'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Friday, 30 September 2016

माओ घ्यावा पारखून

सध्या मुंबई 'जनशक्ती'चे कार्यकारी संपादक असणारे आमचे मित्र पुरुषोत्त्तम आवारे पाटील गेल्या काही वर्षांपासून रोखठोक नावाचा दिवाळी अंक ठोकून चालवितात. २०१३चा अंक नक्षलवादावर होता. त्यात मी माओ त्से-तुंगवर लिहिलं होतं...


भर मे महिन्यात निसर्गरम्य दार्जिलिंगमधल्या सिलीगुडी परिसरातली जवळपास ६० खेडी पेटून उठली होती. एरवी डोंगरखोर्‍यांत जगाच्या नजरेआड जगणारे संथाळ, ओराओं, मुंडा, राजवंशी आदी आदिवासी हातात बंदुका नाचवत घोषणा देत होते. त्यांच्या घोषणा होत्या, ‘माओ त्से-तुंग झिंदाबाद’.. ‘सशस्त्र क्रांतीने सत्ता संपादन’... ‘बंदुकीच्या नळीतूनच क्रांती जन्माला येते’... आदिवासींच्या या उठावामागे होती मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पक्षाची नक्षलबारी शाखा. विशेष म्हणजे या शाखेने या आंदोलनात मध्यवर्ती पक्षाला डावलले होते. ही सगळी खेडी चीनच्या सरहद्दीजवळ असल्याने सगळ्या देशाचे लक्ष तिकडे लागले होते. साल होते १९६७!

पोलिसांनी या बंडाचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला खरा पण, तेव्हा देशाच्या एका कोपर्‍यापडलेल्या त्या आगीच्या ठिणगीने आज देशातील १० राज्ये आणि ८२ तालुके पेटवलेत. त्या वणव्याला म्हणतात, 'नक्षलवाद!' या शब्दाचा इतिहास काहिही असो पण, भारतात त्याला समानअर्थी शब्द आहे, 'माओवाद!' माओ त्से-तुंगचे भक्त म्हणजे 'नक्षलवादी!' हा माओ म्हणजे आधुनिक लाल चीनचा शिल्पकार, मुत्सद्दी आणि लेनिन-मार्क्सवादी विचारसरणीचा महान पुरस्कर्ता. श्रमिक, कष्टकरी समाजाचे राज्य आणण्याच्या घोषणा देत चीनवर एकछत्री अंमल बसवणारा कम्युनिस्ट नेता. पुढे जगभरातील हुकुमशहांमध्ये ज्याची गणना अग्रभागी होऊ लागली त्या माओची जडणघडण मात्र लोकशाहीवादी विचारांत झाली.

२६ डिसेंबर १८९३ रोजी माओ हुनान प्रांतातील शाव-शान या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मला. वडिलांसोबत तो शेतीत राबला. आजोळी माध्यमिक शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथे त्याची कथा, कादंबरी आदी साहित्य आणि वृत्तपत्र लेखनाशी परिचय झाला. राष्ट्रवादी विचारांनी प्रेरीत होऊन १९११ च्या क्रांतियुद्धात तो स्वयंसेवक म्हणून लढला. शिक्षण घेत असताना त्याने हक्सली, मिल, डार्विन, एडम स्मिथ आदी विचारवंतांचे साहित्य वाचले. त्यामुळे त्याला आधुनिक पाश्चात्त्य विचारप्रवाहांचा चांगला परिचय झाला. यानंतर काही काळ त्याने पीकिंग विद्यापीठाच्या ग्रंथालयात कारकून म्हणून काम केले. अध्यापन विद्यालयात शिकत असताना त्याने विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामाचे पहिले धडे गिरवले. माओने  १९१९ मध्ये स्यांग-ज्यांग-फींग-ल्वुन- हे मासिक काढले. त्यात त्याने छांगशाचा लष्करी गव्हर्नर जांग ज्यींग-याव याच्या अन्याय्य कारभारावर कडक टीका करणे सुरू केले. अर्थात त्याला त्यामुळे तेथून पळ काढावा लागला. याच काळात विद्यापीठाचे ग्रंथपाल ली दा-जाव यांच्याशी माओचा घनिष्ट संबंध आला. त्यांच्यामुळेच त्याचा मार्क्स-लेनिन वगैरेंच्या लिखणाशी आणि ओघानेच कम्युनिस्ट चळवळीशी संबंध आला. त्यानंतर तो या चळवळीत सक्रीय सहभागी झाला.
शांघाय येथील चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या १९२१मधील पहिल्या अधिवेशनाला माओ हुनान प्रांताचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होता. हुनान शाखेचा चिटणीस म्हणून त्याने पक्ष प्रचाराचे काम केले. एका खाणीत संप घडवून आणल्यामुळे त्याच्यावर पकड वॉरंट निघाले. त्यामुळे तो शांघायला सटकला.


या काळात जगभरातील कम्युनिस्ट चळवळ रशियातील पक्षप्रमुखांच्या आदेशावर चालत असे. अविकसित देशांतील कम्युनिस्टांनी तेथील राष्ट्रवादी पक्षांशी सहकार्याचे धोरण ठेवावे, ह्या लेनीनच्या तत्त्वानुसार माओने काही काळ क्वोमिंतांग या पक्षाचे काम केले. त्या माध्यमातून त्याने शेतमजुरांच्या संघटना उभारण्यास प्राधान्य दिले. जमीन वाटपाचा प्रश्न सुटल्याशिवाय उद्योग आणि व्यापार यांचा विकास होणार नाही, असे या काळात त्याचे ठाम मत बनले. त्यावरहुनानमधील शेतकरी चळवळीचा अहवालहा लेखही त्याने प्रसिद्ध केला. शहरांमधील कारखान्यांतील संघटित कामगार कोणत्याही देशात कम्युनिस्ट क्रांती घडवून आणू शकतील, असा रशियामान्य सिद्धांत होता. नेमका त्याविरुद्धसंघटित शेतमजूरच चीनमध्ये क्रांती घडवून आणतील’, असे माओने त्याच्या अहवालात म्हटले. त्यावरून चिनी कम्युनिस्ट पक्षात १९२७ मध्ये वादंग माजला. माओचे मत फेटाळण्यात आले. यानंतर क्वोमिंतांग शासनाने कम्युनिस्टांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली. त्यामुळे चिनी कम्युनिस्ट पक्षाची दाणादाण उडाली. तरीही कम्युनिस्ट पुढारी मॉस्कोच्या सूचनांनुसार शहरी कामगार संघटनांच्या माध्यमातून क्रांती घडवण्याची भाषा बोलत होते. माओने मात्र गनिमी काव्याचा आधार घेतला. हुनान किआंगसी प्रांताच्या सरहद्दीवरील दऱ्या-खोऱ्यात त्याने आपले कम्युनिस्ट सैन्य गोळा केले. तेथून तो चळवळीची सूत्रे हलवू लागला. माओच्या संघटना कौशल्यामुळे चीनच्या या भागात जणू लहान लहान स्वायत्त कम्युनिस्ट राज्येच निर्माण झाली.

