'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Wednesday, 18 December 2013

विकासाचा लोकमंगल पॅटर्न

साप्ताहिक 'चित्रलेखा' नेहमीच चांगल्या माणसांना शोधत असते. त्यांच्या कामांना   समाजासमोर आणत असते. अशाच एका माणसाशी मी बोललो. हा माणूस सोलापुरातला माजी आमदार. इतर राजकारण्यांपेक्षा हटके. खरीखुरी कामं करणारा. त्यांच्याविषयी 'चित्रलेखा'नं २०१३च्या दिवाळी अंकात छापलं...

   
मी घरातला वाया गेलेला मुलगा. अकरावी बोर्डातूनच शाळा सोडली. क्रिकेटचा बॉल डोळ्याला लागल्याचं निमित्त झालं होतं. डॉक्टर म्हणाले, वाचू नकोस. त्रास होईल. मला आनंदच झाला. पण पुढं पस्तावलो. शिक्षण नसल्यानं नोकरी मिळेना. भाऊ पीएसआय बनला. दोघी बहिणी पदवीधर झाल्या. मलाच लाज वाटू लागली. आपण बसून खातोय, घरच्यांना भार होतोय असं वाटू लागलं. एक दिवस कामधंदा शोधण्यासाठी सरळ मुंबई गाठली. तिथं बदलापूरला कमल विचारे नावाच्या आमदार होत्या. त्यांच्या पोल्ट्रीवर लेबर म्हणून काम करायला लागलो. दोन वेळचं जेवण करून ५० रुपये मिळायचे. काम पहाटे पाच ते रात्री १० पर्यंत. 
कोंबड्यांची विष्ठा काढण्यापासून, ते धुण्या-भांड्यापर्यंत पडेल ते काम केलं. तिथून पुन्हा सोलापूर जिल्ह्यातल्या माझ्या वडाळा गावी आलो. कमल विचारेंनी तीन चार हजार रुपये दिले होते. त्यातून गावात किराणा मालाचं दुकान टाकलं. पण ते वर्षभरही चाललं नाही. कारण उधारी थकली. मग ज्योतीराम गायकवाड आणि हंगरगेकर म्हणून कंत्राटदार होते. यांच्याकडं रस्त्याच्या कामावर मुकादम म्हणून काम केलं. त्यानंतर सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यात ऊस घेऊन येणाऱ्या १०० गाड्यांचा मॅनेजर म्हणून काम पाहिलं. तिथं मिळणाऱ्या ३०० रुपये पगारातून शेतीऔजारं विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

१९८०मध्ये गावात पाझर तलावाचं काम सुरू झालं होतं. तिथं सुपरवायझर म्हणून नोकरी मिळाली. तिथल्या ज्युनिअर इंजीनिअरशी ओळख झाली. त्यानं ८०० रुपयाचं कंत्राटी काम घेतो का, असं विचारलं. जवळ पैसे नव्हतेच. पण डेअरिंग केली. या पहिल्याच कामात मला १०० टक्के फायदा झाला. तलावाच्या मागच्या गटार खणून त्यात वाळू आणि मोठे दगड टाकायचं काम होतं. एकही मजूर न लावता एकट्यानं हे काम केलं. त्यामुळंच १०० टक्के फायदा झाला! माझी मेहनत पाहून त्याच माणसानं १२ हजार रुपयांचं तलावाच्या पिचिंगचं काम दिलं. अनंत साळुंखे नावाचा मित्र होता. त्याला म्हटलं तू पैसे दे मी मेहनत करतो. कंत्राटं घेण्याच्या कामाला तिथूनच सुरुवात झाली. १९९७पर्यंत ही काम सुरू होती. आपण भले न् आपलं काम भलं. जगात काय चाललंय त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. मजूर, कंत्राटदार, ड्रायव्हर हेच मित्रमंडळी, नातेवाईक, सगेसोयरे बनले होते.

अशा वेळी अगदी अनावधानानं राजकारणात आलो. आलो म्हणजे आणलं गेलं. कैलासवासी माजी खासदार लिंगराज वल्याळ, कै. बाळासाहेब झवर, शांतीलाल जैन यांनी बळजबरीनं स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी विधान परिषदेच्या निवडणुकीला मला उभं केलं. मला त्यावेळी विधानपरिषद,त्यासाठीची निवडणूक प्रक्रिया वगैरे काहीही माहिती नव्हतं. त्यातून सोलापूर जिल्हा या निवडणुकीसाठी कठीण. एकूण पावणेचारशे मतदार होते. त्यापैकी माझ्या म्हणजे भाजप सेनेच्या पक्षाची फक्त ६० ते ६५ मतं होती. गंमत म्हणजे त्यातले चार-पाचसुद्धा मतदार मला थेट ओळखत नव्हते. आणि माझी तर ग्रामपंचायत सदस्यही व्हायची इच्छा, मानसिकता नव्हती. पण एकदा मैदानात उतरलो म्हटल्यावर कंबर कसली. डोक्यानं लढायचं ठरवलं. त्यावेळी जिल्ह्यात ११ तालुके होते. प्रत्येक तालुक्यात एकडुप्लिकेट सुभाष देशमुख उभा केला. त्याच असं असतं की विधानपरिषदेचे मतदार एका ठिकाणी नसतात. अशा विखुरलेल्या मतदारांना डुप्लिकेट सुभाष देशमुख भेटले. केवळ वैयक्तिकरित्या उमेदवार भेटला म्हणून या मतदारांनी मतं दिली आणि मी ३० मतांनी निवडून आलो. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या प्रचारासाठी स्वत: शरद पवार मतदार संघात मुक्काम ठोकून होते. त्यामुळं प्रचार करायला कुणी तयार नव्हतं. १०० टक्के पडणारं सीट. त्यामुळं सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं होतं. पण निवडून आल्यावर पेपरात फोटो येऊ लागले. आणि मला खूप फोन येऊ लागले. अहो, आमच्याकडं दुसरंच कुणी तरी मतं मागायला आलं होतं. मी क्षमा मागितली. आता येत जाईन तुम्हाला खरोखरचा नियमित भेटायला म्हणालो. मग स्वत:हून वाटलं की आता सामाजिक कामाची सुरुवात करायला पाहिजे. हे बाकी मनापासून होतं. 

एक जानेवारीला १९९८ला मी आमदार झालो. आणि २८ फेब्रुवारी १९९८ला लोकमंगल सहकारी बँकेची स्थापना केली. लोकमंगल समूह उभारणीची ती सुरुवात होती. कारण शेतकऱ्यांना आणि उद्योजक तरुणांना उभं करायचं झालं तर त्यांना आर्थिक बळ देणं गरजेचं होतं. मला माझ्या पोल्ट्रीच्या आणि तळ्याच्या कामाचे दिवस नेहमी आठवायचे. पैसा नसताना माणूस हतबल असतो. आपण जे भोगलं ते तरूण पोरांना भोगावं लागू नये, त्यांना उद्योगव्यवसायासाठी भांडवल उपलब्ध व्हावं म्हणून मी पहिल्यांदा बँकेची स्थापना केली. या बँकेला आयएसओ ९००१:२००८ हे सर्टिफिकेट आणि रिझर्व बँकेचा ग्रेड वनचा दर्जा मिळालाय. बँकेत लोकांनी १२७ कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्यात. त्यातून आम्ही ७९ कोटींहून अधिक कर्जाचं वाटप केलंय. बँक यशस्वी झाल्यानं आम्हाला जणू चावीच मिळाली. त्यातून आम्ही पुढं उद्योगांची साखळी उभी केली.

