'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Tuesday, 17 January 2012

तळपती तलवार


भाग ३ :  तळपती तलवार
‘कामगार आहे मी, तळपती तलवार आहे..’, नारायण सुर्वेंनी केलेलं हे गिरणगावातल्या कामगाराचं वर्णन. इतिहास घडवणा-या कामगारांच्या वर्णनासाठी यापेक्षा समर्पक शब्द असूच शकत नाहीत.
आयुष्याशी झगडताना या कामगारांच्या जगण्याला लखलखीत धार आली होती. कामगार म्हटलं की संघर्ष आलाच. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी कामगारांनी संप करायचा आणि मालकांनी तो मोडण्याचा प्रयत्न करायचा. हे अगदी १८४४मध्ये मुंबईत पहिली गिरणी सुरू झाल्यापासून चालू आहे.

सत्यशोधक नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी गिरणगावात पहिली कामगार संघटना उभी केली. ते महात्मा जोतिराव फुल्यांचे कट्टर अनुयायी होते. त्यांनीच इथल्या कामगारांना लढायला शिकवलं. प्रसंगी लोकमान्य टिळकांशीही पंगा घ्यायला त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही.

अर्थात १९०८ मध्ये टिळकांना सहा वर्षांची शिक्षा होताच गिरणगावातल्या कामगारांनीच अभूतपूर्व सार्वत्रिक बंद पाळला. तोही रोजंदारी बुडवून. अगदी कम्युनिस्ट नेता लेनिननंही याची दखल घेतली. अर्थात संपांची सुरुवात १८९०पासूनच झाली होती. १९२०मध्ये या संपांनी कळस गाठला आणि त्याचवेळी कामगार संघटना पूर्णपणे कम्युनिस्टांच्या ताब्यात गेल्या. 
केवळ स्वत:च्या मागण्यांसाठीच नव्हे, तर समाजाचंही आपण देणं लागतो या भूमिकेतून कामगार अनेक सामाजिक लढ्यांमध्ये, स्वातंत्र्यलढ्यांमध्ये सहभागी झाले. आघाडीवर राहून लढले.
  
१९४२चं चलेजाव असो, १९४६चं नावीक बंड असो, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो की गोवा मुक्ती आंदोलन. गिरणगावानं तो अटीतटीनं लढवला. ४२च्या आंदोलनाचा भडका देशभर उडालेला असताना भारतीय कम्युनिस्ट पक्षानं मात्र लोकविरोधी भूमिका घेतली. अशावेळी गिरणीकामगारांनी आपला विवेक शाबूत ठेवून या लढ्यात उडी घेतली.

स्वातंत्र्यसंग्रामातही गिरणगावानं झोकून दिलं होतं. १९३०मध्ये पुणे जिल्ह्यातल्या महाळुंगे पडवळ गावच्या तरुण गिरणी कामगारानं परदेशी माल घेऊन जाणा-या ट्रकखाली स्वत:ला झोकून दिलं.

नाविक बंडात परळच्या एलफिन्स्टन पुलावर इंग्रज सैनिकांच्या गोळीबारात अनेक कामगार कार्यकर्ते ठार झाले. या लढ्यामुळं कम्युनिस्ट पक्षाला पुन्हा एकदा बळ मिळालं.
सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेलाही याच गिरणगावानं मदत केली. भाजीच्या पिशवीत बॉम्ब नेण्यापासून ते रेल्वेरुळांमध्ये स्फोटकं ठेवण्याचं काम इथल्या धाडसी तरुणांनी केलं.
  
संयुक्त महाराष्ट्राचा लढा तर ख-या अर्थानं गिरणगावानंच लढवला, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या १०५ हुतात्म्यांपैकी तब्बल २२जण गिरणगावातले कामगार होते. शाहीर अमरशेख किंवा अण्णाभाऊ साठेंचा एखादा पोवाडा ऐकला, वाचला तरी गिरणी कामगारांच्या लढ्याची प्रखरता आपल्याला दिपवून टाकते. ‘जागा मराठा आम, जमाना बदलेगा’ या अमरशेखांच्या ललकारीनं महाराष्ट्राला विरोध करणा-या दिल्लीतल्या काँग्रेस सरकारला घाम फुटला होता. तर गावोगाव फिरत, लोकनाट्यातून, पोवाड्यातून
‘‘एकजुटीच्या या रथावरती । आरुढ होवून चल बा पुढती ।
नवमहाराष्ट्रा निर्मुन जगती । करी प्रकट निज धाव ।।’’… अशा ललकारीनं अण्णाभाऊ महाराष्ट्राचं मन चेतवत होते. 

संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला. मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला. उरलेला सीमाभाग महाराष्ट्रात यावा म्हणून मग ‘संपूर्ण महाराष्ट्र समिती’ अस्तित्वात आली, पण नंतर तीही नामशेष झाली. मराठी अस्मितेची धग मात्र कायम राहिली. गिरणगावातल्या कामगारांच्या रुपानं तळपत असलेली मराठी स्वाभीमानाची ही तलवार हस्तगत करण्यासाठी मग शिवसेनेनं कंबर कसली. आणि टार्गेट ठरलं, गिरणगावातले कम्युनिस्ट ! 

'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/18/33366 

Monday, 16 January 2012

रणभूमी गिरणगाव


भाग २ : रणभूमी गिरणगाव
महानगरी मुंबई पोर्तुगिजांच्या ताब्यात होती.. त्यांनी ती आपल्या ब्रिटीश जावयाला आंदण दिली..हीच मुंबापुरी इंग्लडच्या राजानं दहा पौंड भाड्यानं ईस्ट इंडिया कंपनीला दिली...हा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे. पण पुढं ही उद्योगनगरी घडवली कोणी याबाबत कवी नारायण सुर्वे गर्जून सांगतात,
‘‘तोच मी, तेच आम्ही ह्या तुझ्या वास्तूशिल्पाचे शिल्पकार,
तुझ्या सौंदर्यात हे नगरी! दिसोंदीस घालीत असतो भर...’’

तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात,
‘‘बा कामगारा तुजठायी अपार शक्ती।
ही नांदे मुंबई तव तळहातावरती।।...’’
अण्णाभाऊंच्या पोवाड्यातला हा कामगार म्हणजे गिरणगावातला गिरणीकामगार. तो आला महाराष्ट्रभरातून. सुरुवातीला आली कोकणी माणसं. कारण भाऊच्या धक्क्यावरून समुद्रमार्गे कोकणात ये-जा करण्याची त्यांची सोय होती. नंतर मुंबई-पुण्याहून मिरज-कोल्हापूरला जाणारा रेल्वेमार्ग सुरु झाला, तशी घाटावरची माणसं गिरणगावात येऊ लागली.

मुंबईच्या मध्यभागी असलेलं गिरणगाव म्हणजे, धुराड्यांनी व्यापलेलं आकाश, दाटीवाटीनं उभ्या असलेल्या लाल कौलारू चाळी, त्याशेजारी अहोरात्र सुरू असणा-या गिरणी. गिरणगाव म्हणजे जवळपास ६०० एकरावरच्या ५८ गिरण्या आणि पंधराशे एकरांवरचा कामगारांचा परिसर. ढोबळ नकाशा सांगायचा म्हटला तर मुंबईतल्या भायखळ्यापासून दादरपर्यंत आणि महालक्ष्मीपासून एल्फिन्स्टन रोडपर्यंत पसरलेला भाग म्हणजे गिरणगाव.

गिरणगावातले बसचे प्रमुख स्टॉप म्हणजे, महालक्ष्मीतील संत गाडगेबाबा चौक, गुलाबराव गणाचार्य चौक, खालचे परळ, प्रभादेवी, प्रबोधनकार ठाकरे, चौक, नायगाव, शिवडी, घोडपदेव, माझघाव, भायखळा.

रेल्वे स्टेशन्स सांगायची तर भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, परळ आणि दादर. उलट दिशेने दुस-या रेल्वेमार्गाने दादर, एल्फिस्टन रोड, लोअर परळ आणि महालक्ष्मी. हार्बर मार्गावरचं कॉटनग्रीन, रे रोड,शिवडी. तर लखमसी नप्पू मार्ग, पश्चिमेला सेनापती बापट मार्ग आणि ना. म. जोशी मार्ग, डॉ.आंबेडकर मार्ग आणि पूर्वेकडचा रफी अहमद किडवाई मार्ग हे प्रमुख रस्ते.

याबरोबरच नरे पार्कातलं गणेश गल्ली मैदान, कामगार मैदान, त्याच्या पलिकडं गिरणगावात न मोडणारी गिरगावची चौपाटी, दादरचं शिवाजी पार्क मैदान, प्रभादेवीचं नर्दुल्ला टँक मैदान ही गिरणगावाशी संबंधित महत्त्वाची ठिकाणं. याशिवाय कम्युनिस्टांची ऑफिसं असणारी परळमधली दळवी बिल्डिंग, खेतवाडीतलं राजभवन, लालबागेतलं तेजुकाया मॅन्शन, तसंच करीरोड पुलाजवळची हाजीकासम,प्रभादेवीची ‘वाकडी’, आग्रीपाड्याच्या बीआयटी चाळी, कामाठीपु-यातल्या बटाट्याची चाळी यांच्याशिवाय गिरणगावाचा उल्लेख पूर्ण होणार नाही.

