'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Sunday, 14 July 2013

जगायला शिकवणारा देव

वारकऱ्यांचा देवच मुळी समता, बंधुता, समन्वयाचं तत्त्वज्ञान रुजवणारा आहे. पंढरपुरात कटेवर कर ठेवून उभा राहिलेला विठोबा म्हणजे रोजचं जगणं सोपं करणारा, बंधुभावानं जगायला शिकवणारा अनाथांचा नाथ. हा लोकांनी लोकांसाठी उभा केलेला लोकदेव आहे.


चैत्र-वैशाखी उन्हाच्या रणरणत्या लाह्या रानभर फुटत असतात. आभाळाकडं तोंड करून तापत पडलेल्या रानाची तगमग-तगमग होत असते. एका दुपारी अचानक सोसाट्याचा वारा सुटतो. पालापाचोळा गोल गोल फिरत आभाळात जातो. कुठल्याशा कोपऱ्यातून एकेक ढग जमा होतो. त्यांचं क्षणात पांढऱ्यातून काळ्यात रुपांतर होत राहातं. चकीत होऊन पाहणाऱ्या रानाच्या अंगाखांद्यावर टप् टप् करत वळवाचे टप्पोरे थेंब पडतात. त्या थंड स्पर्शानं रान शहारतं. धारा नेम धरून बरसू लागतात. बघता बघता ढेकळांचं लोणी होतं. शेता-बांधातून लाल-तांबडं पाणी खळाळू लागतं. झाडं झडझडून अंगावरचं पाणी झटकतात. अन् सृष्टी ताजीतवानी होऊन जाते...

हळू-हळू कड्या-कपारीच्या आडून पोपटी कोंब डोकावू लागतात. ज्येष्ठ-आषाढाची हिरवाई रानावर दिसू  लागते. अशा वेळी या हिरव्या रानात दूरवर एक पांढरा ठिपका दिसतो. एका ठिपक्याचे दोन, दोनाचे पाच, पाचाचे दहा ठिपके होत होत ठिपक्यांची लांबच लांब रांग हळू हळू जवळ येते. टाळ-मृदुंगाचा आवाज मोठा होत जातो. कपारीआडून बाहेर डोकावू लागलेली कोवळी पानं टाळ्यांचा ताल धरतात. मृदुंगाच्या धुमाळीवर रस्त्याकडेची झुडपं अंग घुसळू लागतात. ''वारी आली..माऊली आली..पालखी आली...'' वाटेवरच्या गावात चैतन्य जागतं. माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्यायला झुंबड उडते...

कशी येईना मरी, गं या संतांवरी...

अस्सल मऱ्हाटी भाषा अनुभवायची असेल तर संतांचे अभंग वाचावेत. थेट. तीक्ष्ण. परखड. त्याहूनही अधिक जिवंत भाषा आहे, या संतांच्या बायकांची.. त्यांचे अभंग वाचणे हा एक रसरशीत अनुभव...


ज्येष्ठाच्या पावसाची ओल अंगाला लागली की मातीच्या पोटात झोपलेली बी-बीयाणं जागी होतात. आषाढाची चाहूल घेत त्यांचे हिरवे कोंब डोकं वर काढतात. हळू हळू साऱ्या रानाला हिरवा गहिवर येतो न् मग या दगडांच्या देशाला पिसं भरतं. खुळावलेली पावलं नकळत पंढरीची वाट चालू लागतात. 'उभारोनी बाहे' त्यांना 'पालवणारा' विठोबा आणि त्याच्या भेटीसाठी आतूर झालेले भक्त. दोघेही वेडेपिसे! हे वेड शतकानुशतकांचं. दर आषाढीला असं परस्पर प्रेमाचं भरतं येतं. 
कुणी मायबाप म्हणावं, कुणी सखा, कुणी सोयरा, कुणी बंधू, कुणी चुलता, कुणी गुरू...ज्याला जे वाटेल त्यानं ते नातं लावावं. वाटेनं चालताना या सगळ्यांचं मिळून एक नातं बनतं. ते म्हणजे, 'माऊली'! वारकऱ्यांनी याच नावानं एकमेकांना संबोधावं. याच नावानं झोपेतून जागं करावं. याच नावानं घासातला घास द्यावा. हेच नाव घेऊन थकले भागलेले पाय चेपून द्यावेत आणि 'माऊली माऊली' म्हणतच परस्परांच्या न् विठुरायाच्या पायावर मनोभावे डोकं ठेवावं...

उंचनिंच कांही नेणे भगवंत

मऱ्हाटी मुलुखातली माणसं 'वारी' का करतात? त्यांना त्यातून काय मिळतं? त्यांचा देव त्यांना देतो तरी काय? असे प्रश्न विचारले जातातच. फार शोधावं लागणार नाही. सोपं आहे. कुठल्याही संताचा एखादा अभंग वाचून पाहावा. उत्तर मिळतं.


जमाना माध्यमांचा आहे. माहितीच्या विस्फोटाचा, स्पर्धेचा आहे. सध्या पंढरीची वारी सुरू आहे. गावागावांतून निघालेल्या जथ्थ्यांचा आता गर्जणारा, उचंबळणारा भाविकांचा विराट ओघ बनला आहे. या आधुनिक युगात दुर्मिळ झालेली धोतर, लुगडी.., डोई, खांद्यावर हेलकावत निघालेली बोचकी.., निब्बर अनवाणी पावलं.., भाबडे चेहरे शूट होतायत. आभाळाकडं तोंड केलेल्या 'ओबी व्हॅन्स' काही सेकंदात त्यांना 'ऑन एअर' करतायत. टीव्हीवर हा 'लाईव्ह' सोहळा पाहताना घरोघरी भक्तीभाव दाटून येतोय. पाठीला सॅक अडकवून आपल्या इंडियन फ्रेन्डस् सोबत वारीत सहभागी झालेल्या फॉरीनर्ससाठी तर ही नवलाईच...   

