'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Wednesday, 9 February 2011

मुंबईकर

आयुष्यात घडलेल्या प्रत्येक प्रसंगाची पहिली आठवण लिहून ठेवायची असं मध्यंतरी ठरवलं होतं. पण ठरवलेलं काही होत नाही. मुंबईच्या पहिल्या दर्शनाची आठवण लिहून ठेवली होती. परवा सामान उचकताना ते कागद सापडले. खूप विस्कळीत वाटलं. पण म्हटलं चला, आठवण तर आहे, लिहून ठेललेली. टाकूयात ब्लॉगवर... 

आई
‘गाडी घोड्याला जप रं बाबा...’ लोकलमधल्या ‘दाबजोर’ गर्दीतून स्वत:ला सोडवून घेताना आई आठवली. मी पुण्याला निघालो की, ती काळजी करत बसायची. पाठ फिरवून निघालो की, म्हणायची, ‘गाडी घोड्याला जप रं बाबा..!’ ट्रॅफिकमधून वाट काढताना आईचे शब्द पुन्हा ऐकू यायचे. आयुष्य रानातल्या वस्तीवर काढलेल्या आईची एकदा पुण्याच्या ट्रॅफिकनं मोठी तारांबळ उडवली होती. गजबजलेल्या चौकांमधली गाड्यांची थप्पी,..हॉर्न..कर्कश ब्रेक..आणि आपल्याच नादात धावणारी गर्दी...आईला हे आवडत नाही. घरी, शेतात, गुराढोरांमध्ये कधी जाईन असं तिला होतं.
कॉलेजसाठी का होईना, शहराची वाट धरावीच लागली. निरोप देताना आईचं पुन्हा ‘गाडी-घोडा’ पालुपद सुरू झालं. म्हणालो, ‘गाडी-घोड्याचा जमाना गेला आई..’ त्यावर ‘कुत्रं मागं लागल्यासारखं जो तो पळत असतो तिथं. माणसाला माणूस वळखीत नाय. जपून राहा...’ असं ती पुटपुटली. आईला अनोळखी असणारी ही गर्दी पहिल्यांदा दिसली सिग्नलला. एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या पलटणीच जणू. महाभारताच्या रणांगणाप्रमाणं फक्त ‘आक्रमण..’असं म्हणायचंच तेवढं बाकी.

Monday, 17 January 2011

शेंद-या

डोक्याला फेटा, कमरेला उपरणं बांधून कीर्तनकार उभा राहावा तसा. उंच. पंचक्रोशीतून दिसणारा. दिसला तरी आधार वाटणारा, शेंद-या! शनिवारी शेंदरात खुलणा-या हनुमानासारखा हा वैशाखात शेंदरी रंगाच्या आंब्यांनी लगडायचा. म्हणून त्याचं नाव शेंद-या.


शेंद-या पाडाला लागल्याची पहिली खबर लागायची, पोपटांना आणि दुसरी मळ्यातल्या पोरांना. मग शेंद-याखाली उभं राहून एका सुरात ‘पड पड आंब्या, गोडांब्या’ची आळवणी सुरू व्हायची. या विणवण्याचं कारण याचं ‘आह्यागमनी’पण. उंचावरील कै-या भिरकावलेल्या दगडाच्याही टप्प्याबाहेर. पट्टीच्या आंबे उतरणा-यांनाही त्याच्यावर चढायची कधी छाती झाली नाही. पोपटांना मात्र रान मोकळं होतं. त्यांचे हिरवे थवे शेंद-यावर दिवसभर कलकलाट करायचे. त्यांना कोवळ्या कै-या भारी आवडत. त्यांनी खाऊन टाकलेल्या अर्ध्या कै-या पोरं मिटक्या मारीत खात. शिवाय त्यांच्या चोचीतून सुटलेले पाड मटकावण्यासाठी मोठी स्पर्धा लागायची. लाल-शेंदरी पाड कावळ्यांनाही ‘खाद्य’ वाटायचं. मग कावळेबुवाही एखादा पाड पळवत. विहिरीच्या थारोळ्यावर बसून खायला सुरुवात करत. पण हा आपला ‘जिन्नस’ नाही, हे लक्षात आल्यावर सोडून देत.

Sunday, 16 January 2011

फौजी रगडा

२६ जानेवारी. दिल्लीत राजपथावर लष्कराचं शानदार संचलन सुरू आहे. टीव्हीवर पाहूनच अंगावर रोमांच उठतायत. आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्यात. ९५च्या जानेवारीत मीही राजपथावर होतो.  त्याचा अनुभव लोकमतच्या 9 डिसेंबर 2003च्या ‘मैत्र’ पुरवणीत लिहिला होता.     