शहरातल्या याच भूभागानं, गिरणगावानं मुंबईचं आणि संपूर्ण देशाचं औद्योगिक जीवन घडविलं. आणि ते घडवण्यासाठी राबणारे हात होते, मराठी माणसाचे. जवळपास ८० टक्के म्हणजेच सुमारे अडीच लाख मराठी माणसं गिरणगावात राहत होती. त्यामुळं साहजिकच या एकगठ्ठा समाजावर राजकीय पक्ष डोळा ठेवून होते. 

पण हा मराठी गिरणी कामगार होता, कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य, कार्यकर्ता. कारण हाच पक्ष कामाच्या ठिकाणी अर्थात गिरणीत त्यांचा पाठीराखा होता. अर्थात या कामगारांचा लढाऊ बाणा कम्युनिस्टांच्या नेहमीच उपयोगी आला. पण १९६६मध्ये मराठीचा जयजयकार करत शिवसेनेचा उदय झाला आणि हा कामगार वर्ग शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली जमू लागला. 
साहजिकच अस्तित्वाच्या लढाईसाठी तलवारी उपसल्या गेल्या. अर्थात या लढाईतला सैनिक होता, सर्वसामान्य मराठी गिरणी कामगार. त्याच्या लढाऊ बाण्याविषयी बोलूयात पुढच्या भागात.

'नवशक्ति'मधील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/17/33081

१९६८ची निवडणूक

कासराभर उडी मारल्यानंतर सिंह मागे वळून पाहतो. आपण किती लांब उडी मारली ते. मग अदमास घेत पुढची उडी घेतो. आपण त्याला 'सिंहावलोकन' म्हणतो. माणसानंही असंच करावं. इतिहासाचा मागोवा घ्यावा. म्हणजे आजूबाजूच्या घडामोडी उलगडतात. भविष्यात काय होईल याचा अंदाज येतो, असं जुने-जाणते सांगतात. 
ताजा संदर्भ आहे, मुंबई महापालिका निवडणुकीचा. १९६८ सालच्या निवडणुकीनं पुढचा सारा राजकीय पटच बदलून टाकला. या निवडणुकीविषयी, त्यावेळच्या वातावरणाविषयी 'नवशक्ति'त सुरू केलेला हा कॉलम. अर्थात आयडिया आहे, संपादक सचिन परब यांची. मी फक्त भारवाही हमाल...



भाग १ : इलेक्शन दे धक्का !
केवळ एका महापालिकेच्या निवडणुकीमुळं जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचं राजकारण बदलून गेलं...हे कोणालाही खरं वाटेल काय? पण होय, हे खरं आहे. भारतीय राजकारणात अशी उलथापालथ झाली ती मुंबई महापालिकेच्या १९६८ सालच्या निवडणुकीत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या मुंबईतल्या दादा राष्ट्रीय पक्षाचं यात पानिपत झालं. त्यांच्यावर ‘दे धक्का’ विजय मिळवला तो नव्यानंच उदयाला आलेल्या प्रादेशिक पक्षानं. त्याचं नाव, शिवसेना!

मुंबईतल्या या निवडणुकीपासून कम्युनिस्ट पक्षाला मुंबईत तर ओहोटी लागलीच. पण या पराभवाचा परिणाम देशभर झाला. देशातल्या पुढच्या दोन निवडणुका इंदिरा गांधींच्या वर्चस्वाखाली झाल्या. कम्युनिस्ट पक्षाची लोकसभा, विधानसभेतली सदस्यसंख्या कमी झाली. 
डाव्यांच्या पाठीशी असलेला वर्ग काँग्रेसकडे वळला. यात प्रामुख्यानं होते, कामगार, शेतकरी आणि मध्यमवर्ग. इंदिराबाईंच्या घोषणा त्यांचं आकर्षण ठरलं. या घोषणा होत्या, बँक राष्ट्रीयीकरण, राजेरजवाड्यांचे तनखे रद्द, बंद पडलेल्या किंवा आजारी गिरण्याचं राष्ट्रीयीकरण आणि गरीबी हटाव इत्यादी. 
७२ला इंदिरा गांधींनी आणिबाणी लागू केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं या आणिबाणीचं समर्थन केलं. आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पक्षानं सपाटून मार खाल्ला. आणिबाणीनंतर कम्युनिस्टांकडून काँग्रेसकडं गेलेला वर्ग जनता पक्षाकडं गेला.