बँकेनंतर लोकमंगलनं २००४मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक असं कार्यक्षेत्र असणारी मल्टिस्टेट सहकारी सोसायटी सुरू केली. या सोसायटीनं दूध डेअरी सुरू केली. जैविक आणि रासायनिक खतांचं उत्पादन सरू केलं. इफको खतांचं वितरक म्हणून काम पाहिलं. सोसायटीचा १५०० एकरचा शेतीविभाग आहे. तसेच या सोसायटीमार्फत दाळमिल आणि संगणक दुरुस्ती, विक्रीचं काम सुरू करण्यात आलंय. याच सोसायटीच्या मार्फत लोकमंगल शेतीप्रतिक नावाचं कृषी मासिक चालवलं जातं. दरवर्षी कृषिमहोत्सव भरवण्यात येतात. सध्या सोसायटीच्या ५० शाखा आहेत. दोन्हीही राज्यात आणखी ५० शाखा सुरू करण्यात येणार आहेत.
ग्रामीण अर्थकारण मजबूत करण्यासाठी आम्ही लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था ही तिसरी आर्थिक पतसंस्था उभारली. या पतसंस्थेत सध्या ११५ कोटींच्या ठेवी आहेत.

या तीनही आर्थिक संस्था ग्रामोद्योग, ग्रामविकास, शेती, लघुउद्योग, स्वयंरोजगार प्रकल्प, आर्थिक दुर्बल घटकांना स्वावलंबी बनवण्यासाठी सहाय्य, करतात.
शेती हा इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा. म्हणून शेती आणि शेतीपूरक उद्योगांना मदत करण्याच्या भूमिकेतून आम्ही लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रिज लिमिटेडची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही केवळ सहा महिने सहा दिवसांत लोकमंगल साखर कारखाना  उभा केला. या रेकॉर्डची लिम्का बुकात नोंद झाली. पाच सात वर्षात कारखाना कर्जमुक्त केला. एवढंच नाही तर इतर कारखान्यांनाही कर्जमुक्त करण्याचा चंग बांधला. कारखाने कर्जमुक्त करून त्यांची पुनउर्भारणी करण्याचं काम सुरू केलं. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजा भवानी, किल्लारी साखर कारखाना हे कारखाने लोकमंगलला चालवायला मिळाले. आम्ही ते उत्तमरित्या चालवले. 

शेतकऱ्यांच्या मुलांनी नवं तंत्रज्ञान समजून उमजून सुधारीत आणि फायद्याची शेती करावी यासाठी आम्हीअॅग्री क्लिनिक अॅन्ड अॅग्री बिझनेस सेंटर सुरू केलं. केंद्रीय कृषिमंत्रालयाच्या मदतीनं चालवलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान आणि मार्केटींगचं प्रशिक्षण दिलं जातं.
आपल्याकडं आधुनिक शेतीतून उत्पादन वाढलं पण शेतीचा कस कमी झालाय. पाणी रसायनं आणि कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापरामुळं शेतीवर दुष्परिणाम होतायत. यावर संशोधन करण्यासाठी आम्हीमहाराष्ट्र रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं. जैविक खतं, जिवाणू संवर्धक, जैविक कीडनियंत्रण पद्धती, टिश्यूकल्चर यांचा शेती विकासासाठी कसा उपयोग होईल, याचा विचार या माध्यमातून केला जातो. या संशोधनातून आलेल्या निष्कर्षांमधूनच २००६मध्ये लोकमंगल बायोटेकची स्थापना झाली.  

या माध्यमातून लोकमंगलनं सुमारे ८५ सेंद्रीय उत्पादनं विकसित केलीत. सोलापूर, अकोला, जळगाव, वडोदरा, उदयपूर आदी ठिकाणी हे उत्पादन केलं जातं. या लोकमंगल बायोटेकच्या महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या सात राज्यांत शाखा आहेत. बायोटेकच्या माध्यमातून खतं, बियाणं, जैविक कीटक आणि बुरशी नाशकं याचं उत्पादन केलं जातं.
सेंद्रीय उत्पादनांचा आम्ही खूप प्रचार, प्रसार केला. मला संपूर्ण सोलापूर जिल्हा सेंद्रीय करायचा होता. पण २००७मध्ये आम्हाला या उद्योगात खूप तोटा झाला. कारण आपल्याकडं सेंद्रीय खतं वापरण्याची मानसिकताच अजून तयार झालेली नाही. शिवाय हे खत तयार केल्यानंतर ते सहा महिन्यांनी नष्ट होतं. आता मी यात सावध झालोय. रासायनिक खत निम्मं वापरा. निम्मं सेंद्रीय वापरा, असं शेतकऱ्यांना सांगतोय. त्यातून हळू हळू लोक सेंद्रीय शेतीकडं वळतील.

शेतकऱ्यांमध्ये एकूणच आधुनिक शेतीबद्दल सजकता निर्माण व्हावी, कृषी तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी म्हणून लोकममंगलनं शेतकरी मंडळ स्थापन केलं.
ही कामं करत असताना जिल्ह्यात आरोग्यसुविधांची मोठी वाणवा असल्याचं लक्षात आलं. त्यासाठी मगलोकमंगल जीवक हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र सुरू झालं. या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रस्ट या संस्थेच्या वतीनं गरजू आणि गरीब लोकांना ना नफा ना तोटा तत्त्वावर आरोग्यसेवा पुरवली जाते. लोकमंगलचा सहभाग असलेल्या या उपक्रमात ६० बेडचं अद्ययावत हॉस्पिटल चालवलं जातं.
लोकमंगलनं केवळ ग्रामीण भाग आणि शेती यांच्याशीच संबंधीत काम केलंय असं नाही. तर शहरी नागरिकांच्या सोयीसुविधांचाही विचार केलाय. त्यासाठीच तर लोकमंगल माऊली ज्वेलर्स, लोकमंगल सुपर बझार आणि लोकमंगल डेव्हलपर्स, प्रॉपर्टीज हे सेवा उद्योग उभारण्यात आलेत.

माझं शिक्षण अर्ध्यावर थांबलं. त्यामुळं पुढं खूप झगडावं लागलं. इतर मुलांचं तसं होऊ नये म्हणून आम्ही श्रीराम प्रतिष्ठान मंडळ स्थापन केलंय. त्याअंतर्गत माझ्या वडाळा या गावी दीडशेहून अधिक एकरांवर शैक्षणिक संकुल उभं राहिलंय. इथं उद्यान विद्या महाविद्यालय, कृषी विद्यालय, जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, संगणक पदवी अशी सात महाविद्यालयं या संकुलात आहेत. देशातला एकमेव असा बॅचलर ऑफ इंटरप्रिन्यूअरशिप हा अभ्यासक्रम इथं शिकवला जातो. स्वत:चा उद्योग, विविध कंपन्यांमध्ये नोकऱ्या, उच्च शिक्षणाची संधी मिळवण्यासाठी या अभ्यासक्रमाचा उपयोग होतो. या संकुलात सध्या ९५० विद्यार्थी शिक्षण घेतायत. त्यापैकी साडेचारशे विद्यार्थी इथल्या होस्टलमध्ये राहतात. ३०० मुलं आणि १५० मुली इथं काम करून शिक्षण घेतात.