Friday, 12 July 2013

माणूस माझे नाव

विदर्भ आणि तिथल्या माणसांवर 'भारत4इंडिया.कॉम'साठी ब्लॉग लिहिला. तोच इथं कॉपी पेस्ट करतोय. सोबतचं चित्र आहे, आमचे विदर्भातलेच स्नेही सुनील यावलीकर यांचं...

दिवस नाताळाचे आहेत. हवेत गारठा आहे. खिडकीतून कोवळी उन्हं आलीयेत. टीव्हीला चिकटलेला पोरगा काही तरी खाता खाता भरभर चॅनेल्स बदलतोय. लाल डगला घातलेला, पांढऱ्या दाढीवाला सांताक्लॉज, माणसांचं जग सुखी करायला स्वर्गातून आलेले देवदूत, हॉलीवूड सिनेमांचे कॉपी केलेले हिंदी सिनेमे तुकड्या तुकड्यांनी टीव्ही स्क्रीनवरून सरकतायत. मी खिडकीतून बाहेर बघू लागतो. शाळेच्या पुस्तकातल्या नाताळाच्या गोष्टी आठवू लागतात. त्यात रशियन, जपानी, युरोपियन... सगळे देवदूत गरिबांच्या जीवनात आनंद फुलवायला आलेले असतात...

Monday, 16 July 2012

महानामा

आज संत नामदेवमहाराजांची पुण्यतिथी. नांदेडमध्ये 'रिंगण'च्या (http://www.ringan.in/) वेबसाईटचं प्रकाशन झालंय. त्यानिमित्तानं 'रिंगण'साठी लिहिलेला हा लेख...

पहिली आठवण आहे. गाभा-यातल्या समईच्या उजेडात विठुरायाचा सावळा चेहरा उजळून निघालाय. डोळे मिटून मोठ्या प्रसन्न चित्तानं तो ऐकतोय, ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा..’, ‘उठा जागे व्हा रे आता...’ स्पष्ट, खणखणीत आवाज, सुंदर वारकरी चाल. पांढराशुभ्र फेटा बांधलेले वडील नामदेवरायांचा काकडा म्हणतायत. पहाटेच्या शांततेत आवर्तन घेत येणारे ते सूर हृदयात जिरतायत. मुरतायत. मी बहुदा आईच्या पोटात आहे…


Friday, 6 April 2012

दावडीची ठाकरवाडी

पैसा म्हणजे परमेश्‍वर. पैसा हसवतो. पैसा रडवतो. पैसा घडवतो. पैसा बिघडवतो. पैसा अगदी ’माणसाचं’ माकड करून टाकतो. तरी सारं जग पैशाभोवतीच फिरतं. या पैशानं माणसांची दुनिया अगदी उलटी-पालटी करून टाकलीय. ही दुनिया पाहायची असेल तर पुण्याजवळचा चाकण, खेड परिसर एकदा फिरून यावा...


आले.. आले.. आले... मुंबईतले सुप्रसिद्ध भाजीपाला व्यापारी अभयशेठ गावडे आले. दरसाल ते यात्रेसाठी घसघशीत देणगी देतात बरं का. यंदाही ते आपला नावलौकीक राखणार आहेत. लाऊडस्पीकरवरून गावचे कारभारी माऊलीअप्पा यात्रेला गावी आलेल्या मुंबैकराला असं हरभ-याच्या झाडावर चढवत असतात. मग कांजी केलाला खादीचा शर्ट न् डोक्यावर कडक धारेची भगवान टोपी घातलेला मुंबईकर वाजत्र्यांच्या कडकडाटात, गुलालाच्या उधळणीत तरंगतच मांडवात येतो. दोनऐवजी चार हजारांची रोख देणगी देतो. या सोहळ्याची मुंबईकर आणि त्याचं गाव वर्षभर वाट बघत असतं.
दुसरीकडं मुंबैकर घरी आला म्हणजे मुंबईचा हलवा, पोराटोरांना नवे कपडे, वाणसामान, शेजारच्यांना काहीबाही, असं काय काय... 

Tuesday, 20 March 2012

शून्याची गोष्ट

'शाळा' सिनेमा पाहिला. शाळेची खूप खूप आठवण झाली. किती किती गोष्टी आठवल्या. वाटलं, लिहून ठेवल्या पाहिजेत सगळ्या. पण म्हटलं नको. आपली अब्रू जाईल. पण मागून विचार केला, जाईना का. आपण कोण थोर आहोत असे? एक आठवण लिहून ठेवली. योगायोगानं आमच्या शाळेचं यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आलं. माझा बालमित्र तिथंच शिक्षक झालाय. त्यानं त्यानिमित्तानं प्रकाशित होणा-या स्मरणिकेबद्दल सांगितलं. म्हटलं, 'मी एक छोटा लेख लिहिलाय. पण तुमच्या चौकटीत बसणार नाही. उगीच दोघांचीही लाज कशाला वेशीवर टांगा'.. तर म्हणाला, 'दे तर खरं'. दिला. त्यानं छापला.
सिनेमाच्या शेवटी जोश्या म्हणतो, 'नववी संपली आता दहावीचं भयाण वर्ष..' याच वर्षाची ही गोष्ट...

ही गोष्ट सांगितलीच पाहिजे. किमान दहावीतल्या विद्यार्थ्यांना. ज्यांना गणित म्हणताच पोटात गोळा येतो त्यांना. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना.
तर ऐका..