माओने जनयुद्धाचे तंत्र अवलंबले. शस्त्रास्त्रे आणि त्यांचे संपादन यापेक्षा क्रांतीच्या राजकीय विचार-प्रणालीने प्रभावित झालेल्या मनुष्यबळाला त्याने अधिक महत्त्व दिलेसरंजामशाहीविरूद्ध चळवळ उभी करणे हेच माओचे मुख्य ध्येय बनले.
सत्ताधारी चँग कै-शेकने मात्र कम्युनिस्टांना संपवण्याचा विडाच उचलला. सुमारे तीन लाख सैन्याने घेरले असता ३६८ दिवसांत सुमारे साडेनऊ हजार किलोमीटरचे अंतर कापून, अनेक हाल अपेष्टांना तोंड देऊन कम्युनिस्टांनी शन्सी प्रांतातील दर्‍याखोर्‍यां आणि गुहांत आपली ठाणी प्रस्थापित केली.
माओ-त्से-तुंगला युद्धाद्वारे केवळ प्रस्थापित राजकीय सत्ता नष्ट करायची नव्हती तर, व्यापक सामाजिक क्रांती घडवून आणावयाची होती. माओच्या मताप्रमाणे चिनी क्रांती ही मुख्यत: शेतकर्‍यांची क्रांती आहे. शेतकरी हाच माओचा गनिमी सैनिक आहे. शेतकरी आणि सैनिक यांच्यात त्याने फरक केला नाही.



गनिमी युद्ध लढतानाही माओने काही सूत्रे मांडली होती. निश्वित राजकीय ध्येय, या ध्येयात जनतेच्या आकांक्षा प्रतिबिंबित व्हाव्यात, सैनिकांची शिस्त स्वयंस्फूर्त असावी, सैनिक आणि जनता यांच्यात एकजूट असावी म्हणजे जनता ही सागरासारखी असून गनिमी सैनिक हे त्यातील माशांप्रमाणे असावेत.
गनिमी सैनिकांची भरती करताना माओने जनतेमधून गनिमी दल उभे करणे, शेतकऱ्यांनाच सैनिक बनवणे, शत्रुसैन्यातून फुटून आलेल्यांना सामावून घेणे, लुटारू-दरोडेखोरांनाही सामावून घेणे, स्त्रियांची लढाऊ दले तयार करणे अशा बाबींवर भर दिला.

अखेर कम्युनिस्टांच्या चिवट आणि गनिमी काव्यापुढे शैकचा पराभव झाला. हा २२ वर्षांचा चीनचा इतिहास म्हणजे माओच्या ध्येयधोरणांची कथाच आहे. यांपैकी १० वर्षे माओ कम्युनिस्ट पक्षाचा अध्यक्ष आणि राष्ट्रप्रमुख होता. साहजिकच चिनी प्रजासत्ताकाची उभारणी करण्याचे बरेच श्रेय त्याच्याकडेच जाते.
माओने अमेरिकेशी जुळते घेण्याच्या ख्रुश्चेव्ह नीतीला कसून विरोध केला. त्यानेलाल सैनिकआणि चिनीजन मुक्तिसेनायांच्या मदतीनेसांस्कृतिक क्रांतीघडवून आणली आणि चिनी कम्युनिस्ट पक्षातील विरोधी गटांचा बीमोड केला. चीनमध्ये माओवादाचा विजय झाला. त्यामुळे जवळजवळ अर्धशतक चीनवर माओचाच एकछत्री अंमल राहिला. या काळात त्याने अनेक अभिनव प्रयोग जनतेच्या गळी उतरवले. प्रभावी प्रचारतंत्र, दडपशाही, परिश्रम इत्यादींच्या बळावर त्यांनी चीनची नवनिर्मिती सुरू केली.

जमीनदारी, अज्ञान, गरिबी, उपासमार, रोगराई हे शतकानुशतके चीनचे प्रमुख प्रश्न होते. त्यामुळे शिक्षणप्रसार, रोगनिर्मूलन, कृषिविकास आणि औद्योगिकीकरणाच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या गेल्या. सामाजिक सुधारणा सांस्कृतिक विकासाकडेही त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. प्रजेला पोटभर अन्न पुरविण्यासाठी सरंजामदारी नष्ट करून जमिनीच्या फेरवाटणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. जमिनीचे सामाजिकरण करण्यात येऊन कम्यूनमार्फत कृषिउत्पादन होऊ लागले. नागरिकांचे आरोग्य सुधारण्याकडेही लक्ष पुरविण्यात आले. पाश्चात्त्यांचा प्रभाव नष्ट करण्यासाठी प्रार्थना मंदिरांमध्ये चिनी धर्मगुरूच नेमले गेले, त्यामुळे परदेशी मिशनऱ्यांना चीन सोडावा लागला.

रशियाच्या सहाय्याने अनेक प्रकल्प राबवण्यात आले. शिक्षणक्षेत्रात अमूलाग्र बदल करण्यात आला. पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला. शतकानुशतके कन्फ्यूशसच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेला आणि पाश्चात्त्यांच्या संपर्काने भांबावलेला परंपरावादी चिनी समाज संपूर्णपणे बदलून माओप्रणीत समाजवादी तत्त्वज्ञान अंगी मुरलेला नवा समाज निर्माण करण्यासाठी चीनमधील कुटुंबपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचे कम्युनिस्टांनी ठरविले. त्यासाठी स्त्रीदास्यविमोचनाचा कार्यक्रम त्यांनी आखला. स्त्रियांवरील परंपरागत बंधने नष्ट करून त्यांना पुरूषांच्या बरोबरीने सर्व हक्क बहाल करण्यात आले.