शिक्षणाची खरी गरज असते गोरगरीबांनाच. केवळ पैशांअभावी त्यांच्या मुलांचं शिक्षण थांबू नये म्हणून आम्ही इथं आम्ही २०० विद्यार्थ्यांना मोफत शिकवतो. त्यांच्याकडून होस्टेलचे, खाण्याचे आरोग्य सुविधांचे पैसे घेत नाही.
यासोबतच आम्ही स्थापन केलेल्या अवंती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बालवाड्या, प्राथमिक, माध्यमिक शाळा चालवल्या जात आहेत.
या शैक्षणिक संकुलात शिकणारी माझी ही पोरं नवं जग घडवायला तयार होत आहेत.
लोकमंगलची विकासाची भूमिका जनतेपर्यंत जावी यासाठी आम्ही स्वतंत्रपणे लोकमंगल प्रिंट आणि पॅक ही संस्था सुरू केली आहे. त्यात विविध प्रकारचं प्रिंटींग होतं. याच ठिकाणी लोकमंगल महिला सहकारी मुद्रणालय सुरु करण्यात आलंय. त्यात शालेय वह्यांचं उत्पादन केलं जातं.   
या प्रमुख संस्थांशिवाय लोकमंगल समूहानं महिला बचत गटांची स्वयंरोजगार सहकारी संस्था, लोकमंगल कडबाकुट्टी, लोकमंगल वेअर हाऊस, लोकमंगल ट्रान्सपोर्ट, लोकमंगल गारमेंटस्, लोकमंगल इन्व्हेस्टमेंट, लोकमंगल इथेनॉल अॅन्ड को जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड, लोकमंगल टिश्यूकल्चर, लोकमंगल ट्रेनिंग अकादमी, लोकमंगल टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स, लोकमंगल प्लेसमेंट सेंटर, लोकमंगल रोपवाटिका, लोकमंगल हॅचरी, सार्वजनिक वाचनालय, कला क्रिडा, युवक सांस्कृतिक मंडळ, महात्मा जोतिराव फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, लोकमंगल दाळ मिल, वराहपालन सहकारी संस्था अशा विविध संस्था स्थापन केल्यात. त्यांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.

या संस्था, उपक्रमांतून सुमारे साडेसहा हजार लोकांना रोजगार मिळाला आहे.
मी २०१५पर्यंत दीड हजार उद्योजकांना उभं करण्याचा संकल्प सोडलाय. त्यासाठी कष्ट उपसायची तयारी असणाऱ्या जिगरबाज तरुणांचा मी शोध घेतोय. माझ्याकडं नोकरी मागायला अनेक तरुण येतात. मी त्यांना म्हणतो, नोकऱ्या कसल्या मागता? फाडा त्या डिग्र्यांची कागदं. स्वत:चा व्यवसाय सुरू करा. मोठे व्हा. मी मदत करतो. तुळजापूरहून आलेल्या एका सुतार नावाच्या मुलानं खरोखरच त्याची डिग्री माझ्यासमोर फाडून टाकली. मी अवाक् झालो. पण तो माझ्यावर दाखवलेला विश्वास होता. त्याला फर्निचरचा व्यवसाय करायचा होता. त्यासाठी मी त्याला लोकमंगल मल्टिस्टेटमधून आर्थिक मदत केली. चौधरी मसले गावातलं एक जोडपं माझ्याकडं आलं. नवरा माझ्याकडं दोन तीन हजार रुपये पगाराची नोकरी मागत होता. मी त्यांना आमच्या कॉलेजचं कॅँटीन चालवायला दिलं. त्यासाठी त्यांना ५० हजार रुपयांची गरज होती. ते मी मिळवून दिले. त्यांनी कँटीन अत्यंत व्यवस्थित सांभाळलं. त्याच्या जोरावर शेतावरचं ७५ हजारांचं कर्ज फेडलं. सादिक शेख म्हणून एक शिक्षक आहेत. त्यांचं मोठी पोल्ट्री उभारण्याचं स्वप्न होतं. पण या सामान्य शिक्षकाला एवढं कर्ज कोण देणार? मी धाडस करून त्याला सव्वा कोटींचं कर्ज दिलं. आज त्याची वार्षिक उलाढालच सव्वा कोटींची आहे.

पारधी समाजातली एक बारावी झालेली तरुणी आहे. शेळीपालन आणि त्याला जोडून काही कुटीरोद्योग करण्याचं तिच्या मनात होतं. तिला विनातारण २० लाखांचं कर्ज दिलं. उत्तम रितीनं तिनं चालवलेला व्यवसाय इतर तरुणींसाठी आज मार्गदर्शक ठरलाय. 
अक्कलकोट शेगावचा एक अपंग मनुष्य आहे. तो दंतमंजन तयार करतो. त्याला दोन लाखांचं कर्ज दिलं. सोलापूर शहरात यशोदास गायकवाड नावाचा तरूण आहे. साधी पानपट्टी टाकायलाही त्याच्याकडं भांडवल नव्हतं. आता त्याचा शोभेचे मासे विकण्याचा मोठा व्यवसाय आहे. वैरागजवळच्या सासूर गावात एक आईसकँडी विकणारा आहे. एक एक रुपया कमावणाऱ्या या माणसानं आता मोठा बंगला बांधलाय. मला अशी कितीतरी उदाहरणं आठवतात. माणसाकडं जिगर असतेच. फक्त त्याला हवी असते थोडीशी मदत आणि विश्वास. त्या दोन्हीही मी देतो. त्या माणसाचं, कुटुंबाचं आयुष्य मार्गी लागतं.  

ग्रामीण भागात कल्पकता असणारी खूप पोरं आहेत. त्यांना छोटे छोटे व्यवसाय करायचे असतात. पीठाची चक्की सुरु करायची असते. त्यासाठी छोटी जागा, छोटं शेड बनवायचं असतं. अडचण येते पैशांची. मी ती बँकेच्या माध्यमातून सोडवतो. मी आवाहन करतो, उद्योग व्यवसाय करू इच्छिणारा माणूस राज्यातला कुठलाही असो मी त्याच्या पाठीशी उभा राहीन. अनेक तरूण लोकमंगच्या माध्यमातून उद्योजक झालेत. शिवाय लोकमंगलनं उभारलेल्या प्रकल्पांतून सुमार वीसेक हजार तरुणांना नोकरी मिळाली आहे.

आपली लोकसंख्या जास्त आहे, त्याची सगळ्यांना चिंता वाटते. मला त्यात संधी दिसते. प्रत्येकाकडं काही ना काही कौशल्य असतंच. म्हणून मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर व्हायला हवा. आपापल्या गावात, परिसरात जर हे उद्योजक उभे राहिले तर मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे जाणारे तरुणांचे लोंढे थांबतील. शहरांवरचा ताणही कमी होईल.

