायला, वाचायला शिकवायचे. कधी अचानक त्याच्यासमोर ज्ञानेश्वरी ठेवायचे आणि लोकांसमोर प्रवचन करायला सांगायचे. अशी कितीतरी माणसं मी पाहिलीत, ज्यांना वडिलांनी आत्मविश्वास दिला. धीट केलं. त्यामुळं ती प्रवचन, कीर्तन करू लागलीत. असंच तमाशातल्या माणसांबाबत. तमाशातली माणसं कीर्तनात, वारीत आणण्याची किमया त्यांनी केली. ही माणसं कशाला कीर्तनात म्हणून काही मंडळी नाक मुरडायची. पण तमाशात ढोलकी वाजवणारा वडिलांच्या कीर्तनात मृदंग वाजवायचा. तुणतुणं वाजवणारा हाती वीणा घ्यायचा. लावणीचे झीलकरी टाळकरी व्हायचे. स्टेजवर गणगवळण म्हणणारे फार उत्तम भजन गायचे. ही सगळी मंडळी वडिलांचे जीवलग सोबती बनले. वडिलांनी त्यांना प्रतिष्ठेनं वागवलं. कीर्तना-भजनात त्यांनी महिलांनाही मान दिला. त्याची सुरुवात म्हणून आपल्या मुलींनाही त्यांनी प्रवचन, कीर्तन, भजन शिकवलं.

वडील आषाढी वारीला पंढरीला निघाले की, कुठली कुठली कष्टकरी माणसं त्यांना येऊन मिळायची. मग त्यात अगदी एखादा दारूच्या आहारी गेलेला माणूसही निघायचा. त्याचाही ते कंटाळा करायचे नाहीत. पंढरीच्या वाटेवर महिनाभर आपल्यासोबत राहिला म्हणजे आपोआप दारू विसरेल असं म्हणायचे. माऊलींचा तो पालखी सोहळा अनुभवून तो मनुष्यही भारावून जायचा. गळ्यात तुळशीची माळ घालून घरी यायचा. अर्थात यातले काही बहाद्दर पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' सुरू करायचे. पण वडील जिद्द सोडायचे नाहीत. अशा माणसांचा किंवा शाकाहारी नसणाऱ्या माणसांचाही त्यांनी द्वेष केला नाही. या सर्वांना एक गोष्टी मात्र ते आवर्जून सांगायचे, ती म्हणजे आपल्या मुलांना शिकवा. इतरांना सांगण्यापूर्वी त्यांनी स्वत:च्या मुलांना शिकवलं. गरजू विद्यार्थ्यांना, होस्टेल मिळवून देण्यासाठी, त्यांना वह्या पुस्तकं मिळवून देण्यासाठी नेते, अधिकाऱ्यांकडे त्यांनी वाऱ्या केल्या.बुवा वारीला निघाले म्हणजे गावातल्या घराघरांतून त्यांच्या दिंडीसाठी शिधा दिला जायचा. म्हणजे धान्य वगैरे. ते त्यांना अगदी १ किलो, २ किलोपण चालायचे. शिवाय देणगीदार म्हणून अहवालामध्ये त्यांची नावं छापायचे. मला हे सगळंच अजब वाटायचं. 

का कोण जाणे, मलाही हळू हळू संत साहित्याची आवड निर्माण झाली. संतवचनांचे, तत्वज्ञानाचे अर्थ लावताना वारकरी वडिलांचं जगणं, वागणं उलगडू लागलं. आदरयुक्त भीतीमुळं मी कधीही त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करू शकलो नाही. काही विषय बोलायचाच असेल तर तो आईच्या माध्यमातून. माझ्यासाठी वडील म्हणजे दूर सरोवरात पोहणारा राजहंसच. त्याच्या जवळपासही जाणं जमलं नाही. पण दैवाची लीला की काय म्हणतात ते... गेल्या वर्षी घडलं. आई-वडिलांना दोघांनाही कोरोनाची लागण झाली. आई अचानकच गेली. तिच्या जाण्यानंतर खचलेल्या वडिलांसोबत मी राहिलो. ते कोरोना वॉर्डात आणि मी बाहेर बसलेला. संपर्क फोनवर. ते त्यांचे शेवटचे दिवस. सरलेल्या वाटचालीचं चिंतन करत असावेत.फोनवर बोलता बोलता मला म्हणाले, ''मला काही करता आलं नाही तुम्हा मुलांसाठी...'' म्हणजे रुढार्थानं करिअरसाठी मदत, बँक बॅॅलन्स, प्रॉपर्टी असं, म्हणायचं होतं त्यांना... मला भरून आलं. मी नाना म्हणायचो त्यांना. 'नाना, मग आम्ही कसे मोठे झालो? कुठल्याही व्यसनात का नाही अडकलो? भलत्या मार्गाला भरकटत का नाही गेलो? अधिकार पदांवर असतानाही भ्रष्ट का नाही झालो? कुठल्याही काळात नैतिकता का नाही सोडली? अखेर वारकरी विचारांच्या पंढरीला कसे निघालो? हे तुमच्यामुळं नाही तर कुणामुळं..? असं बराच वेळ काहीबाही बोलत राहिलो... जे आयुष्यभर त्यांच्याशी बोलू शकलो नव्हतो. उशीरा का होईना, आमच्यातलं अंतर संपलं. मला म्हणाले, 'मला घरी घेऊन चल. तिथं माझी माणसं मला भेटायला येतील न् मी बरा होईन...'मी त्यांना घरी घेऊन गेलो. त्यांची माणसं त्यांना भेटत राहिली. ते त्यांच्याशी बोलत राहिले...