आणिबाणीवरून कम्युनिस्ट पक्षात तीव्र मतभेद निर्माण झाले. त्यात पक्ष पुन्हा एकदा दुभंगला. कॉम्रेड डांगेंसारख्या उत्तुंग नेत्याला पक्षाबाहेर काढण्यात आलं. आणि मग काँग्रेसविरोध हाच कम्युनिस्ट पक्षाचा एककलमी कार्यक्रम सुरू झाला. त्याचा एकूण परिणाम म्हणजे पक्ष छोटा छोटा होत गेला. आणि तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दावणीला बांधला गेला.
याच काळात प्रादेशिक पक्षांचं पेव फुटलं. या प्रादेशिक अस्मितेला चालना मिळाली ती शिवसेनेमुळे. शिवसेना म्हणजे या पक्षांपुढं एक ‘आदर्श’ ठरला. प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा घेऊन एखादा पक्ष एवढी परिणामकारक मुसंडी मारू शकतो, याचा साक्षात्कार शिवसेनेच्या १९६८मधील विजयातून देशातल्या इतर राज्यांना झाला. 
त्यातूनच मग तामीळनाडूत अण्णा डीएमके, आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव, उत्तरप्रदेशात मुलायम सिंग, बिहारमध्ये लालूप्रसाद यादव, काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, ओरिसात बिजू पटनायकांचा जनता दल, पंजाबमध्ये अकाली दल, ओमप्रकाश चौटालांचा हरियाणा जनतादल हे प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष उदयाला आले. या सर्व राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्ष कमकुवत झाले.

१९६६ सालच्या शिवसेनेच्या स्थापनेनंतर १९६७ सालीच काँग्रेसला देशभर प्रादेशिक अस्मितेचा पहिला धक्का बसला. ९ राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता गेली. कम्युनिस्टांसारख्या राष्ट्रीय पक्षाला आपण त्यांच्या बालेकिल्ल्यातच, मुंबईत हरवू शकतो हा या निवडणुकीतून शिवसेनेला आला.

१९५७, १९६२ आणि १९६७ या तीन निवडणुकांवर आणि मुंबईतल्या गिरणगावावर वर्चस्व असलेल्या कम्युनिस्ट पक्षाला मोठा धक्का बसला. कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास डळमळला. काँग्रेसमध्ये शिवसेनेचा ‘वट’वाढला. १९६८चं हे महाभारत नेमकं जिथं घडलं त्या रणभूमीची, गिरणगावाची आणि त्याच्या इतिहास-भूगोलाची चर्चा करूयात उद्याच्या भागात. 


'नवशक्ति'मधील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/16/32692


Thursday, 22 December 2011

सेन्सॉर धुडकावणा-या लेखण्या

रस्त्यावर उतरून लढणा-या देशभरातल्या स्त्रियांचं लिखाण मराठीत येतंय. मनोविकास प्रकाशनने हे शिवधनुष्य उचललंय. तब्बल ४० पुस्तकांची ‘भारतीय लेखिका’ नावाची ही मालिका आहे. पैकी ११ पुस्तकं तयार झालीत. त्यांची ‘लोकप्रभा’मधून करून दिलेली ही ओळख...


एखादं गाव किती शहाजोग आहे, याचा कानोसा घ्यायचा असेल तर पाणवठ्यावर गावातल्या बायका काय काय बोलतात ते ऐकावं असं म्हणतात. मोठ्या समाजाबद्दलही तसंच म्हणता येईल. कुठलाही समाज किती निकोप आहे किंवा प्रगतीची किती शेखी मिरवतो, हे समजून घ्यायचं असेल तर त्या समाजातील स्त्रियांचं लिखाण वाचावं. अगदी लख्ख प्रतिबिंब उभं राहील. हे लिखाण म्हणजे समाजाचा आरसाच. पण बाई बोलते म्हटल्यावर लगेचच कान टवकारतात. आपल्याविषयीच काही तरी बडबडतेय असं लक्षात आलं तर अगोदर तिचं तोंड बंद केलं जातं. गपगुमान राहण्याची तंबी दिली जाते. खेडेगावातल्या एखाद्या छोट्या कुटुंबापासून तर जगभरातल्या प्रगत, अप्रगत समाजात हेच चित्र दिसतं. 