सोलापूर आणि जवळच्या परिसरात श्री सिद्धेश्‍वर, अक्कलकोट स्वामी समर्थ, संत दामाजी, संत सावता माळी, वडवळचे नागनाथ मंदिर, करमाळ्याची कमलादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अशी नऊ तीर्थक्षेत्रं आहेत. ज्यावर अनेक पूरक उद्योग चालतात. इतर उद्योजकांना चालना मिळते.त्यामुळं पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही तीर्थक्षेत्रे विकसित होणं आवश्यक आहे.
मनापासून ठरवलं तर प्रतिकूल परिस्थितीतले लोकही काय करू शकतात, याचं उत्तम उदाहरण मी पाहिलंय, इस्त्रायल देशात. 
हा देश आमच्या सोलापूर किंवा उस्मानाबादएवढाच आहे. तेवढीच लोकसंख्या आहे. आमच्यापेक्षा हलकी जमीन आणि आमच्यापेक्षा कमी पाणी. तरीही शेतीउत्पन्न विक्रमी. कारण त्या लोकांनी उपलब्ध साधनसामुग्रीचा योग्य तो वापर करण्याची शिस्त अंगी बाणवलीय. तिथं शेतीत १०० टक्के ठिबक सिंचन केलं गेलंय. त्याचे हे सगळे फायदे आहेत. आम्हीही ठरवलंय, जे गाव १०० टक्के ठिबक सिंचन करेल त्याला आम्ही एक लाखाचं बक्षीस देणार. आम्हाला तुमच्या कॅनॉलचं पाणी नको. आम्हाला तुमच्या उजनी धरणातलंही पाणी नको. पडलेल्या पावसाचं थेंब थेंब पाणी साठवू आणि हिरवी क्रांती करून दाखवू, असं स्वप्न आम्ही पाहतोय. आपल्या कार्यक्षेत्रात शिरपूर पॅटर्नचे अनेक बंधारे, पाझर तलाव उभारून लोकमंगल कारखान्यानं या स्वप्नाला हातभार लावलाय.

आणखी एक महत्त्वाचा उपक्रम लोकमंगल सोलापुरात राबवतं. तो म्हणजे, सामूहिक विवाह. लेकीचं लग्न जमवण्यापासून ते हुंडा, लग्नाचा खर्च, त्यासाठी सावकारी पाशात अडकणं आणि मग नाईलाजानं आत्महत्या, असं शेतकऱ्याच्या मागचं दुष्टचक्र मी पाहिलंय. त्यातूनच माझ्या मनात ही सामुहिक विवाहाची कल्पना घोळत होती. २००६मध्ये ती प्रत्यक्षात आली. आम्ही आत्तापर्यंत साडेसहाशे विवाह लावून दिलेत. सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावरील तीन लाख चौरस फुटांच्या मंडपात हे विवाह थाटामाटात पार पडतात. लाखभर लोक जेवतात. जोडप्यांना संसारउपयोगी साहित्य, कन्यादान, अनुदान दिलं जातं. शेवटी सगळ्यांची रिक्षात बसवून थाटात मिरवणूक काढली जाते. या सोहळ्यात आंतरजातीय विवाहासोबतच अंध, अपंग, अनाथांचेही विवाह लावून दिले जातात. आम्ही इथंच थांबत नाही तर या लेकीजावयांना नंतर पाहुणचारासाठी बोलावतो. त्याचाही ऋणानुबंध सोहळा होतो. लोकमंगलचे कर्मचारीही सामुहिक विवाहसोहळ्यात मुलामुलींची लग्नं लावतात. 
विवाह सोहळ्यात येणारे वऱ्हाडी स्वेच्छेनं रक्तदान करतात. शेतकरी आणि मजूर आपल्या मुलामुलींचे विवाह या सामुदायीक विवाह सोहळ्यात लावतात.
सरकारकडून नवरी मुलीच्या आईच्या नावे १० हजार रुपये अनुदान मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आत्तापर्यंत २६७ पालकांना सुमारे २६ लाख ७० हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळवून देण्यात आलेत. याच पद्धतीनं मागासवर्गीय अनुदान योजनेअंतर्गत ५३ वधुमातापित्यांना पाच लाख ३० हजार रुपये अनुदान मिळवून दिलं गेलं आहे.

या जोडप्यांच्या मुलीच्या जन्मानंतर तिला 18व्या वर्षी एक लाख  रुपये मिळावेत, एवढी तरतूद करून ठेवतो. कुटुंबाला स्वत:चा उद्योग व्यवसाय उभारून देण्याचा प्रयत्न करतो.
या विवाहांसाठी सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांमध्ये सुमारे ६३ नोंदणी कार्यालयं उघडण्यात आली आहेत.
हे सगळं उभारत असताना यशासोबत अपयशही मिळालं. ते एक बरंच झालं. नाही तर मी मुजोर झालो असतो. जनतेपासून तुटलो असतो. लोकमंगल यशस्वी होण्यामागचं मोठं कारण म्हणजे मला मिळालेले जीवाला जीव देणारे, झोकून देऊन काम करणारे तरूण कार्यकर्ते. त्यांच्यामुळंच तर मी लायकी आणिबॅकग्राऊंड नसताना हे लोकमंगलचं विश्व उभं करू शकलो. या माध्यमातून आपण समाजाच्या उपयोगी पडतोय. याबदद्ल खूप समाधान वाटतंय. 

माझी दोन्हीही मुलं यूएसमधून शिकून आलीत. ते दोघेही आता लोकमंगलच्या कामात लक्ष घालतायत. पत्नी सीमा, मुलगी अश्विनी यांच्या सहकार्यामुळंच मी लोकमंगलचा हा भला थोरला गाडा हाकू शकतो.
लोकमंगलचं बोधचिन्ह कासव आहे. तर अखंड गतीतून सार्थकता हे ब्रीदवाक्य आहे. प्रयत्नात, कामात सातत्य ठेवून प्रगतीचं ध्येय निश्चितपणे गाठायची प्रेरणा हे बोधचिन्ह आम्हाला देतं. 
मला असं वाटतं, की लोकमंगल हा विचार आहे. लोकविकासाची ती अंतरीची प्रेरणा आहे. समाजातील सर्व घटकांना डोळ्यासमोर ठेवून सहकार्यातून तयार झालेलं लोकमंगल नावाचं ते विकासाचं मॉडेल आहे. त्याच्या अखंड वाटचालीसाठी तुमच्याही सहकार्याची आणि शुभेच्छांची आवश्यकता आहे.




Wednesday, 2 October 2013

शिक बाबा शिक, लढायला शिक!

गेल्या आठवड्यात पुण्याला गेलो होतो. वाघोलीच्या एका शाळेत. तिथं शाळेचे माजी विद्यार्थी जमले होते. संघटना स्थापन करायला. या संघटनेच्या माध्यमातून ते आपत्तीग्रस्तांना मदत करणार आहेत. सामाजिक कामांना हातभार लावणार आहेत. कारण त्यांनाही 20 वर्षांपूर्वी असाच कुणी तरी मदतीचा हात दिला होता. त्यांची कथा मी लिहिली. ती साप्ताहिक 'चित्रलेखा'नं 'कव्हर स्टोरी' म्हणून प्रसिद्ध केली.


