'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Sunday, 22 January 2012

राजकारणाचं गजकरण


भाग ८ :  राजकारणाचं गजकरण
शिवसेनेच्या स्थापनेचा इतिहास मार्मिकचे संपादक पंढरीनाथ सावंत यांच्या तोंडूनच ऐकायला हवा. या वयातही खड्या आवाजात, ओघवत्या भाषेत ते शिवसेनेच्या स्थापनेचं आणि पहिल्या दस-या मेळाव्याचं चित्र डोळ्यासमोर उभं करतात.
‘'मार्मिक'मधले ज्वलंत विचार वाचून अस्वस्थ झालेला मराठी माणूस 'मार्मिक'च्या कचेरीची म्हणजेच ठाकरे परिवाराच्या शिवाजी पार्कवरच्या घराची वाट धरायचा. माणसांचे लोंढेच्या लोंढे इथं येऊन धडकायचे. 
बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे सगळं पाहात होते. एक दिवस बाळासाहेबांना ते म्हणाले,  'बाळया गर्दीला, धुमसणा-या मराठी शक्तीला कधी आकार देणार आहेस की नाहीउत्तरादाखल बाळासाहेबांनी नारळ आणवला. तो छत्रपतींच्या पुतळ्यासमोर फोडायला लावला. आणि एका लढवय्या संघटनेची स्थापना झाली. प्रबोधनकारांनी तिचं बारसं केलं. नाव ठेवलंशिवसेना!

पहिल्या दसरा मेळाव्याला शिवसैनिक ढोलताशे वाजवतगुलाल उधळत शिवाजी पार्कवर आले. गर्दीबाबत सांगायचं तर, मी पाहिलंयशिवाजी पार्कच्या भिंतींना माणसं टेकली होती’’. महाराष्ट्राला राजकारणापेक्षा समाजकारणाची गरज आहे, असं सांगत शिवसेना यापुढं ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करेल, असं बाळासाहेबांनी या मेळाव्यात जाहीर केलं. याच वेळी राजकारण म्हणजे गजकारण अशी कोटीही त्यांनी केली.

संयुक्त महाराष्ट्राच्या यशस्वी लढ्यानंतरही सत्तेपेक्षा रोजगार मिळावा, अशी सामान्य मराठी माणसाची अपेक्षा होती. ही अपेक्षाच ठाकरे शिवसेनेच्या स्थापनेअगोदर सहा वर्षे मार्मिकमधून व्यक्त करत होते. स्थापनेनंतरही ही मराठी समाजकारणाची लाईन आपण सोडणार नसल्याची ग्वाही ठाकरेंनी दिली खरी पण राजकारणाशिवाय समाजकारण होऊ शकत नाही, हे लवकरच त्यांच्या लक्षात आलं. 

निमित्त झालं, १९६७च्या लोकसभेच्या निवडणुकीचं. माजी संरक्षणमंत्री कृष्ण मेनन या निवडणुकीला उभे राहिले. मराठी माणसासाठी काहीही न करणा-या या उप-या माणसाला विरोध म्हणून शिवसेनेनं काँग्रेसचे उमेदवार स. गो. बर्वे यांना पाठींबा दिला. मराठी मतांची ही जणू चाचणीच होती. या निवडणुकीत स. गो. बर्वे निवडून आले. आणि मराठी माणूस निवडणुकीच्या मैदानातही आपल्या पाठीशी उभा राहू शकतो हे शिवसेनेच्या ध्यानी आलं. 

या निवडणुकीतून राजकारणात अप्रत्यक्षपणे शिरकाव झाला असला तरी ८० टक्के समाजकारण या आपल्या मूळ धोरणापासून शिवसेना हटली नव्हती. त्यानंतर २१ जुलै १९६७ रोजी शिवसेनेनं विधानसभेवर पहिला मोर्चा काढला. मुंबईतल्या ८० टक्के नोक-या आणि महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीतील ८० टक्के जागा मराठी माणसासाठी राखून ठेवाव्यात, अशा २५ मागण्यांचं निवेदन शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना दिलं.

