'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Monday, 17 January 2011

शेंद-या

डोक्याला फेटा, कमरेला उपरणं बांधून कीर्तनकार उभा राहावा तसा. उंच. पंचक्रोशीतून दिसणारा. दिसला तरी आधार वाटणारा, शेंद-या! शनिवारी शेंदरात खुलणा-या हनुमानासारखा हा वैशाखात शेंदरी रंगाच्या आंब्यांनी लगडायचा. म्हणून त्याचं नाव शेंद-या.


शेंद-या पाडाला लागल्याची पहिली खबर लागायची, पोपटांना आणि दुसरी मळ्यातल्या पोरांना. मग शेंद-याखाली उभं राहून एका सुरातपड पड आंब्या, गोडांब्याची आळवणी सुरू व्हायची. या विणवण्याचं कारण याचं आह्यागमनीपण. उंचावरील कै-या भिरकावलेल्या दगडाच्याही टप्प्याबाहेर. पट्टीच्या आंबे उतरणा-यांनाही त्याच्यावर चढायची कधी छाती झाली नाही. पोपटांना मात्र रान मोकळं होतं. त्यांचे हिरवे थवे शेंद-यावर दिवसभर कलकलाट करायचे. त्यांना कोवळ्या कै-या भारी आवडत. त्यांनी खाऊन टाकलेल्या अर्ध्या कै-या पोरं मिटक्या मारीत खात. शिवाय त्यांच्या चोचीतून सुटलेले पाड मटकावण्यासाठी मोठी स्पर्धा लागायची. लाल-शेंदरी पाड कावळ्यांनाही खाद्य वाटायचं. मग कावळेबुवाही एखादा पाड पळवत. विहिरीच्या थारोळ्यावर बसून खायला सुरुवात करत. पण हा आपला जिन्नस नाही, हे लक्षात आल्यावर सोडून देत.

Sunday, 16 January 2011

फौजी रगडा

२६ जानेवारी. दिल्लीत राजपथावर लष्कराचं शानदार संचलन सुरू आहे. टीव्हीवर पाहूनच अंगावर रोमांच उठतायत. आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्यात. ९५च्या जानेवारीत मीही राजपथावर होतो.  त्याचा अनुभव लोकमतच्या 9 डिसेंबर 2003च्यामैत्र पुरवणीत लिहिला होता.     


दरवर्षी हिवाळा आला की लष्करी शिस्त आठवते. दिल्लीच्या हुडहुडी भरवणा-या थंडीत लष्करासोबतच्या कवायती. प्रजासत्ताक दिन संचलन अर्थात आरडी परेडचा सळसळता उत्साह. राजधानीतला तो लष्करी रुबाब अनुभवण्यासाठी एनसीसी कॅडेट जीवाचं रान करतात.
रिपब्लिकन डे परेड कॅम्प नवी दिल्लीत सुरू होतो, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. गॅरिसन परेड ग्राऊंड परिसरात. आरडी परेडमध्ये सहभागी होणा-या भारताच्या निवडक सैन्यदलानंही इथंच डेरा टाकलेला असतो.

Thursday, 13 January 2011

म्हैस

म्हैस नावाचं हे ललित मी पुणे सकाळच्या १९ मार्च २००६च्या सप्तरंग पुरवणीत लिहिलं होतं. खूप लोकांनी ते आवडल्याचं कळवलं. हे ललित म्हणजे आमच्या म्हशीची खरीखुरी गोष्ट आहे...

कृपया फोटोवर क्लिक करा

Monday, 10 January 2011

पुण्यातील देवळे

भाविकहो, कशी कोण जाणे या अगोदरची मंदिरं ब्लॉवरून उडाली आहेत. देवाची इच्छा. शोधून काढून पुन्हा टाकतो.... 
..............................................................................


भाविकहो, पुण्यात मुलुखावेगळ्या नावांचे आणखी देव सापडले आहेत..:) म्हणजे मला जुन्या कागदांमध्ये या देवांविषयीची माहिती आणि फोटो सापडले आहेत.  ते या जुन्या कात्रणांमध्ये डकवून देत आहे...

बिजवर विष्णू


शनिवार पेठेतील श्री विष्णू मंदिरात विष्णूची सुबक मूर्ती आहे. या मूर्तीशेजारीच श्री लक्ष्मीचीही मूर्ती आहे. पण ही मूर्ती लहान आहे. विष्णू-लक्ष्मीचा हा जोडा काहीसा विजोड वाटतो. त्यामुळे ही विष्णूची दुसरी बायको असावी, असा अंदाज बांधून पुणेकरांनी या विष्णूला बिजवर विष्णू नाव ठेवले.