‘‘पहाटेच्या साखरझोपेत होतो आम्ही. ग्रामप्रदक्षिणेला निघालेल्या रामपालखीच्या टाळमृदुंगाची लय कानावर येऊ लागली होती. पण अंथरुणातून उठवत नव्हतं. अचानक कुत्रांनी कालवा केला. पाठोपाठ धडामधुडूम आवाज झाले. आम्ही लगबगीनं उठून बाहेर आलो. तर परिसरात मोठा धुराळा उठलेला. माणसं सैरावैरा पळत असलेली. भोवताली अंधार. काही कळंना...’’
  
‘‘बाबा ओरडत होते, ‘आरं ये, कुणाचं ट्रॅक्टर हाय? भित्ताडाला धडाकलंय त्ये...’ तोपर्यंत आजीनं शर्टाला धरून मला फराफरा ओढत बाहेर आणलं...’’

‘‘गावाबाहेरच्या मंदिरात जिथं झोपलो होतो तिथली घंटा आपोआप वाजायला लागली. भानावर आलेले जाणते ओरडू लागले, भूकंप भूकंप!! गावात पळत निघालो तर सगळी घरं एकमेकांवर कोसळून रस्ता बंद झालेला...’’

‘‘आरं धरण फुटलंया पळा पळा..ढिगाऱ्यातून माणसांना बाहेर काढणारी माणसं जीव घेऊन पळत सुटली. ती थेट डोंगरावर जाऊन बसली. पुन्हा खाली उतरंचनात...’’

‘‘खबर कळली तसा गावाकडं निघालो. जीवाचा दगड करून उध्वस्त झालेली गावं ओलांडत किल्लारीत पोहोचलो. तिथलं दृश्य सांगण्यापलिकडचं. रस्त्याच्या कडेला प्रेतांचा खच पडला होता. पळतच गावाकडं निघालो. आपल्या गावाचं, घराचं, माणसांचं काय झालं असेल?...’’

अशा नाना आठवणी सांगणाऱ्यांमध्ये शेवटी आपली आठवण सांगत भूतकाळात शिरलेल्या गौतम बनसोडेंचा गळा भरून येतो. बीएसएनएलमध्ये मोठ्या पदावर असलेले बनसोडे आणि त्यांचे सगळे उच्चपदस्थ सहकारी मित्र एकत्र येऊन 20 वर्षांपूर्वीच्या त्या महाप्रलयंकारी घटनेच्या आठवणी जागवत होते. लातूरचा भूकंप!! देशाला हालवून टाकणाऱ्या या घटनेला येत्या 30 सप्टेंबर 2013 रोजी 20 वर्षे पूर्ण होतायत. त्यानिमित्तानं अशा घटनांविषयी जनजागृती करण्यासाठी पुण्याजवळच्या वाघोली इथल्या भारतीय जैन संघटनेच्या संस्थेत दोन दिवसांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय.
या दोन दिवसांत एक छोटासा पण महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो म्हणजे, इथल्या वसतीगृहात राहून गेलेल्या गेल्या 20 वर्षांतील विद्यार्थ्यांच्या संघटनेची स्थापना करणं. आपापले अनुभव सांगणारे हे अधिकारी अर्थात संस्थेचे माजी विद्यार्थी त्यासाठीच इथं आले होते. भूकंपाच्या कटू आठवणी बाजूला सारत ते जगण्याची लढाई लढले आणि जिंकलेही. इतरांनाही त्यापासून प्रेरणा मिळावी, आपत्तीग्रस्तांना मदत करता यावी, सामाजिक जबाबदारीची भावना वाढीस लागावी यासाठी हे सुमारे अडीच हजार विद्यार्थी आता आपापल्या व्यावसाय, नोकऱ्यांमध्ये स्थिरावल्यावर संघटना बांधणार आहेत.

एखाद्या भयपटातल्या घटना एकामागोमाग एक वेगानं घडाव्यात तशा खऱ्याखुऱ्या घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या.  
लातूरच्या औसा तालुक्यातील दाऊ लिंबाळा गावचा गौतम बनसोडे त्यावेळी गावात नव्हता. मराठवाड्यातील अनेक लहान मुलं पोट भरण्यासाठी पुण्यासारख्या शहरात येतात. हॉटेलात वगैरे काम करतात. तसाच गौतमही आला. ज्या हॉटेलमध्ये काम करत होता, त्या हॉटेलच्या मालकीणीनं भूकंपाविषयी सांगितलं. तिथून तो आणि त्याचा मित्र गावी निघाला. रस्त्यातच त्यांनी तो भयानक विध्वंस पाहिला. त्यांच्या वयाची अनेक मुलं आपल्या उध्वस्त घरांच्या ढिगाऱ्यांभोवती फिरत होती. ढिगाऱ्याखालून निघणारी आपले आईवडील, भाऊ, बहीण, नातेवाईक, गुराढोरांची प्रेतं पाहत होती. खात्यापित्या घरातली, अचानक अनाथ झालेली ही मुलं अन्नपाणी घेऊन आलेल्या ट्रक्समागं भुकेल्या पोटानं धावत होती. शाळा तर केव्हाच भुईसपाट झाली होती. ती कधी उभी राहील, याचा काही भरवसाही नव्हता. अशी तब्बल पाच हजार निराधार मुलं भूकंपग्रस्त भागात भटकताना दिसत होती. 

या परिसरात तळ ठोकून गावकऱ्यांना अन्नपाणी, वस्त्र, निवाऱ्याची मदत करणारे भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांनी ही मुलं पाहिली. मुलांच्या कोवळ्या मनावर या भीषण आपत्तीचा कायमचा परिणाम होऊ नये, त्यांचं जगणं कोमेजून जाऊ नये म्हणून त्यांनी या मुलांना पुण्याला न्यायचा बेत आखला. मोठं होईपर्यंत त्यांच्या राहण्या-खाण्यापिण्याची, शिक्षणाची व्यवस्था करण्याचं ठरवलं. त्यांच्या या कल्पनेला मुख्यमंत्री शरद पवार आणि राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी संमती दर्शवली. भूकंपग्रस्त जिल्ह्यांमध्ये मग संघटनेकडून सर्व्हे केला गेला. बाराशे शाळकरी मुलांना पुण्याला नेण्याचं ठरलं. पण भेदरलेले पालक मुलांना सोडायला तयार होईनात. कुणी म्हणे ‘या मुलांचं धर्मांतर केलं जाईल‘, कुणी म्हणे ‘या मुलांना मायबाप, गावापासून कायमचं तोडलं जाईल..’ पण या सगळ्या अफवांचं निरसन केलं गेलं. ‘आमच्या मुलांना शिक्षण नाही मिळालं तरी चालेल पण त्यांना सुरक्षित जागी ठेवा..’ असं वारंवार सांगत पालकांनी भरल्या डोळ्यांनी मुलांना निरोप दिला.