या दरम्यान मुंबईत नाक्या-नाक्यांवर शिवसैनिकांचे अड्डे उभे राहू लागले होते. हे अड्डेच पुढं शिवसेनेच्या शाखा बनल्या. नागरी प्रश्नांपासून ते बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन करण्यापर्यंत आणि स्वस्त दरातल्या वस्तू विकण्यापासून ते अगदी घरगुती भांडणं सोडवण्यापर्यंतची सर्व कामं शिवसेनेच्या शाखा-शाखांवर होऊ लागली. शिवसेना शाखांच्या या कार्याविषयी उद्याच्या भागात. 


'नवशक्तिती'ल लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/24/34968


Saturday, 21 January 2012

त्रिमूर्ती भंजन (भाग- ३)

भाग ७ :  त्रिमूर्ती भंजन (भाग- ३)
शिवसेना जन्माला आली तीच मुळी मराठी अस्मितेच्या प्रश्नावर. कालांतरानं कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करत शिवसेनेनं मुस्लिम विरोध सुरू केला. पण सेनेनं यापेक्षाही कट्टर द्वेष केला तो मुंबईतल्या कम्युनिस्ट पक्षाचा. आपल्या राजकीय आयुष्यात शिवसेनेनं बहुतेक पक्षांशी युती केली पण कम्युनिस्टांशी कधीही जवळीक केली नाही.

मुंबईवर अधिराज्य गाजवायचं असेल तर बाळासाहेबांच्या भाषेत या लाल माकडांना पहिल्यांदा हुसकावून द्यायला पाहिजे, असा अजेंडा शिवसेनेनं ठरवला. त्यानुसार शिवसैनिकांमध्ये कट्टर कम्युनिस्टद्वेष भिनवण्यास सुरुवात केली. डेअरिंगबाज कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचं अवसानघात करण्यासाठी त्यांच्या म्होरक्यावर प्रहार करणं आवश्यक होतं. म्हणूनच कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे शिवसेनेचे प्रमुख शत्रू बनले.

खरं तर कॉम्रेड डांगे म्हणजे देशातल्या कम्युनिस्ट पक्षाचे उद्गाते आणि कामगार चळवळीचे पितामह. त्यांच्याच पुढाकारानं १९२५ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचीस्थापना करण्यात आली. स्वातंत्र्यलढ्यात कामगार आणि शेतकर्‍यांचा सहभाग वाढला तो डांगे यांच्यामुळं. महिला कामगारांमध्येही हक्काची जाणीवनेतृत्वगुण निर्माण करण्यात डांगे यशस्वी ठरले. 

त्यांच्या नेतृत्वाची जागतिक पातळीवरही दखल घेतली गेली. त्यांनी काही काळ वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनचं सदस्यत्वही भूषवलं होतं. त्यांच्या कार्याची दखल घेत रशियानंही त्यांना सर्वोच्च असं लेनिन पदक देऊन गौरविलं होतं. चीन-युद्धानंतर क्रुश्र्चेव्हटिटो आदी नेत्यांना भेटण्यासाठी आणि भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळवण्यासाठी  पंडित नेहरूंनी डांगेंना खास परदेश दौर्‍यावर पाठवलं होतं. 

असा हा नेता महाराष्ट्राच्या, मुंबईच्या गळ्यातला ताईत होता. मराठी माणसासाठी डांगेंनी केलेली ऐतिहासिक कामगिरी म्हणजे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा. त्यांच्यामुळंच  कामगार वर्ग मोठ्या संख्येनं आणि एकजुटीनं संयुक्त महाराष्ट्र लढ्यात उतरला आणि हा लढा यशस्वी झाला.

मराठी भाषेवर डांगेंचं मोठं प्रेम होतं. राज्यकारभारात मराठी भाषा स्वीकारली जावी, यासाठी ते नेहमी आग्रही राहिले. कामगार चळवळ आणि राजकारणासोबतच साहित्य, संगीत, अर्थकारणाचाही त्यांचा अभ्यास होता. साहित्य क्षेत्रातलं दलित-विद्रोही साहित्य निर्माण होण्यामागची वैचारिक पार्श्र्वभूमी तयार करण्याचं मोठं काम कॉम्रेड डांगेंनीच केलं. संयुक्त महाराष्ट्राचं मुखपत्र अर्थात आचार्य अत्र्यांचामराठा पेपर सुरू करण्यातही डांगेंचा मोठा वाटा होता.