नवसमाजनिर्मितीच्या कार्यास साहित्यादी कलांचीही मदत व्हावी, म्हणून कलावंतांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. मात्र ती कलाकृती कम्युनिस्टांच्या निकषावर तपासून घेण्याची दक्षता घेण्यात आली.
ऑगस्ट १९५८ मध्ये हाती घेण्यात आलेली कम्यूनच्या स्थापनेची चळवळ म्हणजे माओवादी समाजाचे आदर्श ग्रामीण स्वरूप होय. अनेक खेडी सामूहिक शेती संघ, उद्योग शासन यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी निर्माण केलेली संघटना म्हणजे कम्यून. प्रत्येक कम्यून एक छोटे लोकशाही संस्थानच. यात शेती, धान्यवाटप, पगार वगैरे जनमताने चालावेत अशी सोय केली गेली. टीकाकारांनी कम्यून म्हणजे मोठे तुरूंग आहेत, अशी टीका केली.
माओ आणि त्यांच्या समर्थकांनी जमीनदारांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेऊन त्या शेतकर्यांना वाटण्यास सुरूवात केली. अर्थात हे करताना चीनमध्ये प्रचंड रक्तपात झाला.

भारतातील माओवाद्यांना चीनमधील हीच क्रांती इथेही आणायची आहे. त्यासाठी त्यांनी योजना तयार केली आहे. त्यामधील काही मुद्दे असे आहेत -
- सध्याची राजकीय, आर्थिक आणि संपूर्ण सांस्कृतिक व्यवस्था नष्ट करून त्या जागी नवीन माओवादी व्यवस्था स्थापन करणे.
- शस्त्रबळावर राजकीय सत्ता कब्जात घेणे. बंदुकीतूनच सत्ता प्राप्त करणे. त्यासाठी माओवादी लष्कर उभारणे. त्यामाध्यमातून प्रदीर्घ लढा उभारणे.
- जिथे सरकार कमजोर आहे, अशा दुर्गम भागात प्रथम आपले सुरक्षित तळ उभारणे. नंतर शहरांना वेढा घालून, शहरे तसेच ग्रामीण भाग ताब्यात घेणे.
- समाजाला प्रेरित, एकत्रित करून, लढाईत सहभागी करून घेणे. हेच प्रदीर्घ युद्धाचे स्वरूप असेल.
- माओवादी पक्ष, लष्कर आणि अनेक माओवादी फ्रंट संघटनांची संयुक्त आघाडी ही तीन हत्यारे. माओवादी पक्ष हाच लष्कर आणि संयुक्त आघाडीचे सूत्रसंचालन करेल.
- कामगार, शेतमजूर आणि शहरी मध्यमवर्ग यांना संघटित करून माओवादी संघटना स्थापन करणे. विविध माओवादी फ्रंट संघटनांना एकत्र करून माओवादी संघटनांची संयुक् आघाडी स्थापन करणे.
- माओवादी क्रांतीसाठी समाजाला संघटित करणे हाच माओवादी संयुक्त आघाडीचा प्रमुख उद्देश.
- युद्ध हेच संघर्षाचे मुख्य स्वरूप आणि माओवादी लष्कर हीच मुख्य संघटना. फ्रंट संघटना आणि जनआंदोलनाने युद्धाला मदत करणे अभिप्रेत आहे.
- युद्धात नवीन सैनिकांची भरती आणि इतर सर्व प्रकारची मदत करणे हा माओवादी फ्रंट संघटनांचा उद्देश.
- माओवादी पक्षात आणि लष्करात सतत नवीन भरती होत राहावी म्हणून समाजातील विशिष्ट घटकावर लक्ष केंद्रित करणे. त्यासाठी स्त्रिया, दलित, आदिवासी आणि मुसलमान या सामाजिक घटकांकडे लक्ष देणे.
- विविध संघटनांच्या माध्यमातून वरील घटकांची अनेक जनआंदोलने सुरू करणे. विशेषत: दलितांवर लक्ष केंद्रीत करणे. त्यांच्या नेत्यांचा संधिसाधूपणा उघड करणे.
काश्मीर आणि ईशान्य भारतातील फुटीरवादी संघटनांना खंबीर समर्थन देणे. या संघटनांच्या स्वयंनिर्णयाच्या आणि भारतापासून स्वतंत्र होण्याच्या अधिकाराला मान्यता देणे. त्यांना एकत्र करून एक लढाऊ संयुक्त आघाडी उभी करणे.
आता, हे विचार ज्या माओकडून घेतले गेले तो माओ प्रत्यक्षात जे जगला ते जगातील कुठल्याही क्रूर हुकुमशहापेक्षा कमी नव्हते. उलट काकणभर अधिकच होते.
सैन्यात भरती होण्यासाठी शेतकर्‍यांना शेतजमीन देण्याची लालूच दाखवणार्‍या माओने नंतर त्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेतमालकांना आणि श्रीमंतांना झोडपून काढण्यासाठी शोषित वर्गाला चिथावणी दिली. त्यात लाखो हत्या झाल्या. नवीन राज्यघटनेत कागदोपत्री सर्व नागरिकांना समान हक्क, विचार, विहार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले गेले. प्रत्यक्षात मात्र माओने लोकशाहीचा खूनच केला. टीका करणार्‍यांचा बिमोड केला. पत्रकारितेवर कुर्‍हाड चालवली. राष्ट्रासाठी जनतेला त्याग करायला सांगणार्‍या माओने स्वतः मात्र अमर्याद राजेशाही सुखे उपभोगली. स्वतःसाठी तब्बल ५४ प्रासाद बांधले. घटस्फोट घेणे हे पाप असल्याचे सांगणार्‍या माओने स्वत: कमालीचा स्वैराचार केला.
पीपल्स लिबरेशन आर्मी या जगातील सर्वात मोठ्या लष्कराच्या बळावर आपली सत्ता अबाधित ठेवली. अमानुष छळ करणार्‍या कैद्यांच्या छळछावण्या उभारल्या.