दरवर्षी हिवाळा आला की लष्करी शिस्त आठवते. दिल्लीच्या हुडहुडी भरवणा-या थंडीत लष्करासोबतच्या कवायती. प्रजासत्ताक दिन संचलन अर्थात आरडी परेडचा सळसळता उत्साह. राजधानीतला तो लष्करी रुबाब अनुभवण्यासाठी एनसीसी कॅडेट जीवाचं रान करतात.
रिपब्लिकन डे परेड कॅम्प नवी दिल्लीत सुरू होतो, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. गॅरिसन परेड ग्राऊंड परिसरात. आरडी परेडमध्ये सहभागी होणा-या भारताच्या निवडक सैन्यदलानंही इथंच डेरा टाकलेला असतो.

Thursday, 13 January 2011

म्हैस

म्हैस नावाचं हे ललित मी पुणे सकाळच्या १९ मार्च २००६च्या सप्तरंग पुरवणीत लिहिलं होतं. खूप लोकांनी ते आवडल्याचं कळवलं. हे ललित म्हणजे आमच्या म्हशीची खरीखुरी गोष्ट आहे...

कृपया फोटोवर क्लिक करा

Monday, 10 January 2011

पुण्यातील देवळे

भाविकहो, कशी कोण जाणे या अगोदरची मंदिरं ब्लॉवरून उडाली आहेत. देवाची इच्छा. शोधून काढून पुन्हा टाकतो.... 
..............................................................................


भाविकहो, पुण्यात मुलुखावेगळ्या नावांचे आणखी देव सापडले आहेत..:) म्हणजे मला जुन्या कागदांमध्ये या देवांविषयीची माहिती आणि फोटो सापडले आहेत.  ते या जुन्या कात्रणांमध्ये डकवून देत आहे...

बिजवर विष्णू


शनिवार पेठेतील श्री विष्णू मंदिरात विष्णूची सुबक मूर्ती आहे. या मूर्तीशेजारीच श्री लक्ष्मीचीही मूर्ती आहे. पण ही मूर्ती लहान आहे. विष्णू-लक्ष्मीचा हा जोडा काहीसा विजोड वाटतो. त्यामुळे ही विष्णूची दुसरी बायको असावी, असा अंदाज बांधून पुणेकरांनी या विष्णूला बिजवर विष्णू नाव ठेवले.

Thursday, 6 January 2011

एग्रोवन

मुंबईतल्या धबडग्यात, गर्दीच्या वेळी स्टेशनवरच्या बाकड्यावर बसून एक माणूस अगदी मन लावून पेपर वाचत होता. मला त्या माणसाबद्दल फारच आदर वाटला. जवळ जाऊन पाहिलं तर त्याच्या हातात 'एग्रोवन' दिसला.  अन् आदर एकदम दुणावला. एग्रोवन नावाचं कृषीदैनिक ही एक भन्नाट आयडिया. मी त्याच्या पायाचा दगड.  एग्रोवनच्या वर्षपूर्तीनिमित्त 'सकाळ'मध्ये मी एक लेख लिहिला होता...


कृपया फोटोवर क्लिक करा

Monday, 20 December 2010

अमृताचा घनू

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा ८२वा वाढदिवस होता. 'आयबीएन-लोकमत'तर्फे पं. हृदयनाथ मंगेशकरांनी लतादीदींची दीर्घ मुलाखत घेतली. मी ती शब्दबद्ध केली. लोकमतनं ही मुलाखत सर्व आवृत्त्यांमध्ये छापली...



लता मंगेशकर ..!
कोट्यवधी रसिकमने झंकारणारा स्वर्गीय सूर... गेली ६८ वर्षे हा अमृताचा घनू अखंडपणे बरसतो आहे... या गानकोकिळेनं अर्थात रसिकांच्या लाडक्या लतादीदींनी आयुष्यातील काही अस्पर्श क्षण अजूनही जपून ठेवले आहेत. हा ठेवा त्यांनी उघड केलाय, 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना. त्यांच्या ८२व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा मनमोकळा संवाद साधलाय, त्यांचा लाडका बाळ अर्थात पं. हृदयनाथ मंगेशकरांशी....


पं. हृदयनाथ मंगेशकर - दीदी तू गेली ६८ वर्षे गातेस. १९४२ला बाबा गेले, त्याच वर्षी तू गायला सुरुवात केलीस. आता मागे वळून बघताना तुला काय वाटते?

लता मंगेशकर - गेले ते दिवस खूप चांगले गेले. मी ६८ वर्षांपेक्षा जास्त गाते आहे. ९ वर्षांची असताना सोलापूरला थिएटरमध्ये बाबांसोबत मी क्लासिकल प्रोग्रॅम केला. १९३८-३९ सालची ही गोष्ट आहे. त्याच्याही आधी मी गात होते. बाबांसोबत मी अनेक कार्यक्रम केले. आपली बलवंत संगीत मंडळी कंपनी बंद झाल्यानंतर मी बाबांसोबत प्रत्येक कार्यक्रमात गायले.