Saturday, 3 December 2011

सोयराबाईचा विटाळ सुटो...

‘नवशक्ति’ने आज महापरिनिर्वाणदिन विशेष पुरवणी काढलीय. ‘भीमराव की बेटी हूँ मै!’ अशी थीम आहे. त्यात माझाही संत सोयराबाई आणि कुटुंबावरचा लेख छापलाय...
भल्या पहाटे सावळ्या विठूरायावर दूध, दही, मधादी पंचामृताचा अभिषेक सुरू आहे. टिपेचा सूर लावून ‘बेणारे’ पुरुषसूक्त म्हणतायत. त्याची गंभीर लय गाभा-यात आवर्तनं घेतेय. ‘परिचारकां’नी गरम पाण्यानं भरलेली चांदीची घागर नुकतीच आणून ठेवलीय. आता ते धुपाटण्यात धूप नीट जुळवून ठेवतायत. ‘बडवे’ देवाच्या भरजरी वस्त्रांच्या घड्या उलगडतायत.

Thursday, 1 December 2011

अत्रे आणि शिवसेना

आठवड्याभरापूर्वी पेपरात एक बातमी वाचली. ‘‘शिवसेने’च्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रे!’ मला पीएच.डी.चे दिवस आठवले. ‘पत्रकार अत्रे’ असा संशोधनाचा विषय होता. सुरुवातीलाच मी वरील बातमीच्या निष्कर्षावर आलो. पण पुढं वाचत गेलो, तसं लक्षात आलं की, अरे ही तर महाराष्ट्राची परंपरा आहे. कॉपीची म्हणा हवी तर. (साप्ताहिक ‘लोकप्रभात’ तशा आशयाचा मी एक लेखही लिहिला होता) महाराष्ट्रप्रेमाच्या भुतानं ज्याला झपाटलं तो अशाच प्रकारच्या गर्जना करणार न् लिहणार. मग ते लोकमान्य टिळक असोत, शि. म. परांजपे असोत, अच्युतराव कोल्हटकर असोत, प्रबोधनकार ठाकरे असोत, राम गणेश गडकरी असोत की आचार्य अत्रे..!
परवा भल्या सकाळीच पोराला घेऊन शिवाजी पार्कावरच्या ‘श्रॉफ हाऊस’मध्ये गेलो होतो. तिथं अत्रेकन्या शिरिष पै राहतात. आचार्य अत्रे इथंच राहायचे. हॉलमधला अत्र्यांचा अर्धपुतळा पाहून मनात पुन्हा आलं, कदाचित हे शिवसेनाप्रमुखांचं, अत्र्यांचं घर असतं...पण इतिहासात जर, तर, कदाचित नसतात...


‘शिवसेने’च्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रे!, अशी बातमी नुकतीच
वर्तमानपत्रात वाचली. आता सुमारे अर्धशतकानंतर‘हरपले श्रेय’ शोधण्याची धडपड का? असा विचार यानिमित्तानं मनात आल्याशिवाय राहिला नाही. खरं तर प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे ही मराठी माणसाची दोन दैवतं. महाराष्ट्राकडं हे दोन महारथी नसते तर, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढा जिंकणं अशक्य होतं, हे प्रत्येक मराठी माणूस जाणतो. हा लढा लढवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचं जे ‘पंचायतन’ होतं, त्यात अग्रभागी होते, ठाकरे आणि अत्रे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांच्या लेखण्या आणि वाण्या वीजेप्रमाणं कडाडल्या. जनमानसाला त्यांनी खडबडून जाग आणली. म्हणून तर मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला. 

Saturday, 12 November 2011

तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा

आमचे परममित्र श्री. सचिन शंकर परब थोर परंपरा असलेल्या दैनिक 'नवशक्ति'चे संपादक झाले. पहिल्याच आठवड्यात त्यांना तुकोबारायांची आठवण झाली. निमित्त, संत तुकाराम सिनेमाला पाऊणशे वर्षे पूर्ण झाल्याचं. त्यांनी मला विषय सांगितला. लिहायला बसलो न् भलतीच तंद्री लागली. त्यांनी तो लेख आजच्या रविवार पुरवणीत छापलाय...