मुलं पुण्यात आली खरी पण त्यांचं भेदरलेपण काही जाईना. पुण्यातल्या पिंपरीतील आत्मनगर भागात त्यांची राहण्याची तात्पुरती सोय करण्यात आली होती. पण मुलं उंच बिल्डिंगमध्ये जायला तयार होईनात. त्यांनी पुण्यात येईपर्यंत दोन मजलीसुद्धा घरं पाहिली नव्हती. गावात जी माडीची उंच घरं होती, त्यांची भूकंपात काय अवस्था झाली ती त्यांनी अनुभवली होती. इथल्या उंच बिल्डिंगवरून जाणाऱ्या ढगांकडं पाहून बिल्डिंग हालत असल्याचा त्यांना भास व्हायचा. त्यामुळं आम्ही खाली जमिनीवरच झोपतो, असं ही मुलं म्हणू लागली. अखेर मानसोपचारतज्ज्ञांचं पथक बोलावलं गेलं. ससून हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख, अभिनेते मोहन जोशी आणि त्यांच्या टीमनं प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधला. त्यांची भीती दूर केली. मुलं कशीबशी बिल्डिंगमध्ये राहायला तयार झाली. त्या रात्री एक मुलगा बाथरुममध्ये गेला. त्यानं आयुष्यात पहिल्यांदाच पाण्याचा नळ पाहिला. नळ चालू केला तर त्याला प्रचंड प्रेशर. तो घाबरून तसाच पळाला. त्या आवाजानं सगळ्या मुलांमध्ये गोंधळ उडाला. भूकंप भूकंप म्हणून मुलं पळू लागली...

भूकंपाच्या त्या धक्क्यातून सावरायला मुलांना बरेच दिवस लागले.
नंतर या मुलांसाठी जैन संघटनेनं पुण्याजवळच्या वाघोलीमध्ये 12 एकर जागा घेतली. ‘वाघोली शैक्षणिक पुनर्वसन केंद्र’, पुणे (Wagholi Educational Rehabilation Center (WERC) , Pune) या नावाची आपत्तीग्रस्त मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी कायमस्वरुपीची संस्था स्थापन केली. जागतिक बँकेनं यासाठी सुसज्ज इमारत उभी करून दिली. तीन लाख स्क्वेअर फुटांवर उभ्या राहिलेल्या या इमारतीत वसतीगृह, शाळा, प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी सुविधा आहेत.  
सध्या या वसतीगृहात 840 विद्यार्थी राहतात. त्यात डहाणू आणि अमरावतीतील धारणी तालुक्यातील 400 आदिवासी मुलं आहेत. तसेच जवळपासच्या कॉलेजांमध्ये जाणाऱ्या बाहेरगावच्या 275 मुलींची ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर या वसतीगृहात राहण्याची सोय करण्यात आली आहे.

लातूरच्या भूकंपग्रस्त 1200 मुलांसोबतच मेळघाटाच्या कुपोषणग्रत भागातील 360, जबलपूर दुर्घटनेतली 50, जम्मू काश्मीरमधील 450 भूकंपग्रस्त मुलं आणि सुमारे 750 अनाथ मुलं या वसतीगृहानं सांभाळली आहेत. पण यात लक्षणीय ठरली ती लातूर भूकंपातील मुलं. कारण या मुलांपासूनच या पुनर्वसन प्रकल्पाचा पाया घातला गला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मुलं आता स्वत:च्या पायावर तर उभी राहिलीतच पण त्यांनी आपली सामाजिक बांधिलकीही जपलीय.

1993च्या भूकंपानंतरचा जबलपूर, भूज, जम्मू-काश्मीरचा भूकंप असो की  अंदमान, तमिळनाडूमधील त्सुनामी. महाराष्ट्रातील आणि बिहारमधील मोठा पूर, दुष्काळ असो की उत्तराखंडमध्ये नुकतीच कोसळलेली आपत्ती, या सर्व नैसर्गिक संकटांमध्ये हे विद्यार्थी मदतीला धावले आहेत. संस्थेनं जणू भावी काळासाठी हे सामाजिक कार्यकर्तेच घडवले आहेत. या बांधिलकीचं एक उदाहरण म्हणजे या विद्यार्थ्यांपैकी एक असलेला उस्मानाबाद जिल्ह्यातील कानेगावचा गणेश बाबर. टॅक्स कन्सल्टन्ट असलेला गणेश महिन्यातला एक तरी रविवार समाजसेवेसाठी देतो. त्यानं डॉ. नरेंद्र दाभोळकरांसोबत काम केलंय. डॉ. बाबा आढाव, डॉ. अभिजित वैद्य यांच्या कामात सहभागी झालाय. गावाकडं जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करण्यासोबतच केरळमधल्या अट्टापट्टी या आदिवासी भागात जाऊन त्यानं आदिवासींसाठी काम केलंय. दूधभेसळीविरुद्ध तो वेळोवेळी रस्त्यावर उतरलाय. त्यासाठी त्यानं पोलिसांचा प्रसादही खाल्लाय. दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करत नाही, म्हणून त्यानं सरकारलाच कोर्टात खेचलंय. अंगमेहनतीची कामं करणाऱ्या हमालांना सकस आणि पौष्टीक आहार मिळतो का याचा त्यानं सर्व्हे केलाय. एम.कॉम. करताना ‘बेस्ट स्टुडंट’ म्हणून गौरवला गेलेला गणेश असा सामाजिक कार्यातही बेस्ट कामगिरी करतोय.

वाघोलीच्या संस्थेत शिकून तिथंच शिक्षक झालेला अशोक स्वामी लातूरच्या नदी हातरगा गावातला भूकंपग्रस्त विद्यार्थी. भूकंपानं धरण फुटल्याची अफवा ऐकून त्याच्या गावातल्या माणसांनी गावाशेजारच्या डोंगरावर आश्रय घेतला. सरकारनं नंतर तिथंच त्यांचं पुनर्वसन केलं. आपलं पुनर्वसन करणाऱ्या समाजाचं ऋण  अशोक स्वामी विसरलेला नाही. म्हणून तर देशात जिथं जिथं आपत्ती ओढवली तिथं तिथं तो जैन संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत मदतीला धावून जातो. महापालिकेच्या शाळेत आसरा घेतलेल्या पुण्यातल्या 20 हजार पूरग्रस्तांना त्यानं जेवण वाटायचं काम केलं. मांढरदेवी दुर्घटना, मध्यप्रदेशातील जबलपूर, जम्मू काश्मीरचा भूकंप, तामीळनाडूतील त्सुनामी अशा अनेक आपत्तींच्या वेळी त्यानं मदतकार्यात सक्रीय सहभाग घेतलाय.
इंजीनिअर झालेला उस्मानाबादमधील माकनी गावचा संजय राजपूत आता यशस्वी खाजगी कॉन्ट्रॅक्टर झालाय. पुण्यात आला तेव्हा उंच बिल्डिंगमध्ये जायचीही भिती वाटणाऱ्या संजयनं पुण्यात पिसोळी आणि हिंजवडी भागात 16 आणि 28 मजली बिल्डिंग उभ्या केल्यात.
 