एक दिवस त्यांची तब्येत बिघडली. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी तातडीनं त्यांना गाडीत बसवलं. पुण्याच्या दिशेनं निघालो. ड्रायव्हिंग सीटवरून आरशात मागं बघितलं. नाना नेहमीप्रमाणं शांत, खंबीर दिसत होते. पण चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान विलसत होतं. मला म्हणाले, गाडी सावकाश चालव... पुण्यात पोहोचण्यापूर्वी खेडमध्येच रस्त्याकडेच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करावं लागलं. चंद्रभागा नदीच्या अगदी किनाऱ्यावरच हॉस्पिटल होतं ते. होय, चंद्रभागाच ती. भीमाशंकरहून आलेली भीमा नदी. तीच तर पुढं वाहत जाऊन पंढरपुरात पांडुरंगाच्या चरणी चंद्रभागा होते. जिच्या पवित्र पाण्यावर वडिलांचं भरण पोषण झालं, जिच्या सोबतीनं ते पंढरपूरला जात राहिले, त्याच भीमा-चंद्रभागेच्या काठावर त्यांनी विठ्ठलाचं नामस्मरण करत देह ठेवला. त्यावेळी त्यांचा हात हातात घेऊन मी त्यांना मनोमन वचन दिलं; नाना, मी वारकरी होईन...

24 नोव्हेंबर 2020 रोजी लिहिलेली फेसबुक पोस्ट - 

माझे आई-वडील गेले हो..! 

रखुमाई पाठोपाठ विठुराया वैकुंठाला गेले..!!

आमचं पंढरपूर पोरकं झालं.!!!

या कोरोनामुळं गेल्या ६८ वर्षांत त्यांची पंढरीची वारी पहिल्यांदा चुकली हो... म्हणून त्यांच्या देवाला भेटायला ते थेट वैकुंठालाच गेले...

आई-नाना,

तुमच्यावाचून दाही दिशा ओस पडल्यात... अनाथपणाच्या खोल अथांग कृष्णविवरात मी हरवलोय...

दिवस जातील, दिवस येतील पण, प्रत्येक दिवसाला तुमची आठवण असेल...

टाळ मृदुंगाचा आवाज आला की, तुमची आठवण येईल...

भजनाचे सूर कानावर आले की, तुमची आठवण येईल...

देवळाचा कळस दिसला की, तुमची आठवण येईल...

गाभाऱ्यातली विठु-रुखमाय पाहिली की, तुमची आठवण येईल...

वारीला निघालेले वारकरी पाहिले की, 

तुमची आठवण येईल!!

कुणाच्या कपाळाचा गंध, बुक्का पाहिला की, 

तुमची आठवण येईल...

डोक्यावर पांढराशुभ्र फेटा असलेला माणूस पाहिला की, 

तुमची आठवण येईल...

नऊवारी लुगडं, चोळी, कुंकू ल्यायलेली आजी, मावशी दिसली की, तुमची आठवण येईल...

आळंदी, देहू, पंढरपुरात गेलं की, तुमची आठवण येईल...

पंढरपुरातला हळद-कुंकवाची, तुळशी माळेची दुकानं पाहिली की, तुमची आठवण येईल...

भरलेली चंद्रभागा पाहिली की, तुमची आठवण येईल...

तुळशी वृंदावन पाहिलं की, तुमची आठवण येईल...

पहाटेचं झुंजूमुजू झालं की, तुमची आठवण येईल...

भल्या सकाळी वासुदेव गाणं म्हणत आल्यावर तुमची आठवण येईल...

भर उन्हातली डेरेदार वृक्षाची घनदाट सावली पाहून तुमची आठवण येईल...

सूर्य मावळतीला गेल्यावर, कातरवेळी तुमची आठवण येईल...

श्रावणातली पोथी सुरू झाल्यावर तुमची आठवण येईल...

धूप, दीप, अगरबत्तीच्या सुवासासोबत तुमची आठवण मनात दरवळेल...

माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकोबारायांच्या गाथा वाचायला घेतला की, तुमची आठवण येईल...

पंढरीच्या वाटेवर आषाढधारा झेलताना, आळंदीतली कार्तिकी वारीतली थंडी अनुभवताना तुमची आठवण येईल...

रंजल्या-गांजलेल्यांना, अनाथ-दीन-दुबळ्यांना कुणी पोटाशी धरताना पाहिलं की, तुमची आठवण येईल!!

शिवारात पेरण्या सुरू झाल्या की, तुमची आठवण येईल...

गाई-गुरं पाहिली, त्यांचं हंबरणं ऐकलं की, तुमची आठवण येईल...

शेणानं सारवलेली भुई पाहिल्यावर तुमची आठवण येईल...

चुलीवरल्या भाकरीचा खरपूस गंध आल्यावर तुमची आठवण येईल...

जेवताना पहिला घास घेताना तुमची आठवण येईल...

ठेच लागल्यावर तुमची आठवण येईल...

उचकी लागल्यावर तुमची आठवण येईल..!!!


2 comments: