'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Monday, 6 February 2012

प्रचाराच्या भिंती, घोषणांचा पाऊस (भाग १)


भाग १९ : प्रचाराच्या भिंती, घोषणांचा पाऊस (भाग १)
जमाना आहे कोट्यवधी लोकांना एकमेकांशी जोडणा-या सोशल नेटवर्कींगचा. तरुणाई तर ट्विटर,फेसबुकच्या वॉलवर अक्षरश: पडीक असते. या तरुणाईला जर एखाद्या वयस्कर गृहस्थांनी सांगितलं, की १९६८ साली मुंबईतल्या तमाम वॉल्सनी अर्थात ख-या खु-या भिंतींनी शिवसेनेला एक निवडणूक जिंकून दिली..., तर त्यांनी त्यावर विश्वास ठेवावा. कारण तो इतिहास आहे.

ज्ञानदेवमाऊलींनी आळंदीत जशी निर्जीव भिंत चालवली, तशा ७०च्या दशकात मुंबईतल्या भिंती जणू बोलत होत्या. म्हणजे, या भिंतींवर रंगवलेल्या आकर्षक घोषणा लोकांचं लक्ष वेधून घेत होत्या. त्यांना जागवत होत्या. साद घालत होत्या. आपलं म्हणणं लोकांपर्यंत थोडक्यात आणि नेमकंपणानं पोचवण्यासाठी त्यावेळी या भिंतींशिवाय हुकमी पर्याय नव्हता. साहजिकच निवडणूक प्रचारात या भिंतींना फार फार महत्त्व आलं. 

मुंबईत त्या काळात विळा हातोड्यावाल्या कामगार संघटनांची या भिंतींवर मक्तेदारी होती. १९६६नंतर शिवसेनेचा वाघोबा या मक्तेदारीला गुरकावू लागला. पहिला घास होता, यंडुगुंडूंचा. त्यांच्या विरोधातल्या बजाव पुंगी, हटाव लुंगी घोषणेनं मुंबईत धुमाकूळ घातला. त्यानंतर नंबर होता, कम्युनिस्टांचा. जला दो जला दो, लाल बावटा जला दो, या घोषणेनं डाव्यांना धडकी भरवली.

निवडणुकीत तर हे घोषणायुद्ध अगदी भरात आलं. यात शिवसेनेनं एकदमच आघाडी घेतली. कारण शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मूळचे चित्रकार. त्यांच्या व्यंगचित्रांना जनतेनं यापूर्वीही दाद दिली होतीच. शिवाय वडील प्रबोधनकार ठाकरेंकडून वारसापरंपरेनं आलेली एक घाव दोन तुकडेकरणारी भाषाही जोडीला होतीच. त्याचा पुरेपूर वापर शिवसेनेच्या घोषणांमध्ये करण्यात आला.

१९६८च्या निवडणुकीत केवळ भिंतीच नव्हेत तर पूल, पाईप, पाण्याच्या टाक्या शिवसैनिकांनी ताब्यातघेतल्या. कम्युनिस्ट कार्यकर्ते चुना लावून भिंती बुक करून ठेवत. शिवसैनिक मग या भिंतीच धुवून टाकत. दोघांमधल्या भांडणाची खरी सुरुवात या भिंतींवरूनच झाली. कम्युनिस्ट भिंतींवर आपल्या पक्षाचा शॉर्टफॉर्म सीपीआय असा लिहायचे. म्हणून शिवसैनिक एसएस असं लिहू लागले.

शिवसेनेच्या घोषणा भावनिक आवाहन करणा-या असायच्या. त्यातल्या त्यात शिवरायांची शपथ तुम्हाला, विजयी करा शिवसेनेला’ ही शिवसेनेची आवडती घोषणा होती. तर असशील जर खरा मराठी,राहशील उभा शिवसेनेच्या पाठी असं मराठी मनांना भिडणारी घोषणा ठिकठिकाणी दिसू लागली.

लोकप्रिय सिनेमांची नावं लोकांच्या पक्की लक्षात राहतात, हेही शिवसेनेनं लक्षात घेतलं. त्यातूनच मग थांब लक्ष्मी कुंकू लावते, शिवसेनेला मत देऊन येते’, ‘बूँद जो बन गये मोती, शिवसेना हमारा साथी’, या घोषणा रंगवल्या जाऊ लागल्या.

म्हणी, वाक्प्रचार, सुविचार, काव्य यांचा मुक्त वापर या घोषणांमध्ये केला जाऊ लागला.
बाळासाहेब व्यंगचित्रांमधून जी टोपी उडवायचे, तो प्रकार या घोषणांमध्येही दिसू लागला. 
काँग्रेसला मत म्हणजे चांगल्या नागरी जीवनाला मत’ या घोषणेच्या पुढं शिवसैनिकांनी लिहिलं हा हा हा हा...’ 

केवळ पक्षाच्या भिंती रंगवता रंगवता पेंटर झालेले कम्युनिस्ट पक्षाचे नगरसेवक नारायण घागरे सांगतात, बाकी काहीही असो या भिंती अत्यंत सुबक अक्षरात लिहिलेल्या असत. या सुबकतेचं श्रेय शिवसेनेलाच द्यायला हवं. त्यातून एकप्रकारे भिंतीवाचनाचा आनंद मिळे. अर्थात शिवसेनेला खिजवणा-या घोषणाही विरोधकांनी शोधल्या होत्याच. त्याविषयी पुढच्या भागात. 


'नवशक्ति'तील लिंक - http://46.137.240.209/navshakti.co.in/?p=38055

Sunday, 5 February 2012

बिनपैशांची निवडणूक

भाग १८ : बिनपैशांची निवडणूक
पेटी, खोका हे शब्द हल्ली अगदीच बापडे वाटतात; असा पैशांचा प्रचंड खेळ निवडणुकांच्या निमित्तानं अवतीभोवती पाहायला मिळतोय. अशा वातावरणात कुणी बिनपैशाची निवडणूक असा शब्द जरी उच्चारला तरी खुळ्यातच काढतील. 

भल्या भल्या मंत्र्यांना लाजवेल असं साम्राज्य मुंबईल्या नगरसेवकाचं असतं. पण जीवलग दोस्तांनी गोळा केलेल्या पैशांतून, चाळीतल्या मावशी, आजींनी दिलेल्या हक्काच्या मतांवर नगरसेवक म्हणून निवडून येण्याचाही एक काळ होता. त्याचं उदाहरण म्हणजे १९६८ची मुंबई महापालिकेची निवडणूक.

गिरणगावातले कम्युनिस्ट पक्षाचे नगरसेवक नारायण घागरे सांगतात,  त्यावेळी पक्षाचा निवडणूक खर्च अत्यंत कमी असायचा. चाळीतल्याच लोकांकडून वर्गणी काढून बॅनर लावले जात. गिरणीच्या गेटवर एकेक रुपया निवडणूक निधी गोळा केला जाई. तो गरजू उमेदवारांना दिला जा.

या निवडणुकीतले एक उमेदवार आणि ज्येष्ठ पत्रकार मधू शेट्ये सांगतात, निवडणुकीसाठी माझ्याजवळ पैसे असण्याचं कारणच नव्हतं. माझा मतदारसंघ ताडदेव होता. तिथल्या कार्यकर्त्यांनीच प्रत्येकी पाच ते दहा रुपये काढले. असे ८०० रुपये जमा झाले. त्यावेळी डिपॉझिट अवघं अडीचशे रुपये होतं. तेव्हा हजार पाचशे रुपयात सहज निवडणूक लढवली जायची.

शिवसेनेच्या उमेदवारांचीही अशीच परिस्थिती होती. पण सत्ताधारी काँग्रेसकडं साहजिकच मुबलक पैसा होता. त्यांनी या निवडणुकीत भरपूर झेंडे, बॅच, टोप्या आदी साहित्य आणलं. शिवाय त्यांनी शिवसेनेलाही पैसे पुरवले, असा आरोप अजूनही जुने कम्युनिस्ट नेते करतात.

आताच्या सारखी प्रचार करणा-या कार्यकर्त्यांची खाण्यापिण्याची सोय परस्पर होत नव्हती. प्रचारासाठी राबणारे हे कार्यकर्तेही अर्थातच फाटक्या खिशांचे. पण खिशात पैसे नसले तरी मनात दिलदारी होती. अर्ध्या कप चहात मित्राच्या प्रचाराचा धूमधडाका उडवून दिला जायचा. या कार्यकर्त्यांचे अड्डे म्हणजे इराण्याची हॉटेल्स
गल्ली, रस्त्याच्या कोप-यावर असलेली ही हॉटेल्स आकाराने भरपूर मोठी असायची. हॉटेलमालक कधीही गि-हाईकाला किती वेळचा बसला, म्हणून उठवायचा नाही. त्यावेळीआम आदमीचं खाणं म्हणजे, ब्रून मस्का-चहा, खारी-चहा, खिमा-पाव, आम्लेट-पाव. इराण्याचं हॉटेल म्हणजे कॉम्रेडससाठी एक चहा आणि सिगारेट यावर तासन् तास गप्पा मारण्याची हक्काची जागाया कार्यकर्त्यांमुळं इराणी हॉटेल्स नेहमी भरलेली दिसत.

कार्यकर्त्यांना परवडतील असे पदार्थ हॉटेलवाले ठेवायचे. त्यावेळी बटाटावडा फेमस नव्हता. उडप्याच्या किंवा काही मराठी हॉटेल्समध्ये ऊसळ पाव, वडा ऊसळ, घावण ऊसळ, भजी, कांदाभजी मिळायचे. कमी किंमतीतले हे पदार्थ राबणा-या कार्यकर्त्यांच्या पोटाला आधार द्यायचे. निवडणुकीच्या काळात प्रचार करणा-या कार्यकर्त्यांसाठी एकत्रित ऊसळ-पाव बनवला जायचा. यातूनच कम्युनिस्ट कार्यकर्त्यांबद्दल एक म्हण प्रचलित झाली. लाल बावटा ऊसळ परोटा’!
 
त्यावेळी लाल बावट्याखाली जमलेल्या तरुणांना आंदोलनासाठी कशाचंही निमित्त पुरायचं.गिरण्यांमधली छोटी छोटी आंदोलनं तर पावाचा आकार छोटा आहे, ऊसळ बरोबर नाही, अशा कारणांवरून व्हायची. पण एक व्हायचं, यामुळं कार्यकर्ते जोडले जायचे. हे कार्यकर्ते रात्र रात्र जागून बॅनर लावायचे. भिंती रंगवायचे. हो, या भिंतींचा आणि त्यांच्यावर रंगवलेल्या घोषणांचाही एक इतिहास आहे. हे उद्याच्या भागात. 

'नवशक्ति'तील लिंक - http://46.137.240.209/navshakti.co.in/?p=37925 

Friday, 3 February 2012

बाप कम्युनिस्ट, पोरं शिवसैनिक!


भाग १७ : बाप कम्युनिस्ट, पोरं शिवसैनिक!
काळाचा महिमा अगाध असं म्हणतात. संयुक्त महाराष्ट्राच्या रणमैदानात जीवाची बाजी लावली, गिरणगावातल्या कामगारांनी. पण म्हणजे तुम्ही आमचं काय भलं केलंत? असा सवाल त्यांना पोटची पोरं करू लागली. या लढ्यातून मुंबईवर खरंच मराठी माणसाचं राज्य आलं का? आमचे प्रश्न सुटले का? असं ही पोरं विचारू लागली.