Thursday, 6 January 2011

एग्रोवन

मुंबईतल्या धबडग्यात, गर्दीच्या वेळी स्टेशनवरच्या बाकड्यावर बसून एक माणूस अगदी मन लावून पेपर वाचत होता. मला त्या माणसाबद्दल फारच आदर वाटला. जवळ जाऊन पाहिलं तर त्याच्या हातात 'एग्रोवन' दिसला.  अन् आदर एकदम दुणावला. एग्रोवन नावाचं कृषीदैनिक ही एक भन्नाट आयडिया. मी त्याच्या पायाचा दगड.  एग्रोवनच्या वर्षपूर्तीनिमित्त 'सकाळ'मध्ये मी एक लेख लिहिला होता...


कृपया फोटोवर क्लिक करा

Monday, 20 December 2010

अमृताचा घनू

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा ८२वा वाढदिवस होता. 'आयबीएन-लोकमत'तर्फे पं. हृदयनाथ मंगेशकरांनी लतादीदींची दीर्घ मुलाखत घेतली. मी ती शब्दबद्ध केली. लोकमतनं ही मुलाखत सर्व आवृत्त्यांमध्ये छापली...



लता मंगेशकर ..!
कोट्यवधी रसिकमने झंकारणारा स्वर्गीय सूर... गेली ६८ वर्षे हा अमृताचा घनू अखंडपणे बरसतो आहे... या गानकोकिळेनं अर्थात रसिकांच्या लाडक्या लतादीदींनी आयुष्यातील काही अस्पर्श क्षण अजूनही जपून ठेवले आहेत. हा ठेवा त्यांनी उघड केलाय, 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना. त्यांच्या ८२व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा मनमोकळा संवाद साधलाय, त्यांचा लाडका बाळ अर्थात पं. हृदयनाथ मंगेशकरांशी....


पं. हृदयनाथ मंगेशकर - दीदी तू गेली ६८ वर्षे गातेस. १९४२ला बाबा गेले, त्याच वर्षी तू गायला सुरुवात केलीस. आता मागे वळून बघताना तुला काय वाटते?

लता मंगेशकर - गेले ते दिवस खूप चांगले गेले. मी ६८ वर्षांपेक्षा जास्त गाते आहे. ९ वर्षांची असताना सोलापूरला थिएटरमध्ये बाबांसोबत मी क्लासिकल प्रोग्रॅम केला. १९३८-३९ सालची ही गोष्ट आहे. त्याच्याही आधी मी गात होते. बाबांसोबत मी अनेक कार्यक्रम केले. आपली बलवंत संगीत मंडळी कंपनी बंद झाल्यानंतर मी बाबांसोबत प्रत्येक कार्यक्रमात गायले.

बहुजनांचे कैवारी ठाकरे आणि अत्रे...

माझा द्रष्टा मित्र सचिन परब प्रबोधनकार ठाकरेंची वेबसाईट बनवत होता. मला म्हणाला, पत्रकार आचार्य अत्रेंवर पीएच. डी. केली आहेस ना, मग दे एक लेख लिहून. अत्रे आणि ठाकरेंवर. म्हटलं, आनंदानं! त्याप्रमाणं लेख लिहिला. त्यानं तो छापला...



महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव साजरा होत आहे. हुतात्म्यांचे स्मरण केले जात आहे.
समारंभ, सत्काराचे कार्यक्रम होत आहेत. महाराष्ट्र संस्कृतीचे गोडवे गायले जात
आहेत. आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाचे आकडे सादर केले जात आहेत...सगळीकडं
असा उत्सव सुरू असताना एका बाबीकडं मात्र दुर्लक्ष होत आहे. केले जात आहे. ती
बाब म्हणजे महाराष्ट्राचा पुरोगामीपणा, सामाजिक न्यायाचा, सुधारणांचा वारसा. त्याची आठवणही कोणाला होताना दिसत नाही. नेत्यांनी ती दिली, तरी जनतेला त्यांचा भरोसा वाटणार नाही. राजकारणाचा धंदा थाटणार्‍या मंडळींपैकी आता कुणीही आपला कैवार घेणार नाही, याची लोकांना पक्की खात्री झालेली आहे.
अशा वेळी काही वर्षांपूर्वी मराठी मनांवर राज्य करणार्‍या दोघा शिलेदारांची,
रयतेच्या कैवार्‍यांची महाराष्ट्रातील जनतेला तीव्र आठवण येत आहे. अत्रे आणि
ठाकरे!...महाराष्ट्राच्या समाजजीवनातील दोन जागले... त्यांच्या कार्याविषयी,
मैत्रीविषयी अनेक चर्चा, किस्से, वाद, अफवा प्रत्येक मराठी माणसाने ऐकलेल्या
असतात. पण सर्वच लोकोत्तर पुरुषांचे दुदैर्व त्यांच्याही वाट्याला आले. ते
म्हणजे त्यांचे खरे विचार बाजूला पडले...ठाकरे फोटोपुरते आणि अत्रे विनोदापुरते
उरले.