'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Thursday, 24 March 2011

देव देईल विसावा

२००५च्या आषाढी वारीला गेलो होतो. निमित्त होतं, 'एग्रोवन'चं रिपोर्टींग. वारीहून आल्यावर एक लेख लिहिला. त्याचं नाव, 'देव देईल विसावा'...

                                कृपया फोटोवर क्लिक करा

Wednesday, 23 March 2011

त्यांची सुट्टी

परीक्षा सुरू आहे, पण सुट्टीचे वेध लागलेत. सुट्टीचे प्लॅन्स आखले जातायत. छंदवर्गांची चौकशी केली जातेय.
पुण्यात 'लोकमत'मध्ये होतो तेव्हा, मुलांसाठी सुट्टीच्या पानाची चर्चा सुरू होती. मला विचारलं. म्हटलं लिहितो.
अवतीभोवती दिसणारी किती तरी पोरं आठवली. त्यांच्याशी बोलण्याची हे आणखी एक निमित्त.
बोललो आणि त्यांच्याच भाषेत लिहून काढलं. त्यापैकी काही कात्रणं हाताला लागलीत.
कृपया फोटोवर क्लिक करून वाचा...

कृपया फोटोवर क्लिक करा

Friday, 18 March 2011

डोरेमॉनचा देश

कुठल्या मातीची बनलीत ही माणसं कोणास ठाऊक? संकटांवर संकटं कोसळतात. हा हा म्हणता होत्याचं नव्हतं होतं. पण ही माणसं पुन्हा उभी राहतात. जगात नंबर वन होतात. ही केवळ तंत्रज्ञानाची जादू नव्हे बरं का. तिथल्या कष्टाळू, निकोप आणि एकोपा जपणा-या समाजाची ही ताकद आहे. आणि या समाजाचं प्रतिबिंब पाहायचं असेल ना, तर तुमच्या घरातली पोरं सध्या कोणती कार्टून्स पाहतात ते पाहा. ही सगळी कार्टून्स आहेत, जपानी! जपानमधलं समाजजीवन दाखवणारी. हॉलीवूडप्रमाणं कुठलीही भव्यदिव्यता, भपकेबाजपणा नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा बडेजाव नाही की पौराणिक कथा, राजपुत्र-राजकन्येच्या भरजरी गोष्टी नाहीत. आदर्शांचं अवडंबर नाही.
या कार्टूनमध्ये आहेत, अगदी साधी सरळ, आपल्याला अवती-भोवती दिसणारी, सामान्य जीवन जगणारी, आपल्याच कुटुंबातली वाटणारी पात्रं.
यात निगुतीनं घर चालवणारी आई आहे. कामावर जाणारे बाबा आहेत. प्रेमळ आजी-आजोबा आहेत. शाळा आहे, शिक्षक आहेत. लाडकं कुत्रं आहे, मांजर आहे. खेळणं आहे, भांडणं आहे. आनंद, दु:ख, हेवे-दावे, राग-लोभ प्रेम सारं सारं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उपेक्षेचे धनी असलेले सुमार विद्यार्थी यांच्या कार्टून्सचे हिरो आहेत.


चुकून सोमवारी घरी होतो. बोनस म्हणून आमच्या बहुउद्योगी बाळराजांना सुट्टी होती. त्यामुळं टीव्ही फुल्ल व्हॉल्यूममध्ये अखंड सुरू होता. 'नोबिता', 'सुझुका', 'जियान' आणि 'डोरेमॉन'चा गोंधळ सुरू होता. त्यांचा मंडे अर्थात डोरेमन डेहोता.

Thursday, 17 March 2011

अनुभव

आयुष्यातला एक योगायोग असा की पत्रकारितेच्या एवढ्याशा आयुष्यात मराठीतले नामवंत संपादक 'बॉस'  म्हणून अनुभवले. कुमार केतकर, अरूण टीकेकर, निखिल वागळे, भारतकुमार राऊत, विजय कुवळेकर, यमाजी मालकर आणि थोर पत्रकार अनंत भालेराव यांचे चिरंजीव, निशिकांत भालेराव. तुमचा आजचा अग्रलेख काही धड नाही, असं बिनदिक्कत तोंडावर सांगणा-या आपल्या रिपोर्टरशी भालेराव अत्यंत शांतपणे चर्चा करायचे. रंग दे बसंतीसिनेमा पाहून आल्यावर मी उस्फूर्तपणे सकाळच्या पुरवणीत अनुभव लिहिला. तो वाचून काही न बोलता यांनी नोटीस बोर्डावर चांगलं लिहिल्याबद्दल लेखी कौतुक केलं होतं. तोच हा अनुभव...