पुणे विद्यापीठाच्या तळेगाव ढमढेरे कॉलेजात प्राध्यापक झालेला पदमाकर गोरे उस्मानाबादमधील बेंडकाळ गावचा. तो म्हणतो, ‘इथं केवळ आमचं शैक्षणिक पुनर्वसनच झालं नाही तर आमचं आणि आमच्यानंतरच्या पिढ्यांचं आयुष्य उभं राहिलं. इथं आम्ही मान्यवरांची व्याख्यानं ऐकली. त्यांनी आम्हाला मोठं होण्याची स्वप्नं दाखवली. आम्ही ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवली. इथं आलेली बाराशेपैकी 700 मुलं शैक्षणिक करिअरमध्ये यशस्वी झाली. उरलेली मुलं गावाकडं परतली. पण वाया नाही गेली. ती उत्तम गावकरी बनली, शेतकरी बनली. महत्त्वाचं म्हणजे समाजबांधीलकी मानणारी माणसं बनली’.

नंतर या भूकंपग्रस्त मुलांमध्ये इतर ठिकाणची आपत्तीग्रस्त, अनाथ, आदिवासी मुलंही सामील झाली. मेळघाटातील कुपोषणग्रस्त भागातील पन्नालाल धुर्वे हा त्यापैकीच एक. मातृभाषा कोरकू असणाऱ्या पन्नालालला धड मराठी किंवा हिंदी बोलता यायचं नाही. त्याच्यासारखी मेळघाटातली साडेतीनशे मुलं इथं आली होती. त्यांचाही भाषेचा प्रॉब्लेम. मग त्यांच्यासाठी संस्थेनं मराठी भाषेचे स्वतंत्र क्लास लावले. त्यातून 100 मुलं पुढं सरकली. नोकरी व्यवसायाला लागली. त्यांच्यात उच्चशिक्षण घेणारा पन्नालाल एकटाच. तो पुणे विद्यापीठात हिंदी एम.ए. झालाय. प्राध्यापकीसाठी आवश्यक असणारी नेट परीक्षाही पास झालाय. पण सध्या तो स्पर्धा परीक्षेचा कसून अभ्यास करतोय. दरम्यान प्राध्यापकाची नोकरी मिळाली तरी तो स्पर्धा परीक्षेची तयारी सोडणार नाही. कारण त्याला त्याच्या जिल्ह्यात जाऊन प्रशासन अधिकारी बनायचं. त्याच्या गावात धड रस्ते नाहीत. दवाखाना नाही. शाळा नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. गावात या पायाभूत सुविधा नेण्यासाठी, दुर्गम भागात राहणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवांच्या विकासासाठी त्याला झटायचंय.

बोलता बोलता गौतम बनसोडेला आपल्या गावच्या मित्रांची आठवण होते. ‘गावातल्या नापास मुलांनाही अशा शिक्षणाची संधी मिळायला पाहिजे होती. त्यांनाही कुणी तरी व्यावसायीक शिक्षणासाठी मदत करायला पाहिजे होती. स्ट्रगलच्या काळात मदतीची खरी गरज असते. इथलं आमचं सुविधाजनक शिक्षण संपल्यावर खरी लढाई सुरू झाली. पुण्यात राहायला जागा नाही. खर्च करायला पैसे नाही. हाताशी कुठलीही नोकरी नाही. आम्ही मुलं पुणे विद्यापीठात ‘पॅरासाईट’ म्हणून राहिलो. कधी वसतीगृह अधिक्षक आला तर गच्चीवर पाण्याच्या टाकीआड जाऊन लपायचो. तिथंच झोपायचो. असे दिवस काढले. आता पुण्यात स्वत:चं घर घेतलंय.’

अशाच दिवसांबद्दल सांगितलं बाबासाहेब हरीभाऊ दूधभातेनं. लातूरच्या हसलगन, गावातला दूधभाते सध्या पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात सहाय्यक प्राध्यापक आहे. वाघोलीची संस्था सोडल्यानंतर त्यालाही हलाखीत दिवस काढावे लागले. त्यानं ‘कमवा आणि शिका’ योजनेमध्ये काम केलं. विद्यापीठाच्या गेटवर एक एसटीडी बूथ होतं. दिवसभराची लेक्चर्स संपली की रात्री उशीरापर्यंत या बूथवर थांबायचं काम केलं. तो सांगतो, ‘गावी आईवडील आहेत. शेती करतात. धाकटा भाऊ इथंच एम.एस्सी. बीएड. शिकून गावी गेलाय. मीही गावी जातो अधूनमधून. पण पूर्वीचं गाव आता राहिलेलं नाही. माझ्या लहानपणी गावात चौसोपी घरं, दारापुढं निजामकालीन आड आणि भलीमोठी बारव, बुरुज, वडापिंपळाची झाडं, त्यांच्या भोवतीचे दगडी पार, मन प्रसन्न करणारी मंदिरं होती. भूकंपानं हे सारं मातीआड लोटलं. आमचं बाळपणच हिरावून घेतलं म्हणा ना. आता माळरानावर सिमेंटची घरं उभी राहिलीत. त्यांच्यात फार जीव रमत नाही. असो. पण या संस्थेच्या माध्यमातून आमचे गावचे ऋणानुबंध अधिकच घट्ट झालेत. भूकंपग्रस्त भागातील प्रत्येक गावातील एक तरी मुलगा वसतीगृहात होता. त्यामुळं आजही कुठल्याही गावात जा. आपुलकीनं विचारपूस होते. आग्रहानं आणि मायेनं दोन घास खाऊ घातले जातात. आम्ही सर्वांनी मिळून ‘मराठवाडा भूमिपुत्र संघटना’ स्थापन केलीय. दर दिवाळीत आम्ही गावाकडं ‘गेट टुगेदर’ करतो. संघटनेच्या माध्यमातून गावी सरकारी योजना पोचवण्याचा प्रयत्न करतो.

आत्तापर्यंत आम्ही गावच्या दोन हजार मुलांना मदत केलीय. आता भारतीय जैन संघटनेच्या सहकार्यानं आमच्या भूमिपुत्र संघटनेचं काम वाढवणार आहोत.
पुनर्वसनाचा हा सारा पसारा उभा करणारे शांतिलाल मुथ्था 20 वर्षांपूर्वीचा सगळा पट उलगडून दाखवतात. त्यांनी आपल्याला थोरल्या भावासारखा आधार दिला म्हणून सगळी मुलं त्यांना ‘भाऊ’ म्हणतात. जन्मानंतर सहा महिन्यांनी आई गमावलेल्या शांतिलाल यांनी स्वत: पोरकेपण अनुभवलंय. तेही बीड जिल्ह्यातल्या पाटोदा गावचे. त्यांचं सगळंच शिक्षण होस्टेलमध्ये झालं. ते बीडमधील एका जैन विद्यार्थी वसतीगृहात राहायचे. वसतीगृहाला डोनेशनची गरज असायची. त्यासाठी विद्यार्थ्यांना लग्नात वाढपी म्हणून काम करायला लागायचं. शांतिलालभाऊंनी हे काम केल्यामुळं लग्नामध्ये किती अनाठायी खर्च येतो, हे त्यांनी अनुभवलं. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्रात सामुदायिक विवाहाची चळवळ उभी केली. सर्व जातीधर्माचे हजारो सामुदायीक विवाह घडवून आणले. त्यासाठी महाराष्ट्रभर फिरले. गावोगावी जैन संघटनेचे कार्यकर्ते उभे केले. लातूर भूंकपग्रस्तांच्या मदतीला हेच कार्यकर्ते धावून आले. 1985मध्ये त्यांनी स्थापन केलेली ‘महाराष्ट्र जैन संघटना’ पुढीला काळात ‘भारतीय जैन संघटना’ बनली.