माओने १९५१मध्ये कोरियन युद्धात साम्यवादी किम जाँगला पाठिंबा दिला. त्यातून उत्तर कोरियाला झुकवले. लोह उत्पादन वाढवून चीनला महासत्ता बनवणे आणि सामुदायिक शेती हे त्याचे दोन्ही प्रयोग फसले. यात लाखो लोकांना जीव गमवावा लागला. समाजातील बुद्धीजीवी वर्गाला दडपशाहीच्या वरवंट्याखाली आणले.

चीनमधील प्रत्येक गोष्ट भव्य दिव्य करण्याचा त्याने प्रयत्न केला. तिआनमेन हा हा जगातला सर्वात मोठा चौक करण्यासाठी त्याने हजारो घरे बळजबरीने जमीनदोस्त केली. तिथे १०० एकर मैदान तयार केले. मैदानाच्या पश्चिमेला १० हजार आसनक्षमतेचे जनता दालन बांधले. १९६६मधील सांस्कृतिक क्रांतीमध्ये शांघायमधील बुद्ध पॅगोडावरही टाच आली.

भारत आणि त्याच्या संबंधाबद्दल बोलायचे म्हटले तर, १९३५मध्ये माओचे लाल सैन्य जपानी आक्रमकांशी झुंज देत असताना त्यांची सेवा करण्यासाठी भारतीय डॉक्टर्स तिकडे गेले. नेहरूंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन डॉ. द्वारकानाथ कोटणीस तिथे गेले. त्यांच्या कामाबद्दल माओने त्यांचे आभारही मानले. अर्थात याच चीनने १९६२मध्ये भारतावर एकतर्फी आक्रमण करून भारताचा १५ हजार चौरस मैलांचा मुलुख ताब्यात घेतला.

१९७६ साली ८२ वर्षीय माओचे निधन झाले. त्याच्या इच्छेनुसार लेनिनप्रमाणेच त्याचे शव रासायनिक संस्कार करून तियानमेन चौकात काचेच्या पेटीत ठेवण्यात आले.

सध्या चीन जगातील दुसर्‍या क्रमांकाची आर्थिक महासत्ता आहे. त्याचे श्रेय जाते डेंगने खुल्या केलेल्या अर्थव्यवस्थेला. त्याने पहिल्यांदा माओच्या विचारांना, त्याच्यासर्व सरकारी मालकीचेया तत्त्वाला तिलांजली दिली. त्यामुळेच चीन महासत्ता बनला.

भारतात माओच्या विचारांतून क्रांती आणू पाहणार्‍यांनी माओवादाच्या या प्रवासाकडे डोळसपणे पाहणे आवश्यक आहे.


Thursday, 29 September 2016

जगायला शिकवणारा देव

जुलै २०१३च्या आषाढी एकादशीला 'गोवादूत'मध्ये छापून आलेला लेख...

वारकर्‍यांचा देवच मुळी समता, बंधुता, समन्वयाचं तत्त्वज्ञान रुजवणारा आहे. पंढरपुरात कटेवर कर ठेवून उभा राहिलेला विठोबा म्हणजे रोजचं जगणं सोपं करणारा, बंधुभावानं जगायला शिकवणारा अनाथांचा नाथ. हा लोकांनी लोकांसाठी उभा केलेला लोकदेव आहे.




चैत्र-वैशाखी उन्हाच्या रणरणत्या लाह्या रानभर फुटत असतात. आभाळाकडं तोंड करून तापत पडलेल्या रानाची तगमग-तगमग होत असते. एका दुपारी अचानक सोसाट्याचा वारा सुटतो. पालापाचोळा गोल गोल फिरत आभाळात जातो. कुठल्याशा कोपर्‍यातून एकेक ढग जमा होतो. त्यांचं क्षणात पांढर्‍यातून काळ्यात रुपांतर होत राहातं. चकीत होऊन पाहणार्‍या रानाच्या अंगाखांद्यावर टप् टप् करत वळवाचे टप्पोरे थेंब पडतात. त्या थंड स्पर्शानं हळू-हळू कड्या-कपारीच्या आडून पोपटी कोंब डोकावू लागतात. ज्येष्ठ-आषाढाची हिरवाई रानावर दिसू  लागते. अशा वेळी या हिरव्या रानात दूरवर एक पांढरा ठिपका दिसतो. एका ठिपक्याचे दोन, दोनाचे पाच, पाचाचे दहा ठिपके होत होत ठिपक्यांची लांबच लांब रांग हळू हळू जवळ येते. टाळ-मृदुंगाचा आवाज मोठा होत जातो. कपारीआडून बाहेर डोकावू लागलेली कोवळी पानं टाळ्यांचा ताल धरतात. मृदुंगाच्या धुमाळीवर रस्त्याकडेची झुडपं अंग घुसळू लागतात. ''वारी आली..माऊली आली..पालखी आली...'' वाटेवरच्या गावात चैतन्य जागतं. माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्यायला झुंबड उडते...

विठुरायाच्या पंढरीला निघालेली ही आषाढी वारी! सार्‍या मर्‍हाटी मुलुखाचा भावसोहळा. मराठी माणूस जगभर जिथं आहे तिथून तो काया, वाचा, मनानं या चैतन्य-सोहळ्याला जोडला जातो. 'ज्ञानबा-तुकाराम'च्या ठेक्यावर दुडक्या चालीनं पंढरीची वाट चालू लागतो.

दरवर्षी न चुकता लाखो भाविक संताच्या पादुका पालखीत ठेवून नाचत गात पंढरपूरला जातात. ते नित्यनेमाने अशा येरझारा घालतात म्हणून त्यांना म्हणतात, वारकरी. खेडोपाड्यांतून आलेल्या असंख्य वारकर्‍यांची मिळून होते पंढरीची वारी! ती कधीपासून सुरू आहे कुणास ठावूक? ज्ञानदेव-नामदेवांच्या आधीपासून ती सुरू आहे म्हणतात. संत तुकाराममहाराज १४०० टाळकर्‍यांसह देहूहून आषाढी वारीला पंढरपूरला जायचे. त्यांच्यानंतर त्यांचे धाकटे सुपुत्र नारायणमहाराज यांनी सध्याचा पालखी सोहळा सुरू केला. तुकोबाराय आणि ज्ञानदेवांच्या पादुका एका पालखीत घालून 'ज्ञानबा-तुकाराम' या भजनाच्या तालावर नाचत शेकडो वारकरी नारायणमहाराजांसोबत पंढरीला जाऊ लागले. म्हणजे १६८० ते १८३५ पर्यंत हा उपक्रम अव्याहत सुरू होता. १८३५मध्ये या दोन पालख्या स्वतंत्र झाल्या. ज्ञानोबारायांची पालखी आळंदीहून सुरू झाली. मराठेशाहीतील शिंद्यांचे एक सरदार हैबतराव बाबा आरफळकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.
न्यायमूर्ती रानडेंच्या निरिक्षणानुसार १०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रभरातून १८ संतांच्या पालख्या पंढरपुराला जात. त्यात काशीहून कबीर आणि कर्नाटकातून विठ्ठल पुरंदर, बोरवणकरबाबा या पालख्यांचाही समावेश होता.