परवा टळटळीत दुपारी देहूत पोहोचलो. नको गर्दीची भानगड म्हणून. तशी एरवीही देऊळवाड्यात फारशी गर्दी नसतेच. पण शांत, निवांतपणासाठी दुपारसारखी वेळ नाही. 
अचानक एकामागून एक माणसं येऊ लागली. दिसेल त्याच्या पाया पडू लागली. माणसांच्या, दगडी भिंतींच्या, त्यावरील चित्रांच्या, खांबांच्या. एकमेकांच्या. लगबग करून रांगेत उभी राहू लागली. माना उंचावून अधिरतेनं पुढं सरकू लागली. मी अल्लद बाजूला झालो. पाहू लागलो. दोन तीन लक्झ-या आल्या होत्या भरून. खान्देशातून. मी पिंपळाची सावली पकडली. समोर वीणेकरी दिसत होता. दर्शन करून, मंदिर फिरून आलेली माणसं त्याच्या पायावर डोकं टेकवत होती. पुन्हा उठून झरझर पाय-या उतरून खाली येत होती. वीणेची संथ लय आणि दगडी गारवा मनात मुरू लागला. डोळ्यांच्या कॅमे-यानं फ्रेम पकडली. टाईट. क्लोज. वीणेक-याचे पाय. त्यावर क्षणभर टेकणारी डोकी. आणि पाय-या उतरणारी, उन्हापावसात राबून निब्बर झालेली, शेतक-यांची पावलं.

कुठल्या काळात, कुठल्या जगात वावरतायत ही माणसं? क्षणभर मनात कीव दाटून आली. देवळात येऊनही कुठला नवस बोलत नाहीत. गा-हाणं घालत नाहीत. सोनं नाणं दान करत नाहीत. नुसतीच तुळशीची दोन पानं वाहून डोकं टेकायचं. यांचा देवही माणसाच्या रुपातला. धोतर, बाराबंदी, डोईला फेटा. मांडी घालून बसलेला. तुकारामबाबा! डोळ्यापुढं उभा राहिला. फत्तेलाल, दामलेंचा ‘संत तुकाराम’ सिनेमातला. लहानपणापासून पाहिलेला. केवढं पुण्य लागलं असेल ‘प्रभात’ला. इथल्या, देशातल्या, परदेशातल्या लोकांसमोर त्यांनी तुकोबाराया सदेह साकार केला. विष्णुपंत पागनिसांच्या रुपातल्या याच तुकोबाचं चित्र आम्ही शाळेतल्या पुस्तकात पाहिलं. आळंदी पंढरीहून आणलेल्या, भिंतीवर लावलेल्या फोटोंमध्ये पाहिलं. 
या फोटोपुढं उदबत्या लावून, टाळ्या वाजवत ‘आरती तुकारामा’ म्हटली. अजूनही म्हणत आहोत. पाऊणशे वर्षं झाली. या ‘तुकाराम दर्शना’बद्दल ‘प्रभात’च्या पायावर पहिल्यांदा डोकं टेकवावं. मग पाय-या उतराव्यात. आणि पिंपळाची सावली पकडावी. 
डोळ्यांचा कॅमेरा फोकस करावा. एकामागून एक उतरणारी, शेतात राबून निब्बर झालेली पावलं टिपत राहावीत. डोळ्यापुढं तुकारामबाबा उभे राहतात. पण भलत्याच रुपात. फत्तेलाल दामलेंचे पांढ-या स्वच्छ कपड्यातले, चेह-यावर सारे सात्विक भाव दाटलेले, मऊ, मृदू आवाजात बोलणारे, भोळेभाबडे तुकोबाराय. त्याच्या जागी मिशांना पिळ भरलेले, धुवट बाराबंदीच्या बाहया सरसावलेले, हातात सोटा घेतलेले देहूचे तुकोबा उभे राहतात.
‘काय रे? रांडेच्या xxx मी... नेभळट दिसतो काय तुला’? असं दरडावतात. आता पुढचा प्रसंग टळावा म्हणून मी घाईगडबडीनं कॅमेरा बंद करतो. आणि देवळातून सटकतो.  घाईघाईनं कॅमे-याची लेन्स बदलतो.