दिल्लीश्वरांनी १ एप्रिल हा महाराष्ट्र दिन करायचं ठरवलं होतं. पण डांगेंच्या आग्रहामुळं १ मे हामहाराष्ट्र दिन झाला. अशा या लोकप्रिय माणसाला अंगावर घ्यायचं म्हणजे पहिल्यांदा जनमानसातल्या त्याच्या प्रतिमेला धक्का दिला पाहिजे, हे बाळासाहेबांनी लक्षात घेतलं. त्यानुसार मार्मिकच्या प्रत्येक कार्टूनमध्ये डांगे राष्ट्रद्रोही असल्याचं रंगवलं जावू लागलं. डांगेवर टीका नाही, खिल्ली उडवणारं कार्टून नाही, असा १९६५पासूनचा मार्मिकचा एकही अंक पाहायला मिळत नाही. भाषणातून डांगेंवर जोरदार टीका करणं, त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न करणं हे तर नेहमीचंच झालं.
  
मुंबईतल्या गिरण्यांसोबतच एलआयसी, जीआयसीवर कम्युनिस्टांचं वर्चस्व होतं. ते मोडून काढायचं तर शिवसेनेनं समाजकारणापेक्षा राजकारणात जाणं गरजेचं होतं. त्यानुसार कम्युनिस्टांना विरोध करतच शिवसेना १९६७च्या निवडणुकीत उतरली. 

सेनेच्या पहिल्या मेळाव्यात राजकारण म्हणजे गजकरणअशी खिल्ली उडवणारे ठाकरे पुढच्या काळात पक्के राजकारणी बनले. त्यांची शिवसेना कम्युनिस्ट पक्षाची वैरी बनली. या राजकारण ते गजकरण प्रवासावर नजर टाकूयात उद्याच्या भागात.


'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/23/34764

Friday, 20 January 2012

त्रिमूर्ती भंजन (भाग- २)


 भाग ६ :  त्रिमूर्ती भंजन (भाग- २)
कॉमर्ड श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे आणि जॉर्ज फर्नांडिस या तिघांनाही शिंगावर घेण्याचं ठाकरेंनी कसं ठरवलं होतं, याचं एक उदाहरण  मार्मिकच्या २९ ऑगस्ट १९६५च्या कव्हरवर एक कार्टून प्रसिद्ध झालं. त्यात या तिघांनी असहाय भारतमातेचा लीलाव आरंभलाय, असं दाखवण्यात आलं होतं. 

मार्मिकचा हा अंक पाहून अत्रे, डांगे, फर्नांडिस प्रचंड संतापले. त्याच दिवशीच्या रात्री शिवाजी पार्क परिसरातील ठाकरे यांच्या निवासस्थानावर संतप्त जमाव चाल करून गेला. ठाकरे बंधू घरी नव्हते. प्रबोधनकार आणि त्यांचे आणखी एक चिरंजीव रमेश घरात होते.
घराबाहेर शंभरेक माणसांचा जमाव ‘बाळ ठाकरे काँग्रेसचा हस्तक’, ‘बाळ ठाकरे, बाळासाहेब देसाईंचा बुटपुशा’ अशा घोषणा देत होता. त्यांनी पिशव्या भरून दगड आणि जोडेही सोबत आणले होते. ठाकरेंच्या घरावर लटकवलेली ‘मार्मिकची पाटी उचकटून काढण्यात आली. अत्रे-डांगे-फर्नांडिस झिंदाबाद, असे नारे देत मोर्चेक-यांनी ‘मार्मिकच्या अंकाची होळीही केली.
यावेळी वयोवृद्ध प्रबोधनकार घराबाहेर आले आणि त्यांनी बाळासाहेबांच्या वतीनं संतप्त निदर्शकांची माफी मागितली.

या घटनेनंतर मात्र बाळासाहेब या तिघांच्या कच्छपीच लागले. अत्रेंचं त्यांनी काय केलं, हे मागच्या भागात आपण पाहिलं. डांगे आणि त्यांचा कम्युनिस्ट पक्ष हे मुख्य टार्गेट होतं. पण त्याआधी नामोहरम करायचं होतं, जॉर्ज फर्नांडिस यांना. मुंबईवर राज्य करण्यासाठी ते आवश्यकच होतं. कारण जॉर्ज त्या वेळी बंदसम्राट म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या एका इशा-यावर अवाढव्य मुंबईची हालचाल बंद व्हायची. 

महापालिका, बेस्टमहापालिकेची हॉस्पिटल्स, थिएटर कामगार, हॉटेल कामगार, कॉलेज कर्मचारी, फेरीवाले, टॅक्सीवाले, रिक्षावाले या सर्व ठिकाणी जॉर्ज यांनी उभ्या केलेल्या संघटना होत्या. ज्येष्ठ पत्रकार मधू शेट्ये सांगतात, जॉर्ज, बाळासाहेब आणि शेट्ये फ्री प्रेसमध्ये एकत्र काम करत होते. जॉर्ज युनियनचे अध्यक्ष तर शेट्ये सेक्रेटरी होते. पुढं जॉर्ज मोठे कामगार नेते बनले. त्यामुळं ते बाळासाहेबांच्या निशाण्यावर आले. 

जॉर्ज यांच्या मुंबईला वेठीस धरण्यावर बाळासाहेबांनी मार्मिक आणि सभांमधून प्रचंड टीका केली. १९६७च्या निवडणुकीत पंचमहाभूतांना गाडा असं आवाहन शिवसेनेनं केलं. त्या यादीतही जॉर्ज होतेच. समाजवादी जॉर्ज यांनीही शिवसेनेला वेळोवेळी विरोध केला. पण दोघांमधली मैत्री कायम राहिली. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट काँग्रेसचे स. का. पाटील यांचा पराभव करून जॉर्ज मुंबईचे सम्राट बनले. पुढं ते राष्ट्रीय राजकारणात गेले. नंतर शिवसेनेनं स्थापन केलेली कामगार संघटना सगळीकडं घुसली. पण त्यांना जॉर्ज यांच्या संघटनेचा प्रभाव फारसा मोडून काढता आला नाही. शरद राव यांच्या माध्यमातून त्यांची संघटना अजूनही पाय रोवून आहे.

शिवसेनेचं मुख्य टार्गेट होतं ते कम्युनिस्ट आणि त्यांचे नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. कारणशिवसेनेचं विषारी रोपटं मुळातूनच उपटून काढा असं आवाहन ते करत होते. तर उलट डांगे हे विष आहे, असा प्रचार शिवसेना करत होती. कारण शिवसेनेच्या लेखी कम्युनिस्ट राष्ट्रद्रोही होते. त्यामुळं त्यांना संपवणं गरजेचं होतं. म्हणूनच १९६७ पासून शिवसेनेनं नेम धरला होता तो  कम्युनिस्ट पक्षावर आणि अर्थात त्यांचे नेते कॉम्रेड डांगे यांच्यावर. त्यांच्याविषयी उद्याच्या भागात.


'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/21/34149

Thursday, 19 January 2012

त्रिमूर्ती भंजन (भाग- १)

भाग ५ :  त्रिमूर्ती भंजन (भाग- १)
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानं मराठी माणसांना डोंगराएवढे नेते दिले. या लढ्यात आणि त्यानंतरही मराठी माणसांना आधार देणारे हे नेते म्हणजे, समाजवादी पक्षाचे  एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, झुंजार पत्रकार आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, आणि नंतरच्या काळात कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस. 
मराठी माणसांची नस गवसलेले हे नेते नंतरही आपापला प्रभाव टिकवण्यासाठी प्रयत्नशील होतेच. यात सरशी झाली ती प्रबोधनकार ठाकरेंची. त्यांचे पुत्र व्यंगचित्रकार बाळ ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे कुंचल्याची तलवार घेऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत सहभागी होते. 

मराठी माणसाला मुंबई मिळाली. पण या उद्योगनगरीत मराठी माणूस मात्र उपराच राहिला. त्याला न्याय मिळावा, स्वत:चा आवाज मिळावा म्हणून ठाकरे बंधूंनी साप्ताहिक मार्मिक सुरू केलं. त्याला मोठा प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळं ठाकरे उपरोक्त नेत्यांचे थेट स्पर्धकच बनले. १९६६ ला शिवसेना स्थापन झाल्यानंतर तर या स्पर्धेला चांगलीच धार चढली. 

मराठी माणसाच्या हृदयसिंहासनावर राज्य करायचं असेल तर या नेत्यांना वाटेतून दूर करायला लागणार, हे ठाकरेंच्या लक्षात आलं. पहिला नंबर होता, आचार्य अत्रेंचा. खरं तर अत्रे हे प्रबोधनकार ठाकरेंचे जीवलग मित्र. पुण्यात सत्यशोधक चळवळीत एकत्र आलेले हे समाजधुरीण नंतरही साहित्य, सिनेमा आदी क्षेत्रांमध्येही एकमेकांच्या खांद्याला खांदा देऊन कार्यरत होते. 
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात तर त्यांनी भीमपराक्रम केला होता. पण नंतर अत्रे आणि ठाकरे यांच्यात वाद उभा राहिला. यामागचं कारण सांगितलं जातं ते अत्र्यांची डाव्यांशी असलेली मैत्री. मग या मुलुखमैदान तोफा समोरासमोर येऊन एकमेकांवर आग ओकू लागल्या. मार्मिक आणि मराठामधून परस्परांवर शेलकी विशेषणं उधळली जाऊ लागली. सुव्वराचार्य, प्रल्हादखान, वरळीचा डुक्कर अशा विशेषणांनी अत्र्यांचा मार्मिकमधून उद्धार केला जाऊ लागला. डांगेंसोबत राहतात म्हणून त्यांनालालभाई असंही हिणवण्यात येऊ लागलं.

अत्र्यांनी तर ठाकरेंविरुद्धच्या  सांज मराठातील लेखांची एक पुस्तिकाच तयार केली. तिचं नाव होतं,कमोदनकार ठाकरे आणि त्यांची कारटी. आणि तिची किंमत ठेवण्यात आली होती, एक कवडी!
नंतर मात्र अत्रेंच्या विरोधात शिवसेनेनं कंबर कसली. १९६७मध्ये शिवसैनिकांनी अत्र्यांचीठाण्यातली सभा उधळली. अत्र्यांवर जोडे फेकले. गदारोळात अत्र्यांना मारही बसला. त्यांच्या गाडीची मोडतोड करण्यात आली. त्या काळात अत्र्यांचा महाराष्ट्रात प्रचंड दबदबा होता. पण या दिवशी शिवसैनिकांनी अत्रेंच्या व्यक्तिमत्वातली हवाच काढून घेतली. या लोकसभा निवडणुकीत अत्र्यांचा पराभव झाला. अर्थात या पराभवात शिवसैनिकांचा मोठा वाटा होता.

असं सांगितलं जातं की, सुरुवातीला अत्र्यांनाच मार्मिकचं संपादक करण्याचा ठाकरेंचा विचार होता. तसंच शिवसेनचं मुख्य पदही त्यांना देण्याचा विचार होता. मात्र अत्रे काही शिवसेनेच्या व्यासपीठावर आले नाहीत. पण शिवसेनाप्रमुखांवर अत्र्यांच्याच लेखणी आणि वाणीचा प्रभाव असल्याचं मराठी माणसाला सतत जाणवत राहिलं.
अत्र्यांची जादू तर शिवसेनेनं निष्प्रभ केली. आता उरले होते, मुंबईतील कामगारांवर पर्यायानं मराठी माणसांवर अधिराज्य गाजवणारे नेते, कॉम्रेड डांगे आणि जॉर्ज फर्नांडिस. त्यांच्याविषयी उद्याच्या भागात.
'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/20/33786