कृपया फोटोवर क्लिक करा


Saturday, 12 March 2011

आम्ही संपादक होतो!

''आम्हीही एके काळी संपादक होतो!'' असं मी छातीठोकपणे सांगू शकतो.:) पत्रकारितेचा विद्यार्थी असताना संपादन केलेला हा अंक...

कृपया फोटोवर क्लिक करा

कृपया फोटोवर क्लिक करा

Sunday, 6 March 2011

माळावरचा वेडा

परवा मुंबईतल्या काही भागात पाणीकपात होती. बातमी वाचताना अचानक अरूण देशपांडे आठवले. सोलापूरचे. लगेच फोन केला. तर म्हणाले, कधी येताय इकडं? मारा आता टायटॅनिकमधून उडी..!’


अरूण देशपांडे म्हणजे एकदम सटक माणूस. जग कुठं चाललंय आणि याचं भलतंच...असं प्रथमदर्शनी तरी याचं बोलणं ऐकून वाटतं. १ लीटर दूध बनवण्यासाठी १० हजार लीटर पाणी लागतं. १ किलो मटण तयार होण्यासाठी ३५ हजार लीटर पाणी लागतं. शेतीमालाच्या विक्रीतून फक्त १ रुपया मिळवण्यासाठी १ हजार लीटर पाणी खर्च करावं लागतं. १ पंखा दिवसभर सुरू ठेवण्यासाठी कोयनेतलं शेकडो टन पाणी समुद्रात सोडावं लागतं...असा अफलातून हिशोब हा माणूस मांडतो. पण तो पुढं बोलत जातो, तसं आपण फारच अपराधी आहोत, असं वाटायला लागतं.

Wednesday, 9 February 2011

मुंबईकर

आयुष्यात घडलेल्या प्रत्येक प्रसंगाची पहिली आठवण लिहून ठेवायची असं मध्यंतरी ठरवलं होतं. पण ठरवलेलं काही होत नाही. मुंबईच्या पहिल्या दर्शनाची आठवण लिहून ठेवली होती. परवा सामान उचकताना ते कागद सापडले. खूप विस्कळीत वाटलं. पण म्हटलं चला, आठवण तर आहे, लिहून ठेललेली. टाकूयात ब्लॉगवर... 

आई
गाडी घोड्याला जप रं बाबा... लोकलमधल्या दाबजोर गर्दीतून स्वत:ला सोडवून घेताना आई आठवली. मी पुण्याला निघालो की, ती काळजी करत बसायची. पाठ फिरवून निघालो की, म्हणायची, गाडी घोड्याला जप रं बाबा..!’ ट्रॅफिकमधून वाट काढताना आईचे शब्द पुन्हा ऐकू यायचे. आयुष्य रानातल्या वस्तीवर काढलेल्या आईची एकदा पुण्याच्या ट्रॅफिकनं मोठी तारांबळ उडवली होती. गजबजलेल्या चौकांमधली गाड्यांची थप्पी,..हॉर्न..कर्कश ब्रेक..आणि आपल्याच नादात धावणारी गर्दी...आईला हे आवडत नाही. घरी, शेतात, गुराढोरांमध्ये कधी जाईन असं तिला होतं.
कॉलेजसाठी का होईना, शहराची वाट धरावीच लागली. निरोप देताना आईचं पुन्हा गाडी-घोडा पालुपद सुरू झालं. म्हणालो, गाडी-घोड्याचा जमाना गेला आई.. त्यावर कुत्रं मागं लागल्यासारखं जो तो पळत असतो तिथं. माणसाला माणूस वळखीत नाय. जपून राहा... असं ती पुटपुटली. आईला अनोळखी असणारी ही गर्दी पहिल्यांदा दिसली सिग्नलला. एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या पलटणीच जणू. महाभारताच्या रणांगणाप्रमाणं फक्त आक्रमण..असं म्हणायचंच तेवढं बाकी.