त्यासोबत शंभरावर दिंड्या असल्याची नोंदही त्यांनी केलीय. सध्या तुकोबारायांच्या पालखीसोहळ्यासोबतच्या सुमारे साडेतीनशे दिंड्यांमध्ये साडेतीन लाखांवर वारकरी चालतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोहळ्यात सुमारे ४०० दिंड्या सहभागी होतात. आळंदीला दोन-अडीच लाखांपर्यंत असणारा जनसमूह पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत आठ लाखांवर जातो. वारीसंबंधी पहिली लिखित नोंद म्हणजे पंढरपुरातला १२३७मधला होयसळ राजाचा शिलालेख.
शेकडो वर्षे झाली. काळ बदलला. यंत्रातंत्राचं आधुनिक युग आलं. पण आषाढी वारी सुरु आहे. एका पिढीची जागा दुसरी पिढी घेते.  दर आषाढीला वारीची वाट संतप्रेमानं उचंबळून येते. विठुनामाचा गजर टीपेला पोहोचतो...

भल्या-भल्यांना प्रश्न पडतो, याचं गुपीत काय आहे? हे काही फार मोठं वगैरे गुपीत नाही. समाजातल्या सर्व घटकांना आपल्यात सामावून घेतल्यानंच हा वारीचा ओघ आटला नाही, आटणार नाही हे त्यातलं उघडं सत्य. जातपात, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत, स्त्री-पुरुष असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव वारकरी करत नाहीत.

यात भरडून निघालेल्या बहुजन समाजानं मग त्यांचा स्वत:चा साधासोपा देव शोधला. जो रंगानं त्यांच्यासारखाच काळा,  शांत, सात्वीक भावमुद्रेचा, शस्त्रं टाकून कमरेवर हात ठेवलेला, पूजाविधीचं, भक्तीचं कुठलंही अवडंबर नसलेला देव, पंढरीचा श्री विठ्ठल! विटेवर स्थिर उभ्या राहिलेल्या या देवामुळं शेंदर्‍या-हेंदर्‍या दैवतांचा बाजार कमी झाला. सर्वसामान्यांच्या मनाला गोंधळही दूर झाला. अनेक विद्वान म्हणतात, या देवावर भगवान बुद्धांचा प्रभाव आहे, कुणी म्हणतं जैनांचा प्रभाव आहे तर कुणाच्या मते यावर एकेश्वरवादी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचा प्रभाव आहे. म्हणोत बापडे. ज्या धर्मात, ज्या देवात जे जे काही चांगलं आहे, ते या श्रीविठ्ठलात सामावलं गेलंय, असं आपण खुश्शाल समजावं. या अहिंसावादी, शाकाहारी, दया, क्षमा, शांती सांगणाऱ्या देवानं दीनदुबळ्यांना आधार दिला. त्यांचं आत्मभान जागं केलं. त्यांना आत्मविश्वासानं जगायला शिकवलं. पिढ्यान पिढ्या सामाजिक स्थान नाकारलेल्या, दबलेल्या, पिचलेल्या लोकांचा विठोबा आधार झाला.

आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा दाता।
प्रसवला विश्व तोचि सर्व होय जाणता।।
धर्म गा जागो तुझा। तूचिं कृपाळू राजा।
जाणसी जीवीचे गा न सांगता सहजा।।
असं भोळ्या भक्ताचं गुज जाणून घेणारा हा देव समाजाच्या सर्व थरांत मान्यता पावला. त्याला असा चालता बोलता करण्याचं काम केलं, त्याच्या लाडक्या भक्तानं भक्तानं, संतशिरोमणी नामदेवरायानं. त्यानं या देवाची पताका महाराष्ट्रातच नाही तर दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत संपूर्ण भारतभर फडकवली.

'सकळांसी येथे आहे अधिकार' असं सांगत त्यांनी अधिकारहिनांना भागवत धर्माच्या झेंड्याखाली एकत्र आणलं. या देवाला प्राप्त करण्यासाठी जपतप, यज्ञयाग, करावे लागत नाहीत. व्रत, अनुष्ठानं करायला लागत नाहीत. हिमालयात, काशी-उत्तराखंडात जावं लागत नाही.
न लगती सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण।।
ठायीच बैसोनि करा एकचित्त। आवडी अनंत आळवावा।।
अशी साधीसोपी 'नाम' भक्ती ज्ञानदेव-नामदेवांनी समाजाला सांगितली. म्हणजे आपण जे काम करतो आहोत, त्यातच राम मानायचा किंवा जिथं आहोत तिथंच बसून मनापासून देवाचं नाव घ्यायचं की देव पावतो, याची प्रचिती त्यांना येऊ लागली. त्यामुळं
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम। आणिकांचे काम नाही आता।
असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला.

याच शूद्रातीशूद्र समाजातून मग संत तयार झाले. आपल्या कामातलीच रुपकं वापरून अभंग लिहू लागले. त्यांच्या कामाचा विठोबा त्यांना प्रसन्न होऊ लागला. 'देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार', असं सोनारकीचं काम करता करता संत नरहरी सोनार म्हणू लागले. 'आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक', असं संत सेना न्हावी म्हणू लागले. 'दळिता कांडिता तुज गाईन अनंता' असं संत जनाबाई म्हणू लागल्या. संत सावतामाळी तर याहून पुढं गेले. 'कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी' म्हणत त्यांनी आपल्या हिरव्या शेतमळ्यातच श्री विठ्ठल पाहिला. त्याच्या दर्शनासाठी त्यांना पंढरपूरला जाण्याचीही गरज वाटली नाही.
हा देव केवळ निर्मळ, भोळा भक्तीभाव पाहतो बरं.
उंच नींच काही नेणे भगवंत। तिष्ठे भावभक्ति देखोनिया।।
असं संत त्याच्याविषयी म्हणतात. त्यांनीच त्याबाबतच्या असंख्य कथा लिहून ठेवल्यात.