वाईड अँगल लेन्समधून देहू आणि परिसर न्याहाळू लागतो. तोच बारा मावळ, तोच भंडारा, तोच भामचंद्र, तीच इंद्रायणी, काठावरचं तेच नांदुरकीचं झाड, आणि तोच डोह. ज्यात तुकारामाच्या अभंगाच्या वह्या बुडवल्या. आता मला पु. ल. देशपांडे आठवतात. त्यांच्या ‘तुका म्हणे’ नाटकातली पात्रं जिवंत होतात. देहूजवळच्या सुदुंब-यातले तेली समाजाचे संताजी जगनाडेबुवा. तुकोबांचे लेखक. मंबाजीबुवाला ऐकवतायत, ‘‘केवढ्या भ्रमात आहात तुम्ही मंबाजीबाबा! या वह्या बुडवून अभंग बुडणार? त्याचं नावच ‘अ-भंग’ आहे. त्यांना भंग नाही. मी लिहिलेलं महाराजांचं कवित्व तुम्हाला बुडवता आलं. पण या गेन्या चांभाराच्या तोंडातले अभंग कुठे नेऊन बुडविणार? आज या देहू गावात रोज सकाळी जात्यावर हेच अभंग गायले जातात. मोटेवरचा बैल या अभंगाच्या नादानं शेतं पाजतो. आई लेकराला पोटाशी घेऊन झोपताना या अभंगांची अंगाई गाते. लोहाराच्या मेटावर विठ्ठल नामाच्या गजरात लोखंडाचे घण बसतात. सोनाराचे नाजूक हात या अभंगाच्या तालावर दागिने घडवतात. लोहगावचा रावा महार रस्ते झाडताना हे अभंग गातो. बारा मावळच्या मनात जाऊन बसलेले हे अभंग कसे बुडवणार तुम्ही?’

दुस-या दृश्यात जगनाडेबुवा, अभंग बुडवण्याची आज्ञा देऊन पश्चाताप पावलेले रामेश्वर भटजी आणि त्यांची पत्नी जानकी मावळ खो-यात खेडोपाड्यात, बांधाबांधावर फिरताना दिसतायत. ते काही तरी मागतायत. गोळा करतायत. कागदावर टिपून ठेवतायत. त्याविषयी जगनाडेबुवा सांगतायत, ‘‘वह्या विसर्जित केल्या आणि मी, आई आणि रामेश्वरबाबा निघालो. आईनं गावोगावच्या जात्यावरनं आणि पाळण्याकडनं तुमचे अभंग वेचले. मी शेतमळ्यांतून फिरलो आणि रामेश्वरबाबा गृहस्थांच्या घरात हिंडले. गावागावांतून सा-या मावळ प्रांतात पाखरांसारखं भिरभिर फिरलो आणि हे तुळशीचं बी गोळा करून आणलं.’’
पण या अभंगांमध्ये असं आहे तरी काय? असं विचारायला मी तोंड उघडणार तोच पु. लं.च्या बाजूने प्रचंड देहाचे सुटाबुटातले आचार्य अत्रे येतात. आमची दखलही न घेता इंद्रायणीकडं पाहत आपल्या पहाडी आवाजात अभंग म्हणू लागतात. त्याला  जोडून निरुपणही.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा।।
जगातील सर्व गरीबांना आणि दलितांना नवनीतासारख्या कोमल अंत:करणाने आणि समबुद्धीने जो आपल्या हृदयाशी धरतो, तोच खरा ईश्वराचा अवतार. हे पृथ्वीमोलाचे महान सत्य संसार सागराच्या तळाशी बुडी मारून तुकारामाने बाहेर काढले. जगामधल्या कोणत्या धर्मसंस्थापकाने, तत्वज्ञाने आणि पंडिताने याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचे तत्त्व आजपर्यंत सांगितले आहे?
अहो, आम्हा महाराष्ट्रातल्या माणसांचे केवढे हे भाग्य की, तीनशे वर्षांपूर्वी इंद्रायणीच्या काठी शूद्र कुळात जन्माला आलेला एक सत्पुरुष गेली तीनशे वर्षे सतत आपल्या हातांनी आमच्या डोळ्यांमधले अश्रू पुसत आहे आणि आपल्या अभंगवाणीने आम्हाला आशा देऊन, धीर देऊन, जागृती देऊन, आमचा उद्धार करीत आहे! या महाराष्ट्रातले लक्षावधी भोळेभाबडे, अडाणी आणि गरीब प्रापंचिक लोक गेली तीनशे वर्षे तुकारामाची भाषा बोलत आहेत आणि तुकारामाचे तत्त्वज्ञान सांगत आहेत. एवढ्या साध्या, सुबोध आणि रसाळ भाषेत संसाराचे सार इतके सोपे करून या जगात कुठे कोणी तरी सांगितले असेल काय हो?’’