शांतिलालभाऊ सांगतात, ‘‘असं काम करताना तुम्हाला खूपच ‘पेशन्स’ आणि सातत्य ठेवावं लागतं. अशा कामांमध्ये आपण कल्पनाही करत नाही, अशा अडचणी येतात. उदाहरणंच सांगायची तर अलिकडंच आम्ही मेळघाटाच्या कुपोषणग्रस्त आदिवासी भागातून साडेतीनशे मुलं पुण्यात शिकायला आणली. यात प्रामुख्यानं ज्यांना आई वडील नाहीत, अशी मुलं होती. काही दिवसांनी असं लक्षात आलं की तिथून आणलेली सातवी, आठवी, नववीची मुलं 10वीत पासच होत नाहीत. आठवी, नववीतील या मुलांना स्वत:चं नावसुद्धा लिहिता येत नव्हतं, असा मेळघाटातल्या शिक्षणाचा दर्जा. यामुळं आमच्या निकालाची टक्केवारी खूप घसरली. पण यातून आम्ही शिकलो. सध्या मेळघाट आणि ठाणे कोसबाडमधील आदिवासी मुलं इथं शिकायला आणतो पण अगदी पाचवीपासूनच. त्यांचा शैक्षणिक पायाच भक्कम करतो. त्यामुळं आता आमचा दहावीचा निकाल 97-98 टक्के लागतो. हे झालं संस्थांतर्गत अडचणीचं उदाहरण.

दुसरं उदाहरण राज्यकर्ते कसे वागतात, त्याचं. तामीळनाडूत त्सुनामीचं संकट आलं तेव्हा आम्ही कार्यकर्ते मदतीला धावून गेलो. वाघोलीप्रमाणंच तामीळनाडूत पुनर्वसन केंद्र उभारायचं आम्ही ठरवलं. त्यासाठी समाजातील लोकांची जागाही मिळवली. प्रकल्प उभारणीचा खर्चही आम्हीच करणार होतो. पण मुख्यमंत्री जयललितांनी या प्रकल्पाला परवानगी दिली नाही. आमच्यासोबत स्वत: शरद पवारसाहेब जयललितांकडे आले. त्यांच्यासमोर जयललिता ‘हो’ म्हणाल्या. पण नंतर त्यांनीच विविध परवानग्या अडवल्या. आता यासाठी आम्ही चेन्नई हायकोर्टात याचिका दाखल केलीय.
तसाच अनुभव जम्मू काश्मीर भूकंपाच्या वेळचा. 2005मध्ये तिथली 500 भूकंपग्रस्त मुस्लिम मुलं आम्ही शिकायला पुण्याला आणली. सोनिया गांधींनी स्वत: श्रीनगरला येऊन या मुलांच्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. मुलांनी इथं शिकायचं आणि परीक्षा तिकडं जाऊन द्यायची, अशी योजना होती. अभ्यासक्रमातील भाषेतवगैरे फरक पडायला नको म्हणून आम्ही तिथले शिक्षक मुलांसोबत आणले. ही प्रक्रिया खूपच यशस्वी झाली. मुलांनी पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये जाऊन परीक्षा दिली. पण त्यानंतर कुठं तरी माशी शिंकली. तिथल्या लोकांनी आमची मुलं पुन्हा महाराष्ट्रात नेऊ नयेत म्हणून तिथल्या सरकारच्या विरोधातच याचिका दाखल केली. अगदी त्यात बारकौन्सिलही सहभागी झालं. त्यामुळं त्या मुलांना काही परत आणता आलं नाही!

अशा नाना प्रकारच्या अडचणी येतात. पण आम्ही त्यामुळं डगमगत नाही. पुन्हा नव्या जोमानं काम करायला सुरुवात करतो. म्हणून तर आम्ही आपत्तीच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अथकपणे काम करतो. मदतकार्याची मोहीम फत्ते करतो. आता तर आमचे हक्काचे आणि प्रशिक्षित सैनिक या कामासाठी तयार झालेत. ते म्हणजे आमच्या वसतीगृहातले विद्यार्थी. इथं शिकून मोठे झालेले हे विद्यार्थी स्वेच्छेनं नैसर्गिक आपत्तीच्या मदतकार्यात सहभागी होतात. आम्ही वर्षानुवर्षे निष्ठेनं केलेल्या कामाचं हे फळ आहे. माणसाला आयुष्यात आणखी काय पाहिजे?’’

आठवण लातूर भूकंपाची
  • 8 हजार लोक मृत्यूमुखी
  •  16 हजार लोक जखमी
  •  16 हजार जनावरांचा मृत्यू
  •   52 गावं जमीनदोस्त
  •   30 हजार घरं भुईसपाट
  •  3 लाख लोक बेघर


भारतीय जैन संघटनेचं आपत्तीग्रस्तांसाठी काम
संघटनेनं लातूर भूकंपाच्या पहिल्या दिवसापासून महिनाभर रोज सुमारे 10 हजार लोकांची जेवणाची सोय केली. त्यासोबतच कपडे आणि संसारपयोगी वस्तूंचं वाटप, मृतदेहांचं सामूहिक दहन अशी कामं युद्धपातळीवर केली. मुलांना शाळेसाठी पुण्यात आणण्याचं काम मुख्यमंत्री शरद पवार यांच्या सहमतीनं केलं.

इतर ठळक कामे
 
·        1993 - लातूर भूकंप – 1200 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पुनर्वसन. पाचवी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा
·        1997 – मेळघाट पुनर्वसन प्रकल्प – 350 मुलांची 10 वर्षांची शिक्षणाची सुविधा
·        1997 – जबलपूर भूकंप – 50 मुलांचं शैक्षणिक पुनर्वसन
·        2001 – गुजरात भूकंप – 90 दिवसांत 368 शाळांची उभारणी करून सरकारकडं हस्तांतरीत
·        2002 – अकोला पूर – 15 हजार पूरग्रस्तांसाठी तात्पुरता निवारा उभारणी
·        2004 – त्सुनामी – 6 कॅम्पच्या माध्यमातून तामीळनाडूत 11 शाळा आणि 34  प्राथमिक आरोग्य केंद्रांची एका वर्षात अंदमान आणि निकोबार बेटांवर उभारणी
·        2005 – जम्मू आणि काश्मीर भूकंप – सुमारे 15 हजार भूकंपग्रस्तांसाठी 870 प्री फॅब्रिकेटेड (PRE-FABRICATED) घरांचा पुरवठा
·        2005-06 महाराष्ट्रातील पूर – पूरग्रस्तांना संसोरोपयोगी साहित्याचं वाटप
·        2008 – बिहार पूर – 181 दिवसांमध्ये दीड लाख पीडितांवर औषधोपचार
·        2013 – महाराष्ट्रातील दुष्काळ – बीडच्या दुष्काळग्रस्त भागात 115 तळ्यांची खोदाई. सात जिल्ह्यात 28 जनावरांच्या छावण्यांची उभारणी आणि व्यवस्थापन