दारोदार हिंडूनही नोक-या मिळत नाहीत. साधी वडापावची गाडी टाकायची म्हटली तर बापाजवळ पैसे नाहीत. अशा परिस्थितीत मराठी माणसांची नोकरी, भाकरी आणि घरयासाठी आवाज उठणारे बाळासाहेब ठाकरे या तरुणांना जवळचे वाटू लागले. शिवसेनेच्या दाक्षिणात्यांविरोधातल्या बजाओ पुंगी, हटाओ लुंगीत हे तरूण मग उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. शिवसेनेच्या जला दो जला दो, लालबावटा जला दो या घोषणेच्या तालावर ही कम्युनिस्टांची पोरं नाचू लागली.

बाप कट्टर कम्युनिस्ट आणि पोरगा शिवसैनिक१९६८च्या निवडणुकीत गिरणगावात हे चित्र सर्रास दिसू लागलं. कारण तेव्हा कम्युनिस्ट संघटना मालक विरुद्ध कामगार एवढीच लढाई लढत होते. स्थानिकांना नोक-या मिळाव्यात हा मुद्दा त्यांच्या गावीही नव्हता. त्यामुळं बेरोजगार तरुणांना शिवसेनेचं अपिल पटू लागलं. रोखठोक रांगडी भाषा, राडा करणा-या पोरांच्या मागं ठामपणं उभं राहणं, तुरुंगात गेलेल्या पोरांच्या घरच्यांची काळजी घेणं, हे पाहून कामगारांची पोरं बाळासाहेबांवर फिदा झाली.

दुसरीकडं या पोरांच्या आई-बापांची जामच गोची झाली होती. आपलीच पोरं आहेत म्हणून त्यांना गप्प बसावं लागत होतं. लाल बावटा जला दो म्हणा-या पोरांना भगवा झेंडा जला दो असं प्रत्युत्तर देता येत नव्हतं. कारण तो झेंडा शिवरायांचा. 

६८च्या निवडणुकीतलं वातावरण अनुभवणारे कम्युनिस्ट पक्षाचे अरविंद घन:श्याम पाटकर सांगतात, ‘‘शिवसेनेच्या पोरांच्या झुंडीच्या झुंडी त्यावेळी रस्त्यावर असत. चाळीतली सर्व पोरं सेनेत असायची. पाच ते १५-२० वर्षांची पोरं. काही कळायचं नाही, पण शिवसेना जिंदाबाद! कुठं गडबड, तणाव झाला की पोरं तिकडं धावायची.
कम्युनिस्ट उमेदवारासोबत दोघे तिघे त्याच्या चाळीतले कार्यकर्ते असायचे. पण शिवसेनेच्या उमेदवारासोबत पोरांची ही गर्दी असायची. सर्वांवरच या गर्दीचं दडपण यायचं. सेनेलाच मत द्या असा हट्ट ही पोरं आईबापाकडं करायची. मतदार चाळीतून निघाला की तो बूथपर्यंत जाईपर्यंत पोरं त्याची पाठ सोडायची नाहीत. या सळसळत्या रक्ताच्या पोरांनीच ख-या अर्थानं ही निवडणूक लढवली.’’

१९६८च्या निवडणुकीपर्यंत कार्डवाटप हा महत्त्वाचा प्रकार होता. आपली माहिती असलेलं कार्ड मतदाराला मतदानासाठी घेऊन जावं लागे. पक्ष कार्यकर्ते हे कार्ड बनवायचे. या निवडणुकीत कार्ड कम्युनिस्ट पक्षाचं आणि मत शिवसेनेला असा प्रकार झाला.
१९६८मधला सेनेचा हा कार्यकर्ता पूर्ण कोरा होता. त्याच्या डोक्यात फार मोठं तत्वज्ञान, दिशा असं काही नव्हतं. फक्त मराठी माणसाचं भलं झालं पाहिजे, एवढंच त्याला कळत होतं. पण भारावलेला कार्यकर्ता किती हिंमतीनं काम करतो त्याचं अनोखं उदाहरण या पोरांच्या रुपानं पाहायला मिळालं. 