निरुपण संपवताना अत्रे अचानक आमच्याकडं मोहरा वळवतात. म्हणतात, ‘काय हो, तुम्हाला मी केलेली मराठी माणसाची व्याख्या ठाऊक आहे काय? ‘‘तुकोबाचा निदान एक अभंग ज्याला पाठ येतो, तो मराठी माणूस. ज्याच्या घरी नाही तुकोबाची गाथा, त्याच्या शिरी लाथा हाणा चार’’ चला म्हणून दाखवा एक तरी अभंग.’ आमची उडालेली गाळण पाहत म्हणतात, ‘बरं हे सांगा, तुकाराम सिनेमातल्या शेळपट तुकारामापेक्षा त्याची बाईल ‘आवडी’ उजवी न् खणखणीत का वठलीय?’ आमच्याकडून उत्तराची अपेक्षा न करता तेच म्हणतात, अहो जिजाईचा अभिनय करणारी ती गौरी नावाची नटी अक्षरओळख नसलेली अडाणी बाई होती!’ आणि अत्रे आपल्याच हास्याच्या गडगडाटात हरवून जातात.
मी हळूच भंडा-याच्या वाटेला लागतो. तुकाराम मनात घुमू लागतो. व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात तुकाराम सिनेमानं बाजी मारली. गो-या लोकांनी तोंडाचा आ करून या कुणबटाचे विचार ऐकले. त्यानंतरही तुकारामांवरचे सिनेमे आले आणि गेले. पाऊणशे वर्षे झाली. पण ‘मऊ मेणाहून आम्ही विष्णूदास, कठीण वज्रास भेदू ऐसे’, किंवा ‘भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या काठी देऊ माथा’ असं ठणकावणारे तुकोबा कुठल्याच सिनेमात दिसले नाहीत.

माझ्या तर मनात अनेक पटकथांच्या लडी उलगडतायत. तुकोबांच्या जीवनातल्या ओपनिंग शॉटसची तर गर्दी झालीय. कोणता घ्यावा न् कोणता नको. ‘तुकाराम, तुकाराम नाम घेता कापे यम’ असं म्हणत, शेताच्या बांधावर बाजरीची भाकरी आणि खर्डा हातावर घेऊन खाणारा शेतकरी. तुकारामांचा आवडीचा अभंग म्हणून दाखवणारा त्यांचा लाडका टाळकरी. तुकयाचे अभंग लिहिणारा कडूस गावचा गंगाधरबुवा मवाळ किंवा संताजी जगनाडे. सावकारीची गहाणखतं इंद्रायणीत सोडताना साक्षीदार असलेला तुकयाबंधू कान्होबा, भामनाथाच्या डोंगरावर चार दिवस उपाशी बसलेल्या तुकोबांना भाकरी घेऊन जाणारी कजाग जिजाई, तुकोबांच्या पाईकीच्या अभंगातून प्रेरणा घेत स्वराज्यासाठी जीवाची कुरवंडी करणारा शिवबाचा एखादा मावळा, तुकोबांच्या आयुष्याचा झगडा प्रत्यक्ष पाहणारी सिऊर गावची संत बहेणाई, अभंग बुडवून पश्चाताप पावलेले रामेश्वर भट, शेतातली कामं सुरू करण्यापूर्वी पहाटेच देवळात जमून तुकोबांची भजनं म्हणणारे गावकरी, (प्रत्यक्ष पांडुरंगही गडबडीनं कमरेवरचे हात काढून वीटेवरून खाली उतरेल, असा टाहो फोडून म्हटली जाणारी वारकरी भजनाची ही धुमाळी अजूनही कुठल्याच सिनेमात दिसलेली नाहीत.)
वह्या बुडवल्याच्या निषेधात तुकोबा १४ दिवस ज्या शिळेवर बसले होते ती शिळा, तुकारामांच्या काळातली राजकीय, सामाजिक उलथापालथ आणि भयाण दुष्काळाच्या साक्षीदार असणा-या देहूतल्या विठोबा रखुमाईच्या मूर्ती, अशी कितीतरी दृश्ये. दुसरीकडं ‘डिस्कव्हरी’चा एक सर्व्हे सुरू आहे. शेक्सपिअरच्या जन्मभूमीत राहणा-या किती नागरिकांना शेक्सपिअरच्या साहित्यातले उतारे पाठ आहेत. आणि महाराष्ट्रातल्या अडाणी लोकांना तुकारामाचे किती अभंग पाठ आहेत... 
रिमिक्स होऊद्या, रिमेक होऊद्या, थ्रीडी येऊद्या, डिजिटल येऊद्या. पण प्रतिभावंतहो, तुकारामावर पुन्हा एखादा खणखणीत न् ठणठणीत सिनेमा येऊ द्या हो. तुमचं ऑस्करबिस्कर झक् मारत त्याच्या मागं येतंय की नाही ते बघा.