हा देव संत रोहिदासाला चपलांचं चामडं रंगवू लागला. कबिराला शेले विणू लागला. सावता माळ्याला खुरपू लागला, नरहरी सोनाराला दागिने घडवू लागला. गोरा कुंभाराला मडकी बनवण्यासाठी चिखल तुडवू लागला. चोखोबाला मेलेली ढोरे ओढू लागला. सजन कसायाला त्याच्या मटनाच्या दुकानात बसून मांस विकू लागला...या कथा म्हणजे संतांची अलौकीक प्रतिभाशक्ती. ती जागृत केली नामदेवरायांनीच. केवळ महाराष्ट्रातच नाही तर उत्तर भारतातही. संत कबीर, कमाल, रोहिदास, नरसी मेहता, मीराबाई असे किती तरी थोर संत नामदेवांच्या या शिकवणुकीतून उभे राहिले. याच तत्त्वज्ञानातून शीख धर्माचा पाया घातला गेला.

पुरुषांसोबत स्त्रियाही वारीच्या या ओघात सहज सहभागी झाल्या. नामदेव, चोखोबाच्या कटुंबातील स्त्रिया अभंग लिहू लागल्या. आजही हजारो स्त्रिया संत जनाबाईच्या ओव्या गात पंढरीची वाटचाल करतात. जनाबाईसारखी दासी, कान्होपात्रेसारखी वेश्या विठ्ठलाच्या लाडक्या भक्त होऊ शकल्या. भागू महारीण, संताबाई, वत्सला संतपदाला पोहचू शकल्या.
स्त्रीशूद्रांना असा समान अधिकार देण्याचा प्रयत्न वारकऱ्यांआधी झाला नव्हता असे नाही.
त्यापूर्वी इथं लिंगायत होते. महानुभव होते. बौद्ध होते. जैन होते.  नाथपंथीय होते. त्यांनीच या सामाजिक मंथनाची सुरुवात, मशागत करून ठेवली होती. पण वारकरी पंथ वाढण्याचं आणि टिकण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे या पंथाची सर्वसमावेशकता आणि विनम्रता. अजूनही वारकरी सोबत चालणार्‍याचं ज्ञान, वय, अधिकार तपासत नाहीत. तर ते विनम्र भावनेनं एकमेकांच्या पाया पडतात. प्रेमभरानं आलिंगन देतात. वारकरी परंपरा वर्षानवर्षे चालत राहण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांचं लिखित साहित्य अर्थात अभंग. प्रत्येक वारकरी संताला हलाखी, अवहेलना सोसावी लागूनही या संतांनी आपलं अभंगलेखन थांबवलं नाही. नामदेवांनी शोधलेला हा अभंग छंद एवढा सोपा की, अशिक्षित माणसाचाही तो सहज पाठ व्हावा. त्यामुळं काळाच्या ओघात हे अभंग आणि त्यातलं जगण्याचं सोपं तत्त्वज्ञान 'अभंग' राहिलं. आजही गावोगावच्या मंदिरांमधून सकाळ संध्याकाळ हे अभंग मोठ्या प्रेमानं आणि भक्तिभावानं गायले जातात. बर्‍या-वाईटाचा, नीती-अनितीचा निर्वाळा देताना या अभंगांचे दाखले दिले जातात.

बरं भक्ती करण्यासाठी फार काही सायास करावे लागत नाहीत. कडक आचरण,नियमनियमावल्या पाळाव्या लागत नाहीत. वर नमूद केल्याप्रमाणे आपलं काम करता करता केवळ भावभक्तीनं देवाचं नाव घ्यायचं.
तुकोबारायांनी तर त्यासाठी क्वालिफिकेशनच सांगून ठेवलं आहे,
वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ। त्याच्या गळा माळ, असो नसो।।
कोणाचं वाईट करू नये, कोणाचं वाईट चिंतू नये, सर्वांचं भलं व्हावं अशी इच्छा मनात असणारा माणूस खरा माळकरीच समजावा, असं हे मानवतेचं तत्वज्ञान.


अजूनही विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी, वारकरी होण्यासाठी फार काही सायास करावे लागत नाहीत. त्यासाठी अमूकच प्रकारचे कपडे परिधान करावेत असा आग्रह नाही. अभंग गाण्यासाठी शास्त्रीय संगीताची जाण असण्याची सक्ती नाही. गाणार्‍याच्या मागे म्हटलं तरी पुरे. टाळ वाजवणंही फार सोपं. एका टाळांनं दुसर्‍या टाळावर तीनच ठोके द्यायचे. एका लयीत. पखवाजही तसाच वाजणार. त्याला म्हणायचं भजनी ठेका. लहान पोरालाही तो वाजवता येतो. टाळ वगैरे नसले तर दोन्ही हातांनी टाळी वाजवायची.
नामदेवांनी सांगितलेलं 'नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी' हे उद्दीष्ट वारकरी अजूनही जपतात. कीर्तनकार आपल्या कीर्तनातून समाजातील अनिष्ट प्रवृत्तींवर टीका करतो. चांगुलपणानं वागण्याचं आवाहन करतो. हे कीर्तन कोठेही होऊ शकतं. त्याला बंदिस्त मंदिरच पाहिजे असं नाही.  मोकळ्या पटांगणात, नदीच्या वाळवंटात, वारीच्या वाटेवर, झाडाच्या खालीही कीर्तन रंगतं.
कीर्तन, प्रवचन, भजन, हरिपाठ, काकडआरती, पालखी, दिंड्यांनी वारकरी समुहाला, समाजाला वर्षानुवर्षे एकत्र ठेवलं आहे. एकीची, बंधुभावाची भावना बळकट केली आहे.
इथले डावे विचार असोत की समाजवादी, ते इथं रुजण्यापूर्वीची मशागत वारकरी संतांनीच तर करून ठेवली आहे.