बरं, निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार आणि कार्यकर्ते दोघंही फाटक्या खिशाचे. पण मनात जबरदस्त जिगर होती. दोस्तांच्या खिशातून मिळतील तेवढे पैसे गोळा करून, अपार मेहनतीची तयारी ठेवून उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्याविषयी बोलूयात उद्याच्या भागात. 


'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/02/04/37360

Thursday, 2 February 2012

गिरणगावात वाघाचे ठसे

भाग १६ : गिरणगावात वाघाचे ठसे
शिवसेनेचे स्थापना झाली ती मार्मिकच्या कचेरीत. म्हणजे दादरमधल्या बाळासाहेबांच्या घरात.मार्मिकचा वाचकवर्ग होता, दादर, शिवाजी पार्क, गिरगाव इथल्या मध्यमवर्गीय वस्तीतला. सुरुवातीला शिवसेनेला पाठींबाही याच मध्यमवर्गातून मिळू लागला. या भागातून पाठींबा मिळेल पण शिवसेनेसाठी आवश्यक असणारी लढाऊ फळी मात्र गिरणगावातूनच मिळणार, हे बाळासाहेबांनी ओळखलं. कारण कष्ट करत अन्यायाशी झगडणारा चिवट कामगारवर्ग या गिरणगावात होता. 

महत्त्वाचं म्हणजे शिवसेना ज्यामराठी माणसावरच्या अन्यायाबाबत बोलत होती तोच हा मराठी माणूस होता. सेनेच्या दृष्टीनं अडचण फक्त एवढीच होती, की हा मराठी कामगार कम्युनिस्टांच्या पोलादी तटबंदीत होता. हीच तर तटबंदी शिवसेनेला तोडायची होती. त्यासाठी निमित्त मिळालं, १९६८च्या महापालिका निवडणुकीचं. तोपर्यंत रस्त्यावर राडे करून सेनेनं लढाऊ कम्युनिस्टांचा आत्मविश्वास ढिला केला होता. पण कामगारांच्या मनावर कम्युनिस्टांची पकड कायम होती. ही पकड सेनेला ढिली करायची होती. म्हणून सेनेचा ढाण्या वाघ गिरणगावातून वावरू लागला.

अगदी शिवसेना स्थापनेच्या शिवाजी पार्क मेळाव्याच्या अगोदरच्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंनी सभा घेतली ती परळच्या गणेश गल्लीच्या मैदानावर. त्याही आधीपासून ठाकरे गिरणगावातल्या विविध व्यायामशाळा, सांस्कृतिक मंडळांना भेटी देत होते. तिथल्या तरुणांच्या व्यथा समजून घेत होते.
  
गिरणगावात त्यावेळी अनेक व्यायामशाळा होत्या. या व्यायामशाळा म्हणजे सळसळत्या रक्ताच्या तरुणांचे आखाडेच. देवदत्त, गुरुदत्त, हिंदमाता, राममारुती, जयभवानी, जनता सेवा मंडळ आदी व्यायामशाळा त्यावेळी प्रसिद्ध होत्या. १९६८च्या निवडणुकीत यातल्या बहुसंख्य व्यायामशाळांनी सेनेला पाठींबा दिला. बाळासाहेबांनी या व्यायामशाळांमध्येही सभाही घेतल्या होत्या.

मराठी माणूस म्हटलं ती सण, उत्सव आलेच. गिरणगावातही ते मोठ्या उत्साहाने साजरे होत. या उत्सवांबद्दल कम्युनिस्टांना फारशी आत्मीयता नव्हती. हे हेरून शिवसेनेनं गिरणगावातला गणेशोत्सव,शिवजयंती उत्सव, नवरात्रोत्सव ताब्यात घेतला. आणि आपल्या राजकारणासाठी या उत्सवांचा उपयोग करून घेतला.