Wednesday, 18 January 2012

मराठीचा झेंडा

भाग ४ : मराठीचा झेंडा
 साठच्या दशकात महाराष्ट्रभर संयुक्त महाराष्ट्राचा वणवा उसळला. म्हणजे प्रकार असा झाला की,भाषिक राज्य संकल्पनेनुसार बहुतेक राज्यं स्वतंत्र झाली. पण महाराष्ट्राला स्वतंत्र दर्जा द्यायला काही केंद्रसरकार तयार होईना. 
त्यामागचं कारण म्हणजे मुंबई ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी अर्थात उद्योग नगरी. ती ताब्यात राहावी. शिवाय मराठी माणसाविषयी केंद्राला आकस असल्याचा आरोप अर्थमंत्री चिंतामण देशमुखांनी तर अगदी जाहीरपणे केला होता.
केंद्राच्या या धोरणाविरोधात मराठी माणूस जागा झाला. झाडून सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी  संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली. लढाईचं मैदान होतं मुंबई. आणि सैनिक होता, गिरणगावातला मराठी गिरणीकामगार. या वीरांनी आणि सा-या महाराष्ट्रानं रणात बाजी लावली. अखेर दिल्लीला झुकावं लागलं. १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं.

त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली. मात्र संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या निमित्तानं जागृत झालेली मराठी शक्ती कायम जागती राहावी असं अनेकांना वाटत होतं. त्यात आघाडीवर होते आचार्य अत्रे. या लढ्यानंतरही लोंबकळत पडलेला मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा सीमाप्रश्न सुटावा, मराठी माणसांची एकी राहावी यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र परिषद स्थापन करण्यात पुढाकार घेतला.

त्यानंतर मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी रामराव आदिकांनी १ ऑगस्ट १९६५मध्ये लालबाग-परळ भागात ‘महाराष्ट्र हितवर्धिनी’ नावाची संस्था स्थापन केली. नोक-या तसंच सरकारी वसाहतींमध्ये मराठी माणसाला ८० टक्के जागा मिळाल्या पाहिजेत, परप्रांतीयांचं वर्चस्व वाढू नये,अशा या संस्थेच्या मागण्या होत्या. 

शिवसेना नेते दत्ताजी नलावडेही त्यावेळी आदिकांसोबत होते. बाळासाहेबांचे तर ते मित्रच होते. त्यांच्या कामाचं कौतुक बाळासाहेब अगदी जाहीरपणे करीत असत.
दुसरीकडं पत्रकार म्हणून 'लोकसत्ता'चे ह. रा. महाजनीही मराठीपणाचा जोरदार पुरस्कार करत होते. 

मात्र या सगळ्यांमध्ये उजवे ठरले ते ठाकरे पितापुत्र. त्यांनी मराठी माणसांची लढाऊ संघटना उभारण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं. प्रबोधनकारांनी तर ४०च्या दशकातच शुद्ध महाराष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. प्रबोधनकारांचे सुपुत्र बाळ ठाकरे मावळा नावानं व्यंगचित्रं काढून महाराष्ट्रविरोधकांना फटकारे मारत होते. 

नाही म्हणता शिवसेना या मराठी माणसांच्या संघटनेची कल्पना अत्र्यांनीही मांडली होती. पण त्याला मूर्त दिलं ठाकरेंनी. मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी मार्मिक साप्ताहिक काढलं. महत्त्वाच्या ठिकाणी मराठी माणसांना डावलून दाक्षिणात्य कसे जागा बळकावून बसले आहेत, हे मार्मिकमध्ये पुराव्यानिशी छापून येऊ लागलं.
मार्मिकच्या ऑफिसमध्ये बेरोजगार तरुणांची गर्दी वाढू लागली. या गर्दीला एक दिशा दे असं प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना सुचवलं. आणि स्थापन झाली शिवसेना! तारीख होती, १९ जून १९६६.

मराठीचा झेंडा फडकावण्यात शिवसेना यशस्वी झाली. आता शिवसेनेचं ध्येय बनलं, फक्त मराठी आणि मराठी!
मराठी मनांवर अधिराज्य गाजवेल ती फक्त शिवसेना. त्यात इतर कोणाचीही लुडबूड नको, असा निश्चय झाला. मग जानी दोस्त जॉर्ज फर्नांडिस असोत, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात खांद्याला खांदा देऊन लढणारे आचार्य अत्रे असोत वा कॉम्रेड डांगे. त्यांना नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधला गेला. त्याविषयी उद्याच्या भागात. 

'नवशक्ति'तील लिंक - 'http://61.8.136.4/nav/2012/01/19/33456