सध्या देशाला लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेत. त्यामुळं जातीधर्माच्या नावावर आपल्या राजकारणाची पोळी भाजू पाहणार्‍यांनी आपापल्या शेगड्या पेटवल्यात. समाजा-समाजांमध्ये कलह लावण्याचा मसाला तयार होतोय. या विघ्नसंतोषी प्रवृत्तींनी एकदा तरी हा आषाढी वारीचा समताबंधुभावाचा निव्वळशंख प्रवाह पाहावा. त्यांची गढूळ दृष्टी स्वच्छ होईल. विठुरायाच्या कृपेनं त्यांची डोकी ठिकाणावर येतील.



Tuesday, 13 September 2016

सांगे भूमीचे मार्दव

आळंदी देवस्थानचे विश्वस्त प्राचार्य शिवाजीराव मोहिते यांच्या आग्रहाखातर चाकणचे मामासाहेब शिंदे यांच्यावरील गौरव विशेषांकात लेख लिहिला होता, माझ्या आजोळाविषयी. खेड अर्थात राजगुरुनगरविषयी. जून २०१४मध्ये लिहिलेला हा लेख आत्ता ब्लॉगवर टाकतोय...


पुण्याहून नाशिकच्या दिशेनं जात असताना वाटेत खेडच्या भीमा नदीवरचा पूल लागतो. गाडीतून पुलाखालचं नदीचं विस्तीर्ण पात्र दिसत राहतं. मी मनोमन हात जोडतो. भावूक होतो. खेड माझं आजोळ. पांढराशुभ्र फेटा घातलेले मायाळू, सावळे आजोबा डोळ्यासमोर तरळतात. आजीचे जिथे अंत्यसंस्कार झाले ती नदीतली जागा मी गाडीतून वळून वळून पाहतो. भीमेच्या याच पुलावर मोटरगाडीला बिचकून आमच्या गाभण गायीनं उडी मारली होती. नदीपात्रात पडताच ती व्याली. गोजीरवाण्या वासराला जन्म देऊन जीव सोडला. त्या वासराचं नाव नंद्या. पुढं तो आयुष्यभर आमच्यासोबत शेतात राबला. माझी नाळच या खेडच्या मातीत पुरली आहे. माऊली-तुकोबारायांची पालखी आषाढी वारीच्या वाटेवर असताना माझा जन्म झाला. हे रम्य आजोळ निवांत क्षणी आठवत राहतं. महानगरी धावपळीतही डोळ्यासमोर येत राहतं. मुंबईत मंत्रालयासमोर गेलो की, मला खेडची हमखास आठवण येते.

मंत्रालयासमोरच्या चौकातून जाताना 'हुतात्मा राजगुरू चौक' नावाची पाटी दिसते. मला खेडचं एसटी स्टँड आठवतं. तिथला छत्रीखालचा हुतात्मा राजगुरुंचा अर्धपुतळा आठवतो. इतिहासाच्या पुस्तकातील भगतसिंग, सुखदेव या क्रांतीकारकांच्या रांगेतील राजगुरू आठवतात. मंत्रालयावर फडकणार्‍या तिरंग्याशी खेडच्या असलेल्या या नात्यानं छाती अभिमानानं फुलून येते. राजगुरूंच्या बलिदानानंतर त्यांच्या स्मरणार्थ खेडचं नाव राजगुरुनगर झालं. त्याही पूर्वी ते होतं प्राचीन समृद्ध नाणेघाट मार्गावरचं खेटकग्राम. याच मार्गानं भारतीय माल परदेशात गेला. उत्तरेतल्या सम्राटांच्या फौजा दक्षिणेत आल्या. त्या अर्थानं परस्पर देवाणघेवाणीतून एक भारतीय आणि जागतीक संस्कृतीच खेडमध्ये रुजली. खरं तर त्याही पूर्वी भीमेकाठचा हा मावळी प्रदेश सर्वांगांनी समृद्ध होता.





या मातीतल्या चिवट मावळयांनीच शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी साथ दिली. आणखी उलगडून सांगायचं तर उत्तम मशागत झालेल्या या मातीतूनच शिवरायांसारख्या रयतेच्या महान राजानं जन्म घेतला. ही मशागत केली होती, संतांच्या विचारांनी. इंद्रायणीच्या काठी जन्मलेल्या संत ज्ञानदेव आणि संत तुकोबांनी अन्यायाविरुद्ध बंडाचा झेंडा उभारण्याचा संदेश दिला. तो सांगण्यासाठी आचार्य अत्र्यांच्या शब्दांचा मोह आवरत नाही. त्यांची सासुरवाडी खेडमधल्या चासकमानची. ते म्हणतात, "धर्ममार्तंडांनी आणि पंडितांनी धर्माची तत्त्वे आणि विद्या ब्राम्हणांच्या किल्ल्यांत आणि संस्कृताच्या कड्याकुलुपात बंदिस्त करून जनतेला वर्षानुवर्षे अज्ञानात आणि दास्यात ठेवले. त्याविरुद्ध ज्ञानेश्वरांनी इंद्रायणीकाठी बंडाचा झेंडा प्रथम उभारला आणि ते ज्ञानाचे आणि विद्येचे भांडार मराठी भाषेत वाहून घरोघर पोहोचते केले. परकीय मोगल सत्तेच्या महापुरात अवघे महाराष्ट्र भूमंडळ बुडून सर्व मराठी बुद्धी आणि कर्तबगारी नामशेष होण्याची पाळी आली तेव्हा त्या सत्तेविरुद्ध बंडाचा भगवा झेंडा तोरणागडावर उभारण्यासाठी हातात भवानी तलवार घेऊन आणि कृष्णा घोडीवर स्वार होऊन महाराष्ट्राचा पहिला बंडखोर छत्रपती अवतीर्ण झाला. वेदस्थापित धर्माचे देव्हारे माजवून, वर्णश्रेष्ठत्वाचे पोकळ नगारे वाजवून, टिळे टोपी घालणार्‍या आणि साधुत्वाचा आव आणणार्‍या दांभिकांनी जेव्हा महाराष्ट्रातील अडाणी बहुजनांना आत्मोद्धाराचे सारे मार्ग बंद करून टाकले, तेव्हा इंद्रायणीच्या काठी भंडा-याच्या डोंगरावर एका देहूच्या वाण्याने बंडाची पताका उभारली आणि नुसत्या नामसंकीर्तनाच्या सामर्थ्यावर वैकुंठपेठ खाली ओढून आणण्याचा अभंगमंत्र महाराष्ट्राला दिला. 