गणेशमंडळं म्हणजे तरुणांचे अड्डेच. त्यामुळं शिवसेनेनं पहिल्यांदा गिरणगावातली गणेशमंडळं ताब्यात घेतली. समाजवादी मंडळींची गणेशमंडळं तर शिवसैनिकांनी जवळपास हिसकावूनच घेतली. इथं समाजवाद्यांच्या राष्ट्र सेवा दलाची कलापथकं होती. ही पथकं नाटकं वगैरे बसवत. त्यातून तरुणांचं संघटन होई. यापैकी कम्युनिस्टांकडं काहीही नव्हतं. एकही गणेशमंडळ त्यावेळी कम्युनिस्टांच्या ताब्यात नव्हतं. अशा गणेशमंडळांमधून, सांस्कृतिक उपक्रमातून होणा-या तरुणांच्या संघटनाकडं त्यांनी साफ दुर्लक्ष केलं. त्यांची हीच उणीव शिवसेनेनं भरून काढली.

गिरणगावात शिवसेनेनं विविध सांस्कृतिक उपक्रम सुरू केले. वृक्षारोपण, रक्तदान, वह्यावाटप आदी उपक्रमांतून शिवसेना घराघरांत पोहोचली.
बाळासाहेबांभोवती कामगारांची तरुण मुलं जमू लागली. बाळासाहेब या बेकार तरुणांच्या नोक-यांबद्दल बोलत होते. त्यांच्या नोक-या दाक्षिणात्यांनी हिरावून घेतल्याचं सांगत होते. 
खरं तर त्या वेळी गिरण्यांमध्ये साधारणपणे अडीच लाख नोक-या होत्या. पण प्रत्येक कामगाराला किमान दोन तरी मुलं होती. त्यामुळं या नोक-या पु-या पडू शकत नव्हत्या. आणि इतर उद्योगव्यवसायातल्या, सरकारी नोक-या यंडुगुंडूंनी ताब्यात घेतलेल्या. यामुळं अस्वस्थ झालेल्या तरुणांना त्याविरुद्ध बोलणारे शिवसेनाप्रमुख आपले वाटू लागले होते. त्यातून वडील कट्टर कम्युनिस्ट आणि पोरगा शिवसैनिक असं चित्र सर्रासपणं गिरणगावात दिसू लागलं. त्याबद्दल उद्याच्या भागात.

'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/02/03/37090

Wednesday, 1 February 2012

दळवी बिल्डिंग



भाग  : दळवी बिल्डिंग
१९६८ची मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे शिवसेना आणि कम्युनिस्टांमधल्या संघर्षाचा इतिहास. कामगार जगतावर अधिराज्य गाजवणा-या कम्युनिस्ट पक्षाच्या हासाचा इतिहास. आणि या इतिहासाची साक्षीदार आहे, परळची दळवी बिल्डिंग! 

ही बिल्डिंग म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचं मुंबईतलं ऑफिस. गिरणीकामगारांच्या असंख्य आंदोलनाचा केंद्रबिंदू. नाविक बंडापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची साक्षीदार. ही बिल्डिंग म्हणजे देशाच्या कामगार चळवळीचं फुफ्फुसच. देवळात जावं तेवढ्या भक्तीभावानं कामगार या बिल्डिंगमध्ये नित्यनेमानं यायचे.
शाहीर अमरशेख, अण्णाभाऊंचा आवाज याच बिल्डिंगमध्ये घुमायचा. कॉम्रेड डांगे, कृष्णा देसाई, गुलाबराव गणाचार्य आदी दिग्गज कम्युनिस्ट नेत्यांचा इथं राबता असायचा. दळवी बिल्डिंग १८२, डॉ. आंबेडकर रोड, परळ, मुंबई १४’, हा पत्ता देशाच्या राजकीय नकाशात ठळकपणे नोंदला गेला होता. 
इथल्या गर्दीचा रहिवाशांना कधीही त्रास वाटला नाही. उलट रात्री उशिरापर्यंत चालणा-या चर्चा, बैठकांना आसपासच्या बि-हाडांमधून चहा पाठवला जायचा.

अशा या कम्युनिस्टांच्या मर्मस्थळावर २८ डिसेंबर १९६७ रोजी शिवसैनिकांनी तुफान हल्ला चढवला.
निमित्त झालं एका बैठकीवरच्या दगडफेकीचं. शिवसेना नेते मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवे यांची सभा शिवडीच्या गोलंजी हिलजवळच्या गाडी अड्ड्यावर सुरू होती. त्याचवेळी कराची हॉटेलवरच्या गच्चीवर मिटींगसाठी शिवसेनेची पाचशेक पोरं जमली होती. जोशी, साळवे इथं येण्यापूर्वी या मिटींगवर कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक केली. 
ही बातमी पसरताच उट्टं काढायचं म्हणून शिवसैनिकांनी दळवी बिल्डिंगमधल्या कम्युनिस्टांच्या ऑफिसवर जोरदार हल्ला चढवला. पाच ते सहा हजारांचा जमाव या बिल्डिंगमध्ये घुसला. ऑफिसमधले सर्व पेपर जाळले, फाडले गेले. सगळी कागदपत्रं रस्त्यावर आणली गेली. मोठा राडा झाला.

या घटनेचं शिवसेनाप्रमुखांनी समर्थनच केलं. दळवी बिल्डिंगवर चाल करून जाणारा शिवसैनिक आणि त्याची आक्रमकता मला प्यारी होती. हे मी वसंतराव नाईकांकडे ते मुख्यमंत्री असतानाच बोललो होतो. म्हटलं, आम्हाला दळवी बिल्डिंग जाळायचीच होती. पण इतर भाडेकरू आमचे मतदार असल्यानं पोरांना रोखावं लागलं. पण त्यांनी नासधूस केली. टाईपरायटर फेकला हे सगळं खरं आहे. या घटनेनंतर काही वर्षांनी बाळासाहेबांनी हा खुलासा केला होता.

पण हल्ल्याचे पडसाद लगेचच उमटले. या हल्ल्याचा धिक्कार करण्यासाठी कम्युनिस्टांनी गोखले सोसायटीजवळ सभा भरवली. ही सभाही शिवसैनिकांनी उधळली. यावेळी जोरदार धुमश्चक्री झाली. दगडविटा, लाठ्याकाठ्या, एसिड बल्ब यांचा दोन्ही बाजूंनी सर्रास मारा झाला. पोलिसांना यावेळी लाठीमार करून अश्रूधूर सोडावा लागला.

विधानसभा आणि संसदेतही दळवी बिल्डिंग प्रकरण गाजलं. यात सत्ताधारी काँग्रेसनं शिवसेनेला पाठीशी घातलं. संसदेत गृहमंत्री म्हणून उत्तर देताना यशवंतरावांनी या घटनेपूर्वी शिवसेनेच्या मिरवणुकीवर एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचं निदर्शनास आणून दिलं. प्रजासमाजवादी पक्षाचे सद्स्य बंकी बिहारी दास यांनी दिल्लीत शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थन केलं.

दळवी बिल्डिंगवरचा हा हल्ला कम्युनिस्टांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी होता. त्यात शिवसेनेला यश आलं. या घटनेनंतर कम्युनिस्ट चळवळीला उतरती कळा लागली. कम्युनिस्टांचं असं नाक कापल्यावर महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं बाळासाहेबांनी गिरणगावात प्रवेश केला. गणपती मंडळं, व्यायामशाळा सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून ते गिरणगावकरांच्या हृदयात शिरले. हळूहळू गिरणगाव शिवसेनेच्या पंज्यात येऊ लागलं. त्याविषयी उद्याच्या भागात. 

'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/02/02/36843