अहो, आम्हा महाराष्ट्रातल्या माणसांचे केवढे हे भाग्य की, इंद्रायणीच्या काठी शूद्र कुळात जन्माला आलेला एक सत्पुरुष गेली तीनशे वर्षे सतत आपल्या हातांनी आमच्या डोळ्यांमधले अश्रू पुसत आहे आणि आपल्या अभंगवाणीने आम्हाला आशा देऊन, धीर देऊन, जागृती देऊन, आमचा उद्धार करीत आहे! या महाराष्ट्रातले लक्षावधी भोळेभाबडे, अडाणी आणि गरीब प्रापंचिक लोक गेली तीनशे वर्षे तुकारामाची भाषा बोलत आहेत आणि तुकारामाचे तत्त्वज्ञान सांगत आहेत. एवढ्या साध्या, सुबोध आणि रसाळ भाषेत संसाराचे सार इतके सोपे करून या जगात कुठे कोणी तरी सांगितले असेल काय हो?’'ज्ञानोबा-तुकोबांच्या या भूमीतूनच स्वराज्याची निर्मिती का झाली, इथूनच पंढपूरची वारी कशी निर्माण झाली, याची उत्तरे अत्र्यांच्या या उस्फूर्त उद्गागारात सापडतात. या बंडाची प्रेरणा पुढे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अगदी हुतात्मा राजगुरु, नारायण मेघाजी लोखंडे, नामदेव ढसाळ यांना मिळाली.





नाशिक हायवेवरून जाताना खेड परिसरातील स्त्याकडेला बाराही महिने जी हिरवीगार शेते डोलताना दिसतात, ती बहरलीत इथल्या माळी आणि शेतकरी समाजाच्या घामातून. याच मंडळीनी महात्मा जोतिबा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीला बळ दिलं. मुंबईच्या भग्न कापड गिरण्यांमधून फिरत असताना तिथं अहोरात्र राबणारे महाराष्ट्रभरातले कामगार आठवत होते. या कामगारांची पहिली संघटना बांधून त्यांना न्याय मिळवून देणारे आद्य कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे खेडमधल्या पूर कनेरसर गावचे. पानाफुलांत रमलेल्या मराठी साहित्याला आपल्या रांगडया भाषेनं घाम फोडून समृद्ध करणारे कवी नामदेव ढसाळ या कनेरसर गावचेच. गावच्या आठवणीने ते हळवे होत. त्यांची आई न् माझी आजी मैत्रिणी होत्या. योगायोगानं ढसाळांच्या कविता मी खेडच्या कॉलेजात प्राध्यापक असताना शिकवल्या. ढसाळाच्या घरची मुलं वर्गात होती. त्यांना विचारलं ढसाळाच्या कविता वाचल्यात का? तर नाही म्हणाले! ढसाळाना हा किस्सा सांगितला तर हसले नुसते. असो. याच गावाने भारताला यशवंत चंद्रचुडांसारखे सरन्यायाधीश दिले.  


पानिपतावर लढायला मराठ्यांची फौज निघाली तेव्हा खेडमधील शेतकरी सरदार बळवंतराव महेंदळे यांच्या फौजेत कंबर कसून उभे राहिले होते. असे भक्ती आणि शक्तीने पावन झालेले माझे आजोळ. नितांतसुंदर मराठी साहित्य लिहिणार्‍या कवयत्री शांता शेळके यांचं आजोळही खेडच. त्यांनी त्यांच्या धूळपाटी या आत्मचरित्रात खेडचं रमणीय वर्णन केलंय. खेडच्या वेशीवरचा मारुती असो निमगाव-खरपुडीचा कुलदैवत खंडोबा असो की, तालुक्यातील आळंदीचं माऊलींचं मंदीर किंवा जिथं तुकारामबाबांना अभंग सुचले तो भामचंद्र डोंगर असो, त्यांच्या नुसत्या दर्शनानं मन उचंबळून येतं.

खेडच्या शिवारातल्या भुईमुगाच्या शेंगा, बाजरीच्या भाकरीची खरपूस चव जगात सापडायची नाही.


तुकोबारायांनीच सांगितलंय, इथली माणसं मेणाहून मऊ आणि प्रसंगी वज्राहून कठोर. एरवी उग्र चेहर्‍याने फिरणारे पोलिस आषाढी-कार्तिकीला भाविक होतात. पोलिस स्टेशनच्या आवारात दत्तजयंती साजरी करतात. दरवर्षी श्री दत्तासमोर होणारं माझ्या वारकरी वडिलांचे कीर्तन मनोभावे ऐकतात. माऊली एके ठिकाणी म्हणतात, 'की भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव'...खेडची भूमी आणि इथल्या माणसांचं वर्णन माऊलींच्या याच शब्दांत करता येईल. ही सारी परंपरा, वारसा खेड तालुक्यानं जोपासला आहे. कुमंडला नदीकाठच्या कडूस गावात होणार्‍या तुकाराममहाराजांचे टाळकरी गंगारामबुवा मवाळ यांच्या उत्सवाला पुणे-मुंबईकर आवर्जून सहकुटुंब येतात.


पण भीमेकाठचं खेड आता पूर्वीचं राहिलं नाही. या तालुक्याच्या गावाचं आता शहरात रुपांतर होतंय. गावातून जाणारा हायवे चार पदरी झालाय. गावाशेजारी एसईझेड उभं राहिलंय. आता लवकरच विमानतळही उभं राहील. त्यामुळं जमिनींना सोन्याचा भाव आलाय. आर्थिक सुबत्तेच्या खुणा परिसरावर दिसू लागल्यात. परिसरासोबत माणसंही बदलू लागलीत. पैशासोबत येणार्‍या दुखण्याची बाधा त्यांना होऊ लागलीय. त्यावर उतारा म्हणून ज्ञानोबा-तुकोबांच्या या भूमीत बाबा-बुवांच्या नकली पंथांची दुकानदारी सुरू झालीय. जगाला स्फूर्ती देणार्‍या माझ्या या आजोळभूमीला कुणाची दृष्ट लागो नये, हीच माऊली-तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना.